अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण एकोणिसावे.
– संपादक
भूतकाळातला संदेश
“ॲग्नॉन, मला वाटतं मी वर उत्तरेकडच्या कोरड्या प्रदेशात उत्खनन सुरू करायला हवं. इथल्या पावसाळी प्रदेशापेक्षा तिथल्या कोरड्या हवेत पुरातत्व अवशेष जास्त चांगले शाबूत राहिले असतील.”
“पावसाळी प्रदेश म्हणजे?”
“म्हणजे ज्या ऋतूत दक्षिणेकडच्या समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दरवर्षी पाऊस पडतो. प्राचीन मानव त्याला पावसाळा म्हणायचे.”
आम्ही माझ्या कुटीच्या ओसरीवर बसून मुसळधार पडणारा पाऊस बघतो आहोत. अंधार पडायला लागला आहे आणि ढगाळलेल्या आकाशातून जो काही सूर्यप्रकाश झिरपतो आहे तो शोषून घ्यायला आम्हांला बराच वेळ पंख पसरून बसावं लागतं आहे. आम्ही सगळा दिवस इतरांबरोबर प्रयोगशाळेत काम करण्यात घालवला आहे; कारण या संततधार पावसात बाहेर काही कारणं शक्यच नाही. ॲग्नॉन त्याचे आण्विक प्रयोग करतो आहे आणि मी आतापर्यंत अभ्यासलेल्या अवशेषांची नोंद आणि त्यांच्यावरील अहवाल पूर्ण करते आहे. भूगोलावर उत्खनन केलेल्या वीस ठिकाणांतून मी हजारो नमुने गोळा केले आहेत. त्यांत बांधकामात वापरण्याचं सामान, रासायनिक पदार्थ, मनुष्यांचे आणि प्राण्यांचे अवशेष, कापडाचे तुकडे, कलाकृतींचे अवशेष आणि अशाच अनेक वस्तू आहेत; तरी त्यांपैकी काहीच बुद्धीला ताण देईल किंवा कोड्यात टाकेल असं नाही. या ग्रहावरच्या आमच्या वास्तव्याचे आता तीनच महिने उरले आहेत आणि पृथ्वीचा कायमचा निरोप घेण्यापूर्वी शक्य तितकं संशोधन मला करायचं आहे.
“पण उत्तरेलाच का? पश्चिमेकडेही वाळवंट आहे,”ॲग्नॉन म्हणतो.
“उत्तरेकडच्या प्रदेशात जवळजवळ चार हजार वर्षं दाट वस्ती होती. पूर्वीची दिल, ओग्र, लकनू, कोंपर ही शहरं जिथे होती त्या भागांत मला उत्खनन करायचं आहे. ही सगळी अत्यंत दाट वस्तीची शहरं होती आणि माणसाच्या संपूर्ण ज्ञात इतिहासाच्या काळात माझे पूर्वज या भागात राहत होते. त्या भागात टिकून राहिलेले अवशेष सापडण्याची जास्त शक्यता आहे; कारण तिथलं हवामान कोरडं आहे आणि अखेरचं युद्ध सुरू झाल्यावर लवकरच त्या भागात पाण्याचा तुटवडा जाणवू लागला होता.”
“तुझे पूर्वज म्हणजे?”
“तुझ्या कधी लक्षात नाही आलं? माझा चेहरा मोहरा भारती आहे. माझे आई वडीलही भारती दिसतात आणि मी नैसर्गिकरित्या जन्मले आहे.”
“तुझा चेहरा भारती आहे असं मला वाटलं होतं पण तू नैसर्गिकरित्या जन्मली आहेस हे मला माहिती नव्हतं.”
“खरंतर माझ्या आईच्या वंशाच्या बाजूने पाहायला गेलं तर नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलींच्या सलग साखळीतला मी दुवा आहे.”
“आणि तुझे वडील?”
“तो नैसर्गिकरित्या जन्मलेला नाही, पण माझी आई म्हणते, की त्याची बहुतांशी जनुकं भारती आहेत, निदान बाह्य रूप ठरवणारी जनुकं तरी.”
“या विषयाची तुला बरीच माहिती आहे. मी त्याबद्दल कधीच विचार केलेला नाही; कारण मला माझ्या पूर्वजांबद्दल काहीच माहीत नाही. युरोपी दिसणाऱ्या आई-वडिलांनी माझा सांभाळ केला. अर्थात तेही काही निश्चितपणे सांगता येणार नाही; कारण त्वचेच्या रंगावरून आता आपल्यातला फरक कळत नाही. एखाद्याचा चेहरा अगदी उघड आशियी किंवा आफ्रिकी नसेल तर तुमची जनुकं कुठून आली आहेत हे सांगणं शक्य नाही.”
“बरोबर. पण विचार कर, पृथ्वीवरच्या मानवांच्या बाबतीत हे किती वेगळं असेल. ते सगळे एकमेकांपेक्षा वेगळे दिसायचे आणि त्यांची वेगवेगळी संस्कृती होती.”
“त्यामुळेच ते सगळे एकमेकांशी भांडले आणि सगळी मनुष्यजातच नष्ट करून टाकली.”
