काव्यातील कलाकुसरीवर मोरोपंतांचा विशेष भर होता. वेगवेगळ्या प्रसंगांतून याची चुणूक दिसते.
श्रीरामाला पाहताच शूर्पणखा त्याच्या प्रेमात पडते. त्याला म्हणते, “माझ्याशी लग्न कर!”
हे साधेसुधे वाक्य मोरोपंतांनी कसे रंगवले आहे :
२२/१९
रुचिराक्षी हेमंती, रघुनाथाला म्हणे, ‘मला वरणे’
आवरणे स्मरवैरी रक्षीं वीरा! भुजामलावरणें
(शंकरासारख्या वैराग्याला आवर घाल आणि भुजांच्या आवरणाने मला वेढून घे, मला कवेत घे.)
२२/२०
राम उत्तरतो,
तों सामयुक्त वाक्यें राम म्हणे, ‘मी असे सदार जनीं;
अस्त्रीक (पत्नी नसलेला) बंधु माजा; त्याला युग होतसे सदा रजनी!’
सदार जनीं आणि सदा रजनी अशी सांगड घालून तिची बोळवण रामाने लक्ष्मणाकडे केली आहे.
मी विवाहित (सदार – दारा म्हणजे पत्नी असलेला) आहे, माझ्या भावाला मात्र रात्र कशी जाईल असं वाटत राहतं. (तो अविवाहित आहे.) तू त्याला वर! वरणे, आवरणे, भुजामलावरणे हा ‘वर’वरचा वर्णवर्षाव वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.
मोरोपंतांचं साहित्य वाचत असताना मानवी आणि अमानवी – राक्षसी वृत्ती ठाशीव शब्दांच्या माध्यमातून जिवंत होतात.
शूर्पणखा म्हणते, (२३/२३)
चित्तज शराग्निदग्धा मीं सुविदग्धासि तूज जलदासी
आल्यें शरण शरण्या! रक्षावी स्वाधरामृतें दासी
चित्तात पेटलेल्या कामशरामुळे विदग्ध झालेली शूर्पणखा, लक्ष्मणाला विनवते, ‘तू ही आग विझवणारा ढग हो…’
खरंतर मोरोपंतांचा काळ सोवळा! त्या काळाच्या मानाने हे थेट आवाहन धार्ष्ट्याचं वाटतं. मोरोपंतांची एरवी सोवळी असणारी शब्दकळा प्रसंगी अशी धीट होताना दिसते पण ती पातळी सोडत नाही.
उपमादी अलंकारांमधून कथेतील भावभावनांचा प्रकर्ष करताना तत्कालीन वातावरणाचेही संदर्भ मोरोपंत उपयोजितात.
रावण सीतेचे अपहरण करतो त्या प्रसंगाचे वर्णन करताना ते म्हणतात; (२५/५७)
“जैसा यवन वधाया नेतो धेनूसि, हा तसाचि खल
ऐसें वदोनि रडती वनदेवी;
तों पडे वनीं चिखल”
देवस्वरूप गाईला कापण्यासाठी ओढत नेणारा कसाई अशी उपमा देताना त्यांना सीता आणि रावण — गरीब गाय आणि तिला ओढत नेणारा कसाई हे दृश्य समोर येतं.
रामायण काळात यवन, कसाई हे शब्द नव्हते. इथे सीतेच्या तोंडी हे उद्गार घालून कालविपर्यास केला आहे. उपमेच्या चपखल उपयोजनामुळे या दोषाकडे दुर्लक्ष केलेले योग्य वाटते.
रामायण प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटावं इतकं सुस्पष्ट चित्र आणि घडामोडी केवळ लेखणीच्या साहाय्याने मोरोपंत रंगवतात. यात मनुष्यस्वभाव, हालचाली, चेहर्यावरील भाव यांच्यासह आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचाही उल्लेख करायला ते विसरत नाहीत. त्या काळात शकुन अपशकुन यांचा मोठा पगडा समाजमनावर होता. शकुन अपशकुनांवरील विश्वास हा कथेचं वळण दर्शविण्यासाठी — संकेतदर्शक म्हणून मोरोपंत वापरतात.
