‘How many are you then, said I, if they two are in heaven? Quick was the little maid’s reply, oh master! We are seven.’
‘मराठी नाट्यछटा’ या छोटेखानी पुस्तकाच्या प्रारंभी कवी गिरीश यांनी उद्धृत केलेल्या या ओळी रविकिरण मंडळाच्या सदस्यांची स्मृती जागवतात. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलंय, ‘या करुण सुंदर ओळींची यथार्थ स्मृति करून देणाऱ्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांना!’
तीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीतर्फे ‘रविकिरण मंडळाची निवडक कविता’ हा प्रातिनिधिक स्वरूपा
चा, निवडक कवितांचा काव्यसंग्रह नाटककार वसंतराव कानेटकर आणि डॉ. अनुराधा पोतदार यांनी रसिक वाचकांना सादर केला.


डॉ. अनुराधा पोतदार वसंत कानेटकर

१९९४ साली या पुस्तकाचे संपादन करताना वसंतरावांनी त्या संदर्भातील काही महत्त्वाची कामे मजवर सोपवली. वसंतराव यांनी कवी गिरीश, यशवंत आणि ज्यूलियन यांच्या कविता निवडल्या. बऱ्याच कविता त्यांना मुखोद्गत होत्या. घाटे, माडखोलकर,श्री. बा. आणि मनोरमाबाई, द. ल.गोखले यांच्या कविता डॉ.अनुराधा पोतदार यांनी निवडल्या. दोघांनीही प्रस्तावनेचे काम पूर्ण केले.
माझे काम यानंतर सुरू झाले. या सर्व कविता लिहून त्याची कवींच्या नावाने वर्गवारी करून मग प्रस्तावना लिहिण्याचे, त्याचे हस्तलिखित करण्याचे काम मी पूर्ण केले. त्या दिवसांत कॉंप्युटरची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रेस कॉपीला – हस्तलिखिताला – महत्त्व होते. हस्ताक्षर आणि शुद्धलेखन या गोष्टींना महत्त्व होते. या दोन्ही बाबतींत माझे कौशल्य वसंतराव यांच्या कसोटीला पूर्वीच उतरले होते.(तरुणपणी मी त्यांचा लेखनिक होतो.)
हे सर्व करत असताना कवी गिरीश आणि त्यांचे साहित्यिक मित्र यांचा परिचय झाला आणि मला आठवतंय, की ते काम करताना कवितेचे स्वरूप हळूहळू कसे बदलत गेले, त्याचाही मला शोध लागत गेला.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वसंतराव लिहितात : ‘रविकिरण मंडळ ही मराठी काव्यसृष्टीतली एक अपूर्व घटना आहे. मराठी कविता आज (१९९४ साली) अनेक अंगांनी विस्तारलेली आपण पाहत आहोत. तिच्यात वेळोवेळी क्रांतिकारक बदल होत गेले आहेत. त्यामुळे ‘माइल स्टोन’ ठरलेल्या या मंडळाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन वेळोवेळी होत गेले आहे. आज मराठी कविता अनेक अंगांनी विकसित झाली आहे. अनेक क्रांतिकारक बदल तिच्यात होत गेले आहेत. नवनिर्मितीच्या या प्रवाहाची अविरत खळखळ जुन्यातून नवनिर्मिती करते आणि हे कालचक्र चालू राहते. जुन्या पंडित कवितेला नाकारणारी केशवसुतांची कविता, बेबंद कल्पनाविलासी गडकऱ्यांच्या कवितेला नाकारणारी रविकिरणांची कविता, रविकिरणी कवितेला नाकारणारे क्रांतिकाव्य, क्रांतिकाव्याला नाकारणारी मर्ढेकरांची नवकविता आणि नवकवितेला नाकारणारे दलित विद्रोही काव्य असा हा प्रवाह वाहतो आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ हा अट्टाहास प्रत्येक नवकवितेमधून वेगवेगळ्या कालखंडांत व्यक्त झाला आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे.’
