‘वस्त्रगाथाकार’ विनय नारकर यांच्या व्यासंगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते करत असलेला मराठा चित्रशैलीचा अभ्यास. याबाबत ते अंतर्नादमध्ये क्रमशः लिहिणार आहेत.
या लेखमालेतील निवडक चित्रे ही अंतर्नादच्या काही आगामी अंकांची मुखपृष्ठे असतील. संपादक
‘वस्त्रगाथा’ हे पुस्तक २०२४ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्राची वस्त्र परंपरा आणि माझा संशोधन-प्रवास या विषयावरचे हे पुस्तक आहे. वस्त्रगाथाच्या रचना प्रक्रियेत सगळ्यात जास्त ऊहापोह झाला तो चित्रांबाबतच. पुस्तकात चित्रं कशाप्रकारची असावीत, याबाबत स्पष्टता येत नव्हती. आधी वस्त्रप्रकारांनुसार इलस्ट्रेशन्स बनवण्याचा विचार होता, परंतु ते बनवून पाहिल्यानंतर समाधान झालं नाही. काय चुकत होतेसमजत नव्हतं. बऱ्याच विचारानंतर आम्हांला वाटलं, की आपण पुस्तकात फक्त वस्त्रप्रकारांबद्दल नाही बोलत आहोत; तर वस्त्रसंस्कृतीबद्दल बोलत आहोत. त्यामुळे चित्रेही तशीच हवीत – संस्कृतिदर्शनघडवणारी.अशी चित्रे कशी असू शकतील याचा विचार करता, मराठा चित्रशैलीच डोळ्यांसमोर आली.
अठराव्या शतकाच्या साधारण मध्यावर उदयास आलेली ही शैलीच आपल्या विषयाला न्याय देऊ शकेल याची खातरी पटली.
यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न होता, ही चित्रे काढणार कोण…? तो शोध घेण्यात काही दिवस गेले. मराठाचित्रशैलीत काम करणारे चित्रकार मिळणं किती अवघड आहे याची व्यवस्थित माहिती या काळात झाली.
या शैलीत पूर्णवेळ काम करणारे कुणीच चित्रकार नाहीत, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जे दोघं-तिघंआहेत, तेही हौशीच आहेत. एका चित्रकारांबद्दल समजलं पण तेही पूर्णवेळ काम नाही करत व जे काम करतात ते काम दाखवायलाही तयार नव्हते. अशा परिस्थितीमुळे आमचं चित्राचं काम काही पुढेजात नव्हतं. हे सगळे प्रयत्न करून झाल्यावर आमच्या लक्षात आलं, की आपल्यालाच हे काम करावं लागणार आहे. आम्ही सोलापुरातल्याच एक चित्रकार मीनाक्षी रामपुरे यांना या कामी विनंती केली. त्यांनी आधी काही वर्षं माझ्यासाठी साड्यांवर श्रीशुभराय महाराजांची चित्रं काढायचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांना भारतीय पारंपरिक चित्रकलेचा थोडाफार परिचय होता. त्या वेळेस आम्ही, म्हणजे मी आणि पियुषने (माझा सहायक) मराठा चित्रशैलीचा अभ्यास सुरू केला. एकूणच मराठा कलेवर पूर्वीपासून आमचं अतिशय प्रेम आहे. मराठा चित्रं पाहणं हा नेहमी एक आनंदाचा भाग असायचं. जिथे अशी चित्रं आहेत ही माहिती मिळायची, तिथं जाऊन ती पाहायची असा आमचा नेहमीचा शिरस्ता होता; पण अशी चित्रं काढणंही पूर्णपणे वेगळी गोष्ट होती.