राम लक्ष्मण जेव्हा मारिचाला मारून परत कुटीकडे येत असतात तेव्हा त्यांना अनेक अपशकुन होतात. २६/६९
मार्गीं होती अनेक अपशकुन/
हानीतें सुचविती निजदेहस्फुरण मृग शिवा शकुन||
इतस्ततः असणारी श्वापदे, शिवा म्हणजे कोल्ह्यांची कोल्हेकुई आणि पक्ष्यांची फडफड, आधीच कातर झालेल्या मनाला व्याकूळ करून जाते. सीता नसलेल्या उदासवाण्या कुटीराचं दर्शन रामलक्ष्मणासह वाचकांनाही व्याकूळ करतं. या वातावरणनिर्मितीमुळे वाचक पुढचे वर्णन धडधडत्या छातीने वाचतो. कथेतील रस कथानकाला उठाव देतो. सीतेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या रामाला जिकडे तिकडे सीतेचा भास होत असतो. मोरोपंतांच्या लेखणीतून हा विरहरस अलवारपणे पाझरतो.
३०/८
हा वायु विरहशिखिला दीप्त करुनि, मत्तनूसि पाचितसे|
(विरहरस भाजत आहे.)
सीतेचे रया गेलेले दागिने बघून रामाचे डोळे पाण्याने भरतात.
मोरोपंत म्हणतात, (३२/२८)
ती संस्कारां वांचुनि मळलीं होतीं म्हणुनियां काय
प्रक्षाळी नेत्रजळें दाराभरणें समस्त रघुराय
दागिने जणूकाही मळले होते म्हणून रामाने अश्रूंनी धुऊन काढले!
सीतेच्या विरहाने होणारी रामाची उलघाल अशा विविध उपमा उत्प्रेक्षांच्या माध्यमातून मोरोपंत जिवंत करतात.
सीताशोधासाठी मारुतीची धडपड साक्षात दिसावी अशी जिवंत होते. ४५/२७
तो हृदयीं श्रीमद्रघुनाथपदांतें नमूनि लंकेला
पाहे; लघुदेहातें घेउनि सर्वत्र बहुशोध केला
तेथुनि निराश होउनि, मारुति गेला अशोकवनिकेला
अशोकवनात लगेच सीता दिसली असे अर्थातच घडत नाही. ज्या स्थानी सीतेला ठेवलं आहे त्या अशोकवनाचं प्रफुल्लित करणारं वर्णन मोरोपंत करतात. तिथल्या झाडांचं, फुलांचं वैविध्य सांगतात.
कुरबक, मरुबक, वंजुल, तिलकामलक, प्रियाल, हिंताल माकंद, कुंद, तिंदुक, चंपक, चांपेय, केतकी, ताल, ४५/२९
वट, कुटज, लकुच (मारवा) पांढरा कुडा किंवा ‘इंद्रजव’ औषधी अशी वनस्पतींची मांदियाळी मोरोपंत दाखवतात. कुरबक म्हणजे सुंदर स्त्रीच्या स्पर्शाने फुलणारे झाड, वंजुल म्हणजे बांबू किंवा वेत. आमलक, (आवळा) तिलक (bleeding heart plant) प्रियाल (चारोळी वृक्ष) हिंताल म्हणजे खजुराच्या जातीतील एक झाड, माकंद – आंबा, कुंदतिंदुक (एबनी), चाफा, चांपेय (नागकेसर), केवडा, तालवृक्ष(ताड, माड, शिंदी, खजूर), वड, कुटज म्हणजे कुड्याचे औषधी झाड, लकुच, पाटल ( ट्रंपेट फूल… तुतारीच्या आकाराची फुले) फणस, अश्वत्थ वृक्ष, देवदार, पुंनाग म्हणजे पांढरं कमळ, नागचाफा किंवा जायफळाचे झाड, बकुळ, तमाल, औदुंबर, चंदन, लवंग, बेल हे कमी की काय म्हणून हेमशिंशप म्हणजे पिवळसर रंगाची मधुर सिताफळे असं हिरवीगार छटा ल्यालेलं वृक्षवल्लींचं वर्णन वाचताना प्रत्यक्ष पाहत आहोत असं वाटू लागतं. एखाद्या परिसराचं वर्णन रेखताना केलेला पूर्वाभ्यास थक्क करतो. कथानक फुलवण्यासाठी कथा कोणत्या पार्श्वभूमीवर घडत आहे, नाट्य कोठे घडत आहे याचा बारीकसारीक तपशील साहित्य प्रतलावरच्या नेपथ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ओघवत्या भाषेला वर्णनाची जोड लाभली, की कथेला उठाव येतो. त्यामुळे वर्णन पाल्हाळीक वाटले तरीही कंटाळवाणे होत नाही.
