अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण अठरावे.
– संपादक
चांदणं
तर पुढच्या आठवड्यात मी पुन्हा विमानात बसून प्राचीन मानव ज्याला ऑस्ट्रेलिया म्हणत त्या भूखंडाकडे दक्षिणेला प्रवासाला निघते. या वेळेस आशियाच्या जवळच दक्षिणेला असलेल्या एका बेटापर्यंत ॲग्नॉन माझ्यासोबत आहे. तिथल्या उष्ण कटिबंधातल्या समुद्रात त्याला काही प्रयोग करायचे आहेत. त्याची सोबत असल्याने मी अधिक निर्धास्त आहे कारण मला अखंडपणे विमानाचं नियंत्रण सांभाळावं लागत नाही. या वेळेस माझ्या प्रवासाची तयारीदेखील आम्ही नीट केली आहे. माझ्या विमानाच्या मार्गावर कोणतेही वादळ नाही याची खातरी करून घेतली आहे.
दक्षिणेकडे जात असताना आम्ही एक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला प्रदेश ओलांडतो. हजार वर्षांनंतरही निसर्गाने इथे पुन्हा स्वामित्व मिळवलेलं नाही. एके काळी हा आशियातील सर्वाधिक लोकसंख्येचा भाग होता. आता तो मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग असलेला पूर्णपणे वैराण भाग आहे.
“या भागात पुन्हा कधी जीवन तग धरू शकेल असं तुला वाटतं?” मी ॲग्नॉनला विचारते.
“मला वाटतं पुरेसा काळ लोटल्यावर इथे जीवन नक्की तरारेल. जीवन – निदान वनस्पतींचं जीवन – या ग्रहावर चांगलं बहरतं आहे.”
“हो, पण इथलं किरणोत्सर्गाचं प्रमाण बघ.”
“तू पोलिनाच्या प्रयोगांचे परिणाम पाहिले नाहीस का? तिला असे काही जीवाणू सापडले आहेत, जे केवळ किरणोत्सर्ग असलेल्या वातावरणातच जगतात. त्यांचं प्राणी किंवा वनस्पती असं वर्गीकरण करणं कठीण आहे; पण त्यांची पुढे नक्कीच उत्क्रांती होईल.”
“बुद्धिमत्ता प्राप्त होईपर्यंत पृथ्वीवरच्या जीवांची पुन्हा उत्क्रांती होईल असं वाटतं तुला?”
“मी नेहमी त्याबद्दल विचार करतो. उत्क्रांतीचा तो तर्कशुद्ध मार्ग असायला हवा; पण आपण उत्क्रांतीचा एकच मार्ग अभ्यासला आहे, हो की नाही? कदाचित या वेळेस उत्क्रांती दुसरा कोणता तरी मार्ग निवडेल.”
“म्हणजे कसा?”
“ते माहीत नाही. असं बघ, बुद्धिमत्तेचा उपयोग काय होता?”
“का बरं? बुद्धिमत्तेने जीवसृष्टीला स्वतःचा बचाव करण्यास मदत केली.”
“हो, प्राण्यांना कळप म्हणून स्वतःचा बचाव करण्यास मदत केली; पण प्रत्येक स्वतंत्र प्राण्याला मात्र दुःखी केलं.”
“असं का बरं म्हणतोस तू?”
“बुद्धी विकसित झाल्याने प्रत्येक जनावराला संकटाच्या शक्यतेची कल्पना आली, त्रास आणि वेदना यांची तीव्र जाणीव होऊ लागली.”
“पण त्यामुळे त्यांना ते टाळण्यासाठी प्रयत्न करता येऊ लागले.”
“हो, पण पुढचं संकट येईपर्यंत. असं पहा, संकट असो किंवा नसो, अन्न उपलब्ध असो किंवा नसो, बॅक्टेरियासारख्या एखाद्या जीवाणूला त्याची कुठे फिकीर असते? त्याला भले संकट टाळता येत नसेल, तो नष्टसुद्धा होईल; पण येणाऱ्या मृत्यूची त्याला भीती वाटणार नाही किंवा त्याचं दुःख होणार नाही.”
“पण मग मनुष्यप्राण्याचं काय? बुद्धीमुळेच त्याचं उन्नयन शक्य झालं ना? बुद्धीमुळेच आपण एका ग्रहावर अभियांत्रिकी करून तो सर्व मानव जातीसाठी राहण्यास अत्यंत योग्य असा करू शकलो.”
“बरोबर; पण त्याच बुद्धीमुळे आपण याच ग्रहाचा पूर्ण विनाश केल्यानंतर.”
“पण स्वर्गावरचं जीवन हे केव्हाही या ग्रहावर मानव राहत असताना होतं त्यापेक्षा चांगलंच आहे.”
“हे आपल्याला शास्त्रज्ञ साल्चर – जो मूलभूत प्रश्न उपस्थित करतो आहे त्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जीवन कशासाठी? आणि ते चालू ठेवण्यासाठी चाललेला हा प्रचंड आटापिटा कशासाठी?”
“याचं उत्तर आपल्याला सापडेल असं वाटतं तुला?”
“मला नक्की माहीत नाही. निदान आत्ता तरी. जीवनाबद्दल आपण नक्कीच खूप काही शिकतो आहोत. हे सगळं ज्ञान कदाचित एक दिवस आपल्याला या मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळवून देईल.”
“आतापर्यंत आपल्याला जे काही सापडलं आहे त्याने पृथ्वी मोहिमेच्या शास्त्रज्ञांची निराशा होईल का?”
“नाही, मला नाही तसं वाटत. आपल्याला आतापर्यंत जे काही सापडलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पृथ्वीवर आपल्याला जे काही गवसलं आहे त्याने जीवनाबद्दलचं आपलं ज्ञान कायमचं बदलणार आहे. या ज्ञानामुळे शास्त्रीय प्रगती व्हायला आणि त्याचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम व्हायला अनेक वर्षं लागतील, पण आपल्याला नक्कीच महत्त्वाची सूत्रं सापडली आहेत.”
