अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण पंधरावे .
– संपादक

नऊ तासांनी आम्ही पृथ्वीवर उतरणार. आम्ही सगळेच खूप उत्साहात आहोत. पृथ्वीला प्रदक्षिणा घालत केलेल्या प्रतीक्षेचा हा शेवटचा टप्पा फारच अस्वस्थ करणारा होता. आमचे पंख उड्डाण करण्यासाठी आसुसलेले आहेत. अवकाशयानातील अडचणीने आम्ही जिकिरीस आलो आहोत आणि तरीही, खोल कुठेतरी मला थोडीशी भीतीदेखील वाटते आहे. आई आणि पपा माझ्यासोबत इथे असायला हवे होते असं मला सारखं वाटतं आहे. हे साहस करताना आम्ही एकत्र असायला हवं होतं. काही वाईट घडलं तर, ‘मी म्हटलंच होतं’ अशी भूमिका पपा घेईल आणि अपराधीपणाच्या भावनेने आई कोलमडून पडेल आणि म्हणून यशस्वी होण्याची माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आम्हांला यश मिळेलच! ही मोहीम फत्ते होईल! मी शंभराव्यांदा माझ्या मनाला समजावते. मला जणू आईचाच आवाज ऐकू येतो. मी लहान असताना ती मला असाच धीर द्यायची. आईने मला कडेवर घेतलं आहे त्या फोटोकडे मी बघते. किती तरुण दिसते आहे ती त्यात!
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणारं यान लवकरच मुख्य यानातून बाहेर पडणार आहे. आम्ही पृथ्वीवर उतरण्यासाठी त्या यानात विशिष्ट पद्धतीने आसनस्थ झालो आहोत. काही मिनिटांनी आमचं छोटं यान पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरात प्रवेश करेल. आम्ही खाली पृथ्वीवर वर्षभर राहणार तोपर्यंत मुख्य अवकाशयान पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहील. पृथ्वीवरून परतताना जे यान आम्हांला त्या मुख्य यानाकडे घेऊन येईल ते आमच्या उतरण्याच्या वाहनात व्यवस्थित बांधून घेतलं आहे आणि पृथ्वीवर जगण्यासाठी आम्हांला लागणारी आवश्यक ती सामग्रीदेखील. आम्ही नेहमी वापरतो त्या अंगाला गच्च बसणाऱ्या, लवचीक कपड्यांच्या वर आम्ही अवकाशात वापरायचा सुरक्षात्मक जाड पोशाख घातलेला आहे. आमचे फुगे आमच्या हातात आहेत. आम्ही यानाच्या बाहेर पडू तेव्हाच ते फुगतील.
उतरण सुरू झाली आहे. मला माझ्या शरीराच्या प्रत्येक इंचात गतीचा जोर जाणवतो आहे. गेलं वर्षभर यानातील कृत्रिम गुरुत्वाकर्षण अनुभवल्यानंतर ही गती माझे स्नायू फाडू पाहते आहे. मी माझं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि प्रशिक्षणाच्या वेळी शिकवल्याप्रमाणे मनातल्या मनात उतरण्याच्या निर्देशांची उजळणी करते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश, वेग कमी करण्यासाठी विरुद्ध बाजूच्या रॉकेट्सचे बार उडणे आणि जमिनीवर प्रत्यक्ष उतरण्याची क्रिया ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आमचं यान जरी स्वयंचलित असलं तरी आम्हांला सगळ्यांनाच दक्ष राहणं आणि कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असणं आवश्यक आहे. ही स्वप्नात किंवा भूतकाळात रमण्याची वेळ नाही. ही मन एकाग्र करण्याची वेळ आहे.
दरक्षणाला परिस्थिती अधिकाधिक कठीण होते आहे. विरुद्ध दिशेची रॉकेट्स चालू झाली तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने माझ्या शरीराला लागलेली ओढ मला जाणवते आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याच्या धक्क्यामुळे यानाचा प्रत्येक भाग हादरतो आहे. विरुद्ध दिशेच्या रॉकेट्सचा तिसरा संच चालू झाला आहे आणि आता कुठे आमच्या शरीरांवरचा दाब कमी व्हायला सुरुवात झाली आहे. हालचाल करण्यात अजूनही धोका आहे. जमिनीवर उतरेपर्यंत धोका आहेच. आता आमचं यान जमिनीच्या जवळजवळ समांतर उडतं आहे. आमचा वेग हळूहळू कमी होतो आहे आणि आता आम्ही ग्रहावर उडणाऱ्या विमानासारखे तरंगत चाललो आहोत. यानाच्या बाहेरच्या बाजूला लावलेल्या कॅमेऱ्यांतून स्क्रीनवर प्रक्षेपित झालेल्या दृश्याकडे मी नजर टाकते. माझं मन चट्कन त्याचा अर्थ लावू शकत नाही पण एक धूसर श्वेत दृश्य दिसल्यासारखं वाटतं आणि शेवटी एकदाचा… यानाचा जमिनीला स्पर्श. यान खाली उतरून थांबलं आहे, त्याचं इंजिन मात्र अजून गरगरतं आहे.
नियमाप्रमाणे आम्ही स्थिर बसून राहतो आणि मन शांत करतो. आम्ही दोन-दोनच्या रांगांत बसलो आहोत. माझ्या शेजारी एरा बसली आहे पण तिने डोळे मिटून घेतले आहेत. मी वळून पाहते आणि तिच्यामागे मला ॲग्नॉन बसलेला दिसतो. आमची नजरानजर होते आणि तो हसतो. मी पण सुटकेचा निःश्वास सोडून हसते. आम्ही पोचलो आहोत. एकदम वेगळंच वाटतं आहे. आम्ही एका दुसऱ्या ग्रहावर आहोत, घरापासून जवळजवळ पाच प्रकाश वर्षं दूर. ताऱ्यांच्यामधील प्रचंड अवकाशातून प्रवास करून आम्ही इथे आलो आहोत. त्या प्रवासाची भव्यता आता लक्षात येते आहे. आम्ही सगळे शांत बसून आहोत. यानाच्या इंजिनाचं फुस्कारणं आणि अधूनमधून होणारी मॉनिटर्सची किणकिण याव्यतिरिक्त इतर कोणताच आवाज नाही. पंधरा मिनिटं खूप मोठी वाटत आहेत.
