तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा

कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ ही मालिका नितांतसुंदर आहे. या मालिकेतील अनेक दृश्यं अविस्मरणीय आहेत. या मालिकेतील माझ्या मनावर प्रभाव पाडलेला एक प्रसंग आठवतो. या दृश्यात एक मोठं वाचनालय दाखवलं आहे. वाचनालयातील प्रत्येक मजल्यावर भिंतींलगत पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे ठेवलेली आहेत. कार्ल सेगन त्या पुस्तकांच्या कपाटांकडे निर्देश करून म्हणतात, ‘अशी कल्पना करा, की तुम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचता. या गतीने जर तुम्ही आयुष्यभर पुस्तके वाचली तरीही आयुष्याच्या अखेरीस तुमची काही हजार पुस्तकेच वाचून होतील. म्हणजे पुस्तकांच्या या कपाटापासून आपण सुरुवात केली,’ असं म्हणत ते चालायला सुरुवात करतात आणि पुस्तकांची सात-आठ कपाटे ओलांडून थांबतात, ‘तर अंदाजे इथपर्यंत आहेत तितकी पुस्तके आपली वाचून होतील.  मोठ्या वाचनालयात एकूण जितकी पुस्तके असतात त्याचा हा अगदी छोटा अंश आहे. त्यामुळे ही पुस्तके कुठली असावीत याची निवड महत्त्वाची ठरते!’ 

वाचण्यासाठी नवी पुस्तके निवडताना अनेकदा मला हा प्रसंग आठवतो. मर्यादित आयुष्यात वाचता येतील अशी पुस्तकेदेखील मर्यादित असतील हे साहजिक आहे. ती उत्तम आणि जाणीवपूर्वक निवडलेली असावीत हा विचारदेखील योग्यच आहे;  पण ही निवड करावी कशी?

वाचनाची आवड असलेल्या बहुतांश व्यक्तींच्या वाचनाच्या प्रवासात काही समांतर दुवे असतात. लहानपणी वाचनाची सुरुवात गोष्टींच्या सचित्र पुस्तकांपासून, ‘कॉमिक्स’ पासून होते. शाळेची पुस्तके बहुतांश वेळा रुक्ष माहिती देणारी असतात. गोष्टींची पुस्तकं मात्र स्वतःच्या आनंदासाठी वाचण्याची असतात. किशोरवयात धाडसकथा, रहस्यमय कथा वगैरे प्रकारांची पुस्तकं आवडीने वाचली जातात. मराठी वाचकांना इथे कदाचित ‘फास्टर फेणे’ची पुस्तकं आठवतील. इंग्रजी वाचकांना शेरलॉक होम्स, एनिड ब्लायटनची पुस्तकं आठवतील. मग वेगवेगळ्या विषयांवरच्या कादंबऱ्या किंवा नॉव्हेल्स वाचण्याची सुरुवात होते. बहुतांश वाचकांसाठी तरुणवयात येईपर्यंत वाचनाचं प्राधान्य कल्पज साहित्याला असतं. शाळकरी वयात वैचारिक किंवा तथ्यज पुस्तकं तुलनेने कमी वाचली जातात. प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, प्रवासवर्णने वगैरे तथ्यज पुस्तकं काही प्रमाणात वाचली जातात. तरुण वयात प्रवेश केल्यावर हळूहळू तथ्यज पुस्तकांचं वाचन वाढू लागतं. ते आवश्यकही असतं; कारण जग समजून घेण्यासाठी चांगली तथ्यज पुस्तके मोलाची ठरतात. नवे वाचक सर्वप्रथम तथ्यज पुस्तकांकडे वळतात तेव्हा ती पुस्तके पाठ्यपुस्तकांसारखी रुक्ष भाषेत लिहिलेली नसावी अशी अपेक्षा असते. वेगवेगळ्या वयांच्या, पार्श्वभूमीच्या वाचकांसाठी तथ्यज पुस्तकांची काठिण्य पातळी वेगवेगळी असावी लागते. इंग्रजीत याची चांगली उदाहरणे आढळतात.

