अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (१२) 

आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत. 

भाग १२ 

 आठवणींच्या लोलकातून आकाशवाणी

हे पुराण ऐकता-ऐकता, लिहिता-लिहिता आज आकाशवाणीचा शेवटचा भाग सादर करण्याचा दिवस उजाडलाय. शेकडो आठवणींनी माझ्या मनात रिंगण मांडलेय. प्रभाव आणि उपयुक्ततेसह आकाशवाणीचे एक लोभस प्रतिबिंब मी या रिंगणात पाहतोय. तुम्हांलाही ते दिसेल. या माध्यमावर लोकांनी मनापासून प्रेम केलं हे सत्य आहे.खंडवा-इंदोर परिसरात जलसंवर्धन उपक्रम पाहायला एकदा राष्ट्रपती ए. पी. जे.अब्दुल कलाम आले होते. आम्ही नेहमीप्रमाणे रेकॉर्डिंग केले. वृत्तांत प्रसारित झाले आणि ही आठवण मागे पडता पडता २० ऑक्टोबर २००३ च्या इंदोरच्या ‘नई दुनिया’ या प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्रात एक बातमी वाचली : राष्ट्रपतींनी एका परदेशी दौऱ्यात विमानात पत्रकारांशी गप्पा मारताना मला रेडिओ ऐकायला फार आवडतो आणि सादरकर्ता होऊन लोकांना आपले अनुभव ऐकवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. रेडिओतल्या तमाम मंडळींना अभिमान वाटेल अशी ही बातमी.

तांत्रिकदृष्ट्या प्रभावी असूनही सुरुवातीला एफ. एम.ची योजना पुरेशी यशस्वी होऊ शकली नाही याचे कारण मोठे विचित्र होते. अगदी १९९५ पर्यंत बाजारात पुरेसे एफ. एम.बँडचे रेडिओच उपलब्ध नव्हते. स्टेशन आहे पण रेडिओ संच नाही, अशी स्थिती  बराच काळ होती. धोरणकर्त्यांना हे का लक्षात आले नाही याचे आश्चर्य वाटायचे. एका केंद्राचा प्रमुख म्हणून तर आम्ही प्रस्तावही पाठवला होता, की कलाकारांना मानधनाचा भाग म्हणून एफ. एम. रेडिओ संच भेट द्यावा; पण ही सूचना  कोणी गांभीर्याने घेतली नाही. या स्थितीत सुधारणा झाली पण अगदीच मंद गतीने.

  *

काही प्रदेशांमध्ये मराठी भाषक मोठ्या संख्येने असूनही तिथल्या केंद्रांत मराठी कार्यक्रमांना स्थान नव्हते. उदा. :  इंदोरमध्ये १९७९ दरम्यान तेथील लेखक, कवी, साहित्यिकांनी आंदोलन केले, मोर्चा काढला आणि अंतिमतः १९८० मध्ये केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी मराठी कार्यक्रम इंदोरहून नियमित चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. प्रदेश, भाषा, बोलीभाषा, लोकसंख्येचे प्रमाण इत्यादींचा सखोल अभ्यास करून कार्यक्रमाची पुनर्रचना होण्यास आजही वाव आहे. अर्थात ‘कुठलेही स्टेशन कुठेही’ ऐकू येण्याची देणगी देणाऱ्या अ‍ॅपमुळे या प्रश्नाची तीव्रता कमी झाली असली तरी अन्य भाषकांचा सहभाग वाढवायला अशा अभ्यासाची मदत होईल. कार्यक्रमात स्थानिक लोकपरंपरेतील सर्व प्रमुख घटकांना प्रतिनिधित्वाचा आता नव्याने विचार करावा लागेल. उदा. पुण्यात आठवड्यातून एखादा बंगाली कार्यक्रम का नसावा? उलट अशा प्रयत्नातून एकात्मता बळकट होईल.

