भारतात विविध ठिकाणी उपासनेमध्ये चित्रांच्या पटांना महत्वाचे स्थान आहे. अनेक धर्म व पंथांच्या उपासनेमध्ये चित्रमय पट वापरले जाण्याची दीर्ध परंपरा आहे. मंदिरांमध्ये, घरांमध्ये, पूजा-व्रतांमध्ये व सणांच्या सजावटीसाठी चित्रमय पटांचा वापर केला जात असे. मराठी समाजातही असा सौंदर्यवारसा होता. चैत्रगौरी पट, संक्रांति पट, पिठोरी पट असे विविध पट आपला चित्रकलेचा वारसा चालवित असत.
चैत्र गौरीपट
चैत्रगौरी हा सण एकप्रकारे शिवपत्नी पार्वतीचा भक्तिसोहळा असतो. गौरीरूपातल्या पार्वतीचे आदरातिथ्य महाराष्ट्रातल्या स्त्रिया उत्साहाने करतात. गौरी ही वसंताची देवता समजली जाते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया असा महिनाभर हा उत्सव असतो. यात स्त्रीया एकमेकींना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायला हळदी-कुंकवाला बोलावतात. त्यावेळी चैत्रगौरीची आरास केली जाते.
ही पुजा चैत्रगौरीच्या चित्रमय पटाने सुशोभित केली जात असे. हा पट कागदाला मागच्या बाजूने कापड चिकटवून बनवला जायचा. या पटाने चैत्रगौरीच्या पुजेचा डौल किती वाढत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. केळकर संग्रहालयातील हा चैत्रगौरीपट मराठा चित्रशैलीचा एक अजोड नमुना आहे. मराठा चित्रशैलीच्या, पुणे उपशैलीत केलेला हा पट आहे. ३’x ४’ असा हा विस्तीर्ण पट आहे. एकोणिसाव्या शतकातील हा पट असावा.
या पटाच्या मध्यावर देव्हाऱ्यात शंकर पार्वती चितारले आहेत. यांच्या बाजूला ब्रह्मा व विष्णु सपत्निक स्थानापन्न आहेत. यांच्याच खालच्या बाजूला राधा-कृष्ण व गोपिका रंगपंचमी खेळताना दाखवले आहेत. याच्या खालच्या बाजूला काही कृष्णलीला दाखवल्या आहेत. पटाच्या अगदी तळाशी नदी आणि जलचर दाखवले आहेत.
या पटाच्या वरच्या बाजूला मराठा चित्रात दिसून येणारी कमान आहे. या कमानीच्या आत एक शिखराकृती मखर चित्रीत केले आहे. या शिखराकृतीची रचना गुजरात / राजस्थानमधल्या जैन धर्मियांच्या ‘तीर्थपटा’वरून प्रेरित असल्याचे दिसून येते. या तीर्थपटांमध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची चित्रे विविध रचनांद्वारे दाखवली जात असत. तीर्थक्षेत्रांच्या एकत्रित स्मरण करण्यासाठी अशा पटांची योजना केली जात असे.
या मखरामध्ये त्रिमुर्तीं विराजमान आहेत. मखराच्या वर महिरपदार कमानीत गणपती आणि सरस्वती विराजमान आहेत. कमानीच्या बाहेच्या बाजूलाही सुंदर सजावट आहे. बाकी पूर्ण पटावरही सजावट आहे. मखराच्या कळसांवर ध्वज आणि गुढ्या आहेत, केळीचे खुंट, पोपट, द्राक्षांच्या वेली, वानर अशा चित्रांनी पूर्ण पट सजवला गेला आहे. मखरासाठी योजलेली भौमित्तिक नक्षी आणि हे मखर खांद्यावर तोलून धरणारे हनुमंत आणि गरूड ही तर या पटाची विशेष बाब आहे.
महाराष्ट्रातल्या पटांमधील अवकाश सहसा पांढरेच ठेवले जात असे. लाल, हिरवा, पिवळा हे या पटातील प्रमुख रंग आहेत. पटाच्या तीन बाजूंना फुलाची किनार केलेली आहे.
या गौरीपटात आकृतीबंध आणि तपशील यांचा सुयोग्य समतोल साधला गेला आहे. या पटातल्या देवतांच्या व इतर प्रमाणबद्ध आकृती, पुर्णपणे विकसित झालेली मराठाशैली दाखवतात.
चित्र १
असाच एक भव्य गौरीपट अहमदाबाद येथील कॅलिको संग्रहालयात आहे. हा पट साधारण ७ फुटी आहे. हा पट साधारण १८व्या शतकातील असावा. देवळांमध्ये लावला जाणारा हा पट असावा, असं कॅलिकोनी म्हटलं आहे, परंतु चैत्रगौरी हा घरी साजरा करण्याचा सण असतो, त्यामुळे घरातील पूजेच्या सजावटीत, घरातील देवघराच्या खोलीत हा सुशोभित केला जात असावा असे वाटते.