सक्तीने स्थिर राहण्याची पंधरा मिनिटं संपल्याची घोषणा यानातील संगणक शेवटी करतो. आता आम्ही हालचाल करू शकतो. मी माझ्या खुर्चीचा पट्टा सोडते आणि काळजीपूर्वक टेहळणीच्या खिडकीपर्यंत जाते. बाकीचेही तेच करत आहेत. एरा माझ्यामागे येऊन उभी राहते आणि आम्ही बाहेरचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न करतो. सगळीकडे मला फक्त बर्फाने आच्छादलेली सपाट जमीन दिसते. बऱ्याच अंतरावर उजवीकडे एक उघड्या, तपकिरी दगडांचा समूह आहे. त्या वैराण प्रदेशाचा तोचतोपणा मोडणारी ती एकच गोष्ट आहे. यापेक्षा वेगळं काही आम्हांला अपेक्षित नाहीच. गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करून उत्तर ध्रुवाजवळ उतरण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. उतरण्यासाठी ही सर्वात सुरक्षित जागा आहे; शिवाय, ही बहुतांशी अक्षत जमीन आहे. पृथ्वीवरच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीतदेखील इथे फार कमी लोक राहत असत. त्यामुळे, नैसर्गिकरित्या उत्क्रांती झालेल्या जिवाणूंचे अवशेष इथे मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्यांच्यावर मानवी बुद्धीचा परिणाम झाला नाही असे जिवाणू… उत्क्रांतीचे सर्वोच्च फळ… जे नंतर निसर्गावरच उलटले… त्या मानव जातीचा ज्यांच्यावर परिणाम झाला नाही… अखेरच्या युद्धाच्या परिणामांपासूनदेखील आमची उतरण्याची जागा तुलनेने सुरक्षित आहे. आण्विक किरणोत्सर्गाचे प्रमाण इथे कमी आहे.
आणखी चोवीस तास आम्ही यानातून बाहेर पडणार नाही. आकाश जरी काळवंडलेलं आणि भरून आलेलं दिसत असलं तरी मला माहीत आहे, की आत्ता इथे सकाळ आहे. पृथ्वीचा तारा – सूर्य उगवून एक तास झालेला आहे. आजचा दिवस आम्ही यानाच्या आतच घालवणार आहोत. यानाच्या बाहेर बसवलेली निरीक्षण यंत्रं सावध राहतील आणि माहिती गोळा करतील. अजून तरी मला वाऱ्याच्या अखंड येणाऱ्या आवाजाव्यतिरिक्त फारशी माहिती मिळालेली नाही. वारा जमिनीवरचा मोकळा बर्फ उकरून तो आमच्या यानावर फेकतो आहे, त्याच्या वाहण्याच्या प्रवाहात हा अनपेक्षित अडथळा आलेला पाहून तो रागावला आहे.
दिवसाचा बहुतेक वेळ मी यानाच्या बाहेर बसवलेल्या यंत्रांमधून मिळणारी माहिती बघण्यात घालवते. त्यातील आकडे सतत बदलणारी वाऱ्याची गती आणि दिशा दाखवतात. माझ्या बुद्धिवादी मनाला आणखी काही अपेक्षित नाही पण माझी कल्पना शक्ती दरमिनिटाला आमच्यावर चालून येणाऱ्या संकटांची कल्पना करते. कधी ती वन्य श्वापदांच्या रूपात असतात… किरणोत्सर्ग पचवल्यामुळे कधी नव्हती इतकी ती हिंस्र झालेली असतात आणि कधी ती अखेरच्या युद्धानंतर भुयारांत आणि गुहांत तग धरून राहिलेल्या विध्वंस करणाऱ्या आदिम जमातींच्या टोळ्यांच्या स्वरूपात असतात. मी लहान असताना अधाशीपणे वाचलेल्या प्राचीन वाङ्मयातल्या सगळ्या गोष्टी मला आठवतात. भीषण युद्धांच्या कथा, प्रेमाच्या आणि विरहाच्या कथा आणि काल्पनिक कथासुद्धा – देवांच्या, पिशाच्चांच्या, राक्षसांच्या आणि देवदूतांच्या. सुरुवातीला मी त्या कथा गुपचूप वाचत असे. संध्याकाळी जेव्हा माझी अभ्यासातली प्रगती तपासायला आई यायची त्या आधी मी वाचलेल्या गोष्टींच्या खाणाखुणा कशा पुसून टाकायच्या ते मी शिकले होते. पण मग एक दिवस मी एक गोष्ट वाचण्यात गढून गेले होते आणि आई खोलीत आली आहे आणि मला डोळे विस्फारून एक प्राचीन गोष्ट वाचताना पाहते आहे हे मला कळलंच नाही. तिला तिथे पाहून आणि माझं गुपित तिला समजलं असं वाटून मी तर घाबरूनच गेले होते; पण ती मुळीच रागावली नाही. उलट प्राचीन गोष्टींमध्ये मला रस आहे ही गोष्ट तिला आवडलीच होती. तिला खूप जुन्या गोष्टी माहीत होत्या. तेव्हापासून ती मला कितीतरी प्राचीन गोष्टी सांगू लागली; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काल्पनिक कथा आणि ऐतिहासिक सत्य यांतला फरक तिने मला समजावून सांगितला आणि कधीकधी या दोन्हीतील सीमारेषा कशी पुसट होते हेदेखील तिने मला शिकवलं.
आणि जिथं या सगळ्या कथा – मग सत्य घटनांवर आधारित असोत अथवा तिथे राहणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्तीतून उत्पन्न झालेल्या असोत – निर्माण झाल्या त्या ग्रहावर आता मी प्रत्यक्ष उतरल्यावर सगळंच खोटं वाटतं आहे. हा ग्रह बिनडोक आणि कंटाळवाणा वाटतो आहे. एवढी कल्पनाशक्ती इथे निर्माण झाली असणं शक्यच नाही; तरीदेखील मला माहीत आहे, की ही पृथ्वी आहे. मानवाला जन्म देणारा ग्रह आणि आम्ही इथे तिला विचारायला आलो आहोत, की कोट्यवधी वर्षांपूर्वी इथे जीवन कसं सुरू झालं?
तो दिवस शांतपणे पार पडतो. संध्याकाळी ढगांचं आवरण थोडसं विरळ झाल्यावर आकाशाचा रंग थोडा बदलतो आणि मग अंधार. संपूर्ण, पुरेपूर अंधार! आमच्या यानाचा जमिनीवर पडलेला फिकट गोल प्रकाशाचा झोत सोडला तर काहीच दिसत नाही. आकाशसुद्धा अंधारं आहे. ढग इतके भरून आले आहेत, की आम्हांला तारे दिसत नाहीत. मी माहिती वाचणं आणि निरीक्षण करणं थांबवते. आमच्या यानाच्या आत आम्ही पूर्णपणे सुरक्षित आहोत हे आम्हांला सर्वांना माहीत आहे आणि तरीही मला झोप लागत नाही. आपण एका अपरिचित विश्वात आहोत ही भावना मनात खोलवर आहेच. जीवन पोसू न शकणारं रिकामं अंतराळदेखील त्या मानाने आश्वस्त करणारं वाटलं होतं. पण हा माझा वेडेपणा आहे. अवकाशात आम्हांला आमच्या यानाचा आधार होता. इथे पृथ्वीवर आम्ही त्याशिवायदेखील जगू शकतो. पण तरीसुद्धा मला भीती वाटते आहे. बाकीचे सगळेपण थोडे अस्वस्थ आहेत हे मला जाणवतं आहे.