“तसंही असेल…”
_________________________________________________________________________________________
पावसापासून सुटका झाल्याने मी आनंदी आहे. दोन महिने प्रयोगशाळेत कोंडून बसावं लागल्यामुळे माझे पंख शिवशिवत आहेत. या दूरवर पसरलेल्या पानझडीच्या अरण्यात मी रमले आहे. आणखी महिनाभर तरी इथे पाऊस पडणार नाही. या प्रदेशात मला थोडं खोलवर उत्खनन करायचं आहे. प्राचीन इतिहासात मी वाचलं आहे, की या प्रदेशात कुठेतरी एक प्रचंड शहर होतं आणि अनेक शतकं ते या प्रदेशाच्या राजधानीचं शहर होतं. या प्रदेशात अश्मयुगातील आदिमानवाच्या वसाहतींपासून ते राजे महाराजांचा काळ आणि युद्ध ते अखेरच्या युद्धाच्या पूर्वीच्या शतकांपर्यंत मानवाची वस्ती होती. दूरदूरच्या प्रदेशांतून लोक इथे येऊन स्थायिक झाले आणि त्या शहराची भरभराट झाली. शक्य झाल्यास मला सरळ खाली खणायचं आहे म्हणजे त्या सगळ्या स्तरांपर्यंत पोचता येईल.
निवडुंगासारख्या वनस्पती वाढणाऱ्या त्या कोरड्या प्रदेशात पोचल्यानंतर दोन दिवसांनी मी खणायला सुरुवात करते. या कलेत आता मी प्रावीण्य मिळवलं आहे आणि आधी मी माझ्या उत्खननाचा काळजीपूर्वक आराखडा तयार करते. खणण्याच्या यंत्राच्या संगणकाला सरळ रेषेत खाली खणण्याच्या तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत आणि जर एखादी सुव्यवस्थित वस्तू लागली तर जोरात खणणं ताबडतोब थांबवायचे आदेश दिलेले आहेत. उत्खनन करण्याच्या मोठ्या यंत्राने एका त्यातल्या त्यात सपाट आणि कमी खडकाळ जागेवर खणायला सुरुवात करताच आता लवकरच काही शोध लागेल असं वाटून माझं मन थरारतं. माती उपसणारी लहान यंत्रं खणायच्या मोठ्या यंत्राभोवती भिरभिरताहेत आणि दगड माती बाजूला करताहेत. मी धुळीच्या ढगाच्या पलीकडे जाऊन बसते आणि माझ्या कॉमवर त्या यंत्रांच्या कामाची पाहणी करत राहते. खणल्यामुळे उद्यापर्यंत जमिनीत जेव्हा पुरेसा खोल खड्डा तयार होईल आणि पाहणी करण्यासाठी मला उडत आत बाहेर करावं लागेल तेव्हा खरं कठीण काम सुरू होईल.
________________________________________________________________________________________________________________
उकाड्यामुळे मला जाग येते आणि मला तहानही लागली आहे. फुग्याशिवाय या उकाड्यात निभाव लागणं कठीण गेलं असतं. सूर्योदयाच्या आधीच हवा तापू लागते. माझ्या खोलीतला पाण्याचा घडा रिकामा आहे आणि पाणी आणायला मला विमानापर्यंत जावं लागणार आहे. उकाडा इतका जास्त आहे, की अपेक्षेपेक्षा आधीच माझा पाण्याचा साठा संपतो आहे. उत्तरेला शंभर मीटर अंतरावरून वाहणाऱ्या नदीवरून मला सारखं सारखं पाणी आणावं लागतं. नदीच्या आणखी जवळ राहून उत्खनन करणं शक्य नाही कारण तिथली जमीन ठिसूळ आहे.
माझ्या कुटीच्या पश्चिमेला असलेल्या काटेरी झुडुपांच्या पडीक जमिनीत खोदायला सुरुवात केल्यापासूनचा आज दुसरा दिवस. इथे एकच गोष्ट चांगली आहे आणि ती म्हणजे मला भरपूर ऊन्ह मिळतं आहे आणि त्यामुळे मला नेहमीच उत्साही वाटतं.
दुपारपर्यंत खड्डा इतका मोठा झाला आहे, की माती उपसणारी यंत्रं एकीकडची माती बाजूला करत असताना मी त्या विवरात दुसऱ्या बाजूला बसू शकते. नाहीतरी या मैदानी प्रदेशात सगळीकडे इतकी धूळ आहे, की विवराच्या बाहेर बसूनसुद्धा फारसा फरक पडणार नाही. माझ्या फुग्यात अंग आकसून माझ्या कॉमवरून मी खोदकामावर लक्ष ठेवून राहते. संध्याकाळी उशिरा, सूर्य पश्चिमेकडे कलल्यावर, मला त्या ठिकाणचे पाहिले अवशेष सापडतात. इतर ठिकाणांप्रमाणेच हे युद्धाच्या काळातल्या इमारतींचे अवशेष आहेत. आतापर्यंत अशा अवशेषांचे बरेच नमुने मी गोळा केले आहेत. वरवर नजर फिरवून मी यंत्राला आणखी खणायला सांगते. युद्धपूर्व काळातले अवशेष शोधण्याचा मी चंगच बांधला आहे.
दिवस मावळल्यावर जेव्हा मी माझ्या राहण्याच्या कुटीत परत येते तेव्हा मला दाराच्या बाहेर बसून संध्याप्राशन करत त्या विस्तृत प्रदेशावर संधिप्रकाश हळूहळू पसरत जाताना पाहायला आवडतं. पृथ्वीवर कुठेही जा, संध्याकाळ सुंदरच असते. मग मी माझ्या मूळ पथकाला फोन करून दिवसभराच्या कामाची माहिती देते. आता सगळेच जण या ग्रहावरच्या आमच्या मर्यादित उर्वरित काळात आपापली कामं संपवण्यात गुंतले आहेत आणि तरीही, सूर्यास्तापर्यंत मी जर त्यांना फोन केला नाही, तर माझी चौकशी करायला ॲग्नॉनचा फोन येतो. कधीकधी त्याचं लक्ष वेधून घ्यायला मी मुद्दामच फोन करायला उशीर करते. सूर्यास्तानंतर बरोबर पाच मिनिटांनी माझ्या कॉमची बेल वाजते आणि ॲग्नॉनचा चेहरा स्क्रीनवर झळकतो.