*

माझे एक वरिष्ठ सहकारी आणि स्नेही – संचालक विश्वनाथ पांडे यांनी ‘संप्रेषण और रेडिओ’ हे सुंदर पुस्तक २००५ मध्ये लिहून आपले अनुभव मांडले आहेत. २००४ मध्ये ऐतिहासिक त्सुनामीने जेव्हा अंदमानात कहर उडवला त्या वेळी सुमारे अकरा हजार लोक मृत्युमुखी पडले. जवळपास साडेपाच हजारजण बेपत्ता होते आणि हजारो लोक बेघर झाले.९.३ रिस्टर स्केलच्या भूकंपातून ही त्सुनामी आपत्ती कोसळली होती. बारा मीटर्स (जवळपास ४० फूट) उंचीच्या लाटा किनाऱ्यावरच्या लोकांनी अनुभवल्या होत्या. दळणवळण यंत्रणा पूर्ण ठप्प असताना अंदमान रेडिओने सलग काही आठवडे संवादाचा पूल प्रस्थापितकरून हजारो बेपत्ता लोकांचा – नातेवाइकांचा परस्पर संपर्क प्रस्थापित केला. उपलब्ध मदतीची आणि मदतकार्याची माहिती विनाव्यत्यय प्रसारित करून लोकांच्या मनात हळूहळू धैर्य निर्माण केलं. आपत्तीला तोंड देण्याची मानसिकता अखंड प्रसारणातून निर्माण करायचा प्रयत्न केला. मला हे अनुभव वाचताना आपल्याकडच्या किल्लारी भूकंपातील विनाशाचीआठवण झाली. तेथेही उद्ध्वस्त आणि बेघर अवस्थेतील लोकांना आपल्या नजीकच्या नातेवाइकांशी ख्याली-खुशाली कळवायला आकाशवाणी औरंगाबादच्या चमूने अहोरात्र संपर्क-प्रसारण चालू ठेवले. मदतीचा ओघ आणि वाटप याबाबतींत वस्तुस्थिती-निदर्शक माहिती, बातम्या नियमित चालू ठेवल्या. आरोग्यविषयक अफवा, वस्तुस्थिती, मदत या बाबतींत विश्वासार्ह माहितीचे प्रसारण चालू ठेवून धीर दिला. या काळातील विशेष उल्लेखनीय कामासाठीनंतर तत्कालीन वृत्तविभाग-प्रमुख पुरुषोत्तम कोरडे यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मानही झाला.

*

१९९८ च्या आसपास विशिष्ट क्रमांक फिरवून टेलिफोनवर आकाशवाणीच्या ठळक बातम्या ऐकण्याची सोय झाली होती. याचा उपयोगही असंख्य लोकांनी करून घेतला. अर्थात काळाच्या ओघात हा उपक्रम अन्य तंत्रज्ञानामुळे लवकर मागे पडला कारण फोनवर कोणतेही केंद्राचे प्रत्यक्ष प्रसारण ऐकण्याची सोय झाली. ‘रेडिओ ऑन डिमांड’ ही संकल्पना लोकांना आवडली होती.

*

२००४ मध्ये नवी दिल्ली येथे प्रसारभारतीच्या डी.टी.एच. सेवेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी सार्वजनिक जीवनातील शालीनता सांभाळण्याच्या बाबतीत आणि मुक्त – पण सकारात्मक चिंतन घडविण्यात आकाशवाणी, दूरदर्शनने पार पाडलेल्या भूमिकेची प्रशंसा केली होती. सार्वजनिक शालीनतेवरून मला आणखी एका श्रोत्याची प्रतिक्रिया आठवते. अमुक आकाशवाणी केंद्रावर किंवा आकाशवाणीच्या अमुक वाहिनीवर बंदी घालण्याची मागणी कोणी कधी केली नाही याचा उल्लेख तो श्रोता खाजगी वाहिन्यांच्या संदर्भात करत होता. बातम्यांमधूनसुद्धा काही खळबळजनक, ऐकीव अफवांना बळ देणारे प्रसारण आकाशवाणीने कधी केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘अंधश्रद्धा की वस्तुस्थिती?’ ‘खळबळ की विश्वासार्हता?’ ‘टीआरपी की विश्वासार्हता?’ या चढाओढीमध्ये आकाशवाणीने विश्वासार्हतेला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे श्रोत्यांना तसे वाटते.

