अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. चालू वर्षी – शके १९४८ (इ.स.२०२६ ) – हा मान ज्येष्ठ महिन्याला मिळाला आहे. रविवार १७ मे ते सोमवार १५ जून २०२६ हा कालावधी अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जाईल. दरवर्षी येणाऱ्या – म्हणजे निज ज्येष्ठ महिन्याचा कालावधी मंगळवार १६ जून ते १४ जुलै २०२६ असा असेल. सण, उत्सव, विशेष दिन इत्यादी निज महिन्यात साजरे करण्याची प्रथा आहे, त्यामुळे गेल्या वर्षी १० जून रोजी असलेली वटपौर्णिमा यंदा २९जूनपर्यंत पुढे गेली आहे. तसेच ६ जून रोजी आलेला शिवराज्याभिषेक दिन चालू वर्षी २७ जून रोजी साजरा करावा लागेल. त्या दिवसापासून शिवशक ३५३ सुरू होईल. मागे आलेले सण पुढे ढकलण्यासाठीच अधिक महिन्याची योजना आहे.
सणांची उलट ( reverse ) गती
चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांच्या वर्षाला आपण चांद्रवर्ष म्हणतो. चांद्रवर्षाचे एकक ( unit ) तिथी आहे. प्रत्येक चांद्रमहिना ३० तिथींचा असतो; म्हणजे वर्षात एकूण ३६० तिथी होतात. चांद्रमहिन्याच्या तिसाव्या तिथीला अमावास्या म्हणतात. अमावास्येच्या समाप्तिक्षणी पुढील महिन्याचा प्रारंभ होतो. लागोपाठच्या दोन अमावास्यांमधील कालावधी सरासरी साडेएकोणतीस (२९.५ ) दिवसांचा असतो. चांद्रमहिन्याचा हा कालावधी विचारात घेतला तर चांद्रवर्ष २९.५२ गुणिले १२ म्हणजे ३५४ दिवसांचे होते; परंतु ऋतूंचे वर्ष सरासरी ३६५ दिवसांचे असल्याने प्रत्येक चांद्रवर्षी एखादा सण साधारण ११ दिवसांनी मागे सरकतो. २०२४ साली २७ ऑगस्ट रोजी असलेला गोपाळकाला २०२५ रोजी १६ ऑगस्टला आला. अशा तऱ्हेने दरवर्षी गोपाळकाला ११ दिवसांनी मागे जात राहिला तर आपल्या आयुष्यातच तो ऐन मे महिन्यात येईल. म्हणून साधारण तीन वर्षांच्या कालावधीनंतर अधिक महिना घेतला, की मागे आलेला सण पुढे सरकतो आणि त्याचा ऋतूंशी मेळ राहतो. अधिक महिन्याचे पर्यावरणीय महत्त्व आता आपल्या लक्षात आले असेल.
चांद्र महिन्यांची नावे
ज्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र चित्रा नक्षत्राजवळ असतो तो चैत्र. तसेच पौर्णिमा ज्येष्ठा नक्षत्राजवळ झाली तर तो महिना ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो; परंतु नक्षत्र सान्निध्याने चांद्र महिन्याचे नाव ओळखणे ही युक्ती आहे – चांद्र महिन्याचे नाव ठरविण्याचा तो निकष नव्हे.
चांद्र महिन्याचे नाव कसे ठरते?
प्रत्येकाने आपले नाव आठवून पहा. ते तुम्ही स्वतःच ठरविले आहे का? मुळीच नाही. तुमचे नाव तुमच्या आईने किंवा अन्य कोणीतरी ठरविले आहे, खरं ना ?चांद्र महिन्यांच्या चैत्र, वैशाखादी महिन्यांचे तसेच आहे. चांद्र महिन्याचे नाव सूर्य ठरवितो. राशींचा आणि महिन्यांचा क्रम माहीत असेल तर तुम्हांलाही ते समजेल. राशी बारा आणि महिनेही बारा. त्यामुळे सूर्याचे राशिस्थान आणि महिन्याचे नाव यांची एकास एक संगती आहे.
उदाहरणार्थ : मीन राशीत सूर्य असताना सुरू होणारा महिना चैत्र. मेष राशीत सूर्य असताना सुरू होणारा महिना वैशाख याप्रमाणे क्रम चालू राहतो; परंतु काही वेळेस या चक्रक्रमात एक नवीनच प्रश्न उपस्थित होतो – तो कसा?
आपण या वर्षीचेच उदाहरण घेऊ.