मात्र मतमतांतराच्या गतबल्यातही काही कवींच्या कविता दीपस्तंभासारख्या तेजस्वी दिसतात आणि आसमंत प्रकाशित करतात. उदा. केशवसुत, भा.रा.तांबे, गडकरी, बालकवी, ज्यूलियन, मर्ढेकर, विंदा करंदीकर, पाडगांवकर, बापट, ग्रेस, महानोर, आरती प्रभू, सुधीर मोघे इत्यादी. ही यादी लांबतच जाईल अगदी २०२०पर्यंत! रविकिरण मंडळातील सात सदस्य म्हणजे माधव जूलियन, गिरीश, यशवंत, वि. द. घाटे, श्री. बा आणि मनोरमाबाई रानडे व द.ल.गोखले ! मंडळाच्या संदर्भात अत्र्यांनी गमतीने म्हटले होते, की ‘माधव ज्यूलियन हेच एकमेव कवी होते, बाकीची निव्वळ किरणे होती! विनोद जरी बाजूला ठेवला तरी शतकापूर्वी ज्या मंडळाने एका नवीन प्रकारच्या कवितांना जन्म दिला; वेगळ्या पद्धतीने तिचे सादरीकरण गावोगावी जाऊन केले – प्रसंगी खिशाला खार लावून – त्यांची धडपड आणि तो प्रयोग नेमका काय होता, याचे डोळस सिंहावलोकन करण्यासाठी या लेखाचे प्रयोजन केले आहे. हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, की हा प्रयोग १९२० च्या सुमारास केला गेला आणि शतकपूर्तीच्या निमित्ताने आज याचे वेगळेपण विचारात घेता येईल.

एक अत्यंत महत्त्वाचे छायाचित्र. ‘महाराष्ट्र शारदा मंदिर’ या मूळ गटातून पुढे रविकिरण मंडळ स्थापन झाले. छायाचित्रातील सर्व व्यक्तींची ओळख पटू शकलेली नाही. जाणकारांना याबाबत अधिक काही माहिती असल्यास त्यांनी जरूर कळवावे.
डावीकडे खुर्चीवर बसलेले श्री.बा.रानडे वसौ. मनोरमाबाई रानडे. त्यांच्या मागे उभे आहेत कवी गिरीश, त्यांच्या शेजारी कवी यशवंत, मध्ये खुर्चीवर बसलेल्या दोन व्यक्तींची ओळख पटू शकत नाही. खाली जमिनीवर बसलेले द.ल.गोखले,
छायाचित्रात उजव्या बाजूला खुर्चीवर फेटा धारण करून बसलेल्या दोन व्यक्ती या कवी अनंत तनय व प्राध्यापक चाफेकर आहेत. या दोघांच्या उजव्या बाजूला खुर्चीवर बसलेले प्र. के. अत्रे.
आता मागे उभ्या असलेल्या तीन व्यक्तींपैकी सर्वात उजवीकडे वि. द. घाटे आणि त्यांच्या उजव्या बाजूला माधव जूलियन. माधव जूलियन यांच्या उजव्या बाजूला असलेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.
१९२० च्या सुमारास बालकवी आणि गोविंदाग्रज अकाली निधन पावल्यामुळे मराठी काव्याचा एक कालखंड संपला होता. त्या वेळी पुण्यात ‘महाराष्ट्र शारदा मंदिर’ या नावाची संस्था कवी अनंततनय व प्रा. चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली. यात प्र.के.अत्रे, अज्ञातवासी, मायदेव, गोपीनाथ तळवलकर, ग. ह. पाटील इ. तरुण कवींच्याबरोबर गिरीश, यशवंत, ज्यूलियन, रानडे पतिपत्नी ही तरुण मंडळी होती. संस्थेत नवे-जुने, पुरोगामी,प्रतिगामी अशा संमिश्र साहित्यिकांचा समावेश होता. त्यामुळे त्यांतील काही समविचारी मंडळी एकत्र येणे स्वाभाविक होते. यांतील काही दररविवारी कोणाच्यातरी घरी चहापानाच्या निमित्ताने जमू लागले. या निमित्ताने