सीता अशोकवनात आहे हे सांगून झाल्यावर, ती नक्की कुठे आहे, कशी आहे त्याचेही वर्णन ओघाने येते.
मलिनांतरासुरींच्या मध्यें सीतेसि देखतां, कपिला
केवळ अनुचित भासें, जैसी कीं गर्दभगणीं कपिला
चित्तीं म्हणे मरुत्सुत तू राक्षसीसवे तुळशी;
अनुचित केवळ जालें मसणीं भांगेमधे जसी तुळशी|| ४५/३३||
मलीन मन असलेल्या राक्षशिणींमध्ये सीता बसली आहे. इथे ‘कपि’ला म्हणजे मारुतीला आणि गाईसारखी म्हणजे कपिला हा सहज शब्दखेळ दाद घेऊन जातो. गरीब गाईसारखी बावरून बसलेली सीता, राक्षसीसवे तुळशी? म्हणजे तुलना करतोस का? भांगेच्या रोपट्याबरोबर तुळशी असावी तसं भोवताली राक्षशिणी आणि मध्ये सीता असं दृश्य सामोरं येतं.
एकसुरीपणा येऊ नये म्हणून आधी निसर्गवर्णन, नंतर सीता आणि भोवतालच्या राक्षशिणी हे दृश्य वाचकांच्या मनावर बिंबल्यावर भयानक रसाचं सावट दाटून येतं. नाजूकशा सीतेला पाहून राक्षशिणींच्या तोंडाला पाणी सुटतं, तिला भाजून खावंसं वाटू लागतं.
४७/४८
त्या राक्षसी यमाच्या बहिणी जाल्या; ‘धरा, चिरा, भाजा, चावा, खा’ म्हणती तों कांपे
ते भूपसुनूची भाजा
भाजा (भाजणे) आणि भाजा (पत्नी) असे यमक भीतिदायक ठरते. पण हा रस क्षणभंगुर ठरतो. वाचकाला भयानक रसातून बाहेर काढत मोरोपंत वीररसात शिरतात.
५५/१४०
मारुतीचं शेपूट पेटवून दिल्यावर मारुतीचा पराक्रम शब्दांत मांडताना त्यांनी अवघड अशा द्व्यर्थी शब्दांचे उपयोजन केले आहे.
परिघें भुजदंडानें, निर्मुनि नक्तंचरप्रमथनातें
अनळें प्रदीप्त केली, लंका जैसें पुर प्रमथनाथें
नक्तंचर याचा एक अर्थ दिवाभीत म्हणजे राक्षस. प्रमथन म्हणजे नाश करणे. अर्थात राक्षसांना मारले.