“काय, सगळं ठीक आहे ना?”
“हो. मी करणारच होते फोन. आज खोदताना मला पहिल्या स्तरावरचे अवशेष सापडले.”
“काय आढळलं त्यात?”
“नेहमीचंच, युद्धकाळातल्या इमारती.”
“हं!”
“पण मी आणखी खोदणार आहे.”
“काय सापडेल असं वाटतं तुला?”
“युद्धाच्या आधीच्या काळातलं काहीतरी. इथली जमीन पूर्णपणे कोरडी आहे. पुरातत्व अवशेष चांगले राखले गेले असतील.”
“उन्हापासून जप आणि भरपूर पाणी पीत रहा. तुला वाचवायला मला हजारो मैल ड्रोन उडवत यायला लागायला नको.”
मी हसते. तो अगदी आईसारखाच आहे. सतत माझी काळजी करत असतो.
“तुझं काम कसं चाललंय?” मी त्याला विचारते.
“छान चाललं आहे. तू परत येईपर्यंत माझी सगळी कामं पूर्ण झालेली असतील.”
“छान!”
“मग मी राणीसाहेबांना ड्रोनमध्ये बसवून पृथ्वीची शोभा दाखवायला नेणार आहे.”
मला खूपच हसू येतं. मी इथे उत्तरेला आल्यापासून हे तो मला सांगतो आहे. रोज संध्याकाळी त्याच्याशी फोनवर बोलल्यावर मी हसऱ्या चेहऱ्याने झोपी जाते.
___________________________________________________________________________________________________________
खणायला सुरुवात केल्याच्या तिसऱ्या दिवशी शेवटी मी युद्धाच्या पूर्वीच्या स्तरापर्यंत पोचते आणि एखाद्या कपड्यांच्या कारखान्याचे असावेत असे अवशेष मला सापडतात. कापडाचे अवशेष आणि कापड विणायच्या यंत्रांचे भाग सापडतात. कापडाचे सगळे तुकडे फाटलेले आहेत आणि मातीच्या रंगाचे झाले आहेत. पण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली धरल्यावर त्यातून माहितीचा खजिनाच मिळेल याची मला खातरी आहे. कापड तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या रसायनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी मी मातीचे नमुने गोळा करते.
त्या रात्री बराच वेळ जागून मी मातीतून खणून काढलेले जीर्ण झालेल्या कापडांचे नमुने माझ्या कुटीत तपासत बसते. इथे माझी कुटीच माझी प्रयोगशाळादेखील आहे. ते कापडाचे नमुने काळजीपूर्वक स्वच्छ करून जेव्हा माझ्या प्रभावी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली धरून त्यांचं मी निरीक्षण करते तेव्हा मला त्यांचे अस्पष्ट रंग आणि त्यांच्यावरची नक्षी दिसते. नमुन्यांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंदाज बांधणारं यंत्र दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा ती कापडं तयार केली गेली होती तेव्हा ती कशी दिसत असतील हे दाखवतं. माझ्या कामाच्या पडद्यावर जेव्हा ते रंग आणि नक्षी झळकतात तेव्हा मी हरखून जाते.
उन्नयनपूर्व मानव कसे रंगीबेरंगी कपडे घालायचे आणि दागिन्यांनी आपलं शरीर सुशोभित करायचे ते वाचलेलं मला आठवतं. ते रंग इतके गडद आहेत आणि त्यांच्यावरची नक्षी इतकी तऱ्हेतऱ्हेची आहे, की इतके चटपटीत कपडे घातलेल्या माणसाच्या शरीराची मला कल्पनाच करता येत नाही. आता सगळे मानव वापरत असलेल्या पांढऱ्या कपड्यांच्या तुलनेत ते कपडे थोडे भडक वाटतात. अर्थात प्राचीन मनुष्यांची शरीरं सोनेरी नव्हती आणि त्यांना जांभळे पंख नव्हते. त्यांच्या त्वचेचा रंग गुलाबी गोऱ्यापासून ते गव्हाळ किंवा काळ्या रंगापर्यंत वेगवेगळा असायचा आणि तरीही या प्राचीन माणसांच्या अहंकाराचा मला थोडा तिटकारा वाटल्याशिवाय राहत नाही. असं कसं ते शरीराला इतकं महत्त्व द्यायचे पण आपली मनं विकसित करण्याकडे दुर्लक्ष करायचे! पण मी असं त्याचं मूल्यमापन करणं कदाचित योग्य नाही; कारण आई नेहमी म्हणते, की मी त्यांची वारस आहे.
मी मातीचे नमुने काळजीपूर्वक ठेवून देते. त्यांचं विश्लेषण करायला स्वर्गावर परतण्याच्या प्रवासात मला भरपूर वेळ मिळेल.
दुसऱ्या दिवशी मी सरळ खालच्या दिशेने खणत राहते. ते विवर आता इतकं खोल झालं आहे, की मी जेव्हा त्याच्या तळाशी बसते तेव्हा त्याच्या काठापलीकडचा परिसर मला दिसत नाही. कधीकधी मला असं वाटतं, की अचानक मला विवराच्या काठावरून खाली डोकावून पाहणारं एखादं झाड दिसेल. कुतूहलाने ते तिथपर्यंत चालत आलं असेल. संध्याकाळी फोनवर मी तसं ॲग्नॉनला बोलून दाखवते आणि तो म्हणतो, की माझी कल्पनाशक्ती नक्कीच पृथ्वीवरच्या उत्क्रांतीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पळते आहे. मला माहीत आहे, की मी वेड्यासारख्या कल्पना करते!
