अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण सोळावे.
– संपादक
शोध
पृथ्वीवर येऊन आम्हांला जवळजवळ एक महिना झाला आहे. या जगाची आम्हांला हळूहळू सवय होते आहे. हे जग आजिबात स्वर्गासारखं नाही. हा प्राचीन ग्रह म्हणजे एक अनघड स्थान आहे. इथला निसर्ग रानटी आहे. वृक्ष उंच आणि घेरदार आहेत. ते कुठेही आणि कसेही वाढतात. वेली, झुडुपं, गवत… सगळं मिळून रानात इतकी दाटी होते, की त्यांचा दरारा वाटतो. झाडांची जागा आणि माणसांची जागा यांत इथे काहीच नीट विभागणी नाही. या ग्रहावरच्या शेवटच्या माणसांचा मृत्यू झाल्यापासून, वृक्षवल्लींनी अभिनिवेशाने हा ग्रह आपल्या ताब्यात घेतला आहे असं वाटतंय. आमच्याकडे जर कोणत्याही पृष्ठभागावरून चालू शकणार्या गाड्या आणि तरंगणारी विमानं नसती तर इथे सगळीकडे पसरलेल्या अरण्यातून वाट काढत या ग्रहावर हिंडणं आम्हांला अशक्य झालं असतं. निदान आम्ही जिथे तत्कालिक वास्तव्य केलं आहे त्या प्रचंड तलावाच्या काठावर उभं राहिल्यावर तरी असं वाटतं.
मी सूर्यास्ताच्या वेळेस माझ्या कुटीच्या दारात बसून तलावाच्या पाण्याचे बदलणारे रंग पाहते आहे. त्या पाण्यावरून उडत असताना माझ्या पंखांखाली ते पाणी चमचमताना पाहण्याची मला तीव्र इच्छा होते आहे. पण त्यासाठी बराच वेळ फुग्याच्या बाहेर राहावं लागेल आणि म्हणून मी ती इच्छा दाबून टाकण्याचा प्रयत्न करते आहे. अचानक माझा कॉम वाजतो आणि त्या आवाजाने सगळेच दचकतात. आम्ही सगळे सहा जण एकमेकांच्या दृष्टिपथात आहोत आणि त्यामुळे कॉमवरून एकमेकांशी संपर्क साधण्याची आवश्यकताच नाही आहे. मी स्क्रीनकडे पाहते आणि माझ्या लक्षात येतं, की ओन्नीचा फोन येतो आहे. उत्तर ध्रुवावर आम्ही जिथे उतरलो होतो तिथून दक्षिणेकडे गेलेल्या गटात ओन्नी आहे.
“हॅलो ओन्नी! काय विशेष? सगळं ठीक आहे ना?”
“हॅलो आरुषी! छान वाटतं आहे तुझा आवाज पुन्हा ऐकायला. आमच्याकडे सगळं ठीक आहे. तुमचं कसं चाललं आहे?”
“आमचंही छान चाललं आहे. आम्ही एका तळ्याच्या काठी मुक्काम ठोकला आहे. इथे खूप घनदाट झाडी आहे. सूक्ष्म जीवाणूंच्या अनेक वस्त्या आहेत. आम्ही शेकडो नमुने गोळा केले आहेत आणि काही प्रयोगसुद्धा सुरू केले आहेत.”
“उत्तम. आमच्या इथे पण भरपूर झाडी आहे आणि विशेष म्हणजे, आम्हांला इथे काही पुरातत्त्व अवशेष सापडले आहेत. त्यासाठीच मी तुला फोन केला. आम्हां सगळ्यांच्या मते तू इथे येऊन ते अवशेष तपासावेस.”
ही अत्यंत अनपेक्षित बातमी आहे. मी केव्हाच उठून उभी राहिले आहे आणि माझ्या कॉममध्ये ओरडून बोलते आहे,
“पुरातत्त्व अवशेष! हे तर अगदी चित्तथरारक आहे. कसले अवशेष आहेत? व्हिडिओ पाठव. सगळी माहिती सांग मला.”
“तसं म्हणशील तर ते नक्की कशाचे अवशेष आहेत ते आम्हांला माहिती नाही. मी तुला एका मिनिटात व्हिडिओ पाठवतो. पण इथे येऊन तुला ते प्रत्यक्ष बघता येतील का?”
“हो तर! त्यासाठीच तर मी या मोहिमेवर आले आहे. आम्हांला अजून संस्कृतीच्या कोणत्याही खाणाखुणा सापडलेल्या नाहीत. मला नक्कीच तिथे यायला आवडेल. मला विमान घेऊन यावं लागेल बहुतेक,” माझ्या गटातील इतर सदस्यांकडे बघत मी म्हणते.
“हो. दहा हजार मैलांचा प्रवास आहे. तरंगणाऱ्या ग्लायडर विमानाने किंवा ड्रोनने नाही करू शकणार तू हा प्रवास. तुला विमानच घेऊन यावं लागेल. पण मला वाटतं, की तेवढा त्रास घेण्याच्या योग्यतेचं आहे हे. तुमच्या गटाला जर तिथे काही धोका नसेल तर तू विमान घेऊन येण्याचा विचार करू शकतेस.”
मी जर विमान घेऊन या प्रवासाला गेले तर मी परत येईपर्यंत माझ्या गटातील लोक इथे अडकून पडलेत असं होईल. तसा काही इथे धोका नसल्यामुळे त्यांना विमानाची गरज पडण्याची शक्यता तशी कमी आहे; शिवाय आमची प्रयोगशाळा उभारली गेली आहे आणि कार्यशील आहे. मी सोडून गटातील इतर सगळे तिथे प्रयोग करण्यात व्यग्र आहेत; तरीदेखील इतरांशी चर्चा केल्याशिवाय पक्की हमी देण्यास मी कचरते. तसं मी ओन्नीला सांगते आणि तो समजून घेतो.