*

यशवंत देव, जयदेव, हरिप्रसाद चौरसिया, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, अनिल मोहिले यांसारख्या मातब्बरांनी आकाशवाणीत काम केलं. तिकडे मदन मोहनदेखील लखनौ आणि दिल्ली आकाशवाणीत काही काळ होते. १९५० दरम्यान रविशंकरही सहा-एकवर्ष आकाशवाणीत होते. ‘आकाशवाणी वाद्यवृंद’ त्यांनी सांभाळला. सुंदर समूहगीते त्यांनी रेडिओला दिली. अनिल मोहिलेंची एक हृद्य आठवण आहे : काही गाजलेल्या गाण्यांची नोटेशन्स (स्वरलिपी) अनिल मोहिले यांना सकाळी ऑफिसला जाताना बेस्ट बसमध्ये सुचली होती व त्यांनी तिकिटाच्या मागे ती नोंदवून ठेवली होती. ही आठवण त्यांनीच मला आकाशवाणी नाशिकमध्ये मुलाखतीत सांगितली. माणसं आणि त्यांची जीवनपद्धती साधी होती पण कर्तृत्व मोठे होतं.

*

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी  ‘सय’ या आपल्या कलाप्रवासाची कहाणी सांगणाऱ्या  आत्मचरित्रात पुणे आकाशवाणीतल्या दिवसांच्या आठवणी एका स्वतंत्र प्रकरणातून मांडल्या आहेत. व्यावसायिक जीवनाची मुहूर्तमेढ आकाशवाणीत रोवली गेली आणि ते सगळे दिवस मंतरलेले होते अशी सईताईंची भावना आहे. ‘माझा पुढला मार्ग आकाशवाणीने प्रकाशमान तर केलाच; पण माझ्या गलबताची पुढची दिशाच आकाशवाणीने ठरवली,’ असे त्या मानतात. लहान मुलांसाठीचा ‘बालोद्यान’ कार्यक्रम त्यांनी हाताळला. गोपीनाथ तळवलकरांच्या साहाय्यक म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. पुढे त्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्या. तरुणांचे लाडके नेते राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार होते. ‘उघड्या पुन्हा जहाल्या,’ ‘माझिया प्रियाला,’ ‘हा छंद जिवाला,’ ‘हे मना आज कोणी,’ ‘हा रुसवा सोड सखे’ अशी कितीतरी सुंदर गाणी श्रीकांत ठाकरे यांनी मराठीला दिली. त्यांनी आकाशवाणीबद्दल काही ‘सामना’ आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ‘आकाशवाणी माझ्या जीवनात मैलाचा दगड (माईलस्टोन) आहे. आपल्या जीवनात यशाची पताका फडकवणाऱ्या अनेक कलाकारांना रेडिओपासूनच आपली सुरुवात करावी लागली आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

पहिले कंट्रोलर ऑफ ब्रॉडकास्ट झेड. ए. बुखारी यांनी मास्टर कृष्णराव यांना ‘वंदे मातरम्’ गाण्यापासून कसं रोखलं याचा किस्साही श्री. ठाकरे यांनी सांगितला आहे. १९४८ मध्ये आकाशवाणीने ठाकरे यांना साथीदार वादक म्हणून सामावून घेतलं. सुगम संगीताच्या अनेक कलाकारांना त्यांनी साथ केली. आशा भोसले, ज्योत्स्ना भोळे, मोहनतारा तळपदे यांच्या व इतरांच्याही आकाशवाणीतल्या बऱ्याच आठवणी श्री.ठाकरे यांनी सांगितल्या आहेत. त्यांत आकाशवाणीचे ‘मराठीपण’ ठसठशीत जाणवते. ते दिवस खरेच सोनेरी होते.

*

२००६ मध्ये जेव्हा भारतभरात ३०० एफ. एम. वाहिन्या कार्यान्वित होणार अशी बातमी आली तेव्हा पुणे सकाळने ‘नभोवाणीचे नवे युग’ असा अग्रलेख लिहून या घटनेचे स्वागत केले. प्रसारणाचा नवा पल्ला गाठताना त्या त्या परिसरातले जनमानस लक्षात घेणे आवश्यक असल्याचा अगदी योग्य सल्लाही दिला. नव्या एफ.एम. जाळ्यामुळे रेडिओने कात टाकली आहे हे ‘सकाळ’चे भाष्य माध्यमातला भ्रातृभाव सांगणारे वाटले. एरवी असा भ्रातृभाव दुर्मीळ असतो. माध्यमं परस्परांविषयी फार कमी लिहितात.

