
महेश एलकुंचवार यांनी लिहिलेला ‘एका नटाचा मृत्यू’ हा एकल प्रयोग पाहिला. हा दीर्घांक मी अलीकडेच वाचला होता. मुळात मी फारशा नाट्यसंहिता वाचल्या नसल्यामुळे संहिता वाचणं आणि लगेच तिचा रंगमंचावरील प्रयोग पाहणं, हा अनुभवही माझ्यासाठी जवळजवळ पहिलाच होता.
ही संहिता वाचताना एलकुंचवारांनी रंगमंच, प्रकाशयोजना, संगीत आणि अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीचं केलेलं सूक्ष्म आणि तपशीलवार वर्णन विशेष लक्ष वेधून घेत होतं. वाचतानाच नाटक डोळ्यांसमोर उभं राहत होतं. त्यामुळे हा मजकूर रंगमंचावर कसा उभा राहील आणि त्यात अतुल पेठे स्वतःचं काय आणतील याची उत्सुकता होती.
प्रयोग सुरू होण्याआधीच रंगमंचावर वरून खाली लोंबणारे झुळझुळणारे काळे पडदे आणि त्यावरचा निळा प्रकाश नजरेत भरत होता. प्रयोग सुरू झाला तो अभय महाजन रंगमंचाच्या मध्यभागी शरीराचं वेटोळं घालून बसलेले आहेत, अशा दृश्यातून. नाटक वाचलेलं असल्यामुळे ते पात्र तसं का दिसतंय, त्याची मनःस्थिती काय आहे, याची कल्पना होती. शरीराने रचलेली एकेक गाठ सोडवत ते उभे राहिले आणि पुढची पासष्ट मिनिटं त्या शरीराचा त्यांनी केलेला वापर थक्क करणारा होता. अस्वस्थतेलाही एक लय असू शकते, हे त्यांच्या अभिनयाने दाखवून दिलं.
अभय महाजनने साकारलेल्या या पात्राची सर्वात ठळक गोष्ट म्हणजे त्याची घुसमट. ती रंगमंचाच्या अवकाशामुळे निर्माण झालेली नाही. त्याचा कोंडमारा त्याच्या आतच सुरू आहे; म्हणूनच त्याची अस्वस्थता ही परिस्थितीची नसून अस्तित्वाची आहे. कार्ल युंगच्या persona, shadow आणि individuation या संकल्पना आठवाव्यात, अशी ही झुंज आहे. आयुष्यभर विविध मुखवटे धारण करणारा नट शेवटी स्वतःच्याच सावलीसमोर उभा ठाकतो. ती घुसमट अभय महाजन यांनी ज्या प्रकारे शरीरातून आणि हालचालींमधून व्यक्त केली, ती विलक्षण प्रभावी आहे.
नाटक वाचताना त्यातले अनेक प्रसंग रंगमंचावर कसे साकारले जातील, हे माझ्यासाठी कोडंच होतं. प्रदीप वैद्य यांच्या प्रकाशयोजनेने त्या कोड्याची काही उत्तरं सुचवली. मुखवटे, सावल्या आणि अंधार-प्रकाश यांचा त्यांनी केलेला वापर हा केवळ दृश्य परिणामासाठी नव्हता. त्या माध्यमातून त्यांनी पात्राच्या मनात चाललेला संघर्ष, त्याची घुसमट आणि त्याचं एकाकीपण यांना दृश्य रूप दिलं. त्यामुळे संहितेतले काही अमूर्त स्तर रंगमंचावर परिणामकारकरित्या उलगडले. मुखवटे, प्रकाश आणि अभिनेत्याच्या शरीरावर भर देत प्रॉप्सचा वापर मुद्दाम मित ठेवलेला दिसला. त्यामुळे लक्ष सतत पात्राच्या अंतर्मनावरच केंद्रित राहायला मदत झाली.