“अवशेष सापडले त्या जागेचे व्हिडिओ आणि फोटो मी तुला पाठवतो. तुम्ही सगळे चर्चा करून ठरवा. आम्ही उद्या परत तुमच्याशी संपर्क करू.”
प्राचीन संस्कृतीच्या सापडलेल्या पहिल्या खाणाखुणा पाहण्यासाठी मी आतुर आहे. फोटो पाहण्यासाठी सगळे माझ्याभोवती गोळा होतात. एकामागोमाग एक फोटो माझ्या कॉमवर येऊ लागतात.
मी काय पाहते आहे हे पहिल्या दृष्टिक्षेपात मला आजिबात समजत नाही. तो कशाचा तरी सांगाडा आहे; पण इमारत नव्हे. खरंतर ते तीन वेगवेगळे सांगाडे आहेत. त्यांपैकी दोन एकाच उंचीचे आणि तिसरा थोडा लहान. माझा थोडा अपेक्षाभंग होतो कारण मला काहीतरी अधिक भव्य अपेक्षित होतं. एखादी इमारत म्हणा!
पण काही झालं तरी ते नक्कीच मानव निर्मित काहीतरी आहे. व्हिडिओतून आणखी जास्त माहिती मिळाली नाही, फक्त त्याच सांगड्याच्या सर्व बाजू दिसल्या. ओन्नीने इतरही माहिती पाठवली आहे – त्या सांगाड्यांचे आकार, त्यांच्या घरांपासून असलेले अंतर आणि ते अवशेष जिथे सापडले त्या जागेचे अक्षांश रेखांश. पण त्या सगळ्याचा फारसा काही उपयोग नाही.
त्या दिवशी रात्री संध्याप्राशनानंतर, आम्ही या नवीन शोधाविषयी चर्चा करतो. आमच्यापैकी बहुतेकांचं मत आहे, की मी जाऊन त्या जागेला भेट द्यावी, कारण आमच्या गटाला किंवा तिसऱ्या गटालाही अजून पृथ्वीवरच्या विलुप्त संस्कृतीच्या कोणत्याही खाणाखुणा सापडलेल्या नाहीत; शिवाय माझे सहकारी मला विमान नेऊ देणार आहेत आणि ते इथे त्यांचे प्रयोग चालू ठेवतील. तातडीने ही जागा सोडून जाण्याची काही परिस्थिती उद्भवेल असं त्यांना वाटत नाही. शेवटी आम्ही एक आराखडा ठरवतो. माझ्या प्रवासाबद्दल तिसऱ्या गटाला सांगायचं आणि त्यांनी तयारीत राहावं अशी त्यांना सूचना द्यायची. माझ्या गटावर जर काही संकट आलं तर तिसऱ्या गटातील एक जण त्यांचं विमान घेऊन तातडीने इथे येईल आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊन जाईल अशी व्यवस्था तयार ठेवायची. पुरातत्त्व अवशेष जिथे सापडले आहेत त्या दक्षिण अमेरिकेच्या खंडापर्यंत प्रवास करायला मला एक दिवस लागेल. मी तिथे पाच दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही आणि एकूण एका आठवड्यात परत येईन, मग तेवढ्या अवधीत मला ते काय आहे हे ओळखता येओ किंवा नको. एकूण बेत चांगला आहे.
दुसऱ्या दिवशी विमानातून आणखी सामान काढून ते प्रयोगशाळेत नेऊन ठेवण्यात माझा बराच वेळ जातो. मग मी माझी उत्खनन करण्याची उपकरणं तयार ठेवते आणि गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करणारी यंत्रं चार्ज करून तयार ठेवते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी निघणार आहे.
________________________________________________________________________________________________________________
दुसऱ्या दिवशी संध्याप्राशनानंतर मी निघण्याच्या तयारीत आहे. मला निरोप द्यायला माझ्या गटातले सगळे विमानाभोवती जमले आहेत. मला मिठी मारून सगळेजण प्रवासासाठी शुभेच्छा देतात.
“काळजी घे, आरुषी आणि लवकर परत ये,” मी एक भरारी घेऊन विमानाच्या दारात जाताना ॲग्नॉन म्हणतो.

मी सगळ्यांना हात हलवून निरोप देते आणि विमान चालकाच्या जागेवर बसते. विमानाची स्वयंचलित यंत्रणा उड्डाण, प्रवास आणि खाली उतरणं या क्रिया करू शकते पण सगळं नियंत्रण त्या यंत्रणेवर सोपवून नुसतं बसण्याइतकं माझं मन स्वस्थ नाही. मला विमान उडवता येतं आणि मी माझ्याच हातात नियंत्रण ठेवणार आहे. मोहिमेवर येण्यापूर्वी आम्हांला स्वर्गावर जे प्रशिक्षण मिळालं त्यात आम्हांला विमान उडवायला शिकवलं होतं आणि काल सिम्युलेटरवर मी सराव केला आहे. लांबचा प्रवास असला तरी मी जागी राहणार आहे.
मी सफाईदार उड्डाण करते आणि विमान तलावाच्या पाण्यावरून उंच नेते. मग एक मोठे वळण घेऊन पश्चिमेकडे विमान नेऊ लागते. पहिल्यांदाच मी एवढं मोठं विमान एकटीने चालवते आहे. या मोठ्या विमानातून मी जवळजवळ दहा तास प्रवास करणार आणि त्यापैकी बहुतेक वेळ महासागरावरून उडण्यात घालवणार याची मला जाणीव आहे. रात्र ओलांडून, संध्याकाळी मी दक्षिण अमेरिकेत उतरणार. काळाचा क्रम उलटा होताना पाहणार. माझ्या खऱ्या काळाच्या रात्रीनंतर संध्याकाळ होणार आणि त्यानंतर दुसरी रात्र.