आम्ही आमच्यापरीने मराठा चित्रशैलीची उकल करण्याचा प्रयत्न करत होतो… आणि ते चित्रकारांससमजावून सांगत, त्या पद्धतीने चित्रे काढायची आमची धडपड चालू होती. त्या वेळेस गुलबर्गा येथीलअसामान्य प्रतिभेचे प्रसिद्ध चित्रकार व आमचे मित्र श्री.विजय हगरगुंदगी यांनी अतिशय चांगल्याप्रकारे आम्हांला मार्गदर्शन केले. मराठा चित्रशैलीचे ते चाहते आहेत. आम्हांला त्यांनी भारतीय चित्रशैलींचेअंतरंग उलगडून तर दाखवलेच, त्याशिवाय भारतीय चित्रकलेत वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या तंत्रांचीही
ओळख करून दिली. या मार्गदर्शनामुळेच आम्हांला थोडाफार आत्मविश्वास येऊ लागला. मीनाक्षी
रामपुरेनींही खूप मेहनत घेऊन वस्त्रगाथासाठीची चित्रे पूर्ण केली. या चित्रांचेही खूप चांगले स्वागत झाले.
या चित्रांचे आम्ही मुंबईमध्ये प्रदर्शन भरवले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला व त्यांतली बहुतांश
चित्रे विकलीही गेली.
यानंतर मी मराठा चित्रशैलीचा विविध अंगांनी अभ्यास सुरूच ठेवला. चित्रे काढण्याचे कामही सुरूच ठेवले.
आणखी तरुण चित्रकारांना आम्ही प्रशिक्षित करून त्यांच्याकडून चित्रे काढून घेत आहोत. या चित्रांचे दुसरे प्रदर्शन आम्ही चेन्नई येथे लावले. त्यालाही फार चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा चित्रशैलीबाबत तिथल्या रसिकांनी खूप उत्सुकता व उत्साह दाखवला. आमचे काम बघून म्हैसूर सिंपोजियमने मराठा चित्रशैलीचे एक सादरीकरण करायला सांगितले. तिथे ‘भारतीय कला’ या विषयातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. हे सादरीकरण उपस्थितांच्या पसंतीस उतरले. मराठा चित्रशैलीबाबत तिथेही फारशी कुणाला माहिती नव्हती; परंतु त्याबद्दल उत्सुकता मात्र दिसून आली.
त्या दिवशी अन्य वक्त्यांमध्ये नामवंत अभ्यासक प्रो.अॅना डोलापिकोला याही होत्या. प्रो.डोलापिकोला
या भारतीय चित्रकला या विषयातल्या मोठ्या तज्ज्ञ समजल्या जातात. भारतीय नसूनही त्यांनी याविषयाला वाहून घेतले आहे. त्यांची भारतीय चित्रकलेतल्या विविध विषयांवरची पुस्तकं जगभर नावाजली गेली आहेत. त्यांच्या ‘साऊथ इंडियन पेंटिंग्ज’ या पुस्तकात त्यांनी मराठा चित्रशैलीला स्वतंत्र शैली म्हणता येईल का, याबद्दल शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीमुळे त्यांच्यासमोर सादरीकरण करताना मनात धाकधूक होती. सादरीकरणानंतर त्यांनी मला भेटून सांगितले, की ‘It was an eye opener for me..!’
ही प्रतिक्रिया आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण आपणही आपल्या वारशाबद्दल अनभिज्ञ आहोत.
या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही ‘मराठा चित्रशैली आणि माझा अनुभव’ या विषयावरची‘चित्रओळी’ ही लेखमाला सुरू करीत आहोत.
मराठा चित्रशैली (१) : श्रीगणेशा

मराठा चित्रशैलीमध्ये काम करताना आमच्या समोर पहिला प्रश्न होता, ‘शैली म्हणजे काय…?’ एकतर चित्रशैली ही चित्रं पाहून समजून घेण्याची गोष्ट आहे, ती शब्दांत मांडणे शक्य आहे का? तर चित्रशैलीची सांगोपांग व्याख्या करण्याचा प्रयत्न करण्याआधी, शैली समजून घेण्यासाठी आम्ही कोणकोणत्या बाबींकडे लक्ष दिले हे सांगायचा प्रयत्न करतो. कोणत्याही भारतीय पारंपरिक चित्रशैलीची अनेक वैशिष्ट्ये असतात, ज्यायोगे ती शैली अमुक एक म्हणून ओळखता येते. चित्रातील व्यक्तींची विशिष्ट शारीरिक ठेवण, त्यांच्या लकबी किंवा ढब, पोशाख करण्याची पद्धत, चित्रांत दिसून येणारा निसर्ग आणि वास्तू या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी एखादी शैली प्रथमदर्शनी ओळखता येते.