नक्तंचरचा आणखी एक अर्थ गुग्गुळाचे झाड. त्यापासून राळ मिळते. हा ज्वालाग्राही पदार्थ. त्याच्या मदतीने त्याने प्रमथन सुरू केले. भयानक रस असूनही नक्तंचर या अवघड शब्दाचे द्व्यर्थ भाषापटुत्वाला दाद देऊन जातात. शब्दांवरची ही हुकमत
‘शब्दगंगेने बाहूत’ घेतल्याशिवाय अशक्य आहे.
युद्धाचा चित्रदर्शी वर्णनपट विविध भावनांचे, रसांचे कल्लोळ उभे करतो.
पान ५९/३१
वानरांचे वर्णन हुरूप, चैतन्य आणते.
पिवळें प्रवाळसंनिभ, किति धूनाभ, प्लवंग किति काळे
ते चलितधराधरसे पीन
प्लवगप्रवीर, बहुसंख्य;
ढगांसारखा गडगडाट करत गर्जना करतकरतात म्हणतात;
‘शीघ्र घडो रावणासवें संख्य
||३२||
परिघप्रतिम भुजांतें, ताडिति, हसती, किती कपी उडती;
धांवति कांपविती क्षिति, पाडिति तरु, पर्वतांवरी चढती.||६०/३३||
अवखळ असे हे कपिवर रामाप्रती लीन होते हे रंगवताना मोरोपंत म्हणतात, (६०/३७)
कपि तेथे आयकतां दशरथनृपसूनुच्या विलापाला
फळजळसेवन कैंचें?
एकानेंही न चाविला पाला!
रामाच्या विलापाला ऐकून कोणत्याही कपीने पालाही खाल्ला नाही. रामाच्या विरहवेदनेने तेही व्याकूळ झाले होते.
दुसऱ्या बाजूला राक्षस सेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. .
पान६१, ४७
रजनीचर म्हणतात, ‘राया,’ सलीलजितलेखा’
लेखा न धरी, त्यांचा, ते मर्त्य महानसींच सिजले खा
लेखा या शब्दाचे दामयमक करत महानसींच सिजले खा असे म्हटले आहे. हे कूट कसं सोडवायचं?
सलील – सहजतेने देवांना जिंकणारऱ्या… म्हणजे, अरे रावणा, या मर्कटांचा तू लेखा धरू नकोस! देवांना जिंकलेस… त्यापुढे ही माकडे ती काय!
ही माकडं महानसींच म्हणजे स्वयंपाक घरात शिजत पडलेल्यांसारखी आहेत… त्यांना सहज खाऊन टाकता येईल.
सलीलजितलेखा हे संस्कृत, लेखा हाही संस्कृत शब्द पुढे महानसींच हेही संस्कृत (स्वयंपाकघरात) सिजले खा ही मराठी रचना… अशी झटापट केलेली आहे. इथेही संस्कृत आणि मराठी यांचे जोडकाम केलेल्या कंथेची म्हणजे गोधडीची आठवण होते.
सिजले खा ही ओळ युद्धाचे पडघम वाजत असल्याची सूचना देतेच शिवाय युद्धाचा वाढता ज्वर, त्यातून निर्माण होणारे भयनाट्य याची वाचकालाही काव्यातून थेट कल्पना देते आणि पुढच्या घटनांची आतुरता, अस्वस्थता निर्माण होते.
कुंभकर्णाची वेगळीच भूमिका यात गोवली आहे. ६१/५०
ऐके निद्राप्रिय तो सचिवमुखें कुंभकर्ण हे वार्ता…आणि म्हणतो,
अनुचित हे राक्षस पति! केले, जे आणिलीस परमहिला
मंदोदरीस टाकुनि बापा भुललासि काय परम हिला|
कुंभकर्णाच्या एरवीच्या भूमिकेपेक्षा हे बोलणे एक आक्रीतच वाटते.
पान ६२/५८
बिभीषण मंद हसत राक्षसांना वानरांच्या ताकदीची कल्पना देतो.