पुढचे दोन दिवस मी एकसारखी खणत राहते. दरकाही तासांनी खणणाऱ्या यंत्राला काहीतरी मानव निर्मित लागतं आणि मी मोठं यंत्र थांबवून हळुवारपणे खणणाऱ्या छोट्या यंत्रांना कामाला लावते. मी नमुने गोळा करत राहते – बांधकामाच्या सामानाचे तुकडे, हाडं, यंत्रांचे अवशेष, आणि मातीचेसुद्धा. दिवसेंदिवस माझा संग्रह वाढत आहे. त्यातलं काय बरोबर न्यायचं आणि काय नाही हे मला हा ग्रह सोडण्यापूर्वी ठरवायला लागेल. आमचं अवकाशयान केवळ मर्यादित सामान नेऊ शकतं आणि पथकातल्या इतर लोकांनीदेखील स्वर्गावर नेण्यासाठी नमुने गोळा केले आहेत. पण तो निर्णय मी माझ्या तळ्याकाठच्या घरी परत गेल्यावर घेईन. आतातरी मला काहीच सुटू द्यायचं नाही. संध्याप्राशनानंतर जेव्हा मी दिवसभर गोळा केलेले मातीचे नमुने बघत बसते तेव्हा माझ्या कॉमची बेल वाजते आणि ॲग्नॉनचा आवाज येतो.
“हाय आरुषी, कसं काय चाललंय?”
“हाय ॲग्नॉन! काही नाही, दिवसभर गोळा केलेले नमुने बघत बसले होते. तिथे काय चाललंय?”
“आज तुझी संदेश पाठवण्याची संधी हुकली. आम्ही आमचे संदेश रेकॉर्ड करून मुख्यालयाला पाठवले. तुला काही पाठवायचं होतं का? मी तुला कालच विचारायला हवं होतं, पण आज संदेश पाठवायचा दिवस आहे हे तेव्हा माझ्या लक्षात नव्हतं.”
“जाऊ दे. माझ्याही लक्षात नव्हतं.” वरवर मी तसं म्हणते पण काल त्याची आठवण ठेवली नाही म्हणून मला माझा आणि माझ्या पथकाचा खूप राग आला आहे. संदेश रेकॉर्ड करणं सुरू केल्यावरही ते मला फोन करू शकले असते!
“पण मी तुझ्या आईला पाठवला एक संदेश. तू बरी आहेस आणि तिकडे उत्तरेला उत्खनन करत आहेस म्हणून.”
“धन्यवाद!”
पण त्याने काही मी स्वतः संदेश रेकॉर्ड करून आईला पाठवण्याची भरपाई होणार नाही. गेल्या दहा महिन्यांत माझी संदेश पाठवण्याची एकही संधी हुकलेली नाही.
मला फारच वाईट वाटतं आहे आणि ते ॲग्नॉनच्या लक्षात येतं. पण मला त्याची फिकीर नाही, रागच आला आहे मला.
“मला माफ कर, आरुषी. रेकॉर्डिंग करण्यापूर्वी मी तुला फोन करायला हवा होता. पण इथे एक छोटा अपघात झाला. व्हेनलाला एक विषारी किडा चावला. तिला बरं करण्याची इंजेक्शनं देण्यासाठी आम्हांला दक्षिणेकडच्या पथकातून युइआला बोलवावं लागलं.”
“अरे! आता कसं आहे तिला?”
“बरी होते आहे. उद्यापर्यंत पूर्ण बरं वाटेल तिला.”
माझ्या मनात भावनांचं काहूर उठलं आहे. आई-पपांशी बोलायला मिळेल त्याला अजून एका वर्षापेक्षा जास्त वेळ आहे. त्यांच्यासाठी पाच वर्षं. कदाचित आत्ता या क्षणी, आई तिच्या चित्रासमोर एकटीच बसून मी परत यायला किती दिवस आहेत हे मोजत बसली असेल. ती इथे माझ्यासोबत असायला हवी होती. माझे विचार तिने व्यवस्थित लावून दिले असते. माझ्या कुटीच्या बाहेर पसरलेला गडद अंधार बघत मी तिथं बराच वेळ बसून राहते.
________________________________________________________________________________________
अमर एका सरबताच्या कारंज्यापाशी उभा असताना त्याला गर्दीकडे पाहत एकटीच उभी असलेली आरुषीची आई दिसली. पृथ्वीवर उतरणाऱ्या पथकाचं तिथलं यशस्वी वास्तव्य साजरं करण्यासाठी पृथ्वी प्रकल्पाने आयोजित केलेल्या एका समारंभासाठी ते दोघेही तिथे आले होते. पुढच्या दोन महिन्यांत असे अनेक समारंभ नियोजित केलेले होते. त्यानंतर पृथ्वीवर गेलेलं पथक त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघणार होतं – निदान प्रकल्पाच्या टीमला तशी आशा होती.
गर्दीतून वाट काढत अमर पुढे झाला आणि आरुषीच्या आईजवळ जाऊन त्याने तिला अभिवादन केलं.
“तुला इथे बघून किती छान वाटलं,” तो स्नेहाने म्हणाला.
आपल्या जुन्या मित्राला बघून आरुषीची आई हसली.
