उत्क्रांतीच्या ओघाकाठी
वचन दिले उभयतां
युगायुगांचे अतूट व्रत,
हो दिग्विजयीं सांगता

रानघऱ्यांचा गृहप्रवेश
कोंबडा आरवला. भैरू उठला. तोंड धुऊन त्याने न्याहारी केली. पारूने त्याला शिदोरी बांधून दिली. तोवर भैरूने बैलांना वैरणपाणी दिलं आणि त्यांना घेऊन तो शेताकडे निघाला. पारूने कपिलेला आणि शालू शेळीला चारा दिला. वासराला आणि कोकराला प्यायला सोडलं; मग दूध काढलं. मोत्या कुत्र्याला भाकरी दिली; मनीला दूध दिलं; कोंबड्यांना दाणे टाकले. गायी, बैल, शेळ्या, कुत्री, मांजरं, कोंबड्या या साऱ्या प्राण्यांचा भैरू-पारूच्या रोजच्या वेळेवर हक्क होता. ते त्यांचे सगेसोयरे होते. भैरू-पारूंच्या आज्या-पणज्यांशीही त्या मुक्या प्राण्यांचं तसंच नातं होतं.
त्या नात्याची सुरुवात कित्येक पिढ्यांपूर्वी – हजारो वर्षांपूर्वी झाली.
युरेशियात तीस हजार वर्षांपूर्वीच्या एका हिवाळी रात्री एक शोधीपारधी टोळी आपल्या गुहेच्या तोंडाशी, कातळाच्या वळचणीखाली शेकोटी पेटवून जेवायला बसली होती. भाजत्या मांसाचा घमघमाट सुटला होता. इतक्यात, पल्याडच्या अंधारात दोन डोळे चमकले. एरवी विस्तवाला, टोळीच्या वावराला घाबरून तसे प्राणी निघून जात. तो प्राणी घाबरला असेलही; पण तरीही धीर करून, कदाचित जिवाच्या निकराने तो विस्तवाच्या बाहेरच्या कडेला येऊन चक्क उबेला बसला, आळोखेपिळोखे दिलेन् आणि स्थिरावला. टोळीतल्या कुण्या मुलाला कुतूहल वाटलं, दया आली. त्याने मांसाचा एक लचका त्याच्या दिशेने भिरकावला. “या रावजी, बसा भावजी, घासभर खावा दाजी,” हे सगळे शिष्टाचार पूर्ण झाले. एक नवा घरोबा सुरू झाला.
ती एक सुरस आणि चमत्कारिक कहाणी आहे.
साधारण सव्वा लाख ते ऐंशी हजार वर्षांपूर्वी शोधीपारधी मानव आफ्रिकेतून भूमध्यसागरी सुपीक पट्ट्यात गेला आणि तिथून पुढे यथावकाश आशियात, युरोपात पोचला. त्या वेळी त्या भागांत मॅमथ (मोठ्या हत्तीसारखा), बायझन(मोठ्या गव्यासारखा)सारखे मोठे थोरले बोजड प्राणी हिंडत होते. माणसाकडे तीरकमठा होता, भाला होता, विस्तवही होता. माणसांच्या टोळ्या एकजुटीने, धोरण आखून बायझनवर हल्ला करत. एक बायझन मारला, की टोळीच्या पोटापाण्याचा प्रश्न काही दिवसांपुरता सुटे.
आजूबाजूला कळपाच्या शिस्तीत राहणारे मांसाहारी प्राणी म्हणजे लांडगे(Canis lupus). ते अमेरिकेच्या अलास्का भागातून निघून भटकत भटकत आशिया-युरोपमध्ये आले होते. तेही मानवासारखेच भटके पारधी होते. लांडग्यांच्या आणि माणसांच्या टोळ्यांची रचनाही बरीचशी सारखी, आखीव, सुविहित कुटुंबपद्धतीवर आधारलेली असे. टोळीला किंवा कळपाला एक म्होरक्या असे. त्या म्होरक्याची आणि त्याच्या खालोखाल त्याच्या जोडीदारणीची संपूर्ण टोळीवर बिनशर्त हुकूमत चाले. टोळीतल्या सगळ्या नातलगांचा एकमेकांवर गाढ विश्वास असे आणि त्यांना एकमेकांचं मनोगत केवळ देहबोलीवरून किंवा चेहऱ्यावरच्या भावांवरून सहज समजू शके. दोन्ही जमातींत लहानग्यांना सांभाळायची जबाबदारी संपूर्ण कळपात विभागली जाई. माणूस आणि लांडगा दोघेही आकाराने मॅमथ, बायझनपेक्षा कितीतरी लहान होते; तरीही एकजूट, आखणी आणि चलाखी यांच्या जोरावर ते बाजी मारून जात आणि त्यामुळेच त्यांच्यात प्रचंड स्पर्धा होती. लांडगा हा माणसाचा कट्टर शत्रू होता; पण ते वैर लांडग्यांच्या आक्रमकतेशी होतं.
