वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

भारतीय जनमानसावरचे रामकथेचे गारुड केवळ असामान्य आहे. कितीही वेळा वाचली, पाहिली, तरी मन भरत नाही, अशी ही कथा. त्यामुळे अनेक लेखकांकडून तिच्याविषयी लिहिणे हे घडत आलेले आहेच. आजही तिच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल लिहिले जाते. ती कथा आपल्या भाषेत लिहिणे, एवढेच नव्हे तर आपल्या मनाप्रमाणे तिच्यात काही बदल करून लिहिणे, शिवाय तिच्यात अन्य कथा रचून मिसळणे वा घुसडणे हेही घडत आले आहे. त्यामुळेच, रामायणांची संख्या तीनशे आहे, असे म्हणतात. रामायणावर विविध संशोधने करणे हेही पुष्कळांना आवडते. महाकाव्यांचा, रामायणाचा, श्रीरामाचा काळ कोणता, हा संशोधनाच्या अनेक विषयांपैकी एक आहे. त्या सर्व कविराजांनी स्वतःची चरित्रे तर राहोत, काही ठावठिकाणा समजण्यासाठी काही चिन्हेसुद्धा ठेवलेली नाहीत!! तशात नालंदा विद्यापीठासारख्या अनेक ठिकाणांच्या आक्रमकांनी लावलेल्या आगीत असेल नसेल ती माहिती जळून गेलेली आहे. त्यामुळे विविध प्रकारची संशोधने करून काही निष्कर्ष काढले जातात, ते एकमताने मान्य होण्यासारखे निघतील याची शाश्वती नसते! अर्थात काळाच्या आणि आक्रमणांच्या प्रवाहात एवढे साहित्य तरी अवशेष राहिले, ही त्या कालपुरुषाची कृपाच आहे! रामायणाचा शेवट कुठे, म्हणजे उत्तरकांड हे अंगभूत आहे की प्रक्षिप्त, हा एक असाच प्राचीन वाद आहे. त्याचा थोडा विचार करावासा वाटतो.  

वाल्मीकी रामायणाच्या युद्धकांड या भागात रावणवध करून झाल्यावर सीतेची सुटका झाली व श्रीरामाने तिला तिच्या इच्छेनुसार कोठेही जाण्यास संमती दिली. यामध्ये एक व्यक्ती म्हणून मधल्या काळात तिच्या स्वभावामध्ये काही परिवर्तन झाले आहे का, हे पाहण्याचा हेतू होता, असे म्हणता येईल का, असे वाटते. पण मग सीतेने अग्निप्रवेशाची तयारी केली. तेव्हा स्वतः अग्नीने तिच्या शुद्ध चारित्र्याची ग्वाही दिली व देवदेवतांनी त्याला पुष्टी दिली. अर्थातच श्रीरामाने तिचा पुनःस्वीकार केला. ते दोघे पुष्पक विमानाने लंकेतून अयोध्येला आले. भरताने त्यांना राज्य परत दिले व ते राज्य करू लागले. या अध्यायाच्या सुखद अंतापाशी खरेतर वाल्मीकी रामायण संपले – किंवा संपावे – असे आपल्याला वाटते.