“मला आवडतात हे समारंभ. त्यामुळे मी प्रकल्पाचा भाग असल्यासारखं वाटतं मला,” ती प्रसन्नपणे म्हणाली.
“काही नवीन बातमी आहे?” तिने अमरला विचारलं.
“सगळ्यात मोठी बातमी म्हणजे साल्चर अखेरच्या विश्रांतीसाठी निघाला आहे.”
“काय? साल्चर? ते कसं शक्य आहे? अजून प्रकल्पाची पूर्तता कुठे झाली आहे?” आरुषीच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला.
“हो, पण प्रकल्प चालू राहील. गेल्या काही महिन्यांत प्रकल्पामध्ये त्याचा रस कमी झाला होता म्हणे. केंद्रीय मंडळ आता प्रकल्पाचं नेतृत्व करत आहे. ती टीम पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.”
“पण असं कसं साल्चर सगळं सोडून जाऊ शकेल? पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाला काय सापडलं याबद्दल त्याला उत्सुकता नाही? मला वाटलं होतं, की तिथे केलेल्या प्रयोगांचे परिणाम तपासण्यात तो सर्वांत पुढे असेल. ज्या प्रश्नासाठी हा प्रकल्प सुरू केला होता त्याचं उत्तर तो शोधून काढेल.”
“हो, आम्ही सगळेच कोड्यात पडलो आहोत. साल्चरने घेतलेल्या निर्णयाचे तपशील मला माहीत नाहीत. प्रकल्पातला त्याचा रस का कमी झाला असावा यावर इथे सगळे अंदाज बांधत आहेत; पण मला नाही वाटत, की प्रकल्पाशी संबंधित कुठल्या कारणासाठी तो सोडून जातो आहे. त्याचं आयुष्यच संपतं आहे. ती वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्हांला कशातच रस उरत नाही – अगदी आयुष्यभर केलेल्या कामातसुद्धा.”
“कधी आणि कसा आयुष्यातला रस संपायला लागतो ते काही कळत नाही,” दूरवर पाहत ती म्हणाली.
“आणखी एक बातमी आजकाल चर्चेत आहे.”
“ती कोणती?”
“क्षितिज अवकाशयान कृष्णविवराच्या घटना क्षितिजाच्याजवळ पोचलं आहे आणि त्याने काही कोड्यात टाकणारे संदेश पाठवले आहेत. शास्त्रज्ञ अजून त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत; पण अशी एक शक्यता आहे, की त्या यानाला अवकाश आणि काळ यांच्या विवरात एखाद्या किड्याच्या जमिनीतील बिळासारखा निसटून जाण्याचा बोगदा सापडला असावा आणि ते काळाचा पडदा ओलांडून पलीकडे गेलं असावं.”
“म्हणजे ते भूतकाळात गेलं असेल का?”
“ते एकाच वेळी दोन अवस्थांमध्ये असल्यासारखं वाटतं आहे. एक वर्तमानकाळात आणि एक भूतकाळात.”
“मला नेहमीच असं वाटत आलं आहे, की तसं काहीतरी फक्त सैद्धांतिक भौतिक शास्त्रात वाचायला मिळतं… पण खरोखर घडू शकत नाही.”
“तेवढंच नाही. वर्तमानकाळात असणारं यान अजूनही कृष्णविवराच्या दिशेने प्रवास करतं आहे आणि त्याला एक माहिती कणांचं वादळ सामोरं आलं आहे.”
“खरंच? माझ्या आठवणीप्रमाणे अनेक भाकितांपैकी ते एक भाकीत होतं.”
“बरोबर आहे. पण त्या माहितीकणांमध्ये असलेल्या माहितीचा शास्त्रज्ञांना अजून उलगडा झालेला नाही.”
“ते माहितीकणच आहेत हे कशावरून?”
“कारण त्यांपैकी एकदशांश टक्के माहितीचा अर्थ लावण्यात त्यांना यश आलं आहे. ते माहितीकण सोपे होते कारण त्यात विश्वाच्या काही मूलभूत नियमांची माहिती होती.”
“आश्चर्यच आहे. या सगळ्याचा अर्थ काय?”
“मला नक्की माहीत नाही. क्षितिज यानावर काम करणारं पथक त्याचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात आहे. कदाचित आपण ज्ञानसंपादनाच्या एका नव्या पर्वात प्रवेश करत आहोत. हे दोन्ही प्रकल्प आपल्या जीवनपद्धतीवर नक्कीच परिणाम करणार.”
नंतर संध्याकाळी जेव्हा आरुषीच्या आईने अमरचा आणि पृथ्वी प्रकल्पाशी संबंधित इतर मित्र-मैत्रिणींचा निरोप घेतला तेव्हा तिथे ऐकलेल्या सगळ्या बातम्यांवर ती विचार करत राहिली. आरुषी आणि तिचे साथीदार पृथ्वीवरून परत यायला अजून पाच वर्षांचा अवकाश होता. तोपर्यंत बरंच काही घडेल.
साल्चर अखेरच्या विश्रांतीसाठी निघून जाईल. क्षितिज अवकाशयान भूतकाळात जाईल आणि घटना क्षितिज ओलांडेल.