*

आकाशवाणीच्या चाहत्यांनी तिच्यावर उदंड प्रेम केले. काही एकदम आगळेवेगळे प्रसंग आहेत : संभाजीनगरचे असेच एक निस्सीम रेडिओ प्रेमी – श्याम खांडेकर. एफ.एम.चे चांगले कार्यक्रम ऐकायला मिळावेत म्हणून एक विशेष अँटेनाच त्यांनी तयार केला. अनेकांनी माफक किमतीत तो विकतही घेतला. जानेवारी २००६ ची गोष्ट आहे. त्या वेळी संभाजीनगरला एक एफ. एम. कार्यान्वित नव्हता. या अँटिनामुळे १२० किलोमीटर दूरवरच्या अहमदनगर रेडिओचे कार्यक्रम ऐकणे औरंगाबादवासीयांना शक्य झाले. असा एक अँटेना आणून आम्ही तो अहमदनगर केंद्राच्या दर्शनी भागात ठेवला होता. आकाशवाणीवरच्या प्रेमाखातर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी श्रोत्यांनी, श्रोतासंघांनी उत्स्फूर्तपणे केल्या. अकोला, खंडवा, शेगाव, खामगाव येथे शेकडो सदस्य असलेले रेडिओ श्रोतासंघ खूप काळ सक्रिय होते. या श्रोत्यांची शेकडो पत्रे, फर्माइशी कार्यक्रमांसाठी आकाशवाणीकडे येत असत. काही पत्रे रंगरंगोटी, नक्षीकाम केलेली, छापीलही असत. या श्रोतासंघाची अधिवेशनेही भरत. हा काळ फार जुना नाही. या संघाचे स्थानिक आकाशवाणी केंद्राशी फार जिव्हाळ्याचे नाते होते. अधिवेशन प्रसंगी स्मरणिकाही निघत. आता कदाचित हे सर्व इतिहास जमा झाले असेलही; पण जिव्हाळा – सौहार्द यांची गरज आजही तेवढीच आहे. कदाचित काकणभर जास्तच!

*

प्रदेश, भाषा यांचा कितीही अभिमान बाळगला तरी हेही वास्तव आहे, की मुंबई- नागपूर-जळगावसारख्या मराठी केंद्रांचे प्रमुखपद अनेकदा अमराठी किंवा दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी भूषविले आहे. आपला ठसाही त्यांनी त्या-त्या काळात उमटविला आहे. आकाशवाणीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या भारतीय स्तरावर असल्यामुळे अनेकदा परभाषी मंडळी कार्यक्रम-प्रमुख असतात. याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे फारसे विपरीत न घडता अखंड भारतीयत्वाची जाणीव बलशाली होत राहिली आहे.मध्यंतरी  सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ठोस प्रयत्न ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून अनेक वर्षे महाराष्ट्रात चालू आहे. सजग प्रशासनाचे नवे पर्व या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाले. मुद्रित माध्यमांनी दिलखुलासची विस्तृत नोंद घेतली. अनेक मंत्री, वरिष्ठ सचिव, प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलखुलासमध्ये हजेरी लावली. जाणकार पत्रकारांनी ‘विकास पत्रकारितेचा नवा अध्याय’ म्हणून या कार्यक्रमाला गौरवले.