_____________________________________________________________________________________________________________
रात्री आम्ही मालदीव बेटावर उतरतो. हा प्रदेश अत्यंत रमणीय आहे. आम्ही समुद्रात सूर्यास्त होताना पाहतो, समुद्राचं पाणी जणू पातळ सोनं होतं, माझ्या त्वचेपेक्षाही गडद सोनेरी आणि मग केशरी आणि जांभळं होतं. त्या सुंदर दृश्यापासून दूर एकटीने रात्रीच्या आकाशात उड्डाण करणं आणखी कठीण होण्यापूर्वी मी घाईघाईने ॲग्नॉनचा निरोप घेते; पण ॲग्नॉन मला प्रेमाने कवेत घेतो आणि विमानात चढायला मदत करतो. परत जाताना मी त्याला घेण्यासाठी इथं येणार नाही. मी माझ्या घरच्या तळावर परतल्यावर व्हेनला इथं येणार आहे आणि ते दोघे त्यांचे प्रयोग पूर्ण करून महिन्याभराने परतणार. मी रात्रीच्या आकाशात दक्षिणेकडे उड्डाण करते; पण आता ऑस्ट्रेलियातले अवशेष मला इतके काही आकर्षक वाटत नाहीत.
________________________________________________________________________________________________________________
शेवटी मी जेव्हा माझ्या गंतव्य स्थळी पोचते तेव्हा माझ्या लक्षात येतं, की तिथले अवशेष हे पडझड झालेल्या घरांचे आहेत. सिमेंट आणि दगडांच्या ढिगाऱ्यात अगदी थोड्या भिंती उभ्या आहेत. त्या भागात किरणोत्सर्गाचं प्रमाण सर्वसाधारण पातळीच्या वर आहे. त्यामुळे मी जेव्हा तपासणी करायला जाते तेव्हा मला फुग्याच्या आतच राहावं लागतं. मी लगेच माझ्या खणायच्या उपकरणांना कामाला लावते. दिवसभर कष्ट करून हळूहळू खणल्यावर मला अनेक वस्तू सापडतात. त्यात बहुतेक काचेचे तुकडे, डिंक, वाळू हेच आहे. युद्धाच्या काळात कोणतीही वास्तू बांधण्यासाठी हेच वापरत असत. मला हाडंपण सापडतात – बहुतांशी माणसांचीच.
कोणती माणसं राहत असतील इथे? एका वेळेस हजारो लोक इथे राहत असतील. ही घरं जर खरोखरच युद्धाच्या काळातली असतील तर इथे लोक आधारासाठी एकत्र राहत असतील. कुटुंबसंस्था युद्धापूर्वीच नष्ट झाली होती. लहान मुलांना वेगवेगळ्या कारणांसाठी विकलंतरी जायचं किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवलं जायचं. या ठिकाणाने किती विश्वासघात आणि किती वेदना पहिली असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. उन्नयनपूर्व माणसं एकमेकांना किती यातना देऊ शकत होती हे आम्हां सर्वांनाच माहीत आहे. कुणाचाही शारीरिक किंवा मानसिक छळ करण्यात त्यांना काहीच वाटत नसे.
एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे मानवाच्या इतिहासाचे एक हजार तेहतीस तुकडे गोळा झाले आहेत; पण यांतील कोणताही अवशेष सहजपणे कोणतीही रंजक कथा सांगत नाही. तळ्याच्या काठावरच्या घरी परत गेल्यावर मला त्यांचा नीट अभ्यास करून एकेका अवशेषाचा अर्थ लावून युद्धाच्या काळातल्या जीवनाची कथा जुळवावी लागेल.
त्या ओसाड वस्तीत विषण्णपणे उभ्या असलेल्या आणि पडझड झालेल्या भिंतींना मी एकदा शेवटचं पाहून घेते. इथं जिवंत असणारा शेवटचा मनुष्य कोण होता हे आम्हांला कधीच कळणार नाही. इथं विध्वंसाच्या खुणा आहेत. एकाच वेळी आपल्या हजारो बांधवांना मारणारी अस्त्रं माणसं वापरत होती असं मी वाचलं आहे. फक्त जिवंत लोकच नव्हे; तर त्यांच्या वाटेत येणारं सगळं काही उद्ध्वस्त करणारे बॉंब त्यांच्याकडे होते. एखाद्या क्षेत्रातलं सगळं जीवन नष्ट करणारी; पण तिथल्या बांधकामाला धक्का न लागू देणारी रसायनं होती त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे अण्वास्त्रं होती! अखेरच्या युद्धात तीच सर्वाधिक वापरली गेली. इथलं किरणोत्सर्गाचं प्रमाण पाहता असं वाटतं, की एखाद्या अण्वस्त्रामुळेच ही वसाहत नष्ट झाली असावी. त्या उदास जागेचे मी आणखी काही फोटो काढते आणि थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या माझ्या गाडीकडे उडत जाते.
_______________________________________________________________________________________________________________
ऑस्ट्रेलियात दोन आठवडे घालवून मी तळ्याच्या काठी असलेल्या माझ्या घरी परत येते. छान वाटतं इथे परत यायला. मी जेव्हा कामासाठी इतर ठिकाणी जाते तेव्हा ही जागाच मला घर म्हणून आठवते. का कोण जाणे पण स्वर्गाच्या आठवणी आता इतक्या तीव्रतेने येत नाहीत. अवकाशाच्या पोकळीतून अब्जावधी मैलांचा प्रवास करून आल्याने आता आमचं आमच्या घरच्या ग्रहाविषयीचं आकर्षण कमी झालं आहे. आई आणि पपाची अर्थातच मला खूप आठवण येते आणि माझ्या मित्रमैत्रिणींचीसुद्धा. स्वप्नात माझं लहानपणीचं घरसुद्धा येतं; पण या ग्रहावर चालणारे पहिले मानव जितक्या नैसर्गिकपणे पृथ्वीवर राहत होते तितक्याच नैसर्गिकपणे आम्हांला या ग्रहाविषयी आपुलकी वाटते आहे.
