“पुणे विद्यापीठाकडून औंधकडे जायला निघालं की पहिल्यांदा ब्रेमेन चौक लागतो आणि तिथून डावीकडे वळलं की लगेचच बँक ऑफ महाराष्ट्रची निळ्या रंगातली पाटी दिसते. त्याच्या अगदी समोर पाहिलं की उर्मी वाचनालय अशी पाटी दिसायची. इथूनच अंतर्नाद मासिक ऑगस्ट १९९५ पासून सुरू झालं आणि तेव्हापासून तेवीस वर्षं दरमहा एक तारखेला प्रकाशित होत गेलं. ह्या तारखेत कुठल्याही कारणांनी कधीही खंड पडला नाही ही फार विशेष गोष्ट आहे. त्यानंतरची तीन वर्षं केवळ दिवाळी अंक निघाला. यंदाच्या दिवाळी अंकानंतर अंतर्नाद पूर्णविराम घेत आहे.
“भानू काळे यांनी हे मासिक सुरू केलं तेव्हा दर्जेदार समजली जाणारी मासिकं बंद पडली होती. मराठी भाषा आणि तिचं अस्तित्व याविषयी चर्चा सुरू होती. पण तरीही काळे यांनी हे मासिक सुरू केलं आणि पहिल्या अंकापासून त्याची घडी फार सजगतेने, कौशल्याने आणि मेहनतीने बसवली. यामध्ये कुठल्याही नियोजित तारखेत कधीही बदल झाला नाही. लेखकांचं मानधन आणि इतर तत्सम गोष्टींची पूर्तताही न चुकता एक तारखेला होत गेली. ही गोष्ट कुठल्याही मासिकाची दमदारपणे वाटचाल होण्यासाठी अत्यावश्यक असते. राजकारण सोडले तर जवळपास सगळ्या विषयांना मासिकात जागा होती. शान्ताबाई शेळके यांचं कविता स्मरणातल्या हे अप्रतिम सदर सुरुवातीपासून होतं. लक्ष्मणझुला हे सदर लक्ष्मण लोंढे लिहीत असत. हेही तीन वर्षं सुरू होतं. अवधूत परळकर यांनीही अंकात सुरुवातीपासून मुबलक लेखन केलं. मधुकर धर्मापुरीकर, विजय पाडळकर, सुबोध जावडेकर, पंकज कुरुलकर अशा अनेक लिहित्या लेखकांनी बरीच वर्षं आपलं अप्रतिम लेखन अंतर्नादकडे आवर्जून पाठवलं, याचं मुख्य कारण म्हणजे संपादकांनी थोडक्या काळात कमावलेला विश्वास. ‘मराठी मासिकांसाठीचा सर्वोत्कृष्ट असा वाढता वाचकवर्ग’ हेही एक मोठं कारण असावं. आपलं लेखन ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं असं लेखकाला वाटतं, तो वाचकवर्ग अंतर्नादला लाभला होता.
