डॉ. सरोज व डॉ. नील सहस्रबुद्धे या मातापुत्रांच्या जोडीने ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’या शीर्षकांतर्गत शरीरातील विविध संस्थांची माहिती पुस्तकरूपाने मराठीत प्रसिद्ध करायचा संकल्प सोडला आहे. या मालिकेतील ‘मानवी मज्जासंस्था’ यावरचे दुसरे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. ही पुस्तके छापील व ई अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहेत. ई स्वरूपातील पुस्तक पूर्णपणे विनामूल्य आहे. शास्त्रीय ज्ञान मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी हे चाललेले प्रयत्न वेगळे वाटल्याने आम्ही या पुस्तकाच्या लेखकांना एक प्रश्नावली पाठवून त्यावर त्यांचे मनोगत विचारले. त्या प्रश्नांच्या आधारे डॉक्टर सरोज सहस्रबुद्धे यांनी तयार केलेले टिपण सोबत देत आहोत – संपादक
मी सरोज सहस्रबुद्धे, मँचेस्टर विद्यापीठात संशोधन करून एम.एस्सी व पीएच.डी.च्या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ख्रिस्ती कॅंसर हॉस्पिटल या संस्थेमध्ये सात वर्षे संशोधन कार्याला हातभार लावला. माझे संशोधन सायटॉलॉजी या विषयाशी संबंधित होते. त्या काळात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा आपल्या भारतीय समाजाला काहीतरी फायदा करून द्यावा ही ओढ परदेशात राहूनच मला वाटायला लागली होती. त्यामुळे एकोणीसशे ऐंशी साली आम्ही भारतात परत आल्यानंतर आणि पुण्याला स्थायिक झाल्यानंतर मी त्या दृष्टीने लेखनाला आरंभ केला. प्रथम कॅंसरवर पाच पुस्तके आणि त्यानंतर आरोग्यावर सात अशी एकूण बारा पुस्तके आणि विविध दैनिके आणि मासिकांमधून शंभरांहून अधिक लेख प्रकाशित केले. त्या सर्व पुस्तकांचं आणि लेखांचं महाराष्ट्रात भरपूर कौतुक आणि स्वागत झालं; कारण त्याआधी अशा विषयांवर मराठीतून फारच थोडं लिखाण झालेलं होतं. पण आता ती सर्व पुस्तके आणि लेख उपलब्ध नसल्यामुळे त्या काळात जमवलेल्या सर्व माहितीचा लोकांना पुनश्च नव्याने परिचय करून द्यावा या उद्देशाने कोविडच्या काळामध्ये माझा मुलगा नील याच्या मदतीने पुन्हा लेखनाला आरंभ केला. त्याच काळात आम्हांला ई साहित्य प्रतिष्ठानाच्या वेबसाइटची माहिती मिळाली. या संकेतस्थळावर ते मराठीमधून ई-पुस्तके प्रसिद्ध करतात आणि ती जगभराच्या मराठी वाचकांपर्यंत नेऊन पोहोचवतात, अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते श्री. सुनीळ सामंतजी यांच्याशी संपर्क साधला आणि आज सांगायला अभिमान वाटतो, की त्यांच्या संपूर्ण सहकार्याने, प्रोत्साहनामुळे आणि आम्हांला लिहिते करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे आजमितीला आमची आरोग्य-संबंधित सतरा पुस्तके प्रकाशित होऊन ती जगभराच्या मराठी वाचकांपर्यंत विनामूल्य पोहोचली जात आहेत. त्या पुस्तकांवर भरभरून आलेल्या प्रतिक्रिया हे त्याचेच द्योतक आहे. आमचे पहिले पुस्तक ‘परिचय कॅन्सरचा’ वाचकांच्या पसंतीस उतरल्यामुळे आमचा लिहिण्याचा उत्साह वाढत गेला. ई-साहित्य प्रतिष्ठाननेही कॅंसरच्या पुस्तकासाठी स्पेशल अभियान तयार केले होते. आणखी एका सेवाभावी संस्थेने त्या पुस्तकाचे अभिवाचनही केले आहे. आमच्या आणखी तीन पुस्तकांचेही अभिवाचन झालेले आहे.
माझा मुलगा डॉक्टर नील हा पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस व एमडीच्या परीक्षा उत्तीर्ण झाला असून, एमडीच्या परीक्षेत त्याला सुवर्णपदकही मिळाले आहे. त्याच कॉलेजमध्ये काही वर्षे तो लेक्चरर म्हणूनही काम करीत होता. यूकेमध्ये आल्यानंतर त्याने FRCPath लंडन ही पदवी संपादन केली आणि २००८ पासून तो रॉयल ब्लॅकबर्न हॉस्पिटलमध्ये कॅंसर कंसल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. दोन वेळा त्याला हॉस्पिटलतर्फे क्लिनिकल एक्सलंस अवॉर्डही मिळाले आहे आणि कॅंसर डायग्नोसिस क्षेत्रात त्याचा वीस वर्षांचा अनुभव आहे.
