मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

रामाविषयीची भक्ती व्यक्त करण्यासाठी १९०० कडव्यांचं मंत्ररामायण लिहूनही मोरोपंतांचं समाधान झालं नाही. कॅलिडोस्कोपमधून  विविध कोनांतून वेगवेगळ्या आकृती निरखाव्यात तसं मोरोपंत वेगवेगळ्या कोनांतून रामायण निरखत होते.

मंत्ररामायणाप्रमाणे बालमंत्ररामायणातही श्रीरामाचा जप त्यांनी गुंफला आहे.   बालमंत्ररामायण हे  रामाच्या लहानपणीचे वर्णन नसून ते केवळ ३९ कडव्यांचे लहानसे रामायण आहे म्हणून या काव्याला बालमंत्ररामायण संबोधले आहे. 

मंत्ररामायण आणि बालमंत्रारामायण यांत सुरुवातीच्या ९ व्या ओळीत कथेत  फरक दिसतो. 

मंत्ररामायणात पुत्रप्राप्तीसाठी जे पायसदान दिले असते त्या वेळचे वर्णन करताना मोरोपंत लिहितात, (७/४२,४३) 

“दे भार्यांशि” असं म्हणत पायसपरिपूर्ण हेमपात्र दशरथाच्या हातात  येतं.

जन्म सफळ मानुनि तो स्वपायसाचे  करूनि युगभाग

कौसल्येला देउनि कैकेयीला हि दे महाभाग

इथे सुमित्रेला दशरथ प्रसाद देत नाही. 

यद्यपि भूपें न दिला भाग सुमित्रेसि, तरि हि त्या तीतें

निजभागार्ध समर्पुनि आनंदविती अपार नृपतीतें

असं जावाजावांमधलं प्रेम अधोरेखित केलं आहे.

बालमंत्ररामायणात मात्र मोरोपंत लिहितात,

यज्वा म्हणे तिघींतें, करुनि उचित भाग तें सुपायस खा (१७५/९)

कथा तीच असली तरी ती विविध अलंकारांनी सजवून आणलेली आहे. अलंकारांचा जरी एक वेगळा लेख होणार असला तरी काही शब्दलेण्यांचं सौंदर्य आणि काठिण्य कौतुकास्पद आहे ते मांडावंसं वाटतं. 

जगदीश्वरीपितृत्वें बहु मानी  सुरसभा जनकराज्या

पात्र दशरथा करि त्या नुतिस सुधासुरसभाजनकरा ज्या (१७६/३०

या नऊ अक्षरी यमकासारखी अनेक काव्यलेणी रामायणाला चढवलेली दिसतात.   कधीकधी मोरोपंत  यमकांच्या या खेळात इतके रमून जातात, की  बालिश वाटतील असेही शब्दही त्यांना खुणावतात आणि काव्यात मानाने बसतात. 

पान १७८/९

भय  सोडुनि कैकेयी निर्दयहृदया करी महा जाच

ती श्रीरामासि म्हणे, चवदा वर्षें वनीं रहा जा च.

पान १८१ /१३

प्रथम भ्रात्याते, मग घटजातें राम भेटला भावें

त्या मुनि म्हणे, तसें हें जेंवि

समुद्रात बेट लाभावें

(१८३/३७) 

सुश्रेय मला गुरुनें कथिलें तें सिद्ध जाहलें आजी 

तृप्ता केली, होती करुनि जसी चातकी तसी ‘आ’ जी

चातक पक्षी आ करून पावसाचं पाणी पिऊन तृप्त होतो तद्वत माझे समाधान झाले. या किरकोळ शब्दखेळात किंचित काळ रमलेले मोरोपंत पुन्हा भारदस्त शब्दसुमनांमध्ये रंगतात. 

सीतेचे अलंकार दिसल्यानंतरच्या भावना मंत्ररामायणात

तीं संस्कारा वांचुनि मळली होतीं म्हणूनियां काय

प्रक्षाळी नेत्रजळें दाराभरणें समस्त  रघुराय 

अशा मांडल्या आहेत.(३२,२८) हाच प्रसंग  बालमंत्ररामायणात अधिक हळवा होतो… (१८४/८) 

नेली रजनीचरें स्त्री अनुमानें जानकी असें जाणें;

अस्मच्छ्रुतींस वांटित गेली ती ‘राम राम’ हीं वाणें

लक्ष्मण आणि सीतेचे सोज्ज्वळ नाते हलकेच उलगडणारा भावनिक प्रसंगही या दागिन्यांच्या निमित्ताने यात गुंफला  आहे. 

