एकदा दुपारच्या उन्हात, भर तीन वाजता माझी आत्तेबहीण वाण्याच्या दुकानात गेली. तिने चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) घेतली. पैसे देत असताना तिला एक मैत्रीण भेटली.
‘उन्हाची कुठे आलीस बिस्किटं घ्यायला?’
‘अगं, आमच्या जोबीसाठी.’
‘अय्या, तुम्ही कुत्रा कधी घेतला?’
——
चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) खाणारी, कुत्रा नाही ती – जोबी – म्हणजे मी.
नाव निवडताना माझ्या आईवडिलांनी जोडाक्षरांनी ठासून भरलेलं ‘ज्योत्स्ना’ हे नाव ठेवलं खरं, पण मी अमेरिकेत पाळणाघरात जाऊ लागल्यावर प्रश्न आला. तिथल्या बाईंना ‘ज्योत्स्ना’ म्हणता येई ना.
“एखादं सोपं टोपण नाव नाही का?” तिने विचारलं.
दोघांनाही ‘ज्यो’ नको होतं आणि ‘ज्योती’देखील. कसं कोण जाणे पण त्या चर्चेतून ‘जोबी’ नावाचा उदय झाला. (“ज्योत्स्नाबेबीचं जोबी का?” असेल बुवा…).
काही वर्षांनी गिरगावात राहायला आल्यावर ‘जोबीने’ सर्वांची चांगलीच करमणूक केली. सुरुवात ‘जोबीकोबी’ ने. नंतर नंतर मी पुढे उभी आहे हे दिसलं, की शेजारचा काका हाक मारायचा, ‘जोभी…’
मी वळून पाहिलं, की लगेच ‘… हो तुम खुदा की कसम, लाजवाब हो…’ म्हणायचा!
असं दोनतीनदा घडल्यावर मात्र ‘जोबी’ हाक ऐकली तरी मी नाजवाब होत असे!
माझे वडील लिहिताना ‘जोबी’ तर आई ‘ज्योबी’ लिहायची.
जो भी हो, बाबी, बेबी, प्रभी, शोभी यांच्या प्रभावळीत ‘जोबी’ बसलं ते बरं झालं नाहीतर चाळीत रुळायला वेळ लागला असता… नावाला.
माझ्या लहानपणी नात्यात, शेजारीपाजारी ‘ब’ ची बाराखडी जोरात होती.
बंडा (डॅडी), शेजारी बंडू आणि पुढे बंड्या. खाली बंडी (बराच लहान). क्वचित उपरोधाने ‘बंडोपंत!’ही पुरुषांची नावे.
नाही म्हणायला एक बंडाताई होत्या – हयात असल्या तर वय १०० असेल – पण त्या अपवादानेच.
मुलींना पाळण्यात ठेवताना चार अक्षरी अर्थपूर्ण, सुंदर नावं उच्चारली जायची. हाक मारताना बाबी, बगी, बेबी!
नावात काय आहे म्हणा…!
ब, बा…बाळ, बाळा, बाळू आणि बाळ्या या सर्वांत फरक आहे. नामों के भी कुछ उसूल होते हैं!
माझ्या माहेरी ‘बाळू’ म्हणजे सांगलीचा? बाबीकाकांचा? स्वातंत्र्यवीर बाळू? ते तसे स्वा.वी. नव्हते पण, कोकणात पडलेले नाव – उपरोधानेच असणार! एरवी त्यांचा उल्लेख ‘पोपट बाळू’ म्हणून व्हायचा! नाकामुळे! असो.
एका बाळूला ‘धोंडा काडगा’ म्हणायचे पण तो बाळू, त्याचे कुटुंब, हे जबरदस्त अभिधान बहाल केलेली सगळी मंडळी आता या जगात नाहीत.
जो गुण बाळा, तो गुण बाबल्या!
