मुखपृष्ठ जुलै २०२६ :

मी छायाचित्रे घडवतो.

शहरात राहतो खरा मी, पण जंगलातून फिरण्याची सदैव ओढ लागलेली असते. स्वच्छ हवा, मनमोहक निसर्गदर्शन, वैविध्यपूर्ण प्राणिपक्षिदर्शन या साऱ्यांमुळे मन कसे प्रसन्न, आनंदी होते.

फोटोग्राफीची आवड आणि काहीसे कौशल्य आहे आणि अत्याधुनिक चांगले कॅमेरे माझ्याकडे आहेत, त्यामुळे मग छायाचित्रे घडवतो. माझ्या गुरूने मला अनेकदा सांगितले आहे, “फोटो काढायचे नाहीत, घडवायचे!” त्या सूचनेनुसार मी फोटो घडवत असतो.

काय आहे ना, आजकाल कोणत्याही प्राण्याचे, निसर्ग देखाव्यांचे फोटो तुम्हांला हवे असतील तर गूगल करून घरबसल्या ते असंख्य मिळवता येतात. मग फोटो काढायचे कशासाठी? म्हणून ते घडवायचे! म्हणजे नेमके काय करायचे? तर तुम्ही जे काही प्रत्यक्ष पाहता, त्याचे जमेल तेवढे तंतोतंत छायाचित्र काढले, की ते छायाचित्र नंतर पाहताना पुनःप्रत्यय यावा. ते काढताना नेमके काय घडले, तिथले वातावरण कसे होते, सोबत कोण होते आणि कुणी काय म्हटले या सर्वांची एक गोष्ट तयार व्हावी आणि ते छायाचित्र पाहणाऱ्या कुणाही व्यक्तीला अशीच काही गोष्ट त्यातून दिसावी किंवा सुचावी. म्हणूनच कदाचित म्हटले आहे, “एक छायाचित्र एक हजार शब्दांचे असते.”

आता या माझ्या छायाचित्रात ती उत्तराखंडमधील कॉर्बेट नॅशनल पार्कमधली हिंवाळ्यातली धुक्याची सकाळ, सूर्याची कोवळी किरणे उंच घनदाट झाडांमधून वाटेवर नक्षी बनवत होती, पर्णसंभार धुक्याने नाहून पुसटसा दिसत होता, मी आणि सोबतचे सखे गरम कपडे घालूनदेखील उघड्या जीपमध्ये कुडकुडत बसलो होतो, वाघाची कुठे चाहूल घेत होतो आणि त्यात समोर हे निसर्गचित्र पाहता कर्णपिशाच्च ‘ही वाट दूर जाते…’ किंवा ‘इस मोड से जाते है’ गाणे गुणगुणत होते, – या सगळ्या मनमोहक अनुभवाचा पुनःप्रत्यय मला होतो. तुम्हांला अशी काही कहाणी पुसटशी मनात आली, तरच तुम्ही अशा छायाचित्राशी थोडे थबकाल, नाही का?

मिलिंद केळकर, पुणे.

Author

Leave a Reply