पण अगदी खरं सांगायचं तर मी संहिता वाचलेली नसती, तर नाटकातले काही भाग मला कदाचित समजलेच नसते. कदाचित मी त्यांचे पूर्णपणे वेगळे अर्थ लावले असते. क्षणभर तर असंही वाटलं, की आधी संहिता वाचून मी चूकच केली की काय! कारण प्रयोगभर माझ्या मनात लिखित संहिता आणि रंगमंचावरील सादरीकरण यांची तुलना सुरू होती. माझ्या कल्पनेतला नट, त्याचा आवाज, त्याच्या हालचाली आणि रंगमंचावर दिसणारा नट यांच्यात नकळत तुलना होत होती. पण नंतर वाटलं, अशी तुलना होणं स्वाभाविकच आहे. चांगली संहिता वाचताना प्रत्येक वाचक आपल्या मनात स्वतःच एक रंगमंच उभा करत असतो. पात्रांची रूपं, त्यांचा आवाज, त्यांचा रंगमंचावरचा वावर, सगळंच नकळत आकार घेत असतं. त्यामुळे तीच संहिता प्रत्यक्ष रंगमंचावर पाहताना तुलना अटळ असते… आणि कदाचित तशी व्हायलाही हवी.
पण मग प्रश्न असा उरतो, की नाटकाला जाण्याआधी संहिता वाचलेली असणं चांगलं की वाईट? अर्थात, याचं एकच उत्तर असू शकत नाही. संहिता आधी वाचली, तर तिच्यातले सूक्ष्म अर्थ, प्रतिमा आणि स्तर अधिक स्पष्ट होतात. पात्रांच्या मनात काय चाललं आहे याचा धागा आधीच हातात असल्यामुळे काही प्रसंग अधिक खोलवर भिडतात. पण त्याच वेळी दिग्दर्शकाच्या वाचनाकडे पूर्णपणे कोऱ्या मनाने पाहणं कठीण होऊ शकतं. आपण नकळत आपल्या मनातल्या नाटकाचाच शोध रंगमंचावर घेऊ लागतो आणि तो तसाच दिसला नाही, की ते स्वीकारायला जड होऊ शकतं. उलट संहिता न वाचता गेलो, तर दिग्दर्शकाने उभं केलेलं विश्व आपण कोणत्याही पूर्वकल्पनांशिवाय स्वीकारू शकतो. काही अर्थ कदाचित निसटतील, काही प्रतीकं लगेच उलगडणार नाहीत; पण त्या बदल्यात आश्चर्य, गोंधळ, अस्वस्थता आणि शोध या सगळ्या भावना अधिक तीव्रतेने अनुभवता येतात.
एका नटाचा मृत्यू पाहताना या दोन्ही अनुभवांच्या मधोमध मी बसले होते. संहितेमुळे काही गोष्टी अधिक स्पष्ट दिसत होत्या, तर त्याच संहितेमुळे काही नव्या शक्यता पाहताना माझ्या मनात नकळत प्रतिकारही निर्माण होत होता. कदाचित याच कारणामुळे या प्रयोगाने मला केवळ प्रेक्षक म्हणून नाही, तर वाचक म्हणूनही विचार करायला भाग पाडलं.
या सगळ्यात दिग्दर्शकाबद्दल लिहायचंच राहून गेलं. अतुल पेठे हे केवळ धाडसी दिग्दर्शक नाहीत. हे नाटक रंगमंचावर आणण्यासाठी धाडस हवंच; पण त्याहीपलीकडे ते या संपूर्ण अनुभवाचे सूत्रधार आहेत. नाटकाचं interpretation करण्यापासून ते प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर बसवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो. अशी सर्वस्व पणाला लावणारी, उत्साही माणसं मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत, ही मोठी आश्वासक गोष्ट आहे.
मग मला नाटक खूप आवडलं का?
अगदी खरं सांगायचं तर नाही.
मी भारावून गेले का?
तसंही नाही.
अभय महाजन यांचा अभिनय आवडला का?
प्रचंड.
त्यातल्या दिग्दर्शकीय कल्पना इम्प्रेसिव्ह वाटल्या का?
नक्कीच.
एक वेगळा, धाडसी आणि सहज विसरता येणार नाही असा प्रयोग पाहिल्याचं समाधान मिळालं का?
बहुधा हो.
काही नाटकं आपल्याला आवडतात. काही नाटकं आपल्याला अस्वस्थ करतात. काही नाटकं प्रश्न विचारतात आणि उत्तरं शोधण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकावर सोडतात. ‘एका नटाचा मृत्यू’ मला या तिसऱ्या प्रकारातलं नाटक वाटलं. प्रयोग अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यांची तयार उत्तरं देत नाही. ती शोधण्याचा प्रवास मात्र समृद्ध करणारा आहे. कदाचित त्याच्यातच या नाटकाचं खरं यश दडलं आहे.
प्रिया साठे
______________________________________________________________________________________________________________
एका नटाचा मृत्यू
ले ० महेश एलकुंचवर, दि ० अतुल पेठे, भूमिका ० अभय महाजन.
