🎼🎵🎼🎷🎼🎺🎼🎸🎼🪕🎺🎹🎸🎻

मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. चोहोबाजूंनी प्रचंड विस्तारलेले शहर, प्रचंड मोठी धावपळ, गजबज आणि सतत धावायला लावणारे शहर आहे. या शहरात कितीतरी प्रकारची नानाविध क्षेत्रांतील, वेगवेगळ्या स्वभावांची, जातीधर्मांची, सर्व पंथांची जगातील व राज्यांतील सर्व भागांतून असंख्य माणसे त्यांची रंगीबेरंगी स्वप्ने, ध्यास घेऊन पूर्ण करण्यासाठी सतत येत असतात. काहीजण नेटाने, अथक प्रयत्नाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अविस्मरणीय यश प्राप्त करतात. त्यांच्या अंगभूत कलेचा सतत रियाझ करून, वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे या महानगरीत स्वतःचे एक उत्तम स्थान निर्माण करतात; तर काहीजण हरतात, थकतात आणि कधी कधी निराश होऊन परत जात असतात. परत गावाकडे कायमचे प्रयाण करतात.
१९९२ साली मला केकू गांधी या केमोल्ड आर्ट गॅलरी व मोठी फ्रेमिंगची कंपनी असलेल्या कलारसिक पारशी माणसामुळे पाचगणीतून मुंबईला येण्याची अचानक ऑफरच मिळाली. चित्रकाराची जी स्वप्ने असतात त्याप्रमाणे आभाळभर खूप मोठ्ठं होण्याची स्वप्नांची माझी भलीमोठी पोतडी घेऊन या मुंबईनगरीत मी दाखल झालो. मी प्रथमच मुंबईत राहायला आलो होतो आणि तेही ‘केकी मंझील’ या बांद्र्याच्या लँड्स एंडजवळ अलिशान दगडी हेरिटेज वास्तूमध्ये. राहण्याच्या इतक्या सुखसुविधा असतात हे प्रथमच अनुभवत होतो. मुंबईच्या गगनचुंबी इमारती, बंगले, गाड्या, वस्त्या, आर्ट गॅलरी, चित्रपटगृहे, ट्रेन, बसेसची गर्दी नव्याने अनुभवत होतो. केकू गांधी यांचे चित्रकलाक्षेत्रात मोठे नाव होते, अशा माणसाचा माझ्यावर वरदहस्त होता, त्यामुळे मला चित्रकार म्हणून यशाच्या पायऱ्या लवकर चढता येतील अशी माझी समजूत होती. गांधी यांच्या अनेक फ्रेमिंगच्या शाखांपैकी एक शाखा लोअर परेलच्या मोठ्या जागेत नव्याने सुरू केली होती. त्याचा प्रमुख म्हणून मला काम करावे लागणार होते. आमच्याकडे नेहरू सेंटर, ताज, ओबेरॉय, लीला हॉटेल व जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शित होणाऱ्या प्रसिद्ध चित्रकारांची, फोटोग्राफर्सची सर्व प्रकारची उत्तमोत्तम महागडी चित्रे फ्रेमिंगसाठी यायची. केमोल्ड फ्रेमचे नाव व काम उत्तम असल्याने भारतातील मोठी प्रसिद्ध मंडळी व परदेशातील राजदूतांचे तेथे येणेजाणे असायचे. माझे भौतिक विश्व विस्तारत होते; पण मी मनाने दिवसेंदिवस खचत चाललो होतो .
फ्रेमिंगसाठी सर्वांनाच कमीतकमी एक महिन्याची वेटिंग लिस्ट असायची. त्यामुळे कामाचा व्याप मोठा होता. आमचे वर्कशॉप सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सतत सुरू ठेवावेच लागायचे. अफाट काम होते. मी चित्रकार बनण्याची स्वप्ने घेऊन स्वतःला कलेच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मुंबई शहरात आलो होतो; पण ब्रश, रंग, कागद, कॅनव्हास यानां स्पर्श करायला मला पाच मिनिटेही वेळ नव्हता; कारण मी तेथे प्रमुख होतो, जास्तीत जास्त फ्रेम्स करून, दिलेली वेळ पूर्ण करायची सतत घाई असायची. एक लॉट संपला, जरा उसासा घेत नाही तोपर्यंत दुसरा लॉट यायचा… आणि मी पक्का मुंबईकर झालो. खरं सांगायचे तर पूर्णपणे हळूहळू यंत्रवत धावणारा, पोटापाण्यासाठी जगणारा यंत्रमाणूस झालो.