इंग्रजीत ‘क्वांटम फिजिक्स फॉर बेबीज’ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकात सोप्या रंगीत चित्रांच्या आधारे लहान मुलांसाठी अणूंच्या जगाची माहिती दिली आहे. या पुस्तकात मजकूर फारसा नाही. संकल्पना समजावून देण्यासाठी आकर्षक चित्रांचा आधार घेतला आहे. लहान मुलांना ‘क्वांटम फिजिक्स’ शिकण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण या विषयावर मुलांसाठी उत्तम पुस्तक इंग्रजीत उपलब्ध आहे. इंग्रजीत ‘सोफीज वर्ल्ड’ नावाचं पुस्तक आहे. यात किशोरवयीन मुलांना अगदी रंजक शैलीत तत्त्वज्ञानाच्या सर्व महत्त्वाच्या शाखांचा परिचय करून दिला आहे. ‘कॉन्शियसनेस – ए व्हेरी ब्रिफ इंट्रोडक्शन’ नावाचं ऑक्सफर्ड प्रेसने काढलेलं छोटेखानी इंग्रजी पुस्तक आहे. यात नव्या वाचकांसाठी थोडक्यात, सोप्या शब्दांमध्ये आत्मभान, स्वत्वाची जाणीव या विषयांवरील अद्ययावत माहिती दिली आहे. याच विषयांवर इंग्रजीत २५०-३०० पानांची पुस्तके आहेत आणि ७००-८०० पानांची पुस्तकेदेखील आहेत. अशी वेगवेगळ्या पातळीची पुस्तके आजूबाजूला ठेवली तर जणू वरवर जाणाऱ्या पायऱ्या तयार होतात आणि या पायऱ्यांच्या आधारे जग समजून घेण्याचा प्रवास करता येतो. मराठीत मात्र अनेक विषयांच्या बाबतीत अशा अधल्यामधल्या पायऱ्या सहज सापडत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. अशा पायऱ्या दृष्टिक्षेपात नसल्यामुळे मराठी वाचकांना इंग्रजी पुस्तकांकडे वळावं लागतं. ज्यांना इंग्रजी पुस्तकं वाचण्याची सवय नाही असे वाचक विषयापासून दुरावले जातात;  शिवाय इंग्रजी पुस्तकांच्या पर्यायामुळे सगळे प्रश्न सुटतात असेही नाही. इंग्रजी पुस्तकांमध्ये स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या विषयांना न्याय मिळत नाही. अनेक दशकांपासून वाचन चळवळीत सक्रिय असलेले गजानन थत्ते यांनी स्थानिक भाषेत दर्जेदार तथ्यज पुस्तकांच्या उपलब्धतेचा मुद्दा आग्रहाने मांडला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही मराठी तथ्यज पुस्तकांवरील प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचा परिचय या लेखातून करून दिला आहे.

तथ्यज पुस्तकांचा प्रकल्प   

मराठी तथ्यज पुस्तकांच्या प्रकल्पामागील मूळ संकल्पना ही अतुल-प्राजक्ता यांची. अतुल-प्राजक्ता हे नागपूरमध्ये उद्योजक आहेत;  पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते विविध सामाजिक, सांस्कृतिक प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभागी आहेत. भटक्या, भारवाड समाजाच्या मुलांचं शिक्षण, नाट्य, साहित्य आणि इतर सामाजिक कार्यक्रम, सेंद्रिय शेतीत सहभाग, विविध कार्यशाळांचं आयोजन असे अनेक उपक्रम ते वर्षभर राबवतात. विविध क्षेत्रांत तळमळीने कामे करणाऱ्या, धडपडणाऱ्या तरुणांसोबत त्यांचे जिवलग बनून मार्गदर्शन करतात. ‘आजचा सुधारक’ हे मराठीतील विवेकवादी विचारांना समर्पित असलेले महत्त्वाचे अनियतकालिक आहे. सध्या ह्या मासिकाची डिजिटल कॉपी अतुल-प्राजक्ता प्रकाशित करतात. २०२५ साली हे दोघे पुण्यात आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर मराठीतील तथ्यज पुस्तकांच्या स्थितीबद्दल चर्चा झाली. मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होण्यासाठी आणि छोट्या गावांमधील सर्वसामान्य माणसांपर्यंत आजच्या काळातील महत्त्वाचे विषय पोचण्यासाठी मराठीत चांगल्या तथ्यज पुस्तकांचा संग्रह असायला हवा यावर आमचं एकमत झालं. मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील निवडक अशा तथ्यज पुस्तकांचा संग्रह केला तर तो वाचनालयांना पुरवता येईल, पुस्तक प्रदर्शनात ठेवता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या वाचकांना तथ्यज पुस्तकांकडे वळताना सुरुवात कुठून करावी, नेमकी कुठकुठली पुस्तकं वाचावी हे ठरवायला मदत होईल. या प्रकल्पात प्रमुख तीन टप्पे असू शकतील असं चर्चेतून समोर आलं :