पहिल्या अस्वस्थ तासानंतर मला त्या प्रवासाची मजा वाटू लागते. आश्वस्त होऊन मी पृथ्वीच्या ताऱ्याची शेवटची किरणं क्षितिजावर धूसर झाल्यानंतर आकाश गडद जांभळे होताना आणि मग मखमली काळे होताना पाहते. खाली पृथ्वीच्या खाणाखुणा सावकाशपणे अंधाराच्या समुद्रात नष्ट होतात आणि भोवतालचं आकाश रत्नजडित होतं. विमानाच्या संगणकावर मी तारे धुंडाळणारं ॲप उघडून स्वर्गाची दिशा शोधून काढते. इतक्या अंतरावरून मला रवीदेखील निश्चितपणे सांगता येणार नाही; पण मला साधारण दिशा माहीत आहे. या क्षणी विश्वाच्या दृष्टीने माझं स्थान काय असावं? जिथे मी जन्मले आणि लहानाची मोठी झाले तो स्वर्ग का पृथ्वी ग्रहावरचं तळ्याच्या काठावरचं माझं सध्याचं घर?
मी एकसारखी नैऋत्येकडे प्रवास करते आहे; कारण दुसरा गट आमच्यापेक्षा दक्षिणेकडे मोठ्या अक्षांशावर उतरला आहे. क्वचित अधूनमधून लागणार्या हवेच्या पोकळ्या सोडल्या तर विमान सुरळीत चाललं आहे. मी पूर्वनिश्चित मार्गावर आहे आणि ठरावीक गतीने जाते आहे.
पाच तास अंधाराकडे बघत बसल्यानंतर मला कंटाळा येऊ लागला आहे. विमान स्वयंचलित यंत्रणेवर सोपवून थोडी डुलकी काढण्याइतपत मी आता आश्वस्त झाले आहे. मला थोडी थोडी झोप लागते आणि ओन्नीने पाठवलेल्या फोटोंपेक्षा अधिक भव्य आणि का कोण जाणे पण अस्वस्थ करणाऱ्या अवशेषांची मला स्वप्नं पडतात. अखेरच्या युद्धात झालेल्या अत्याचारांबद्दल मी जे काही वाचलं आहे ते माझं झोपेतलं मन ढवळून काढत असणार. दोन तासांनी मी जागी होते आणि ताजीतवानी होण्यासाठी एक पेय तयार करते. कॉफीचा वास घेत मी माझा मार्ग तपासून घेते. अजून तीन तास लागणार. कोणीतरी सोबतीला असतं तर बरं झालं असतं. मी आईने दिलेल्या फोटोकडे बघते. माझ्या खुर्चीशेजारीच तो चिकटवलेला आहे. मी तिच्याशी बोलते, ती पाच प्रकाश वर्षं दूर असली तरी!
“आई, मी दक्षिण अमेरिकेतल्या चिली नावाच्या ठिकाणी उडत चालले आहे. त्याबद्दल वाचल्याचं आठवतं का तुला? दुसऱ्या गटाला तिथे काही पुरातत्त्व अवशेष सापडले आहेत आणि मी ते तपासायला जाते आहे. बघ, मी हे मोठं विमान एकटीने चालवते आहे.”
मग हा संदेश ध्वनिमुद्रित करण्याचं मला सुचतं आणि मी पुन्हा ते सगळं रेकॉर्डरच्या समोर म्हणते. तळ्याकाठच्या घरी परत गेल्यावर मी हा संदेश स्वर्गाकडे पाठवेन.
गाणी लावून मी रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू, मी जेव्हा माझ्या गंतव्य स्थळाच्या जवळ जाते तसतसं आकाश निवळू लागतं. आकाशाच्या घुमटाला सगळीकडून उजळलेली गोलाकार श्वेत चंदेरी किनार दिसू लागते. मी रात्रीतून सुटून आले आहे आणि इच्छित स्थळी पोचल्यावर पुन्हा रात्र होताना पाहणार आहे. आता मी अधिक सावध आहे. उतरण्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी विमानाचा वेग कमी झाला आहे. हळूहळू विमान खाली येऊ लागतं आणि खाली मला रान दिसू लागतं. संधिप्रकाशात दिसणार्या अंधुक दृश्यापेक्षा विमानातील उपकरणंच उतरण्याची जागा निश्चित करण्यासाठी जास्त उपयोगी आहेत. आता मी अगदी जवळ आले आहे. आता मी संपर्क साधायला हवा.
ओन्नीला माझा फोन अपेक्षित आहे आणि त्यांनी आधीच विमानाचा आवाज ऐकला आहे. आम्ही पट्कन बोलून घेतो आणि मी विमान खाली उतरवण्याची प्रक्रिया सुरू करते. पंधरा मिनिटांत मी पुन्हा जमिनीवर उतरले आहे, जिथून उड्डाण केलं त्या जागेपासून दहा हजार मैल दूर! मी जेव्हा विमानातून बाहेर येते तेव्हा गटातील सगळेजण माझं स्वागत करायला जमलेले असतात. आमचं उत्स्फूर्त संभाषण शांत झाल्यावर मला एक शांतता जाणवते. तळ्याकाठी आम्ही अनुभवलेल्या शांततेपेक्षा वेगळी शांतता. पण शांतताच!
“आम्ही तुझ्यासाठी एक कुटीर पण उभं केलं, आरुषी,” त्या पथकाने स्वतःसाठी उभारलेल्या पाच कुटीरांपासून एका कोनात उभारलेल्या कुटीकडे निर्देश करत एमिली म्हणते.
“धन्यवाद. किती छान. उद्याचा काय बेत आहे?”
“ओन्नी, गुस्ताव्ह आणि एरा प्रयोग करण्यात व्यग्र आहेत. एमिली ड्रोन घेऊन पूर्वेकडे जाणार आहे. समुद्राच्या उथळ पाण्यात तिला तिथे अळंबीसारखे काही जीव सापडले आहेत; पण मी तुला ज्या जागेत अवशेष सापडले आहेत तिथे घेऊन जाऊ शकतो. आपण गाडी घेऊन जाऊ शकतो,” आयजाईया म्हणतो.
