
“महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण होण्यामध्ये साताऱ्यातील दाभोलकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच दाभोळकर विचाराचा वेध घेतात, घटनांचा कार्यकारणभाव तपासतात आणि त्यातील संगती – विसंगती यांचे विश्लेषण व अन्वेषण करतात. दाभोळकर बंधू-भगिनींनी शिक्षणाच्या, शेतीच्या, सामाजिक सुधारणांच्या व नवोन्मेषाच्या क्षेत्रामध्ये केलेले काम अतुलनीय आहे,” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. ‘१५५ सदाशिव पेठ, सातारा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भानू काळे व डॉ.अनिल जोशी यांनी संपादित केलेले हे पुस्तक पुणे येथील साधना प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. ‘लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा’ असे उपशीर्षक असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन २० मे रोजी, सातारा येथील धनंजयराव गाडगीळ ( डीजी) महाविद्यालयातील सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात झाले. त्या वेळी नामवंत लेखक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता दामोदर नायक हे अध्यक्षस्थानी होते. दोन तास चाललेल्या या समारंभात डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर यांनीही मनोगते व्यक्त केली. साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले, दोन्ही संपादकांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका मांडली. शिरीष चिटणीस यांनी मनोगत व्यक्त करताना दाभोलकर कुटुंबाचे वेगळेपण सांगितले. डीजी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण आंधळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अच्युत व तारा दाभोलकर या दाम्पत्याला १९१९ ते ४५ या काळात दहा अपत्ये ( सात मुले व तीन मुली ) झाली आणि अच्युतरावांच्या भावाच्या दोन मुलीही त्यांच्याकडेच होत्या. अशी ही बारा भावंडे साताऱ्यातील १५५ सदाशिव पेठ या घरात लहानाची मोठी झाली. पुढे सर्वजण उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत राहिली. सर्वांत मोठे देवदत्त यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले तर सर्वांत धाकटे नरेंद्र हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते व साधना साप्ताहिकाचे संपादक होते. उर्वरित भावंडे प्राध्यापक, डॉक्टर, वैज्ञानिक झाली. या दहा भावंडांपैकी आता केवळ दत्तप्रसाद दाभोळकर हयात आहेत. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांनी, आई ताराबाई ही त्यांच्या घराची केंद्रबिंदू कशी होती आणि तिने सर्व मुलामुलींना स्वतंत्र वृत्तीने कसे वाढू दिले हे काही उदाहरणांसह सांगितले. डॉ. नरेंद्र यांच्याशी विवाह होऊन दाभोलकर कुटुंबात आलेल्या डॉ. शैला यांनी मनोगत व्यक्त करताना, सासूबाईंच्या – म्हणजे माईंच्या व्यक्तिमत्त्वात भावना व विचार यांचा कसा सुरेख संगम होता हे हृदयस्पर्शी आठवणीसह सांगितले.
या पुस्तकात १८ व्यक्तींनी लिहिलेले एकूण २८ लेख आहेत. त्यात एकट्या दत्तप्रसाद यांचे ७ लेख आहेत. देवदत्त, नरेंद्र, कुंदा, अमरजा या भावंडांनी लिहिलेले लेखही आहेत; याशिवाय अतीश दाभोलकर यांनी वडील श्रीपाद यांच्याविषयी, अनंत दाभोलकर यांनी वडील नरसिंह यांच्याविषयी, प्रवीण नेरुरकर यांनी आई अमरजा यांच्याविषयी लिहिलेले लेख आहेत. अन्य काही सुहृदांचे लेखही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
विविध काळांत लिहिलेल्या गेलेल्या लेखांचे संपादन करून हे पुस्तक तयार करणारे भानू काळे म्हणाले, “लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबातील सर्व भावंडांच्या कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे एकत्रित असे चित्रण पूर्वी कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. आपल्या सामाजिक इतिहासातील ही उणीव भावी पिढ्यांसाठी भरून काढणे ही हे पुस्तक संपादित करण्यामागची भूमिका होती.” त्याच संदर्भात डॉ. अनिल जोशी म्हणाले, “जुनी मूल्यव्यवस्था कोसळून नवी मूल्यव्यवस्था येण्यामधली संक्रमण स्थिती सध्या दिसते आहे. त्यामुळे, भारतीय विचारविश्वाच्या केंद्रस्थानी राहिलेली कुटुंबव्यवस्था समजावून घेण्याची आवश्यकता आहे.” या पार्श्वभूमीवर, हे पुस्तक म्हणजे केवळ त्या बारा भावंडांच्या कर्तृत्वाचा आलेख नसून, दाभोलकर कुटुंबाचा महत्तम साधारण विभाजक आहे; शिवाय, १९२० नंतरच्या शतकी कालखंडाचे काही चित्रणही यात दिसते.