आदल्या दिवसाइतकीच रात्रदेखील शांतपणे पार पडते. पृथ्वीवर पाऊल ठेवल्याची शंभर स्वप्नं मला जागी होण्यापूर्वी पडून गेलीत.
जागे झाल्याच्या तासाभरात आम्ही यानातून खाली उतरून जमिनीवर पाऊल ठेवण्यास तयार आहोत. पोलिना आणि एड्डी यानातच थांबणार आहेत आणि बाकीचे आम्ही सगळे यानाच्या आसपासचा एक किलोमीटर परिघाचा प्रदेश तपासणार आहोत. आम्ही दोन-दोनच्या गटांनी बाहेर पडतो. मी माझ्या पृथ्वीवर घालायच्या पोशाखात, हातात फुगा घेऊन लिफ्टमध्ये उभी राहते. टॉमिशो मानेनेच खूण करतो आणि आम्ही यानाच्या गच्चीवरून जमिनीच्या पातळीपर्यंत हळूहळू खाली येतो. जमिनीवर उतरल्यावर आम्ही नैऋत्येला ११० अंश कोनाच्या दिशेला जाणार. लिफ्ट जमिनीच्या पातळीवर पोचते आणि आम्हांला बाहेर पडू देण्यासाठी दार उघडतं. मी काळजीपूर्वक बर्फावर पाऊल ठेवते. ज्या पहिल्या मानवाने पृथ्वीच्या बाहेर असलेल्या जमिनीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं असेल तेव्हा त्याला जसं वाटलं असेल तसंच मला वाटतं. माझा फुगा फुगतो आणि मी त्याच्या आत शिरते. पण त्यापूर्वी माझ्या चेहऱ्यावर बर्फाळ वाऱ्याचा एक फटकारा बसतोच. फुग्याच्या आत ऊब आहे आणि श्वास घेण्यास शुद्ध हवा आहे. त्यात किरणोत्सर्गापासूनपण संरक्षण आहे, आमची शरीरं त्यासाठी काही अंशी तयार असली तरी!
इतर लोक आमची वाट बघत थोडं पुढे थांबले आहेत. यानातून चौदाजण बाहेर येईपर्यंत आम्ही वाट पाहतो. मग आम्ही आपापल्या दिशांना पांगतो. मी टॉमिशोबरोबर घरंगळत चालते. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जवळजवळ स्वर्गाइतकंच आहे, थोडंसं जास्त. आम्ही चालत गेलो तर लवकर दमून जाऊ, पण फुग्यांमुळे आम्ही टप्पे घेत पुढे जातो आहोत. जमीन बर्फाच्छादित असल्याने कोणतेही अडथळे नाहीत, फक्त चढउतार असलेला पांढरा पृष्ठभाग आहे. दृष्टी पोचते आहे तिथपर्यंत सगळीकडे असंच आहे. आभाळ अजूनही भरून आलेलं आहे आणि वारादेखील कालच्यासारखाच वाहतो आहे. आम्हांला काय दिसतं आहे ते आम्ही यानात थांबलेल्या लोकांना आणि इतर दिशांना गेलेल्या गटांना कळवतो. सगळ्यांचा अनुभव सारखाच आहे. आम्ही आणखी काही मिनिटं घरंगळत जातो आणि मग यानाच्या दिशेने परत फिरतो. पृथ्वीवरच्या पहिल्या फेरीत सांगण्यासारखं काहीच नाही. माझा थोडा हिरमोड झाला आहे. पृथ्वीवर सगळीकडे जर असंच असेल तर जीवनाबद्दल कोणतेही धागेदोरे मिळण्याची आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडण्याची काहीच शक्यता नाही. पण अर्थातच, असा विचार करणं चुकीचं आहे. आमच्या निरीक्षण यंत्रांना विषुववृत्ताजवळ घनदाट अरण्य दिसलं आहे. मी इतक्या लवकर निराश होता कामा नये.
यानात परत आल्यावर आम्ही सगळ्या गटांनी गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण करतो. ज्या शक्यतांचं आधीच भाकीत केलं गेलं होतं त्यांच्याशी निरीक्षणातून गोळा केलेली माहिती पडताळून पाहतो आणि ती नव्वद टक्के जुळते. आमची निरीक्षण-यंत्रं कुशल आहेत आणि त्यांनी बरोबर भाकीत केलं होतं. आम्ही पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर तिथल्या हिवाळ्यात उतरलो आहोत. इथे फारसं काही दिसण्याची अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. उद्या आम्ही आमच्या कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानात बसून आणखी निरीक्षण करू. मग आम्ही आमची मोठी विमानं बाहेर काढू आणि खालच्या अक्षांशांच्या प्रदेशात जाण्यासाठी निघू.
त्या रात्री, अंथरुणावर पडताना, माझा अनुभव कुणाला तरी सांगायची मला तीव्र इच्छा होते… आई, पापा, जयंत, इव्हान किंवा काईटो. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, की मी पृथ्वीवर पोचले, तिथल्या जमिनीवर मी पाऊल ठेवलं, ज्या आकाशाखाली मी जन्मले नव्हते असं तिथलं अपरिचित आकाश मी पहिलं. मला दिसलेलं दृश्य म्हणजे एकसारखा असलेला पांढरा प्रदेश असला म्हणून काय झालं, मला त्यांना त्याबद्दल सांगायचं आहे. आईचा फोटो हातात धरून मी तिच्याशी बोलते. मी रोजनिशी लिहायला हवी. माझा कॉम बाहेर काढून मी त्यात नवी फाइल उघडते. ‘पृथ्वीवरचा पहिला दिवस,’ या ग्रहावरचा माझा इतिहास नोंदवायला मी सुरुवात करते.
दुसऱ्या दिवशी आम्ही आळीपाळीने कमी उंचीवरून उडणारी विमानं चालवतो. आज मी एन कियांबीबरोबर जाते. आम्ही ईशान्य दिशेला वीस अंशापासून ते पंचेचाळीस अंशापर्यंत वीस किलोमीटर प्रदेशातून उडत जातो. बर्फाच्या पांढऱ्या आवरणातून वर आलेले काही दगड आम्हांला दिसतात पण झाडंझुडुपं किंवा प्राणी दिसत नाहीत. एक दोन ठिकाणी जमिनीवर उतरून आम्ही बर्फाच्या आत खोलवर आमची यंत्रं खुपसून नमुने गोळा करतो. खालच्या अक्षांशांच्या भागात गेल्यावर आम्ही ज्या प्रयोगशाळा उभारू तिथे हे नमुने तपासले जातील. ज्युलिएटा आणि ओन्नीने जेव्हा त्यांची यंत्रं बर्फात खुपसली तेव्हा त्यांना पाणी लागलं.