त्यांच्यातल्या इतरांच्या तुलनेत आकाराने लहान, कमी आक्रमक किंवा मवाळ अशा, कळपाने हाकललेल्या, एकट्या पडलेल्या लांडग्यांना शिकार करता येत नसे. ते भुकेले लांडगे शिजत्या मांसाच्या वासाचा माग काढत माणसांच्या वस्तीकडे येत. उकिरड्यावरचा टाकाऊ भाग खाऊन तृप्त होत. तिथली वस्ती आणि विस्तव त्यांनाही संरक्षण देई. ते तिथेच घोटाळत.
तशी, चार हातांचं अंतर राखूनच ओळखीची सुरुवात झाली; पण माणूस आणि लांडगा दोघांनीही आपापली लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. पुढच्या काही हजार वर्षांत हळूहळू त्यांची भीड चेपली. त्यांना एकमेकांच्या जवळपास आणि मग एकमेकांच्या सोबत राहायची सवय झाली. मवाळ लांडगे वस्तीत रुळले. रात्रीच्या बेसावध वेळी कुणी श्वापद किंवा त्यांच्याच जातीचे लांडगेसुद्धा वस्तीपाशी आले तर ते ओरडून इशारा द्यायला लागले. काळवीट, रानगवे, रानरेडे यांच्या शिकारीत रान उठवायला माणसांना त्यांची मदत व्हायला लागली.
यथावकाश ते लांडगे भटक्या, शोधीपारधी मानवाचे सोबती झाले. त्याच्या कबिल्याच्या संरक्षणासाठी त्याचे मदतनीस झाले. त्यांचा श्वानावतार झाला.
सुमारे १२००० वर्षांपूर्वी गेलं हिमयुग संपलं. पृथ्वीवरचा दोन हिमयुगांमधला सुखाचा काळ सुरू झाला. शोधीपारधींची वणवण कमी झाली. सुमारे दहा-साडेदहा हजार वर्षांपूर्वी मानवाला भटकंतीचा कंटाळा यायला लागला. तो स्थिरावला, शेतकरी झाला. मध्यपूर्वेतली सुपीक कोर(इजिप्त, सीरिया, लेबॅनॉन वगैरे भाग), चीन, अमेरिकेचा पूर्वभाग वगैरे जगातल्या नऊ ठिकाणी, माणसांच्या वस्त्यांमध्ये इतर प्राण्यांच्या माणसाळण्याची सुरुवात झाली.
कोंबड्या, डुकरं, मांजरं यांनी माणसाजवळ यायला आपणच पुढाकार घेतला. माणसाचं उरलेलं अन्न, उकिरडे, खळ्यातलं धान्य, तिथले उंदीर यांचं त्यांना आकर्षण वाटलं. हळूहळू माणसात आणि त्यांच्यात सहजीवन जमलं(commensal pathway). आधी माणसाळलेले कुत्रेही त्याच गटातले, आपणहोऊन जवळीक साधणारे! त्यांच्यामुळे माणसाला परक्या प्राण्यांविषयी आपुलकी वाटायला लागली. ते मानवजातीसाठी नवं शिक्षण होतं.
रानातली शिकार सहजासहजी मिळे ना! तेव्हा माणसाने पोट भरण्यासाठी नवी शक्कल लढवली(prey pathway). शिकारीसाठी वणवण न करता घराजवळच पोटापाण्याची सोय झाली तर बरी म्हणून त्याने प्राणी दावणीला बांधायचे ठरवले. स्वतंत्रपणे माळरानात चरून पोट भरणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांना,गायी-म्हशींना त्याने मुद्दाम कुंपणबंद केलं. गरजेनुसार त्यांच्यातूनच सागुतीची सोय केली. पण त्यामुळे त्याला त्या जनावरांच्या पोटापाण्याची, संरक्षणाची, निगेची जबाबदारी पेलावीच लागली. त्याने त्यांचे कळप पोसले. पोटभरीचा प्रश्न तर सुटलाच पण सोबत परक्या जमातीची जबाबदारी घेण्याचा मोलाचा धडाही शिकायला मिळाला.
त्या शिक्षणाचा फायदा त्याला तिसऱ्या प्रकारच्या प्राण्यांना माणसाळवण्यासाठी झाला.
