संपादकीय : मराठी व्याकरणाचा इतिहास समजावून घेताना…

ख्यातनाम संस्कृतज्ञ आणि मराठी व्याकरणाचे अभ्यासक प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर हे स. प. महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ येथे कार्यरत होते. अर्जुनवाडकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने त्यांच्या एका ऐतिहासिक पुस्तकाबद्दल…  संपादक 

   ‘या समाज माध्यमांचे व त्यांच्या अतिवापराचे करायचे काय?’ या प्रश्नाने हळूहळू विक्राळ स्वरूप धारण केले आहे यात काही शंका नाही; परंतु या समाजमाध्यमांचा चांगला वापरही होऊ शकतो याचा एक सुखद प्रत्यय मला नुकताच आला.  एका व्हॉट्सॲप-समुदायावर एका जुन्या व वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. समाजमाध्यमांचा वापर करून ते पुस्तक मिळवले. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर लिखित ‘मराठी व्याकरणाचा इतिहास’ हे ते पुस्तक. पुस्तक कसे लिहावे त्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे हे पुस्तक. वाचायला सुरुवात केली आहे. विषय व त्यातील ज्ञानाचा खजिना लक्षात घेता पुस्तक काही लवकर वाचून होईल असे वाटत नाही; तरीही पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही पानांतली माहिती इतरांना सांगावी असे वाटते आहे म्हणून लिहीत आहे. पुस्तक मुंबई विश्वविद्यालय मराठी विभाग आणि ज्ञानमुद्रा पुणे या दोन्ही संस्थांनी मिळून १९९२ साली प्रसिद्ध केले आहे. उत्तम संस्करण आणि साधारण संस्करण असे या पुस्तकाचे दोन प्रकार  उपलब्ध आहेत. हार्ड बाउंड आणि सॉफ्ट बाउंड यासाठी हे वेधक प्रतिशब्द.  

पहिले पान : वरती पुस्तकाचे नाव आणि खाली हा मजकूर : 

अनध्यवसितावगाहनमनल्पधीवृत्तिना- प्यदृष्टपरमार्थतत्त्वमधिकाभियोगैरपि । 

मतं मम जगत्यलब्धसदृशप्रतिग्राहकं प्रयास्यति पयोनिधेः पय इव स्वदेहे जराम् ।।

धर्मकीर्ती (ख्रि. ६२५)

कुशाग्रबुद्धींनाही ज्याचा थांग लागत नाही आणि प्रकांड पंडितांनाही ज्यातला तत्त्वविचार आकळत नाही असं माझं चिंतन, 

ते ग्रहण करण्याची क्षमता असलेला वाचक न लाभल्यामुळं सागराच्या जळाप्रमाणं स्वतःच्याच ठायी विरून जाणार आहे.

 अर्जुनवाडकर सरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच असे थोडेसे निराशाजनक वाटावे असे का लिहिले असावे असा प्रश्न मनात आला आणि मुखपृष्ठाची व मलपृष्ठाची आतली पट्टी  आणि मलपृष्ठ यांवर असलेल्या मजकुराकडे लक्ष गेले.

“शाखांचा इतिहास पाहिल्यावर असं प्रत्ययाला येतं, की जेव्हा एखादा विषय एखाद्या जिज्ञासू माणसाला झपाटतो तेव्हा तो माणूस त्या विषयाचा पिच्छा पुरवून, त्याचं स्वरूप समजून घेऊन तर्कशुद्ध रितीनं सप्रमाण मांडण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेतून शाखांचा जन्म आणि विकास होतो. मराठी व्याकरणाची परंपरा या प्रक्रियेतून निर्माण झाली नाही. ज्यांनी मराठी व्याकरणावर ग्रंथ लिहायला घेतले त्यांच्या पुढं अन्य भाषांच्या व्याकरणांचे तयार साचे होते. त्यांत किरकोळ बदल करून त्यांनी मराठी भाषा बसवली इतकंच. त्यामुळं, विषयाचं शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी जे विचारमंथन व्हावं लागतं ते घडलंच नाही. मराठी व्याकरण जन्माला आलं ते या अनुकरणात दडलेली पोलिओची बीजं बरोबर घेऊनच आलं. त्यामुळं १८५ वर्षांचं वय झाल्यावरही ते अजून खुरडतच चालत आहे.” (मुखपृष्ठ आतली पट्टी )

मराठी व्याकरणाच्या सात-आठ शतकांच्या जीवनपटात जुन्यातला जुना ग्रंथ (‘पंचवार्तिक’) १३-१४-व्या शतकातला असला, तरी ज्यापासून मराठी व्याकरणाची परंपरा सुरू झाली म्हणता येईल असा पहिला ग्रंथ १८०५ – मधला विल्यम केरीचा, ‘A Grammar of the Mahratta Language’ हाच ठरेल. या दृष्टीनं मराठी व्याकरणाचा इतिहास चालू घडीला १८०५ ते १९९० असा १८५ वर्षांचा म्हणावा लागेल. म्हणजे, हा इतिहास दोन शतकांहूनही कमी काळाचा आहे. हा काळ व्यक्तीच्या दृष्टीनं मोठा असला तरी शाखविचाराच्या विकासाच्या दृष्टीनं छोटाच आहे. पाणिनीय व्याकरणाची परंपरा २५ शतकांहून अधिक वयाची आहे हे लक्षात घेतल्यावर तर मराठी व्याकरणविचार अजून शैशवावस्थेतच आहे असं म्हणावं लागेल; आणि त्यावरच्या ग्रंथांचा मर्यादित आवाका पाहिल्यावर ही गोष्ट पटण्यात अडचण येणार नाही. 

