पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होतेय आणि कधी आपण वाचतोय अशी काहीशी मनाची अवस्था झाली होती. अशात ११ एप्रिल २०२६  रोजी महात्मा फुले यांच्या दोनशेव्या जयंती वर्षाला हे पुस्तक प्रकाशित झालं. 

   संजय विष्णू साठे यांचं पुस्तकाच्या मध्यवर्ती कल्पनेला न्याय देणारं मुखपृष्ठ आवडलं. विशेषतः या लेखमालेला पुस्तकरूपात आणताना, ‘बाभळीच्या बाया झरी-जामनी तालुक्यात’ या शीर्षकरूपात सादर करणं खूपच अर्थपूर्ण वाटलं. लेखिकेने आपल्या आईला हे पुस्तक समर्पित करत असताना, ‘बाईला नात्याच्या कुंपणापल्याड जाऊन समजून घेता आलं पाहिजे,’ ही आईने दिलेली शिकवण लेखिका पानोपानी सजगपणे निभावताना दिसते. म्हणून तर या बाभळीच्या बायांमधील प्रत्येक बाईकडे लेखिका एक स्वतंत्र व्यक्ती, एक स्वतंत्र मूल्य, एक स्वतंत्र विचार या दृष्टिकोणातून कुठल्याही अभिनिवेशाशिवाय एक निखळ माणूस म्हणून पाहताना दिसते. खूप कमी पुस्तकांत असं निखळ माणूसपण अनुभवायला मिळतं – ही या पुस्तकाची एक खासियत म्हणून नोंदवता येईल.

बाभळीच्या बाया कसे लिहून झाले? या संदर्भातले लेखिकेचे मनोगत या पुस्तकामागील वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे आहे. पहिल्याच पानावर लिहिलेले,  ‘कुठलीही पुस्तकं वाचताना सर्वात आधी बघावं, की लेखक कोण आहे? त्याचं सामाजिक-आर्थिक स्थान काय आहे? पुस्तक कुठल्या काळात लिहिलं गेलंय आणि ह्यात कुणाचा परिप्रेक्ष्य वगळला गेलाय? हे तपासल्याने आपली आकलनाची क्षमता वाढते.’ या सर्व कसोट्या प्रस्तुत पुस्तकाला लावू पाहता, यातून वाचकाच्या आकलनाच्या क्षमता कैकपटीने वाढल्याचा अनुभव कोणाही सजग वाचकाला आल्याशिवाय राहणार नाही. या आकलनातून फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेतून लेखिकेचं व्यक्तिमत्त्व पानोपानी फुलत गेल्याचं पाहायला मिळतं.

      लेखिकेची आई वसुधा गोसावी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिप्रिय शिक्षिका. विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्या कायम धडपडत. या धडपडीतूनच त्यांनी स्वतःच्या मुलीला शिक्षणाचे, समतेचे, धैर्याचे भिंग दिले. त्यातून सभोवतालाकडे डोळसपणे पाहण्याची विवेकी दृष्टी दिली; म्हणून लेखिका सांगते, की माझ्या बायांचे शिक्षण मला सुरुवातीपासूनच महत्त्वाचे वाटत आले आहे; कारण शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून ते सामाजिक भान, वैज्ञानिक दृष्टिकोण, विवेक व आयुष्याकडे बघण्याचा डोळसपणा देतं. हे लेखिकेचं ठाम मत असल्याचं ती आवर्जून सांगते व त्यासाठी ती वाटेल तेवढे कष्ट घ्यायला तयार असल्याचे या पुस्तकातून पुन्हा पुन्हा जाणवत राहते.

    पूजा ही लेखिकेच्या आईच्या शाळेतली सर्वात हुशार मुलगी. गावातल्या कोणा एकाच्या प्रेमात पडते.  प्रेमप्रकरणातनं एकमेकांची साथ निभावण्याच्या आणाभाका होतात. त्यातनं ती गरोदर राहते. लग्नासाठी मुलाकडच्यांना विनवण्या करते. गावभर त्याची बातमी पसरते. आई-वडील तिचं घराबाहेर जाणं बंद करतात. पर्यायाने तिचं शिक्षण थांबतं आणि वर्गातली सर्वात हुशार मुलगी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवते. एक प्रवास सुरू होण्याअगोदरच कायमचा संपून जातो पुन्हा कधीच न सुरू होण्यासाठी! 