आता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळे यानात परतलो आहोत. संध्याप्राशन करत आम्ही पुढचे बेत आखतो. या बर्फाच्छादित प्रदेशातून बाहेर पडून अधिक आकर्षक स्थळांचं निरीक्षण करण्यास आम्ही सगळेच उत्सुक आहोत. अवकाशातून पृथ्वीवर उतरलेलं आमचं यान आम्ही इथेच ठेवणार आहोत आणि तीन वेगवेगळ्या विमानांत बसून आम्ही तीन दिशांना जाणार आहोत. एक गट प्रशांत महासागराच्या तटाकडे जाणार आहे, दुसरा उष्ण कटिबंधाच्या प्रदेशात आणि तिसरा गट पृथ्वीचा अर्धा गोलार्ध ओलांडून न्यूझीलंडकडे जाणार आहे. मी उष्ण कटिबंधात जाणारा गट निवडते कारण अखेरच्या युद्धाच्या आधी हा प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश होता आणि गतसंस्कृतीचे अवशेष इथे सापडण्याची जास्त शक्यता आहे असं मला वाटतं. झोपण्यापूर्वी मी तसं माझ्या रोजनिशीत लिहून ठेवते.
दुसऱ्या दिवशी आमच्या यानातून विमानांचे भाग बाहेर काढण्यात आणि ते एकत्र जोडून ती विमानं लांबच्या उड्डाणासाठी तयार करण्यात आमचा बराच वेळ जातो. ते काम जरी बरंचसं स्वयंचलित असलं तरी आम्हांला आवश्यक त्या सूचना द्याव्या लागतात. या दूरच्या ग्रहावर अभियांत्रिकीचं हे पाहिलं कार्य यशस्वीपणे पार पडलं म्हणून व्हेनला खूप आनंदात आहे. आम्हांला सगळ्यांनाच एक प्रकाराचा अभिमान वाटतो आहे. आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात आम्ही कधीच इतके एकटे आणि स्वावलंबी नव्हतो. आमच्या खांद्यांवर असलेलं जबाबदारीचं ओझं आम्हांला जाणवतंय पण आम्हांला आत्मविश्वासही आहे. आमच्या धमन्यांतून तरुण रक्त सळसळतं आहे.
विमानं उड्डाणासाठी तयार झाल्यावर आम्ही त्यांत सगळं आवश्यक ते सामान लादतो – आमच्या प्रयोगशाळा आणि आमची घरं उभारण्याची सामग्री, जमिनीवर चालणाऱ्या गाड्या – या गाड्या म्हणजे आमच्या झिप्परमध्येच बदल करून तयार केलेल्या आहेत; कारण आम्हांला इथे रस्ते अपेक्षित नाहीत; शिवाय छोटी विमानं आणि ड्रोनदेखील आहेत आणि प्रयोगशाळेत लागणारी सगळी उपकरणं. आम्ही पाण्याचा थोडाच साठा आणला आहे पण आमच्याकडे पाणी शुद्ध करायची उपकरणं आहेत आणि आमची पौष्टिक पेयं आणि शक्तिवर्धक रसायनंसुद्धा. कोणता गट कोणते विमान नेणार हे ठरल्यानंतर आम्ही आमचं वैयक्तिक सामान त्यात भरतो. मी माझे पोशाख आणि कॉंप्युटेशनची उपकरणं, माझा कॉम आणि आईने दिलेला स्थिर फोटो बरोबर घेते. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतो. ली जिंग आणि व्हेनला खूप भावुक होतात. मला निघायची घाई आहे. आम्ही अर्थातच अधूनमधून एकमेकांच्या स्थळांना भेटी देऊ आणि काही अधिक सामानाची गरज पडल्यास आम्हांला या मोठ्या यानाकडे परत यावे लागेल. आमच्यापैकी कोणी जर अकार्यक्षम झालं तर युइआ आणि एड्डीला त्यांच्याकडे जावं लागेल कारण ते दोघेच आमच्या पथकातील जीवशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि दुसऱ्या दोन गटांना जर त्यांच्या स्थळांवर संस्कृतीचे अधिक चांगले अवशेष सापडले तर, मला तिथे विमानाने जावं लागेल. ॲग्नॉन आणि ज्युलिएटा माझ्या पथकात आहेत म्हणून मला आनंद झाला आहे. इथवरच्या लांबच्या प्रवासात आमची चांगली मैत्री जमली आहे.
दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही निघतो. आम्ही रात्र आणि दिवसाच्या खेळातून प्रवास करणार आणि जुन्या संस्कृतीत भारत नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात उतरणार आहोत. हे स्थान निवडण्यात माझा थोडा वाटा आहे कारण त्या प्रदेशाबद्दल मला उत्सुकता आहे. आई म्हणते, की आमचे पूर्वज तिथून आले. ती नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मानवांच्या साखळीचा घटक आहे आणि म्हणून तिला आपलं मूळ माहिती आहे, निदान तिच्या आईच्या बाजूचं. ते माझंही मूळ आहे आणि म्हणून त्या प्रदेशाचा भरपूर इतिहास मी वाचला आहे. प्राचीन जगातली ती सर्वात जुनी संस्कृती होती. तिथे काही अवशेष सापडतील अशी मला आशा आहे. आम्ही तिथे एका मोठ्या तळ्याच्या काठी उतरायचा बेत करतो आहोत. निर्जंतुक आणि शुद्ध करून वापरता येण्यासाठी त्यात भरपूर पाणी असावं.
आम्ही आग्नेय दिशेकडे उडत जातो, बर्फापासून दूर आणि तेजाने उजळलेल्या आकाशात. ध्रुव प्रदेशातील रूपहीन पृथ्वीवर आता ओळखता येतील असे आकार स्पष्ट होऊ लागले आहेत. विमान उडवण्यात माझं काही काम नाही आणि म्हणून मी खिडकीला चिकटून बसले आहे. मला डोंगर, नद्या ओळखता येतात आणि विमानात बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून झूम केल्यावर शेवटी एकदाचं झाडांसारखं काहीतरी दिसतं. निम्मं अंतर कापून गेल्यावर आम्ही प्रचंड अटलांटिक महासागर ओलांडतो. आमच्याकडे स्वर्गावर फक्त समुद्र आहेत, या महासागराइतकं प्रचंड काहीच नाही.