१८४/११

सीताप्रियनग पाहे राम; म्हणे लक्ष्मणा! पहा बा हे! 

तो ‘नेणें इतर’ म्हणे, ‘जाणें नूपुर चि यांत हें आहे’ 

भावविवश होऊन राम सीतेचे दागिने लक्ष्मणाला दाखवत आहे आणि लक्ष्मण म्हणतो, “मी यांतले फक्त नूपुर ओळखतो.”  लक्ष्मणाची नजर सीतेच्या पावलांकडेच असते,’ नजर वर करून कधी वहिनीला पाहिलेलेच नाही या तत्कालीन शालीनतेच्या व्याख्येचे यातून  दर्शन घडते.

दागिने बघून सीतेच्या आठवणी रामाला बेचैन करतात. 

साश्रू उरासीं प्रभु धरी भिजवी शोकोदकें समस्त नग

हारासि म्हणे, ‘हा तूं भाग्यें होतासि मजसम स्तनग

(१८४ किष्किंधा कांड १२) 

विरहरसातून पाझरणारं दुःख रामाला व्याकूळ करतं. समस्त नग  (दागिने) 

आणि सम स्तनग – माझ्यासारखेच सीतेच्या हृदयाजवळ असलेले! अशा सहज शब्दखेळाने भाषापटुत्वाची प्रचिती येत राहते. 

मोरोपंत भावना अनुभवून लिहीत असावेत इतकं त्याचं लेखन हळुवार आहे. 

संस्कृत आणि मराठी शब्दांची मोट बांधून यमके योजणे हा गमतीशीर प्रकारही मोरोपंत रुजवतात. अभ्यास, भाषेची, यमकाची मौज असा हा प्रयोग : 

हा आश्रय  निर्भय नग मज; कारण  सांगतो तुला याचें 

वाळी  बळजळधि, मथन करि दुंदुभिनामका लुलायाचें (१८५/२२)

तुला याचेसाठी लुलायाचे असं यमक कोड्यात पाडतं. 

मयासुर नावाच्या दानवाचा मुलगा दुंदुभि. हा अत्यंत अहंकारी राक्षस-रेडा होता. त्याला वाळीने मारले. ही कथा गुंफताना रेडा याचा संस्कृत शब्द लुलाय सुयोग्य रितीने उपयोजिला आहे.

यात वाळी  बळजळधि मधून ळ चा अनुप्रासही साधला आहे. यमक अनुप्रासाच्या मोहात कधीकधी त्यांचं काव्य हास्यास्पदही होतं.  

पान १८७/१४

मारुतीच्या शेपटीला तेलात भिजवलेली वस्त्रे बांधून पेटवून दिले. यावर शूर योद्धा हनुमंत म्हणतो :

‘वातसुत’ ‘श्री रामो जयति!’ असे म्हणुनि तो उडे सहसा 

जाळी लंकेसि; म्हणे ‘रे! राक्षस हो! रडा, मला न हसा.

मारुतीरायाच्या एवढ्या मोठ्या पराक्रमाच्या पुढे, ‘राक्षसांनो रडा, मला हसू नका’  ही काव्यपंक्ती आणि त्यातला उडे सहसा न हसा हा अनुप्रास   केविलवाणा वाटतो. त्याच प्रमाणे (१८८/१७)

त्या लंघुनि जलधीतें, गर्जोनि महेंद्रपर्वतीं उतरे

झाले जयापुढें ते राक्षस, सिंहापुढें जसे कुतरे

हेही भारदस्त काव्यापुढे किरकोळ वाटतं. 

मंत्रमयरामायण या  चोवीस आर्यांच्या रामायणात त्यांनी प्रत्येक आर्येत त्रयोदशाक्षरी मंत्र गुंफला आहे. तो ठळक अक्षरांतून दाखवला आहे. वानगीदाखल  आर्या(१९६/१ मंत्रमयरामायण) 

श्रीमान्  राजशिरोणि दशरथ, जो निजयशें बरा हित

द्विसेवक, ज्ञनिरत,  नभहर्ता धरानिकाहित 

मंत्रगर्भरामायणात साकी वृत्त योजल्याने  टिचकीचा ताल धरून गुणगुणता येईल अशी गेयता आली आहे. साकी हा मूळ साक्षी किंवा साक्षीभावातून आलेला शब्द आहे.  मोरोपंतांच्या सर्वच रचना श्रीरामापुढे नतमस्तक होऊन केलेल्या आहेत. अलिप्तता हा साकीचा मूळ स्वभाव.