याच्या पुढे जाऊन रंगलेपनातील बारकावे, रंग निवड, चित्रातली कथनशैली, मांडणी, चित्रातील अवकाशाचे भाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेषा – या वैशिष्ट्यांनीही चित्रशैली ओळखली जाते. एखाद्या चित्रशैलीतून दिसून येणारी प्रांतिक वैशिष्ट्ये, जसे रूढी, समजुती, उपासना पद्धती, देवता याही त्या चित्रशैलीची एका प्रकारे ओळख ठरू शकतात. एखाद्या परंपरेमध्ये वर्षानुवर्षे काम होत राहिल्याने, त्यातील सातत्याने, संघटित प्रयत्नांनी आणि प्रतिभावान कलाकारांच्या योगदानाने या चित्रशैली विकसित होत जातात. एखाद्या शैलीचा विकास उपलब्ध साधने आणि कौशल्ये यांच्याही अधीन असतो. साधने आणि कौशल्ये जितकी प्रभावी, तितकी त्या शैलीची अभिव्यक्ती प्रभावी असते आणि त्याच प्रमाणात ती शैलीही समृद्ध असते.

मराठा चित्रशैलीतील गणपती करताना, त्याच्या शारीरिक ठेवणीचा विचार आम्ही आधी केला. त्यासाठी जुन्या चित्रांतून संदर्भ घेऊन त्याचा अभ्यास केला. मराठा शैलीत गणपती शक्यतो बाजूच्या कोनातून (side profile) चितारला गेला आहे. अपवादानेच समोरून चित्रण झाले आहे. आम्ही पहिला गणपती केला, तो बाजूच्या कोनातून केला व दुसरा मात्र समोरून चितारला. पहिला गणपती करताना आम्ही केळकर संग्रहालयातील चैत्रगौरीपटातील (पुढील लेखांमधून याबद्दल सविस्तर लिखाण येईल.) गणेशचित्राचा संदर्भ घेतला आहे.
पहिल्या चित्रामध्ये गणपती व सरस्वती यांचे साहचर्य दाखवले गेले आहे. दोन्ही ज्ञानदेवता असल्यामुळे एखाद्या कलाकाराला ही कल्पना अनावर झालेली असू शकते. या साहचर्याला पौराणिक आधार सापडत नाही. हे महाराष्ट्रात जास्त प्रचलित असावे, अन्य प्रांतांत तसे नसावे. एका बंगाली स्नेह्यांना हे चित्र पाहून याचे फार आश्चर्य वाटले होते. आमच्या लहानपणी ‘गण्या गण्या गणपती, गण्याची बायको सरस्वती’ असे बडबडगीत लोकप्रिय असल्याचे स्मरते. गणपती आणि सरस्वतीच्या विवाहाची एक कथा आहे. यात ब्रह्मदेव व सावित्रीची सरस्वती ही कन्या असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपती-सरस्वती पूजनाने करण्याची रीत आहे. नारद पुराणानुसार सरस्वती हे विघ्नहर्ता गणेशाचे शक्तिरूप मानले गेले आहे.
भारतीय पारंपरिक शैलीबद्दल असे म्हटले जाते, की या चित्रांचे विषय एकतर धार्मिक असतात, दुसऱ्या कवींच्या किंवा लेखकांच्या साहित्यकृतींवर आधारित असतात, ऐतिहासिक किंवा प्रचलित कथांवर आधारित असतात. त्यामुळे या तयार विषय चितारणाऱ्या चित्रकाराच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते.