ऑस्ट्रेलियात गोळा केलेल्या पुराव्यांचा अभ्यास करण्यात मी पुढचा एक महिना घालवते. हाडांच्या अवशेषांवरून असं दिसतंय, की त्या ओसाड वसाहतीत राहणारी माणसं आजारी असावीत. तिथे सापडलेल्या हाडांमध्ये आमच्या शोधयंत्रांना माणसांना पछाडणाऱ्या अनेक प्राचीन रोगांची लक्षणं सापडली आहेत. हिंसात्मक मृत्यू आणि जखमांच्याही खुणा दिसून आल्या आहेत.
त्या जागेत सापडलेल्या जीवेतर सामग्रीच्या आधारे संगणकावर केलेल्या अनुकरणावरून असं दिसतं, की ती एक दाटीवाटीची आणि फारशा सोयी नसलेली झोपडपट्टीवजा वसाहत असावी. तिथे अन्न आणि पाण्याचा तुटवडा असणार; कारण माझ्या उत्खननात दोन्हीचा फारसा पुरावा सापडला नाही; पण तो तुरुंग नसावा कारण तिथे अडवणूक करणारी कोणतीही भिंत आढळली नाही. तिथल्या इमारतीत लोक स्वेच्छेने ये जा करू शकत असावेत. कदाचित तिथे ज्यांचा मृत्यू झाला ते लोक अखेरच्या युद्धाच्या कालांतराने होणाऱ्या परिणामाने मेले असावेत. तसा परिणाम पृथ्वीवर अनेक ठिकाणी झाला असणार – अन्नाचा तुटवडा, रोगराई आणि शेवटी मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग.
ऑस्ट्रेलियातील अवशेषांवरचा हा अहवाल मला आता पूर्ण करायला हवा. त्यात आणखी काही घालण्यासारखं आता उरलं नाही आणि ज्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायला आम्ही निघालो आहोत त्या प्रश्नांची उत्तरं काही यातून सापडणार नाहीत. आता अनेक ठिकाणी अवशेष सापडल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि मला प्रवासाची आखणी करायला हवी. दक्षिणेकडच्या समुद्रातील मालदीव बेटावरून ॲग्नॉन आणि व्हेनला विमान घेऊन परत येण्याची मी वाट पाहते आहे. ऑस्ट्रेलियातून आल्यापासून मला त्यांची आठवण येते आहे. विशेषतः ॲग्नॉनची. तो असला की प्रत्येक दिवस विशेष वाटतो.
_______________________________________________________________________________________________________________
पृथ्वीच्या भूगोलाची आणि लोकवस्तींच्या आकृतिबंधांची कल्पना येण्यासाठी मी युद्धाच्या आधीच्या पृथ्वीच्या नकाशांचा अभ्यास करत मी बसलेली असताना आमचं विमान ॲग्नॉन आणि व्हेनला यांना घेऊन येत असल्याची बातमी येऊन पोचते. आमच्या गटातले आम्ही सगळेजण आज प्रयोगशाळेत काम करत आहोत आणि बातमी आल्यावर आम्ही सगळे तिथून बाहेर येतो. पृथ्वीवरच्या आमच्या वास्तव्यात प्रवासाला गेलेल्या गटातल्या सदस्यांचं परतणं हे आनंदाचे क्षण असतात. गेल्या सात महिन्यांत आम्ही सगळे एकमेकांचे पक्के मित्र झालो आहोत आणि पथकातला कोणताही सदस्य परत आला, की आम्ही आनंदोत्सव साजरा करतो.
तरीदेखील जेव्हा ॲग्नॉन आणि व्हेनला त्यांच्या विमानाच्या केबिन मधून उडत खाली येतात तेव्हा मी ॲग्नॉनची नजर टाळते. त्याच्या परत येण्याने इतकं उत्तेजित होणं मलाच वेडेपणाचं वाटतं. मला त्याच्याशी बोलायचंही आहे आणि त्याला टाळायचंही आहे. माझंच मला काही समजेनासं झालं आहे.
नंतर जेव्हा आम्ही सगळे संध्या प्राशनासाठी प्रयोगशाळेत जमतो तेव्हा ॲग्नॉन आणि व्हेनला बेटावरच्या त्यांच्या कहाण्या सांगतात. त्यांना काहीतरी विशेष सापडलं आहे. काही अत्यंत आदिम जीव – जीवाणू आणि विषाणूंपेक्षाही निम्न स्तरावरचे जीव. त्यांना स्वतःची प्रत निर्माण करणाऱ्या न्युक्लिओटाईड सापडल्या आहेत. यातूनच पुढे जनुकांची निर्मिती होते. पृथ्वीवर अनेक वेळा पुन्हा नव्याने जीवन सुरू होत असावं याचादेखील त्यांना पुरावा मिळाला आहे आणि तसं ते पृथ्वीवर अनेक ठिकाणी होत असावं. याचा अर्थ जीवनाची सुरुवात अब्जावधी वर्षांपूर्वीच्या कोण्या रहस्यमय युगात लपलेली नाही. उत्क्रांतीची रेषा वाटते तितकी सरळ नसावी. आत्तादेखील निर्जीवापासून सजीवांची निर्मिती सतत होत असावी. याचा अर्थ निर्जीवापासून जीवनाची उत्पत्ती केवळ आदिम पृथ्वीवर झाली असं नाही; ती एक सतत होणारी प्रक्रिया आहे आणि अजूनही सुरू आहे. मग प्रश्न असा येतो, की तशी प्रक्रिया स्वर्गावर का होत नाही? त्या ग्रहावर मानवांची वस्ती झाल्यापासूनच्या पाचशे वर्षांत, सजीवांची एकही नवीन जात तिथे उत्पन्न झालेली नाही. स्वर्गावरच्या प्राण्यांच्या जाती म्हणजे माणसांनी पृथ्वीवरून नेऊन ज्यांची जोपासना केली त्याच जाती आहेत. अर्थात उत्क्रांती होण्यासाठी पाचशे वर्षांचा काळ पुरेसा नाही. तरीपण स्वर्गावरच्या प्राण्यांच्या जातींमध्ये कोणताही बदल झालेला आण्विक शास्त्रज्ञांना आढळून आलेला नाही. काळजीपूर्वक संतुलन राखलेल्या स्वर्गाच्या वातावरणात जीवन आहे तसंच राहिलं आहे आणि बेलगाम रानटी पृथ्वी अजूनही जीवनाला जन्म देते आहे… अविरतपणे, पुन्हा पुन्हा.
