वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर : जीवनमूल्यांना समर्पित साहित्यिक

ज्ञानपीठ पुरस्कारांच्या दशकपूर्ती वर्षात विष्णु सखाराम खांडेकर या मराठी साहित्यविश्वाच्या सुपुत्राला हा सन्मान मिळाला. तसे पाहता आदल्याच वर्षी हा पुरस्कार मिळवणारे द.रा.बेंद्रे हे मूळचे मराठी भाषकच;पण त्यांचे बहुतांश आणि महत्त्वाचे साहित्य कन्नड भाषेत होते. १९७४ मध्ये हा पुरस्कार प्राप्त करणारे खांडेकर हे तत्कालीन लेखकांमधील ज्येष्ठ होते, पण पुरस्कारासाठी हे काही एकमेव वा सर्वात महत्त्वाचे कारण नव्हते. त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे मूल्यमापन करताना नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात, “समकालीन वास्तवांच्या जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून ललित साहित्याची निर्मिती करणाऱ्या मोजक्या लेखकांमध्ये खांडेकरांचा समावेश होतो.”
खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगलीमध्ये झाला. त्यांचे वडील सांगली संस्थानात नोकरीला होते. खांडेकरांचे बालपण आणि शालेय शिक्षण तेथेच झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आणि वाचनाची प्रचंड आवड होती. अभ्यासातही त्यांची चांगली गती होती. शालांत परीक्षेत ते राज्यात आठवे आले होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण घेत असतानाच ते राम गणेश गडकरी यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे जणू भक्तच झाले; पण अचानक वडिलांची तब्बेत बिघडली. खांडेकरांच्या सेवाशुश्रूषेला यश लाभले नाही. कसलीही कल्पना नसताना त्यांना कोकणातल्या चुलत्यांकडे दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. चुलत्यांना मूलबाळ नव्हते आणि त्यांच्या गाठीशी चार पैसे, शेतीवाडी होती हे त्यामागले कारण असावे. काकांनी शिक्षणासाठी पैसे देण्यास साफ नकार दिला. तरीही खांडेकर शिक्षण चालू ठेवू इच्छित होते. पुढल्या तीन वर्षांच्या गंभीर आजारपणानंतर त्यांची प्रकृती तोळामासाच राहिली. त्यामुळे शिक्षणाचा नाद सोडून उदरनिर्वाहासाठी अखेर त्यांनी कोकणातील शिरोडे गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाच्या नोकरीचा प्रस्ताव स्वीकारला. १९२० ते १९३८ अशी अठरा वर्षे ते आधी शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून तेथे राहिले. नोकरीच्या सुरुवातीस महिना २० रुपये असलेले वेतन नोकरीअखेरी केवळ ४० रुपयांपर्यंत पोहोचले होते. इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि बीजगणित हे विषय ते शिकवत. ग्रामीण भागातील दारिद्र्य, अंधश्रद्धांचा प्रभाव, कष्टकऱ्यांचे जीवन आणि सामाजिक विषमता त्यांनी जवळून पाहिली, प्रत्यक्ष अनुभवली, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत साहजिकच उमटले.
नोकरीला लागण्यापूर्वीच, १९१९ मध्ये खांडेकरांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. शिरोड्याच्या शांत वातावरणात त्यांना लेखनाला भरपूर वेळ मिळाला. त्यांच्या मित्राच्या ‘वैनतेय’ (हे नाव खांडेकरांनीच सुचवले होते.) या नियतकालिकासाठी संपादन साहाय्य आणि नियमित लेखन ते कधी स्वतःच्या नावाने तर कधी ‘कुमार’(कवितांसाठी) आणि ‘आदर्श’ (विनोदी लिखाणासाठी)अशा टोपण नावांनी करत. त्यासोबतच मराठीतील प्रसिद्ध मासिकांमध्येदेखील त्यांचे साहित्य प्रकाशित होत राहिले. ‘संगीत रंकाचे राज्य’ हे खांडेकरांचे सर्वप्रथम प्रसिद्ध झालेले पुस्तक. १९२६ मधील एका स्पर्धेसाठी लिहिलेल्या या नाटकाला बक्षीस मिळाले नसले तरी त्याचे काही प्रयोग मात्र झाले. आपले हे पहिले पुस्तक त्यांनी आपले ‘लेखनगुरू’ श्री. कृ. तथा तात्यासाहेब कोल्हटकरांना अर्पण केले. गडकऱ्यांच्या प्रथम स्मृतिदिनी खांडेकरांनी लिहिलेला “हा हन्त हन्त!” लेख वाचून कोल्हटकरांनी खांडेकरांशी पत्रव्यवहार सुरू केला. कोल्हटकरांनी त्यांची केवळ प्रशंसा केली नाही; तर लेखनातील दोष, कोठे सुधारणा हव्या याचे मार्गदर्शनदेखील केले. त्यांच्याच सल्ल्यानुसार कविता आणि विनोदी लेखन थांबवून खांडेकरांनी कथालेखनावर लक्ष केंद्रित केले. “१९२० ते ३० या दशकात लेखक या नात्याने माझी जी काही प्रगती झाली, तिचे सारे श्रेय श्रीपाद कृष्णांच्या पत्रांतल्या उत्तेजनाला, दोषदर्शनाला आणि पितृतुल्य आपुलकीला आहे,” असे खांडेकरांनी म्हटले आहे.
