रेल्वेमध्ये आणि रेल्वे परिसरात प्रवाशांना जितक्या सोई दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सोई कोणत्याही वाहतूक व्यवस्थेत दिल्या जात असतील असे मला तरी वाटत नाही. उदा. स्टेशनवरील फुकट Wi-Fi, सर्व प्रकारच्या उद्घोषणा, डिजिटल घड्याळे, प्रतीक्षागृह, स्नानगृहे, शौचालये, वेगवेगळी Apps, घरात बसून आरक्षण इ. अर्थात, प्रसंगी या सोई-सुविधांचा दर्जा कमी जास्त होत असेलही. मुंबईमध्ये मी रेल्वे आणि रेल्वे परिसर येथेच राहणारे लोक पाहिलेत, ते फक्त आठवडा किंवा १५ दिवसांनी घरी किंवा लॉजवर जातात; नाहीतर एरवी रेल्वेची बोगी हेच त्यांचे घर! रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या सोईसुविधांचा ते इतका वापर/गैरवापर करतात आणि मासिक रेल्वे पासचा पुरेपूर उपभोग घेतात. फुकट्यांची भारतात काही कमी नाही. असो आपल्याला काय करायचंय!
रेल्वे स्टेशन आणि रेल्वे हॉस्पिटल आणि रेल्वेच्या इतर आस्थापना (प्रशिक्षण केंद्रे, शाळा आणि सरकारी निवासस्थाने) या ठिकाणी योग्य त्या सोईसुविधा पुरवल्या जातात का नाही? याबद्दल रेल्वेमध्ये एक व्यवस्था आहे : SIG (Service Improvement Group). यामध्ये सर्व क्षेत्रांतील अनुभवी अधिकारी आणि विभागप्रमुख असे कर्मचारी निवडले जातात आणि ज्या ठिकाणी भेट दिली आहे त्याबाबतचा एक एकत्रित अहवाल (Joint Note) भेटीनंतर, तयार केला जातो आणि त्या आस्थापनांच्या भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि त्या दूर करण्याचा कालावधी त्यात नमूद केला जातो आणि संबंधित विभागाकडून त्या ठिकाणी आढळलेल्या त्रुटी त्या नेमून दिलेल्या कालावधीत दूर केल्या जातात. अशा ठिकाणच्या भेटीदरम्यान काही गंभीर/ मजेशीर प्रसंग घडतअसतात.
अशाच एका रेल्वे दवाखान्यात आम्ही मुद्दाम जनरल वॉर्ड निरीक्षणास गेलो असता, एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला निरीक्षणादरम्यान तहान लागली. हा अधिकारी एका दुसऱ्या रेल्वे झोनमधून त्याला झालेल्या शिक्षेमुळे (Administrative Action) सोलापूर मंडलात आला होता. भारतीय सैन्यदले आणि रेल्वे ह्या दोन संस्थांमध्येच कोर्ट मार्शल आणि Disciplinary and Appeal Rule आहेत. त्याने पाणी मागितले. एका वॉर्डबॉयने तिथल्याच एका नळाचे पाणी एका ग्लासमध्ये घेतले आणि त्याला दिले. तो ते पाणी पिणार एवढ्यात Duty वर असलेल्या डॉक्टरने त्यांना ते पाणी पिऊ दिले नाही. आणि सीलबंद पाण्याची बाटली त्यांच्यासमोर पुढे केली. त्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने (Non Medico होता ) त्या डॉक्टरला चांगलेच झापले. “जो मरीज पानी पिते हैं, वो हम पी नहीं सकते? क्या खराबी है इस पानी में?” आणि एका आठवड्यात सगळीकडे R.O चे फिल्टर लागले गेले. याउलट एका रेल्वे स्टेशनावर फेरीवाले, त्यांचे बाटलीबंद पाणी विकले जावे म्हणून स्टेशनवरील पिण्याच्या पाण्याचे नळच तोडून टाकत. अशा वेळी मला शाळेतील मराठी विषयातील श्री.म.माटे यांचा धडा आठवला : ‘देश म्हणजे देशातील माणसे.’ तो धडा अभ्यासक्रमातून कधीच वगळला जाऊ नये.
रेल्वे स्टेशनावरील उद्घोषणा ह्या कायम स्त्री-स्वरात असतात. याचे तांत्रिक कारण आहे. अशाच एका स्टेशनवरून एक नवीन गाडी जाणार होती. गाडी क्रमांक आणि त्या स्टेशनवर येण्याची वेळ आम्हांला गाडी यायच्या आधी काही तासच कळवली गेली. स्त्रीस्वरात ती उद्घोषणा तयार करण्यास आणि स्टेशनवर प्रसारित करण्यास खूपच वेळ जाणार होता. तोपर्यंत ती गाडी त्या स्टेशनवरून जाणार होती. “अडचण सोडवू शकत नसेल तर तो इंजीनियर कसला,” आणि “अवघड गोष्टींचा उपाय सोपा असतो” इति. आमचे प.पू ( माझे वडील). त्यांचे हे वाक्य आठवत मी नवीन गाडीच्या उद्घोषणेच्या तयारीला लागलो.