या शोधाने मला विस्मयचकित केलं आहे. उन्नयनपूर्व साहित्यात वाचलेला एक सिद्धांत मला आठवतो. त्यात पृथ्वीला ‘गाईया’ नावाची सजीव व्यक्ती मानलं गेलं होतं. ज्याप्रमाणे मानवी शरीरात कोट्यवधी जीवाणू राहतात त्याचप्रमाणे तिच्या शरीरावर अब्जावधी जीव पोसले जातात. गाईया मला आईसारखीच वाटते : नैसर्गिक जन्म देण्याचा अट्टाहास करणारी, आपल्या मातृत्वाचा आनंदोत्सव साजरा करणारी.
_____________________________________________________________________________________________________________
या ग्रहावरच्या वास्तव्याचा हा आमचा आठवा महिना. आतापर्यंत मी पाच मोठ्या पुरातत्व अवशेषांचा आणि अरण्यात फिरताना आढळलेल्या अनेक मानवनिर्मित वस्तूंचा अभ्यास केला आहे. मानवी संस्कृतीच्या उरल्यासुरल्या खुणा वनस्पतींनी अहमहमिकेने पुसून टाकल्या आहेत. आम्हांला सापडलेले बहुतेक अवशेष अत्यंत पडझड झालेल्या अवस्थेत आहेत आणि त्यांचे घटक बऱ्याच अंशी कुजलेले आहेत. या वस्तू ज्यांनी वापरल्या त्या लोकांचं जीवन समजून घेण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केला आहे. पृथ्वीवरच्या मानवी संस्कृतीच्या अवशेषांवरचा माझा निबंध हळूहळू आकार घेतो आहे. पृथ्वीवरचा उरलेला चार महिन्यांचा अवधी आणि त्यानंतरचा वर्षभराचा अवकाशातील प्रवास संपवून आम्ही जेव्हा स्वर्गावर परत जाऊ तेव्हा बव्हंशी युद्धकाळातील अवशेषांवर आधारित असलेली मानवाच्या अस्तित्वाची ठिगळं लावलेली कहाणी मी सांगू शकेन.
आतापर्यंत मला सापडलेल्या सगळ्या वस्तूंचा अभ्यास करून झाल्यामुळे मी आज निवांत आहे. पुढच्या आठवड्यापासून मी पुन्हा खोदकाम करायला आणि अवशेष शोधायला जाईन. युद्धपूर्व काळातलं काहीतरी महत्त्वाचं सापडावं अशी माझी इच्छा आहे.
माझ्यात एका नव्या शक्तीचा संचार झाला आहे आणि त्यामुळे मला निरनिराळ्या ठिकाणी जावंसं वाटतं. पृथ्वीच्या थोड्या जास्त असलेल्या गुरुत्वाकर्षणानेदेखील मला दमायला होत नाही. हे गेले दोन महिने मी यापूर्वी कधी नव्हते इतकी आनंदी आहे. आज जेव्हा मी माझ्या अंथरुणावर पडते तेव्हा मला झोप येत नाही. काहीतरी करण्यासाठी माझं मन उतावीळ आहे. मी उठून बसते आणि हळूच माझे पंख उलगडते. मग मी पलंगावरून उतरून दाराकडे जाते. कॉमचं बटण दाबताच दार उघडतं आणि रात्रीचा मंद सुवास मला जाणवतो. रातकिड्यांचा आवाज सोडला तर बाहेर सगळं शांत आहे. रात्र मला भुरळ घालते आहे आणि सवयीने डोक्यावर फुगा ओढून घेऊन मी माझ्या कुटीतून बाहेर येते.
तलावाकडे चालत जाताना मला अचानक तलावाचं पाणी आणि आकाश यांच्या मध्यावर ओणवलेला चंद्र दिसतो. मोठ्ठा, गोल आणि तेजस्वी! त्याचं अस्तित्व भारदस्त आहे, जणूकाही तो माझ्याशी संवाद साधतो आहे. पौर्णिमेचा चंद्र मी या आधीही पहिला आहे, पण यापूर्वी तो कधी असा इतका जवळ आणि माझ्यासाठी असलेला वाटला नव्हता. मला जणू त्याची मोहिनी पडली आहे. मी तळ्याच्या जवळ पोचते आणि काठावर बसून राहते. चंद्र अधिकाधिक तेजस्वी होत जातो आणि आकाशातल्या त्या उजळलेल्या चंद्र बिंबाचं सौंदर्य पिऊन तळ्याचं पाणी चंदेरी होतं.
