साताऱ्यात असताना कॉलेजच्या वार्षिक अंकासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत घेतली. मुलाखत खूप चांगली झाली. पुढे विद्यापीठाने या मुलाखतीला पारितोषिक देऊन सन्मानित केले. ही मुलाखत घेत असताना डॉक्टरांच्या वागण्याबोलण्यातील, राहणीमानातील साधेपणा खूप भावला. त्यांच्या कामाचे मोठेपण लक्षात आले. या भारावलेपणातच माझ्याकडून एकही रुपया न घेता त्यांनी मला साधनेचा वर्गणीदार करून घेतले. पुढे मी हमीद सरांमार्फत साधनेकडे ही वर्गणी दिली. त्यामुळे आजही जेव्हा जेव्हा साधनेचा अंक घरी येतो तेव्हा तेव्हा हमखास डॉक्टरांची आठवण येते. या निमित्ताने डॉक्टरांशी खूप चांगले ऋणानुबंध जुळू पाहत होते. या ना त्या निमित्ताने त्यांच्याशी फोन व्हायचा. मागेन ते सहकार्य, मदत ते करायचे; परंतु प्रत्यक्षात भेट व्हायची नाही. अशातच २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांच्या हत्येची बातमी ऐकली नि खूप अस्वस्थ झालो. या अस्वस्थतेत त्यांची सर्व पुस्तके अधाश्यासारखी वाचली. ही सर्व पुस्तके व १० भाषणांची डीव्हीडी रयत शिक्षण संस्थेतील ३५० शाखांत पोहोचवण्याच्या उपक्रमात समन्वयक म्हणून काम केले. यातून, डॉक्टर जी कामे करत होते ती मूलतः शिक्षकांची, प्राध्यापकांची घटनादत्त कर्तव्ये असल्याची जाणीव झाली. तेव्हापासून अंनिस व साधनेशी जोडला गेलो. साधनेच्या ‘बालकुमार आणि युवा’ दिवाळी अंकांच्या वितरण मोहिमेत दरवर्षी सहभागी होत राहिलो. हे अंक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवताना खूप आनंद वाटायचा; पण मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा कोरडेपणा व निरुत्साह मात्र काही केल्या नजरेतून सुटायचा नाही. वाईट वाटायचे.
हे सर्व अनुभवत असताना कॉ. गोविंद पानसरे, दत्तप्रसाद दाभोळकर, आर.ए. कुंभार यांचे अनुक्रमे राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन व कार्यावर आधारित १०० व्याख्याने देण्याचा संकल्प वाचनात आला. यातून आपणही सामाजिक आशयाचे काहीतरी काम करावे हा विचार मनात रुजला. हे सर्व घडत असताना नोकरीच्या सुरुवातीपासूनच मी अध्यापनादरम्यान कायम वेगवेगळ्या पुस्तकांतील उदाहरणे, घटना, संदर्भ सांगायचो. त्यातून ऐकणारे सारे प्रभावित व्हायचे. ‘तुमचे भाषण खूप आवडले,’ असेही सांगायचे; परंतु प्रत्यक्ष संदर्भित पुस्तके वाचताना मात्र दिसायचे नाहीत. तेव्हा, ‘आपले विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक वाचत का नाहीत?’ यावर खूप विचार केला आणि त्यातून लक्षात आले, की यांतील काहींचा अपवाद वगळता बहुतेकांना वाचनीय पुस्तके, उत्तम लेखक माहीतच नाहीत. आपल्या जवळच्या एखाद्या शिक्षकाला, विद्यार्थ्याला हे विचारून बघा, मग मी जे सांगतोय त्याची तुम्हांलाही खातरी पटेल. शिक्षक, प्राध्यापक कोणती पुस्तके वाचतात? त्यांच्याकडे स्वतःची विकत घेतलेली किती पुस्तके आहेत? त्यांच्या एकूण चर्चा-विश्वात पुस्तकांना काय स्थान असते? यावर कोणी खरेखुरे संशोधन केले तर अक्षरशः हादरून जायला होईल एवढी बिकट अवस्था आज वाचनसंस्काराची झाली आहे.
