झुकझुक आगीनगाडी :१८  

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल (कार्यक्षेत्र : वाडी—ते दौंड, दौंड ते मनमाड, लातूर ते कूर्डवाडी ते मिरज) मध्ये अतिवेगाने खूपच सुधारणा  होत होत्या आणि त्यासुद्धा माझ्या कार्यकाळातच होत होत्या. त्यामुळे मी जास्तच तंत्रस्नेही होऊ लागलो. आम्हां इंजीनियर लोकांना Android सारखे कायम अपडेट राहवेच लागते. “बदला, नाहीतर नष्ट व्हा!” ‘मला माहीत नाही, येत नाही’ अशा सबबी  अजिबात  चालत नाहीत. ह्यासाठी रेल्वे प्रशासन  आमच्यावर नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी खूप खर्च करते. त्यासाठी  आम्हांला त्या उपकरण तयार करणाऱ्या कंपनीत (O.E.M.,Original Equipment Manufacturer) पाठवले जाते किंवा सिकंदराबाद  (IRISET) येथे प्रशिक्षणासाठी    पाठवले जाते.   

  रेलगाड्यांचा वक्तशीरपणा वाढावाम्हणून, सर्व गाड्यांचे इंजीन चालक आणि गार्ड यांना Walkie-Talkie संच देण्यात आले. याशिवाय रेल  वाहतुकीशी निगडीत मुख्य विभागप्रमुख आणि इतर  आवश्यक अधिकारी यांना भ्रमणध्वनिसंच पुरविण्यात आले. यासाठी Idea कंपनीबरोबर सेवा करार केला होता. नोकियाचे अतिशय बेसिक मॉडेल (Nokia 6110)  दिले गेले. फक्त बोलणे आणि SMS एवढेच! इंटरनेट नव्हतेच.   

रेल्वे वाहतुकीशी निगडित असलेल्या   प्रत्येक   विभागाला Walkie Talkie ची  वेगळी फ्रिक्वेन्सी/ चॅनल  असल्यामुळे संभाषणात गोंधळ अजिबात होत नव्हता. याबाबतीत WPCC ((Wireless Planning and Coordination Committee, नवी दिल्ली) अशा सर्व वापरकर्त्यांना (उदा. भारतीय सेना, राज्य पोलीसदले, निमलष्करी दले आणि इतर सरकारी खाती) मार्गदर्शक तत्त्वे, आणि licence  वेळोवेळी देत  असते. प्रत्येक विभाग हा त्याच्या नियोजित फ्रिक्वेन्सीवर/चॅनलवर  बोलत असतो.

त्यामुळे संभाषणाचे   आदानप्रदान  चुकीच्या विभागाशी होतच नाही. त्यामुळे गोंधळाचा प्रश्नच उद्भवत  नाही. कोणी आमची प्रणाली  ‘हॅक’ केली  असे होणारच नाही. ज्या वेळेला हे संच मोटोरोला या कंपनीने आम्हांला पुरवले  तेव्हा आम्ही प्रत्येक  विभागाच्या गरजेनुसार त्या विभागाला ती फ्रिक्वेन्सी/चॅनल  सेट करून संच दिले. त्यांचा खूपच चांगला उपयोग दिसून आला. हे चांगले कार्य पुढे मला मनस्तपाचे ठरेल याची मला किंचितही कल्पना नव्हती.

काही दिवसांनी स्टेशनमास्तरांच्या संघटनेचे  प्रमुख माझ्याकडे आले आणि विनंती केली, की आमच्या Walkie Talkie संचात  सर्व विभागांची फ्रिक्वेन्सी सेट करून मिळावी; जेणेकरून आम्ही सर्व विभागांशी संपर्कात राहू.  त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक संबंधित  दैनंदिन कामे आणखीन  सुरळीत होतील.  त्यांच्या संघटनेची मागणी एकदम रास्त आणि योग्य होती. म्हणून मी याबाबत माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  तसेच स्टेशनमास्तरांच्या संघटनेचे प्रमुख यांना घेऊन  समक्ष कार्यालयात जाऊन बोललो. त्यांनी त्यांच्या वारिष्ठ अधिकाऱ्यांशी  बोलून  मला तोंडी Walkie Talkie संचाची  सर्व विभागांची फ्रिक्वेन्सी सेट करण्याची परवानगी दिली. (तसे परिपत्रक नंतर निघालेसुद्धा ) आणि एक दोन  दिवसांत  आम्ही  त्यांचे वायरलेस संच सर्व फ्रिक्वेन्सीला अनुकूल  करून दिले.