या समारंभाचे अध्यक्ष दत्ता नायक म्हणाले,
“चारित्र्य, साधेपणा, नम्रता, ज्ञानाची जिज्ञासा, सर्जनशीलता, कार्यनिष्ठा, आतिथ्य आणि चांगल्या अर्थाने विक्षिप्तपणा ही दाभोलकर कुटुंबाची व्यवच्छेदक लक्षणे होती. माई हा ह्या कुटुंबाचा गुरुत्वमध्य होता; पण वडिलांचे अनस्तित्व जाणवते. भारतीय कुटुंबव्यवस्थेत वडील व मुले यांचे निरोगी, निरामय संबंध दिसत नाहीत. द्राक्षांपासून रुद्रा़क्षांपर्यत ह्या कुटुंबाच्या कार्याचा परीघ होता.”
कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. चित्रा दाभोलकर यांनी एक निवेदन वाचून दाखवले. त्यानुसार, तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या पुरोगामी व्यक्ती, संस्था व संघटना यांना आगामी वर्षभरात दोन कोटी रुपये रक्कम दाभोलकर परिवाराच्या वतीने दिली जाणार आहेत. त्याला देणगी असे न म्हणता, समाजासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कार्यासाठी ‘सहयोग निधी’ असे म्हटले जाणार आहे. हा सहयोग निधी कुंदा उर्फ अंबू या बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जावा, अशी सूचना दत्तप्रसाद यांची होती, ती दाभोलकर परिवाराने मान्य केली. पहिल्या टप्प्यात पुढील पाच व्यक्ती व संस्था यांना ( एकूण पंधरा लाख रुपये ) सहयोग निधी दिला जाणार आहे :
विजय दिवाण (गागोदे, रायगड ), दत्ता देसाई ( पुणे ) व निरंजन टकले ( नाशिक ) यांना प्रत्येकी एक लाख रुपये,
संध्या चौगुले ( सातारा ) यांना हिरवाई प्रकल्पासाठी दोन लाख रुपये, तर विनिमय ट्रस्ट (कोपर खैरणे, नवी मुंबई) आणि वन निकेतन, (मु.सोनरपाडा, जि. ठाणे) यांना प्रत्येकी पाच लाख रुपये.
यानंतरचे सहयोग निधी वाटप करण्यासाठी तीन-चार टप्पे केले जाणार असून, त्या संदर्भातील निवेदन त्या त्या वेळी साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केले जाणार आहे. सहयोग निधी हवा असणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी स्वतःविषयी फक्त पाचशे शब्दांत टिपण पाठवावे असे आवाहन त्या निवेदनात केले आहे. आलेल्या एकूण प्रस्तावांमधून अंतिम निवड करण्यासाठी एक निवड समितीही तयार केली असल्याचे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले.


डावीकडून : विनोद शिरसाठ, दत्तप्रसाद दाभोळकर, भानू काळे, ज्ञानदेव म्हस्के, दत्ता नायक, शैला दाभोलकर, अरुण आंधळे, अनिल जोशी, वर्षा काळे
हे पुस्तक amazon वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हे पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाईट वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
