चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

मराठी काव्याच्या इतिहासामध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पाहायला मिळते. ती परंपरा आहे द्रौपदीच्या धाव्यांची. वस्त्रहरणप्रसंगी द्रौपदी श्रीकृष्णाचा धावा करते आणि तो तिच्या मदतीकरिता अवतरतो, हे साधारण कथानक. जेव्हा दुःशासन द्रौपदीच्या साडीस हात घालतो, तिथपासून हे कथानक  एक वेगळे वळण घेते. इथे मराठी कवी मुख्य कथानक जरा बाजूला ठेवून, कृष्णाने द्रौपदीस पुरवलेल्या साड्यांचे वर्णन करू लागतात. यामध्ये साड्यांची नावं, प्रकार, त्यांच्या पेठा, रंग असे सगळे तपशील त्या काव्यामध्ये येऊ लागतात. हे मराठी काव्यपरंपरेचे एक वैशिष्ट्य आहे, हे माझ्या लक्षात आले. मी या परंपरेचा शोध घेतला असता, चौदाव्या शतकातील नामा पाठक या कवीपर्यंत पोहोचू शकलो.

द्रौपदी वस्त्रहरणाच्या या काव्य परंपरेला मानवंदना देण्यासाठीचे एक चित्र काढायचे होते. त्यासाठी कवी नामा पाठक यांचे हे काव्य केंद्रस्थानी असावे असे ठरवले. त्यासाठी मराठी चित्रमय पोथ्यांमधले एक पान, असे या चित्राचे स्वरूप असावे, असे वाटले. या चित्रात नामा पाठकांच्या काव्याचा वस्त्रवर्णन करणारा भाग तेवढा घेतला आहे. चित्राच्या वरच्या उजव्या भागात श्रीकृष्ण दाखवला आहे आणि खालच्या डाव्या भागात द्रौपदी दाखवली आहे. बाकी पूर्ण भागात काव्य दिसते. चित्रमय पोथ्यांमध्ये विविध प्रकारे अशी चित्रे काढलेली दिसून येतात. पोथीच्या विषयानुसार ही चित्रे असतात, तसेच काही ठरावीक देवतांची व ठरावीक पारंपरिक चित्रेही काढलेली असतात. जसे : दशावतार, गणपती, कृष्णलीला, समुद्रमंथन, विभूतियोग, विश्वरूप इ.

मराठा काळखंडात अशा चित्रमय पोथ्या बऱ्याच प्रमाणात रेखल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात या पोथ्या खाजगीसंग्रहांशिवाय महानुभाव मठ, रामदासी मठ, नाथसंप्रदायांचे मठ, जैन मठ यांतून संग्रहित झाले आहेत. त्या काळी पेशवे आणि सरदार यांचे स्वतःचे ग्रंथसंग्रह असत. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या सूनबाई, सगुणाबाई जनार्दन पेशवे यांना लिहिता-वाचता येत असे. त्यांनी बरेच ग्रंथ करवून घेतले होते, अशी माहिती मिळते. नाना फडणवीसांना चित्रे व पोथ्या जमा करण्याचा खासा शौक होता. राजस्थानात प्रतापसिंह राजाने भागवताची सचित्र प्रत त्याच्या पदरी असलेल्या चित्रकाराकडून करवून घेतली होती. या हस्तलिखित ग्रंथाची ख्याती ऐकून नाना फडणवीसास हा ग्रंथ आपल्या संग्रही असावा असे वाटले. त्यासाठी त्याने खूप खटाटोप केला व तो मिळवलाच.

या चित्रमय पोथ्या धार्मिक व धार्मिकेतर अशा दोन्ही विषयांवर आढळतात. यात गीता, सप्तशती यांसारखे संस्कृत ग्रंथ असायचे किंवा शिवलीलामृत, पांडवप्रताप, भक्तविजय, हरिविजय, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी, दासबोध असे मराठी ग्रंथही असायचे. धार्मिकेतर ग्रंथांमध्ये ज्योतिषांचे ग्रंथ, योगशास्त्राविषयीचे ग्रंथ, कामविषयक चित्रांच्या पोथ्या यांचा समावेश असायचा. विदर्भातील कारंजा लाड इथे मराठा काळाच्या सुरुवातीपासूनच सचित्र ग्रंथ निर्मिती सुरू झाल्याचे दिसून येते. यातील चित्रांवर राजस्थानी-मुघल, दख्खनी चित्रांचा प्रभाव दिसून येतो.