     दुसरी एक अशीच घटना. जन्मदाता बापच शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करतो. त्यातून ती मुलगी कोमेजून जाते. गोसावी मॅडमना हे सर्व सांगते. त्यांच्या पुढाकाराने नराधम बापाला तुरुंगवासाची शिक्षा होते; पण त्या गरीब, बिचाऱ्या, निष्पाप मुलीचं शिक्षण थांबतं. यातून लेखिकेच्या मनातला लिंगभाव जागा होतो नि प्रत्येक वेळी या पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांना त्याची कशी किंमत मोजावी लागते हे तिच्या नजरेतून काही केल्या सुटत नाही. त्यामुळेच की काय या पुस्तकातील प्रत्येक लेखात तुम्हांला लिंगभावाचा काही एक वेगळा विचार, नवा दृष्टिकोण  पाहायला मिळत राहतो. हीच लेखिकेची मूळ प्रेरणा आहे असे वाटायला लागते.

   या पुस्तकात मनोगतासह एकूण१८ लेख आहेत. सुरवंट या पहिल्या लेखातून या कामाकडे लेखिका कशी वळली? प्रेमभंगातल्या नैराश्यातून आयुष्याला आलेली मरगळ तिने कशी झटकून दिली याचं वर्णन वाचायला मिळतं. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधून समाजकार्याचे शिक्षण, घरच्यांनी, मित्रपरिवाराने दिलेला आधार, कोविड काळ, एका नावाजलेल्या भारतीय कंपनीत सीएसआर डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्यूटिव्ह या पदावर नियुक्ती होणं आणि त्यातून बाभळीच्या बायांचा तिच्या जीवनात प्रवेश होणं याची मांडणी केली आहे. पुढच्या सर्व प्रकरणांमध्ये आपल्या कामाच्या निमित्ताने या झरी- जामणीतल्या वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित बायांना तिने आपलंसं कसं केलं? त्यांच्याशी एकरूपता कशी साधली? याचं वरचेवर वर्णन येत राहतं. या स्त्रियांसाठी वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणं, प्रशिक्षणात नावीन्य आणणं, त्यांना आत्मविश्वास देत राहणं, त्यांच्यातील स्वजाणीव जागृत ठेवणं अशा कैक गोष्टी आपल्याला भेटत राहतात. विशेषतः त्यासाठी प्रबोधनात्मक गाणी, चित्रपट, दृश्यमाध्यमे, सहली,या  गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. 

    बायांच्या पहिल्याच मीटिंगच्या वेळी, 

‘तू यावं… तू यावं… बंधन तोडीत यावं…’ 

या चळवळीतील गाण्याचा झालेला परिणाम सांगताना शेवटी लेखिका लिहिते, ‘कला ही द्वेषाच्या गाठी सैल करते हे मी अनुभवत होते.’ प्रत्यक्षात हा अनुभव फक्त लेखिकेचा राहत नाही तर तो वाचकांचाही अनुभव होऊन जातो हेही या पुस्तकाचे एक वेगळेपण सांगता येईल. 

   या पुस्तकातील लेखांच्या शीर्षकावर एक नजर टाकली तरीही त्यातलं वेगळेपण सहजच वाचणाऱ्याच्या मनात काहीतरी नवं आपल्या हाती लागणार आहे याचा विश्वास जागवल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ : आमचा आपला दिवस, मेरा नकाब कहॉं है? भविष्याचा प्रिंट आऊट, मनीषा दिल से जिंकलेली, आशावादी सपना, ये लढाई लंबी है, सरपंचीनबाई, आमची लांची, संविधान दिन अशा शीर्षकांतून आपल्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. या वंचित, फारशा न शिकलेल्या स्त्रियांसाठी लेखिकेने सीएसआरच्या माध्यमातून केलेली विकास कामे खूप महत्त्वाची वाटतात. त्यातून तिने त्यांच्यातला जागवलेला आत्मविश्वास, त्यांना दिलेली स्वत्वाची ओळख, स्वतःकडे व सभोवतालाकडे पाहण्याची दिलेली डोळसदृष्टी, गाव -भूगोल -जात -आरोग्य यांच्याकडे पाहण्याचा दिलेला निखळ दृष्टिकोण, या बायांचं प्रशिक्षणाच्या निमित्ताने नाचणं, बागडणं, मनसोक्त पोहणं, आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणं, हॉटेलमध्ये एक दिवस  तिथल्या सर्व पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणं, तेथील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून स्वतःचं  वर्चस्व प्रस्थापित करणं अशा कितीतरी गोष्टी वाचकांच्या मनात आशा जागवणाऱ्या आहेत.