मला हा बेत पसंत आहे आणि आम्ही सकाळी सूर्यस्नान केल्यानंतर लगेचच निघायचं ठरवतो. लांबच्या प्रवासाने मी दमून गेले आहे आणि माझ्या कुटीत जाऊन अंथरुणावर पडण्यात परमसुख आहे; पण झोप लागायला मला बराच वेळ लागतो. बदललेली जागा आणि जुनी मित्रमंडळी भेटल्याने माझं मन झंकारत राहतं.
_______________________________________________________________________________________________________________
सकाळी जाग आल्यावर डोळ्यांसमोर तलावाचं प्रशांत पाणी पसरलेलं न दिसल्याने विचित्र वाटतं. किती लवकर मला माझ्या पृथ्वीवरच्या घराच्या परिसराची सवय झाली आहे! माझ्या इथल्या नवीन घराच्या दारातून मला दुसऱ्या गटाची प्रयोगशाळा एका मोठ्या पसरट खडकावर बांधलेली दिसते आहे. घरांच्या वर्तुळाच्या पलीकडे लालसर मातीची सपाट जमीन आहे. तिच्या कडेने झुडुपं आणि नेचे वाढले आहेत. ही खडकाळ भूमी आहे आणि काही मीटर अंतराच्या पलीकडचं इथून दिसत नाही. मी माझ्या ग्लासातलं उरलेलं सकाळचं पेय घटाघटा पिऊन टाकते आणि ऊन्ह खायला जाते. चांगली जागा शोधण्यात काही मिनिटं जातात आणि शेवटी मी एक झुडपाच्या शेजारी बसते. हात जोडून मी डोळे मिटून घेते आणि माझे पंख पसरते.
“हे विश्वाच्या सर्वोच्च स्वसंवेद्या! हे मूलभूत आणि अनंत वास्तवरूपांत असणाऱ्या माझ्या खऱ्या स्वरूपा! आज हे अवशेष ओळखण्यास मला मदत कर. माझ्या कल्पनाशक्तीला आधार दे.”
अर्ध्या तासानंतर मी आणि आयजाईया गाडीत बसून नैऋत्य दिशेला जाऊ लागतो.
“त्या बैठ्या टेकड्या पाहिल्यास आरुषी?” आमच्या उजवीकडे असलेल्या छोट्या टेकड्यांच्या रांगेकडे बोट दाखवून आयजाईया विचारतो. “पुरातत्त्व अवशेष त्यांच्या मागेच आहेत. तिथे पोचायला आपल्याला साधारण एक तास लागेल कारण तिथे जाण्याची वाट बरीच खडबडीत आहे.”
“आपण तरंगणाऱ्या विमानाने किंवा ड्रोनने तिथे जाऊ शकलो नसतो का?”
“आमच्याकडे फक्त दोन ड्रोन आहेत आणि त्यांतलं एक एमिली तिच्या अळंबी मोहिमेवर घेऊन गेली आहे आणि तिथे ग्लायडर उतरवायला पुरेशी जागा नाही; शिवाय मला असं वाटलं, की आजूबाजूची जागा नजरेखालून घातल्यावर तुला त्या अवशेषांबाबत मत बनवणं सोपं जाईल.”
त्याचं म्हणणं बरोबरच आहे. कोणत्याही अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी तिथल्या जमिनीचे चढ उतार माहीत असणं महत्त्वाचं असतं. आम्हांला तसं शिकवलंच आहे. पण मला प्रत्यक्ष अनुभव नाही. स्वर्गावर प्राचीन अवशेषच नाहीत. आधुनिक मानदंडांप्रमाणे स्वर्गावरच्या मानवी वसाहतीचा पाचशे वर्षांचा काळ अवशेष तयार होण्याच्या दृष्टीने फारच कमी आहे. पृथ्वीवरच्या मानव-इतिहासाच्या तुलनेत स्वर्गावर आमची सामाजिक रचना बरीच स्थिर आहे. इथे युद्ध किंवा दोन गटांतील तणाव नाहीत, संस्कृतीचा विनाश करेल आणि अनेक मैल जमीन ओसाड पाडेल असं विध्वंस करणारं सैन्य नाही. आमच्या इमारती आणि स्वर्गावरचं इतर बांधकाम साती देशांमध्ये सगळीकडे सारखंच आहे. तिथे इमारती कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात कारण जमीन मुबलक आहे आणि गरज पडेल तेव्हा आम्ही नवीन इमारत बांधतो. त्यामुळे मी जे काही पुरातत्त्वशास्त्र शिकले आहे ते पृथ्वीवरच्या मानवांना आधीच माहीत होतं.
उन्नयनपूर्व माणूस पुरातत्त्व अवशेष अभ्यासण्यात आणि त्यांचा अर्थ लावण्यात पारंगत होता कारण त्यांच्या मातीखाली संस्कृतींचे अनेक थर गाडलेले होते.
आम्ही जसजसे झुडुपांच्या आणि शिळांच्या मधून वाट काढत पुढे जातो तसतशी आमच्याभोवती झाडी वाढत जाते. आणखी पुढे गेल्यावर झुडुपांची जागा उंच वृक्ष घेतात. पण हे वृक्ष भारतातील वृक्षांपेक्षा फार वेगळे आहेत. फुलं आणि खालची हिरवळही वेगळी आहे. त्यांचे नमुने गोळा करून माझ्या गटातल्या लोकांना दाखवायला नेले पाहिजेत.
“कीटकांपेक्षा मोठ्या आकाराचं तुम्हांला काही आढळलं आहे का?” मागच्या वेळेस फोन झाला तेव्हा या गटाने तसं काही आढळलं नसल्याचं सांगूनही मी विचारते.
“नाही, फक्त कीटक. त्यांपैकी काही खूप मोठे आहेत मात्र! आणि त्यांच्या विस्तृत वसाहती आहेत.”