आम्ही पश्चिम आशियाच्या खडबडीत डोंगरांवरून उडत राहतो आणि शेवटी एके काळी सुपीक असलेल्या भारताच्या भूमीत प्रवेश करतो. त्या प्रदेशाचं पहिलं दर्शन मला सूर्योदयाच्या वेळी तरंगणाऱ्या विरळ ढगांतून मिळतं. खूप खूप खोलवर मला झाडांचे हिरवे पुंजके दिसतात. थोड्याच वेळात आमचं विमान खाली उतरू लागतं आणि पृथ्वी जवळ येऊ लागते. आता ती बर्फाच्या किंवा पाण्याच्या आवरणाखाली झाकलेली नाही. ती उघडी, तपकिरी जमीन आहे. पाण्याचे स्रोत तिच्यावरून वाकडे तिकडे वाहताहेत आणि तिच्यावर झाडांचे अनेक पुंजके दिसताहेत. मला हिरवळीने झाकलेल्या टेकड्या आणि सकाळचं ऊन्ह परावर्तित करणारे तलाव दिसतात. विमानातील माझ्या जागेवरून असं वाटतंय, की आम्ही जसजसं खाली येतो आहोत तसतशी पृथ्वी आम्हांला भेटायला धावून वर येते आहे. जमिनीच्या जवळ आल्यावर आम्ही विमानाचा वेग कमी करतो आणि एखादा किडा हलकेच जसा फुलावर बसतो तसं आमचं विमान हलकेच खाली उतरवायच्यासाठी आम्ही योग्य ती जागा शोधतो. जेव्हा अखेर विमान जमिनीवर उतरतं आणि आम्ही बाहेर पडतो तेव्हा पहिली जी गोष्ट जाणवते ती म्हणजे गंध – एक भारावून टाकणारा ताजा वास. बऱ्याच काळानंतर हा वास ओल्या मातीचा, पावसाने नुकत्याच भिजवलेल्या आणि अंकुर फुटणाऱ्या बियाण्याची पहिली जागृती आपल्या गर्भात धारण करणाऱ्या मातीचा सुगंध आहे हे मी ओळखायला शिकेन.
एका झाडांनी वेढलेल्या मोठ्या तलावाच्या काठाशी आम्ही उतरलो आहोत. मी यापूर्वी कधीही पाहिली नाहीत अशी झाडं आहेत ती. त्यांच्यावर फुलं उमललेली नाहीत आणि अगदी दाटीवाटीने वाढलेली आहेत ती. तलावाचं पाणी शांत आहे आणि हवादेखील स्तब्ध आहे. इथे अगदी घरच्यासारखं वाटतं आहे कारण इथे फार थंडीही नाही आणि फार उकाडाही नाही. सकाळ ताजीतवानी आणि रम्य आहे. आम्ही पट्कन आमच्या फुग्यांमध्ये शिरतो आणि आमची निरीक्षण यंत्रं हातात धरून पुढे होतो. आम्ही वर्तुळाकार पांगतो आणि त्यानंतरचा अर्धा तास आम्ही आमच्या उतरण्याच्या जागेच्या आजूबाजूचा परिसर कसून तपासतो. आम्हांला सगळीकडे अनेक प्रकारच्या वनस्पती दिसतात, झाडं, झुडुपं, वेली, गवत आणि एखाद् दुसरा किडा. जिथे हिरवळीने जमीन झाकलेली नाही तिथली माती मऊ आहे पण बहुतेक ठिकाणी ती झाडांच्या जाड मुळांनी बांधून ठेवलेली आहे आणि गळलेल्या पानांनी आच्छादलेली आहे. आम्हांला कोणतेही प्राणी दिसत नाहीत आणि कोणताही आवाज ऐकू येत नाही. आमची यंत्रं केवळ सूक्ष्म किरणोत्सर्ग नोंदवतात.
सकाळची ताजी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मला मोहात पडतात. मी माझ्या फुग्यातून बाहेर पडते, माझे पंख पसरते आणि ऊन्ह खाण्यासाठी गवतावर गुडघे टेकून बसते. मी हात जोडते आणि ज्या शक्तीने मला माझ्या घरापासून अब्जावधी मैल दूर आणलं असूनही ऊर्जेसाठी ताऱ्याचा प्रकाश, श्वास घेण्यासाठी हवा आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं तिच्यावर चित्त एकाग्र करते.
-_____________________________________________________________________________________________________
तळ्याच्या काठी आम्ही उतरल्यापासून आज तिसरा दिवस. या ग्रहावर आम्ही घालवलेल्या काळाची मोजणी करण्यासाठी आम्ही आमचं पृथ्वीवरचं कॅलेंडर आणि पृथ्वीवरचं घड्याळ यांची नोंद ठेवायला सुरुवात केली आहे. घरच्या मंडळींच्या काळाशी नातं जोडलेलं ठेवण्यासाठी आम्ही दुसरी काही घड्याळं स्वर्गावरच्या घड्याळांशी आणि कॅलेंडरशी समांतर ठेवली आहेत, पण त्यात काही अर्थ नाही. त्या कॅलेंडर आणि घड्याळाप्रमाणे, स्वर्ग सोडून मला पाच वर्षं झाली आणि आता एडन आणि स्टारव्हिलेमध्ये संध्याकाळचे चार वाजले आहेत. या एकूण पाच वर्षांत – ज्यापैकी चार वर्षं माझ्यासाठी अस्तित्वातच नव्हती – माझ्या आई वडिलांनी काय केलं? त्याची कल्पना करणं मला फार कठीण जातं. मी जन्मण्यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्यासारखंच काहीतरी आहे हे. असा काळ जो त्यांच्या दृष्टीने अगदी खराखुरा होता पण जो माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हता.
आम्ही एक संदेश पाठवण्याची छोटीशी यंत्रणा उभी केली आहे आणि आमचे थोडक्यात बोललेले संदेश स्वर्गाकडे पाठवून दिले आहेत. त्यांच्या काळाच्या गतीप्रमाणे हे संदेश त्यांना आम्ही स्वर्गावर परतण्यापूर्वी एक वर्ष आधी मिळतील. आमचं सर्वात पहिलं काम म्हणजे आमची घरं उभारण्याचं होतं आणि आता आमच्या विमानापासून थोड्या अंतरावर सहा घरं एका वर्तुळात उभी आहेत. आम्ही अजूनही सामान ठेवायला विमानाचा उपयोग करतो आहोत. आता आम्ही आमची प्रयोगशाळा उभारत आहोत. कालच आम्ही आधीच तयार केलेले प्रयोगशाळेचे भाग विमानातून बाहेर काढले. आज आम्ही आवश्यक ते भाग इथेच छापून प्रयोगशाळा बांधायला सुरुवात करू. मग आम्हांला आणखी व्यवस्थित संदेश यंत्रणा उभारता येईल आणि आमचे एकतर्फी संदेश नियमित पाठवता येतील. आमचे संदेश स्वर्गावर पोचण्यापूर्वी नेहमीच पाच वर्षांचा अवधी लागणार, तरीही आम्ही आमची पृथ्वीवरची प्रगती त्यांना नियमितपणे कळवत राहणार. काही कारणाने आम्हांला स्वर्गावर परत जाणं शक्य झालंच नाही आणि आमची कहाणी प्रत्यक्षात सांगता आलीच नाही तरी हे संदेश ती उणीव भरून काढतील. स्वर्गावरून आमच्यापर्यंत कोणताही संदेश पोचणार नाही कारण सर्व काही जर ठरल्याप्रमाणे घडत गेलं तर आम्ही वर्षभराने पृथ्वी सोडणार आणि अगदी प्रकाशाच्या वेगाने येणारा संदेशदेखील तोपर्यंत इथं पोचू शकणार नाही. मला आईच्या फोटोशी बोलण्यातच समाधान मानावं लागेल.
