प्रतिसाद

वाचकपत्रांचे ‘प्रतिसाद’ हे ‘अंतर्नाद’चे एक आगळेवेगळे सदर होते. त्याबद्दलचे पुढील निवेदन अंकात वेळोवेळी प्रसिद्ध होत असे ..    

   लेखक का लिहितात याची उत्तरे अनेक असू शकतील पण ह्याचे एक समर्पक उत्तर जॉं ल क्लेझिओ (Jean Le Clezio) ह्या २००८ सालच्या नोबेल पुरस्कारविजेत्या फ्रेंच लेखकाने दिले आहे. तो म्हणतो, “We write to be read, we write to have responses.” (“वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो.”)

   नवोदित वा प्रस्थापित कुठलाही लेखक असला, आणि केवळ ‘स्वान्तसुखाय’ लेखनाचा कोणी कितीही दावा केला, तरी प्रत्येक लेखकाच्या मनाचा एक कोपरातरी वाचकांच्या प्रतिसादाचा निश्चितपणे कानोसा घेत असतो. तसे नसते, तर लिहून झालेले साहित्य कोणी प्रकाशितच केले नसते! रसिकाची दाद मिळाल्याशिवाय निर्मितीला पूर्णत्व लाभत नाही असे म्हणतात. 

   लेखनाची खोटी स्तुती करावी असे अर्थातच नाही; पण एखादे लेखन आपल्याला खरेच आवडले असेल तर ते का आवडले ते नेमक्या शब्दांत कळवावे. त्याबाबतीत आळस करू नये, संकोच बाळगू नये. स्वतः लेखकांनीही आपली प्रतिक्रिया इतर लेखकांना कळवायला हवी. यात कोणीच कमीपणा मानायचे कारण नाही. कारण लेखक हा स्वतःदेखील एक वाचक असतोच. प्रतिसाद देणार्‍याची लेखकांनीही कदर करायला हवी; खोट्या अहंकाराच्या आहारी जाऊन त्याच्याकडे दुर्लक्ष तर कधीही करू नये. 

   प्रतिसादातून साधला जाणारा वाचक-लेखक संवाद हा निकोप साहित्यसंस्कृती जोपासण्यासाठी आवश्यक आहे. वाचकप्रतिसाद नसेल, तर सर्व लेखनव्यवहार हा केवळ एकदिशा वाहतुकीसारखा ठरेल. लेखक-वाचक संवादातूनच साहित्यचर्चा सुरू होते. त्या चर्चेतून होणारे विचारमंथन आजच्या समाजात अत्यावश्यक आहे. वाचकांनी थेट लेखकाकडेही आपली प्रतिक्रिया नोंदवायला हरकत नाही. किंबहुना त्यासाठीच लेखकाचा फोन-पत्ता अंतर्नादमधे छापला जातो; लेखकाचा विरोध असेल, तर मात्र त्याचा फोन-पत्ता छापला जात नाही. जर आपले पत्र प्रकाशित होऊ नये अशी इच्छा असेल तर त्यावर    ‘व्यक्तिगत’ असे लिहावे. अशी व्यक्तिगत पत्रे अंतर्नाद कधीही प्रकाशित करत नाही.

   माझ्या माहितीत दुसरे कुठलेच नियतकालिक वाचकपत्रांना इतकी जागा देत नव्हते. प्रतिसाद द्यायची प्रेरणा इतर वाचकांना मिळावी हाही वाचकपत्रे प्रसिद्ध करण्यामागचा एक उद्देश असायचा. अनेक वाचक थेट लेखकांशीही संपर्क साधत असत. गंमत म्हणजे याचा फायदा इतर प्रकाशकांनाही होत होता! “तुम्ही छापलेले पत्ते-फोन नंबर वाचून आम्हीही त्यांच्याशी संपर्क साधत असू” असे एका मालक-संपादकाने स्वतःच मला सांगितले होते. “आमचे लेखक बाकीच्यांनी पळवू नये म्हणून आम्ही नाव-पत्ते छापत तर नाहीच, पण कोणी मागितले तरी शक्यतो त्यांना देत नाही” असेही एकाने कबूल केले होते. 

   थेट संपादकांना लिहिलेली पत्रेच फक्त अंकात प्रसिद्ध होत; लेखकाला वाचकांनी परस्पर लिहिलेली पत्रे कधीच छापली जात नसत. त्याच-त्याच वाचकांची पत्रे अंकात छापली जाऊ नयेत याचीही विशेष दक्षता घेत असू कारण वाचकपत्रांच्या सदरात तो धोका नेहमीच असतो. 

                        डिजिटल अंतर्नादसाठी  वाचक प्रतिसादाचे धोरण सर्वसाधारणपणे वरीलप्रमाणेच असेल. 

प्रतिसाद jaysss12@gmail.com या पत्त्यावरती पाठवावा. 

— संपादक