*

ख्यातनाम वक्ते आणि कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आकाशवाणीवर मनापासून प्रेम. त्यांनी ‘सकाळ’मध्ये मुद्दाम एक लेख लिहून आकाशवाणीचा गौरव केला. आपला ट्रांजिस्टर घेऊन श्रोत्यांनी गच्चीवर जायचे आणि तज्ज्ञांच्या सूचनांबरहुकूम आकाश निरीक्षण करायचे असा आकाशदर्शन कार्यक्रम त्या वेळी सांगली, जळगाव इ. आकाशवाणी केंद्रांनी केलेला होता. अगदी डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे वैज्ञानिक, सुधाकर भालेराव यांच्यासारखे खगोलतज्ज्ञ त्यात सामील झाले होते. प्राचार्य भोसले यांनी या नियोजनाचे खूप कौतुक केले. ‘या मनोवेधक नवलाईच्या कार्यक्रमामुळे आकाशवाणीला एक नवे परिमाण प्राप्त झाले आहे,’ असे त्यांचे शब्द आहेत. कानाने ऐकणे आणि मनाने पाहणे हे अधिक लाभदायक म्हणून आकाशवाणी एक मनोज्ञता वाढीस लावते आणि जीवनाच्या गाभाऱ्याकडे नेते, असेही ते म्हणतात. भारतीय ‘तत्त्वज्ञ’ शब्द हा आकाशाचा गुण मानतात. (जसे गंध हा पृथ्वीचा, स्पर्श हा वायूचा गुण) आणि म्हणूनच श्रवणात मनाची गुंतवणूक अधिक असते. बरं, ही प्रक्रिया अंधारातही घडू शकते, याची छान आठवण प्राचार्यांनी त्यांच्या शैलीत करून दिली आहे. दुर्दैवाने आमच्यातल्या काही करंट्यांना आकाशवाणीची ही शक्ती सेवेतून निवृत्त होईपर्यंत कळली नाही हे विशेष!

*

‘नभोनाट्य’ हा रेडिओ कार्यक्रमांतला एक सुंदर फॉर्म (शैली) आहे. आशयाला, कथासूत्राला एका विलक्षण उंचीवर नेणारा हा फॉर्म आहे. भारतातील सर्वच प्रमुख केंद्रांवर हा एके काळी गजबजलेला विभाग होता. दरआठवड्याला सुंदर-सुंदर, वेधक आणि वैविध्यपूर्ण नभोनाट्य सादर करायला कलाकारांचा स्टुडिओत जमावडा असे. काही वेळा तर रिहर्सल्समुळे स्टुडिओ दणाणून जायचे. सस्पेंस, विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा कितीतरी थीम्सवर ही नाटकं असायची. नभोनाट्य ऐतिहासिक असेल तर विचारायलाच नको! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी अशी कितीतरी ‘कॅरॅक्टर्स’ आपले डायलॉग म्हणताना ऐकायला, पाहायला मजा यायची. वाचिक अभिनय, आशयनिर्मिती, सादरीकरण या सर्व स्तरांवर भरपूर मेहनत नभोनाट्याच्या सर्व सादरकर्त्यांनी घेतल्यामुळे अनेक चांगली नभोनाट्ये आजही ध्वनिसंग्रहालयात उपलब्ध आहेत. या बाबतीत जळगाव केंद्राचे एक विशेष योगदान मानले जाते, की व्यावसायिक रंगभूमीची संशय कल्लोळ, एकच प्याला, तरुण तुर्क म्हातारे अर्क,ययाती आणि देवयानी, मृत्युंजय अशी २० गाजलेली नाटकं मूळ संचात ध्वनिमुद्रित केली गेली. आज ध्वनिसंग्रहातील ही मोठी देन आहे. बाळ धुरी, फैय्याज, सुधा करमरकर, अरुण सरनाईक, प्रभाकर पणशीकर, भालबा केळकर, चित्तरंजन कोल्हटकर यांचा सुंदर वाचिक अभिनय या नाटकांतून दडलेला आहे. ती नियमित लागायला हवीत. दुर्दैवाने कार्यक्रमकर्मींबाबत आकाशवाणी केंद्रे ओस पडू लागल्यामुळे हा फॉर्म विस्मृतीत जाईल की काय अशी आज भीती वाटते. ९२, ९५, ९७ च्या काळात अत्यंत वैविध्यपूर्ण नभोनाट्यांचा उत्सव दरवर्षी सलग आठवडाभर आकाशवाणीने घडवला होता. यात बाबासाहेब पुरंदरे, डॉ.बाळ फोंडके, मंगला गोडबोले, मधु मंगेश कर्णिक, शं. ना. नवरे, व. पु. काळे इ. मान्यवर सामील झाले होते, यावर आता विश्वास बसत नाही.