१९९३ साली माझे लग्न झाले आणि राहण्यासाठी मला स्वतःची जागा घेणे भाग पडले. नालासोपारा पश्चिमेला मी कंपनीचे पर्मनंट नोकरीचे पत्र घेऊन बँकेचे कर्ज घेऊन फ्लॅट घेतला होता. त्यानंतर माझा रोजचा त्रासदायक विचित्र प्रवास सुरू झाला. नालासोपाऱ्यावरून लोअर परेलला येण्यासाठी दादरला उतरावे लागायचे. मग स्लो ट्रेनने लोअर परेल वर्कशॉप, मग गाडीने प्रिंसेस स्ट्रीटच्या ऑफीसला, तेथून टॅक्सीने जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर! सर्व चित्रकारांची प्रदर्शने दोन मिनिटांत मी पाहायचो कारण तेथून परत लोअर परेलला वर्कशॉपला जावे लागायचे तर कधी वसईच्या फॅक्टरीलाही जावे लागायचे.
जहांगीरची सतत प्रदर्शने पाहून या गॅलरीत माझी चित्रे कधी लागतील का? असा प्रश्न मला सतत पडायचा; कारण माझा दिवस सकाळी ७ ते रात्री ११ असा व्यग्रतेतच मावळायचा. चार वर्षांत प्रखर इच्छा असूनही चित्रे काढायचेच मी विसरलो होतो, मी कंटाळलो होतो, निराश झालो होतो . पाचगणी महाबळेश्वर परिसरात एखादे कलादालन निर्माण करून भरपूर कलानिर्मिती करायची व सातारा जिल्ह्यात स्वतःची व इतर कलाकारांचीही चित्रे विकायची असा पक्का निर्धार करून मी मुंबईच्या विश्वाला कायमचा रामराम केला आणि परत कधीही न येण्याचा ठराव मनाशी केला. एका नव्या स्वप्नाने मी भारावलो होतो.
पाचगणीत अनेक जागा शोधायला सुरुवात केली. त्या वेळी जकात नाक्याजवळ सिडने पॉईंटच्या पायथ्याशी रस्त्यावर जुना पडीक दुर्लक्षित अवस्थेतील ‘पॅनोरामा व्ह्यू’ नावाचा बंगला धनावडे यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकांचा असल्याचे कळले. त्यांतील दोन भावांना गाठून मी तो बंगला भाड्याने घेतला. जुनाट, पडीक अवस्था असलेला बंगला कमीतकमी खर्चात मला आर्ट गॅलरीत रूपांतरित करायचा होता. बंगल्यातील मोठ्या सागवानी खिडक्या झाकायच्या होत्या – त्या तोडता येणे शक्य नव्हते. चित्र लावण्यासाठी सपाट भिंत तयार करण्याचे मोठे आव्हान होते. मग मला आठवले, की अब्दुल रहिमान स्ट्रीटवर पिवळसर गवताच्या चटयांची मोठी बंडले विकायला असायची. पाच फूट उंचीची व साठ-सत्तर फूट लांबीची ही चटई मशिदीत एकत्र नमाज पढताना वापरली जायची. चटयांची अशी अनेक बंडले मी खरेदी केली व सागवानी लिपिंग पट्ट्या मारून या जुनाट खिडक्या झाकल्या. सफेद रंगाच्या भिंतींवर चित्रे पाहण्याची सवय असलेल्या कलारसिकांना या गॅलरीचे गवताच्या चटईचे इंटीरियर खूपच आवडायचे. अशा रितीने आमची ‘पांचगणी आर्ट गॅलरी’ सुरू झाली. देशविदेशांतील अनेक पर्यटक, कलारसिक व शाळेचे विद्यार्थी यांचादेखील प्रतिसाद उत्तम मिळू लागला.