तिसऱ्या प्रकारच्या प्राण्यांकडून माणसाला काही खास काम करून घ्यायचं होतं. त्या उद्देशाने व्यवस्थित मोहीम आखूनच माणसाने त्यांना आपल्या कह्यात घेतलं(directed pathway). ते काम अधिक झपाट्याने झालं. घोड्या-गाढवांपासून रेशीमकिड्यां-मधमाश्यांपर्यंत सगळ्यांचं माणसाळणं या गटात मोडतं.
पहिल्या दोन्ही प्रकारांतले प्राणी अधिक मवाळ, समजूतदार होते. त्यांनी माणसाला खूश करायचा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रकारातले प्राणी स्वच्छंद होते.
ते तिन्ही प्रकारचे प्राणी सुरुवातीला फक्त माणसाच्या आसपास वावरायला सरावले, त्याने टाकलेलं किंवा दिलेलं अन्न खायला लागले. यथावकाश त्यांची माणसाशी सलगी झाली. त्या सलगीमुळे त्यांना भुकेला अन्न, भयापासून संरक्षण आणि वणवण भटकण्याऐवजी स्थैर्य लाभलं. पण तेवढं होऊनही त्यांच्या जनुकांत फेरफार झाले नव्हते. त्यांच्यात आणि त्यांच्या विमुक्त जातभाईंत काहीही फरक नव्हता. उकिरडे धुंडणारी डुकरं, घरामागच्या अंगणात चरणारी गुरं, वळचणीला गुमान राहणारं गाढव दहाहजार वर्षांपूर्वी माणसाळण्याच्या त्या प्रथमावस्थेत होती.
हार्वर्डच्या संशोधकांचं तर म्हणणं आहे, की कुठलाही प्राणी जादूची कांडी फिरवल्यासारखा, एका ठरावीक मुहूर्तावर किंवा एका विवक्षित ठिकाणी माणसाळला नाही. माणसाळणं ही अखंड चालणारी लांबलचक प्रक्रिया आहे. माणसाळण्याचा उगम सलगीपासून, कामापुरत्या जवळिकीतून झाला.पण पुरेशा अवधीनंतर त्यांना एकमेकांवर अवलंबून राहायची सवय झाली, लळा लागला. साहचर्य हा माणसाच्या आणि त्या प्राण्यांच्याही जगण्याचा अविभाज्य भाग बनला. भैरू-पारूंचं जसं कपिला-शालूंशी, मोत्या-मनीशी नातं होतं तसं अतुट नातं जुळलं.
पुढल्या काळात माणसाने आणि प्राण्यांनीसुद्धा त्या नात्यात आपापल्या परीने सतत भर घातली. त्या दीर्घ प्रक्रियेतून तसा सलोखा, मैत्री, जिवाभावाचं सख्य व्हायला काही शतकं, सहस्रकंही लागली असावीत. सुरुवातीच्या काळात त्या प्राण्यांच्या आणि त्यांच्या विमुक्त जातभाईंच्या रंगरूपांत, हाडांपेरांत फारसा फरक पडला नव्हता. नंतरच्या, सततच्या सहवासाच्या लांबलचक कालखंडात हळूहळू तसा फरक वाढत गेला.
दोस्तांचा कायापालट
सुमारे सोळा हजार वर्षांपूर्वीची गोष्ट – सध्या जिथे तुर्कस्तान आहे तिथल्या पिनारबासी भागातल्या माणसाची.
तो पहाटे उठून शिकार शोधत मुलूखगिरीला निघाला. त्याच्या शोधीपारधी टोळीसोबत काही लांडगे नेहमीच असत. त्यांच्यापैकी दोघे रोजच्या सवयीने त्याच्याबरोबर निघाले. ते सोबत असले, की शिकारीच्या डावपेचात तीन डोकी चालत. हरणं, जंगली शेळ्या सहज मिळत. कधीकधी एखादा दांडगा रानबैलसुद्धा एकटा सापडला तर तीन बाजूंनी घेरून कोंडीत पकडता येई. तिघांच्याही पोटापाण्याची ददात मिटे.
माणसाने बनवलेल्या हत्यारांमुळे शिकार आधीच सोपी झाली होती. लांडगा हे एक नवं, जिवंत हत्यारच झालं. मानवाच्या आणि लांडग्यांच्या कळपांची वरिष्ठ-कनिष्ठ समाजरचना, संकटं आणि त्यांच्यावर मात करायची पद्धतदेखील साधारण सारखीच असल्यामुळे कालपरत्वे ते लांडगे मानवी कळपाचा लहानसा का असे ना, पण एक भाग बनून गेले. पुढच्या काहीहजार वर्षांत त्यांच्या राहणीत फरक झाला. प्रत्येक गोष्टीत ते माणसाच्या कलाने घ्यायला लागले. हळूहळू त्यांच्या शरीरयष्टीत, वागण्यात फरक होत गेला. ती माणसाळण्याची दुसरी अवस्था होती.