चंद्राच्या अस्तित्वाने रात्र बदलून गेली आहे. तळ्याच्या काठावरचं परिचित अरण्य, ओळीने असलेली आमची राहण्याची कुटीरं, त्यांच्या पलीकडे असलेली मोठी प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष तळंसुद्धा चंद्राच्या शांत चांदण्यात नाहून निघालं आहे. हे असलं सौंदर्य मी स्वर्गावर कधीही पाहिलेलं नाही. निसर्ग काहीतरी सांगतो आहे, पण मला ते कळत नाहीये. स्वर्गावर असा स्पष्ट दिसणारा चंद्र नाही. पृथ्वीच्या चंद्राच्या तुलनेत आमचे उपग्रह फार लहान आहेत आणि त्या सगळ्या उपग्रहांवर कारखाने आहेत. त्यांपैकी कोणताही उपग्रह पृथ्वीच्या चंद्रासारखा रवीच्या परावर्तित प्रकाशाने चमकत नाही.
या तळ्याच्या काठी आम्ही जेव्हा उतरलो त्या पहिल्या रात्रीच मी पृथ्वीचा चंद्र पाहिला होता; पण तेव्हा अजूनही संधिप्रकाश होता आणि चंद्राची कोर आकाशात म्लान दिसत होती. इतर वेळी विमानातून उडताना मला चंद्र ओझरता दिसला आहे आणि क्वचित तो संध्यकाळी पूर्वेला उगवतानाही दिसला आहे. पण यापूर्वी कधीच तो एवढ्या दिमाखात माझ्यासमोर अवतरला नाहीये. या रात्री कोणाचं अस्तित्व सर्वात अर्थपूर्ण आहे यात संशयच नाही… ज्यातून शीतल चांदणं पाझरतं आहे आणि ज्याच्या प्रकाशाने इथे पृथ्वीवर सगळं उजळून निघालं आहे त्या चंद्रबिंबाचं! त्या चांदण्यात न्हालेल्या रात्रीच्या सौंदर्याने मी भारावून गेले आहे. वरच्या चंद्राइतकंच माझं मनही त्या शीतल तेजाने उजळून निघालं आहे. चंद्र आणि आवतीभोवतीच्या परिसराशी मी एकरूप झाले आहे. माझ्यासमोर दिसणारं दृश्यच मी आहे आणि हा अनुभव मला परिचित आहे. या निसर्गाशी माझं जुनं नातं आहे. त्या सौंदर्यात मला नाहायचं आहे. आवतीभोवतीच्या वातावरणाशी मला शरीराने एकरूप व्हायचं आहे आणि अमृताप्रमाणे ते चांदणं प्राशन करायचं आहे.

मी माझ्या अंगावरून फुगा काढून टाकते आणि माझी पावलं मऊ मातीत ठेवते. मग मी पाण्यात प्रवेश करते. पाण्याचा मऊ सुखद स्पर्श माझ्या त्वचेला भिडतो. मी मुक्तपणे पोहू लागते, बोटांच्या टोकांवरून पाण्याचे चंदेरी तरंग निसटून जाताना पाहते. ते चंदेरी पाणी माझ्या केसांत आणि पंखांत झिरपतं. पाण्याचा सळसळ आवाज सोडला तर रात्र शांतच राहते.
वर तेजस्वी प्रकाशणारा पूर्ण चंद्र आणि खाली पाण्यात मी अशा अवस्थेत जणू अगणित काळ लोटल्यावर मी पाण्याच्या पातळीवरून बाहेर येते. माझ्या केसांतून पाणी ठिबकत राहतं आणि पंखांवरून थेंब झटकण्यासाठी मी पंख फडफडवते.
तेव्हा मला ते दिसतो. तळ्याच्या काठापासून थोड्या अंतरावर, आमच्या घरांच्या रांगेजवळ ॲग्नॉन उभा आहे. मी त्याला पाहिलं आहे हे त्याच्या लक्षात येताच तो हात हलवतो.
“फुग्यातून बाहेर पडून मध्यरात्री तळ्यात काय करते आहेस?” वरवर माझी चूक काढणारा स्वर असला तरी माझ्या धाडसाने त्याला वाटलेलं आश्चर्य त्याच्या आवाजात लपत नाही.
“रात्र किती सुंदर आहे, नाही? तो चंद्र पहा, त्याचा असा दिमाख मी यापूर्वी पाहिलेला नाही.”
तो हात देऊन मला तळ्यातून बाहेर पडायला मदत करतो आणि माझ्यामागे तरंगणारा माझा फुगा उचलतो.
“रात्र मंत्रमुग्ध करणारी आहे. पण आपण पृथ्वीवर आहोत हे विसरता कामा नये. सावधगिरी बाळगण्यातच शहाणपण आहे,” माझ्या बोटांत आपली बोटं गुंफवून तो म्हणतो.
आम्ही आमच्या कुटीरांपर्यंत चालत जातो आणि तो माझा निरोप घेतो. मी जागी होऊन रात्रीची बाहेर हिंडत होते हे त्याला कसं कळलं?
_______________________________________________________________________________________________________________
गुडघ्याच्या थोडं वर थरथर सुरू झाली हे काईजाला जाणवलं. तिथून ती वर सरकू लागली आणि पोटापर्यंत पोचली तेव्हा त्याला गलितगात्र वाटू लागलं. त्याने रागाने आपला पाय जमिनीवर आपटला पण त्यामुळे त्याच्या शरीरातली थरथर आणखी वर पसरली आणि तिने त्याच्या हृदयाची पकड घेऊन त्याच्या ठोक्यांची गती वाढवत नेली. त्याने धडपडत आपला कॉम गाठला आणि अमरला फोन लावला.
“काईजा, अरे तू तर फारच उत्तेजित झाला आहेस! काय बातमी आहे?”
“तू प्लीज माझ्या प्रयोगशाळेत येतोस का? मला वाटतं मला वेड लागलं आहे. हे जे निकाल आले आहेत त्यांचा अर्थच लागत नाहीये.”
“मी अर्ध्या तासात पोचतो.”