मोरोपंतांच्या  या साकीत – (२८ मात्रांच्या या वृत्तात) भक्तिभावाचे आणि भाषाप्रभुत्वाचे पडसाद उमटलेले दिसतात.(पान १९९) 

ही रचना धावती असल्याने चालीवर  म्हणत, ठेका धरत गेयतेला प्राधान्य देते. मोरोपंत कधी संस्कृतप्रचुर तर कधी घरगुती वापरातले शब्द योजत असल्याने, या गेयकाव्याला खुमारी येते.

मारीच आणि ताटका यांचा मुलगा सुबाहू. त्याचे  आणि ताटिकेचे मस्तक धडावेगळे करणारा श्रीराम.

या  प्रसंगात साकीतून वीररसाचं उपयोजन न करता, त्या क्षुद्र व्यक्ती आहेत, शेतातलं तण उपटावं अशा सहज उपटल्या जातात हे मनावर ठसेल अशी रचना करतात. मारिचालाही शंभर गावे म्हणजे शतयोजने उडवून टाकतात… ते कसे? बाणाच्या मागे असलेल्या पंखांच्या  झोताने! 

१९९/३

मथुनि ताटिका सुबाहुमस्तक बाण प्रेरुनि खुडवी

मारीचातें प्रभु शतगावें पुंखसमीरें उडवी|

या काव्यात अजिबात पाल्हाळ नाही.  इथे पुच्छचे बोली भाषेत पुंख झाले आहे. अर्थात हे विषयांतर झाले. भाषेच्या छटा, उच्चारांतील भेद हा एक रसाळ आणि कुतूहलाचा वेगळाच विषय आहे. 

या रामायणात दोन दोन ओळींत एकेक प्रसंग रंगवत नेला आहे.(१९९/५) 

यश करि भारी भवधनु भंगुनि, हर्षे सीता बाळा;

माळा घालुनि वरिती झाली रामा त्रिजगत्पाळा

या दोन ओळींत सीतास्वयंवराची मांडव-परतणी पार पडते. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंतांनी दोन ओळींत प्रजेच्या आनंदाचे वर्णन केले आहे. (२००/१२) 

रात्रिदिवस सद्गुण रामाचे वर्णिति हर्षें पौर

श्यामलमूर्ति परि यश प्रसवे हरहासाधिकगौर

हराच्या  म्हणजे शंकराच्या हास्याहूनही शुभ्र रंग असलेले यश रामाला लाभले आहे.

संस्कृत काव्यशास्त्रात  नवरसांचे रंग मानले गेले आहेत. यात हास्याचा रंग शुभ्र मानला आहे. कुठलाही विकार नसलेला, कसलीही छटा नसलेला निर्मळ रंग असतो तसा हास्याचा शुभ्र रंग! श्रीरामाचे यशही तसेच निष्कलंक, शुभ्र आहे ही कल्पना इथे केलेली आहे. (२००/४) रंगाचेच पुन्हा एकदा उपयोजन करून मोरोपंत दोन पात्रांमधील भेद  दर्शवतात. 

हो मन्नंदन नृप, वनवासी राम चतुर्दश वर्षें’

हे मागणं मागितल्यावर दशरथ कळकळीने विनवतो,

‘मजला वांचिव सांचिव सद्यश दयिते! मयि तेऽस्तु  दया

अगं पत्ने, माझ्यावर दया कर! 

‘ऐसें बहु विनवी, परि न वळे धवळेतरबुद्धि तया’

कारस्थान हे नेहमी काळे असते,  काळ्या रंगाने भयानकता दर्शविली जाते. मोरोपंत वरच्या धवल रंगाच्या  विरोधी रंग कैकेयीच्या या प्रसंगात उपयोजतात. 

धवळेतर बुद्धी म्हणजे धवल नसलेली बुद्धी – ती काळी बुद्धी! 