माणसाळण्याने डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतालाच शह दिला. माणसाचं संरक्षण लाभल्यावर तगून राहण्याच्या धडपडीच्या सार्या गरजा दूर झाल्या. ते नैसर्गिक ताणतणाव नाहीसे झाल्यावर जनुकांतही नवे फेरफार झाले. नवेच गुणधर्म दिसायला लागले.
माणसांचा आधार मिळाल्यावर लांडग्यांना उपजीविकेसाठी मोठ्या हिंस्र श्वापदांशी झुंजायची किंवा जोडीदारीण मिळवायला प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर द्यायची गरज उरली नाही. आक्रमकता, उग्रपणा, चपळाई, धूर्तपणा या तोवर अत्यावश्यक असलेल्या गुणांचा वापर कमी झाला. त्यांच्याच सोबत मोठा, कामसू मेंदू, दांडगी शरीरयष्टी, लांब, मजबूत तंगड्या, शत्रूला फाडणारा मोठा जबडा आणि बळकट दात आणि अंगावरच्या केसाळ कातडीचा भोवतालच्या परिसराशी जुळणारा भुरकट, मळकट रंग हेही गुणधर्म आपसूक घटले. मानवाशी जुळवून घेणं अधिक महत्त्वाचं झालं. त्यांची शरीररचना त्यानुसार बदलत गेली. शरीराचा, डोक्याचा आणि दातांचाही आकार लहान झाला. पाय आखूड झाले. त्यांचा मेंदूही आक्रसला. रानात सतत टवकारलेले कान शरणागतीचं द्योतक म्हणून मुडपून खाली आले. शेपूट तहाचा झेंडा बनून वर वळलं आणि सलोखा दाखवत हलायला लागलं. त्यांच्या अंगावर माणसाला आकर्षक वाटतील असे फिके ठिपके-पट्टे आले. त्यांची आक्रमक दांडगाई लयाला जाऊन ते आजन्म बालिश, लडिवाळ राहायला लागले. पूर्ण संरक्षण आणि पोटभरीची निश्चिंती असल्यामुळे त्यांची प्रजननाची क्षमताही वाढली. जीवनाच्या संघर्षामुळे ज्या thyroxine, epinephrine वगैरे अंतस्रावांचं किंवा मेंदूमधल्या ज्या रसायनांचं प्रमाण वाढतं त्या सार्यांमध्ये माणसाळण्यामुळे घट झाली. माणसाळण्याच्या लक्षणांचा तो अख्खा गटच त्यांच्यात तयार झाला. पिल्लांची गर्भात वाढ होत असतानाच लांडगेपणा आणि कुत्रेपणा वेगवेगळा साकारायला लागला, माणसाळण्याचा लक्षणगट तेव्हापासूनच दिसायला लागला. रानटी लांडग्याचा माणसाळलेला कुत्रा(Canis familiaris) झाला. काही शास्त्रज्ञांच्या मते त्या काळात माणसानेही त्याच्या आवडत्या लांडग्यांच्या जोड्या जुळवून त्यातले काही फेरफार घडवून आणले असावेत.
Domestication figure

संशोधकांनी त्या लक्षणगटामागचं कारण शोधलं. प्राण्यांच्या गर्भात न्यूरल क्रेस्ट नावाचा उंचवटा असतो. जीवनातल्या ताणतणावाशी, संघर्षाशी झुंज देणाऱ्या ग्रंथी त्या उंचवट्यापासून बनतात. माणसाळण्याचा, सुरक्षिततेचा, स्थैर्याचा परिणाम म्हणून न्यूरल क्रेस्टच्या पेशी सुस्त होतात, उशिरा कामाला पोचतात. त्वचेचा रंग, आक्रमक स्वभाव, आडदांड शरीर, मोठं डोकं, बळकट दात हेदेखील त्याच पेशींवर अवलंबून असतात. माणसाळलेल्या प्राण्यांच्या अंगावरचे पांढुरके ठिपके, त्यांचा मवाळ स्वभाव, नाजूक शरीर, लहान डोकं, लहानगे दात हा सारा त्या उंचवटापेशींच्या सुस्तपणाचा परिणाम असतो.
