कहाणी…
राजकारणातल्या कलेची आणि कलेतल्या राजकारणाची…
(ज्येष्ठ कविवर्यांची क्षमा मागून)
तेच किस्से त्याच कहाण्या
तेच हशे आणि त्याच टाळ्या
तीच वाक्ये – तीच गाणी
सृजनाची झाली फक्त कहाणी/
ती (च) घराणी ती (च) परंपरा
अहो, मी (च) आहे त्यातील मोठा
बडा घर पोकळ वासा
मात्र सांगेन मीच नेता/
घागर भरली रिती झाली
पुन्हा भरली पुन्हा भरली
कथा उखाणे किस्से यांनी
भरल्यासारखी भासवत ठेवली/
पालथी घागर त्यावर पाणी
आतमध्ये मजकूर नाही
दावी बहु भास मोठा
मीच राजा मीच प्रजा/
साठी सत्तरी नव्वद शंभरी
आकडे फक्त बदलत राहिले
सगळेच गुणी सगळेच शहाणे
सृजनाचे की हो पीकच आले/
काही शेते भरली पिकली
झाडे काही जगली वठली
वठूनही काही स्मृतीत राहिली…
ऊन पाऊस दिवस रात्र
सृजनाचा कधी (तरी) घडे वसंत/
मी…मोठा तू…मोठा
मीही मोठा तूही मोठा
(पण खरेतर मीच मोठा)
सगळं काही गोड गोड
समारंभांना नाही तोड/
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम
डावे उजवे आणि सर्व गामी
फ्यूजनची ती सुंदर गाणी/
फ्यूजनचे कन्फ्यूजन झाले
कला गुणांचे मळेच फुलले
सगळेच श्री, सगळेच भूषण
लहान मोठे सगळेच थोर
सारे काही गोड गोड/
खोटे गुण मोठे झाले
खरे गुण महाग झाले
तीच चर्चा तीच सत्रं
तेच प्रश्न तीच उत्तरं/
रित्या घागरी सुके मळे
ते विचार आणि तेच घराणे
तुझी प्रथा आणि माझे(?) गाणे
मिळून गाऊन (टाकू) सृजन तराणे/
तीच रूपकं तीच उदाहरणं
तीच यमकं तीच गमकं
सांगू एक (मात्र) करू भलतेच
यात बहुधा यशाची मेख
यात आहे यशाची मेख
यातच आहे का (असावी…!) यशाची मेख…???