*

प्रत्येक आकाशवाणी केंद्राने आपल्या परिसरातील लोकपरंपरा जतन करण्याचा बराच प्रयत्न केलाय; पण त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकडं तेवढं लक्ष नाही दिलंय, हेही वास्तव आहे; तरीही तिथल्या यात्रा, जत्रा, लोकोत्सव, सण-वार या निमित्ताने होणारं पुष्कळ लोकसंगीत संग्रहित आहे. डिजिटल क्रांतीमुळे अधिक प्रभावी जतन ही शक्य झालयं.१९९९-२००० च्या आसपास औरंगाबाद (आत्ताचे संभाजीनगर) केंद्राने ‘माळावरची फुलं’ ही फार सुंदर मालिका केली होती. लक्ष्मीकांत धोंड यांच्या प्रयत्नातून ती घडली होती. भटक्या जमाती, आदिवासी जनजाती, त्यांचे आयुष्य, जीवनशैली, सण, सांकेतिक भाषा, चालीरिती, गाणी इ. उपयुक्त आशय त्यातून मांडताना कोल्हाटी, डक्कलवार, गोंधळीसमूहाविषयीचे कार्यक्रम उल्लेखनीय झाले होते. याच प्रमाणे अकोले, भंडारदरा परिसरातील महादेव कोळी बांधवांची लोकगीतेही अहमदनगर, पुणे इ. केंद्रांनी ध्वनिमुद्रित करून ठेवली. अनेक पारंपरिक गीतांची जागा आता प्रचारगीतं तसेच विकासगीतं घेत आहेत, हाही चिंतेचा भाग जाणवला. ‘पारंपरिक’ आशय क्षीण होतोय.

*

सादरीकरणातली व्यावसायिकता वाढावी या उद्देशाने आकाशवाणीतर्फे राष्ट्रीय पातळीवर ‘आकाशवाणी वार्षिक पुरस्कार’ ही स्पर्धाही घेतली जाते. ६-७ प्रकारांत ही स्पर्धा होते. अशाच स्पर्धा खाजगी पातळीवरदेखील होतात. लाडली फाऊंडेशन मुंबई, ग्रँड प्री इंटरनॅशनल, AVA (Association of Voice Artist), ABU Awards (Asian Pacific Broadcasting Union) सारख्या संस्था या स्पर्धा भरवून निर्मितीचे स्पर्धात्मक वातावरण ठेवायला मदत करतात. उत्तम जाहिरात निर्मितीच्यादेखील स्पर्धा खाजगी संस्था आयोजित करतात.

*

जवळपास २००५ पर्यंत अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक कार्यक्रम (साधारण चवथी ते दहावीपर्यंत) महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित होत असत. हा उपक्रम अनेक वर्ष गंभीरपणे चालू होता. शिक्षण संचालक, शिक्षणशास्त्र संस्था, जिल्हा परिषद, महापालिका ही कार्यालये यात सामील होती. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचेही काही विषय असायचे. १९९० दरम्यान राज्य शासनाने ‘श्रवण पुरस्कार योजना’ सुरू करून ज्या शाळा शैक्षणिक कार्यक्रम मुलांना व्यवस्थित ऐकवून मुलांचे प्रतिसाद घेत असत त्यांना फिरता चषकही ठेवला होता. प्रत्येक वर्गास चांगले रेडिओ संच दिले गेले होते. शाळांच्या वेळापत्रकात सकाळी व दुपारी शैक्षणिक प्रसारण-श्रवणाचा समावेश होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत व्यक्तिमत्त्व विकासाचे वासंतिक कार्यक्रमही सुरू करण्यात आले. या विषयाची उदाहरणे आपण पाहिली आहेत. अनेक मान्यवर  या वासंतिक कार्यक्रमांत येत असत. २००४ दरम्यान दुर्दैवाने हळूहळू हे कार्यक्रम थांबवण्यात आले.