पण नंतर उत्तरकांड येते. या उत्तरकांडात रावणाच्या लंकेत दीर्घकाळ राहून आलेल्या सीतेच्या शीलाबद्दल अयोध्येच्या प्रजेने संशय व्यक्त केला. त्यामुळे श्रीरामाने केलेला सीतात्याग आहे. तसेच, शूद्र शंबूकाने तपश्चर्या आरंभल्यामुळे वर्णधर्माचा भंग झाला, समाजात त्याचे वाईट परिणाम होऊ लागले, म्हणून त्याबद्दल श्रीरामाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिलेली आहे. अर्थातच आधुनिक काळात श्रीरामाच्या या दोन कृतींबद्दल त्याला दोष दिला गेला आहे. एका बाजूला विष्णूचा पराक्रमी अवतार म्हणून अनेक शतके त्याची पूजा होत आलेली असली तरी असा दोष देणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. दुसऱ्या बाजूला हे उत्तरकांड प्रक्षिप्त आहे किंवा काय हा रामायणाच्या अनेक संशोधनविषयांपैकी एक आहे. कदाचित श्रीरामाचे समर्थन करण्याचा हेतू प्रक्षिप्त मानण्यामागे आहे, असेही म्हटले जाते. रामायणाचा शेवट दुःखी व निराशादायक आहे आणि त्यात काव्यगत न्याय नाही, म्हणूनही ते प्रक्षिप्त असल्याचा काहीजणांचा दावा आहे. उत्तरकांडापूर्वी श्रीराम राजा होऊन सर्वजण सुखी होतात. मग हे सीतात्याग व शंबूकवधाचे प्रसंग कुठून उभे राहिले? 

श्रीरामाच्या समर्थनासाठी म्हणून नव्हे, पण काही विचार मनात येतात. आदिकवी ऋषी वाल्मीकी हे वाल्याचे उत्क्रांत रूप मानले जाते. दरोडेखोर असणाऱ्या व माणसे मारणाऱ्या वाल्याला नारदमुनींनी विचारले, तू ही पापे का करतोस? तेव्हा त्याने उत्तर दिले, बायकोमुलांसाठी. त्यावर नारदांनी विचारले, की मग ते या पापांच्या जबाबदारीतील वाटा घेतील का? वाल्याने सांगितले, की जरूर घेतील. पण प्रत्यक्षात त्याला दिसले, की ते यासाठी मुळीच तयार नव्हते. मग तो पश्चात्तापदग्ध होऊन नारदांना शरण गेला. त्यांच्या निर्देशाने त्याने रामनामाची घोर, अगदी अंगावर वारूळ होईपर्यंत तपश्चर्या केली. त्याला वाल्मीकी हे ऋषिपद मिळाले व नारदांच्याच आदेशाने त्यांनी रामायण लिहिले. 

ही कथा माहीत नाही असा कोणीही भारतीय नसेल. या कथेतून दोन गोष्टी दिसतात. एक तर शूद्राला, दरोडेखोर, खुनी माणसाला तपश्चर्या करायला नारदांनी संमतीच नव्हे, तर आज्ञा दिली. त्यानंतर त्याच्या ऋषिपदाला म्हणजे  ब्राह्मण्याच्याही वरच्या पदाला मान्यता दिली. म्हणजे त्याचा वरच्या वर्णात प्रवेश झाला. पुढे त्याला महाकाव्य लिहायला सांगितले. ते आदिकाव्य ठरले. सतराव्या शतकातल्या तुकारामांप्रमाणे त्याला लिहायला कोणी बंदी घातलेली नव्हती. अर्थ  असा, की हे सर्व त्या वेळच्या समाजाला मान्य झालेले होते. अशा समाजातले ऋषी कवी वाल्मीकी आपल्या रचनेच्या नायक रामाला, शूद्र शंबूक तपश्चर्या करतो, या कारणासाठी त्याचा वध करायला लावतील का?  