साहित्यावर, काव्य, शास्त्र,, विनोदावर चर्चा होत असे. यालाच पुढे ‘सन टी क्लब’ ‘रविकिरण मंडळ’ असे नाव मिळाले. सामाजिक जीवनातील उदारमतवाद, ध्येयवाद, सौंदर्यमीमांसा, काव्याबद्दल प्रेम अशा अनेकविध विषयांतून विचारमंथन होत असे. त्यातून ‘किरण’ हा पहिला काव्यसंग्रह मंडळाने प्रकाशित केला. या पहिल्या-वहिल्या प्रयत्नाने काव्यसृष्टीत चांगलीच खळबळ निर्माण केली. ताज्या प्रतिभेच्या निर्मितीचे कुणी स्वागत केले; तर कुणी ‘नवे तमासगीर’ म्हणून हेटाळणीचा सूर लावला. या प्रतिकूल टीकेमुळे सर्वांनी एकत्र येऊन ‘आत्मचिंतन’ केले आणि ठरवले, की आपली काव्यविषयक भूमिका स्पष्ट करणारे ‘काव्यविचार ‘ हे पुस्तक प्रसिद्ध करावे. त्यामागोमाग शलाका, उषा, मधु-माधव, प्रभा असे छोटेखानी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ही सर्व तरुण मंडळी सदाशिव, नारायण व शनिवार पेठेत एकमेकांजवळ राहत. श्री.बा व मनोरमाबाई गायकवाड वाड्यात राहत असत. त्यांच्या निवासस्थानी हे मंडळ जमत असे. रानडे पतिपत्नींची कल्पक योजकता आणि उत्साह फार मोलाचा ठरला. विशेषतः मनोरमाबाईंनी आपल्या अबोल स्नेहशीलतेने मंडळाला ‘घरपण’ दिले. पुनर्विवाहाचे सामाजिक कार्याचे कंकण हाती बांधून डॉ. वि.ल. देशपांडे यांचा पुनर्विवाह घडवून आणला आणि आपला उदारमतवादी दृष्टिकोण त्या काळी समाजात अधोरेखित केला. हे लग्न गायकवाड वाड्यात ९ नोव्हे. १९२३ रोजी झाले म्हणून रविकिरण मंडळाचा जन्म या दिवशी अधोरेखित झाला. ‘किरण’ या पुस्तकाचेही या दिवशी प्रकाशन झाले. ही एक अभूतपूर्व घटना घडली, यात शंका नाही! आरंभीच्या सदस्यांमधील दिवाकर गर्गे काही मतभेदामुळे मंडळ सोडून गेले. त्यांची जागा विठ्ठलराव घाटे यांनी घेतली; पण पुढे व्यवसायानिमित्ताने ही सर्व मंडळी हळूहळू विखुरली गेली. कधी नगरला घाट्यांच्याकडे किंवा पुण्याला गिरीशांच्याकडे मैफिली रंगत. उरले वैयक्तिक स्नेहाचे काही उत्कट भावबंध आणि साहित्यसेवेचा अतुट धागा.
माधव ज्यूलियन, गिरीश आणि यशवंत या त्रयीने कवितेची साथ सोडली नाही. स्फुट आणि दीर्घ कवितेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. यशो-गिरींनी सर्व महाराष्ट्रात आणि बाहेरही कविता सादरीकरणाचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. कवितागायन व वाचन हे श्रोताभिमुख झाले. सर्व स्तरांतून याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत गेला.
पुलंनी एके ठिकाणी लिहिलंय, ‘स्वतःला स्फुरलेली कविता गाऊन, समुदायापुढे आणण्याचे फार मोठे कार्य रविकिरण मंडळातील कवींनी केले. यांत ‘गिरीश’ आणि यशवंत हे मोठे मानकरी होते, ही गोष्ट मान्य करावी लागेल. काव्यगायनांदन यशोगिरींनी पुस्तकातील कविता मध्यमवर्गीयांच्या घराघरांत पोहोचवली. ‘पोर खाटेवर मृत्युच्याच दारा…’ हे ऐकतांना त्या डॉक्टरप्रमाणे आम्हीही लोचनें पुसली होती.’