रसमंजरी हा १६व्या शतकातील भानुदत्ताचा प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ. हा नायक-नायिका यांचे प्रकार सांगणारा एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यग्रंथ आहे. यात नायक-नायिका यांचे स्वभावानुसार व वर्तनानुसार होणारे प्रकार रंजकपणे सांगितले आहेत. रसमंजरी ही एक रसराज श्रुंगाराला प्राधान्य देणारी कलाकृती आहे. यातील नायक-नायिका यांचे नाजूक; पण प्रत्ययकारी वर्णन व श्रुंगार यांमुळे विविध चित्रपरंपरांतील कलाकारांना यावर आधारित चित्रे काढायचा मोह होत आला आहे. राजस्थानी, पंजाबमधील काही शैली, पहाडीमधील बाशोली शैली यांमध्ये रसमंजरीवर आधारित चित्रे काढली गेली आहेत. दिल्ली येथील प्रसिद्ध राष्ट्रीय संग्रहालयामध्ये रसमंजरीची एक वैशिष्ट्यपूर्ण हस्तलिखित चित्रमय पोथी संग्रहित आहे. यातील चित्रे मराठा शैलीमध्ये काढली गेली आहेत. पूर्ण पोथीमध्ये ११७ चित्रं आहेत. ही प्रत ५”x११” अशी आडव्या आकाराची आहे.

या पोथीमधील चित्रे पाहत असता आधी लक्षात येणारी गोष्ट म्हणजे, ही शैली आपल्याला नित्य परिचित असणाऱ्या मराठा शैलीपेक्षा वेगळी आहे. यातील मनुष्याकृतींची ठेवण काहीशी राजस्थानी शैलीमधल्यासारखी वाटते. यातील वास्तुदर्शन व वनस्पतिदर्शन दख्खनी आणि माळव्यातल्या शैलींच्या जवळ जाणारे वाटते. विदर्भातील सुरुवातीची जी मराठा चित्रे दिसून येतात, ती अशा मिश्र प्रभावातूनच झालेली दिसून येतात. त्यामुळे रसमंजरीतली ही चित्रे नागपूर भागातलीच असावीत असे वाटते. या हस्तलिखितातील कोलोफन (त्या प्रतीची पूर्ण माहिती असणारे पान) मध्ये ही प्रत बनल्याचे नेमके ठिकाण दिलेले नाही. या कोलोफनमध्ये ही पोथी कुणी नकलली, कुणासाठी नकलली, पोथी बनल्याचे साल, स्थळ अशी सगळी माहिती दिलेली असते. चित्रमय पोथ्यांमध्ये लिहिणारा आणि चित्र काढणारा अशा दोन वेगळ्या व्यक्ती असतात. संग्रहालयातील तज्ज्ञांनी ही प्रत पुणे-सातारा भागात बनली असण्याची शक्यता सांगितली आहे. यातील शैलीचे वेगवेगळ्या अंगांनी अवलोकन करता ही शक्यता कमी वाटते. रसमंजरीच्या या प्रतीतील चित्रे पाहता, यातील लुगडे नेसण्याची पद्धत, म्हणजेच नऊवारी पद्धतीने नेसलेले लुगडे आणि पगडी हीच मराठा चित्रांची ओळख वाटू शकते. मराठा सत्तेच्या अनेक ठिकाणी झालेल्या प्रसारामुळे मराठा चित्रशैलीमध्ये अशी मिश्रप्रभाव असणारी अभिव्यक्ती घडत गेली. एखादी शैली घडताना त्यावर निरनिराळे प्रभाव कसे पडत जातात याचा अभ्यास करण्यासाठी ही चित्रे महत्त्वाची ठरू शकतात.

रसमंजरीच्या चित्रांतील साड्यांमध्ये पिवळ्या आणि जांभळ्या रंगांचा बराच वापर दिसून येतो. महाराष्ट्रातल्या स्त्रियांची वस्त्रांतील रंगााची निवड योग्यपणे यातून दाखवण्यात आली आहे; तरी, या चित्रणात महाराष्ट्रातील साड्यांचे वाण काही ध्यानात घेतले गेले आहेत असे वाटत नाही. याशिवाय, नित्य उपयोगाच्या वस्तूंमधूनही महाराष्ट्राची ओळख पटत नाही. या चित्रांतून दिसून येणारा निसर्ग, फुलझाडं यांनी या चित्रांची आणि काव्याचीसुद्धा खुमारी वाढवली आहे. प्रतिभावंत चित्रकार निसर्गाचा वापर खुबीने करून घेतात. या पोथीमध्ये दाखवलेला अर्धनारीश्वर शंकर, आपल्या अर्धांगीला देण्यासाठी तिने नेसलेल्या साडीच्याच रंगाचेच फूल तोडत आहे, असे चित्रण आले आहे.