एके दिवशी सफेद शर्ट, काळी पँट, फुलशर्टाच्या हाताच्या बाह्या कोपऱ्यांपर्यंत दुमडलेले सावळ्या वर्णाचे एक गृहस्थ तोंडातील सिगारेट विझवत प्रदर्शन पाहायला आले. पाचगणीसारख्या छोट्या गावात इतकी छान आर्ट गॅलरी सुरू केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले व कडकडून मिठी मारली. मी मुंबई सोडून कायमचा पाचगणीत राहायला आलो याचे त्यानां खूपच कौतुक वाटत होते. एखादा जुना मित्र अचानक खूप वर्षांनंतर भेटावा आणि त्याच्याशी किती बोलू अशी आमची अवस्था पहिल्या भेटीतच झाली होती. पुढे ते अनेक वेळा आर्ट गॅलरीला यायचे. त्यांच्या प्रत्येक भेटीत आम्ही मुंबईच्या गर्दीला, ट्रॅफीकला, विरार टू चर्चगेट या लोकल ट्रेनला, मुंबईच्या धावपळीच्या व सतत अस्वस्थ माणसांच्या ‘मुंबई’ मनोवृत्तीला भरपूर शिव्या घालायचो. त्या भेटीत मुंबईतील धावपळीचे जीवन या एका विषयावर आम्ही कित्येक तास एकमेकांना टाळी देत दिलखुलासपणे, एकमताने मुंबईला परत न जाण्याचा निर्धार पक्का करायचो. या गृहस्थाचे नाव त्याने हेमंत भोसले असल्याचे सांगितले. हेमंत व्यवसायाने पायलट होते. त्यांचे स्कॉटलंडला एक निवासस्थान होते. मालाज फॅक्टरीच्यासमोर भोसे गावात दाऊद इस्टेट नावाची बंगल्याची श्रीमंत लोकांची मोठी सोसायटी आहे. तेथे एक एकराच्या जागेत त्यांनी अप्रतिम बंगला बांधला होता. समोर कृष्णा नदी, कमळगडाचे डोंगर व खाली सगळीकडे स्ट्रॉबेरीच्या शेतीचा हिरवागार नयनरम्य परिसर होता. त्या हवेशीर ब्रिटिश टाईप बंगल्यात त्यांनी युरोपियन चित्रकारांच्या प्रिंट्स लावल्या होत्या. त्या पाहण्यासाठी त्यांनी मला एकदा बंगल्यावर बोलावले होते.
एका संध्याकाळी मी त्या बंगल्यात पोहचलो. परदेशातील चित्रपटात जसा बंगला दाखवतात तसाच युरोपिअन कलर-स्कीमचा, उत्तम सजावटीचा तो बंगला नव्यानेच बांधला होता. मला आजही लक्षात आहे, की त्या बंगल्याच्या त्रिकोणी उंच कमानीवर एक वाऱ्याची दिशा दर्शवणारा पातळ धातूचा कोंबडा बसवला होता – (Wind Indicator) अगदी साधी जरा जरी वाऱ्याची झुळूक आली तरी कोंबडा लगेच वाऱ्याची दिशा दाखवायचा. जसे जसे वारे वेगाने वाहू लागायचे तशी तशी कोंबड्याची गती वेग धरायची. कितीतरी वेळा पाहिली तरी मला ही गंमत भारी वाटायची.