व्हेनला एका काडीने जमिनीवर प्रयोगशाळेचा नकाशा काढते आहे. टॉमिशोच्या मदतीने ॲग्नॉन आधीच तयार केलेले भाग एकमेकांना जोडतो आहे. एन कियांबी तळ्याचं पाणी शुद्ध करण्यात मग्न आहे. दोन दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा आमच्याकडे आहे पण कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावं म्हणून त्याला आणखी पाणी साठवून ठेवायचं आहे. आम्ही हवामानासंबंधी जी माहिती गोळा केली आहे त्यानुसार पावसाळा सुरू होईपर्यंत इथलं हवामान उत्तम राहणार आहे आणि अजून सात महिने पावसाळा काही सुरू होणार नाहीये. आमचे प्रयोग करण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे.
पंखांवर ऊन्ह झेलताना मला छान वाटतं आहे. हा तारा जरी वेगळा असला तरी त्याचा प्रकाश सारखाच आहे आणि त्याने माझी ऊर्जेची आवश्यकता भागते. गेले दोन महिने कृत्रिम प्रकाशात राहिल्याने जो अशक्तपणा आला होता तो या पौष्टिक प्रकाशाने तर भरून निघतो आहेच. केवळ माझं शरीरच नव्हे तर माझं मनही त्यामुळे प्रसन्न झालं आहे. मला खूप मोकळं आणि आनंदी वाटतं आहे. मी आमच्या घरांवर चकरा मारते आहे कारण आमच्या ड्रोन्सना आसपास अनेक मैल कोणताही प्राणी किंवा कसलीही हालचाल जरी दिसलेली नाही तरी इतर लोक मला जास्त लांबवर उडू देत नाहीत. आमच्या सोबतीला केवळ प्रचंड वृक्ष आणि सूक्ष्म किडे आहेत असं दिसतंय.
“आपली घरं आणि प्रयोगशाळा उभारण्यात आपला फारच वेळ जातो आहे. नमुने गोळा करण्यात आणि प्रयोग करण्यात जो वेळ आपण घालवायला हवा तो हे कोश उभारण्यात वाया जातो आहे.”
“प्रयोग करायला जर प्रयोगशाळाच नसेल तर त्या नमुन्यांचा काय उपयोग?” पोलिना खोचून म्हणते.
“प्रयोगशाळा नको आहे असं नाही मला म्हणायचं, फक्त ती उभारण्यात आपला वेळ जायला नको.”
ॲग्नॉन हसतो. “हो, मला या ग्रहावर पऱ्या, देव आणि जादूगार सापडले, की मी त्यांना कामाला लावणारच आहे. तोपर्यंत, आरुषी, हे त्रिमितीय छपाई यंत्र जोडायला मला मदत करशील?”
“अर्थात,” मी मनापासून होकार देते आणि त्याच्या बाजूला उडत जाते. ॲग्नॉन आमच्या गटात आहे हे मला फार बरं वाटतं. तो खूप मेहनत करतो आणि नेहमीच छान बोलतो.
“मला वाटतं आणखी दोन दिवसांत आपलं सगळं आवश्यक ते काम पूर्ण होईल. मग आपण नमुने गोळा करायला सुरुवात करू शकतो,” टॉमिशो थोड्या वेळाने म्हणतो.
“त्याआधी आपण थोडं आणखी फिरून आलो तर?” तिच्या कॉमच्या आज्ञेनुसार आपल्याआपण उघडत असलेल्या फळ्यांवर वाकत व्हेनला म्हणाली. “हे काम जर मला पट्कन संपवता आलं तर उद्या मी गाडीत बसून एक फेरफटका मारून यावा म्हणते.”
“आपण काय काय कसं कसं करायचं याचा आराखडा आखला पाहिजे आणि आणखी काही दिवस आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. अजून या ग्रहाची आपल्याला पुरती ओळख पटलेली नाही, ” ॲग्नॉनने सुचवलं.
पॉलिना आणि टॉमिशो काही याच्याशी सहमत आहेत असं मला तरी वाटत नाही. त्यांना काहीतरी धाडस करायची खुमखुमी आलेली आहे.
____________________________________________________________________________________________________________
माझ्या झोपायच्या खोलीच्या खिडकीतून सकाळचं ऊन्ह आत आल्यावर मी जागी होते. उजाडल्यावर लगेच जाग यावी म्हणून मी नेहमीच पडदे थोडेसे उघडे ठेवते. काल रात्री माझ्या स्वप्नात आई आणि पपा आले. स्वप्नात मी लहान होते आणि आई आणि पपा मला उडायला शिकवत होते. आनंदी दिवस होते ते. त्या स्वप्नाची ऊब अजूनही माझ्या मनात रेंगाळते आहे.
मी उठून न्हाणीघरात जाते. आंघोळ करून, प्राशन करून मी ऊन्ह खाण्यासाठी लगबगीने बाहेर पडते. तळ्याकाठच्या गवतावर मी गुडघे टेकून बसते, माझे पंख पसरते, हात जोडते आणि निसर्गातील शक्तीवर चित्त केंद्रित करण्याचा प्रयत्न करते. जी शक्ती ताऱ्यांना तेज देते आणि आपल्या शरीरांच्या पुष्टीसाठी प्रकाश निर्माण करते; जी शक्ती आपल्या मनांना विचार करण्याची क्षमता देते आणि ज्या शक्तीने या ग्रहावर जीवन निर्माण केलं. मी माझ्या मनातून सर्व विचार काढून टाकते आणि प्रकाशाच्या एका बिंदूवर ध्यान एकाग्र करते. अर्ध्या तासानंतर, माझं मन शांत आहे आणि माझ्या शरीरात भरपूर शक्ती आली आहे. मी पंख मिटून उठते. टॉमिशो सोडून बाकीचे सगळे मला आसपास गुडघे टेकून बसलेले दिसतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हलक्या पावलांनी माझ्या घरापर्यंत जाते आणि माझ्या ओसरीच्या पायऱ्यांवर बसते.
अतिशय प्रसन्न आणि शांत सकाळ आहे. सूर्याचे कोवळे किरण पडल्याने तलावाचं पाणी चकाकतं आहे. हे जर स्वर्गावरचं तळं असतं तर त्याच्या काठाशी बसायला बाक असते, सभोवती फुलझाडं आणि स्वयंप्रकाशी झुडुपं असती आणि पाण्यावर नावा आणि पाण्यातल्या खेळांची सामग्री असती. लोक पाण्यात आणि तळ्याच्या भोवताली खेळत असते, ऊन्ह आणि पाण्याचा आनंद घेत असते. तिथे लोकांना महत्त्व असतं आणि तळं – जीवनाचा उपभोग घेण्याचं आणखी एक साधन. पण इथे, हा तलाव भारावून टाकणारा आहे. आम्ही सहा माणसं त्याच्या काठावरील एक नगण्य तपशील आहोत. निसर्ग आमच्याशी या एकांताच्या माध्यमातून बोलतो आहे आणि आम्ही त्याची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत.