ज्या रेल्वेस्टेशनावरून ती गाडी जाणार होती त्या स्टेशनावरील संगणकामध्ये इतर गाड्यांच्या उद्घोषणा (मराठी/ कन्नड/हिन्दी /इंग्लिश) ह्या भाषांत होत्याच आणि त्यांच्या आगमन आणि प्रस्थान ह्यांच्या स्त्रीस्वरातील Sound Filesही होत्या. फक्त नव्हते ते स्त्रीस्वरातील नवीन गाडी क्रमांक आणि गाडीचे नाव. तेवढाच स्वर मी माझ्या स्वरात रेकॉर्ड केला आणि तोच वापर करून मी त्या नवीन गाडीच्या उद्घोषणेचा एकत्रित भाग माझ्या आवाजात आणि उरलेला भाग स्त्री-स्वरात तयार केला आणि उद्घोषणा (announcement) तयार झाली. ‘गाडी क्रमांक आणि गाडीचे नाव माझ्या (पुरुष स्वरात ) आवाजात आणि अमुक अमुक फलाटावर येत आहे हे स्त्रीस्वरात. आम्हांला ऐकताना ती उद्घोषणा वेगळीच वाटली; कारण कानाला झालेली स्त्री-स्वरांची सवय! नवीन गाडी येण्याआधी आमचे सिनियर आले. त्यांना मी हे सर्व सांगितले आणि उद्घोषणा ऐकवली. ऐकल्यावर त्यांनी माझे आपादमस्तक निरीक्षण केले. माझे कौतुक करावे का माझ्यावर तोंडसुख घ्यावे? हा प्रश्न त्यांना पडला असावा असे मला वाटले. मी त्यांना म्हणालो, “सर, और कोई रास्ता नहीं था.” “जुगाड बढ़िया है, लेकिन उसको क्या बोलना? (त्यांचे सिनियर जास्तच खोचक होते.) मी लगेच म्हणालो, “यात्रियों का ध्यान आकर्षित करने हेतु.” ऐसा जवाब देंगे. ते म्हणाले, “ठीक है, देखेंगे.” गाडी आली. त्या नवीन गाडीची उद्घोषणा केली गेली. हार, तुरे, फित कापणे झाले. पेढे वाटले, इंजिनाच्या चाकाखाली लिंबे ठेवली. गाडी पुढे मार्गस्थ झाली. माझ्या सिनियरच्या सिनियरने आम्हां दोघांना बोलवले. चहा पाजला. वेळ मारून नेली याबद्दल माझे कौतुकही केले. नंतर त्या गाडीची उद्घोषणा पूर्णपणे स्त्री स्वरात करण्यास सांगून ते नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसले. मी आणि माझे सिनियर आणि इतर विभागाचे कर्मचारी आमच्या विशेष निरीक्षण गाडीत बसलो आणि सोलापूरकडे मार्गस्थ झालो. त्या वेळी मला प्रसिद्ध लेखक श्रीयुत पॉल हौक (Paul Hauck) यांचे वाक्य आठवले, ‘कोणतीही गोष्ट चांगली करण्यापेक्षा ती आधी ‘करणे ‘महत्त्वाचे असते.’ त्या वेळी सोलापुरात साऊंडप्रूफ रेकॉर्डरूम नव्हती. त्यामुळे ती उद्घोषणा तयार करण्याचा ईमेल मी सदर कंत्राटदाराला पाठवला आणि स्त्रीस्वरात उद्घोषणा तयार करण्यासाठी सांगितले.
सोलापुरात आल्यावर नमूद केलेल्या ह्या नवीन गाडीबद्दल नवीन माहिती मिळाली. त्या वेळचे एक अतिशय ‘सभ्य’ रेलमंत्री यांची नात एका मेडिकल कॉलेजला जात होती. तिचे कॉलेजला जाणे येणे सोपे व्हावे म्हणून त्या गाडीचा प्रवासाचा मार्ग आणि त्या गाडीची वेळ त्यांच्या नातीच्या कॉलेजच्या वेळेप्रमाणे आखले गेले आणि नातीची सोय आजोबांनी केली. नंतर ते मायबाप सरकार गेल्यावर त्या गाडीची वेळ जन-सामान्यांकरिता सोयीची अशी केली गेली.
असेच एका दमदार नेत्याने आपल्या गावातील स्टेशनाला ‘अमुक अमुक गाडीचा थांबा करेनच,’ असे आश्वासन तेथील गरीबबापुड्या जनतेला दिले. हा निव्वळ स्टंट होता. त्या स्टेशनाहून तेवढे जाणारे आणि येणारे प्रवासीही नव्हते.
रेल्वेत एक अलिखित नियम आहे : ज्या स्टेशनावर गाडीचे आगमन, गाडीचा थांबा आणि प्रस्थान यामध्ये जितके इंधन खर्ची पडते तेवढ्या किमतीची कमीत कमी तिकीट विक्री होणे आवश्यक आहे. याकरिता काही अनामत रक्कम रेल्वेकडे भरावी लागते. (आता नियम बदलला असेल.) कमी तिकीट विक्री झाली तर त्या अनामत रकमेमधून तेवढी रक्कम कापून घेतली जाते. त्या दमदार नेत्याने भरलेली अनामत रक्कम अवघ्या दोन आठवड्यांतच संपली आणि शेवटी त्या गाडीचा थांबा काढावा लागला. नंतर कळले, की तो त्याच्या काही कार्यकर्त्यांना गाडीचा थांबा टिकावा म्हणून त्या गाडीने जाणे येणे करण्यास सांगत होता.