गणपतीच्या दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसतं, की गणपतीची प्रभावळ ही केळीच्या पानांची केलेली आहे. केळीची पाने किंवा खुंट हे हिंदू पूजा-अर्चनेमध्ये पवित्र व शुभ मानले गेले आहेत. या चित्रात हा केळीच्या पानाचा संकेत त्यामुळेच वापरला गेला आहे; परंतु असा वापर आधी झाल्याचे आमच्या पाहण्यात नाही. या चित्रात याचा वापर हे त्यामुळेच एक नवीन योगदान आहे. नवीन असूनही पारंपरिक चित्रशैलीत सामावून जाण्यासारखा आहे. चित्रकाराचे योगदान या प्रकारे नेहमीच महत्त्वाचे असते. शैली पारंपरिक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. हे एक अर्थातच छोटेसे उदाहरण आहे.
याशिवाय या चित्रात मराठा काळाचे खास प्रतीक असलेली, महिरपदार कमान आणि गणपतीच्या मागे निरनिराळे लालित्यपू्र्ण आकाराचे कोनाडे दाखवणारी खास भिंतही दाखवली आहे. अशा भिंतींना ‘चिनी-खाना’ म्हटले जाते. चित्रात अठराव्या शतकातील खास कारागिरी दाखवणाऱ्या समया, गुलाबदाणी या वस्तूही पाहता येतात. या चित्राच्या चौकटीवर गणेशाच्या खास पसंतीची जास्वदांची फुले शैलीदार पद्धतीने चित्रित केली गेली आहेत.
मराठा शैलीतील बहुतेक चित्रांतून त्या काळातील वस्त्रांचे विशेष चित्रण दिसून येत नाही (सन्माननीय अपवाद वगळता). वस्त्रांचा अभ्यास करण्यासाठी, विशेषतः साड्यांचा अभ्यास करण्यासाठी अशा चित्रणाचा फार उपयोग झाला असता. आम्ही या चित्रांमधून वस्त्रे दाखवताना, ती नेमकेपणाने दाखवायचा प्रयत्न करतो. अशा चित्रणाचे दस्तऐवजीकरणाच्या दृष्टीनेही फार महत्त्व आहे. गणेश व गणेशपत्नी सिद्धी आणि बुद्धीसाठी आम्ही पीतांबर वस्त्राचीच योजना केली आहे. गणेशाला रुईफूल काठाचे मर्दाना पीतांबर व गणेशपत्नींना नारळी काठांचे जनाना पीतांबर.
अलंकारांचे चित्रण करताना गणपतीला बऱ्याच प्रमाणात मराठा चित्रशैलीप्रमाणे मोत्यांचे अलंकार दाखवले आहेत. पगडीवरील शिरपेच व चंद्रहार मात्र मुळाबरहुकूम दाखवला आहे. सिद्धी आणि बुद्धी यांचे दागिने पूर्णपणे मराठी पद्धतीचे दाखवले आहेत. दागिन्यांचे व वस्त्रांचे असे चित्रण केल्यामुळे चित्राच्या दृश्यात्मकतेत बराच फरक पडला आहे, सोबतच त्यांना एक निराळे संदर्भमूल्यही मिळाले आहे.
पहिल्या चित्रात गणपती, सरस्वती व सगळ्याच व्यक्तींचे दागिने पारंपरिक शैलीनुसार मोत्यांचे दाखवले आहेत. मराठा चित्रशैलीत मुकुटसुद्धा एका विशिष्ट धाटणीचा दाखवला जातो, तोच आम्ही चित्रित केला आहे.
पारंपरिक विषय असला तरी चित्राची मांडणी नव्याने करताना स्थळ, काळ, परिस्थितीचा विचार चित्रकर्त्यांना करावा लागतो आणि ही एक सर्जनशील प्रक्रियाच असते. याचाच अर्थ असाही होतो, की पारंपरिक शैलीत काम करणाऱ्या चित्रकाराला संकुचित दृष्टिकोण ठेवून चालणार नाही, त्याने प्रयोगशीलही असले पाहिजे.