पु. ल. पुढे लिहितात, “सरकारी शाळाखात्याने मंजूर केलेल्या पाठ्यपुस्तकांतील कवितांचा अन्वयार्थ लावून हैराण झालेल्या आमच्या पिढीला – ‘चला रायगडा, शिवारायाचं दरसन घेऊ’ ही गिरीशांची कविता ऐकताना काय आनंद झाला असेल, ते हल्लीच्या पिढीला कळणे अशक्य! ! कडक रेवडीशिवाय काहीही न मिळालेल्या पोराला चांदीच्या वेष्टणात गुंडाळलेले चॉकलेट खायला मिळाल्यासारखे ते काव्य गोड होते.’
त्यामुळे रविकिरण मंडळ ही काव्यकलेच्या प्रांतात काहीतरी नवे प्रयोग घडवणारी वाङ्मयीन चळवळ होती, असे म्हणावे लागेल.

रविकिरण मंडळातील सप्तर्षी : डावीकडून, माधव ज्यूलियन, गिरीश, य.दि. पेंढारकर, वि. द. घाटे, श्री.बा. रानडे, ग.ल.गोखले, ग. त्र्यं. माडखोलकर. यामध्ये मनोरमाबाई (अरुंधती) नाहीत.
पु.ल. मोठ्या गौरवाने पुढे म्हणतात, ‘रविकिरण मंडळाची स्थापना त्या काळात करणे ही एक प्रकारची क्रांती मानावी लागेल.’ वि.द. घाट्यांनी म्हटले आहे, की हा एक छोटासा सांस्कृतिक प्रयोग होता, हे अगदी खरे आहे. ‘कविता’ एवढा एकच ध्यास घेऊन काव्यधर्मी माणसे एकत्र जमतात, स्त्री-पुरुष एकत्र येतात आणि काव्य गायन, वाचन करतात, ही एक अभूतपूर्व गोष्ट होती. ही ‘एक न मानवणारी’ गोष्ट होती त्या काळात! क्रांती म्हणजे आरडाओरडा, दंगा अशी आपली समजूत झाली आहे. उलट, ती अशी छोट्याछोट्या गोष्टींतून घडत असते. समाज हळूहळू बदलू लागतो. मनावरील जुनी बंधने हळूहळू सैल होतात; पण एक गोष्ट मात्र सत्य आहे, गिरीश, यशवंत, माधव ज्यूलियन यांची नावे मनात आली, की त्यांनी फार मोठे उपकार आमच्या सांस्कृतिक जीवनावर केले आहेत, याची प्रकर्षाने आठवण येते. त्यांनी मिशनऱ्यांप्रमाणे कविता घरोघरी नेऊन सोडली आणि आमचे जीवन समृद्ध केले. या कार्याबद्दल लोकांनी या मंडळाबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे मला प्रामाणिकपणाने वाटते.’ याच भूमिकेतून १९६५ साली कुलगुरू डॉ. काकासाहेब गाडगीळ यांनी मंडळाच्या सदस्यांचा सत्कार पुणे विद्यापीठात केला!
| पुणे विद्यापीठातर्फे रविकिरणांचा सत्कार – (२७-९-१९६५)रविकिरण मंडळ हे ‘शारदा मंदिर, पुणे’ या संस्थेतून ९ सप्टें. १९२३ रोजी केवळ योगायोगाने स्थापन झाले. २७ सप्टेंबर १९६५ रोजी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन, यातील सदस्यांचा सत्कार आयोजित केला होता. या निमिताने विद्यापीठाने रविकिरण मंडळाची गौरविका छापली होती. सत्कारमूर्तींत गिरीशांबरोबर श्री.बा. रानडे, ग.त्र्यं. माडखोलकर, यशवंत, द.ल. गोखले आणि विठ्ठलराव घाटे हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या सांकृतिक इतिहासात या दिवसाची विशेष दखल व नोंद झाली आहे. समारंभ घडवून आणण्याची समयसूचकता व योजकता कुलगुरू डॉ. काकासाहेब गाडगीळ यांनी दाखवली. त्यांच्या भाषणात त्यांनी सत्कारामागची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.एका भव्य शामियान्यात हा समारंभ आयोजित केला होता. कुलगुरूंच्या उजव्या हाताला मंडळाचे सहा सदस्य बसले होते. डाव्या हाताला डॉ.