_________________________________________________________________________________________
आज मला नीट झोप लागत नाही. विचित्र स्वप्नं पडत आहेत. कुणाला तरी मी अखेरच्या विश्रांतीत प्रवेश करताना पाहते, पण पुढच्याच क्षणी, ती व्यक्ती कोणीतरी नाही, तर आई आहे. मी घामाघून होऊन उठते आणि मग बराच वेळ मला झोप लागत नाही. रात्रीच्या किड्यांचा किर्रर्र… आवाज माझी उदासी आणखी वाढवतो. मग मी पुन्हा झोपेत शिरते आणि आमचं अवकाशयान कृष्णविवराच्या दिशेने भरकटत चाललं आहे असं मला स्वप्न पडतं. का कोण जाणे पण मी यानाची कप्तान आहे आणि मला सर्व शक्तिनिशी ते यान कृष्णविवरापासून दूर वळवून न्यायचं आहे. मी कसंबसं ते करते, पण तोपर्यंत अवकाशातील आमचं स्थान कुठे आहे ते आम्हांला समजेनासं झालं आहे आणि आम्हांला आमचं घर असलेला स्वर्ग सापडत नाहीये. जिकडे पाहू तिकडे आम्हांला फक्त पोकळ अवकाश दिसतं आहे… पण आमचं घर कुठेच दिसत नाही.
उन्हं खूप वर आल्यावर जेव्हा शेवटी मी उठते तेव्हा ते सगळं स्वप्न होतं याचं मला फार आश्चर्य वाटतं आणि बरंही वाटतं. आम्ही अजून परतीचा प्रवास सुरू केलेला नाही… अजून पृथ्वीवरच आहोत आम्ही आणि मला कामं आहेत, मी स्वतःलाच सांगते. नंतर जेव्हा मी ऊन्ह खायला गुडघे टेकून बसते तेव्हा मनापासून प्रार्थना करते. तासाभरात मी उत्खननाच्या धुळीने भरलेल्या ठिकाणी पोचले आहे. मी सर्वात खालच्या पातळीवर उडत जाते आणि माझ्या कॉमच्या एका इशाऱ्यासरशी उत्खनन करण्याचं ते अजस्त्र यंत्र हलू लागतं. या ठिकाणी माझे दोनच दिवस उरले आहेत आणि मला शक्य तितकं खोल खाणायचं आहे.
एकेका स्तरावरचा इतिहास उलगडला जातो आहे. या ठिकाणी मानवाची सलग वस्ती होती असं वाटतं आहे. इमारतींचे अवशेष एकमेकांवर रचले गेले आहेत. माझ्या यंत्रांनी असा अंदाज बांधला आहे, की मी तिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पोचले असेन. मी उत्खननाच्या मोठ्या यंत्राची गती थांबवते आणि हलक्या यंत्रांनी हळुवार खणायला सुरुवात करते. आता मजा येते आहे. मला प्राथमिक अवस्थेतल्या संपर्क साधनांचे आणि जुन्या इलेक्ट्रॉनिक साधनांचे काही अवशेष सापडतात. माझ्या प्राचीन इतिहासाच्या सखोल अभ्यासामुळे मला ते ओळखू येतात. माणसं सुरुवातीला सिलिकॉनच्या चिपा आणि नंतर गुणसूत्रांच्या गोळ्या (कॅप्सूल) माहिती साठवण्यासाठी आणि तिची देवाण घेवाण करण्यासाठी वापरायची हे मला माहीत आहे. त्यांचे सुरुवातीचे संगणक सिलिकॉन डायोडमध्ये अंतर्गत असलेले दुहेरी संदेश वापरायचे. गुणसूत्रांचे संगणक स्वस्त होऊन त्यांचा सार्वत्रिक वापर तिसाव्या शतकाच्या मध्यावरच सुरू झाला आणि अखेरच्या युद्धाच्या सुरुवातीनंतरच प्रकाश कणांच्या स्पंदनावर आधारित संगणकांचा शोध लागला. युद्धाने ग्रस्त झालेल्या पृथ्वीपेक्षा अवकाशातल्या वसाहतींमध्येच त्यांचा अधिक प्रसार झाला.
तारा आणि संगणकांचे विखुरलेले अवशेष मी गोळा करत असतानाच अचानक धुळीचे ढग उडवत एक जोराची वावटळ येते. या सपाट प्रदेशावर दहशत पसरवणाऱ्या धुळीच्या वादळांपैकीच आहे ती. झाडं वेड्यासारखी हलत आहेत आणि फुग्याच्या आत असूनदेखील त्याच्यावर साचलेल्या धुळीच्या आवरणाने मला दिसेनासं झालं आहे. उत्खननाच्या ठिकाणी साचलेले मातीचे ढीग वेगवान वाऱ्याला आयतेच मिळाले आहेत आणि तो मस्तवालपणे सगळ्या विवरात, खणण्याच्या यंत्रांवर ती माती उडवतो आहे आणि मौल्यवान अवशेष उकरून काढण्यासाठी तासन्तास हळुवारपणे केलेल्या खोदकामावर उद्दामपणे माती लोटतो आहे. ते वाचवण्याचा प्रयत्न मी हताशपणे सोडून देते आणि त्या दिवसाचं काम थांबवायचं ठरवते. विवरातून बाहेर उडत येण्यात माझी सगळी शक्ती खर्च होते कारण गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात करावं लागणारं नेहमीचं उड्डाण वाऱ्यामुळे आणखी कठीण झालं आहे. माझ्या कुटीत पोचून अंथरुणावर अंग झोकून देईपर्यंत माझे पंख चांगलेच दुखायला लागतात.