त्याशिवाय त्या प्राण्यांचे काही गुण माणसाने जाणूनबुजून जोपासले. अधिक दूध देणार्या गायी, जास्त वजन पेलणारे घोडे आणि शिकारीसाठी आज्ञाधारक आणि लढवय्ये असे कुत्रे माणसाला हवे होते. त्यामुळे ते गुण असलेल्या प्राण्यांचीच अधिक प्रमाणात पैदास झाली. माणसाची हौस, गरज आणि तंत्रज्ञान यांच्यानुसार माणसाळलेल्या प्राण्यांचे गुणधर्म सातत्याने बदलत गेले. त्यांच्या रानटी भाऊबंदांहून अधिकाधिक वेगळे होत गेले.
शास्त्रज्ञांनी मासे, कीटक वगैरेंसाठी माणसाळण्याचे पाच टप्पे ठरवले आहेत.
माणसाळलेल्या सगळ्या प्रजातींनी कमीअधिक प्रमाणात ते टप्पे पार केले.
१) माणसाशी घसट वाढल्यामुळे त्यांना माणसाची सवय होत गेली. त्यांना त्याची भीती वाटेनाशी झाली. त्याची जवळीक सहन व्हायला लागली. त्याच्या सहवासात, आवारात राहणं जमलं.
२) गरजेनुसार, अधूनमधून काही काळ ते त्या आवारात आपखुशीने बंदिस्त होऊन राहिले.
३) बहुतेक वेळ माणसाच्या वळचणीला, बंदिवान राहणं आणि अधूनमधून माणसाने आवाराबाहेर सोडलं, की बाहेरच्या जगातल्या मोकाट, भटक्या साथीदारांशी समागम करणं ही त्यानंतरची पायरी होती.
४) त्यापुढे त्यांचा भटक्या विमुक्तांशी तेवढाही संपर्क राहिला नाही. माणसाने आखून दिलेलं आवार हेच त्यांचं विश्व झालं.
५) माणसाने त्याच्या गरजेनुसार, विशिष्ट गुण असलेले नर-मादी निवडून त्यांच्यात खास घरोबे घडवून आणले. तशी शेलकी प्रजा जोपासली. त्यांच्या गुणधर्मांत फेरफार केले.
बहुतेक प्राण्यांमध्ये माणसाळण्याची वाटचाल साधारण तशीच झाली. माणसाने प्राण्यांमध्ये परिवर्तन घडवलं. प्राण्यांची वागणूक, आकार, चेहरामोहरा बदलला. त्याच काळात त्या प्राण्यांच्या मदतीमुळे माणसांचीदेखील राहणी, शरीरयष्टी बदलत गेली. प्रवास, व्यापार, स्थलांतर आणि लढाई या सगळ्यांचं तंत्र पालटलं. त्यानंतर ते नवे दोस्त प्राणी, त्यांनी आणलेले नवे जंतू आणि शिकवलेली नवी तंत्रं सोबत घेऊनच शेतकऱ्यांनी स्थलांतर केलं. जिथे जिथे ते गेले तिथल्या तिथल्या शोधीपारधी जमातींचा त्यांनी धुव्वा उडवला. माणसाळलेले प्राणी आणि त्यांचा माणूस एकमेकांच्या आधाराने जगभर पसरले.
ते करताना माणसाला काही शतकं, सहस्रकं सक्तीने त्या प्राण्यांच्या संगतीत राहावं लागलं. त्या संगतीच्या परिणामाने माणसालाही गुण तर लागलाच, वाणदेखील बदलला. माणसाळलेल्या प्राण्यांच्या जनुककोशातही फेरफार झाले. काळाच्या ओघासोबत माणसाळण्याचा ओघही बळावत गेला. त्या प्रवाहाने जगाच्या इतिहासाची दिशा बदलली.
माणसाळण्याचा प्रवास गेली हजारो वर्षं चालू आहे. पण सगळेच प्राणी त्या सहप्रवासात सामील झाले नाहीत. कुत्रे सोडून रानटी सस्तन प्राण्यांपैकी मोजकेच प्राणी माणसाळले, ते म्हणजे : शेळ्या, मेंढ्या, गुरं, डुकरं, मांजरं, घोडा, उंट, लामा आणि अल्पाका, गाढव, रेनडियर, गिनी पिग, ससा, म्हैस, याक, बालीची गुरं (अतिपूर्वेचा, नांगरटीचा बान्तेन्ग) आणि मिथुन (अरुणाचल प्रदेश, भूतान, बांगला देश आणि ब्रह्मदेश या भागांत वसणारा, ८००० वर्षांपूर्वी माणसाळलेला, रुंद शिंगांचा, बलदंड प्राणी. ही प्रजाती आता धोक्यात आहे).