“किड्यांना खाणारे पक्षी किंवा सरपटणारे प्राणी नाही आढळले?”
“असले तरी आम्हांला अजून दिसले नाहीत.”
“या किड्यांच्या जाती किती जुन्या असतील?”
“आश्चर्य म्हणजे त्यांपैकी काही खूप जुन्या आहेत. हजार वर्षांपेक्षाही जुन्या. याचा अर्थ त्या अखेरच्या युद्धातून वाचलेल्या जाती आहेत आणि तरीदेखील त्यांची अधिक प्रगत प्राण्यांत उत्क्रांती झालेली नाही.”
“पृथ्वीवर उत्क्रांती एक विशिष्ट उंचीवर येऊन स्थगित झालेली दिसते. असं का झालं असावं?”
“खालच्या पातळीवरच्या प्राण्यांना परिस्थितीशी जुळवून घेणं जास्त सोपं जातं. यापैकी काही कीटक आणि वनस्पती मानवी काळात असल्या तरी आता त्या तशाच राहिलेल्या नाहीत. कालांतराने त्यांच्यात उत्क्रांती आली आहे, मुख्यतः किरणोत्सर्ग आणि पाण्याचा तुटवडा सहन करण्याची क्षमता त्यांच्यात आली आहे. जिथे गेल्या साधारण दोनशे वर्षांत हवामान सुधारलं असे उष्ण कटिबंधातले प्रदेश सोडले तर पृथ्वीच्या इतर भागात सूचीपर्ण वनस्पती आणि निवडुंगच आहे.”
आणि तरीही भविष्य काळात जर कोणता प्रदेश समृद्ध होणार असेल तर तो हाच प्रदेश असेल. इथल्या झाडांची पानं रुंद आणि पसरट आहेत आणि फांद्या हिरव्या आहेत. त्या अर्थी त्यांची प्रकाश संश्लेषणाची क्षमता उत्तम आहे.
आम्ही एका मातीच्या ढिगाऱ्याला वळसा घालून पुढे जातो आणि दृश्य अचानक बदलतं. मला अनेक उन्मळून पडलेले वृक्ष आणि आजूबाजूला बऱ्याच मोठ्या परिसरात मोठ्या शिळा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. जमीन आणखी उंचसखल होते आणि एखाद्या प्रचंड शक्तीने या प्रदेशाची नैसर्गिक जडणघडण विस्कटून टाकल्यासारखी वाटते.
“इथे घडलं तरी काय,” मी घाबरून विचारते.
“तुला काय वाटतं?” माझ्याकडे बारकाईने पाहत आयजाईया विचारतो.
“इथे भूकंप झाला होता का?”
“आम्हांलाही तसंच वाटतं आणि अजून तू अवशेष पाहिलेलेच नाहीस.”
जितक्या आकस्मिकपणे मला उन्मळून पडलेले वृक्ष आणि इकडेतिकडे पडलेले शिळा आणि दगड दिसले होते तितक्याच अचानकपणे मला जमिनीत एक प्रचंड विवर दिसतं. ते फार खोल नाही पण त्याचा व्यास खूप मोठा आहे आणि त्याच्या बाजू सरळ खाली तळापर्यंत गेल्या आहेत. जमीन खणणाऱ्या यंत्राने तिथे खणलं असावं आणि खड्ड्याच्या तळाची आणि कडांची उघडी जमीन अनावृत केली असावी तसं वाटतं आहे. मला ज्यांचे फोटो पाठवले होते त्या तीन वास्तू त्या विवरात एक कोपऱ्यात उभ्या आहेत.
“आम्ही इथे किरणोत्सर्गाची मात्रा मोजली आहे. खूप कमी आहे ती. आपल्या फुग्यातून बाहेर येऊन त्या अवशेषांपर्यंत खाली उडत जाण्यात काही धोका नाही”, आयजाईया म्हणतो.
फुग्याचं आवरण काढून टाकायला मला नेहमीच आवडतं. मी लगेच त्याच्या सांगण्याप्रमाणे करते आणि विवराच्या काठावरून आम्ही त्या अवशेषांपर्यंत खाली उडत जातो. उभे असलेले दोन सांगाडे माझ्यापेक्षा उंच आहेत आणि कसल्यातरी धातूपासून बनवलेले दिसतात. त्यांच्या एका बाजूला निम्म्यापेक्षा जास्त उंचीवर दोन भोकं आहेत. एखाद्या यंत्रणेचा भाग असतील म्हणावं तर त्या सांगाड्यांची रचना तेवढी गुंतागुंतीची नाही आणि एखाद्या इमारतीचा भाग असणेही शक्य नाही कारण त्या मानाने त्यांचा आकार लहान आहे. तिसरा सांगाडा पहिल्या दोन्हींची प्रतिकृती असणं शक्य आहे पण त्याची उंची पहिल्या दोन्ही सांगड्यांच्या दोन तृतीयांश आहे. कदाचित त्याचा उरलेला भाग मोडला असावा. त्यांच्या आजूबाजूला मातीच्या ढिगांव्यतिरिक्त काहीच नाही. बघितल्या बघितल्या त्यांच्याबद्दल काही अंदाज लावणं कठीण आहे.
मी शक्य तितक्या बारकाईने त्या सांगाड्यांची तपासणी करते. त्यांची मोजमापं घेते आणि त्यांच्या धातूचं परीक्षण करते. मी अंदाज केल्याप्रमाणे तो धातूच आहे पण कसलातरी जुन्या प्रकाराचा धातू आहे आणि त्याला गंज लागलाय. एका बाजूला असलेल्या भोकांच्या व्यतिरिक्त प्रत्येक सांगाड्यावर एक खड्डा आहे. त्यांचा आकार दोन उंच सांगाड्यांवर एकसारखा आहे पण छोट्या सांगाड्यावर वेगळा आहे.