यातही मध्यभागी शंकर आणि बाजुला पार्वती व गणपती एका सुंदर शामियान्यात बसलेले दाखवले आहेत. त्यांच्या बाजूला दोन दासी आहेत. याच्या खालच्या बाजूला गजान्तलक्ष्मी आहे. शंकराच्या शामियान्याच्या वरच्या बाजूला चार दासींसह गणपती दाखवला आहे, त्याच्या बााजूला सात घोड्यांच्या रथातला सूर्य व हरणाच्या रथातला चंद्रही आहे. हा भव्य पट फुलांच्या किनारीने पाच भागात विभागला आहे. सगळ्यात वरच्या भागात विष्णूच्या अवतारांची चित्रे आहेत. डाव्या बाजूच्या चौकोनात रामकथा दाखवली आहे. याच्या विरूद्ध बाजूला काही कृष्णलीला व काही पौराणिक कथा पहायला मिळतात. सगळ्यात खाली मराठा शैलीतील छोट्या महिरपी कमानींमध्ये सुशोभित हत्ती, दोन द्वारपाल व बाकी वेगवेगळे गुलदस्ते चितारले आहेत. संपूर्ण पटाला फुलांची किनार दाखवली आहे. या पटातील गुलदस्त्यांसहित सगळी चित्रे मराठा शैलीच्या सौंदर्याची साक्ष देतात.
अगदी याच प्रकारचा आणि आकारचा आणखी एक चैत्रगोरीपट केळकर संग्रहालयातही आहे. या दोन्ही पटांच्या रचनेमध्ये आणि तपशीलातही खूप साम्य आहे.
हे गौरीपट मराठा चित्रशैलीचा आणि मराठी रसिकतेचा मानबिंदू आहेत.
चित्र २
संक्रांती पट किंवा संक्रांति फलपट
संक्रांतसणाच्या पूजेमध्ये हा पट वापरला जात असे. या पटाच्या वरच्या बाजूला मध्यभागी गणपती, गणपतीच्या दोन्ही बाजूला त्यांच्या वाहनावर आरूढ संक्रांती देवी व संक्रांति उपदेवता चितारल्या आहेत. या दोन्ही देवता नऊवार नेसलेल्या दाखवल्या आहेत. याच्या खाली एका बाजूस राक्षस व एका बाजूस सात घोड्यांचा रथात आरूढ सूर्य दाखवला आहे. याच्या खालच्या बाजूस मजकूर लिहला गेला आहे.
या चित्रांमध्ये काळ्या रंगाची जोरकस बाह्यरेषा दिसून येते. चित्रात उत्तम रंगसंगती साधली आहे. या पटातील चित्रांमध्ये फिकट हिरव्या रंगाचा विरोधी रंगसंगती निर्माण करण्यासाठी खुबीने वापर करण्यात आला आहे. प्रत्येक चित्राला महिरपी कमान काढलेली आहे. ही मराठा शैलीत आढळणारी एक महात्वाची खूण आहे. हा साधारण दोन फूटी आहे.
चित्र ३
पिठोरी पट :
पूजेसाठी रंगवलेल्या पटांमध्ये आणखी एक विशेष पट असायचा. मराठा शैलीचा उत्तम अविष्कार या पटामध्ये पहायला मिळतो. पिठोरी अमावस्येच्या व्रतामध्ये या पटाचा वापर केला जात असे. श्रावणी अमावस्येलाच पिठोरी अमावस्या म्हटले जाते.
अपत्यप्राप्तीसाठी आणि बालमृत्यू होऊ नयेत म्हणून हे व्रत केले जात असे. भविष्योत्तर पुराणात एक कथा येते. पार्वतीने इंद्राणीस सांगितले की या व्रतामुळे सौभाग्य, संतति व ऐश्वर्य प्राप्त होतात. या व्रताच्या कथेनुसार श्रीधर व सुमित्रा हे ब्राह्मण जोडपे होते. त्यांना शंकर हा मुलगा होता, त्याच्या पत्नीचे नाव विदेहा असे होते. विदेहा प्रत्येक वर्षी श्रावण अमावस्येस प्रसूत होत असे पण तिचे मूल जगत नसे. तिला पतीने घरातील माणसांच्या सल्ल्याने घराबाहेर काढले. नवजात बालकासह ती अरण्यात गेली असता तिची एका देवतेची गाठ पडली. त्या देवतेने प्रसन्न होऊन सांगितले की, या ठिकाणी ६४ देवता येत असतात, त्यांचे दर्शन घडल्यावर तुझे हेतू पूर्ण होतील. त्याप्रमाणे झाले व ६४ देवतांच्या आशिर्वादाने आठ दीर्घायुषी पुत्र झाले.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी उपवास करून ६४ देवता म्हणजेच ६४ योगिनींची पूजा केली जाते. या पूजेमध्ये या ६४ योगिनींची चित्रे काढलेल्या पटाची पूजा केली जाते.