तेवढेच प्राणी इतके मानवप्रेमी का झाले असावेत? संशोधकांनी त्याचा छडा लावायचा ठरवला.
लांडगे माणसाळून त्यांचे कुत्रे झाले. पण त्याच घराण्यातला कोल्हा माणसाळला नव्हता. बेल्याएव्ह या रशियन शास्त्रज्ञाने त्याच्यावर अधिक संशोधन करायचं ठरवलं. त्याला त्याच्यामागचं कारण जनुकशास्त्राच्या मदतीने शोधायचं होतं. त्याने शेतात जोपासलेल्या पाळीव कोल्ह्यांवर प्रयोग केले. अगदी मवाळ कोल्ह्यांचा एक गट, कट्टर जहाल कोल्ह्यांचा दुसरा आणि अधल्यामधल्यांचा तिसरा असे तीन गट करून त्यांना वेगवेगळं जोपासलं. तो प्रयोग १९५८मध्ये सुरू झाला. पन्नास वर्षांनी, २००९मध्ये मवाळ गटातल्या ८०%कोल्ह्यांचे कान मुडपून खाली आले, शेपट्या हलायला लागल्या, त्यांचं वागणं बालिश झालं. माणसाळण्याचा सगळा लक्षणगट त्यांच्यात दिसायला लागला.
जे प्राणी माणसाळतात ते मुळातच मवाळ, मनमिळाऊ, समाजप्रिय असतात. ते माणसाच्या उपयोगी पडतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या फारशा खोडी नसतात. त्यांचा वंश बंदिवासातही वाढतो. अशा मुद्द्यांची तोपर्यंत खातरी पटली. ज्या प्राण्यांची प्रकृती त्या पठडीत बसली, दोस्तीच्या नात्याला धार्जिणी होती तेवढेच प्राणी माणसाळले. झेब्रा, सांबर, गेंडे, हिप्पो, वाघ, सिंह या प्राण्यांकडे त्या गुणांची उणीवच होती. म्हणून ते माणसाळले नाहीत.
पशुगृहं याति सोनाली
३१ मार्च १९७४. चाळीसगावला, पूर्णपात्र्यांच्या घरात त्या दिवशी दुःखाचं सावट होतं. घरातल्यांच्या अंगाखांद्यावर खेळत, दूधभात खात वाढलेली, पूर्णपात्र्यांची सिंहकन्या आजपासून कायमची पशुगृही, पेशवे पार्कात राहायला निघणार होती.
सोनाली जेव्हा सात महिन्यांपूर्वी पूर्णपात्र्यांच्या घरी आली तेव्हा ते लहानगं, लडिवाळ पिल्लू होतं. पण सात महिन्यांत तिची भराभर वाढ झाली. ती हाडापेराने बळकट सिंहीण झाली. तिच्या पंजाचा एक खेळकर फटकासुद्धा माणसाला जीवघेणा ठरू शकला असता; शिवाय ती पाळीव सिंहीण होती, माणसाळलेली नव्हती. तिची मूळची आक्रमक वृत्ती अचानक उफाळून आली असती; म्हणूनच, ताटातुटीचं दुःख असह्य वाटत असूनही डॉ. पूर्णपात्र्यांनी तिला दूर पाठवायचा निर्णय घेतला.
सर्कशीतले वाघ-सिंह रिंगमास्टरची आज्ञा पाळतात, त्याला आपल्या अगदी जवळ येऊ देतात. ते पाळीव प्राणी झाले. दरवेशाचं अस्वल त्याच्या अंगणात राहतं, पाळीव होतं. ते पाळीव प्राणी फारतर माणसाळण्याच्या पहिल्या अवस्थेत पोचतात. तसेच घरात ठाण मांडून बसलेले उंदीरही तशी प्रथमावस्था गाठतात. पण त्यांच्यातले कुणीही माणसाळण्याच्या टप्प्यांपैकी दुसरा टप्पासुद्धा गाठत नाहीत.
बेल्याएव्हच्या निष्कर्षांविषयी शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. बेल्याएव्हने जे कोल्हे निवडले ते शेतावर पाळलेले होते. त्यामुळे त्यांनी माणसाळण्याची प्रथमावस्था आधीच गाठलेली होती. त्यांचे संकरही माणसाच्या मनाप्रमाणे घडले. तो निव्वळ त्या प्रयोगाचा परिणाम नव्हता असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.