ऐसेच वानराधिप अगणित एकापरीस एक बळी|
येतिल उघडायाला बहुकाळजिघत्सुमृत्युची कवळी||
फार दिवस भुकेजलेल्या मृत्युदेवतेच्या कवळीचे इथे रूपक मांडले आहे! ती ‘आ’ वासून तयार आहे. भयानक रसाचा हा शब्दबद्ध आविष्कार कथेला गहिरी करत जातो.
एकसुरीपणा टाळण्यासाठी अतिशय अवघड संधींचं वरचेवर उपयोजन केलेलं दिसतं. वाचक संधी सोडवण्यात गुंततो आणि क्षणभर भयावहता विसरतो.
क्षितिजाहरणकुपितहिमधरणीध्रतनुज (६४/७८)
अर्थ : पृथ्वीच्या लेकीचे – सीतेचे – हरण झाल्यामुळे क्रुद्ध झालेले हिमालयाचे पुत्र!
असा आणखी एक संधी
श्रीमद्भास्करकुलदुग्धसिंधुचंद्रातें (६४/७९)
(सूर्यवंशरूपी क्षीरसमुद्राला चंद्र, अशा रामाला)
बिभीषण रामाला शरण आला असता, वानर म्हणतात, या अमित्राला मारून टाका. तेव्हा बिभीषण रामाला वरील संबोधन योजतो.
हळूहळू अशी भली थोरली कोडी सोडवायची गोडी वाचकाला लागते.
असंच आणखी एक कोडं
सीताहरणदुरितशिखिकवळीतलंकाटवीपलाशगज(६४/८४)
सीतेचे हरण केल्याने पापाग्नी भडकला आणि त्याने वेढा घातला.
अशा अवघड आणि अवजड शब्दांच्या जंजाळातून मध्येच जड आणि सोप्या शब्दांची सांगडही येते. (६५/९०)
त्वद्रत्नतस्कराला केला मीं बोध फार आरडलो
अंधभसितबधिरीं तें दीप हवन गीत, कीं वनीं रडलों.
गाढवापुढे वाचली गीता या अर्थाने उपयोजिलेल्या या शब्दप्रयोगात त्वद्रत्नतस्करासारख्या जडजंबाळ शब्दाला आरडलो या किरकोळ शब्दाची जोड हास्यास्पद वाटते.
पान ७६/२१७ ते २२१
रामाचा वध झाला असे खोटेच सांगत उभारलेल्या नाट्यात मोरोपंत भयरंग भरतात.
बहु कीशक्षय केला रात्री जावूनियां प्रहस्तानें
लक्ष्मण पळोनि गेला, राम तुजा मारला स्वहस्तानें
रामाचे छाटलेले मस्तक सीतेपुढे धरत रावण म्हणतो, ७६/२२०
‘पहा पुढें तन्वि! सुभ्रु! मृगनयने!
नय नेणसि आतां, तरि नाशाला आपुलाचि अविनय ने.
न, य, ने या अक्षरांचे विविधार्थी उपयोजन क्षणभर गुंगवते. पुढे रावणाच्या तोंडून भयानक वाक्य येतं…
सीते! त्वत्पतिमस्तक हें, कार्मुक हें, पहा खरें लटकें
‘लटक’त असलेलं मस्तक मात्र ‘लटकं’ असतं. लटके या शब्दावरील श्लेषाचं उपयोजन चतुर वाचकांच्या लक्षात येतं आणि दिलासा देऊन जातं.
युद्धाची तयारी झाली हे अवघड शब्दांत छेकानुप्रास योजत सांगतात :
पान७८/२४६
युद्ध कराया रावण जालासे सज्ज सज्जनाराती
सज्ज = तयार
आराति = शत्रू
सज्जन +आराति =सज्जनांचे शत्रू
युद्धाचे पडघम वाजले, कपिंच्या गर्जना सुरू झाल्या.