आपण आत्तापर्यंत काही एक चांगले काम करू शकलो नसलो, तरी वाचनसंस्कार रुजवणुकीच्या दृष्टीने शिक्षक, विद्यार्थी व पालकांपर्यंत आपण हे विचार सहजच पोहचवू शकतो याची खातरी पटली नि लगेच कामाला लागलो. साधनेतील शिक्षणविषयक निवडक पुस्तकांची मध्यवर्ती कल्पना, आशयसूत्र लक्षात घेऊन खास शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी आवर्जून वाचावीत अशा ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ‘शाळा भेट, ‘न पेटलेले दिवे, ‘माझे विद्यार्थी, आठ, प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्ते’, ‘कवाडे उघडताच’, ‘मुलांसाठी पथेर पांचाली’, ‘मुलांसाठी विवेकानंद’ या आठ पुस्तकांचा मूळ १३७५ रुपये किमतीचा संच केवळ १००० रुपयांत पुढील वर्षभरामध्ये शंभर वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
२३ एप्रिल २०२५ – जागतिक ग्रंथदिनाला या संचातील ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ या कादंबरीवर आमची विद्यार्थिनी मृणाल गवळी हिने उत्तमरित्या आपले विचार, अनुभव मांडले; तर देवीदास गावितने ‘न पेटलेले दिवे’ या पुस्तकाने त्याला कसे प्रभावित केले याचे विवेचन केले. ही दोन्ही अनुभवकथने सर्वांना खूप आवडली. तसा प्रतिसाद त्यांनी आपल्या मनोगताद्वारे, संदेशाद्वारे कळवला. इतकेच नव्हे तर यांतील निवडक प्रतिक्रिया पुढील काही दिवस आपल्या स्टेटसला ठेवल्या. व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवल्या. मीही जाणीवपूर्वक याच माध्यमाद्वारे या सर्व गोष्टींचा प्रचार, प्रसार केला. या संदर्भात साधनेच्या विद्यमान संपादकांशी चर्चा झाली. त्यांनाही हा संकल्प खूप आवडला. त्यातूनच एक आकर्षक जाहिरातवजा निवेदन तयार केले. कार्यनीती ठरवली. व्हॉट्सअॅप, फेसबुक या समाजमाध्यमांतून ते जास्तीत जास्त शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवले.
लवकरच या मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसू लागला. रविकिरण साळवे सरांनी पहिल्या संचाची नोंदणी केली. त्याच रात्री वर्धा येथून प्रफुल्ल ढेपे यांनी ‘गुगल पे’ला पार्सल खर्चासह ११२० रु. पाठवून संचाची नोंदणी केली. संच मिळाल्यानंतर आनंदाची, कृतज्ञतेची भावना व्यक्त करून संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. एक छोटासा जाहिरातवजा व्हिडिओही करून पाठवला. गावाकडील दिलीप पारेकर या शिक्षण संस्था- चालकांकडे हे निवेदन पाठवले. त्यांना या पुस्तकांचे वाचकांच्या अनुभवासह महत्त्व पटवून दिले. त्यांनी तत्काळ आपल्या मुख्याध्यापकांमार्फात १२ संचांची नोंदणी केली. सांगली येथून सुरेखा खोत यांनी चार संचांची नोंदणी केली. मनीषा गावडे यांनी शाळेला भेट देण्यासाठी तीन, तर नंदुरबारचे उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी सहा संचांची खरेदी करून आपल्या कार्यक्षेत्रातील सहा शाळांमधील शिक्षक, पालकांना सहभागी करून तिथे ग्रंथालय निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. कविता तळोले यांनी आमच्या गटातील आठही शिक्षिकांना व इतरांनाही पुस्तके घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नांतून दहा-बारा संचांची नोंदणी झाली. सर्वांच्या प्रयत्नांतून बघता बघता वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर हा लेख लिहीपर्यंत १९० संच कधी पूर्ण झाले तेही कळले नाही!
या १९० वाचकांपैकी फारतर ५०-६० लोक प्रत्यक्ष माझ्या ओळखीचे, संपर्कातील असतील. इतर सर्व लोक मात्र ऑनलाईन माध्यमांच्या बळावर मिळत गेले. यातून या माध्यमांची एक वेगळीच ताकद लक्षात आली. हे सर्व अनुभवल्यावर या बाबतीत आपल्याला आणखी खूप काही करायला संधी असल्याची जाणीव झाली. आपण समजतो तितके निराश व्हायचे कारण नाही; फक्त नव्या जोमाने, नव्या कल्पकतेने, नव्या आयुधांसह ही लढाई लढली पाहिजे असे वाटायला लागले.
संचांची नोंदणी तर अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या प्रकारे होतेय. पण पुढे काय? आपण ज्या हेतूने हा उपक्रम सुरू केला तो साध्य होतोय, की नाही हे पाहणेही तितकेच गरजेचे होते. त्यासाठी ज्यांनी ही पुस्तके घेतली त्यांच्याशी पुस्तकांविषयी, ते करत असलेल्या कामाविषयी संवाद साधला. गप्पागोष्टी, चर्चा झाल्या नि त्यातून पुढे खूप बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.