१) मराठीत प्रकाशित झालेल्या विविध तथ्यज पुस्तकांमधून अशी उत्तम पुस्तके निवडायची जी नव्या वाचकासाठी एखाद्या विषयाच्या ‘प्रवेशद्वाराचं’ काम करतील. अशी काही पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे त्यांचं वितरण सोपं असेल. काही पुस्तकं मात्र ‘आऊट ऑफ प्रिंट’ असू शकतील. जी महत्त्वाची पुस्तकं सध्या उपलब्ध नाहीत ती   पुनःप्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांना सुचवता येईल

२) काही पुस्तकं मराठीत लिहिली गेली नसून ती मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद असतील. अशी निवडक महत्त्वाची अनुवादित पुस्तकंदेखील यात समाविष्ट करून घेतली जातील. अशी  शक्यता आहे, की काही महत्त्वाची इंग्रजी पुस्तके मराठीत अनुवादित व्हायला हवीत;  पण अजून झालेली नाहीत. त्यांचा अनुवाद करून घेण्यासाठी पुढाकार घेता येईल.

३) स्थानिक पातळीवरील असे काही महत्त्वाचे विषय असू शकतात ज्यांच्यावर अजून चांगलं तथ्यज पुस्तक निघालेलं नाही. तज्ज्ञ लेखकांच्या मदतीने अशा विषयावर नव्या पुस्तकाच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे लागेल.

४) कुठल्याही वाचनालयातील पुस्तकांची संख्या नवीन वाचकाला दडपवणारी असते. तसेच एवढ्या मोठ्या संख्येने समोर दिसणाऱ्या पुस्तकांमधून निवड करणेही कठीण जाते. त्यामुळे येथे आपल्या निवडक पुस्तकांची संख्या १०० वर मर्यादित करायला हवी.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा मराठीत आधीच प्रकाशित झालेली निवडक तथ्यज पुस्तकं शोधण्याचा होता. सुरुवातीला अशा पुस्तकांची यादी बनवणं गरजेचं होतं.  ह्यासाठी वाचकांना आवाहन पाठवावे असं ठरलं. त्यानुसार अतुल-प्राजक्ता आणि लेखक व अभ्यासक सोपान जोशी यांनी मिळून वाचकांसाठी एक आवाहन तयार केलं. हे आवाहन मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये तयार करण्यात आलं, कारण असा प्रकल्प फक्त मराठी भाषेत नाही तर इतरही भारतीय भाषांमध्ये होणं गरजेचं आहे याची जाणीव होती. हे आवाहन आमच्या परिचयातील वाचकांना, लेखकांना आणि ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना पाठवण्यात आलं. वाचकांना पुस्तकाचे नाव, लेखक, थोडक्यात पुस्तक परिचय आणि हे पुस्तक उपक्रमासाठी योग्य का वाटते याबद्दल टिप्पणी पाठवण्यास सुचवली. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. वाचकांच्या प्रतिसादातून जवळपास दोनशेहून अधिक पुस्तकांची नावे समोर आली. या यादीतून छाननी करून चांगली पुस्तके निवडता येणार होती. त्याशिवाय आम्हांला स्वतंत्रपणेदेखील पुस्तकं शोधून यात भर घालायची होती. पुस्तके निवडण्याचे निकष ठरवायचे होते. वाचकांनी सुचवल्यापैकी जी पुस्तके आमच्या वाचण्यात आली नव्हती ती वाचून त्यावर निर्णय घ्यायचा होता. वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी पुस्तकाचा थोडक्यात परिचयदेखील लिहायचा होता. अशा अनेक गोष्टी या प्रकल्पासाठी आवश्यक होत्या. ‘निरूपक’ ह्या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्थेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात यावा हे निश्चित करण्यात आलं. एखाद्या विषयाचं प्रतिनिधित्व, त्यावर भाष्य किंवा विषयाचं प्रस्तुतीकरण अशा अनेक अर्थांच्या छटा संस्थेच्या नावातच सामावल्या आहेत.  