श्रेयनामावली बरीच आहे आणि ती सगळीच महत्त्वाची आहे. सगळे सविस्तर लिहिण्याचा हेतू नाही. थोडक्यात लिहितो.
सुमारे ६५-७० मिनिटांचा असा हा दीर्घांक आहे. यातली लेखकाची संहिता किती, कोणती व सादरीकरण कोणते असे मला माहीत नाही. जे पाहिले त्यावरून लिहितोय.
यातला नट नाटकभर एका चड्डीत वावरतो. असे का, हा प्रश्न पडायला हवा. आपल्याला समस्यांचे वर्गीकरण सवयीचे असते – सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, लैंगिक, वगैरे. इथे समस्यांची ही बाह्य आवरणे काढून ‘माणसाचे जगणे’ ही समस्या अधोरेखित होते आहे. या समस्येचे ना विश्लेषण शक्य आहे, ना एखादा निष्कर्ष काढणे शक्य आहे, ना एखादा बोध देणे शक्य आहे. हे पाहता हे नाटक मुळातच जगण्याच्या गाभ्याला हात घालणारे आहे, असे म्हणता येईल. या अर्थाने हे नाटक आपल्या नाट्यक्षेत्रातली वर्गीकरणाची कोंडी फोडते. इथे आणखी एक कोंडी फोडली जाते. ती आहे, एखादी गोष्ट वा एखादी लिंक – कथनसलगता – असण्याची. हे एखाद्या कालक्रमातून काही पाहणे नसून ‘कधीही काहीही पाहणे’ आहे. या नाटकाच्या या स्वरूपामुळेच हे नाटक डावे/ उजवे/ वा कुंपणावरचे न ठरता समग्र जगण्याचा वेध घेणारे ठरते.
मुळातच, मानवी जगण्यात असणाऱ्या विदीर्णतेचे हे नाटक आहे. प्रत्येक वेळी एका अभेद्य भिंतीपुढे जाणे घडते आणि तिथून पुढे काही दिसत नाही. नट-दिग्दर्शक संबंध वा प्रियकर-प्रेयसी संबंध हे सगळेच मानवी दुर्गुणांनी युक्त असून त्रासदायक आहे. त्यामुळे नाटकभर नटाचे शरीर पिरगाळले जाणे, वेडेवाकडे होत जाणे घडत राहते. या सगळ्यातून जाणारा हा नट काही स्वतःची चिंतनशीलता वा सखोल जाण असलेला दिसत नाही. सारांश असा दिसतो, की दिसणारी वा न दिसणारी सर्वच पात्रे सुमार आहेत. या मूलभूत समस्येकडे पाहण्याऐवजी नुसतीच त्या त्या वेळी प्रतिक्रिया देणारी आहेत. कितीही मुखवटे उतरवले तरी ते संपतच नाहीत असे एक दृश्य नाटकात आहे. त्यामुळे, हे नाटक म्हणजे नुसत्या त्या नटाचा नव्हे; तर दिग्दर्शक, प्रेयसी आणि अप्रत्यक्षपणे आपण सगळेच, यांचा हा शोकात्म मृत्यू ठरतो. याचे भान येणे हेच कलेचे सर्वस्व असते, असे मला वाटते. अशा नाटकांत ‘नाट्यात्म विधान’ नसते – भान असते. या अर्थाने अशा नाटकाला कोणताही हेतूही नसतो, हे लक्षात घ्यायला हवे.
अतुलने हे नाटक बसवावे ही माझ्या दृष्टीने आनंदाची घटना आहे. आपल्या इथल्या लेखकाचे बहु-आयामी नाटक ! अतुलला सर्व तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळालेली आहे. हा पूर्ण डोलारा अभिनयातून पेलण्याचे काम अभय महाजन या नटाने चांगले केले आहे. हे मूळ समस्येकडे पाहणारे नाटक आहे. हे काही निराशावादी गुंगी देणारे नाटक नाही. तसे घडू नये याची काळजी घ्यायला हवी, असे वाटले.
तसे म्हटले तर नाट्यमाध्यमातून त्या माध्यमाबद्दलच मांडलेले हे एक चिंतन आहे; पण कोणतीही चांगली कलाकृती तिची विशिष्टता ओलांडून तुमच्या-आमच्या जगण्याला स्पर्श करते, हे महत्त्वाचे आहे.
चं प्र देशपांडे
_______________________________________________________________________________________________________________