कॉमच्या गजराने मला जाग येते तेव्हा माझंच मला आश्चर्य वाटतं. रात्रीची अस्वस्थ झोप आणि आदल्या दिवशीची दमणूक यांमुळे मी दीड तास उशीरा उठते. कॉम उचलून मी दाराकडे चालत जाते. बाहेर झिमझिम पाऊस पडतो आहे आणि सुखद वारा वाहतो आहे. धुळीच्या वावटळीनंतर जमीन थोडी गार झाली आहे. आज वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी मी उद्या पहाटेच उत्खननाच्या ठिकाणी जाईन असं मी ॲग्नॉनला सांगते. तो म्हणतो, की उद्या माझा इथला शेवटचा दिवस आहे म्हणून त्याला बरं वाटतं आहे आणि कधी मला मिठीत घेईन असं त्याला झालं आहे. याआधी आम्ही कधीच उघडपणे असं एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं नाही.
मला अर्थातच ते आवडतं पण इथे उत्खननाच्या ठिकाणी आणखी राहता आलं असतं तर बरं झालं असतं. पृथ्वीच्या इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या स्तरावर मी आता पोचले आहे… माणूस जेव्हा एका वैज्ञानिक क्रांतीच्या उंबरठ्यावर होता… जीवशास्त्रज्ञांनी लावलेल्या नवीन क्रांतिकारक शोधांमुळे आणि ऊर्जेच्या एका नवीन स्रोताच्या शोधामुळे त्याचं कंटाळवाणं आयुष्य आणि जगण्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष खूप सोपा होणार होता. एक मानवजात म्हणून, सामूहिकरित्या, जर तो शहाण्यासारखा वागला असता, तर त्याला अखेरचं युद्ध टाळता आलं असतं आणि इथेच पृथ्वीवर स्वर्ग उभारता आला असता.
मातीचा सुगंध श्वासात भरून घेत मी माझ्या कुटीच्या दारात उभी राहते. उन्हाळ्यात सुकलेल्या जमिनीवर पावसाचे पहिलेवहिले थेंब पडल्यावर दरवळणारा हा उत्कट सुगंध मला आवडतो. स्वर्गावर हा गंध येत नाही कारण तो पृथ्वीच्या मातीत राहणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे उत्पन्न होतो. स्वर्गावर मातीत फार कमी आणि निरुपद्रवी जीवाणू राहतात. पृथ्वीच्या मातीच्या तुलनेत, आमची घरची माती जवळजवळ निर्जंतुकच म्हणायला हवी. मी दीर्घ श्वास घेते. या सुगंधातून पृथ्वी मला काही सांगू पाहते आहे. पावसाचा बारीक आवाज सोडला तर सगळं काही शांत आहे… आणि पूर्ण अंधारात बुडालेलं. पृथ्वीवर स्वयंप्रकाशित झुडुपं नाहीत. आज उत्खननाच्या जागेवरून गोळा केलेले नमुने तपासण्याचा मला मोह होतो. पण उद्या मला तिथे पहाटेच पोचायचं आहे. त्यामुळे तो मोह टाळून मी झोपायला जाते.
______________________________________________________________________________________________________________
कालच्या वावटळीने पसरवलेला धुळीचा थर स्वच्छ करून मी खणण्याच्या यंत्राने खोदलेल्या सर्वात खोल उभ्या विवरात खणायला सुरुवात करते. या ठिकाणी मी इतकी भूतकाळात गेले आहे, की आता मला एकामागून एक बांधकामाचे स्तर सापडताहेत. मध्ये कुठेच रिकामा स्तर नाही. बांधकामाची जरी पडझड झालेली असली आणि बांधकामासाठी वापरलेली सामग्री जरी जीर्णावस्थेत असली, तरी त्यात सापडणाऱ्या वस्तूंच्या आधारे त्या वास्तूचा उपयोग कशासाठी होत असला पाहिजे याचा मी बऱ्यापैकी अंदाज लावू शकते. बहुतेक घरंच दिसताहेत. त्यात लोकांच्या वापरायच्या खासगी वस्तू फाटक्या आणि तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. कोण असतील चार हजार वर्षांपूर्वी इथे राहणारी माणसं…? या घरांशी आणि त्यांतल्या वस्तूंशी त्यांच्या किती भावना जोडलेल्या असतील! त्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यांची एक दूरची वारस आता पाहत आहे हे जर त्यांना कळलं तर कसं वाटेल?
दुपार झाली आहे आणि मी खणण्याच्या सगळ्या मोठ्या यंत्रांचं काम थांबवलं आहे. हळुवारपणे खणायचं काम काळजीपूर्वक करायला हवं; कारण मला कुतूहल वाटेल असं जे काही सापडतं आहे त्याचे नमुने मी गोळा करते आहे. अशा प्रत्येक तुकड्याचा किती उपयोग होणार आहे हे जोखत बसायला आत्ता वेळ नाही. तळ्याच्या काठी परत गेल्यावर ते करता येईल. हळू खणणारी यंत्रं जास्त आवाज करत नाहीत आणि त्यांच्या कुंचल्याच्या नियमित होणाऱ्या आवाजात अधूनमधून त्यांना मार्गदर्शन करणारा माझाच आवाज मला ऐकू येतो. संध्याकाळ होईपर्यंत माझी नमुने गोळा करायची पिशवी पुन्हा भरून जाते आणि खणायच्या मोठ्या यंत्राला जोडलेल्या क्रेनने मी तिला विवराच्या बाहेर खेचून आणते. विंगबॉलच्या मैदानाएवढ्या मोठ्या झालेल्या त्या विवराकडे मी एकवार पाहते. त्याच्या एका भागात भिंतीचे काही अवशेष आहेत तर दुसऱ्या एका भागात तुटलेल्या वस्तू विखुरलेले मातीचे ढीग आहेत. जिथे मी सरळ खाली खणत गेले आणि जिथून इतिहासाचे अनेक पदर उलगडत गेले असे तीन खोल खड्डे दिसत आहेत.