सीतात्यागाच्या बाबतीत विचार करता प्राचीन भारतीय इतिहासातले स्त्रीच्या चारित्र्याचे दंडक सर्व काळी एकसारखे नव्हते, हे लक्षात घ्यायला हवे. त्याचे प्रतिबिंब जाबाली, गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी वगैरे स्त्रियांच्या जीवनचरित्रांत दिसते. महाकाव्यपूर्व काळात त्यांच्या बाबतीत असे काही आरोप झालेले दिसत नाहीत. डॉ.राममनोहर लोहियांनी यावर सुंदर लेख लिहिले आहेत. ते म्हणतात, की एका ऋषीच्या सूत्रानुसार स्त्री प्रत्येक महिन्याला कुमारिका होत असते, असे विचार प्राचीन कालखंडात होते. इथे तर सीतेला रावणाच्या लंकेतील अशोकवनात केवळ असहायतेतून राहावे लागले होते. ती रावणाच्या धमक्यांना किंवा प्रलोभनांना बळी पडत नव्हती. आपले सत्त्व जपत ती हा वनवास सहन करत होती. रावणाने तिला स्पर्श केला नव्हता. वाल्मीकी रामायणात सुंदरकांडात तिने केलेल्या रावणाच्या धिक्काराचे, रावण तिला स्पर्श करू शकला नाही, याचे सतत वर्णन आहे. सीतेच्या शोधार्थ हनुमंत तिथे गेलेला असताना त्याने झाडावर लपून हे पाहिले आहे. तिच्या पवित्रतेविषयी श्रीरामाला खातरी होती. तरीही प्रजेच्या खातरीसाठी त्याने तिच्याकडून अग्निदिव्य करविले. तेवढ्याने लंकेतीलच नव्हे, तर अयोध्येच्या नागरिकांचेही आधी समाधान झाले होते, पण नंतर ते कलुषित झाले.  

तर काही शक्यता मनात येत राहतात. बहुधा महाकाव्य रचनेच्या नंतरच्या आक्रमणांच्या सतत येत गेलेल्या अघोरी लाटांमुळे समाजातल्या वंशशुद्धीच्या व म्हणून स्त्रीचारित्र्याविषयीच्या संकल्पना बदलत गेल्या असाव्यात. स्त्रीच्या शीलाविषयीचे नियम अधिकाधिक तीव्र कडक, कठोर व जाचक होत गेले असतील. वर्णव्यवस्थेच्या चौकटीतही ताठरपणा आला असेल. “चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः” या तत्त्वाचा विसर पडला असेल. तो विसर पडताना जन्माचा निकष प्रबल झाला असेल व गुणकर्माला डावलले गेले असेल. त्यातून पुरुषवर्गातील आणि वरच्या ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांतील काहीजणांची काही अथवा बरीच स्वार्थसिद्धीही झाली असेल, त्यामुळे त्या ताठरपणाला बळकटी आली असेल. मग या जन्मात आपल्यापेक्षा उच्चवर्णात जाणे (upward mobility) अशक्य झाले असेल. ते कधीतरी शक्य होते, म्हणून तर महाभारतातला वैश्य असलेला तुलाधार जाजली या तपस्व्याला तत्त्वज्ञान शिकवू शकला होता. त्यातून व अर्थात स्वार्थ-लोभाच्या अतिरेकामुळे या निकषातून कोणावर कसेही वा कितीही अन्याय झाले तरी चालतील, पण तोच निकष खरा, इतका आवेश निर्माण झाला असेल. मग तीच अनुल्लंघ्य रूढी बनली असेल आणि अशा काळातल्या कट्टर महाभागांपैकी कोणी या उत्तरकांडाची स्त्री-शूद्रांवर अन्याय करणारी रचना जोडली असेल, मग ती परंपरेचा भाग बनली असेल, असे वाटत राहते. छाननीसाठी काही पुरावे लभ्य नसल्यामुळे हे विचार करणेच ठरते किंवा हातात तेवढेच उरते. हे कालिदास, भवभूती वगैरेंच्याही पूर्वी घडले असावे, कारण त्यांनीही आपले साहित्य रचताना उत्तरकांड हे रामायणाचाच अभंग भाग मानले होते.  

एक मात्र जाणवते. यांच्यापैकी कोणीही उत्तरकांड स्वीकारताना श्रीरामाच्या सीतेवरच्या, तिच्या शीलावरच्या विश्वासावर शंका घेतली नाही. ती रामाची अपरिहार्यता मानली, कारण तो कायद्याच्या, आजच्या भाषेत संविधानाच्या मर्यादा पाळणारा मर्यादापुरुषोत्तम होता, हे मान्य केले. सीतेच्या चारित्र्यावर कोणी बोट उचलू शकले नाही, त्याला धक्का लावू शकले नाही. प्रजेला पुन्हा आपल्या शीलाची ग्वाही देण्याचा अवमान नाकारून माता धरित्रीबरोबर मानिनी सीता निघून जाते, असे तेजस्वी रूप त्यांनी दाखवले. ही त्यांची, काळ्या ढगाची रुपेरी किनार किंवा इंग्रजीतली Saving grace म्हणावी.