“आयसोटोपचा काळ ठरवण्यासाठी मला किरणोत्सर्ग मोजायला लागेल,” मी म्हणते.
“ते यंत्र वर गाडीत आहे का?” आयजाईया वरच्या जमिनीवर दृष्टी वळवून विचारतो.
“आणते मी जाऊन. आजच केलेलं बरं.”
“मी घेऊन येतो. वर उडत जाणं कठीण आहे कारण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उडावं लागतं.”
ते माझ्या लक्षात आलं नव्हतं आणि आयजाईयाची मदत फार मोलाची आहे. मला कायकाय हवे आहे ते मी त्याला सांगते आणि त्याला विवरातून बाहेर पडण्यासाठी कष्टपूर्वक पंख फडकवताना पाहते. दहा मिनिटांत तो परत येतो आणि मी कामाला सुरुवात करते. दुपार होईपर्यंत दिवसाचा उरलेला वेळ विश्लेषण करण्यात घालवता येईल इतकी माहिती मी गोळा करते. आम्ही आमच्या तळावर परतायचं ठरवतो आणि उडत विवरातून बाहेर येतो. आमच्या घरांपर्यंत पोचेतो मी पार दमून गेले आहे. जमिनीवरून चालणाऱ्या गाडीत बसून अनेक तास प्रवास करणं फार खडतर आहे कारण पृथ्वीवर रस्ते नाहीत. प्राचीन मनुष्यांनी जे काही रस्ते तयार केले असतील ते पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर गाडले गेले आहेत. एके काळचा सुसंस्कृत ग्रह काळाने रानटी करून टाकला आहे.
अवशेष सापडलेल्या जागेला भेट देऊन मी जरी दमून गेले असले तरी माझी उत्सुकता मला तिथे गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण केल्याशिवाय झोपू देत नाही. पण त्या विश्लेषणातून काहीच निष्पन्न न झाल्याने माझा हिरमोड होतो. त्यांच्या तपासणीतून गोळा केलेली माहिती माणसं पृथ्वीवर राहत असताना ज्या अब्जावधी वस्तू वापरत होती त्यांपैकी कशाशीच जुळत नाही. मला आणखी माहिती गोळा करावी लागणार. दुसऱ्या दिवशी उत्खननाचं सामान घेऊन मी अवशेष सापडले तिथे परत जाण्याचं ठरवते.
_____________________________________________________________________________________________________________

दुसऱ्या दिवशी मी सकाळपासून संध्याप्राशनाच्या वेळेपर्यंत जमीन खोदते– म्हणजे, माझी यंत्रं खोदतात. आज मी एकटीच आहे आणि दुपारी जेव्हा खोदकाम करणारं मोठं मुसळ धातूसारख्या कशावर तरी आपटतं तेव्हा मी तातडीने बुलडोझरना काम थांबवायची आज्ञा देते. मला जमिनीत काहीतरी मानव निर्मित लागलं आहे आणि माझ्या आनंदाला पारावर नाही. मी माझे पंख फडफडवते, उड्या मारते आणि एक कोलांटीही खाते. मातीच्या ढिगांशिवाय माझा आनंदाचा नाच बघायला कोणीच नाही. मी पटकन गुडघे टेकून बसते आणि माझ्या हातांनी माती बाजूला करायला लागते; पण मुसळाच्या मॉनिटरवर धातू म्हणून ज्या कोणत्या वस्तूची नोंद झाली होती ती अजून खूप खोल आहे. हातात धरून खोदायच्या छोट्या यंत्रांना मी हळूहळू माती बाजूला करायची आज्ञा देते. हे जिकिरीचं काम आहे पण खाली जे काही पुरलेलं आहे त्याची नासधूस मला होऊ द्यायची नाही.
इथल्या घड्याळाप्रमाणे संध्याकाळचे चार वाजायला आल्यावर विवराच्या भिंतींच्या सावल्या माझ्या उत्खननाच्या जागेपर्यंत पसरल्या आहेत आणि माझी फक्त एका चौरस फुटाच्या धातूच्या भागावरची माती बाजूला करून झाली आहे. हे काम मला उद्या चालू ठेवावं लागणार आहे.
मी दोन तासांचा प्रवास करून तळावर परत जाते. मी पार दमले आहे पण मला लागलेला शोध केव्हा इतरांना सांगेन असं मला झालं आहे. मी जेव्हा तळावर पोचते तेव्हा सगळे माझी संध्याप्राशनासाठी वाट पहात आहेत.
“आज मला काय सापडलं, ओळखा!” माझ्या भोवती जमलेले उत्सुक चेहरे न्याहाळत मी म्हणते.
“हाडांचा सापळा?”
“नाssssही! जमिनीखाली खूप खोलवर काहीतरी धातूचं आहे. मी दिवसभर खणत होते आणि मला काहीतरी चौकोन आणि घन सापडलं.”
“ते काय असेल असं तुला वाटतं?” आयजाईया विचारतो.
“काय माहीत नाही. ते समजायला आणखी खोदावं लागेल. कदाचित उद्यापर्यंत मला थोडी कल्पना येईल.”
“मी येईन तुला मदत करायला,” एमिली म्हणते. “मासे बघून झाले माझे.”
मग दुसऱ्या दिवशी आम्ही लवकरच निघतो, सूर्यस्नान केल्याकेल्या. भारतातील तलावाच्या काठी असते तितकी रम्य इथली सकाळ नसते पण जास्त उजळ असते. सूर्य आकाशात खूप वर येण्यापूर्वीच आम्ही उत्खननाच्या जागेवर पोचतो. उडत विवराच्या तळाशी पोचताच आम्ही दोघीही हातात धरून चालवायची खोदकाम करण्याची उपकरणं आणि धूळ माती बाजूला करणारी उपकरणं घेऊन कामाला लागतो. दुपारपर्यंत आम्ही धातूच्या चौकोनाचा बराचसा पृष्ठभाग मोकळा करतो. तो एक दहा फूट गुणिले पंधरा फुटांचा धातूचा चौकोनी चौरंग वाटतो आहे. त्याचा पृष्ठभाग जरी गंजलेला आणि खराब झालेला असला तरी तो खूप जाड असल्याने त्याचा आकार शाबूत राहिला आहे.