अमर जेव्हा त्याच्या मित्राच्या गुरुत्वकण प्रयोगशाळेत पोचला तेव्हा काईजा तावातावाने त्याच्या कामाच्या रुपेरी भिंतीला लांबच्या लांब आकडेमोड सांगत होता. त्याच्या हातातल्या इलेक्ट्रॉनिक वहीकडे पाहताच अमरच्या लक्षात आलं, की तो कृष्णविवराच्या घटना क्षितिजाकडे वेगाने झेपावणाऱ्या अवकाश यानातून प्रक्षिप्त होणाऱ्या माहितीचा अर्थ लावत होता. रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या आकड्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा अमरने प्रयत्न केला पण त्याला काही अर्थ लागे ना!
“तू कशाचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहेस काईजा,” विश्लेषणात गर्क झालेल्या आपल्या मित्राला त्याने विचारलं.
काईजाने आपल्या वहीतून डोकं वर करून बघितलं आणि अमरच्या आगमनाबद्दल कोणतंही कुतूहल न दाखवता सहजपणे तो म्हणाला, “क्षितिज अवकाशयान कृष्ण विवराच्या घटनाक्षितिजापासून शेवटच्या दशलक्ष किलोमीटर अंतराच्या परिघात पोचलं आहे. उड्डाण केल्यापासून ते यान माहिती प्रक्षेपित करत आलं आहे. कृष्णविवराकडे तिरकसपणे प्रक्षेपित केल्यापासून त्याने पाठवलेली माहिती अपेक्षेप्रमाणेच आहे – त्याचं स्थान दर्शवणारी आकडेवारी आणि पार्श्वभूमीवरील किरणोत्सर्गाबद्दलची नेहमीची माहिती. पण काल रात्रीपासून, ते पाठवत असलेल्या संदेशांमध्ये अचानक बदल झाला आहे. हे आकडे पहा. हे इथपर्यंतचे आकडे त्याचं स्थान दर्शवतात आणि मग या इथून त्यात बदल दिसून येतो आहे. ये, हे पहा आणि तुला काय वाटतं ते सांग.”
क्षितिज यानाच्या मोहिमेबद्दल अमरला सगळी माहिती होती आणि तो अवकाशयानाच्या प्रक्षेपणशास्त्राचा तज्ज्ञ होता. पृथ्वी प्रकल्पाच्या केंद्रवर्ती मंडळात काम केल्याने अवकाशातील प्रवासाच्या शास्त्राची अद्ययावत माहिती त्याला होती. एका कृष्णविवराच्या घटना क्षितिजाकडे झेपावणाऱ्या अवकाश यानाकडून काय माहिती येणं अपेक्षित आहे हे त्याला चांगलं माहिती होतं…
आणि तरीही, क्षितिज अवकाशयानाने पाठवलेली नवीन माहिती कसून तपासू लागल्याच्या पाचच मिनिटांत तोही उत्तेजित झाला. दहा मिनिटांनी खुर्चीच्या हातांवरची त्याची पकड घट्ट झाली आणि पंधरा मिनिटांनी तोही आश्चर्याने थरथर कापू लागला.
“काईजा, याचा एकच अर्थ असू शकतो, क्षितिज अवकाशयान माहिती कणांच्या एका भोवऱ्यात शिरलं आहे”, तो दबल्या आवाजात म्हणाला.”
“थांब. तू माहितीचा फक्त एक भाग पाहिला आहेस. जी माहिती त्या यानाला कधीही कळणं शक्य नाही अशी माहितीही ते पाठवतं आहे.
“”म्हणजे?”
“ते यान प्रचंड प्रमाणात माहिती पाठवत आहे आणि त्यापैकी बहुतेक माहितीचा मला अर्थ लावता येत नाही. पण मधूनच, त्याचे संदेश तपासणारी यंत्रणा एखादं माहिती असलेलं समीकरण दाखवते आहे. क्षितिज अवकाशयानाने ही समीकरणं का पाठवावीत हे समजत नाही आणि ते पाठवत असलेली इतर माहितीही अर्थहीन आहे असं वाटत नाही. त्यातही काहीतरी सुसूत्रता जाणवतआहे, पण त्या माहितीचा अर्थ लावणं आपल्या विश्लेषण यंत्रणेच्या क्षमतेच्या पलीकडे आहे.”
पुढचे दोन तास, काईजाने आतापर्यंत आलेली माहिती पद्धतशीरपणे अमरला दाखवली. अजूनतरी काहीही अर्थपूर्ण असं त्यातून निष्पन्न झालं नव्हतं आणि तरीही ती सगळी माहिती दुर्लक्षित करता येणार नव्हती. माहिती कण – म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म असे (प्लँक स्केल वरचे) माहिती धारण करण्याची क्षमता असणारे मूलभूत कण असतात असा काईजाने जेव्हा शोध लावला होता तेव्हा लोकांनी केलेली भाकितं आणि बांधलेल्या अटकळी अमरला आठवल्या. काही लोकांच्या मते माहितीकणांमध्ये विश्वाच्या भौतिक नियमांची माहिती साठवलेली होती. काहींच्या मते कृष्णविवराने गिळलेल्या वस्तूंची माहिती या कणांमध्ये साठवलेली होती; तर काही अवाजवी मतांप्रमाणे या कणांमध्ये मानवी मनांचे संस्कार दडले होते आणि जेव्हा एखादा मनुष्य अखेरच्या विश्रांतीत विलीन होई, तेव्हा त्या व्यक्तीचे संस्कार या मुक्तपणे विहार करणाऱ्या कणांमध्ये स्थलांतरित होत. कृष्णविवरातून माहिती कणांचा उत्सर्ग का होतो हे यापैकी कोणताही सिद्धांत स्पष्ट करू शकत नव्हता.