पुस्तकांची निवड  

‘निरूपक’च्या ह्या प्रकल्पासाठी आम्ही छोटीशी टीम केली त्यात माझ्यासह अतुल-प्राजक्ता आणि सोपान जोशी आहेत, लोकमत समाचारचे पत्रकार आणि प्रभारी संपादक सुनील सोनी, महाराष्ट्र टाइम्सचे वृत्तसंपादक मनोज मोहिते आहेत. मुद्रण आणि इतर सामाजिक, सांस्कृतिक कामांत सक्रिय असलेले भरत मोहनी तसेच सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त हर्बल खतांचे उत्पादन व विक्री करणारे उद्योजक आणि उत्तम रसिक वाचक श्रीपाद जोशीदेखील आहेत. 

या प्रकल्पाच्या सुरुवातीला तथ्यज पुस्तकांच्या निवडीचे निकष ठरवणं आवश्यक होतं. हा प्रकल्प नव्या वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून केल्यामुळे पुस्तकांच्या काठिण्य पातळीचा प्रश्न महत्त्वाचा होता. नव्या वाचकांना एखाद्या विषयावर चांगलं पण जाडजूड पुस्तक सुचवणं म्हणजे त्यांना सुरुवातीलाच उंच पायरीवर उडी मारायला सांगण्यासारखं होतं.

प्रवासाच्या सुरुवातीला पायरीची उंची कमी ठेवणं गरजेचं होतं. त्यानुसार १५० ते २५० पाने अशी उंची ठरवण्यात आली. मराठीत २५० हून जास्त पृष्ठसंख्या असलेली काही अप्रतिम अशी तथ्यज पुस्तके आहेत. या तथ्यज पुस्तकांतील सर्वोत्तम ‘उंच’ पायऱ्या आहेत. यात नंदा खरेंचं ‘कहाणी मानवप्राण्याची,’ जयंत नारळीकरांचं ‘आकाशाशी जडले नाते,’अंजली चिपलकट्टी यांचं ‘माणूस असा का वागतो?’ तसेच महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद वगैरेंचा समावेश होईल. सध्यातरी अशा उंच पायऱ्या प्रकल्पात निवडलेल्या नाहीत. नव्या वाचकांना अशा उंच पायऱ्यांपर्यंत पोचायचा मार्ग दाखवणं हा आमचा हेतू आहे. हा प्रकल्प नव्या वाचकांसाठी असला तरी तो लहान मुलांसाठीचा नाही. त्यामुळे लहान मुलांची पुस्तके यात समाविष्ट नाहीत. या प्रकल्पात विविध विषयांवरील पुस्तके असायला हवीत. त्यानुसार आम्ही विषयांची वर्गवारी तयार केली. ती यादी पुढीलप्रमाणे :

सामाजिक प्रश्न, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोण, मोठ्या माणसांची व्यक्तिचित्रणे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, निसर्गवर्णन, आरोग्य आणि वैद्यकक्षेत्र, मेंदूविज्ञान आणि मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, नाट्यकला आणि चित्रपट, छायाचित्रकला, क्रीडा, पत्रकारिता आणि शोधपत्रकारिता, प्रवासवर्णन, शैक्षणिक क्षेत्र, राजकारण, तत्त्वज्ञान, स्फुट तथ्यज लेखसंग्रह आणि पुस्तकांवरील पुस्तके.