उत्तमोत्तम अलंकार, शब्दयोजना केल्यावर गोड खाऊन जसे मुळवणी धरते तसे सतत सुंदर काव्यपंक्तींचा ओघ बदलावा म्हणून की काय मोरोपंत अगदी सुमार उपमा गुंफतात. २०५/३

नळकपि सुमहान् सेतु रची त्या मार्गें प्रभु तो उतरे, 

पतिमथनें अरि सुगळा भ्याले, हरिला जैसे कुतरे 

सिंहासमोर कुत्रा ही क्षुद्रत्व दाखवून देणारी  मोरोपंतांची खास ठेवणीतली तुच्छतादर्शक उपमा आहे. 

उपमेचा एक कमालीचा कहर मोरोपंत करतात. चक्क वृत्तांमधल्या  मात्रा किंवा अक्षरगणांची उपमाच रावणाच्या दुष्टबुद्धीला देतात. 

२०५/४

प्रभु तारात्मज दूतमुखें त्या हित कथि,  ते खळ न  गणी;

त्यांत वक्रपण आधीं मध्यें अंतीं ही जसें म गणी

२०५/४ 

जसे म गणात सगळे गुरूच असतात तसे या रावणात सगळीकडे वाकुडेपण भरलेले आहे. या अशा उपमा समजून घेण्यातही परीक्षा पाहिल्यासारखे वाटते. 

२०५/७

रावणवध हा मोठा विजय मंत्रगर्भरामायणात रंगवताना मोरोपंत म्हणतात,

‘सप्ताहोरात्रें जन्य करुनि दशमुख तो खपवीला;

संपादुनि विजयश्री रामें दिधला तोख पवीला

तोख म्हणजे तोष, पवी- वज्र किंवा बाण.   बाणाला तोष दिला.

इथेही खपवीला ही ग्राम्य भाषा वापरली आहे आणि तोष चे तोख करून तोख पवीला असे यमक साधले आहे. 

रावणाचा वध झाल्याने बाणाला आनंद मिळाला हा अर्थ! रामाचे कार्य आपल्यामुळे साधले ही कृतकृत्यता त्या बाणाला लाभली. 

  रम्यमंत्ररामायण (२०७) हे 

शार्दूलविक्रीडितात रचले आहे. यातही अक्षरांमधून श्रीराम जयराम जयजय राम हा मंत्र रेखला आहे. रम्यमंत्ररामायण लिहिण्यामागची भूमिका काय होती? 

२०९/१३

छंदें सत्प्रिय बाळकांड लिहिला शार्दूळविक्रीडितें

श्रीमद्रामयशोलवें परयशें केली बहु व्रीडितें

२१०/४,५

रम्यमंत्ररामायण (चाल : आजीच्या जवळी) 

अयोध्या सोडून गेल्यावर श्रीरामाने जटा बांधल्या याचे वर्णन शार्दूलविक्रीडितात फार सुंदर केले आहे. 

श्रेयस्कामहिता प्रभूत्तम भजे देवापगेच्या तटा, 

तेथें सानुज वन्यवृत्ति वळवी दुग्धें वटाच्या जटा

या रामायणात त्यांनी आधी कुठेही न आलेल्या दशरथाच्या उत्तरक्रियेचे  वर्णन केले आहे. काही प्रसंग वगळून एकसुरी कथानक टाळावे हा त्यामागचा उद्देश असावा. 

२१०/७

तैलांतूनि शरीर काढुनि करी विध्युक्त तातक्रिया…असे वर्णन केले आहे. यामुळे मृतदेहाचा मागील जन्माचा संबंध लवकर सुटतो असे मानले जात असे. 

रम्यमंत्ररामायणात मोरोपंतांनी विराध राक्षसाचा उल्लेख करताना र चा अनुप्रास आणि  करी (हत्ती), हरी (घोडा) यांचे यमक रेखले आहे.

भूकन्येसि विराध राक्षस महारण्यांत जातां हरी,

त्यातें मारिति वीर दाशरथि ते जैसे करीतें हरी 

२१२/४

शूर्पणखेला विरूप केल्यावर… क्षणदचरेश्वर (शार्दूलविक्रीडितात बसवण्यासाठी क्षणदाचर केले आहे.)

‘मारीच्या शिकवी कुबुद्धि मरणा; स्वर्णैणतेच्या छळें

शार्दूलविक्रीडितात सुयोग्य शब्द बसवताना मोरोपंतांची संस्कृतावरची पकड वारंवार दिसून येते.

स्वर्णैणतेच्या छळे याचा अर्थ उमजायला वेळ लागतो…

स्वर्ण+एण

सुवर्ण हरणाच्या छळ – कपटाची बुद्धी!