आज आम्ही आमची तपासणी आणि नमुने गोळा करण्याची मोहीम सुरू करतो आहोत. आम्ही सगळेच इतके उतावीळ झालो आहोत, की प्रत्येकानेच थोडीफार भटकंती करून घेतली आहे. टॉमिशोने जमिनीवर चालणाऱ्या गाडीत बसून फिरून घेतलं आहे आणि त्यामुळे तो सर्वात जास्त लांब जाऊ शकला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे अरण्य अधिक दाट आहे असं तो म्हणाला. त्याला काही मोकळी कुरणंही दिसली; पण संस्कृतीच्या काही खाणाखुणा आढळल्या नाहीत. प्राणीही दिसले नाहीत. पॉलिना आणि मी आमच्या फुग्यांमध्ये बसून टप्पे खात फिरतो आहोत आणि आम्हांला असं दिसलं आहे, की जसजसं आपण तळ्यापासून दूर जातो तसतसं अरण्य अधिक घनदाट होत जातं. मी गुपचूप तळ्यावरून उडत काही फेऱ्या मारल्या आहेत; पण फुग्यांच्या बाहेर जास्त वेळ राहणं सुरक्षित नाही असंच इतरांना वाटतं. ॲग्नॉन तळ्याच्या ईशान्येकडची टेकडी चढून गेला आहे आणि तिथून त्याला तळ्याच्याही पलीकडचं दृश्य दिसलं. त्याला असं वाटतं, की तळ्यातून एक नदी उगम पावते आणि आम्ही आहोत त्याच्या विरुद्ध दिशेला वाहत जाते. टेकडी चढणं कष्टाचं काम आहे कारण स्वर्गापेक्षा पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण काही अंश जास्त आहे आणि त्यामुळे लवकर दमायला होतं. एन कियांबीने बहुतेक वेळ आमच्या तळावरच घालवला आहे. तो आमच्या प्रयोगशाळेची व्यवस्था लावतो आहे म्हणजे आम्हांला लवकरात लवकर प्रयोग सुरू करता येतील.
इतरांचं ऊन्ह खाऊन झालं आहे आणि आम्ही आमच्या तळावरून निघायला तयार आहोत. एन कियांबी तळावरच थांबणार आणि आम्ही पाच जण बाहेर जाणार असं ठरलं आहे. टॉमिशो, पॉलिना आणि ॲग्नॉन जमिनीवरून चालणाऱ्या एका गाडीत बसून जाणार आणि व्हेनला आणि मी दुसऱ्या गाडीतून जाणार. संध्याप्राशनाच्या वेळेपर्यंत परत यायचं असं ठरलं आहे. आम्ही आमच्या फुग्यात शिरतो, गाडीत चढतो आणि आमच्या तळावरून निघून तलावाच्या उजव्या काठावरून पुढे जाऊ लागतो. आमची गाडी स्वयंचलित आहे आणि तिच्यावर बसवलेले कॅमेरे आमचा प्रवास आणि अधूनमधून आम्ही जिथे थांबू त्याचं छायाचित्रण करत राहतील. मी मागे वळून पाहते आणि दुसरी गाडी विरुद्ध दिशेला जाताना आणि आमची घरं आमच्यापासून दूर जाताना मला दिसतात. आमच्या डावीकडे सकाळच्या कोवळ्या उन्हात तलाव प्रशांत दिसतो आहे. उजव्या बाजूला, झाडांची हिरवी भिंत आहे. तळ्याकाठच्या खडबडीत जमिनीवर चालताना होणारा आमच्या गाडीचा आवाज आजूबाजूच्या स्तब्ध वातावरणात अनैसर्गिक वाटतो आहे.
थोडं आणखी पुढे गेल्यावर, आम्हांला झाडांच्या दाटीत थोडी मोकळी जागा दिसते आणि आम्ही आमच्या गाडीला त्या दिशेने जाण्याची सूचना करतो. इथे झाडांच्या मधून एक दगडगोट्यांनी भरलेली खडबडीत वाट जाते आहे. एखाद्या मोसमी झऱ्याचं सुकलेलं पात्र असावं. आमची गाडी त्या दगडगोट्यांवरून जपून पुढे जाते आणि दोन्ही बाजूंना असलेल्या झाडीच्या मधून आमचा प्रवास सुरू होतो. मी झाडांची तपकिरी खोडं न्याहाळते, बहुतेक खोडांवर पोपटी शेवाळ किंवा सुबक नेचे आहेत. झाडांवर भरगच्च पर्णसंभार आहे – छोट्या थेंबांच्या आकाराच्या गर्दीपासून ते पसरट कॉमच्या आकाराच्या चपट्या पानांपर्यंत. झाडं सर्व प्रकारच्या उंचीची आणि आकारांची आहेत; पण माझ्या कॉमने केलेल्या मोजणीनुसार बारा ते पंधरा फूट उंचीची झाडं अधिक आहेत आणि आमच्या आजूबाजूला केवळ हिरवाच रंग नाही. अधूनमधून आम्हांला फुलांनी डवरलेलं एखादं झाड दिसतं – पिवळी, लाल किंवा पांढरी फुलं आणि क्वचित केशरी आणि गुलाबी. मला गाडीतून उतरून त्या झाडांकडे जावं, त्यांची फुलं हातांत भरून घ्यावीत आणि लहान असताना जशी मी ती पपाच्या डोक्यावर उधळत असे तशी व्हेनलाच्या डोक्यावर उधळावीत असं वाटतं.
पंधरा मिनिटं प्रवास केल्यावर आम्ही एका लहानशा मोकळ्या जागी पोचतो. मोकळी जागा म्हणण्यापेक्षा काही उंच झाडांच्या मधली रिकामी जागा आहे ती. तिथलं जुनं झाड कदाचित पडून गेलं असावं. आम्ही आमच्या गाडीला त्या जागेच्या कडेला थांबायला सांगतो आणि गाडीतून खाली जमिनीवर उड्या मारतो. सुरक्षेसाठी आम्ही दोघीही फुग्यांच्या आत आहोत. गाडी थांबल्यावर तिच्या इंजिनाची घरघर बंद होते आणि मला या जागेत भरून राहिलेली गहिरी हिरवी शांतता जाणवते. सगळं काही पूर्णपणे शांत आहे कारण इथे आजिबात वारा नाही आणि पानांची सळसळ नाही.
“आपण कुठे आहोत ते कळवलं पाहिजे,” आमचे ठरलेले नियम आठवून व्हेनला म्हणते.
“बरं! तू तळावर फोन लाव आणि मी दुसऱ्या गटाशी संपर्क साधते, ” मी म्हणते.
मी ॲग्नॉनला फोन लावते आणि पुढच्याच क्षणी त्याचा हसरा चेहरा माझ्या स्क्रीनवर झळकतो.