या चित्रकाराला ग्रंथाच्या विषयाची चांगली समज असल्याचे चित्रांवरून दिसून येते. चित्रमय पोथ्यांमध्ये पहिले पान हे इष्टदेवतेला समर्पित केलेले असते. रसमंजरी हा ग्रंथ नायक-नायिकांबद्दल असल्यामुळे इथे ही देवता अर्धनारीश्वर दाखवली गेली आहे. या अर्धनारीश्वरामधील शंकर त्याच्या अर्धांगीसाठी, म्हणजेच पार्वतीसाठी झाडाचे फूल तोडताना चित्रित केला आहे. यातून शक्तीचे – म्हणजेच स्त्रीचे महत्त्वही अधोरेखित होते. नागपूर भागातील चित्रमय पोथ्यांमधील आणखी एक महत्त्वाची निर्मिती म्हणजे ‘श्रीमद्भागवत.’ ही प्रत नागपूरातील सेंट्रल म्युझियम  येथे संग्रहित आहे. ही प्रत राजे रघूजी भोसले (१७५७-१८१६) यांच्या संग्रहातील आहे. नागपूर भागातील मराठा चित्रशैलीमधील ही एक श्रेष्ठ रचना आहे.

यातील पानेसुद्धा आयताकृती (आडव्या आकारातील) आहेत. या एकाच पोथीत रचनेचे अनेक प्रयोग पाहायला मिळतात. पानाच्या एका बाजूला मजकूर व एका बाजूला चित्रं किंवा एका पूर्ण पानावर चित्र अशा प्रकारची ढोबळ रचना या पोथीमध्ये दिसून येत नाही. एकाच पानावर मजकूर व चित्र अशा प्रकारे केलेल काम यात दिसून येते. हे साधताना बऱ्याच जटिल रचना साध्य केल्या गेल्या आहेत. रचना जटिल असूनही चित्रांच्या दर्जावर परिणाम झालेला नाही. या पोथीतील पानांच्या चौकटींमध्ये केलेल्या पाना-फुलांच्या नक्षीमधूनही या रचनांची समृद्धी दिसून येते.

या पोथीमध्ये सुवर्णाचा सढळ वापर दिसून येतो. चित्रकलेतही काटेकोरपणा दिसून येतो. विशेष राजाश्रयामध्ये हे काम झाल्याच्या या खुणा असाव्यात. या चित्रांच्या शैलीवर राजपूत-मुघल तसेच दख्खनी व काही दक्षिण भारतीय शैलींचे प्रभाव दिसून येतात. हे प्रभाव ठळक आणि तुकड्यांच्या स्वरूपात न दिसता, त्यात एकजिनसीपणा दिसून येतो. रंगनिवडीवर उत्तर भारतीय प्रभाव जास्त वाटतो. सजावटीबद्दलचे प्रेम, निसर्गाचे चित्रणातील स्थान, आकारांमध्ये सममितीचे महत्त्व, हे मुघलशैलीचे गुणविशेष तर आहेतच. व्यक्तींच्या चित्रणावर काहीसा रजपूत प्रभाव जाणवतो. यातील स्त्रिया नऊवारी साडीमध्ये दाखवल्या आहेत, तरी साड्या मात्र महाराष्ट्रातल्या वाटत नाहीत.

मराठा चित्रशैलीवरील अशा प्रकारचे प्रभाव उलगडत जात असता आपल्याला नागपूर उपशैली व पुणे उपशैली अशी ढोबळ विभागणी लक्षात येत जाते. चित्रकारांची स्वतःची शैली व आश्रयदात्यांच्या सूचना यांचाही एकत्रित परिणाम विशिष्ट शैली घडत जाण्यावर  होत असतो. याही बाबींमुळे असणारे मराठा शैलीतले वैविध्य आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक शैलीची काही लक्षणे असतात, ज्यायोगे ती शैली ओळखली जाते. मराठा शैलीची ओळख पटवली जात असताना ‘नऊवार साडी नेसलेल्या स्त्रिया’ ही एक ठळक खूण नेहमी सांगीतली जाते, मग ती नागपूर उपशैली असो, पुणे उपशैली असो, की आणखी काही. मराठी संस्कृतीची ही ओळख आपणां सगळ्यांसाठीच विशेष आहे.

Author

2 thoughts on “चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

  1. अतिशय अभ्यासपूर्ण आणि चित्रमय लेख! मराठी चित्रमय पोथ्यांची समृद्ध परंपरा, मराठा चित्रशैलीवरील राजस्थानी, मुघल व दख्खनी प्रभाव आणि त्यातून घडलेले वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वैविध्य अत्यंत सुंदर रीतीने उलगडले आहे. काव्य, वस्त्रसंस्कृती, इतिहास आणि चित्रकला यांचा असा सुरेख संगम वाचताना आपल्या कलावारशाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. पुढील भागाची उत्सुकता आहे.

  2. या पोथ्यांबद्दल ऐकून आहे. पण प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद.

    सुनंदा भोसेकर

Leave a Reply