अशा सगळ्या विषयांवरील पुस्तके निवडायची ठरवली. हा तथ्यज पुस्तकांचा प्रकल्प असला तरी यात काही अपवादात्मक ललित पुस्तके निवडावी असे चर्चेतून पुढे आले. उदाहरणार्थ : ‘अ‍ॅनिमल फार्म’ हे पुस्तक ललित असलं तरीही ते सोव्हियत रशियाच्या वास्तवाचं भेदक चित्रण आहे; किंवा पु. लं देशपांड्यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ काल्पनिक असलं तरी त्यात एका पिढीआधीच्या मराठी मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजातील व्यक्तींचं, स्वभावाचं मार्मिक चित्रण आहे. अशी अपवादात्मक पुस्तके निवडायचं ठरवलं. काही पुस्तकांमध्ये तथ्यज आणि कल्पज लिखाणाचं मिश्रण असू शकतं. पुस्तक चांगलं असेल, तसेच त्यात तथ्यज भाग कुठला आणि कल्पज भाग कुठला हे स्पष्ट लक्षात येण्यासारखं असेल तर त्याची निवड केली आहे. कुठल्याही विचारसरणीचा दुराग्रह करणारी किंवा ‘प्रचारात्मक’ पुस्तके कटाक्षाने टाळली आहेत. छद्मविज्ञानालादेखील नाकारलं आहे.  

इतिहास हा चुकीच्या कारणांसाठी भारतीयांचा आवडता विषय आहे. एकीकडे आमचे पूर्वज किती थोर होते, त्यांना सगळ्या विषयांवरील सगळं कसं आधीच माहीत होतं असं मांडणारी पुस्तके आहेत. ‘मिथककथांना’ इतिहास समजणारीदेखील पुस्तके आहेत. अशी पुस्तके नाकारली आहेत. दुसरीकडे मराठीत अनेक रंजक ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. त्यात बऱ्याचदा इतिहास कमी आणि कल्पनारंजन जास्त असा प्रकार दिसतो. त्यामुळे अशी पुस्तकेदेखील नाकारली आहेत. इतिहासाचं संदर्भासहित वर्णन करणारी, निष्पक्ष इतिहास मांडणारी काही चांगली पुस्तके आम्हांला सापडली. त्यांचा समावेश केलेला आहे.

पुस्तकांच्या बाजारात ‘सेल्फ हेल्प’ प्रकारची अनेक लोकप्रिय पुस्तके आहेत. या प्रकारची पुस्तके कोणी सुचवण्यापेक्षा ज्याची त्याने निवडणे योग्य ठरते. या प्रकारची पुस्तके प्रकल्पात घेतलेली नाहीत. त्याशिवाय धर्म, अध्यात्म विषयांवरील पुस्तकेदेखील समाविष्ट नाहीत. मराठीत काही उत्तम आत्मचरित्रे आहेत; मात्र अनेकदा आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक अनुभव आणि भावभावना, व्यक्तिगत आयुष्यात अडचणींवर मात कशी केली यावर भर दिला असतो. या प्रकल्पात नव्या वाचकांना व्यापक विषयाचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकांना प्राध्यान्य असल्यामुळे अशी आत्मचरित्रेदेखील समाविष्ट केलेली नाहीत.

या सगळ्या निकषांच्या आधारे आम्ही पुस्तके निवडली. आतापर्यंत निवडलेल्या पुस्तकांवरील टिप्पणी तसेच काही प्रमाणात एकूण मराठी तथ्यज साहित्याबद्दल काही निरीक्षणे खाली नोंदवली आहेत.

आतापर्यंत निवडलेल्या पुस्तकांवर टिप्पणी

पुढे दिलेली टिप्पणी, निरीक्षणे वैयक्तिक पातळीवरील आहेत. या प्रकल्पासाठी निवडलेली पुस्तके २५० पानांच्या खालील असल्यामुळे बहुतांश निरीक्षणे अशाच पुस्तकांना लागू पडणारी आहेत. काही निरीक्षणे मात्र व्यापक मराठी तथ्यज साहित्याबाबत आहेत. अजून हा प्रकल्प सुरू असल्यामुळे ही अंतिम स्वरूपाची निरीक्षणे नाहीत. 