सीतेच्या या स्वाभिमानाचे व तेजस्वितेचे स्वर्गीय लावण्य कोणाला लोभवणार नाही? महाकवी तर त्याने मंत्रमुग्धच झाले असावेत. म्हणून कालिदासाने रघुवंशाच्या चौदाव्या सर्गात लक्ष्मणाने वनात सोडलेल्या सीतेच्या तोंडी तेजोमय वचने दिली आहेत. कालिदास नेहमी वाल्मीकींच्या पदचिन्हांना अनुसरत असतो. रामायणाच्या शैलीत उत्तरकांडातली सीता सांगते, “वक्तव्यश्चापि नृपतिर्धर्मेषु सुसमाहितः” (उत्तरकांड – अध्याय ४८-११). “धर्मनिष्ठ त्या राजालागी ही वचने कथिली जावी.” कालिदासाची सीताही असाच कर्मणी वाक्यप्रयोग वापरत लक्ष्मणाला सांगते – “वाच्यस्त्वया मद्वचनात् स राजा” 

“हे बोल माझे रघुनंदनासी तुझ्या मुखाने कथनी मिळावे”

…वह्नौ विशुद्धामपि यत्समक्षम्

  मां लोकवादश्रवणादहासीः श्रुतस्य किं तत्सदृशं कुलस्य”-(रघुवंश-१४-६१)

अग्नीत शुद्धी घडुनी परी तू लोकप्रवादे मजला त्यजावे?  

इक्ष्वाकुवंशास अथवा श्रुतींना हे कृत्य तूझे कैसे रुचावे? ”

तुझ्याकडून हे कथिले जावे, असे सीता म्हणते. तू  सांग, असे नाही. माझ्या पतीला श्रीरामाला, असेही नाही, तर त्या राजाला. कर्मणी प्रयोगाचा हा वापर तिने आता आखून घेतलेले अंतर दर्शवतो. परिस्थितीचा स्वीकारही दर्शवतो. हे वाचून आपल्याला वाटते, मागे लक्ष्मणाने तिला रेषा आखून दिली होती. आता सीतेने एक रेषा आखून घेतली आहे. म्हणून ती पुढे सांगते, “तपस्विसामान्यमवेक्षणीया”—

“तपस्विनीसम मला पहावे”. यापुढे तिला एक तपस्विनी असे लेखावे आणि हे नाते असे तुटत असताना “जननान्तरेsपि त्वमेव भर्ता न च विप्रयोगः” – “जननांतरीही वियोग नाही, सदैव माझा पति तूच राही”- असेही सांगते. आहत असूनही स्वयंपूर्ण, स्वाभिमानी, प्रेमाप्रती निष्ठावंत असे हे सीतेचे अलौकिक रूप कालिदास चित्रित करतो. 

