एका स्नेहसंमेलनात मला एक ओळखीचा मुलगा भेटला.
“काय म्हणताय? किती दिवसांनी भेटतोय आपण!” असं म्हणत त्याने हात पुढे केला. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याच्या हाताची पकड अगदी सैल होती. तेवढ्यात माझा नवरा आला आणि त्या मुलाने त्याच्याशीही हस्तांदोलन केलं. या वेळी मात्र ती पकड अगदी घट्ट, आत्मविश्वासपूर्ण होती. तो फरक इतका स्पष्ट होता, की मला तो जवळजवळ विनोदी वाटला.
दुसऱ्या वेळी मला याच्या अगदी उलट अनुभव आला. एकदा एका माणसाने माझ्याशी अगदी नेहमीसारख्या, घट्ट पकडीने हस्तांदोलन केलं. त्यात संकोच नव्हता. नंतर संध्याकाळभर मी पाहत होते, की तो इतरांनाही, स्त्रियांनाही अगदी तसंच हस्तांदोलन करत होता. समोर कोण आहे यावर त्या कृतीचा सूर अवलंबून नव्हता. ते फक्त एक साधं आणि व्यवस्थित केलेलं हस्तांदोलन होतं.
हे दोन्ही अनुभव आणि त्यांच्यातलं छोटंसं पण मनोरंजक निरीक्षण मनात रेंगाळत राहिलं. एकदा असं काही लक्षात आलं, की मग ते नजरेआड करणं कठीण असतं. गेटटुगेदर असो, एखादा कार्यक्रम असो किंवा मित्रमंडळींच्या भेटीतल्या ओळखी करून देण्याचा प्रसंग असो, हा छोटासा फरक पुन्हा पुन्हा जाणवू लागला. एखादा पुरुष स्त्रीशी हस्तांदोलन करताना त्याची पकड हलकी, किंचित साशंक असे. जणू हात आधी पुढे आला आहे आणि आत्मविश्वास अजून दोन पावलं मागे उभा आहे. “हे ठीक आहे ना?” असा एक मूक प्रश्नच त्या स्पर्शातून विचारला जायचा आणि तोच माणूस एखाद्या पुरुषाशी हात मिळवत असताना ती कृती पूर्ण वेगळी असायची. घट्ट पकड, हलकंसं हलवणं, कधीकधी खांद्यावर थाप. जणू ती कृती अचानक अधिक नैसर्गिक व्हायची.
एक प्रश्न मनात घोळत राहिला, की हा फरक का दिसतो? पहिल्यांदा हा विचार आला तेव्हा त्याचं मी शोधलेलं उत्तर थोडंसं कठोर होतं. पुरुष जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या तुल्यबळ मानतात तेव्हा त्यांच्या हाताची पकड घट्ट असते, जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला स्वतःपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी लेखतात तेव्हा पकड सैल होत असेल. त्यांच्या नकळतच हा सामाजिक फरक व्यक्त होत असावा असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आणि मग याबद्दल विचार करायला लागण्याचं मूळ कारण – तो ओळखीचा मुलगा – आठवलं. मी त्याला बरीच वर्षं ओळखते. तो महिलांना दुय्यम समजणाऱ्यांपैकी आहे असं कधी जाणवलं नव्हतं; म्हणजेच या फरकामागे माझ्या सरधोपट व्याख्येपेक्षा अधिक गुंतागुंतीची कारणं असणार हे लक्षात आलं.
आपल्या समाजात अनेक पुरुष लहानपणापासून एक गोष्ट ऐकत मोठे होतात – स्त्रियांशी वागताना जपून, हळुवार वागावं. त्यामुळे हस्तांदोलनाचा प्रसंग आला, की ते नकळत पकड हलकी करत असावेत. थोडक्यात हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे होतं. त्या व्यक्तीच्या मनात ते सभ्यतेचं लक्षण असू शकतं.
भारतीय सामाजिक संदर्भात अनोळखी स्त्री-पुरुषांमधला शारीरिक स्पर्श अजूनही थोडासा अनिश्चित प्रदेश आहे. त्यामुळे काही पुरुषांना घट्ट हस्तांदोलन केल्याने आपण जास्त मोकळेपणाने वागतोय असं वाटेल की काय अशी भीती असू शकते. मग ते नकळत पकड सैल ठेवत असतील. पुरुष अनेकदा इतर पुरुषांशी हस्तांदोलन करत मोठे होतात. त्यात एक प्रकारची सवय आणि सहजता तयार होते. स्त्रियांशी तसं हस्तांदोलन करण्याची सवय कमी असल्यामुळे कृती थोडी अवघडलेली वाटू शकते.
यात आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. हस्तांदोलन ही पद्धत आपल्या पारंपरिक सामाजिक संस्कृतीचा भाग नव्हती. ती आपण हळूहळू स्वीकारलेली पाश्चात्त्य सवय आहे. आपल्याकडे अभिवादनाचे इतर अनेक सहज मार्ग आधीपासून आहेत. हलकीशी मान डोलावणं, स्मित करणं, नमस्कार म्हणणं, नमस्ते करणं. या कृतींमध्ये स्पर्शाची गरज नसते आणि तरीही अभिवादन पूर्णपणे सुसंस्कृत आणि सन्मानपूर्वक करता येतं. त्यामुळे हस्तांदोलन कधीकधी अजूनही थोडंसं परकं वाटतं. आपण सध्या एका सामाजिक स्थित्यंतरातून जात आहोत जिथे पारंपरिक संकोच आणि आधुनिक समानतेची सवय एकत्र दिसतात. काही जण या बदलाशी सहज जुळवून घेत आसवेत तर काहींना थोडा वेळ लागत असेल. त्यामुळे अशा छोट्या विसंगती दिसत असाव्यात.
हस्तांदोलन ही तशी बघता काही सेकंदांची कृती आहे; पण त्या काही सेकंदांत बरंच काही जाणवतं. अनेकदा ते काहीच सांगत नाही. पण कधीकधी माणूस जाणीवपूर्वक काही व्यक्त करायचा प्रयत्न करत नसतानाही बरंच काही स्पष्ट होतं. दैनंदिन आयुष्यातल्या अशा छोट्या कृतींकडे आपण सहसा लक्ष देत नाही; पण कधीकधी त्यातून समाजातल्या खोलवरच्या सवयींची झलक दिसते. संस्कार, सभ्यता, संकोच, सवय, अभिसंधान, आत्मविश्वास आणि कदाचित नकळत उमटणारी सामाजिक रेषाही. कदाचित हा सगळा अर्थ आपणच त्यात शोधत असतो. कदाचित तो तिथे नसतोही; पण एक गोष्ट मात्र खरी आहे. एकदा हा फरक दिसायला लागला, की त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण होतं.
आणि म्हणूनच हा छोटासा प्रश्न मनात राहतो. जर एखाद्याला स्त्रीशी किती घट्ट हस्तांदोलन करावं याबद्दल शंका किंवा संकोच वाटत असेल तर हात पुढे करायची गरजच काय? आणि जर हात पुढे केला आहे तर तो आत्मविश्वासाने का नाही मिळवला जात?
प्रिया साठे