●  मराठीत मोठ्या व्यक्तींची बरीच चांगली चरित्रे उपलब्ध आहेत; पैकी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांवरील पुस्तके, ऐतिहासिक व्यक्तिचित्रणे ह्यांचा समावेश आहे.  सामाजिक कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा आणि कामाचा परिचय करून देणारी पुस्तके आहेत. विदेशातील काही मोठ्या व्यक्तींवरही चांगली चरित्रे मराठीत उपलब्ध आहेत. इथे वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’ पुस्तकाचा विशेष उल्लेख करायला हवा. गेल्या तीन पिढ्यांपासून हे वाचकांचं आवडतं पुस्तक आहे. चरित्रलेखनात वीणा गवाणकर यांचा विशेष उल्लेख करणं आवश्यक ठरतं. इतरही काही लेखकांनी विदेशातील शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर काही प्रमाणात लिखाण केलेलं आहे. चरित्रांच्या बाबतीत बघताना महात्मा गांधींवरील चरित्रांचा विशेष उल्लेख करायला हवा. महात्मा गांधींच्या बाबतीत मराठीत सगळ्या उंचीच्या पायऱ्या, म्हणजे अगदी लहान मुलांच्या सचित्र पुस्तकांपासून सुरुवात करत जाडजूड ग्रंथांपर्यंत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. हे महात्मा गांधींच्या समाजमनावरील प्रभावाचेच द्योतक आहे.

●  मराठीत शोधपत्रकारितेवर आधारित असलेले काही उत्तम लेख, पुस्तके आहेत. इथे अनिल अवचट, मिलिंद बोकील यांचे लेख, हेरंब कुलकर्णी यांची ‘दारिद्र्याची शोधयात्रा,’ राजा शिरगुप्पे यांची ‘शोधयात्रा,’ समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘देवाच्या नावाने,’ ‘अर्धी मुंबई’ यांसारख्या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. दरवर्षी दिवाळी अंकांमध्येही काही दर्जेदार रिपोर्ताज प्रसिद्ध होतात. यावरून मराठीत सामाजिक शोधपत्रकारितेची चांगली परंपरा आहे हे दिसून येतं. त्या तुलनेत राजकीय शोधपत्रकारितेची उदाहरणे कमी आहेत. राजकीय शोधपत्रकारिता महाराष्ट्रात आणि भारतात धोक्याची असल्याचं हे चिन्ह मानावं लागेल.

●  विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोणावर मराठीत उल्लेखनीय अशी मोजकी पुस्तके सापडतात. २५० पानांच्या आत नंदा खरे यांचं ‘ज्ञाताच्या कुंपणापलीकडे,’ मिलिंद वाटवे यांचं ‘कट्टा मॉडेल’ अशी काही पुस्तके आहेत. खगोलशास्त्रावर डॉ. जयंत नारळीकर आणि विवेकवादावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी उत्तम लिखाण केलं आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताला दीडशे वर्षं होण्याच्या प्रसंगी मराठीतील काही नामवंत लेखकांनी उत्क्रांतीवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ या नावाने प्रसिद्ध झाला होता. अशा स्वरूपाची आणखी पुस्तके मराठीत येणं गरजेचं आहे. विज्ञानासहित इतरही अनेक विषयांवर उत्तम तथ्यज लिखाणाबद्दल नंदा खरेंची विशेष दखल घेणं गरजेचं ठरतं. विज्ञानाच्या बाबतीत उत्क्रांती, खगोलशास्त्रावर पुस्तके जास्त आढळतात. इतर विषय मात्र त्यामानाने दुर्लक्षित आहेत.  