“नव्या उमेदीने लिहू पाहणार्या लेखकांनाही अंकात आवर्जून स्थान मिळत असे. वैशाली पंडित, प्रमोदिनी वडके कवळे, सतीश वसंत कुलकर्णी, परशुराम देशपांडे अशी कितीतरी त्याकाळी नवोदित असलेली मंडळी या मासिकातून लिहिती झाली. अर्थातच अंतर्नादमध्ये प्रकाशित झालेल्या लेखनाविषयी लिहिणं हा या लेखाचा विषय नाही. साहित्यप्रांतात कुठेही फारसा सार्वजनिक वावर न ठेवता, पुण्यातल्या औंधसारख्या एका कोपऱ्यात सातत्याने, ध्यासाने काम करत, साहित्यक्षेत्रात एक दर्जेदार ठसा संपादकांनी कसा उमटवला याविषयी लिहायचं आहे. हा काळही अनेक सामाजिक, जागतिक बदलांचा काळ होता. वृत्तपत्रं, पुस्तकं आणि मासिकं वाचून आपली वाचनाची भूक भागवणारी या काळातली पिढी म्हणजे तसं करणारी शेवटची पिढी. मराठी माध्यमाकडे पाठ फिरवून घरोघरी इंग्रजी माध्यमाची शाळा निवडणारे पालक याच काळात तयार झाले. आणि ग्रंथालयातून मासिकं-पुस्तकं आणून वाचणाऱ्या वाचकांनी ह्याच काळात निरनिराळ्या वाहिन्यांवरील मालिकांचा रतीब सुरू केला. वाचनापेक्षाही अधिक आकर्षक, अधिक रंगीत, अधिक सहज होणारी करमणूक या काळात सर्वदूर पसरली. जागतिकीकरण झालं अन् हवं की नको हे न विचारताच अनेक गोष्टी उन्मत्त आवेगाने जनसामान्यासह सगळ्या समाजाच्या जगण्याचा भाग होऊन बसल्या. ह्या सगळ्या काळाचा वेग इतका होता की, आपण फक्त परिणामाच्या नोंदी घेत राहिलो. या सगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या काळात नेटाने एक मराठी मासिक काढणं आणि वाचकांच्या हाती दरमहा सोपवत राहणं हे काळे यांनी केलेलं सगळ्यात कठीण आणि महत्वाचं काम आहे असं मी म्हणेन. कारण या पुढच्या काळात छापील स्वरूपात सलग तेवीस वर्षं असं एखादं मासिक प्रकाशित होत राहणं, तेही एकहाती, हे कितपत शक्य होईल याविषयी शंकाच आहे.
“अंतर्नादच्या वाटचालीत सुरुवातीला अगदी वर्गणीदार नोंदण्यापासून व पुढे संपादकीय कामातही मी सहभागी होते. संपादक काळे, लेखक काळे, आपल्या अंतर्नादाशी प्रामाणिक राहत चोख काम करणारे काळे आणि यासह माणूस म्हणून असणारे काळे मला जवळून अनुभवता आले. एक अनोखी ऊर्मी बाळगत त्यांनी हे काम सुरू केलं आणि आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ यात घातला. त्यातून त्यांना काय मिळालं असेल? ह्याविषयी त्यांच्याशी कधीतरी बोलायला हवं आहे. काळे रोज सकाळी बारा ते संध्याकाळी पाच कार्यालयात असत. मासिक चालवणं हे पूर्णवेळ काम आहे हे त्यांनी मला वारंवार सांगितलं आहे. मासिकाकडे येणारं लेखन ते पहिल्या वाचनासाठी माझ्याकडे किंवा वर्षा काळे यांच्याकडे देत असत, मात्र स्वतः वाचल्याशिवाय अंतिम निवड कधीही करत नसत. लेखनासंदर्भात सगळा पत्रव्यवहार ते स्वतः हाताळत. प्रत्येक कृतीत काटेकोर शिस्त त्यांच्याकडे असल्यामुळं अगदी वर्गणीदार नोंदणीसाठीच्या रजिस्टरपासून ते अंकावर वर्गणीदारांचा पत्ता कसा लिहावा ह्याविषयी ते सतर्क असत. म्हटलं तर ही फार किरकोळ, बिनमहत्वाची, क्षुल्लक बाब आहे; म्हटलं तर ही अंतर्नादला अपेक्षित कार्यसंस्कृती आहे.