रात्रि सुवेळीं राहुनि योजनयुगलोच्चशृंग आसादी (शिखर गाठले)
सादी (स्वार) अश्वी तैसे, चढले मारुतिसुकंठपनसादी
सुकंठ यांसह पनस नाव का जोडलं असावं? पनस म्हणजे फणस… पण इथे पनस नावाच्या बुद्धिमान माकडाचा उल्लेख आहे. सादीचं यमक जुळवण्यासाठी पनस +आदी असा संधी केला आहे. क्लिष्ट शब्दांचं अजीर्ण होऊ नये म्हणून वाचकांसाठी वेगळं शब्ददालन मोरोपंत उघडतात.
परखडपणा आणि बीभत्स रस अशी वैचित्र्यपूर्ण सांगड घालत लिहितात :
पान८३/२९६
स्वकुळाला अंजन जो लावी, तो पुत्र न प्रसूविष्ठा
स्वतःच्या कुळाला बट्टा लावणारा मातेच्या विष्ठेप्रमाणे आहे असे रावणाला सुनावतात.
कथेतील घटना यादीच्या स्वरूपात येत नाहीत. प्रसंगाचं वर्णन कधी रसपूर्ण, कधी अलंकारिक, कधी शाब्दिक कसरत करणारं असं वैविध्यपूर्ण असतं. अशीच एक शाब्दिक कसरत :
ष्ट सारख्या अवघड जोडाक्षराचा वृत्त्यनुप्रास, संधी, (८५/३२२)
वाचताना आपसूकच जोडाक्षरांवर जोर देऊन म्हटलं जातं
हा रजनीचर आचारभ्रष्ट दुष्ट पापिष्ठ
विष्टपकंटककष्टद शिष्टद्वेष्टा, धरा, करा पिष्ट.
विष्टप म्हणजे जग. जगाला टोचत राहून, सलत राहून त्रास देणारा, शिष्टांचा – – म्हणजे नम्र, सरळमार्गी जनांचा द्वेष करणारा त्याचं पीठ करून टाका.
८६/३३०
प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटते तेव्हा मोरोपंतांच्या लेखणीला आणखी धार येते.
वीररस, करुणरस असे एकामागोमाग एक लाटांसारखे उचंबळून येतात :
कपि गणांच्या युद्धाच्या आवेशाचे वर्णन करताना ते म्हणतात,
मारिति चपेट लत्ता, मुष्टि छेदूनि दंतनखरांही (८६/३३०)
राम मूर्च्छित झाला याचे वर्णन करताना ते म्हणतात,
‘पुष्पितपर्ण श्रीधर ते दोघे रक्तसिक्ततनु जाले;
आलेख्यचित्र तैसे निष्क्रिय होतां समस्त कपि आले.
करुण रस८७/३३९
एखाद्या चित्रासारखे ते स्तब्ध आडवे पडले होते. घनकश्मळ अशी निद्रावस्था किंवा मूर्च्छा आलेले रामलक्ष्मण बघून आनंदाने हुरळून गेलेला रावण त्रिजटेला म्हणतो, “सीतेला लगेच पुष्पक विमानात बसव आणि तिचा मृतपती दाखव, म्हणजे ती माझी पत्नी व्हायला राजी होईल.” (८८/३४६)
कथेतील ताण सर्वोच्च पातळीवर नेणारा हा प्रसंग!
रावण तो त्रिजटेला म्हणे,
तिला शीघ्र पुष्पकामाजी
घालुनि मृतपति दावीं, म्हणजे होईल कामना माजी
कथा, काव्य, विविध अलंकार यांच्याबरोबरच भावनांचा कल्लोळ टिपणं हे मोरोपंतांच्या काव्याचं वैशिष्ट्य. यामुळे कथा जिवंत होते. साहित्याच्या प्रतलावर ती दृग्गोचर होते आणि पुढे कोणते अलंकार, नाट्य वाचायला, अनुभवायला मिळेल याची उत्सुकता वाढत जाते.