माझे पुण्यातील प्राथमिक लेखन आणि त्याचा इतक्या वर्षांचा या क्षेत्रामधला अनुभव यातूनच आमची लेखनाची प्रक्रिया चालू झाली. माझ्या मराठी लेखनाचा थोडाफार कायापालट करून, आम्ही ते लेखन, आधुनिक काळापर्यंत – म्हणजे अप टू डेट करून – आणि ई-साहित्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करायला आरंभ केला. अशा प्रकारे दोघांच्या सहकार्याने आमचे हे लेखनाचे टीमवर्क सुरू झाले. वाचकांच्या प्रोत्साहनामुळे एकेक नवे पुस्तक आकार घेऊ लागले. इंग्लंडमध्ये मी सायटॉलॉजीमध्ये काम करीत असल्यामुळेच व नील पुढे पॅथॉलॉजीमध्ये नावाजला जात असल्यामुळे आमचे खूपसे विचार आणि मते तंतोतंत जुळत असल्याने लेखनाची प्रक्रिया खूपच सुरळीत आणि सुलभ घडायला लागली. आमचं टीमवर्क आणि ट्यूनिंग छानच जमायला लागून त्यातून एकेक नवं पुस्तक आकार घ्यायला लागलं. पुस्तकाच्या मूळ लेखनाचे काम मी करते आणि त्यातल्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया नीलच्या मदतीनेच घडत असल्यामुळे प्रत्येक पुस्तकातील मजकुराची ऑथेंटिसिटी दोन वेळा तपासली जाते; मात्र कुठलेही पुस्तक आम्ही AIच्या मदतीने लिहिलेलं नाही किंवा AIचा आधारही लेखनासाठी घेतलेला नाही, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आमचं या क्षेत्रातील ज्ञान, वाचन आणि जेवढे अनुभव आहेत, फक्त त्यांचा वापर करूनच आम्ही आत्तापर्यंतचे सर्व लेखन केले आहे. काही प्रसंगी गुगलच्या मदतीने काही संदर्भ तपासून पाहतो तेवढेच. अशी ही आमच्या लेखनाची पार्श्वभूमी आहे.
बऱ्याच काळापासून – म्हणजे आमची ‘देहाची तिजोरी’ ही बारा पुस्तकांची पुस्तकमाला पूर्ण झाल्यानंतर असंख्य वाचकांची आम्हांला विचारणा आली, की या पुस्तकामध्ये उल्लेख केलेल्या प्रत्येक संस्थेबद्दल एकत्रित माहिती उपलब्ध होईल, अशा वेगळ्या वेगळ्या पुस्तिका तुम्ही बनवू शकाल का, ज्यामध्ये प्रत्येक संस्थेबद्दलची सामान्य माहिती, त्यामधील अवयवांना होणाऱ्या व्याधी, त्यांच्यासाठीच्या स्पेशल तपासण्या आणि प्रमुख उपचारपद्धती यांचा एकत्र समावेश होईल, ज्यामुळे वाचकांचा खूप फायदा आणि सोय होऊ शकेल.
आम्हांलाही ती कल्पना खूप आवडली आणि आम्ही श्री. सुनीळ सामंत सरांचा विचार घेऊन लेखनाला आरंभ केला. त्यानुसार खालील पुस्तिका बनवण्याचा आमचा मानस आहे.
१. अस्थिसंस्था, २. मज्जासंस्था,
३. रक्ताभिसरणसंस्था, ४. श्वसनसंस्था, ५. पचनसंस्था, ६. उत्सर्जनसंस्था, ७. जननसंस्था, ८. नलिकारहित ग्रंथी आणि ९. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये (यांतील पहिली दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झालेली आहेत.)
साधारण दरपंधरा दिवसांनी एकेका संस्थेवरील शंभर पानांच्या आसपासची पुस्तिका प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. प्रस्तुत पुस्तकमालिकेद्वारा केवळ आपल्या शरीराची रचना, शरीरामध्ये चालणाऱ्या विविध क्रिया, शरीराला होणाऱ्या असंख्य व्याधी-उपाधी, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तपासण्या आणि त्यासाठीचे निरनिराळे उपचार, आपली प्रकृती, आरोग्य आणि स्वास्थ्य यांबद्दल केवळ प्राथमिक स्वरूपाची ओळख जिज्ञासू वाचकांना करून देण्याचे प्रयत्न आहेत. पुस्तकाची संपूर्ण भाषा मराठीच असली; तरी प्रचलित अशा इंग्रजी संज्ञा आणि नावे टाळण्याचा अट्टाहास मात्र धरलेला नाही; कारण बरेच वेळा मराठी वाचकांनाही काही इंग्रजी संज्ञाच अधिक परिचित वाटतात.
