
काही व्यंगचित्रे बघता क्षणी समजतात तर काही समजण्यासाठी आपल्याला थोडे प्रयास करावे लागतात. त्या चित्रात दाखवलेल्या गोष्टी आणि मजकूर यांचे संदर्भ तपासावे लागतात, समजून घ्यावे लागतात. नुकतेच न्यू यॉर्कर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे व्यंगचित्र दुसऱ्या प्रकारचे आहे. सर्वप्रथम MOMA म्हणजे काय ते समजून घ्यावे लागते.MOMA म्हणजे न्यू यॉर्क या शहरातील सुप्रसिद्ध म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट्स.
या व्यंगचित्राचे कलाकार फेलिपे गॅलिंडो (Felipe Galindo), हे ‘फेगो’ या नावाने प्रसिद्ध आहेत. हे एक अत्यंत प्रतिभावान मेक्सिकन-अमेरिकन व्यंगचित्रकार, चित्रकार आणि कल्पक कलाकार आहेत. त्यांचा जन्म मेक्सिकोमध्ये झाला, परंतु त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने न्यूयॉर्क शहर राहिले आहे.
या विनोदाचा मुख्य केंद्रबिंदू मार्शेल ड्यूशॅंप हा कलाकार आहे. १९१७ मध्ये ड्यूशॅंपने एक साधे, कारखान्यात बनवलेले ‘युरिनल’ (लघवीचे भांडे) एका प्रदर्शनात मांडले होते आणि त्याला ‘फाउंटन’ असे नाव दिले होते. ड्यूशॅंपने एका प्लंबिंग पुरवठादाराकडून एक सामान्य ‘युरिनल’ (लघवीचे भांडे) विकत घेतले, ते बाजूला कलते केले, त्यावर “R. Mutt 1917” अशी स्वाक्षरी केली आणि त्याला ‘फाउंटन’ (कारंजे) असे शीर्षक दिले. हे ‘अमेरिकन सोसायटी फॉर इंडिपेंडंट आर्टिस्ट्स’कडे एका प्रदर्शनासाठी पाठवण्यात आले. हा कलाकारांचा एक नवीन गट होता आणि कसलेही पूर्वग्रह न ठेवता आलेल्या सर्व कलाकृती प्रदर्शनासाठी घेण्यात येतील अशी घोषणा यांनी केली होती… विशेष म्हणजे ड्यूशॅंपदेखील या चळवळ्या गटाचा एक सदस्य होता. हे सर्व असले तरी ही ‘कलाकृती’ प्रदर्शनासाठी नाकारण्यात आली. पुढे ही कलाकृती ही ‘डाडा’ चळवळीचा एक आधारस्तंभ बनली. या चळवळीने ‘अँटी-आर्ट’ (कला-विरोधी) कृतींच्या माध्यमातून प्रस्थापित आणि पारंपरिक कलाविश्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. डाडा या शब्दाला तसा काही अर्थ नाही. एक बालिश आणि अर्थहीन शब्द एवढाच त्याचा अर्थ. पहिल्या महायुद्धातील विध्वंस आणि त्यानंतर जगाची झालेली परिस्थिती याच्या पार्श्वभूमीवर ही चळवळ सुरू झाली होती. हे दृश्य MoMA मधील स्वच्छतागृहातील आहे. तो मुलगा दिवसभर प्रदर्शनातील विविध वस्तू पाहत असल्यामुळे, आता त्याला संग्रहालयातील ‘कलाकृती’ आणि स्वच्छतागृहातील ‘खरे भांडे’ यांतला फरक कळेनासा झाला आहे. मुलाला वाटते, की त्याने भिंतीवर टांगलेली एक दुर्मीळ कलाकृती शोधली आहे. तो उत्साहाने ओरडतोय, “बाबा, एक ड्यूशॅंप!” वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव आपल्याला बरेच काही सांगून जात आहेत. १९१७ मधील मूळ युरिनल हरवले आहे. मात्र, १९३८ ते १९६४ या काळात ड्यूशॅंपने या मूळ कलाकृतीच्या १६ प्रतिकृतींना मान्यता दिली, त्यांपैकी अनेक आज जगातील मोठ्या संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या आहेत.