काही दिवसांनी एका  स्टेशनला मंडल रेल प्रबंधक (DRM) यांची ठरावीक काळानुसार नियमित तपासणी(Scheduled Inspection) होती. रेल्वेमध्ये तंत्रज्ञांपासूनपासून ते सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत तपासणीचे वेळापत्रक असते, ते कोणत्याही स्थितीत पाळावेच लागते. त्यादरम्यान एक स्टेशनमास्टर लोको पायलटशी (एंजिन ड्रायवर) बोलताना त्यांनी पाहिले. त्यांना ते त्यावेळी  नियमबाह्य वाटले आणि त्यांनी Walkie Talkie वापराबाबत  असलेल्या नियमावलीच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्यासमवेत असलेले आमचेच  एक कनिष्ठ अधिकारी होते. त्यांनी संधीचा फायदा घेत नियंत्रणकक्षाला  सांगितले, ‘विभागप्रमुख हेमंत कुलकर्णी  यांना निलंबित करा,’ असा मंडल रेल प्रबंधक (DRM) यांचा आदेश आहे. नियमानुसार त्यांना निलंबनाचा अधिकार नव्हता म्हणून त्यांनी मंडल रेल प्रबंधक (DRM) यांचे  नाव घेतले.  कार्यावर असलेल्या नियंत्रण कक्षातील  कनिष्ठ अभियंत्याने साशंक मनाने मला तसा  निरोप दिला. मला हे अजबच वाटले; पण वरिष्ठांचा म्हणजे DRM साहेबांचा आदेश आहे म्हणून मला तो पाळणे भाग होते. मी दुःखी झालो; पण  काही ठिकाणी ‘खुशी की लहर’ उमटली होती. त्या वेळी मला कळले, की,‘कार्य हीच पूजा म्हणणारे कोण आणि हुजरेगिरी हीच पूजा म्हणणारे कोण!’ आमचे वरिष्ठ त्यावेळी सिकंदराबादला प्रशिक्षणासाठी  गेले होते.  ही घटना झाल्यावर दोन तासांनी मला  मंडल रेल प्रबंधक (DRM) सोलापूर यांचा फोन आला.त्यांचा मोबाईल जो Blackberry Curve  म्हणजे आत्ताच्या आयफोनसारखा होता. त्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि कृपया येऊन तपासणी करून  तो दुरुस्त करून जाणे असा तो निरोप होता. Blackberry Curveच्या कंपनीने मला एक दिवस पुण्यात त्याचे प्रशिक्षण  दिले होते. त्यांना मी लगेच सांगितले की मला निलंबित केलेले आहे आणि मी येऊ शकत नाही.नियमानुसार निलंबित अधिकारी कोणतेही काम करू शकत नाही,  काम केल्यास तो आणखीन एक गुन्हा होतो. त्यांनाही  आश्चर्य वाटले आणि म्हणाले, “Who is that fool? Who suspended you?” मी सर्व प्रकार थोडक्यात  सांगितला, DRM साहेबांना त्यांचे नाव वापरले जाते याची थोडीसुद्धा  कल्पना नव्हती म्हणून त्यांनी प्रश्नार्थक भावनेने “Ok. Meet me tomorrow.” असे म्हणून फोन ठेवला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी Punctuality  मीटिंग  झाल्यावर मी जाऊन त्यांना भेटलो. सगळा  प्रकार त्यांना इत्थंभूत सांगितला. ते म्हणाले, “Mr.Hemanth, You had not done any wrong thing.Since that fellow’s appointment, I am doubtful how he became an  officer? Ok. don’t worry. Relax.” त्यांनी मला दाक्षिणात्य कॉफी पाजली आणि मी घरी निघालो. त्याच  रात्री मला माझ्या वरिष्ठांचा  सिकंदराबादहून फोन आला, “आप चिंता मत करो. आप अपना  Duty सम्हालो. मैं  कल आ रहा हूँ.” मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. जसे काही झालेच नाही असे मी वागत होतो.  साधारण सकाळी ११:०० च्या सुमारास DRM सरांचा स्टेनो माझ्याकडे ऑफिसात आला. मी चहा मागवला आणि  तो बोलू लागला . “तुम्ही गेल्यावर त्यांनी ( DRM)  मला बोलवले आणि  त्यांचा तो  Blackberry Curve मोबाईल, मोबाईल चार्जर, Emergencyमध्ये त्यांना दिलेला Walkie Talkie सेट, Idea Net Setter ( त्या वेळी प्रवासात इंटरनेटची आवश्यक्यता  लागल्यास पेनड्राइव्हसारखे उपकरण आपल्या लॅपटॉपला जोडून ऑनलाइन कामे आम्ही करीत असू.)  Ear phone, पोर्टेबल  Dictaphone इत्यादि  इलेक्ट्रॉनिक  आणि काही गोपनीय वस्तू आणि त्यांच्यासारख्या  अतिउच्च अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गोल्डन लेटरहेडवर निषेधाचा खरमरीत मजकूर असे D.O  (Demi Official) पत्र सही करून  त्या कनिष्ठ  अधिकाऱ्याला देण्यास सांगितले. ते पत्र वाचून तो अधिकारी फक्त रडायचा बाकी राहिला  होता. हे त्याला अनपेक्षितच होते. हा सर्व प्रकार मला  तो स्टेनो हसून हसून सांगत  होता. त्या अधिकाऱ्याचे  हस्तक माझ्या  डेपोत होतेच. हा सर्व प्रकार झाल्यावर ते आता मला जास्त लवून नमस्कार (रेल्वेतील नमस्कार थोड्या वेगळ्या प्रकारे असतो.)  करू लागले. बाण वर्मी लागला होता.