जन्मापासून मौलिक शरीराची देणगी आपल्याला सहज प्राप्त झालेली आहे. तिचा थोडाफार परिचय करून घेणं, अगदीच अवास्तव ठरू नये हा त्यामागचा उद्देश. चोवीस तास आपण आपल्या स्वतःच्या सान्निध्यात वावरत असतो, पण आपलं हृदय कसं चालतं किंवा मेंदू किती जोखमीची कामं करीत असतो याचा आपण पुरेशा गांभीर्यानं विचार केलेला नसतो. त्यामुळे अतिपरिचयात् अवज्ञा अशी शरीराची स्थिती होते. या पुस्तकांचे साधारण उद्दिष्ट असे –
१. आरोग्य-जिज्ञासू वाचकांना स्वतःच्या शरीराचा जरा विस्तृत परिचय करून घेण्याच्या उद्देशाने म्हणजे teach yourself about body and health.
२. उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन मुलांना त्यांच्या क्रमिक पुस्तकांना पूरक माहिती म्हणून textbook plus
३. तज्ज्ञ व व्यासंगी मंडळींना हा उपक्रम पाहता यावा म्हणून quick browseची सोय.
४. नर्सिंग, पॅरामेडिकल, physiotherapy आणि BHMS, BAMS आणि MBBS च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एक उपयुक्त संदर्भ पुस्तक.
पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेली सर्व चित्रे गुगलच्या सौजन्याने उपलब्ध झाली आहेत. ती सर्व चित्रे क्रिएटिव्ह कॉमन्स म्हणजे लायसन्स फ्री आहेत. ही सर्व चित्रे नेहमी मनासारखी मिळतातच असे नाही. पण त्यातल्या त्यात मजकुराला धरून आणि योग्य वाटतील अशी चित्रे निवडण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य प्रकारचे चित्र असेल तर तोच मुद्दा लोकांच्या मनावर अधिक चांगल्या रितीनं बिंबवता येतो. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने चित्रांचा समावेश पुस्तकात केला आहे. विशेषतः हा विषय फारसा माहित नसलेल्या वाचकांची त्यामुळे खूप सोय होते.
प्रस्तुत पुस्तकांच्या छापील प्रती वाजवी दरात (२५० रुपये) उपलब्ध करून देण्याची सोय ई-साहित्यने केली आहे. त्याचा फायदा करून घेऊन काही वाचक त्याची छापील प्रत संग्रहात ठेवू शकतात किंवा काही लायब्ररीजपण त्याचा फायदा घेऊ शकतात.
परिपूर्णतेच्या कुठल्याही व्याख्येमध्ये ही पुस्तके बसणार नाहीत हे तर सत्यच आहे. जागोजागी अनेक त्रुटी असणारच. कित्येक रोगांचा केवळ नामोनिर्देशही शक्य झाला नाही; पण जी माहिती एकत्र केली आहे, ती जाणत्या वाचकांना थोडंफार अधिक जाणतं करण्यासाठी किंवा त्यांच्या जिज्ञासा व जाणिवा जागृत करण्यासाठी. पुस्तकांच्या मदतीनं रुग्णांना डॉक्टर बनवायचं नाही, हे तर निश्चितच. पण थोडीफार लोकांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांनी अधिक जागरूक आणि दक्ष बनावं हीच या पुस्तकांमागची प्रमुख भूमिका आहे. शरीराला जडणाऱ्या ‘कथा आणि व्यथांचा’ अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
भविष्यात आमच्या पुस्तकांवर शाळकरी मुलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करणं ही एक योजना, सुनीळ सरांच्या मनात आहे. त्याला काही मूर्त स्वरूप आलं तर ते पुढील प्रॉजेक्ट असू शकतं.
ही सर्व ई-पुस्तके http://www.esahity.com या वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध आहेत.


डॅा सरोज व नील सहस्रबुद्धे यांची या मालिकेतली सर्व पुस्तके अतिशय साध्या व सोप्सा भाषेत असून मुद्देसूद मांडणीपुर्ण आहेत. आपल्या शरीराबद्दल व वेगवेगळ्या व्याधी बद्दल प्रत्येकालाच कुतुहल असते व ते शमणवण्याची व वैद्यकीय शिक्षणक्रमाच्या व्विध शाखांची मातृभाषेत ओळख करून देण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत. या लेखन उपक्रमाची संक्षिप्त ओळख हा लेख चांगल्याप्रकारे करून देत आहे.