ज्यांनी ही पुस्तके घेतली त्या सर्वांना ती खूप आवडली. यात शाळेसाठी संच भेट दिलेल्या शैलजा पाटील म्हणतात, “माझी काटेमुंढरीची शाळा हे पुस्तक वाचल्यानंतर, आपण किती आरामदायी वातावरणात नोकरी करत आहोत याची जाणीव होते. आदिवासी संस्कृती, त्यांचे जीवन, त्यांच्या जिज्ञासा, त्यांचं निरागस जगणं, त्यांचं सामान्यज्ञान आपल्याला पावलोपावली भेटतं. गावकऱ्यांना शिक्षकांविषयी वाटणारा आदरभाव मन हेलावून टाकतो. शिक्षणक्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने, तसेच जुन्या, जाणत्या बुजुर्गांनीही आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे! हे पुस्तक वाचण्याची जवळपास दहा वर्षांपूर्वीची इच्छा शिंदे सरांनी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहे.”
रघुराज मेटकरी यांचे ‘माझे विद्यार्थी’ हे पुस्तक वाचून स्वप्नील फापाळे म्हणतात, “सामाजिक भान जपणारा शिक्षक कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण मला या पुस्तकातून भेटले. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम करताना आपल्या जाणिवांचा व संवेदनांचा स्तर उंचावणारे हे एक अप्रतिम पुस्तक आहे. शिक्षक म्हणून काम करताना संवेदनशीलता जोपासणे किती महत्त्वाचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.” हेच पुस्तक वाचून सध्या दहावीत शिकणारी लावण्या जांभळे लिहिते, “प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन सारखे नसते. मेटकरी गुरुजींसारखे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार ज्ञान दिले पाहिजे. जे विद्यार्थी मुळात ज्ञानी असतात त्यांच्यावर पालकांच्या अपेक्षांचा डोंगर असतो आणि या डोंगराखाली ते दबले जातात. त्यातून त्यांचे छंद, त्यांची आवड कायमची नाहीशी होते. मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय नेहमी पालकच घेतात, जे स्वतः त्या मुलांनी घ्यायला हवेत. पालक स्वतःचेही आयुष्य जगतात व मुलांचेही आयुष्य जगायला बघतात. पालकांच्या ह्याच वागण्यामुळे असे विद्यार्थी पुढे रागीट, दुःखी व अस्थिर होतात आणि ह्याला पालक, ‘तो कमजोर आहे, ’ असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. या चुका पुढे त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण बनतात. वागण्याचे नियम विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना कळणे अधिक गरजेचे आहे. एवढेच या पुस्तकातून समजले!”
एकच पुस्तक वेगवेगळ्या वयोगटांतल्या वाचकांवर कसा परिणाम करते याचं हे बोलकं उदाहरण आहे. लावण्याच्या या संवेदनशील तितक्याच भेदक अनुभवातून पालकांनी नक्की कोणत्या दिशेने जायला हवं? अगोदर शिक्षण मुलांचं व्हायला हवं, की पालकांचं? पालक म्हणून आपण नक्की कसे आहोत? विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना नकळतपणे पालक तर जबाबदार नाहीत ना? असे अनेक अनुत्तरित प्रश्न तयार होतात.
पवित्र – पोर्टलमधून नुकत्याच नव्याने शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या शुभांगी लोहकरे लिहितात,“ही पुस्तकं माझ्यासारख्या नवख्या शिक्षणसेविकाच्या हातात येणं म्हणजे जंगल सफारीवर जाताना सोबत मिळालेला गाईडच जणू ! आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं वाचताना असेही शिक्षक असतात – आहेत – याचं कधी आश्चर्य वाटत होतं तर कधीकधी डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. प्रत्येकाचे अनुभव थक्क करून टाकतात. हे पुस्तक वाचून मला एक नवी ऊर्जा मिळाल्यासारखे वाटत आहे. जरी माझ्यामध्ये मी कृष्णात पाटोळे सर, विकास देवके सर, रूपाली माळी आणि इतर सर्वांना नाही शोधू शकले, तरी चौकटीच्या बाहेर जाऊन शिकवण्यातील समाधान शोधून एका तपाच्या प्रतीक्षेअंती मिळालेली ही शिक्षिकेची नोकरी फक्त नोकरी म्हणून नाही तर ‘वसा’ म्हणून स्वीकारेन याची ग्वाही देते.”
ही प्रतिक्रिया वाचून नकळत माझ्याही डोळ्यांत पाणी आले. आपण जे रुजवू पाहतोय ते या रूपाने कुठेतरी रुजतेय, फुलू पाहतेय याचा मनस्वी आनंद झाला.
अशा काही चांगल्या अनुभवांसोबतच काही नकोसे अनुभवही वाट्याला आले. ज्याच्याकडे वाचनाच्या आंतरिक प्रेरणा आहेत असा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तुटपुंजा पगारावर हंगामी नोकरी करणारा शिक्षक खिशात पुरेसे पैसे नसतानाही पार्सल खर्चासह संच घेतोय. पुस्तकांचे, माझे खूप कौतुक करतोय. पण ज्यांच्याकडे सरकारी नोकरी, लाखो-करोडो रुपये आहेत, ज्यांच्या हाताखाली पुढे हजारो विद्यार्थी घडणार आहेत त्यांना मात्र यातील काहीच नकोय. यातला विरोधाभास कसा समजून घ्यायचा? काही कळत नाही.
