बुद्धिवादाची शोकात्मता 

 बुद्धिवाद म्हणावे, की बुद्धिप्रामाण्यवाद हा प्रश्न आधी सोडवून घेऊ. माहीत नसलेल्या गोष्टीला कल्पना, विश्वास, श्रद्धा हे प्रमाण न मानता प्रत्यक्ष बौद्धिक अस्तित्व असेल तरच ती गोष्ट मान्य करणे, याला म्हणू बुद्धिप्रामाण्यवाद. हा प्रकार खरे-खोटे, सत्य-असत्य यांच्याशी प्रामुख्याने संबंधित आहे. पण, याच्याही पुढे जाऊन मानवी जगण्यात बुद्धी हाच फक्त एकमेव पाया असतो आणि माणसाचे एकूण जगणेच बुद्धीच्या क्षेत्रातच फक्त घडत असते अशी खातरी असणे याला बुद्धिवाद म्हणू. यात भावना, जाणिवा हे सगळे ‘बुद्धी’ या शब्दातच आले. माहीत असलेले आणि माहीत होऊ शकणारे ते सर्व बुद्धिवादात येते. हिच्याशी लग्न करू, की तिच्याशी, परदेशात जाऊ, की नको जाऊ, झालेल्या अपमानाचा वचपा कसा काढता येईल, हवे ते यश कसे मिळवता येईल वगैरे असंख्य निवडी, निर्णय, तसेच आठवणी, सुख-दुःखे सांभाळणे – हे सर्व बुद्धीचेच क्षेत्र असते. हे पाहता, बुद्धिवाद्यांतच दोन भाग पाहता येतात – एक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी आणि दुसरे म्हणजे बुद्धीपलीकडचे काही तत्त्व मानणारे – समजा श्रद्धाळू – समजा आस्तिक लोक. हे देवळात जातात, पूजा-अर्चा करतात पण त्यांच्याही कृती या बुद्धीवर आधारित, बुद्धीच्या क्षेत्रातच चालू असतात. बुद्धीपलीकडचे कोणतेही तत्त्व त्यांच्या जगण्यात नसते. हे पाहता, एकूणात सर्वच माणसांना बुद्धिवादी म्हणता येते. 

   बुद्धीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? तर, एक म्हणजे ती एकरेषीय पद्धतीने चालते आणि ती माणसाची स्मृती वा त्याची प्रभावयुक्तता याच्या मर्यादेत चालते. त्यामुळे, अर्थातच, सर्वांचे बुद्धीचे वापर वेगवेगळे असतात. अशा वापराबद्दल, सर्वांचीच, चूक-बरोबर वा नैतिक-अनैतिक अशा अनेक बाबतींत मतमतांतरे असतात. संघर्षही होतात. बुद्धीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विचार आणि त्या वैचारिकतेवर ताबा ठेवून असणारे ‘मी’  केंद्र. कधी कधी ताबा सुटणे, तथाकथित भावनेच्या भरात काही घडणे, अ‍ॅबनॉर्मल म्हटली जाणारी कृती घडणे – हे सर्व बुद्धीच्याच क्षेत्रातले असते. बुद्धीची विचारकृती आणि ताबाकेंद्र यांत एक सततचा कमीजास्त तीव्रतेचा ताण असणे भाग असते – काही अपवादात्मक खुशीच्या वा आनंदाच्या क्षणी ते ताण खूप कमी होत असले तरी.  या एकूण यंत्रणेला स्वतःचे सातत्य हवे असते, ते राहण्यासाठी सुरक्षितता हवी असते  आणि सततच्या ताणातून विश्रांती देणारी सुखाची बेटे हवी असतात. सातत्याच्या अटळ गरजेसाठी ही यंत्रणा, एखादी अस्मिता वा विचारसरणी वा ध्येय यांच्याशी समरूपता मानते. तिच्यासाठी मरणे वा मारणे हे गौरवास्पद मानू लागते आणि जगण्याची ही पद्धत एकूण मानवालाच मान्य असल्याने यात ‘मानवी हक्क’, ‘माणुसकी’ वगैरे उदात्तपणे बोलले जात असले तरी ते बोलणारेही याच यंत्रणेचे सभासद असतात. या सातत्याच्या गरजेतूनच अनेक प्रकारची दांभिकता जन्म घेत असते. दया, कळवळा, अहिंसेची पूजा आणि सेवेची आतुरता ही सर्व माणसानेच शोधलेली एक मलमपट्टी असते; पण यातली मूळ मानसिक यंत्रणा सर्वांना मान्य असते आणि अटळ वाटत असते, हे इथे लक्षात घ्यायला हवे. या सर्वमान्य यंत्रणेमुळे अनेकदा देश, धर्म, विचारसरणी, जातीजमाती वगैरेंत संघर्ष उद्भवतात, हिंसा, क्रौर्य यांचे राज्य पसरते, तेव्हा अनेक हुशार लोक कुणी काय करायला हवे, सरकारने काय करायला हवे, आपल्या वा इतर देशांनी काय करायला हवे याच्या हिरिरीने चर्चा करत राहतात. मतमतांतरांचा खूप कल्ला होत राहतो;  पण, एकूणात या सगळ्याची मूळ यंत्रणाच सर्वांना मान्य असल्याने त्या सर्व सद्भावना वांझ ठरतात. 