२१३/६

सीताहरणाची कथा सर्वांना माहीत आहे पण ती शार्दूलविक्रीडित, री चा अनुप्रास, भयानक रस आणि करुणरसात गुंफल्यामुळे त्याचा गहिरा परिणाम होतो.

मारी राक्षस हाक ‘हा प्रियतमे! हा लक्ष्मणा!’ यापरी

सीता निंदुनि देवरासि दवडी, तों तीस वैरी हरी

दुष्टा भंगुनि सून सोडवुनियां सत्य प्रतिज्ञा करी

तो गृध्रेश जटायु कीर्ति गति ही युद्धीं वरी जी बरी

२१४/किष्किंधा कांडात  अवघड असे स्रग्धरा वृत्त योजले आहे.

(चाल : ध्याये नित्यं महेशम्) मारुतीला सीतेचा शोध लागतो या पडावावर किष्किंधा कांड संपतं. 

मारुती सीतेच्या ठिकाणाचं वर्णन करतो : (२१६/१३) 

सीता श्रीमत् प्रिया ती,  दिसति मज दिसे, गृध्रदृग्  दूर पाहे;

जातां लंकेशि मार्गीं कठिन नवति  दिग्योजनें सिंधु आहे 

ऐसें सांगोनि गेला उडुनि, पवनभू ऋक्षपें सिद्ध केला;

किष्किंधाकांड रामें लिहवुनि चवथा सर्व सिद्धीस नेला 

शिखरिणी वृत्तातून रौद्ररस उभा करत मारुतीचा पराक्रम वर्णिला आहे.

२१७/५

द्रुम ध्वंसी यत्नें  खचरपतिसंपादित बळें

वधी युद्धीं अक्षांश दशवदनपुत्रास हि पळें (क्षणात) 

धरूं दे ब्रह्मास्त्रेंकरुनि घननादा मग बळे, 

वदें भावी सर्व क्षय वदवितां दापुनि खळें

युद्धकांडात मात्र विरही रामाचं  विरही रूप पालटतं. जीवननाट्यातील श्रेष्ठ योद्ध्याच्या भूमिकेत शिरून  श्रीराम मारुतीरायाकडून शत्रूचा तपशील समजून घेतो :

२१९/१

पुसे त्या वीरा श्री रघुपति, कसें वर्त्म अरिचें, 

कसें सैन्य, स्थान प्रकृतिमत साहित्य वरिचें? 

प्रजेचं मत काय (प्रकृतिमत) हेही विचारात घेतो. 

३/समुद्रातें त्रासी प्रभुवर महास्त्रें स्थळकरें

तदुक्तें सेतूतें करवि शत गावें नळकरें

सेतू बांधून त्यावरून ‘प्लवगबळ पाहे उतरले’

वर्त्म म्हणजे मार्ग. इथे खेळी या अर्थी. शत्रूची चाल कशी असेल हे समजून घेतो. विरहात बुडालेला राम ते शत्रूशी झुंजणारा राम असे सुखद परिवर्तन होते.

 रम्यमंत्ररामायणात  मोरोपंत रामायणाचा उद्देश लिहितात :

भावें वंदुनि रामचंद्रचरणीं म्यां ग्रंथ हा वाहिला… 

तसंच हे काव्य मनोभावे वाचलं जावं. 

उच्छिष्टें बदरें महामखपुरोडाशाधिकें लक्षिलीं;

ताराया शबरीस, साधु म्हणती, अत्यादरें भक्षिलीं.

श्रीरामायण सर्व साधुमतिस स्त्रीधीस माहेरसें

कीं हो प्राकृत संस्कृत प्रिय चि तें पाहोनि पाहे रसें

रामाचं नाव इतकं गाऊन झालं तरी त्यातली गोडी हवीहवीशी वाटत आहे…

म्हणूनच मोरोपंत प्रार्थना करतात :

नामातें प्रभुच्या मयूर विनवी,  “चित्ता भरीं या भरी, ‘श्रीरामायण’ गाइलें तऱ्हि पुन्हां गावें चि ऐसें करी

वृत्ताच्या चालीवर रामायण गुणगुणताना काव्याचा अर्थ हळुवारपणे उकलत जातो आणि त्यातूनच कथानकासह मोरोपंतांच्या भक्तीची, भाषाप्रभुत्वाची खोली जाणवत राहते.

क्रमशः

Author

Leave a Reply