त्यानंतर एक तास मी सर्व बाजूंनी त्याची मोजमापं घेण्यात आणि त्याच्या जाडीचा अंदाज घेण्यात घालवते. आश्चर्य म्हणजे त्या मोजणीवरून त्या धातूच्या
तुकड्याच्याखाली एक पोकळी असल्याचा निष्कर्ष निघतो आहे आणि आम्ही नुकत्याच खोदून उघड्या केलेल्या चौकोनाच्या खाली अनेक फुटांवर तसाच दुसरा चौकोन असल्याच्या अस्पष्ट खुणा आढळताहेत. हे कोड्यात टाकणारं आहे. धातूचे दोन जड तुकडे मध्ये मोठी पोकळी ठेवून कोण कशाला एकावर एक ठेवेल?
धातूच्या चौरसावरच्या मातीचे नमुने आम्ही गोळा करतो आणि मग तळावर परत येतो. केलेल्या मोजणीतून निष्कर्ष काढण्यात मी त्यानंतरचा दिवस घालवण्याचं ठरवते. भारतातल्या माझ्या तळावर परतण्यापूर्वी चिलीमधला उद्या माझा शेवटचा दिवस असणार आहे. तिथल्या गटाचं सगळं काही ठीक चाललं आहे पण ठरवलेल्या काळात मला परत गेलं पाहिजे.
दुसऱ्या दिवशी मी प्रयोगशाळेतच काम करायचं ठरवते. ओन्नी आणि एरा तिथे त्यांचे आण्विक प्रयोग करण्यात मग्न आहेत. माझं विश्लेषण करायला मला लागणारी सगळी सामग्री तिथे उपलब्ध आहे आणि मी माझ्या गोळा केलेल्या माहितीचा अर्थ लावण्यात व्यग्र होते. दोन तास रासायनिक चाचण्या केल्यावर मला अवशेषांच्या भोवतालच्या जागेतून घेतलेल्या मातीच्या सगळ्या नमुन्यांमध्ये हायड्रोकार्बनचे अंश सापडतात. मग मी त्या धातूच्या सांगाड्यांचं जे मेजमाप घेतलं होतं त्याचं विश्लेषण करते. या सगळ्यानंतर हळूहळू माझ्या असं लक्षात येऊ लागतं, की तो एक मातीत गाडलेला धातूचा प्रचंड पेटारा आहे. मी विचार करकरून थकते आणि प्रयोगशाळेत अनेक तास काम करून माझं डोकं जड होतं. मला ताजी हवा आणि काहीतरी पेय हवं आहे असं वाटू लागतं. संध्याप्राशनाला अजून दोन तास अवकाश आहे.
प्रयोगशाळेतून बाहेर येऊन मी घरांचं जे वर्तुळ आहे तिथे फेरफटका मारू लागते. थोड्या वेळाने माझ्या घराजवळच्या एका दगडावर चढून बसते. इथून मला प्रयोगशाळेच्या पलीकडचं थोडं दृश्य दिसतं आहे. पलीकडच्या बाजूला वाऱ्यावर हेलावणारं गवत दिसतं आहे. वाऱ्याच्या झुळुका मंद असल्या तरी थंड आहेत. त्या बोचऱ्या वाऱ्यापासून संरक्षण म्हणून मी माझ्या फुग्याच्या आत शिरते. पृथ्वीवर घराच्या बाहेरचं वातावरण नेहमीच आल्हाददायक नसतं; विशेषतः इथे चिलीमध्ये. रात्री इथे थंडी पडते. आमच्याकडे जर वातानुकूलित फुगे नसते तर आमच्या घरांसाठी ऊब देणारी यंत्रणा उभी करावी लागली असती. प्राचीन काळी इथले लोक कसे राहत असतील? आवश्यक ती ऊर्जा त्यांना कुठून मिळत असेल?
आणि एखाद्या विजेसारखी एक कल्पना माझ्या मनात चमकून जाते. ते अवशेष म्हणजे एका मोठ्या पेट्रोल पंपाचे भाग आहेत. तिसाव्या शतकातील आहेत ते, जेव्हा मानव ऊर्जेसाठी पूर्णपणे हायड्रोकार्बन्सवर अवलंबून होता. हायड्रोकार्बन्सच्या ज्वलनातून जी ऊर्जा बाहेर पडत असे त्यावर त्यांची वाहनं आणि यंत्रं चालत. हे ओळखायला मला इतका वेळ कसा लागला? विवरात उभे असलेले अवशेष म्हणजे वाहनांमध्ये तेल भरण्याची यंत्रं आहेत. आता जिथे भोकं आणि खाचा आहेत तिथे त्यांना नळ्या आणि तेलाचा प्रवाह मोजण्याची यंत्रं जोडलेली असणार. जमिनीखालची धातूची लादी ही लादी नसून पेट्रोल साठवायच्या हौदाचा पृष्ठभाग आहे. आता सगळ्याचा उलगडा होतो आहे.
हे तिसाव्या शतकातले ऐतिहासिक अवशेष आता वर उघड्यावर कसे काय आले? धरणी कंपामुळे? पृथ्वीच्या वेगवेगळ्या स्तरांची मोठ्या प्रमाणावर हालचाल झाल्याने हे खोलवर गाडलेले अवशेष एखाद्या प्रचंड धरणी कंपामुळे वर आले असतील का?
मला आयजाईया त्याच्या मोहिमेवरून उडत परत येताना दिसतो. मी त्याला हात करते आणि ओरडून सांगते, “धरणी कंपाविषयी तुझं भाकीत बरोबर होतं.”
“म्हणजे कसं?”