या काळात खांडेकर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्यादेखील सक्रिय होते. अस्पृश्यता, अंधश्रद्धा यांबाबत समाज-जागृती, स्वातंत्र्यलढ्यास अप्रत्यक्ष साहाय्य (अनुदानित शाळा असल्याने प्रत्यक्ष सहभाग शक्य नव्हता) ते जमेल तितक्या जोमाने करत होते. शाळेची स्वतःची इमारत व्हावी यासाठी खांडेकरांनी लोकांकडून फंड गोळा करण्याची मोहीम हाती घेतली व त्यातून काही वर्षांनी शाळेची इमारत उभी राहिली.
१९२९ साली ‘नवमल्लिका’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. कादंबरी लिहिण्याबद्दल सुरुवातीला त्यांना आत्मविश्वास नव्हता. मराठीमध्ये नाव घेण्यासारखे कादंबरीकार तोपर्यंत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच – ह.ना.आपटे, वा.म.जोशी, श्री. व्यं.केतकर आणि नव्याने उदयास आलेले ना.सी.फडके – हे होते. नाथ माधव, गो.ना.दातार ह्यांचे लेखन प्रामुख्याने ऐतिहासिक, कल्पनारम्य आणि परकीय साहित्यावर आधारित होते. कादंबरीचे साहित्यातील महत्त्वाचे स्थान ओळखून अखेर त्यांनी ह्या साहित्यप्रकाराला हात घातला व १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. पुढील १०-१२ वर्षांत त्यांच्या आणखी दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. कथालेखन चालूच होते. ‘रूपक कथा’ हा एक नवीन साहित्य प्रकार त्यांनी मराठीत आणला. ना.सी.फडके यांनी ‘गुजगोष्टी’ नावाने लघुनिबंध लिहिण्यास सुरुवात केली होती. खांडेकरांचे अशा प्रकारचे लेखन अधिक विचारप्रवर्तक होते. विविध विषयांवर समीक्षात्मक, तसेच साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील व्यक्तींवरील चरित्रात्मक लेखनदेखील ते करत होते. मराठी साहित्यात समकालीन व पूर्वसूरींबद्दल इतकं विपुल लिहिणारे खांडेकर हे एकमेव साहित्यिक होत.
१९३६ मध्ये मा. विनायकांच्या आग्रहावरून त्यांनी चित्रपटासाठी कथालेखन सुरू केले. ‘छाया’ कथेवरील चित्रपटाचे चांगले स्वागत झाले. पुढला चित्रपट ‘ज्वाला’ अपयशी ठरला तरी विनायकांनी त्यांची साथ सोडली नाही. शिरोड्यात राहून चित्रपटांसाठी लिहिणे गैरसोयीचे होऊ लागल्याने त्यांनी अखेर नोकरी सोडून कोल्हापूरला स्थलांतर केले. त्यांचे त्या नंतरचे वास्तव्य कोल्हापुरातच राहिले. खांडेकरांनी मराठी, हिंदी, तमिळ व तेलगू मिळून थोड्याथोडक्या नाही, तर एकूण २८ चित्रपटांसाठी कथा, पटकथा व संवाद आणि काहींसाठी गाणीदेखील लिहिली.खांडेकरांची चित्रपट क्षेत्रातील भरीव कामगिरी दुर्लक्षितच राहिली आहे.
ऐन विशीत सुरू केलेले लेखन खांडेकरांनी या ना त्या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून आयुष्यभर चालू ठेवले. वयाच्या चाळिसाव्या वर्षापर्यंत त्यांची सांपत्तिक स्थिती ओढगस्तीचीच होती. तिसाव्या वर्षानंतर विवाहबद्ध झालेल्या खांडेकरांची इच्छा पत्नीने शिकून साहित्यात थोडाफार रस घ्यावा अशी होती. उषाताईंनी मात्र संसाराची घडी नीट बसविण्यास प्राधान्य दिले. खांडेकरांची प्रकृती तशी नाजूकच होती. सुरुवातीच्या दीर्घकालीन आजारानंतर शिरोड्यातील वास्तव्यादरम्यान त्यांना फुरसं चावलं. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर परिणाम झाला. त्यांची दृष्टी सुरुवातीपासूनच अधू होती, वयोमानानुसार ती आणखी बिघडत गेली, शेवटी शेवटी तर त्यांना अंधत्व आले. यातील कशाचाही खांडेकरांनी बाऊ केला नाही. आधी स्वहस्ते व नंतरच्या काळात लेखनिकाची मदत घेऊन ते लिहीत राहिले. साहित्यिक म्हणून त्यांची कीर्ती पसरल्यावर त्यांना साहित्य संमेलनासह अनेक ठिकाणी अध्यक्ष म्हणून बोलावले जाई. हळूहळू ते एक उत्तम वक्ता म्हणूनदेखील प्रसिद्ध झाले.