*

निवडणुकांचे निकाल आणि त्यांचे विश्लेषण, प्रसारण ही एक आकाशवाणीसाठी अन्य माध्यमांच्या पुढे राहण्याची संधी असते. सकाळी ८.३० पासून निवडणुकांचे निकाल,पक्षप्रतिनिधी, मान्यवर नेते, विजयी-पराभूत उमेदवार आदींचे प्रसारण लोकांना फार आवडले, असा अनुभव आहे. वृत्तपत्रांनीही अत्यंत उमदेपणाने ‘निवडणूक निकाल प्रसारणात आकाशवाणीची बाजी’ अशी बातमी चौकटीत देऊन समायोजित प्रसारणाचे कौतुक केले आहे.अडचणींचा बाऊ न करता असे आयोजन कलात्मकतेने आणि उत्साहाने करायचे असते. फळ मिळतेच!

*

अपुऱ्या माहितीवर आधारित घाई-गडबडीत चुकीच्या बातम्या हाही आकाशवाणीला कधी कधी खूप छळणारा विषय असतो. काही वेळा वस्तुनिष्ठ बातमी देऊनही विनाकारण राग-धमक्या यांचा ससेमिरा चुकत नाही. जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या पुण्यातील हत्येची वस्तुस्थितिदर्शक बातमी प्रसारित केल्याबद्दल तत्कालीन वृत्तनिवेदिका सुधा नरवणे (निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या मातोश्री) यांना धमकीचे पत्रं मिळाले. सुधाताई काही दिवस पोलीस संरक्षणात होत्या. पुढे काही दिवसांनी वैद्य यांच्या मारेकऱ्यांना (जिंदा-सुखा) फाशी देण्यात आल्याच्या बातमीबद्दल श्रीमती शर्मिला कारखानीस यांना धमकीचे फोन दोन वेळा आले. पुढे हे प्रकरण लवकरच मिटले.

*

जम्मू-काश्मीरमध्ये कश्मिरी, डोगरी, हिंदी, गुजरी, उर्दू आणि पंजाबी या प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून प्रसारण चालू असतं. सीमाभागात पाकिस्तान भारतविरोधी काय प्रचार करतोय, याकडेही बारीक लक्ष ठेवून पाकविरोधी वस्तुस्थितिदर्शक बरीच माहिती-बातम्या या केंद्रांना द्याव्या लागतात. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही आपल्याला हे करावंलागतंय ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. श्रीनगर, जम्मू, पूंछ, भेदखा, कटरा, कारगील या सगळ्याच मोठ्या आणि छोट्या केंद्रांवरून हे सगळे किती संवेदनशीलपणे हाताळावे लागतअसेल याची कल्पना केलेली बरी! जम्मू-काश्मीरमध्ये एकूण २२ जिल्हे आहेत; पैकी १७ जिल्ह्यांतील स्थिती खूपदा शांत असते. अशांती, गडबड, देशद्रोही कारवाया, हिंसाचार ५ जिल्ह्यांत एकवटलेला आहे. ही स्थिती आणि अन्य सकारात्मक माहिती प्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाची असते. मे २०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वेकंय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केवळ आकाशवाणी-दूरदर्शनमधून काश्मीरमध्ये घडवायच्या बदलांबाबत एक बैठक घेऊन ‘कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी’बाबत बरेच निर्णय झाले होते. २२ एप्रिल २०२५ रोजी पहेलगाममध्ये भ्याड हल्ले आणि क्रूर हत्या झाल्यानंतर आता अशा बैठका आणि त्यांतील निर्णयांची समीक्षा नव्याने करायला हवी.

*

१८ जुलै १९८३ चा दिवस होता. ज्येष्ठ कवयित्री महादेवी वर्मा यांच्या अलाहाबादच्या म्हणजे आताच्या प्रयागराजमधल्या घरी ध्वनिमुद्रण ठरले होते. त्याप्रमाणे प्रदीर्घ ध्वनिमुद्रण या दिवशी घडले. आकाशवाणीतर्फे नर्मदेश्वर उपाध्याय, डॉ. रामजी पांडे आणि श्री.गोपाल दास ही साहित्यक्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती. रेकॉर्डिंगच्या सुरुवातीस महादेवी म्हणाल्या, “अतीत की बात करना ऐसाही है, जैसे चले हुए मार्ग पर फिर लौटना.” किती खरं सांगत होत्या महादेवी वर्मा. आज ही संवादमालिका संपवत असताना मलाही तशीच जाणीव होत आहे… चालून आलेल्या मार्गावर पुन्हा फिरून येणं!