दुसरा आणखी विचार करायला भाग पाडणारा असाच एक प्रसंग : शिक्षक निर्मितीच्या केंद्रस्थानी असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपला या संकल्पाचे जाहिरातवजा निवेदन, व्हिडिओ पाठवला. या ग्रुपचे २४२ सदस्य आहेत. हा लेख लिहीपर्यंत २३५ जणांनी ते पाहिले असून फक्त दोघांनी लाईकची इमोजी दिली. एका प्राचार्यांनी त्यांच्या कॉलेजसाठी एक संच घेतला. यापेक्षा वेगळा प्रतिसाद शून्य! जिथून उद्याचे शिक्षक घडतात तोच वर्ग वाचनाबाबत इतका उदासीन कसा काय असू शकतो? पूर्वीही अधूनमधून असा अनुभव यायचा; परंतु आता मात्र माझे या बाबतीतील पूर्वीचे निरीक्षण आणखीच पक्के झाले आहे.
इथे आपल्याला आणखी खूप काम करायला संधी आहे ही मूळची जाणीव आणखीच प्रखर झाली आहे. यापुढे वाचन संस्कार रुजवणूक हेच आपल्या कामाचे आशयसूत्र असणार आहे हे नक्की झाले आहे. त्यासाठी समविचारी व्यक्ती, संस्था, संघटनांनी काही खास उपक्रम घेऊन शिक्षक, प्राध्यापकवर्ग वाचता कसा होईल यावर भर देण्याची गरज आहे; कारण शिक्षक हाच सामाजिक बदलांचा खराखुरा वाहक असतो. म्हणून तर त्याला सामाजिक अभियंता म्हटले जाते.
या उपक्रमातील माझी उठाठेव पाहून मुलगी भक्ती एके दिवशी मला म्हणाली, “तुझ्या या उपक्रमाचे महत्त्व मला सुरुवातीला कळले नव्हते. म्हणून मी तुला विचारले होते, की ‘पप्पा तुला यातून काहीच नफा मिळत नाही तरी तू या उपक्रमासाठी व बालकुमार दिवाळी अंकासाठी एवढी धडपड का करतोस?’ त्या वेळी तू म्हणाला होतास, ‘आपण माणसं आनंदाचे परिमाण मोजण्यात चुकतो. दरवेळी पैसा म्हणजेच आनंद नसतो. निरपेक्ष भावनेतून केलेल्या कामातून मिळणारा आनंद, समाधान त्यापेक्षा कैक पटींनी मोलाचे असते.’ हे तू जे सांगत होतास ते मलाही आता पटत चालले आहे.”
आपल्या या उपक्रमाचा मुलांवर इतका चांगला प्रभाव पडू शकतो याचा मी कधीच विचार केला नव्हता. असो, या सर्वातून शिक्षक वाचता कसा करता येईल याच्या अनेक दिशा स्पष्ट झाल्या. त्यातूनच या १९० वाचकांचा एक दिवस आठ पुस्तकांच्या लेखकांशी संवाद, चर्चा, प्रश्नोत्तरे घडवून आणायचा मनोदय आहे. या ८ पुस्तकांशिवाय मराठीतील इतरही महत्त्वपूर्ण पुस्तके पुरेशा सवलतीत सहजतेने वाचकांपर्यंत पोहचवण्याचे नियोजन करायचे आहे.
पुढे मूळच्या उपक्रमाला पूरक एक चांगलं साहित्यिक, वाचनप्रिय पर्यावरण तयार व्हावं या हेतूने ‘ऑनलाईन साहित्य संवाद यात्रा, वाचू आनंदे! शिकू आनंदे!’ हा उपक्रम १६ जून २०२५ पासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ या तारखांना वाचनासंदर्भात सायंकाळी ९ ते १० या वेळेत मान्यवर साहित्यिक, अभ्यासकांची व्याख्याने, चर्चा, संवाद, प्रश्नोत्तरे, मुलाखती असा ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेचे २१ भाग पूर्ण झाले आहेत. याही उपक्रमाला वरचेवर वाचकांची चांगली पसंती मिळत आहे. नुकताच १०२५ वाचकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप पूर्ण होऊन दुसरा ग्रुप तयार करावा लागला. वाचन संस्कार – संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात ही छोटीशी पाऊलवाटही अनेकांच्या सहकार्याने महत्त्वाची ठरेल अशी आशा वाटते.


मनमोकळा, सुरेख लेख.