चालू वर्षी म्हणजे २०२६ या वर्षी सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी झाला. त्यानंतर अमावास्या झाली. अमावास्या रविवार १७ मे मध्यरात्रीनंतर १ वाजून ३१ मिनिटांनी संपली. ( लक्षात घ्या, नुसती तारीख महत्त्वाची नाही, वेळही विचारात घ्यावी लागते.) या अमावास्या समाप्तीनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला काय नाव द्यायचे? नियमाप्रमाणे अमावास्या समाप्तीवेळी सूर्य वृषभ राशीत असल्यामुळे रविवार १७ मेपासून सुरू होणाऱ्या महिन्याचे नाव नियमाप्रमाणे ज्येष्ठ असे ठेवावे लागेल.
यानंतरची अमावास्या १५ जून रोजी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी संपते. आता नव्याने सुरू होणाऱ्या महिन्याला नाव देण्यासाठी आपण सूर्य कोणत्या राशीत आहे हे पाहिले. सूर्याने अजून रास बदलली नव्हती. तो वृषभ राशीतच होता. त्यामुळे १५ जून रोजी सुरू होणाऱ्या महिन्यालाही नियमाप्रमाणे ज्येष्ठ हेच नाव द्यावे लागेल.
म्हणजे दोन ज्येष्ठ महिने झाले. पहिला अधिक ज्येष्ठ आणि नंतरचा निज ज्येष्ठ. त्या महिन्यात येणारे सण, धार्मिक गोष्टी इत्यादी अधिक महिन्यात न करता निज महिन्यात कराव्यात असा संकेत आहे. अधिक महिना अगोदर आणि निज महिना नंतर घेतल्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. या योजनेमुळे सण एका विशिष्ट कालावधीतच मागे-पुढे होतो. उदाहरणार्थ गणपती २६ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीतच मागे-पुढे होतात.
अधिक महिना कसा येतो?
अधिक महिना घडवून आणण्याची परिस्थिती सूर्य चंद्रच घडवून आणतात. चालू वर्षी सूर्याने १५ जूनच्या अमावास्येनंतर काही तासांनीच मिथुन राशीत प्रवेश केला. सूर्याने वृषभ राशीत ३१ दिवस ६ तास ३२ मिनिटे वास्तव्य केले. या कालावधीत दोन अमावास्या होऊन गेल्या; कारण चांद्र महिन्याचा कालावधी २९ दिवस ६ तास ५३ मिनिटे इतकाच होता. अशा तऱ्हेने सूर्याचा महिना (म्हणजे राश्यंतर महिना) मोठा आणि चांद्र महिना लहान असेल तर अधिक महिन्याची शक्यता निर्माण होते. मात्र केवळ एवढी गोष्ट पुरेशी नाही. सूर्याचा राशिप्रवेश आणि अमावास्या समाप्ती यांमधील कालावधी असणेही आवश्यक आहे.
अधिक महिन्याची वारंवारता
दोन लगतच्या अधिक महिन्यांमध्ये ३२ ते ३५ चांद्रमहिन्यांचा कालावधी होतो. यानंतर २०२९ मध्ये चैत्र महिना अधिक येईल. एखादा विशिष्ट महिनाच अधिक होण्यासाठी ८,११,किंवा १९ वर्षे जावी लागतात. यामुळेच २०३७ साली पुन्हा ज्येष्ठ महिनाच अधिक येईल.
अधिक महिना आणि व्रतवैकल्ये
अधिक महिना ‘पुरुषोत्तम मास’ – म्हणजे ‘विष्णूचा महिना’ म्हणून ओळखला जातो. लेक आणि जावई म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असे मानले आहे. त्यामुळे जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. अधिक महिन्यातील दोन्ही एकादश्या विष्णुपत्नीच्या नावाने म्हणजे ‘कमला’ म्हणून ओळखल्या जातात. अधिक महिन्यात रात्री जेवू नये, दान करावे इत्यादी गोष्टींमधील मूळ हेतू लक्षात घ्यावा. दान हे संग्रहाचे प्रायश्चित्त आहे. ते तर नेहमीच करत राहावे. संकल्पही देशकाल परिस्थितीनुसार करावा. मोबाईलचे व्यसन आबालवृद्ध सर्वांनाच आहे. परिणामी एकमेकांना भेटणे तर दूरच; पण समूहामध्ये बोलणेही होत नाही. वस्तू मागवायच्या त्याही ऑनलाइन म्हणजे आळशीपणाला आमंत्रण. आपल्या संकल्पात संयम, नम्रता, व्यक्तीचा आदर, दुसऱ्यासाठी वेळ देणे या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. अधिक महिन्याचे सामाजिक, कौटुंबिक महत्त्व लक्षात घेणे हिताचे ठरेल नाही का?

अप्रतिम मुखपृष्ठ.
वाचनीय अंक.
अधिक महिन्याची, अधिक माहिती, अधिक जवळून झाली. ज्ञानात अधिकची भर पडली!