पुलंचे ‘बटाट्याची चाळ’ वाचलं आहेत ना? त्यातला एक मुलगा “हा चाळभर काशिनाथ नाडकर्णीचा मुलगा म्हणून ओळखला जातो.” आम्हां चाळवासियांना हे चांगलं ठाऊक होतं.
एक दिवस माझी आई कामावरून घरी आल्यावर म्हणाली, ‘बाबल्या खांडेकरचा मुलगा आमच्याकडे लागला आहे.’
मी लगेच बाहेर जाऊन कोणाला तरी सांगितलं.
‘बाबल्या खांडेकर’ डॅडींहून ७-८ वर्षांनी मोठे असतील! त्यांना चाळ सोडून अनेक वर्षं झाली होती, मी त्यांना ओझरतंच पाहिलं होतं; पण इतरांच्या तोंडचा एकेरी उल्लेख माझ्याही अंगवळणी पडला होता.
‘बाबू’ हे संबोधन त्या मानाने नवे. ‘बाबा’ मात्र प्रचलित होतं. डॅडींचा एक मित्र होता ‘बाबा लेले’ नावाचा. मला ‘बाबा’ या नावाची गंमत वाटायची. त्यांना मुलं व्हायच्या आधीपासून ‘बाबा’ अशी हाक मारली जायची.
‘बाबा आलाय गं, जरा चहा कर… ’ मग काय, घोटभर चहा पीत ‘बंडा, बाळ आणि बाबा’ गप्पा मारायचे!
ह्या सगळ्या माणसांचे चेहरे माझ्या मनात ‘फ्रोझन’ आहेत. त्यांच्या चाळिशीतले, आपापल्या संसारात आणि जागेत रमलेले पण एकमेकांशी जोडलेली नाळ जपणारे..
दादा, नाना, अप्पा, अण्णा आणि भाऊ. ताई, माई, बाई, अक्का, बाया…ही नावं भरल्या घरात शोभायची. घरातली आणि बाहेरून आलेली चुलत/मामे भावंडंदेखील एकत्र वाढायची. मग वय, मान आणि आवड यानुसार गरजेप्रमाणे नव्या हाका मारल्या जायच्या. नावाची संक्षिप्त रूपंदेखील असायची. राजाराम – राजा आणि मग राजाभाऊ. जनार्दंन – जनू ते जनूभाऊ – प्रमोशन पन्नाशीनंतर! कुटुंबातील पहिल्या मुलाला बरेचदा कौतुकाने घरातील वडीलधाऱ्या सासऱ्यांचे नाव ठेवले जायचे. आता त्या मुलाला ‘मामंजींच्या’ नावाने एकेरी हाक कशी मारायची! मग हौसेने पर्यायी नावं! एक वर्षाच्या मुलाला सच्चिदानन्द म्हणायचं? त्याऐवजी रमेश! किंवा तत्सम सुटसुटीत संबोधन.
काही प्रेमाची तर काही मानाची; शिवाय नजर लागू नये म्हणून दिलेली ओबडधोबड संबोधने वेगळी! गोऱ्यापान मुलीला काळं, सुंदर मुलीला ठकं वगैरे. ‘नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ’ याचबरोबर टोपणनावाचा उगमदेखील शोधू नये.
मोठ्या नावाचं छोटं रूप शोधून प्रेमाने हाक मारायची ही प्रथा जगभर दिसून येते. रशियात ‘व्लादिमिर’चे ‘वालोदिया’ होतं, इटलीत ‘अंतोनियो’चं ‘आंतो’ किंवा धाकटा असेल तर ‘तोनिनो’ होतं; पण दादा, नानादी संबोधनं मोठ्या भावासाठी राखून ठेवणं हे भारतीयांचे वैशिष्ट्य. त्यातून ‘ब’ ची बाराखडी तर मराठी लोकांची खासियत. नावात काय आहे म्हणा…!
नावात काय आहे ना – तर एक लयाला जात चाललेली संस्कृती.