तुळपुळे, कुसुमाग्रज, सौ. (प्रा.) घारपुरे बसल्या होत्या. गिरीश त्याबद्दल लिहितात, “या प्रसंगी तीव्र आठवण झाली ती कै. माधव ज्यूलियन यांची! ज्यूलियन म्हणजे रविकिरणांचा मुकुटमणी! तसेच मंडळाच्या एकमेव स्त्री सदस्य मनोरमाबाई रानडे यांची! सोज्ज्वळ, सात्त्विक मधुरवाणी व सर्व सदस्यांची ती अन्नपूर्णा! शेवटी ते म्हणतात – माझे संचित थोर म्हणून हा माझ्या पिढीतील सदस्यांचा सन्मान पाहायला मी हजर राहू शकलो. (गिरीश १९६२ साली पक्षाघाताच्या आजारातून उठले होते. जणू त्यांच्या जीवननिष्ठेचा कळसाध्याय पाहण्यासाठी त्यांचा पुनर्जन्म झाला असावा!) छायाचित्रात बोलताना न.वी. उर्फ काकासाहेब गाडगीळ. यांच्याच पुढाकाराने पुणे विद्यापीठात १९६५ साली रविकिरण मंडळाच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. बसलेले डावीकडून श्री. बा. रानडे, ग.त्र्यं. माडखोलकर, द.ल. गोखले, शंकर केशव कानेटकर( गिरीश), यशवंत दिनकर पेंढारकर, वि. द. घाटे. |
१९३० च्या सुमारास ‘सिंहगड’ या चित्रपटाच्या प्रारंभी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी ‘काव्यसृष्टी’ हा लघुपट निर्माण केला होता. त्यात गिरीश, यशवंत, अत्रे, सोपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे यांनी कविता गाऊन सादर केल्या होत्या. HMV Company ने यशवंत-गिरीशांच्या कविता-गायनाच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. त्याला उत्तम प्रतिसाद व लोकप्रियता मिळाली. त्या सुमारास हा वसा पुढे गोविंदराव जोशी, गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, सुधीर फडके यांनी घेतला. स्त्रीगीते, लोकगीते, नाट्यगीते, लावणी, काव्य यांचा कल्पकतेने उपयोग करून मराठी कवितेला गेयतेचे बहुमोल लेणे चढले. त्यातूनच ‘भावगीत’ जन्माला आले.
डॉ.अनुराधा पोतदार यांनी त्यांच्या प्रस्तावनेत सर्व किरणांचा, त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. त्या लिहितात, ‘रविकिरण मंडळात प्रारंभी नाट्यछटाकार दिवाकरांना सामावून घेण्यात आले होते. त्यांच्या काही नाट्यछटा ‘किरण’ या पहिल्याच संग्रहात जरी समाविष्ट झाल्या असल्या, तरी मंडळाच्या मनात आणि कृतीत अग्रस्थान होते ते कवितेला! मंडळाच्या इतर प्रकाशनांमध्ये (उदा. प्रभा, शलाका) श्री.बा. रानडे, विठ्ठलराव घाटे, द.ल. गोखले यांच्या कथारूप गद्यलेखनासही आवर्जून स्थान मिळाले. मंडळातील दोन सदस्य – घाटे, माडखोलकर हे पुढे गद्य साहित्यिक म्हणून नावाजले गेले असले, तरी त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभही त्यांच्या रोमँटिक, सौंदर्यवादी कविप्रकृतीतून झाला होता. वि.द. घाटे हे कवि दत्तांचे चिरंजीव, स्वतः कवि : ‘चल रात्र जागवू मौजेने’ असे बेहोश उद्गार काढणारे! ‘आई आम्हां आठवशील ना,?’ ‘नवलाख दिवे हे तुझ्या घरी’ किंवा ‘तो पहा महात्मा आला’ या त्यांच्या देशप्रेमाने रसरसलेल्या कवितांचा आणि ‘आलात ते कशाला?’ या लावणीवजा रसिल्या गीताचा रसिकांना विसर पडणार नाही. परंतु पुढे कवितेपेक्षा गद्य लेखनातच त्यांचे कवित्व बहरले.’ नाट्यरूप महाराष्ट्र’ या इतिहासावर आधारलेल्या नाट्यप्रवेशांच्या ग्रंथाततर ऐतिहासिक भाषेचा एक नवा नाट्यपूर्ण बाज निर्माण करायची त्यांची शक्ती आणि ऐतिहासिक प्रसंगांतले नेमके कसदार नाट्य हेरण्याचे त्यांचे कसब आणि चातुर्य यांचा एक प्रतिभासंपन्न आविष्कार आढळतो. भाषा आणि नाट्य, तसेच ऐतिहासिक काळातील व्यक्तिरेखा रेखाटताना त्यांचे कसब यांचा दाट ठसा पुढे वसंत कानेटकरांच्यावर स्पष्टपणे उमटलेला दिसतो.”