 यातल्या काही स्त्रिया लग्नानंतर पंधरा-वीस वर्षांनंतरसुद्धा १७ नंबरचा फॉर्म भरून आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करतात; एवढेच नव्हे तर ८३% गुण घेऊन पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतात. हे खरोखरच खूप विलक्षण आहे. या शिक्षणातूनच त्या स्वतःचं  घरही उभारताना दिसतात. आपल्या वाट्याला जी उपेक्षा आली ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, त्यांनी खूप चांगलं शिकावं, पुढे जावं असा ध्यासही त्यांच्या चित्रणातून आपल्याला दिसत राहतो.

   सरपंचीनबाई या लेखातून स्त्रियांना राजकीय आरक्षण मिळालेलं असलं तरीही त्यांच्या हाती प्रत्यक्ष सत्ता येण्यासाठी त्यांना काय काय दिव्य करावं लागतं याचाही लेखिकेने खूप चांगला आढावा घेतलेला आहे‌. विशेषतः यातल्या दोन सरपंचीन बाई  स्वतःची स्वतंत्र ओळख असणाऱ्या आहेत‌. देवधर्माला फाटा देऊन विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या आहेत. हे वाचून खूपच भारी वाटतं. गृहपाठ या लेखातून स्त्रियांच्या लैंगिक जीवनातील क्लोटीरिझमपासून मिळणारा ऑरगॅझम अनुभवण्याचा बायांना दिलेला गृहपाठ विलक्षण म्हणावा असाच आहे. खरी गंमत रूढार्थाने ज्यांना आपण अशिक्षित मानतो, मागास मानतो त्या बायांनी तो गृहपाठ आनंदाने पूर्ण करणं आणि त्यातनं एक वेगळी दृष्टी वाचकांसमोर मांडणं हे खरोखरच कमालीचं आहे. या संदर्भात आजही आपल्याकडे स्त्री आणि पुरुष या दोघांचंही खूप प्रबोधन होणं गरजेचं आहे. या निमित्ताने डॉ.अंजली जोशी यांच्या, ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या पुस्तकाचे महत्त्व आणखीच अधोरेखित होते. 

    शेवटी मनोरुग्ण लांचीला चांगला आधार मिळण्यासाठी, तिची चांगली जडण-घडण होण्यासाठी तिला मानसोपचार आधार केंद्रात पाठवण्यासाठी लेखिका आपल्या बायांसह जी धडपड करते, जो आटापिटा करते आणि त्यातून तिला जो आनंद मिळतो, समाधान मिळते ते खूप मोलाचे आहे. ‘संविधान दिन’ या लेखाने या पुस्तकाचा शेवट झाला आहे. संविधान विरोधकांना संविधानाचाच आधार घेऊन या बाया कशा आगळ्यवेगळ्या पद्धतीने संविधान दिन साजरा करतात ते मुळापासून या पुस्तकात  वाचण्यातच खरी मजा आहे. शेवटी या लेखमालेवरच्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रियांनी हे पुस्तक संपते. पुस्तक वाचून जरी संपले तरी मनात सुरू राहते हेही या पुस्तकाचे बलस्थान म्हणता येईल‌.

    लेखिका या पुस्तकातल्या मनोगतात म्हणते, की ‘मी झरी जामणीला नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय. त्यांची प्रगती झालीय. त्यांचं भलं झालंय असं लोकांना वाटत राहतं. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालेतून निसटून गेलेल्या माझ्या जडणघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. तो असा, की जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला त्यापेक्षा काही पटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला‌. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला‌. संघर्षाचं बळ दिलं.’ तर असं हे पुस्तक स्त्रीवादी चळवळीत कार्य करणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने तसेच लिंगभाव निरपेक्ष विचार करून एक चांगला समाज घडवू पाहणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे झाले आहे. त्याबद्दल या पुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेत असलेल्या सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करू या!

पुस्तकाचे नाव : बाभळीच्या बाया झरी-जामणी तालुक्यात 

लेखिका: वनश्री वनकर 

 प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे किंमत, २५० रुपये.

Author

Leave a Reply