नेहम टेट या सतराव्या शतकातल्या इंग्लंडचा पोएट लॉरेट असलेल्या नाटककाराने शेक्स्पीअरच्या किंग लिअर नाटकाचा द हिस्टरी ऑफ किंग लिअर लिहून शेवट बदलला, सुखान्त केला. तशाच प्रकारे आठव्या शतकातल्या भवभूतीने वाल्मीकींच्या रामायणातल्या उत्तरकांडातला शेवट बदलून सीतेला न्याय दिला, असे म्हणायला हवे. भवभूती उत्तररामचरितम् नाटकामध्ये सीतेचे असेच सुंदर चित्रण करतो व सर्व सातही अंकांत असेही दाखवतो, की श्रीरामाला प्रत्येक क्षणाला सीतात्यागाचे दुःख जाळते आहे. तो निर्णय घ्यायच्या वेळी सीता झोपलेली असताना तिच्या पावलांवर श्रीराम मस्तक टेकतो, हा त्याच्या तिच्याविषयीच्या प्रेमादराचा व त्याच्या दुःखाचा अत्युच्च बिंदू आहे. त्याहीपुढे जाऊन भवभूती नाटकांतर्गत नाटकाचे तंत्र वापरतो, ज्यात फ्लॅशबॅकही आहे. शेक्स्पीअरने हॅम्लेटमध्ये हे तंत्र वापरले आहे. संस्कृत नाट्यशास्त्रात याला गर्भांक म्हणतात. भवभूती नाटकाच्या सातव्या अंकात रामकथेवरच्याच वाल्मीकींनी रचलेल्या रामकथाविषयक नाटकाचा प्रयोग घडवतो. त्यातून रामाला सीतात्यागानंतरच्या बारा वर्षांतल्या घटना कळतात. गंगा नदी व पृथ्वी या देवता सीतेला सांगतात, की तिच्या शीलाच्या पावित्र्याने त्यांचेही पावित्र्य वाढते. अयोध्येतल्या लोकापवाद पसरवणाऱ्या नागरिकांना यातून योग्य तो संदेश दिला जातो आणि शेवटी गंगा नदी, वसिष्ठपत्नी अरुंधती, ऋषी वाल्मीकी यांच्या साक्षीने राम, सीता व लव-कुश या सर्वांचे मिलन होते, असे भवभूती दाखवतो.

महाभारतात शेवटी स्वर्गारोहणपर्वात सर्वांना स्वर्गात पाठवले गेले आहे. बुद्धदेव बोस यांच्यासारख्या अनेक समीक्षकांनी हा शेवट बनवलेला, कृत्रिम मानला आहे. “The ascent to heaven is nothing but a conventional utterance of comfort,” असे बोस यांनी म्हटले आहे. संस्कृत वाल्मीकी रामायणाच्या अनेक आवृत्ती असतील, पण १९२३मध्ये स्थापन झालेल्या, शंभर वर्षांहून अधिक जुन्या गीता प्रेस, गोरखपुर या प्रकाशनाची आवृत्ती विश्वसनीय वाटते. त्यात शेवटी एकशेअकरा सर्गांचे उत्तरकांड आहे. त्यातील पहिल्या ५९ सर्गांत सीतात्यागानंतर ययाती वगैरे इतरच कथा येतात. ५९व्या सर्गाच्यापुढचे सर्ग ‘प्रक्षिप्त’ या शीर्षकाखालीच दिलेले आहेत. त्या प्रक्षिप्त सर्गांमध्ये सीतेने ‘रसातलात प्रवेश केला,’ असे वर्णन आहे. शेवटी श्रीरामाला साहाय्य करणाऱ्या कपी व ऋक्षांप्रमाणे सगळ्या अयोध्यावासीयांनाही शरयूनदीच्या जलातून स्वर्गात प्रवेश मिळतो, असेही म्हटले आहे. हा शेवट महाभारताच्या शेवटाप्रमाणेच वाटतो. या न पटणाऱ्या शेवटामुळेही हे केवळ ५९च्यापुढचे सर्गच नव्हे, तर सारे उत्तरकांडच प्रक्षिप्त वाटते.  

सीतेने त्याग या परिस्थितीचा स्वीकार केला. या नाटककार-कवींनी उत्तरकांडाला प्रक्षिप्त न मानता त्याचा स्वीकार केला, पण श्रीराम व सीता यांचे सत्त्व मान्यच केले, ते जपले व आपल्या शब्दांनी व असामान्य प्रतिभेने ते उजळवले, असे म्हणायला हवे.  

        ———X———  ———X———  ———X———

Author

Leave a Reply