मराठा शैलीतील गणेशचित्रांवर काहीसा राजस्थानी चित्रांचा प्रभाव जाणवतो. एखादी शैली जेव्हा दुसऱ्या शैलीतील काही गोष्टी आत्मसात करते तेव्हा त्याची अनेक कारणे असू शकतात. मराठा शैली तशी बाकीच्या शैलींच्या तुलनेत नवीन होती. मराठा लघुचित्र शैलीच्या सुरुवातीच्या काळात – म्हणजे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात राजस्थानी चित्रकारांना महाराष्ट्रात बोलावून चित्रे काढून घेतली गेली. त्यामुळे मराठा शैलीवर हा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. सुरुवातीचा हा प्रभाव पचवून मराठा शैलीतील गणेशचित्रांनी उत्तरोत्तर स्वतःचा प्रभाव निर्माण केला.

सौजन्य: झपुर्झा संग्रहालय, पुणे
वाईच्या कृष्णाबाई उत्सवातील मखरातील चित्रांपैकी एक असलेले हे एक गणेशचित्र. या चित्रात गणपतीजवळ दोन चामरढाळिणी दिसत आहेत. यांच्या एका हातात चामर व एका हातात उकडीचे मोदक व आरतीचे ताम्हण दिसत आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील हे चित्र असावे. आधीच्या चित्रांमध्ये सहसा गणपतीपुढे लाडू दाखवले जात असत.
मराठा शैलीचा पूर्ण विकास झालेला या चित्रात दिसून येतो. यात अगदी मोजक्या रंगांचा वापर करूनही चित्र प्रभावी झाले आहे. मराठा शैलीमध्ये गणेश हा बहुतांश वेळा चामरढाळिणींसह किंवा सिद्धी-बुद्धी या त्याच्या पत्नींसोबत चित्रित केला जातो. गणेशपुराणामध्ये गणेशाच्या विवाहाची गोष्ट येते. नारदमुनी शंकराला ब्रह्माच्या मुलींचे, सिद्धी-बुद्धींचे स्थळ सुचवतो. बऱ्याच घडामोडींनंतर हा विवाह संपन्न होतो. प्राचीन परंपरेच्या मान्यतेनुसार गणपतीला अविवाहित मानले गेले होते. त्यामुळे कदाचित फार कमी चित्रपरंपरांमध्ये गणपतीच्या पत्नी दाखवल्या गेल्या आहेत. काही राजपूत व कांगरा शैलीच्या चित्रांमध्ये गणेशपत्नी पाहायला मिळतात. मराठा शैलीमध्ये मात्र बऱ्याच वेळा सिद्धी-बुद्धी किंवा चामरढाळिणींसह गणेशाचे दर्शन होते.
गणेशावरच्या मोनोग्राफमध्ये चामरढाळिणी यासुद्धा सिद्धी-बुद्धी असाव्यात का, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. आपल्याकडे लक्ष्मीचे चित्रणही श्रीविष्णूचे पाय चेपताना केले जाते, त्यावरून चामरढाळिणी या सिद्धी-बुद्धीच असाव्यात असे वाटते.
महाराष्ट्रातल्या भित्तिचित्र परंपरेला फार मोठा इतिहास आहे. याची मुळे थेट अजिंठ्याच्या परंपरेत सापडू शकतात. महाराष्ट्रात भित्तिचित्रकला व वास्तुकला एकत्रच विकसित होत गेल्या असे वाटते. गणेशचित्रांचा उदयही भित्तिचित्रांपासूनच झाला असण्याची शक्यता आहे. शनिवार वाड्यात गेल्यागेल्या समोरच अतिशय पुसट झालेले गणेशचित्र दिसते. इतके पुसट होऊनही मराठा चित्रशैलीचा झोंक काही लपत नाही.