“कारण मला असं वाटतं आहे, की ते अवशेष मानवाच्या इतिहासातील फार पूर्वीच्या काळातले आहेत. बहुतेक तिसाव्या शतकातले. एखादा प्रचंड भूकंपच त्यांना असं वर फेकू शकेल, त्यांच्या वर साचलेल्या इतिहासाच्या अनेक थरांना भेदून.”
“म्हणजे ते काय आहेत हे तू शोधून काढलंस?”
“म्हणजे मी एक अटकळ बांधली आहे. ते एका पेट्रोल पंपाचे अवशेष वाटताहेत. ती धातूची लादी म्हणजे तेल साठवण्याच्या टाकीचं झाकण असावं.”
संध्याप्राशनासाठी जेव्हा सगळे बाहेर येतात तेव्हा मी त्यांना मी केलेला अंदाज समजावून सांगते. सगळ्यांनाच ती शक्यता पटते. आम्हांला अर्थातच खातरीपूर्वक काही कधीच कळणार नाही. पुरातत्त्व शास्त्राची हीच अडचण असते. आपण केवळ अंदाज बांधू शकतो. आपण भूतकाळात जाऊन प्रत्यक्ष पुरावा मिळवू शकत नाही. जीवनाची सुरुवात शोधणाऱ्या प्रयोगांचीदेखील हीच अडचण आहे. आपण फक्त अंदाज बांधू शकतो.
दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जमिनीवर चालणाऱ्या दोन गाड्यांमध्ये बसतो आणि अवशेषांना भेट द्यायला निघतो. मी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सगळ्यांनाच ते पुन्हा त्या दृष्टिकोणातून बघायचे आहेत. जाताना आम्ही गाड्यांच्या चाकांच्या घरघरीवर आवाज चढवून गप्पा मारतो. आज सगळ्यांच्या सोबतीमुळे अंतर बरंच कमी वाटतं.
विवराच्या काठावर पोचल्या पोचल्या, सगळेजण गाडीतून उड्या मारून खाली उतरतो आणि विवराच्या तळाशी उडत जातो. त्या अवशेषांना हाताने स्पर्श करून आणि त्यांचा वास घेऊन त्या पेट्रोल पंपावरचं गजबजलेलं जीवन आम्ही तीन हजार वर्षांच्या अंतरावरून कल्पनेत साकारण्याचा प्रयत्न करतो. त्या अवशेषांविषयी मी केलेल्या अंदाजाची पुष्टी करतील किंवा तो खोडून काढतील अशा काही वस्तू सापडतात का हे पाहण्यासाठी आम्ही हलक्या हत्यारांनी त्या जागेच्या आसपास आणखी थोडं खणायचा प्रयत्न करतो. पण आम्हांला काहीच सापडत नाही. त्या अवशेषांना त्यांच्या रहस्याचा जितका उलगडा करायचा होता तेवढा त्यांनी केलेला आहे हे उघड होतं. आणखी अवशेष सापडण्याच्या शक्यतेची चर्चा करत आणि हास्यविनोद करत आम्ही परततो.
गेल्या आठवड्यात एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे – कुणाला तरी योगायोगाने प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडतील म्हणून वाट बघत बसण्यापेक्षा मी स्वतःच पुढाकार घेऊन पृथ्वीवर हिंडून आणि उत्खनन करून इथल्या हरवलेल्या संस्कृतीच्या खुणा शोधायला हव्यात. उरलेला दिवस मी गटातील सगळ्या लोकांशी गप्पा मारण्यात आणि त्यांच्या प्रयोगांविषयी माहिती मिळवण्यात घालवते. संध्याप्राशनानंतर आशिया खंडात परत जाण्याचा प्रवास सुरू करण्याचा माझा बेत आहे.
पुढचे दहा तास मला माझ्या विमानाच्या बंदिस्त जागेत घालवायचे असल्याने प्राशनापूर्वी तासभर मी सूर्यस्नान करते. माझ्या निरोप समारंभासाठी आयजाईया पेयाचे नवीन डबे फोडतो. माझ्या छोट्याशा मोहिमेच्या यशाच्या नावाने आम्ही प्राशन करतो. सगळ्यांना हलकेच मिठी मारून निरोप घेऊन आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून मी माझ्या विमानाच्या डेकवर उडत जाते आणि खाली उभ्या असलेल्या घोळक्याला टाटा करते. कष्टाचा पण आनंदाचा आठवडा होता हा. या आठवड्यात या ग्रहाविषयी मी खूप काही शिकले. मी विमानाचं नियंत्रण हातात घेते आणि एक सफाईदार उड्डाण करते.
_______________________________________________________________________________________________________________
अनेक वर्षांनंतर जेव्हा पृथ्वी मोहिमेच्या शास्त्रज्ञांना माझा ध्वनिमुद्रित केलेला संदेश मिळेल तेव्हा त्यांना त्याचं किती अप्रूप वाटेल याची कल्पना करून माझ्या कामाचा मला अभिमान वाटतो. गेल्या आठवड्यातील माझ्या धाडसाची कहाणी माझ्या पथकातल्या सहकाऱ्यांना सांगण्यासाठी मी उत्सुक आहे. कुणा एकालाच ही सगळी कहाणी न सांगण्याविषयी माझ्या गटातल्या प्रत्येकानेच मला बजावलं आहे. प्रत्येकालाच माझा वृत्तांत पहिल्यांदा ऐकायचा आहे आणि म्हणून सगळे जेव्हा संध्याप्राशनासाठी एकत्र जमतील तेव्हा मी माझी कहाणी सांगेन. विमान प्रवास सुरू करून दोन तास झाल्यावर मला कंटाळा आणि झोप येऊ लागते. आता विमान स्वयंचलित यंत्रणेवर सोपवून झोप घेण्याची माझ्या मनाची तयारी झाली आहे. डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन मी झोपी जाते.
_______________________________________________________________________________________________________________