आत्ता मी अशाच एका खड्ड्यात उभी आहे, जमिनीखालचा अंदाज घेणारा दंड एकदा शेवटचा फिरवून अजून लक्षात न आलेली एखादी घन वस्तू तिथे दडली आहे का ते पाहत आहे. लवकरच मी सगळा पसारा गुंडाळून खणायचं सगळं काम थांबवणार आहे. सगळी यंत्रं मग सुप्तावस्थेत जातील, त्यांच्या आपोआप घड्या घातल्या जातील आणि मी मुद्दाम लावून ठेवलेल्या तिरक्या पट्टीवरून घरंगळत विवरातून बाहेर चढून जातील. एखादा गोळा केलेला नमुना पिशवीत टाकायचा राहून तर गेला नाही ना हे पाहण्यासाठी खणलेल्या संपूर्ण भागावरून मी एकदा डोळे फिरवते. प्रत्येक चौरस फुटाचा भाग मी काळजीपूर्वक तपासत असतानाच जमिनीखालचा अंदाज घेणाऱ्या दंडाचा गजर अचानक वाजतो. त्याला जमिनीखाली काहीतरी घन वस्तू आढळली आहे.
मी सगळ्यात जवळच्या हळू खणणाऱ्या यंत्राला बोलावते आणि त्याला माझ्या पायाखालच्या जमिनीखाली शोध घेण्याची सूचना देते. सूर्यास्त झाला आहे आणि अंधार पडायला लागला आहे, पण हा नवीन लागलेला शोध सोडून जायला मी तयार नाही. खणायच्या मोठ्या यंत्राचे प्रखर दिवे मी लावते आणि जमिनीतून काय बाहेर पडेल ते पाहण्यासाठी हात आणि गुडघे टेकून ओणवी होते. पंधरा मिनिटं हळूहळू खणल्यावर, जमिनीखाली पुरलेली एक चौकोनी पेटीसारखी वस्तू दिसू लागते. हा काही अवशेष किंवा एखाद्या वस्तूचा तुटलेला तुकडा नाही… ती एक फूट लांब आणि रुंद अशी अखंड पेटी आहे. ती ठोस धातूची बनलेली आहे आणि तिला फारशी इजा झालेली नाही. त्यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार. भलत्या उत्साहात मी माझ्या हातांनीच माती उकरायला लागते. शेवटी, हळू खणणाऱ्या यंत्राच्या मदतीने मी ती पेटी जमिनीतून बाहेर काढते आणि उचलून दिव्याच्या उजेडात धरते. ती फार जड नाही पण त्यात नक्की काहीतरी आहे. त्याला एक आकडे फिरवून लावायचं कुलूप आहे पण ते पार गंजून गेलं आहे आणि आकड्यांची चकती फिरत नाहीये.आत जे काही आहे त्याला धक्का लागू न देता ती उघडण्यासाठी मला थोडी मेहनत करावी लागणार.

आता जवळजवळ पूर्ण अंधार पडलाय आणि मिट्ट काळोख होण्यापूर्वी मला माझ्या कुटीत परतायला हवं. सुरक्षिततेचा नियम मोडल्याने मला अस्वस्थ वाटत आहे. मी यंत्रांना पटापट सुप्तावस्थेत जाण्याच्या सूचना देते आणि यंत्रं बंद होऊन विवरातून बाहेर पडण्याची वाट पाहत अधीरपणे उभी राहते. नवीन सापडलेली पेटी हातात धरून मी स्वतः बाहेर येईपर्यंत, आकाशात तारे उगवायला लागले आहेत आणि आवतीभोवतीच्या शांततेवर रातकिड्यांनी कुरघोडी केली आहे. मी माझ्या जमिनीवरून चालणाऱ्या गाडीकडे उडत जाते, त्याचा दिवा चालू करते आणि मग मला जरा बरं वाटतं. त्याच्या मागच्या टोकाला मी यंत्रांची साखळी जोडते आणि माझ्या कुटीकडे माझा प्रवास सुरू होतो. माझ्या घरच्या पथकाचा फोन येण्यापूर्वी मला घरी पोचायचं आहे. माझी कुटी दृष्टिपथात येते तेव्हा माझा कॉम वाजतो.
“अजूनही तू बाहेर अंधारात का हिंडते आहेस?” ॲग्नॉनचा आवाज चिंतातुर आहे कारण मी अजूनही गाडीवर आहे हे त्याला स्पष्ट दिसतं आहे.
“मी घरी पोचलेच समज, ॲग्नॉन. बघ, मला काय सापडलं. एक कुलूप लावलेली पेटी आहे ती.”
“उघडण्यापूर्वी काळजी घे. उघडायचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यात काही धोकादायक नाही ना हे तपासून बघ. कुठल्या काळातली आहे ती?”
“मी कार्बन १४ ची चाचणी करेनच नंतर पण साधारणपणे ती एकविसाव्या शतकातली असावी. शेवटी मी त्या स्तरापर्यंत पोचले होते.”
“बरं, लवकर घरी पोचून विश्रांती घे. उद्या तुला लांबचा विमान प्रवास करून यायचं आहे.”
“हो.”
मी घरी पोचते आणि माझी नमुन्यांची पिशवी, त्यातल्या कुलूप असलेल्या पेटीसकट आत घेते. संध्याप्राशनापूर्वी मला आंघोळ करायला हवी.
_________________________________________________________________________________________
प्रकरण एकोणिसावे समाप्त