सौजन्य : झपुर्झा संग्रहालय, पुणे
आपण जेव्हा मराठा चित्रशैली असे म्हणत असतो, तेव्हा आपल्याला फक्त मराठा शैलीतील लघुचित्रं अभिप्रेत नसतात; किंबहुना नसली पाहिजेत. अल्पावधीतच या शैलीचा बराच प्रसार झालेला दिसून येतो. मराठा शैलीचे आविष्करण विविध माध्यमांतून झालेले हळूहळू आपल्यासमोर येत आहे. हे गणेशचित्र एका जन्मपत्रिकेवर काढले गेले आहे. जन्मपत्रिकासुद्धा इतक्या सजावटीची करणारा आपला समाज खरेच एके काळी रसिक होता. या गणेशचित्रामध्ये एकीच्या हातात चामर तर एकीच्या मोरपिसाची पिंछी दाखवली आहे. या चित्रातील महिरप व चौकट फुलांनी सुंदरपणे सुशोभित केलेल्या दिसून येतात.
आपल्याला चित्रातील प्रत्येक सौंदर्यतत्त्व उलगडून दाखवता येईलच असे नाही. आपण नजर मात्र प्रयत्नपूर्वक तयार करू शकतो. तसे झाले तरच आपली वास्तववादी चित्रकलेला सरावलेली नजर, आपल्या शैलीदार कलेतील सौंदर्यबिंदू टिपू शकेल.
विनय नारकर

It is indeed enlightening article. There is so much we can learn from the art which was predominantly ours!
नमस्कार,
आपले लेख म्हणजे माझ्यासाठी बौद्धिक पर्वणीच असते. आपल्या “वस्त्रगाथा”ची कितीही पारायणे झाले तरी मन भरत नाही. प्रत्येक वाचनात जे मिळते ते शब्दात न सांगता येणाऱ्या मानसिक आनंदाची स्थिती असते.
मराठा चित्रशैली ही सध्या लोप पावत चाललेली कला आहे. त्यावर काम करणारे कलाकारही अत्यंत कमी व दुर्मिळ आहेत.
अशा स्थितीत आपण हा विषय अभ्यास व संशोधनासाठी निवडलेला आहे, यात आपण नवीन प्रयोगही करत आहात ही खचितच आनंदाची बाब आहे.
आपल्या पहिल्या लेखात असलेली गणेशाची माहिती तसेच समोरून काढलेले गणेशाचे चित्र अत्यंत सुंदर असून रंगसंगती उत्तम व इतर बारकावेही आपण उत्कृष्टपणे त्यात दाखवले आहेत.
आपले लेखन हे अभ्यास व संशोधन पूर्ण असते व ते सादर करताना त्याचा मार्ग इतर ठिकाणी कुठेही न जाता विषयाशीच संलग्न राहील असा असतो.
महाराष्ट्रातील लोप पावलेल्या वस्त्रपरंपरेला आपण आपल्या अभ्यासपूर्ण संजीवनीने जिवंतपणा दिलात, त्याची पुनरावृत्ती मराठा चित्रशैलीच्या बाबतीत होईल असा मला ठाम विश्वास आहे.
पुढील लेखांची चातकाप्रमाणे वाट पाहणारा एक वाचक. रोहित तेलंग
It’s a treat to observe, understand, and appreciate the style closely through the articles.. well done🤝 Shveta Kothavale
अप्रतिम लेखमाला वाचायला मिळणार 👍
विनय नारकर सरांचे लेख म्हणजे बौद्धिक पर्वणीच आहे! किती प्रगल्भ आणि गाढे लिखाण आहे, पुढील भागांची प्रतीक्षा लागलेली आहे.
खूप सविस्तर अभ्यासपूर्ण मांडणी.. महाराष्ट्राच्या चित्रशैलीची ही संशोधन सफर वाचक रसिकांना डोळस आणि जाणकार बनवणार नक्की..
सिमंतिनी चाफळकर
द म दा र “श्री ग णे शा ” !!!