वसंत कानेटकरांनी त्यांच्या ‘रायगडला जाग येते,’ ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशा नाटकांच्या प्रस्तावनेत याचा उल्लेख केलेला आहे. ‘मी माझ्याशी’ या पुस्तकातल्यासुद्धा नाट्यछटा मुखोद्गत असल्याने त्यांनी श्रीमंत अक्कलकोटकर महाराजांच्या मुक्कामी साभिनय सादरीकरण केले ते ‘शिवाजी- संभाजी’ यांचे नाट्यरूप महाराष्ट्रातील प्रवेश अभिनित करून!
अनुराधाबाई पुढे म्हणतात, ग.त्र्यं. माडखोलकर यांनी लिहिलेली भावपूर्ण सुनिते अजूनही वाचनीय वाटतात. पण ते गाजले ते प्रथमश्रेणीचे कादंबरीकार आणि पत्रकार म्हणूनच! त्यांचे साहित्यकर्तृत्व रविकिरण मंडळाच्या परिघाबाहेरचे होते; त्यामुळे ते मनाने मंडळाच्या बाहेर पडले. नाना उर्फ श्री.बा. रानडे यांची प्रतिभा आणि बुद्धी आणि त्यांचे एकूण कर्तृत्व डॉ. जॉन्सन *यांची आठवण करून देणारे आहे. शास्त्रीय संशोधनात आणि बालवाङ्मयात त्यांनी बरेच काम केलेले असले तरी साहित्यातील जुन्या-नव्या प्रवाहांना एकत्र आणणे आणि प्रयोगशील साहित्याला प्रेरणा देणे, हे काम त्यांनी जन्मभर निष्ठेने केले. त्यांचा आणि पुढील पिढीचे कवी मर्ढेकर यांचा गाढा स्नेह होता; एवढेच नव्हे तर मर्ढेकरांच्या कवितेमागे त्यांची सुजाण प्रेरकता होती’
अनुराधाबाईंनी रविकिरणांच्या इतर सदस्यांची अशी दखल घेतल्यानंतर त्या मंडळाच्या काव्यक्षेत्रातील एकूण कर्तबगारीचा प्रपंच उभा राहतो तो प्रामुख्याने यशवंत, गिरीश आणि माधव ज्यूलियन या तीन कवींवर! त्या म्हणतात, ‘काव्य हा समाजजीवनाचा आरसा असेल, तर या त्रिकूटाने त्यांच्या कवितेत १९२० च्या आसपासचा काळ आपल्या सर्व वैशिष्ट्यांनिशी आणि सर्व मर्यादांसह प्रामाणिकपणे प्रकट केला, यात शंका नाही. गिरीशांच्या कवितेतील शब्दचित्रे किती बोलकी असतात हे ‘सुंदर हिरवे माळ’ किंवा ‘कृतज्ञता’ या कवितेतून दिसते.

कवी यशवंत आणि गिरीश. हे दोघे ‘यशोगिरी’ या नावाने काव्यवाचनाचे प्रयोग करायचे.

कवी गिरीश डिसेंबर १९६६.