   आणखी एक वेगळी आठवण. २३ जानेवारी १९८६ ला आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडिओत अमृता प्रीतम आल्या होत्या. आपल्या जीवनातले अनेक अनुभव सांगत सांगत त्या समारोपाला आल्या. वर्षभरापूर्वीच पडलेलं एक स्वप्न त्या सांगत होत्या. समोर आग जळते आहे. बाजूला कागदांचा ढीग आहे. त्या ढिगातला एक एक कागद उचलून अमृता प्रीतम आगीत टाकतायत. समोरून काठी टेकवत टेकवत एक वृद्धा जवळ येते. विचारते, “तू हे काय करते आहेस असं?”  अमृता प्रीतम तिला उत्तर देतात… “अनेक वाईट बातम्यांची कात्रणं काढून ठेवली आहेत. मी एकेक जाळून टाकतेय…” म्हातारी खळखळून हसते आणि काठी टेकवत टेकवत निघून जाते. तिच्या काठीच्या आवाजाने अमृता प्रीतम जाग्या होतात. स्वप्न आणि सत्य यांच्या ऊन-सावलीचा हा खेळ जीवनात अखंड चालू असतो, असे अमृता प्रीतम यांचे म्हणणे.

कधी कधी माझ्याही डोळ्यांसमोर एक दृश्य अधूनमधून तरळत असतं. जुने कौलारू घर. पावसाची रिपरिप.कौलांवरून अंगणात पाण्याची हलकी टपटप. आसमंत शांत.वातावरण काहीसे कुंद. घरात जुना ५-६ बँडचा मर्फी रेडिओ वाजतो आहे. सगळेजण आपापल्या कामात आहेत. रेडिओवर आशाताईंचे मंद सूर ऐकू येत आहेत…

‘पाऊल थकले,

माथ्यावरचे जड झाले ओझे…

सुखसुमनांची सरली माया,

पाचोळा वाजे…

जिवलगा राहिले रे

दूर घर माझे॥’

गाण्यातले भाव मला जरा उदास करतात. मी हलकेच प्रेमाने रेडिओवर हात फिरवतो. स्टेशन बदलण्यासाठी रेडिओचे काटे फिरवतो… कुठल्यातरी केंद्रावर मुकेशचा प्रिय-परिचित आवाज ऐकू येतो…

‘मैं तो हर मोड पर

तुझ को दूंगा सदा..

मेरी आवाज को, दर्द के साज को

तू सूने, ना सूने॥’

जुना रेडिओ संचच मला स्वप्नातही काही सुचवित असावा का? तुम्ही ऐका वा ऐकू नका, मी प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत असेन, असा संकेत देत असावा का?

* * * * *

निवेदन सहभाग गोपाळ आणि उत्तरा अवटी 

‘खरेमास्तर ‘ हे नभोनाट्य पुण्याच्या स्टुडिओमध्ये ध्वनीमुद्रित होत असताना. सहभागी नामवंत कलाकार डॉ. गिरीश ओक आणि स्वाती चिटणीस.

हॅलो हागणदारीमुक्त गाव या आकाशवाणीच्या उपयुक्त कार्यक्रमात श्रोत्यांच्या फोन वरील प्रश्नाना अण्णा हजारे यांनी उत्तरे दिली.

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या व्यावसायिक वाटचालीचा श्रीगणेशा पुणे आकाशवाणी तून झाला. 1955 दरम्यानचा हा फोटो. लहान मुलांसाठी कार्यक्रम सादर करताना सई ताई. मागे गोपीनाथ तळवलकर.

श्रोत्यांचे अमाप प्रेम हे आकाशवाणी चे खरे बळ.उत्साही श्रोता संघ असे विशेष अंक काढून आपले प्रेम व्यक्त करीत.

Author

Leave a Reply