“माहिती कणांमध्ये कदाचित कृष्णविवराने आतापर्यंत ज्या वस्तू गिळल्या आहेत त्यांची माहिती असेल,” त्यातल्या त्यात शक्यतेच्या कोटीतील वाटणारा सिद्धांत आठवून अमर म्हणाला.
“त्यापैकी कोणत्याही सिद्धांतावर माझा विश्वास नाही; तरीपण त्या कणांमध्ये साठवलेली माहिती उलगडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. काहीतरी मार्ग असलाच पाहिजे!”
“बघ, तूच या कणांचा शोध लावलास आणि त्यांचे गुणधर्म काय असतील याचा कयास मांडलास. आता तुला पुरावाही मिळाला आहे, तेव्हा तुझा सिद्धांत बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही तुझ्यावरच आहे, “अमर काहीशा गमतीने म्हणाला.
“माझ्या सिद्धांताचा पुरावा शोधण्याची मला गरजच वाटत नाही कारण तो बरोबर आहे हे मला माहिती आहे. पण या कणांना काय माहीत आहे याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे. काहीतरी माहीत आहे त्यांना. कसलीतरी माहिती आहे त्यांच्या जवळ.” काईजा आता अर्धवट स्वतःशी आणि अर्धवट अमरशी बोलत होता.
त्या दोघा मित्रांनी सगळी रात्र आलेल्या संदेशांचं आकलन करण्यात घालवली पण त्यांना फारसं यश आलं नाही. निघण्यापूर्वी अमरने विश्लेषण करण्याचं काम चालू ठेवण्याचं आश्वासन दिलं आणि यानाकडून जसजसे अधिक संदेश येतील ते अमरला पाठवण्याचं काईजाने कबूल केलं. कृष्णविवराच्या घटना क्षितिजाला यानाने स्पर्श करायला अजून एका वर्षापेक्षा थोडा अधिक अवधी होता. तेव्हा त्याचं भवितव्य ठरणार होतं – ते कृष्णविवराच्या उष्णतेच्या आवरणामुळे जळून खाक तरी होईल, किंवा कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे एखाद्या तारेसारखं ताणलं जाईल किंवा एखाद्या किड्याने जमिनीत करावं तशा भोकातून दुसऱ्या विश्वात निसटून जाईल.
गुरुत्वकण प्रयोगशाळेतून बाहेर पडताना अमरने वळून काईजाकडे पाहिलं. तो पुन्हा आकडेमोडीत गढून गेला होता. अमरला माहीत होतं, की पुढची दोन वर्षं त्याच्या मित्राला गुंतवून ठेवायला त्याला भरपूर काम मिळालं होतं.
_______________________________________________________________________________________________________________
आण्विक प्रयोगशाळेच्या भल्या मोठ्या सभागृहात जमलेला पृथ्वी प्रकल्पाचा संपूर्ण संघ थोडा अस्वस्थ दिसत होता. ते सत्तर लोक गेली पंधरा मिनिटं वाट पाहत बसले होते आणि अजूनही साल्चरचा पत्ता नव्हता. सगळा संघ क्वचितच एकाच वेळी एकाच ठिकाणी प्रत्यक्ष हजर असे. साल्चरच्या दरतीन महिन्यांनी होणाऱ्या भाषणालाच ते सगळे एकत्र जमत. जर एखाद्याला यायला जमणार नसेल तर ती व्यक्ती आभासी रूपाततरी हजर असे. ही भाषणं पृथ्वी प्रकल्पाचा कणा होती. त्या भाषणांतून साल्चर पुढच्या तीन महिन्यांत कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं हे सांगत असे.
पृथ्वी प्रकल्पाच्या मूळ संघाने ही भाषणं दर महिन्याला ऐकली होती. पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाच्या प्रस्थानानंतर जेव्हा दुसरा संघ कामावर रुजू झाला तेव्हा साल्चरची भाषणं दरतीन महिन्यांनी व्हायला लागली. या दुसऱ्या संघाच्या सदस्यांनी त्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या बरोबर जरी काम केलं नसलं तरीही ते प्रकल्पाचा मार्गदर्शक म्हणून त्याला मान देत. साल्चरने स्वतः पथकाच्या प्रत्येक सदस्याला पृथ्वीपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात सुषुप्तावस्थेत जाण्यापूर्वी आणि त्यातून बाहेर आल्यानंतर संदेश पाठवले होते. पथक पृथ्वीवर उतरलं आणि ते त्यांचे प्रयोग करू लागल्यावरच साल्चरने प्रकल्पाच्या रोजच्या कामापासून निवृत्ती घेतली होती.
केंद्रीय मंडळाच्या बैठकांना तो त्यानंतरही हजर राहत असे; पण मंडळाच्या सदस्यांना त्याच्या वागण्यात सूक्ष्म फरक जाणवायला लागला होता. केंद्रीय मंडळाच्या कार्याची दिशा तो आता ठरवत नसे. हळूहळू तो त्यांच्या चर्चा शांतपणे ऐकू लागला आणि कोणी विचारलं तरच आपलं मत देत असे आणि तरीही, प्रकल्पावर काम करणारे बहुतेक शास्त्रज्ञ पृथ्वी प्रकल्प हा साल्चरचा प्रकल्प आहे असंच मानत.
त्यामुळे त्याच्या तीन महिन्यानंतर होणाऱ्या या भाषणासाठी जमलेल्या प्रकल्पाच्या सदस्यांना त्याने ताटकळत ठेवावं हे अकल्पित होतं. श्रोत्यांची अस्वस्थता हेरून, आणि त्यापैकी बरेच जण आपल्या कामाला परत जाण्यास उत्सुक आहेत असं पाहून, केंद्रीय मंडळाने पट्कन सल्ला मसलत केली आणि साल्चरला त्याच्या कॉमवर फोन लावण्याचा निर्णय घेतला. त्यांना तोच एक योग्य पर्याय वाटला. जेव्हा फोन लागला तेव्हा श्रोत्यांमध्ये शांतता पसरली. सगळ्यांचं लक्ष व्यासपीठावरच्या रुपेरी पडद्यावर अवतरलेल्या साल्चरच्या चेहऱ्याकडे गेलं. पण त्यांना जे दिसलं आणि पुढे ते जे ऐकणार होते ते अगदी अनपेक्षित होतं.