या ६४ योगिनींशिवाय श्रीकृष्णाच्या चरित्रातील प्रसंगही यावर चित्रित केले आहेत. या पटावर कृष्णाची चित्रे काढताना चित्रकाराने या व्रताचा देवकीच्या सात मृत अपत्यांशी संबंध जोडला आहे. भारतीय पारंपरिक चित्रकारांवर आक्षेप घेतला जातो की ते फक्त अन्य कवी, लेखकांच्या कृतींवर, पारंपरिक, धार्मिक विषयांवर पूर्णपणे अवलंबून असतात. इथे आपण पाहू शकतो की विषयाची मांडणी करताना चित्रकाराने कशी कल्पकता वापरली आहे. पारंपरिक चित्रे पहाताना अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचे भान ठेवले गेले पाहिजे. पारंपरिक चित्रांच्या बाबतीत असेही म्हटले जाते की त्यामध्ये तोचतोपणा असतो. पण पारंपरिक चित्रे पहाताना गृहितके आणि पूर्वग्रह विसरून त्यांचा आनंद घेता आला पाहिजे. तसे झाले तरच आपल्याला या चित्रांची मांडणी करताना करण्यात आलेले नियोजन व व्हीजुवलायजेशन यामुळे साध्य झालेला कलेचा अविष्कार दिसू शकेल. याबाबत आता नवी दृष्टी जोपासण्याची वेळ अनेक कारणांनी आली आहे.
या पटावर योगिनींचे चित्रीकरण पूर्णपणे मराठी पद्धतीने केले गेले आहे. योगिनींची वेशभूषा व केशभूषा अगदी मराठी पद्धतीची दाखवण्यात आली आहे. या सगळ्या आकृती एकचष्म दाखवण्यात आल्या आहेत. याच्या खालच्या बाजूला बाळ-बाळंतिणीची काही चित्रे आहेत. याच्या खाली, डाव्या बाजूला शंकर-पार्वती, गणपती, विष्णू, ब्रह्मा यांची चित्रे आहेत. उजव्या बाजूला महादेवाचे देऊळ, बाहेर दिपमाळ, वाजंत्री वाजवणारी मंडळी असा सगळा मराठी सरंजाम दाखवला आहे. याच्या जवळंच राधा-कृष्णाच्या फुगडीचेही चित्र आहे. याशिवाय घरातली, शेतातली कामं करणारे स्त्री-पुरूष अशी चित्रेही काढली आहेत.
कागदी पटावर चित्रं काढली असल्यामुळे भित्तीचित्रांपेक्षा ही चित्रे नाजूक आहेत. या चित्रांत हिरवा, लाल, पिवळा हे रंग प्रमुख्याने दिसून येतात.
या पटांची चित्रशैली हा भित्तिचित्रांशी व चित्रमय पोथ्यांशी साम्य असणारी आहे.
हा पट भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. हा साधारण एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातला समजला जातो. पुढे अशा पट प्रत्यक्ष चित्रे काढून बनवणे बंद होत गेले. ते छापले जाऊ लागले. झपुर्झा संग्रहालयात पिठोरी पटाची छापील आवृत्ती पहायला मिळते. मूळ पिठोरी पटाप्रमाणे या छापील पटावरही योगिनींची, ऋषिंच्या स्नान-संध्येची, दैनंदिन कामाची प्राण्यांची चित्रे आहेत. प्रत्येक चित्रावर त्याचा विषय छापला आहे. ही छपाईसुद्धा तशाच प्रकारच्या मराठा शैलीत आहे. या छापील पटावर ‘सांगली सरकारी छापखाना” असे लिहले आहे. सांगलीचा सरकारी छापखाना १८३१ साली सुरू झाला अशी माहिती मिळते. तिथे अशा प्रकारची छपाई, तसेच रंगीत छपाई कधी सुरू झाली, यावरून या छापील पटाची माहितीही मिळू शकते.
त्याकाळात अशा चित्रांची छपाई लाकडी ठसे वापरून होत असे. अशा एका पिठेरी पटाचा लाकडी ठसा झपुर्झा संग्रहालय, पुणे येथे संग्रहित आहे.
चित्र ४
चित्र ५
भारतीयांमध्ये चातुर्मासाचे धार्मिक महत्व पूर्वापार चालत आले आहे. हिंदू धर्मियांमध्ये चातुर्मासात करण्यासाठी अनेक उपचार-उपासना सांगितल्या आहेत. अशा व्रतांमध्ये महाराष्ट्रात अशा पटांचा वापर होत असावा, असे दिसून येते. चातुर्मासाचा हा छापील पटही झपुर्झा संग्रहालयात पहायला मिळतो.
चित्र ६
चित्र ७
अशा चित्रमय पूजांची भारतात अनेक ठिकाणी परंपरा असल्याचे आपल्याला दिसून येते. राजस्थान, गुजरातची पिछवाईची परंपरा असो, वा तिथल्या अन्य परंपरांमधले पट असोत, गुजरात-राजस्थानातील जैन धर्मियांचे कोणतेही पट असोत, उडिशामधील पटचित्र परंपरा असो किंवा दक्षिणेच्या मंदिरांमधील चित्रांचे पट असोत, या सगळ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातले पट सौंदर्याच्या तुलनेत कुठेही कमी पडत नाहीत. महाराष्ट्रातील इतर सौंदर्य परंपरांप्रमाणेच इथल्या चित्रांच्या पटांतही खास ठाशीव मराठी सौंदर्य झळाळलेले दिसून येते.