पुढे संशोधनाला जनुकशास्त्राचीही मदत झाली. माणसांच्या जनुकांच्या अभ्यासात एक जिव्हाळ्याचा जनुक(hypersocial gene of Williams Syndrome) आढळला आहे. तो ज्या माणसांत असतो ती जरा अतीच, अगदी समाजात नाकारली जाण्याइतपत लाघवी असतात. कदाचित तसाच एखादा जनुक काही लांडग्यांत होता. तेही जरा अतीच प्रेमळ आणि म्हणूनच, लांडग्यांच्या कळपात राहायला नालायक होते; पण त्याचमुळे ते माणसांशी सहज जमवून घेऊ शकले. इतकंच नव्हे तर माणसाशी दोस्ती करणाऱ्या, इतर लांडग्यांशी आणि शेळ्या-मेंढ्यांसारख्या दुसऱ्या प्राण्यांशीही ते मिळूनमिसळून वागले. अधिक अभ्यासानंतर तशाच गुणधर्मांचा पण एक वेगळा जनुक(GTF21) कुत्र्यांतही सापडला. तो जनुक नसला तर कुत्रे अधिक लांडग्यांसारखे वागतात, आक्रमक असतात.
माणसांच्या, इतर सगळ्या सजीव प्राण्यांच्या डीएनएमधल्या काही भागांचं काम आता शास्त्रज्ञांना माहीत आहे. त्यांना आपण कामगार जनुक म्हणू. त्याच्याखेरीजच्या डीएनएला आत्तापर्यंत ‘जनुक-कचरा’ असंच नाव दिलं होतं. ENCODE नावाचा जनुकशास्त्राचा आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प सध्या चालू आहे. त्याच्यात पूर्वी शोधलेल्या, कामगार जनुकांचा अभ्यास तर होतोच आहे; पण ज्या डीएनएचं काम अजून कळलेलं नव्हतं अशा जनुक-कचऱ्यावरही लक्ष दिलं जातं आहे. आता कळतं आहे, की तो जनुक-कचरा कामगार जनुकांना वचकात ठेवतो. कुठल्या कामगार जनुकांनी काम करावं आणि ते किती करावं हे तो ‘कचरा’ ठरवतो. सगळे रिमोट कंट्रोल त्याच्या मुठीत असतात. म्हणून आता त्याला डीएनएमधला नियंत्रक विभाग म्हणतात.
माणसाळलेल्या प्राण्यांच्या पुरातन अवशेषांचा अभ्यास झाला. माणसाळताना प्राण्यांचे जनुक फारसे बदलत नाहीत. पण माणसाळण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यांत डीएनएचा नियंत्रक विभाग जोरात काम करतो. आक्रमक प्रवृत्तीच्या जनुकांना रासायनिक मुसक्या बांधून त्यांना सक्तीची विश्रांती दिली जाते. मनमिळाऊ आणि मानवधार्जिण्या जनुकांना प्रोत्साहन मिळतं. लांडग्यांचे कुत्रे होताना, रानकोंबड्यांच्या लेगहॉर्न चिकन बनताना तसे फेरफार झाल्याचं सिद्ध झालं आहे. प्राण्यांचे रंग, मवाळपणा, दुभतेपणा वगैरे अनेक भल्याबुऱ्या गुणधर्मांचे कुंकवाचे धनी असलेले जनुक ठरवणं जमलं आहे. डुकरांच्या आणि गुरांच्या मांसाचा लुसलुशीतपणा ठरवणारे चक्क चार-चार जनुक माणसाच्या सेवेसी तत्पर असतात!
नियंत्रक विभागाने एकदा जनुकमुसक्या बांधल्या, की त्या सहजासहजी निघत नाहीत. घरचा कुत्रा भटकत रानात-निर्जनात गेला, तिथेच स्थिरावला तरी त्याचं माणसाळलेपण नष्ट होत नाही. तो पुन्हा माणसांत आला, की पुन्हा सहज तिथलाच होतो. प्रत्येक स्थित्यंतरात जनुकांत नोंदलेला जुना इतिहास पुसून जात नाही. त्याच्यात नव्या अध्यायाची भर पडते. जॅक लंडनच्या ‘Call of the Wild’ आणि ‘White Fang’ या दोन कादंबर्यांत तो दोन्ही दिशांचा प्रवास अतिशय सुंदर रितीने दाखवला आहे.