“अंतर्नाद कशासाठी याबाबत त्यांची भूमिका अगदी चोख होती. कुठल्याही साहित्यिक वादात न पडता, डावे-उजवे अशा विचारसरणीत न पडता या मासिकाने प्रदीर्घ वैचारिक लेख प्राधान्यपूर्वक प्रकाशित केले. काळे यांना मुळातच सामाजिक कामाविषयी विशेष आस्था असल्याने तसले विषय मासिकात वारंवार येत होते. अंतर्नादची मुखपृष्ठं अनेक प्रयोग करून पाहणारी असत. मुखपृष्ठावर कविता, प्रथितयश तसंच नवोदित चित्रकारांची चित्रं असत. या सगळ्यात दर्जा राखताना कुठेही तडजोड नव्हती, पण अनाठायी चकाचकही नव्हती. अतिशय साधं, तरीही प्रसन्न, देखणं मुखपृष्ठ ही एक खासीयत या मासिकाने नेटाने जपली. अंतर्नादची खासियत असणारं आणखी एक सदर म्हणजे प्रतिसाद. इथे एक निखळ मनमोकळा संवाद घडत असे. ई-मेल, व्हॉट्सअपची घाई आणि तुटक अपुरेपण किंवा औपचारिकता त्यात नव्हती. प्रत्येक वाचकाचा त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेला प्रतिसाद वाचणं, त्याचं म्हणणं समजून घेणं हा आमच्यासाठी फार आनंदाचा भाग असायचा. आता अशी वाचकांची, एखाद्या लेखासाठी वेळ खर्चून हाती लिहून पाठवलेली प्रतिक्रिया दुर्मीळच असणार आहे.
“अंतर्नाद बंद करण्याची चर्चा याच्या पुढच्या टप्प्यावर लोकांसमोर आली. २०१७ साली संपादकीयात त्यांनी ह्याविषयी ठळक उल्लेख केला. त्यावर वृत्तपत्र, फेसबुक, व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमातून बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. ‘अंतर्नादने नव्या लेखकांचा शोध घेतला नाही, ते “मनोरा संपादक” आहेत’ वगैरे. या काळात मी अंतर्नादच्या कामात सहभागी नव्हते व त्यामुळे चर्चेत पडून काही बोलणं मला उचित वाटत नव्हतं; पण वेळोवेळी अनेक लेखकांचं पहिलं लेखन अंतर्नादमध्ये छापून आलेलं माझ्या स्मरणात होतंच. अनेक वर्षं अंतर्नादमध्ये मी पूर्णवेळ काम केलं होतं. या काळात कधीही मासिकाच्या कार्यालयात तासन् तास चालणार्या लेखकांच्या वादळी अन् अनावश्यक चर्चा रंगल्या नव्हत्या. मात्र नव्या लेखकांसाठी वेळोवेळी राबवले गेलेले उपक्रम, त्यातला माझा उत्साही सहभाग आणि काळे यांनी सगळ्या उपक्रमात, कुठेच समोर न येता, दिलेला संपूर्ण पाठिंबा मला स्पष्ट आठवत होताच, आजही आठवतो. नव्या लेखकांसाठी अंतर्नादने दोन वेळा कार्यशाळा घेतली होती. अनेक नवेजुने लेखक त्यात सहभागी होते. ते केवळ मुंबई-पुण्यातले नव्हते, तर इतरही अनेक गावांतून आलेले होते. अगदी सुरुवातीच्या काळातही एका नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेणारा लेख लिहिण्यासाठी त्यांनी एका तरुण होतकरू लेखिकेला बर्याच लांब पाठवलं होतं. मनकविता हे कवितेविषयक खास सदर दोन वर्षं मासिकात सुरू होतं. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत कवींनी या सदरात लिहिलं होतं.