बेकायदेशीर काढलेली माझी सस्पेंशन ऑर्डर रद्द  झाली. माझ्या सेवापुस्तिकेतसुद्धा नोंद झाली नाही. यथावकाश त्या अधिकाऱ्याची त्याच पदावर मुंबईला बदली केली गेली. साधारणतः बदली ही पदोन्नती किंवा कौटुंबिक कारणामुळे होत असते. पण  ह्या अधिकाऱ्याबाबत तसे काही झाले नाही. तो काही दिवस चर्चेचा विषय झाला  आणि नंतर विरूनसुद्धा गेला. कोणत्या षड्रिपूंच्या प्रभावाखाली तो असा वागला? हे तो सेवानिवृत्त  झाल्यावर मला इतरांकडून कळले. 

मी सर्वांना सज्जन  समजत होतो. हा माझा  स्वभावदोष; का ‘कार्यालयीन  असहायता?’ भगवद्गीतेतील त्या श्लोकाचा अर्थ मला त्या वेळी चांगलाच कळाला.  ‘तुम्हांला तुमचे नेमून दिलेले कर्तव्य/कर्म पार पाडण्याचा अधिकार आहे; परंतु तुला कर्मफळाचा अधिकार नाही.’ (अध्याय २, श्लोक ४७). हे सर्व झाल्यावर  मी परत स्थितप्रज्ञासारखा  माझ्या कामाला  लागलो. 

काही दिवसांनी  बरेच अधिकारी  आणि विभागप्रमुख (जे Techno Savvy नव्हते ) ते माझ्याकडे त्यांचा नोकिया  मोबाईल घेऊन आले आणि चालत नाही म्हणून तक्रार करू लागले. मी त्यांना सर्व समजावून सांगितले. परत email चे ट्रेनिंग  आठवले. त्यांच्या तक्रारी  पण मजेशीर होत्या : “आमच्या मोबाईलला Dial Tone नाही,: नंबर प्रेस केल्यावर तिकडून कोणी बोलतच नाही. माझा   मोबाईल  तर दुसऱ्या  दिवसापासून बंदच  आहे. मी त्यांचा परत एक शनिवारी क्लास घेतला. सर्व बटनांची  माहिती दिली. मोबाईल चार्ज कसा  करावा ?  रिंग टोन कसा  सेट करावा.  हेसुद्धा सांगितले; कारण फोन नोकियाचा  असल्यामुळे सर्वांचा  रिंगटोन  सारखाच (By Default)   होता( नोकीयाने Mozart Symphony-40 ही रिंग टोन  म्हणून   वापरली होती.वाचकांच्या औत्सुक्यापोटी  त्याची लिंक देत आहे.

यावरच एक गाणे सुध्या आधारित आहे,” इतना न मुझसे तू प्यार बढा, के मै एक बादल आवारा.) कारण कुणाचाही फोन  वाजला, की  एक-दुसऱ्याला म्हटले  जायचे , “आप का फोन बज  रहा है,” आणि सांगणाऱ्यांचाच  वाजत असे. त्या वेळेला मी ज्यांना मोबाईलवरून  घरी फोन(Landline) करीत  असे,  अशांनासुद्धा त्या कॉलचे बिल यायचे. इनकमिंग  फ्री वगैरेचा  प्रकार त्या वेळी नव्हता. शर्टाच्या  खिशातून दिसणारा  नोकीयाचा Antenna असलेला सरकारी  मोबाईल त्या वेळी श्रीमंतीचे लक्षण होते. ते मिरवण्यात मीसुद्धा  मागे नव्हतो !

Author

Leave a Reply