पण ते केवळ नियंत्रणातले फेरफार होते. मूळ जनुक तेच राहिले. त्यामुळे त्या सगळ्या उलथापालथीत त्या प्राण्यांची प्रजाती बदलली नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा भटक्या विमुक्तांशी संबंध आला तेव्हा तेव्हा रोमिओ-ज्यूलिएट, हीर-रांझा प्रेमकथा सुफळ संपूर्ण झाल्या. माणसाळलेल्या आणि विमुक्त-रानघरी कळपांमध्ये पूर्वी वाटत होतं त्याहून कितीतरी अधिक काळापर्यंत त्याच प्रजातीतल्या भिन्न जनुकांच्या वानोळ्याची देवाणघेवाण चालू राहिली असावी. पुरातत्त्वशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतिहास या साऱ्यांतल्या बक्कळ पुराव्यांवरून आता ते समजलं आहे. त्या वाटेतल्या घरोब्यांचे जे ठसे माणसाळलेल्या प्राण्यांच्या जनुकांवर उमटले त्यांच्यावरून त्यांनी जगात कुठल्या वाटेने प्रवास केला तेही शोधता आलं. डुकरांवरच्या संशोधनात त्यांच्या आईकडून आलेल्या डीएनएने (mitochondrial DNA) साक्ष दिली. आफ्रिकेतल्या गुरांच्या पूर्वजांचे बाप-आजोबा-पणजोबा युरोप आणि भारत या दोन्ही ठिकाणांहून आले होते. त्या पितृवंशाच्या डीएनएने(Y-chromosome) पुराव्याला हातभार लावला.
हळूहळू मात्र, कधी माणसाच्या आवडीनिवडीनुसार, कधी डीएनएत झालेल्या चुकांमुळे काही जनुक पूर्णपणे बदलले. प्राण्यांचे नवे वाण तयार झाले; पण ते फेरफारही तसे मर्यादितच होते. प्रजाती बदलल्या नाहीत. वेगवेगळ्या वाणांमधला बेटीव्यवहार चालू राहिला.
माणसाने दुष्काळातही प्राण्यांच्या पोटापाण्याची, वंशवृद्धीची सोय करावी; त्यांना निवारा द्यावा; त्यांना हिंस्र पशूंपासून संरक्षण द्यावं आणि त्या बदल्यात प्राण्यांनी माणसाला साथ द्यावी, त्याची वेगवेगळी कामं करावी असा, ‘एकमेकां साह्य करू,’ हा माणसाळण्याचा मूळ करार होता. माणसाळण्याच्या इतिहासातल्या ९८% काळात शेतकऱ्यांनी तो पाळला. जनावरांना अभय दिलं, पोटापाण्याला घातलं. प्राण्यांवरचे नैसर्गिक ताणतणाव दूर झाले. त्यामुळे आणि माणसाच्या आवडीनिवडीनुसार प्राण्यांच्या रंगरूपात, जनुकांच्या कामात फेरफार झाले.
माणसाच्या स्थलांतरामुळे नव्या जागा, तिथलं वातावरण आणि तिथलं नवं खाद्य यांच्याशी जुळवून घेताना त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. कुत्र्यांना भाकरीसारखे पिठूळ पदार्थ पचायला लागले. त्या नव्या ठिकाणच्या विमुक्त, भटक्या जातींशी त्यांचा संपर्क आणि घरोबे चालू राहिले. जनुकांची देवाणघेवाण होत राहिली. माणसाने खास पैदास करूनही त्या बाहेरच्या आयातीमुळे जनुकांचा ताजेपणा, तगडेपणा टिकून राहिला. पशुसंगोपनाच्या पद्धतींत आणि तंत्रज्ञानात रोज नवी भर पडत असते. त्या नवेपणाचाही माणसाळण्याच्या वाटचालीवर सतत परिणाम होत गेला.
त्या सगळ्या घुसळणीतून माणसाळण्याचा ओघ अखंड चालू राहिला. माणसाळणं प्राण्यांच्या हाडांमांसात, दुधा-मधात, लोकरीत-रेशमात, जाणिवांत आणि जनुकांत भिनलं. प्रत्येक नव्या प्राणीदोस्ताने माणसाच्या जगण्याला खूरभार, शिंगभार, पंखभार लावला; ते अधिक सुसह्य, सुकर, सुंदर केलं. शोधीपारधी माणूस स्थिरावला. त्याची भरभराट झाली. एका प्रजातीची इतर अनेक प्रजातींबरोबर तशी मैत्री होणं हा अनन्यसाधारण योग आपल्या जगात जुळून आला. तसा योग विश्वातल्या दुसऱ्या कुठल्याही आकाशगंगेत जुळून येणं कठीण आहे. हा जो एकमेवाद्वितीय, सुंदर आणि शुभंकर असा वैश्विक आनंदाचा मौल्यवान ठेवा माणसाला लाभला आहे तो त्याने जाणावा, जोपासावा आणि जिवापाड जपावा. त्यातच त्याचं भलं आहे.