   इथे, अंधश्रद्धा, जादूटोणा वा काळी जादू हा विषय पाहायला हवा. अगदी प्राथमिक स्तरावर, जिथे नुसती गुणवत्ता काम करत नाही तिथे ओळख वा पैसा यांचा उपयोग केला जातो. कॉलेज प्रवेश, नोकरी, सरकारी काम अशा बाबतीत हे बऱ्याचदा घडते. ‘नुसत्या बौद्धिक कुवतीवर नसते आयुष्य,’ अशी तात्त्विक डूबही द्यायला माणसे तयार असतात. अमुक एक गोष्ट घडण्यासाठी वा साध्य होण्यासाठी कुणाला खूश केले पाहिजे हे माहीत असण्याचे हे प्रकार असतात. पण लग्न होणे, कोर्ट केसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागणे, दुर्धर आजारातून बरे होणे – अशा टप्प्याटप्प्याने या गोष्टी अवघड होत जातात. अमुक ठिकाणी जिंकणे, तमुक अपमानाचा बदला घेणे हे बऱ्याचदा हाताबाहेर असते. आपल्या कृती व निर्णय यांनी ते घडेलच असे सांगता येत नाही. इथे जे. कृष्णमूर्तींचे एक वाक्य लक्षात घ्यावे असे आहे – ते म्हणत, की काय घडते आहे वा घडावे यासाठी कणभरही माझी इच्छा काम करत नाही. हे असे जगणे सामान्यतः कुणाचेच नसल्याने भविष्यावर ताबा आणण्याचे विविध मार्ग शोधले जातात. त्यातच हे जादूटोणा वगैरे येते. आपल्या कुवतीबाहेरच्या काही शक्ती असून त्यांच्याकरवी आपल्याला हव्या त्या घटना घडवता येतात असे माणूस मानतो. असे काही न मानता हात चोळत बसून राहणे, गंभीर प्रश्न असताना काहीच न करणे हे त्याला चुकीचे वाटते. नवस बोलणे, अमुक अंगारा आणणे इथपासून ते काहीही करायला तो तयार असतो. माणसाला त्याच्या जगण्यावर ताबा हवा असण्याची यंत्रणा अबाधित ठेवण्यासाठी हे सगळे चालते. हे पाहता सारांश असा निघतो, की युद्धे, अघोरी उपाय, हिंसा, क्रौर्य हे सर्व असे ना तसे सर्वांना मान्य असते. आपले हितसंबंध कुठे कसे गुंतले आहेत हे पाहून यात भूमिका घेतल्या जातात. असो! 

या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे, की बुद्धीचा म्हणजे विचाराचा वापर हा ( ताबा यंत्रणेमुळे ) सतत ताण देणारा आणि क्वचित काही विसाव्याचे क्षण सोडता सतत चालू असणारा एक आत्मछळाचा अटळ असा जगण्याचा भाग आहे. पूर्ण बुद्धिवादी नसलेले, भक्ती करणारे, पूजा करणारे कधी कधी बुद्धीचा हा आग्रह सोडत असल्याने जरा अधिक बरे जगत असतील; पण निव्वळ बुद्धिवादी, नास्तिक आणि यांतले शूरवीर लोक या ताणांना अधिक बळी पडत असतील. अघोरी उपाय करणे जसे वाईट तसाच हा आत्मछळही वाईटच म्हणायला हवा. सारांश, बुद्धिवादी म्हणजे शहाणा असे काहीही नसून तोही एकूण यंत्रणाच राबवत असतो हे लक्षात घ्यायला हवे. इथे जमल्यास, ‘मग काय’ हा प्रश्न विचारून काही शोध घेता येतो का ते पाहावे किंवा बुद्धिवादाची ही एकूण शोकात्मता स्वीकारून जमेल तसे जगत राहावे. 

या ना त्या प्रकारे काही लेखक, कलावंतांना हे सगळे जाणवत असते. त्यातूनच मृषा नाट्य (अ‍ॅबसर्ड थिएटर )  जन्माला आलेले आहे असे मला वाटते. 

— ००० —

Author

Leave a Reply