हेमंतला सिगारेट स्मोकींगची प्रचंड आवड होतीच; पण त्या संध्याकाळी त्यांना जेवणाची, खाण्याची , व पिण्याचीही आवड होती हे लक्षात आले. त्यांनी माझी भारीच बाडदास्त केली होती. स्कॉटलंडहून आणलेल्या महागड्या बाटल्या, नक्षीदार ग्लासेस व काजू – बदामाच्या बश्या भरलेल्या होत्या. त्यांनी टेबलावर भारी सिगारेटची पाकिटेही ठेवली होती; पण मी काहीच घेत नाही हे ऐकून त्यानां मोठा धक्काच बसला व मी असा कसा ‘न घेणारा कलाकार आहे?’ याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. युरोपात आणि मुंबईत मोठे कलाकार यांचे हे रुटीन असते व कधीतरी हे सर्व बदल म्हणून घ्यावे असा त्यांनी खूप आग्रह करून समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी ठाम होतो, मोठ्या नम्रतेने मी त्यानां नकार दिला व फक्त जेवण करून मी निघालो. हेमंतराव थोडे नाराज झाले पण मग त्यांना माझे कौतुकही वाटू लागले. माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते, एक मावशी उत्तम फोटोग्राफर आहे, एक मावशी छान चित्रे काढते – ती एम. आर. आचरेकर यांची शिष्या आहे असे त्यांनी सांगितले. तुमची आर्ट गॅलरी पाहायला मी त्यांना घेऊन येईन असे त्यांनी मला सांगितले.अशाच काही गप्पा झाल्यावर मी त्यांचा निरोप घेतला. मी मद्यपानाला नकार दिल्यामुळे पुढे बरेच दिवस हेमंत भोसले माझ्याकडे आलेच नाहीत. मी माझ्या आर्ट गॅलरीच्या व्यापात, चित्रनिर्मितीत मग्न झालो होतो. कधीतरी बाजारात दिसायचे – अप्सरा हॉटेलच्या जानेमन या वसंत दाभेकरच्या स्टॉलवर हातात सिगारेट घेऊन धूम्रपान करण्यात मग्न असायचे. बाजारात सर्वांशी मनमोकळेपणे मिसळून वागायचे. त्यांना वेळ असला, की आर्ट गॅलरीत मित्रानां घेऊन यायचे. त्यांना गाणं, तबला, पेटी – सर्व वाद्ये ऐकण्याची आवड आहे असे सांगायचे. सोबत असण्याऱ्या मित्रांना माझी ओळख करून देताना त्यांना विशेष आवडायचे. हा कलाकार दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही म्हणून तो डिसक्वालीफाईड आर्टिस्ट आहे असे ते म्हणायचे. निषेध व्यक्त करायचे; पण आम्ही दोघांनीही मुंबई कायमची सोडली आहे आणि आता परत तिकडे जाणार नाही यावर मात्र हसून टाळी द्यायचे व आमचे एकमत व्हायचे. मी मुंबईला परत जाणार नाही याचे वचन घ्यायचे व हळूच मला म्हणायचे, ‘म्हणूनच तू कलाकार म्हणून आवडतोस.’
एक दिवस अकरा वाजता अचानक एक मोठी गाडी पाचगणी आर्ट गॅलरीच्या समोर उभी राहिली आणि त्यातून कोणतीही पूर्वसूचना न देता हेमंत भोसले व त्याची पाचगणीच्या सेंट जोसेफ शाळेत शिकणारी मुलगी अनिका उतरली व दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती बाहेर आली –
त्या म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका ‘आशाताई भोसले!’
त्या फेमस सेलिब्रटी पार्श्वगायिका आर्ट गॅलरीत येत असतानाच त्यांना माझी ओळख करून देत हेमंत म्हणाला, “ही माझी आई! पुढच्या वेळी उषामावशीला भेटवतो.”