“अंतर्नादच्या कितीतरी लेखकांनी आज मोठा नावलौकिक मिळवला आहे. अंतर्नादमध्ये प्रकाशित झालेल्या कितीतरी सदरांची पुस्तकं झाली आहेत. कितीतरी लेखकांना अंतर्नादच्या निमित्ताने उत्तम मैत्र लाभलं आहे. मासिक स्वरूपातील तेवीस वर्षं हा तसा मोठा प्रवास आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भवताल त्याच्या वेगानं पुढे सरकत आहेच, पण या काळातही एका कोपऱ्यात राहून अंतर्नादने जे काम केलं त्याची ठळक नोंद घ्यायलाच हवी. मासिकातल्या त्रुटी तर शोधून काढता येतील, पण मासिकातून प्रसिद्ध झालेल्या दर्जेदार लेखनाचं मोलही नोंदवायला हवं. प्रत्येक अंक हाती आल्याबरोबर काळेंना मनःपूर्वक आनंद वाटायचा; बारीकशी चूक नजरेस पडली तरी बेचैन होतानाही त्यांना पाहिलं आहे. नव्या, आणखी दमदार मजकुराचा पाठलाग व त्यासाठी होणारी त्यांची तगमग ह्या सगळ्याची मी साक्षीदार आहे. त्यांना त्यांच्या मनासारखा अंतर्नाद प्रकाशित करता आला का? याचं उत्तर बहुधा ‘नाही’ हेच असावं. एकदा माझ्याशी बोलताना ते म्हणाले होते, ‘अंतर्नादमध्ये मी पूर्ण यशस्वी झालो असं मला वाटत नाही. मुळात मासिक कितीही निष्ठापूर्वक चालवलं तरी त्याच्या काही मर्यादा आहेत; अनेकांना बरोबर घेऊन जावं लागतं. दुसरं म्हणजे, हा देश कसा असावा ह्याविषयी माझे काही विचार आहेत. पण तेच अंतर्नादमध्ये उमटू नयेत, त्यामध्ये इतरांचेही विचार यावेत असं मला वाटतं. माणूस म्हणून माझं स्वतःविषयी चिंतन तर रोजच सुरू आहे. गेली कित्येक वर्षे मीच माझ्या स्वभावाशी, माझ्याशी भांडतो आहे, झगडतो आहे.’
“मासिकात काम करत असताना संपादनाचे धडे असे काळे यांनी मला दिले नाहीत; पण आज ‘अक्षरधारा’च्या अंकाचं संपादन करत असताना, किंवा इतरही प्रकाशकांच्या पुस्तकांचं संपादन करताना वेळोवेळी अंतर्नादच्या कामातला अनुभव हाताशी येतो. विषयाकडे व्यापकतेने पाहणं, अभ्यासू वृत्ती, नव्या साहित्याकडे बघण्याची असोशी, माणसं वाचत राहण्याची सवय ह्या सगळ्यांचे मूलभूत धडे नकळत गिरवले गेले. आणि या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या कामातून तयार होणारी आपली जीवनवृत्ती, सकस, सहज, आणि संवेदनशील माणूस बनण्याची आच या काळात अंगी नकळत बाणवली गेली. आणखी किती अपेक्षा असते एका कामाकडून?
भानू काळे यांनी त्यांच्या मनोगतात मासिक चालवण्याच्या मर्यादांचा उल्लेख केला आहे. छापील मासिक ,त्याची छपाई, मुद्रित शोधन, वितरण व्यवस्था या सर्व वेळ खाणाऱ्या व क्वचित प्रसंगी त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. छापील अंकाकडून डिजिटल अंकाकडे जाताना निदान छपाई व वितरण याबाबतच्या वेळाची थोडीफार बचत होणार आहे. बाकी अंतर्नादची सर्व ध्येयधोरणे तशीच पुढे चालवायची असाच संपादक व सर्व सहकार्यांचा प्रयत्न आहे. शिवाय या नव्या तंत्रस्नेही माध्यमांचे काही फायदे असल्याने त्याचाही वेगळा उपयोग होत हाही अंक प्रभावी होण्याची शक्यता आहेच. परिपूर्णतेचा शोध दुरापास्त असतो हे प्रवास सुरू करतानाच माहीत असण्याचे काही फायदे आहेत. काही वेळा गंतव्यापेक्षा तो प्रवासच रमणीय असतो नाही का ?
— स्नेहा अवसरीकर
(ललित मासिकाच्या २०२० सालच्या दिवाळी अंकातील लेखाचा संक्षेपित भाग)