साल्चर त्याच्या कामाच्या खोलीत बसला होता, बहुधा त्याच्या घरात. तो विचारात गढून गेला होता आणि त्याच्या न उजळलेल्या कामाच्या स्क्रीनकडे शून्यात पाहत होता. पुढच्याच क्षणी त्याच्या कॉमशी संपर्क जुळताच त्याचा स्क्रीन उजळला आणि आण्विक प्रयोगशाळेतील परिसंवादाचं संपूर्ण सभागृह, तिथे वाट पाहत असलेल्या पृथ्वी प्रकल्पाच्या सगळ्या संघानिशी, त्याच्या कामाच्या पडद्यावर दिसू लागलं. त्याला ते थोडं कष्टप्रद वाटलं.
“साल्चर, आम्ही सगळे इथे मुख्यालयात जमलो आहोत तुमचं त्रैमासिक भाषण ऐकायला. तुम्ही तुमच्या कामाच्या खोलीतूनच भाषण देणार का?” केंद्रीय मंडळाचा सदस्य जीऑर्न ज्युलिप याने आदराने विचारलं.
साल्चरने जमलेल्या लोकांवर नजर फिरवली आणि तो सावकाशपणे म्हणाला, “मी आजिबात भाषण देणार नाहीये. त्याचा काय उपयोग आहे? तुम्हां सगळ्यांना तुमचं काम काय आहे ते माहिती आहे. ते करत राहा. मला काहीच सांगायचं नाहीये.”
“सर, आमच्यामुळे तुम्हांला काही त्रास झाला असेल तर आम्ही क्षमा मागतो.”
“छे छे! तुमचा गैरसमज होतो आहे. मी जे म्हटलं ते मनापासून म्हटलं. काही दिवस मी फार खोलात जाऊन विचार करतो आहे. मला नाही वाटत, की मूलभूत प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत… इथे काय, किंवा पृथ्वीवर काय किंवा अंतराळातसुद्धा. ती उत्तरं सापडण्यासाठी नाहीतच. आपण या विश्वाचे निर्माते नाही आणि निर्मितीचं रहस्य आपल्याला कधीही उलगडणार नाही. मला प्राचीन विचारसरणी प्रमाणे म्हणायचं नाही. उन्नयनपूर्व माणसाची श्रद्धा होती तशा कुठल्या मानवसदृश निर्मात्याबद्दल मी बोलत नाहीये; पण जी काही शक्ती, किंवा कण, किंवा लहर या विश्वाच्या निर्मितीला कारणीभूत झाली तीच कदाचित जीवनाच्या उत्पत्तीलाही कारणीभूत झाली… आणि जाणिवेच्या निर्मितीलादेखील. आपल्याला काय ती गहन तत्त्वं समजणार? आपला मेंदू – अगदी वृद्धिंगत केलेला सध्याचा मानवी मेंदूसुद्धा – मर्यादित आहे. त्यामुळे, तुम्हांला हवंतर तुम्ही चालू ठेवा तुमचे प्रयोग, पण मला तरी आता त्यात स्वारस्य नाही.”
असं म्हणून त्याने आपला कॉम बंद केला आणि संपर्क तुटला. क्षणभर सभागृहात धक्कादायक शांतता पसरली आणि मग सगळेच एकदम बोलू लागले.
सगळ्यांना शांत करण्यासाठी जीऑर्ननेच त्याच्या कॉमवरची घंटा वाजवली.
“अविश्वसनीय… प्रकल्पाच्या नेत्याच्या तोंडून हे ऐकायला मिळावं… पण माझ्या मते आपण परत आपापल्या कामाला लागावं. आपल्यापैकी बहुतेकांनी आपलं सगळं कर्तृत्व आणि आपलं आयुष्य या प्रकल्पाला वाहिलं आहे. तो प्रकल्प काही इतका क्षुल्लक नाही; शिवाय आपली सोळा मुलं त्या दूरच्या जुन्या ग्रहावर आहेत. त्यांना सुखरूप घरी आणायची आपल्यावर जबाबदारी आहे.”
प्रकल्पाचे बहुतेक शास्त्रज्ञ जरी आपल्या कामावर परत गेले; तरी केंद्रीय मंडळाने चट्कन एक बैठक घेतली. केंद्रीय मंडळाच्या एका सदस्याला प्रत्यक्ष जाऊन साल्चरला भेटण्यासाठी पाठवायचं ठरलं. प्रकल्पाविषयी त्याच्या अपेक्षाभंगाचा आवाका समजून घेऊन आणि त्याची इच्छा विचारात घेऊन, मग त्याने प्रकल्पाचा प्रमुख म्हणून कार्यरत राहायचं का नाही हे ठरवायचं हेही निश्चित झालं. त्याची तशी इच्छा असेल किंवा जर तसं करणं आवश्यक वाटलं तर केंद्रीय मंडळ ती भूमिका निभावेल. या संघाने आतापर्यंत प्रकल्पात सहा वर्षं घालवली होती आणि त्यांचं कर्तव्य त्यांना पूर्ण अवगत होतं. ते प्रकल्प चालू ठेवतील आणि नऊ वर्षांनंतर नव्या संघाची निवड करून त्यांच्याकडे प्रकल्पाची सूत्रं सोपवतील. तोपर्यंत, पृथ्वीवर गेलेलं पथक परत आलेलं असेल आणि त्यांनी आणलेल्या नमुन्यांवर प्रयोग सुरू झालेले असतील.
प्रकरण अठरावे समाप्त.