खांडेकरांची साहित्यसंपदा विपुल होती. १६ कादंबऱ्या,२५० कथा, ६ नाटके ( दुर्दैवाने त्यांच्या ५ नाटकांची हस्तलिखिते गहाळ झाली व ती अप्रकाशितच राहिली.), १०० हून अधिक लघुनिबंध, २०० पेक्षा जास्त समीक्षात्मक लेख, जवळपास १०० व्यक्तिचरित्रात्मक लेख, रूपक कथा, काव्य, चित्रपट कथा-पटकथा-संवाद, आत्मचरित्र, अनुवाद, पुस्तकांना प्रस्तावना असे ते सर्वार्थाने ‘समग्र साहित्यिक’ होते. खांडेकरांच्या प्रस्तावना हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्याना प्रदीर्घ प्रस्तावना आहेत. इतर लेखकांना – विशेषतः नवोदित लेखकांना – उत्तेजन देण्याच्या हेतूने खांडेकरांनी त्यांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. खांडेकरांच्या काही कादंबऱ्या अर्धवट लिहून झाल्या, तर काही संकल्पना-अवस्थेतच राहिल्या. ‘सोनेरी स्वप्ने’ ही त्यांची कादंबरी मृत्युपश्चात प्रसिद्ध झाली. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या प्रयत्नांनी ‘नवी स्त्री’ ही त्यांची अर्धवट राहिलेली कादंबरी संपादित स्वरूपात समोर आली. त्यांनीच पुढाकार घेऊन खांडेकरांचे अप्रकाशित व्यक्तिचरित्रात्मक ६० लेख ‘साहित्यशिल्पी,’ ‘समाजशिल्पी’ आणि ‘जीवनशिल्पी’ या पुस्तकांतून प्रकाशित केले आहेत.
खांडेकर हे अत्यंत गुणग्राही होते. कुसुमाग्रजांची काव्यप्रतिभा ओळखून त्यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह त्यांनी पुढाकार घेऊन प्रकाशित करवून घेतला. एवढेच नाही, तर त्याला सविस्तर प्रस्तावना लिहिली. त्यांचे लेखन आदर्शवादी, जीवनवादी आणि लालित्यपूर्ण होते. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज, उच्च मानवी मूल्ये आणि काव्यात्मक भाषाशैली ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये. त्यांच्या लेखनात त्याग आणि चांगल्या विचारांचा आग्रह असतो. कला केवळ कलेसाठी नसावी तर तिच्यातून काहीतरी प्रबोधन व्हावे या तत्त्वावर त्यांनी लेखन केले. शोषित आणि पीडित वर्गाच्या वेदनांना त्यांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडली. आगरकर, केशवसुत, ह.ना.आपटे हे त्यांचे आदर्श होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्या लेखनशैलीवर गडकरी आणि कोल्हटकर यांचा असलेला प्रभाव नंतरच्या काळात कमी झाला. तरीही त्यांचे लेखन काहीसे अलंकारिक राहिले; मात्र अनेक वाचक त्यांच्या या शैलीच्या प्रेमात होते हेही तितकेच खरे. खांडेकरांच्या अनेक पुस्तकांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. मराठीतून सर्वाधिक अनुवाद झालेलं साहित्य खांडेकरांचंच.
खांडेकरांना त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीदरम्यान अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले. १९४१ च्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाप्रमाणेच इतर अनेक संमेलनांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिल्याच वर्षीच्या साहित्य पुरस्कारांत ‘ययाती’चा गौरव झाला. विशेष म्हणजे त्याच वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी या कादंबरीची निवड झाली; १९७४ च्या ज्ञानपीठ पुरस्काराने ‘इजा-बिजा-तिजा’ झाले. १९६८ मध्ये खांडेकर ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित झाले, तर १९७० मध्ये साहित्य अकादमीने त्यांना फेलोशिप प्रदान केली. अशी फेलोशिप मिळणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून भारतीय टपाल विभागाने एक विशेष डाक तिकीट जारी केले.