आता मात्र मी चक्रावलो. इतके दिवस आम्ही भेटत होतो पण कोणताही बडेजाव नाही, अभिमान नाही, गर्व नाही त्याने कधी सांगितलेदेखील नाही, की तो आशा भोसले यांचा मुलगा आहे. अतिशय साधेपणाने राहणारा हेमंत मला त्या दिवशी खूप भारी वाटला! आशाताईंनी आल्यावर स्वातीला बोलवा म्हणून आदेश केला. स्वाती किचनमध्ये होती ती घाईने आली. आर्ट गॅलरी पाहून झाल्यावर आशाताई खूपच प्रसन्न झाल्या. त्यांना चटई लावून केलेले इंटिरिअर फारच आवडले. गॅलरीच्या बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये माझी जलरंगातील निसर्गचित्रे लावलेली होती आणि मधल्या हॉलमध्ये माझा मित्र विजय आचरेकरची तैलरंगातील व्यक्तिचित्रे लावलेली होती. प्रत्येक चित्र त्यांनी आस्थापूर्वक पाहिले, चित्रांची माहिती विचारली आणि भरपूर कौतुकही केले.स्वातीने त्यांना “चहा का कॉफी घेणार?” असे विचारले. कॉफी करण्यासाठी स्वाती किचनमध्ये गेली आणि आशाताईंनी मला एक विनंती केली,
त्या शांत हळुवारपणे मला म्हणाल्या
“मी या चटईवर बसू का थोडा वेळ” ?
आता मात्र मी चक्रावलो. शेजारी खुर्च्या मांडलेल्या असताना ही सुप्रसिद्ध गायिका जमिनीवर बसायचे म्हणते म्हणजे काय!
मी त्यांना खुर्चीवर बसा असे म्हणालो, तर त्यांनी चक्क नकारच दिला.
मी त्यानां खाली बसण्याचे कारण विचारले,
“का जमिनीवर बसत आहात?”
त्या म्हणाल्या खूप वर्षांपूर्वी उमेदीच्या काळात मी एका कार्यक्रमासाठी कोलकत्ता – बंगालमध्ये गेले होते. त्या वेळी एका मोठ्या वयोवृद्ध गायकाच्या घरी गेले होते. तो गायक मोठा होता पण परिस्थिती चांगली नव्हती. तो सक्षम गायक होता; पण त्याच्या घरी खुर्ची नव्हती. अशीच चटई होती . त्या चटईवर मी बसले होते. त्या वेळी ते गायक म्हणाले होते,
“माणूस किती का मोठा कलाकार असे ना! पण त्याचे जमिनीशी असलेले नाते तुटता कामा नये!”
एकदा का हे जमिनीशी नाते तुटले, की अहंकाराची हवा डोक्यात जाते. माणूस संपतो – चैतन्य संपते – कला संपते! आज खूप वर्षांनंतर सगळीकडे परत चटई पाहिली आणि हे आठवले. मग त्यांनी त्या चटईवरच बैठक मारली. तोपर्यंत कॉफी आली. सगळ्यांची कॉफी पिऊन झाली. पुन्हा प्रदर्शन पाहिले त्या वेळी जाताना त्याना अभिप्राय वही दिली. त्यावर त्यांनी
ॐ
फारच सुंदर
मी काय बोलणार?
असा छोटासा अभिप्राय दिला. एक हाफ इंपिरियल साईजचे बंगल्यासमोरचे निसर्गचित्र जलरंगात काढायची असाईनमेंट दिली व त्याचे पैसेही लगेच दिले. निरोप घेऊन निघताना दरवाजात आम्हांला हेमंतने थांबवले. त्याच्या गाडीत जाऊन स्वतःचा कॅमेरा आणला व आम्हांला पायरीवर थांबवून एकमेव फोटो काढला. ( त्या वेळी मोबाईल नव्हते, असता तर खूप फोटो काढून ठेवले असते.)
मी त्यानंतर प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन हेमंत व आशाताईंच्या बंगल्याच्या समोरचे निसर्गचित्र जलरंगात पूर्ण केले. त्याला फ्रेम करून दिली. ते चित्र आजही त्यांच्या बंगल्यात लावले आहे. हेमंत अधूनमधून भेटायचा. त्याच्या पत्नीला संगीत शिकवायचा, त्यासाठी त्याला साथीला तबलजी पाहिजे होता. त्यासाठी मनोहर बगाडे (बापू) नावाच्या आमच्या मित्राची ओळख करून दिली. तो त्यांच्या घरी नियमित जात असे; पण नंतर तोपर्यंत माझी आर्ट गॅलरीच्या सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात निरनिराळ्या ठिकाणी वाताहत झाली व मी सेंट पीटर्स या शाळेत नोकरी करू लागलो. हेमंत नंतर स्कॉटलंडला गेला आणि २८ सप्टेंबरला २०१५ ला कर्करोगाच्या दीर्घ आजाराने सहासष्टाव्या वर्षी त्याचे निधन झाले.