तर यशवंतांच्या काव्यातील ओजस्विता – ‘गाऊ त्यांना आरती’ या कवितेत दिसते. ‘दैवते मायतात’ या कवितेत कल्पकतापूर्ण उत्कट भावदर्शन घडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादेत का होई ना, स्वतःच्या दीर्घजीवी प्रतिभेने, कवित्वाच्या असीम अंगभूत निष्ठेने आणि आपल्या रसिक वाचकांच्याविषयीच्या अपार जिव्हाळ्याने यशवंत-गिरीशांनी काव्यातून सतत व्यक्त केले ते मराठी मन! त्यांनी जे भरभरून दिले त्याचेच कृतज्ञ स्मरण, मराठी रसिकांना दीर्घकाळ राहील, यात संदेह नाही. यशोगिरींपेक्षा माधव ज्यूलियनांची कविता वेगळी आहे. तिचे वेगळेपण त्यांच्या प्रतिभेच्या विविधांगी रंगरूपांत आणि आविष्कारात प्रकट झाले आहे. रविकिरण मंडळाच्या अनुभवविश्वात न मावलेले एक प्रचंड व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव ज्यूलियन! माधव ज्यूलियनांना त्यांच्या टीकाकारांनी ‘प्रणय पंढरीचे वारकरी’ हे उपहासात्मक बिरुद लावलेले असले, तरी त्यांनी गौरवाने धारण करावे इतके त्यांच्या भावनेचे सच्चे रूप दर्शविणारे आहे. या प्रेमभावनेचे अनोखे, सच्चे रूप वाचकाला कधी मोहित आणि धुंद करते, कधी विस्मित करून सोडते, तर कधी त्यामागील वेदनेची झळ लागून व्याकूळही करते. एका कवितेत ते स्वतःबद्दल म्हणतात,
‘या वेड्या तेढ्या मनी माझिया कहर करी हुरहुर!’
त्यांची ध्येयदृष्टी, जीवनाचे आकलन आणि नियतीनेच घडवलेल्या त्यांच्या जीवनाची विपरीतता यांचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल. माधवरावांचे हे प्रीतीचे अनोखे पण उदात्त रूप रसिकांना विव्हल आणि अंतर्मुख करते. प्रा.रा.श्री. जोग यांच्यासारख्या चोखंदळ पंडितांनी त्यांचे ‘विरहतरंग’ हे खंडकाव्य कालिदासाच्या मेघदूतापेक्षा श्रेष्ठ आहे, असा निर्वाळा दिला आहे. माधवरावांची प्रतिभा प्रयोगशील होती, तशीच ती चतुरस्रही होती आणि याचा समर्थ आविष्कार त्यांच्या ‘सुधारक’ या खंडकाव्यात अनुभवता येतो. माधव ज्यूलियन हे पंडित कवी होते. उमर खय्यामच्या रुबायांचे मराठी अनुवाद, फारसी-मराठी शब्दकोश, छंदोरचना हा ग्रंथ, ‘गजल’ हे फारसी वृत्त मराठी कवितेला त्यांनी बहाल केले. त्यांची प्रयोगशीलता केशवसुत आणि मर्ढेकर यांच्या तोडीची होती, हे आजतरी मान्य करावे लागेल.
शेवटी रविकिरण मंडळ काय होते आणि काय नव्हते? मंडळाची कविता हा मराठी कवितेच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा होताच, एक अवस्था होती! एका व्यासंगी, समतोल समीक्षकाने लिहिलंय : ‘रविकिरणमंडळाने काव्यक्षेत्रात केलेल्या कामगिरीला शंभर वर्षांत तोड नाही. मंडळ हा एक विचार होता, जीवनाचा आणि काव्याचा! तो केवळ वाङ्मयीन नव्हे तर; सामाजिक व सांस्कृतिक प्रयोग होता. रविकिरण मंडळ हे काव्यप्रांतात अवतरले नसते, तर कुसुमाग्रज आणि बोरकर यांच्या कविता काही मूठभर लोकांनी वाचल्या असत्या आणि मर्ढेकरांची कवितेची वही तर टेबलाच्या खणातच पडून राहिली असती!
संदर्भ – रविकिरण मंडळाची निवडक कविता, साहित्य अकादेमी, दिल्ली
संपादक : अनुराधा पोतदार (वि.द. घाटे यांच्या कन्या) वसंत कानेटकर (गिरीशांचे पुत्र)
प्रथम आवृती : १९९४
*सॅम्युअल जॉन्सन : (१८ सप्टेंबर १७०९-१३ डिसेंबर १७८४.) इंग्रज कवी, पत्रकार-निबंधकार, कोशकार व समीक्षक.