●  मराठीत काही उत्तम प्रवासवर्णने आहेत. चिंतन आणि सामाजिक विषय यांना जोडलेली प्रवासवर्णने, शोधयात्रा विशेष ठरतात. इथे तरुण लेखकांनी लिहिलेली ‘दोन चाके आणि मी,’ ‘तीन मुलांचे चार दिवस’ विशेष उल्लेखनीय ठरतात. मिलिंद बोकील यांचं ‘समुद्रापारचे समाज’  पुस्तक हे जगभरातील समाजांचे, संस्कृतींचे, त्यांच्या सामाजिक प्रश्नांचे चित्र उभे करते. उत्तम तथ्यज लिखाणाबद्दल मिलिंद बोकील यांचादेखील विशेष उल्लेख करायला हवा. सामाजिक प्रश्न, शोधपत्रकारिता, मराठी साहित्यावर भाष्य, ललित साहित्य अशा अनेक विषयांवर मिलिंद बोकील यांनी महत्त्वपूर्ण लिखाण केलं आहे.

●  निसर्गवर्णन, पर्यावरण आणि पर्यावरणाचे प्रश्न यांवरही काही उत्तम पुस्तके मराठीत आहेत. इथे माधव गाडगीळ, अतुल देऊळगावकर, मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांचा उल्लेख करायला हवा. निसर्गाला पूरक जीवनशैलीच्या संदर्भात दिलीप कुलकर्णी यांनी उल्लेखनीय लिखाण केलं आहे. तरुण शास्त्रज्ञ कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे उल्लेखनीय असं महत्त्वाचे पुस्तक आहे. इथे अतुल देऊळगावकर यांचा विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी पर्यावरणाच्यासोबत शोधपत्रकारिता, साहित्य, संगीत, महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय अशा विविध विषयांवर उत्तम लिखाण केलेलं आहे.

●  मराठीत व्यापक इतिहासावर मात्र विशेष पुस्तकं नाहीत. इतिहास लिखाणाची शिस्त फार कमी पुस्तकांमध्ये आढळते. इतिहासाबद्दल दिलेल्या माहितीचा विश्वासार्ह संदर्भ दिला असावा अशी अपेक्षा असते. इतिहासाचा पद्धतशीर अभ्यास करून, नवं संशोधन करून संदर्भासहित दिलेली पुस्तके कमी आहेत. चांगल्या ऐतिहासिक पुस्तकांची उदाहरणे म्हणून कॉ. गोविंद पानसरे यांचं ‘शिवाजी कोण होता?’ गिरीश कुबेर यांचं ‘रिनेसान्स स्टेट,’ मनोहर सोनवणे यांचं ‘जालियनवाला बाग’ या पुस्तकांचा उल्लेख करायला हवा.

●  अलीकडच्या काळात भारतात धार्मिक द्वेषाचा प्रश्न तीव्र झाला आहे. समाजात टोकाचं ध्रुवीकरण झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर मानवतावादी, सलोख्याचा विषय सांगणारी काही चांगली पुस्तके मराठीत आली आहेत. इथे हिनाकौसर खान यांच्या ‘धर्मरेषा ओलांडताना,’ संजय आवटे यांच्या ‘आम्ही भारताचे लोक,’ सबा नक्वी यांचं प्रमोद मुजुमदार यांनी अनुवादित केलेलं ‘सलोख्याचे प्रदेश’ या पुस्तकांचा विशेष उल्लेख करायला हवा. द्वेषपूर्ण विचारांचं विष उतरवण्यासाठी अशी आणखी पुस्तकं यायला हवीत.     

●  नाट्य, सिनेमा, क्रीडा, संगीत, छायाचित्रकला या विषयांवर तुलनेने कमी पुस्तके मराठीत आढळतात. अशी काही दर्जेदार पुस्तके प्रकल्पात निवडली आहेत. या विषयांवर मराठीत अधिक लिखाण व्हायला हवं.

●  पुस्तकांचा परिचय करून देणारी अनेक चांगली पुस्तके मराठीत आहेत. यात मुख्यत्वे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून दिलेला आढळतो. इतर भारतीय भाषांमधील पुस्तकांचा उल्लेख अपवादाने आढळतो. विविध भारतीय भाषांमधील उत्तम पुस्तकांचे इतर भाषांमध्ये भाषांतर व्हायला हवे हे त्यातून लक्षात येतं.