नंतर मला आमच्या (बापू ) तबलजी मित्राकडून कळले, हेमंत भोसले याने १९७० ते १९८५ पर्यंत अनपढ, दामाद, बॅरिस्टर, फिर तेरी याद, टॅक्सी टॅक्सी, तेरी मेरी कहानी यांसारख्या १५ हिंदी चित्रपटांना संगीत दिले होते. मराठीतही त्याचे आशा भोसले यांनी गायलेले ‘शारद सुंदर चंदेरी राती’ हे गाणे खूप गाजले होते. त्याने काही निवडक मराठी गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले होते; पण मुंबईच्या झगमगाटात, तेथील वातावरणात, दगदगीत त्यांचा जीव रमला नाही व तो सर्वांना रामराम करून पाचगणीला शांत जीवन जगण्यासाठी निघून आला; पण…
‘आपण कोण आहोत… कोणाचा मुलगा आहोत…’
याचा कधीही त्त्याने गवगवा केला नाही. स्वतः कधीही मी आशा भोसले यांचा मुलगा आहे म्हणून फुशारकी मारली नाही.
आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांच्या गाण्याविषयी, त्यांच्या संघर्षाविषयी मी काय बोलणार! ते तर सगळ्या जगाला माहीत आहे. गेली कित्येक वर्षे त्या गातच आहेत. १४००० पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांच्या गाण्याचे चाहते जगभर पसरलेले आहेत. त्यांना कित्येक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी व रशियन भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू गुणांनी भरलेले होते. त्या सर्व गुणवैशिष्ट्यांवर अनेक लेख लिहिलेले आहेत.
मला आजही सिडने पॉईंटला जाताना उजव्या बाजूला पडीक, ओसाड व निर्जीव झालेला ‘पॅनोरमा व्ह्यू’ बंगला दिसतो. तेथे आशाताई, हेमंत भोसले आलेले आठवतात.
त्यांच्या वर्षा नावाच्या मुलीने सुसाईड केली, त्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर सर्वांत मोठा मुलगा हेमंत गेला. उरात अनेक दुःखाचे प्रसंग दडलेले असताना गाणी मात्र भावपूर्ण, हसरी व सुखाची गायला लागली; किंबहुना त्यांना तशी गाणी गाण्याशिवाय पर्याय नव्हता!
पण त्यांनी मनातली दुःखाची किनार गाण्याच्या आशयाला पोहचू दिली नाही हा त्यांचा मला सर्वात मोठा गुण वाटतो. त्यांनी हे जाणले होते, की
‘आपण आपले जमिनीशी असलेले नाते कधीही विसरायचे नाही.”
आणि ते नाते त्या विसरल्या नाहीत याचा मी साक्षीदार आहे. त्यांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेतच. काही दिवसांपूर्वी शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन आणखी एक मानाचा मुजरा केला आहे. त्याबद्दल आशाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन केले होते.
आशाताईंची अनेक गाणी मी ऐकली आहेत. त्यांच्यासारखे गाणे म्हणायला मला जमले नाही आणि जमणारही नाही;
पण त्यांचे एक वाक्य मनात कायमचे कोरले गेले आहे :
“आपण कितीही मोठे झालो तरी जमिनीशी असलेले नाते, मातीशी असलेला संपर्क कधीच विसरायचा नाही.”
हे मात्र मी जरूर शिकलो.
आज आशाताई परलोकात अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. तेथेही त्यांची गाण्याची अखंड मैफल सुरू राहील याची खातरी आहे.
त्यांना भावपूर्ण आदरांजली !🙏