“आम्ही रानातल्या एका मोकळ्या जागेवर थांबलो आहोत,”असं त्याला सांगून मी आमचे अक्षांश, रेखांश पाठवते.
“बरं, मी नोंद केली आहे. तिथे काही विशेष आढळलं का, आरुषी?”
“अनपेक्षित असं काही नाही. इथे सगळं अगदी स्तब्ध आहे. उंच झाडं,जमिनीवर फारसं गवत नाही. माती काळी आहे. आम्ही इथे थोडे नमुने गोळा करू.”
“छान! आम्ही अजून प्रवासच करतो आहोत. तळ्याच्या पलीकडच्या बाजूला खरंच एका नदीचा उगम आहे का हे पाहायला आम्ही जाणार आहोत.”
“ठीक आहे. शुभेच्छा!” मी कॉम बंद करते आणि आपण त्या दुसऱ्या गटाबरोबर असायला हवं होतं असं मला वाटायला लागतं. व्हेनलाचं तळावर असलेल्या एन कियांबीशी बोलून झालं आहे. आम्ही आमची उपकरणं घ्यायला गाडीपाशी जातो.
“तू झाडांच्या खोडांच्या सालीचे नमुने घेशील का आरुषी? मी जमीन उकरून काही नमुने घेते.”
“चांगली कल्पना आहे. तसंच करू.”
मग मी एकेका झाडाकडे जाऊन त्यांची जुनी पुराणी खोडं हलकेच खरवडून निर्जंतुक केलेल्या काचेच्या पट्ट्यांवर नमुने गोळा करते. पृथ्वीवर असलेल्या सूक्ष्म जीवाणूंचे नमुने गोळा करून आम्हांला जीवनप्रक्रियेचा आणि उत्क्रांतीचा अभ्यास करायचा आहे – ज्या उत्क्रांतीतून कधीकधी अशी दिमाखदार झाडं तयार होतात. मला उगीचच वाटतं, की ती झाडं मला न्याहाळतायत. व्हेनला मैदानाच्या दुसऱ्या बाजूला एका झाडाखालच्या भुसभुशीत जमिनीत एक नळीसारखं उपकरण खुपसण्यात मग्न आहे. माझ्याकडे तिची पाठ आहे. या उत्तुंग झाडांच्या समोर फक्त मी उभी आहे. किती जुनी असतील ही झाडं? शंभर एक वर्षांची असावीत… की दोनशे वर्षांची? वयाने ती माझ्यापेक्षा नक्कीच खूप खूप मोठी आहेत. मी कुठेही नव्हते आणि माझे आई वडील कुठेही नव्हते तेव्हादेखील ती अस्तित्वात होती. काय काय पाहिलं आहे त्यांनी? रानात नेहमीच एवढी शांतता असते का? आमच्या हालचालींचा त्यांना त्रास होतो आहे का? पण मी भावनेच्या प्रवाहात वाहून चालले आहे. ज्या वस्तू पाहू शकत नाहीत आणि विचारही करू शकत नाहीत त्यांना मी मानवी अस्तित्व देऊ पाहते आहे. मी जेव्हा अशा तऱ्हेचा विचार करते तेव्हा पपा हेच म्हणतो. पण मला खातरी आहे, की या झाडांना आमचं अस्तित्व जाणवतंय.
मी झाडांच्या खोडांवरून, पानांतून आणि फळांतून नमुने गोळा करते. काही फुलं गोळा करून ती गाडीवर ठेवते. आम्ही गोळा केलेले नमुने व्हेनला काळजीपूर्वक गाडीत ठेवते आणि आम्ही निघायला तयार होतो.
त्यानंतर दोन तासांनी आम्ही पुन्हा थांबतो. हे आणखी मोठं मैदान आहे. आम्ही रानाच्या खूप आतवर आलो आहोत आणि आता थोडा वारा सुटला आहे. पानांची आश्वासक सळसळ ऐकू येते आहे. आम्ही थांबलो आहोत कारण आम्हांला एक किड्यांची वस्ती दिसली आहे. वारुळांच्या चित्रासारखीच दिसते आहे ती. स्वर्गावर वारुळं नाहीत पण प्राचीन पृथ्वीबद्दलच्या पुस्तकांमध्ये मी त्यांची चित्रं बघितली आहेत. आम्ही सावधपणे किड्यांच्या त्या वस्तीपाशी जातो. छोटे काळे किडे सगळीकडे हिंडताना आम्हांला दिसतात. ते आम्हांला इजा करू शकतात की नाही ते आम्हांला माहीत नाही; पण तरी आम्ही आमच्या फुग्यांच्या आवरणात आहोत. किड्यांच्या चावण्यापासून आणि विषापासून आम्ही सुरक्षित आहोत. त्या मुंग्या खूप व्यग्र आहेत.
सगळ्या दिशांना त्या भरभर जात आहेत. त्या मुंग्यांच्या वंशज आहेत, की आणखी कुठल्या किड्यांपासून त्यांची उत्पत्ती झाली आहे हे सांगता येत नाही. पण ज्या घाई गडबडीने त्या इथून तिथे जात आहेत ते फार लक्षवेधक आहे. पण त्यांना हे कधीच कळणार नाही, की आत्ता या क्षणी पाच प्रकाश वर्षं दूर असणाऱ्या एका ग्रहावरून आलेले दोन प्राणी त्यांना टक लावून पाहत आहेत. आम्ही त्यांच्या वास्तवाचा भाग नाही, ते किडे आमच्या वास्तवाचा भाग असले तरी. मीसुद्धा कोणा अज्ञाताच्या वास्तवाचा भाग असेन का?
माझा कॉम वाजतो. ॲग्नॉन फोन करतो आहे.
“अगं आरुषी, कसं काय चाललंय तुम्हां मुलींचं?”
“आम्ही ठीक आहोत. रानात खूप आतवर आलो आहोत. मी एक मुंग्यांचं वारूळ पाहते आहे. तुमचं काय चाललंय?”
“आम्ही नदीच्या उगमापाशी पोचलो आहोत. नदीचा उगमच वाटतो आहे हा. खूप सुपीक जमीन आहे इथे. आम्ही नमुने गोळा करतो आहोत.”
“छान! पुढचा काय बेत आहे?”
“आम्ही इथला आजूबाजूचा भाग थोडा आणखी पाहणार आहोत आणि मग परत फिरणार.”
“ठीक. आमचाही तोच बेत आहे.”
पश्चिम आकाशात सूर्य निम्म्यापेक्षा खाली आल्यावर आम्ही आमच्या तळावर परततो. मी फार दमून गेले आहे. गुरुत्वाकर्षणाने माझ्या शरीरातील प्रत्येक स्नायूची परीक्षा घेतली आहे.
संध्याप्राशनासाठी डोळे उघडे ठेवणं पण मला कठीण जातं.

भाग पंधरा समाप्त