(मलपृष्ठ आतली पट्टी)

  इतिहास म्हणजे नियुक्त विषयातल्या घटनांचा कालक्रमानं परिचय आणि त्यांच्या कारणांची, परिणामांची मीमांसा. मराठी व्याकरणाचा इतिहास हा मराठी भाषेच्या व्याकरणावरचे ग्रंथ आणि त्यांचे कर्ते, त्यांचे प्रभावस्रोत आणि प्रभावक्षेत्र या सूत्रांच्या अनुरोधानं होणार ही गोष्ट उघड आहे. ही सूत्रं दृष्टीपुढं ठेवून प्रस्तुत ग्रंथात महानुभाव भीष्माचार्यांपासून प्राध्यापक माधवाचार्यांपर्यंत (अलीबागचे प्रा. माधव ना. आचार्य) सुमारे सात-आठ शतकांतले ग्रंथकार त्यांच्या ग्रंथांच्या संदर्भात परामर्शिले आहेत, म्हणजे त्यांच्या ग्रंथांचा परिचय करून देऊन व्याकरणविचाराच्या दृष्टिकोणातून, महत्त्वानुसार कमी-अधिक विस्तारानं त्यांचं मूल्यमापन केलं आहे.(मलपृष्ठ)

आता प्रस्तावनेत अर्जुनवाडकर सरांनी इतिहासाचार्य राजवाडे यांना उद्धृत केले आहे. संदर्भ आहे अर्जुनवाडकर सरांनीच  लिहिलेला ‘मराठी व्याकरण वाद आणि प्रवाद’  हा ग्रंथ. 

राजवाडे म्हणतात तसा प्रस्तुत ग्रंथ हा ‘शालेय’ किंवा ‘द्रव्यार्थी’ नाही; तर शास्त्रीय आहे. ‘तडजोड नावाच्या प्राण्याला शास्त्राच्या आसपासही फिरकू देण्याचं कारण नाही.’  ही भूमिका अतिरेकी असेल तर हे सांगणं भाग आहे, की शास्त्र हे अतिरेकीच  असतं आणि हा त्याचा गुण होय.’

हे सर्व वाचले आणि खरे सांगायचे झाले तर अंगावर काटा आला. आपण मराठी भाषेच्या व्याकरणाच्या इतिहासाचा कधी विचारच  केलेला नाही हे लक्षात आले. आता थोडेसे पुस्तकाच्या रचनेविषयी. त्यासाठी ‘तंत्रवार्तिक’ हे ग्रंथाच्या मांडणीचे  तंत्र व त्याचे स्वरूप वाचकांना समजावून सांगणारे छोटेसे टिपण पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे. त्यातला वेधक भाग असा : ‘प्रत्येक सम पृष्ठावर तळातल्या ओळीत लहान ठशांत प्रस्तुत ग्रंथाचं नाव (‘मराठी व्याकरणाचा इतिहास’) आणि त्यापुढं पृष्ठांक येतो. विषम पृष्ठावर अध्यायाचा क्रमांक, विषय, चालू पानावरचा ग्रंथ/ग्रंथकार/विषयांश आणि त्यापुढं पृष्ठांक. दोन्ही पृष्ठांच्या बाहेरच्या बाजूंना पाचांच्या पटींत ओळींचे क्रमांक दिले आहेत; त्यांच्या आधारानं विषयसूचीतले पत्ते ओळींच्या क्रमांकांपर्यंत दिले आहेत. यामुळं सूचीवरून ग्रंथांतले संदर्भ काही क्षणांत सापडतात; कारण जास्तीत जास्त ३ ओळी मोजाव्या लागतात. (उदा. १८ म्हणजे १५ + ३; २९ म्हणजे ३०- १.) ही संदर्भ देण्याची पद्धत मी संपादिलेल्या, मोरो केशव दामल्यांच्या, ‘शास्त्रीय मराठी व्याकरणा’त (१९७१) प्रथम मीच उपयोगात आणली असून अभ्यासकाचा वेळ आणि श्रम वाचवणारी आहे. ती भारतात/विदेशांत प्रकाशित झालेल्या ग्रंथांत माझ्या पूर्वी अन्य कोणी उपयोगात आणली असल्याचं माझ्या पाहण्यात नाही. सूचीशास्त्रज्ञांनी यावर अधिक प्रकाश पाडल्यास मी त्यांचा आभारी होईन.” 

अशा पद्धतीने पृष्ठांच्या बाहेरच्या बाजूंना क्रमांक दिलेले पुस्तक मी तरी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. 

सरतेशेवटी पुस्तकाची अर्पण पत्रिका. तीसुद्धा अतिशय हृद्य  आहे. 

अण्णा !

तुम्ही मला आपल्या स्वावलंबी, व्यासंगी विद्वत्तेचा वारस नेमलं. तुमचा हा अमोल वारसा अनेक यातना आणि विलोभनं यांच्याशी झुंजत मी यथाशक्ती जतन केला, वाढवला आणि नव्या पिढीत रुजलेलाही पाहिला.

त्याचा हा परिणत आविष्कार तुमच्या प्रेरक स्मृतीला अर्पण करण्यात मला धन्यता वाटते.

तुमच्या तृप्त, निराकांक्ष, अंतर्मुख, स्थिरबुद्धी वार्धक्याचाही वारसा मला मिळेल का ?

किसन

व्यासंगाचे किती लोभस संक्रमण आहे हे ! 

Author

Leave a Reply