इंग्रजी भाषेतील उत्तम पुस्तके मराठीत अनुवादित करण्याची संख्या वाढते आहे. मधुश्री प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस यात आघाडीवर आहेत. मनोविकास, रोहन असे इतरही मोठे प्रकाशक अनुवादित पुस्तके आणत आहेत. अलीकडच्या काळात वॉल्डन प्रकाशनने काही उत्तम पुस्तके मराठीत आणली आहेत. हे स्वागतार्ह आहे. 

प्रकल्पाची पुढील दिशा  

एआय, चॅट-जीपीटीच्या काळात जग समजून घेण्यासाठी पुस्तकांची किती गरज उरली आहे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पूर्वी एखादा विषय समजून घेण्यासाठी लोक त्या विषयावरील चांगली पुस्तके शोधायचे.  आजच्या काळात सरळ चॅट-जीपीटीला प्रश्न विचारून उत्तर मिळवण्याची सोय आहे. मग पुस्तकांची आवश्यकता आहे का? माझ्या मते आजच्या काळात चांगल्या पुस्तकांची आवश्यकता जास्त आहे. ज्याबद्दल प्रश्न विचारले जातात अशाच प्रश्नांची उत्तरे चॅट-जीपीटी किंवा इंटरनेटदेतं. किंवा अशाच विषयांची माहिती देतं जे विषय ‘ट्रेंडिंग’ असतात. चांगली पुस्तके नव्या प्रश्नांबद्दल विचार करायला भाग पाडतात. जनमानसाच्या विस्मरणात गेलेल्या किंवा दुर्लक्षित झालेल्या पण महत्त्वाच्या अशा विषयाचा मार्ग खुला करतात. इंटरनेटच्या काळात सर्वसाधारण माहितीचा पूर आला आहे. त्यात निवडक आणि महत्त्वाच्या माहितीचं सार पुरवणारी पुस्तके मोलाची ठरतात. एआयच्या काळात ज्ञानाच्या विषमतेचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. स्थानिक भाषांमध्ये रंजक शैलीत आल्यास सर्वसामान्य माणसांपर्यंत महत्त्वाचे विषय पोचतील. सामान्य माणसांचा लोकशाहीतील सहभाग आणखी अर्थपूर्ण व्हायला यातून बळ मिळेल.

चांगल्या मराठी तथ्यज पुस्तकांचा आमचा शोध सुरू आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी www.nirupak.com हे संकेतस्थळ बनवण्यात आलं आहे. यात आम्ही निवडलेल्या पुस्तकांचा थोडक्यात परिचय लिहिलेला आहे. इंग्रजीत निवडक पुस्तकांचे संग्रह बनवले जातात. उदाहरणार्थ ‘ऑक्सफर्ड लँडमार्क सायन्स – सिरीज’ या नावाखाली विज्ञानावरील काही निवडक पुस्तकांचा संग्रह केला आहे. अशाच धाटणीवर निवडक मराठी तथ्यज पुस्तकांचा संग्रह ‘निरूपक’च्या अंतर्गत उपलब्ध केला जाईल. मराठीबरोबर हिंदी भाषेतही अशा पुस्तकांचा शोध सुरू आहे. हिंदीच्या वाचकांची संख्या मराठी वाचकांपेक्षा जास्त असली तरीही हिंदीमध्येदेखील चांगल्या तथ्यज पुस्तकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे हिंदीतदेखील असा संग्रह बनवणं आवश्यक आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतरही भारतीय भाषांमध्ये असा प्रयोग करता येईल. त्यातून चांगलं तथ्यज लिखाण करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देता येईल. तसेच विविध भारतीय भाषांमधील उत्तम पुस्तके भाषांतरित करता येतील. त्यासाठी प्रकाशकांसोबत काम करता येईल. ही तथ्यज पुस्तकांची यादी विविध वाचनालयांना, वाचक मंडळांना, स्वतंत्र वाचकांना पुरवता येईल. यातून वाचन चळवळ अधिक सक्रिय व्हायला मदत मिळेल अशी आशा आहे.

 

Author

Leave a Reply