त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्याची ओळख करून घेऊ या :
१९३४ मध्ये प्रकाशित झालेली ‘उल्का’ ही खांडेकरांची एक आवडती कलाकृती होती. समाजाने बहिष्कृत केलेल्या एका तत्त्वनिष्ठ शिक्षकाची मुलगी तारा (उल्का) हिच्या आयुष्यातील संघर्षावर ती आधारित आहे. मानवी स्वभावातील लबाडी, स्वार्थ आणि नीतिमत्ता यांतील संघर्ष या कादंबरीत चितारला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीची पार्श्वभूमी असलेली ही एक सामाजिक, तात्त्विक कादंबरी होती.
‘क्रौंचवध’ही एक सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी आहे. तिच्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणांची ध्येये, त्यांचे प्रेम आणि जीवनातील संघर्ष यांचे चित्रण आहे. रामायणातील क्रौंच पक्ष्याच्या शिकारीवरून खांडेकरांनी ही कल्पना विस्तारली आहे. समाजातील दुष्ट शक्तींनी चांगल्या प्रवृत्तींचा केलेला वध आणि त्यातून निर्माण होणारी वेदना यात मांडली आहे.
१९५९ मधील ‘ययाती’ म्हणजे महाभारतातील कथेचा आधार घेऊन आधुनिक मानवाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी रचना आहे. ‘भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः’ (भोग आपण भोगले नाहीत, तर भोगांनीच आपल्याला भोगले.) हा कादंबरीचा मुख्य संदेश आहे. ययाती राजाची देवयानी ही पत्नी असताना शर्मिष्ठा या दासीच्या सौंदर्याने मोहित होऊन तो तिच्याशी विवाह करतो. देवयानीचे पिता शुक्राचार्य यांच्या शापाने त्याला येऊ पाहणारे वृद्धत्व टाळण्यासाठी तो आपला मुलगा पुरू याचे तारुण्य मागून घेतो, कारण त्याची भोगलालसा अनावर असते. माणसाची कधीही न संपणारी विषयवासना आणि संयम यांतील द्वंद्व खांडेकरांनी प्रभावीपणे मांडले आहे. काव्यात्मक आणि विचारप्रवण भाषेने कादंबरी नटली आहे.
खांडेकरांच्या आयुष्याच्या अखेरच्या १५-२० वर्षांत, विशेषतः त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर मंदाकिनी या त्यांच्या कन्येने त्यांची चांगली काळजी घेतली. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्याजोगी त्यांची प्रकृती नसतानाही या पुरस्काराचे महत्त्व ओळखून दिल्लीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फेब्रुवारी ७६ ला झालेल्या समारंभात खांडेकरांना दिलेल्या मानपत्रातील चार ओळी पुढीलप्रमाणे :
“त्यांच्या गद्य/पद्य लेखनात गांधीवादाचा आणि समाजवादाचा एक अनोखा संगम आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अनुवादाच्या माध्यमातून देशातील अगणित वाचकांना त्यांच्या साहित्यातून दिशादर्शक दृष्टिकोण प्राप्त झालेला आहे. प्रतिकूल परिस्थिती, प्रकृतिअस्वास्थ्य आणि दृष्टिविहीनता आलेली असूनही खांडेकरांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य सुरूच ठेवले.”
पुरस्कार स्वीकाराच्या खांडेकरांच्या भाषणातील काही अंश असे होते :
“मी माझ्या अर्धशतकी लेखनजीवनाकडे वळून बघतो, तेव्हा मला स्टीवेन्सनच्या एका कवितेचे स्मरण होते. त्यात एक लहान मुलगा कागदाच्या छोट्या छोट्या नावा करून पाण्यात सोडत राहतो आणि त्या समुद्रापर्यंतच नाही, तर त्याही पलीकडे जाऊन पोहोचतील असा विश्वास मनात बाळगतो. सर्जनशील साहित्यिकाचंही असंच असतं. अबोध बालकाप्रमाणे तोही स्वबलामध्ये, कल्पनेमध्ये जगत राहतो.
दिल्लीहून परतल्यावर खांडेकरांचा मराठी साहित्य परिषदेतर्फे पुण्यात मोठा सत्कार झाला. कोल्हापूरला गेल्यावर शिवाजी विद्यापीठाने एका खास समारंभात त्यांना सन्माननीय डी.लिट. पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली. अखेर मिरजेच्या वानलेस इस्पितळात उपचारांदरम्यान २ सप्टेंबर ’७६ ला त्यांची प्राणज्योत मालवली. एका दीर्घ साहित्यप्रवासाची अखेर झाली. आज समाजातील मूल्ये झपाट्याने ढासळत चाललेली असताना खांडेकरांचे साहित्य निश्चितच योग्य दिशा दर्शवू शकते.
Chintan – Maza Sahityik Drushtikon by V. S. Khandekar । वि.स.खांडेकर । Akashvani Pune
