अडुळसा ही आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. अडुळशाचं रोपटं तीन साडेतीन फुटांचं असतं. हे रोपटं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरून येतं. पानं लांबट, निमुळत्या आकाराची. पानांचा रंग हिरव्यापेक्षा पोपटी रंगाकडे झुकणारा. पानं अगदी जमिनीलगतच्या खोडापासून ते अगदी वरपर्यंत दिसतात. त्यामुळे पानांनी बहरलेल्या रोपट्याचा आकार दुरून साधारण त्रिकोणी वाटतो. वर्षभरात या रोपट्याकडे फार लक्ष जात नाही; परंतु जानेवारीच्या शेवटास हे झाड हिरव्या रंगाच्या कळ्यांनी भरून जातं. फेब्रुवारीत कळ्यांमधून पांढऱ्या पाकळ्यांची फुलं उमलतात. फुलांचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण! खालच्या बाजूला तीन पाकळ्या तर वरच्या बाजूला खालच्या तीन पाकळ्यांवर झुकलेली एकच पाकळी. त्यातून दोन दिशांनी बाहेर पडलेले दोन पुंकेसर – जणू नर्तकीने फैलावलेले दोन हातच.
या रोपट्याचं आयुर्वेदातील महत्त्व अपार आहे. पानांचा कडू अर्क खोकला, सर्दी, दमा आणि कफ यांवर अत्यंत गुणकारी आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी तसेच क्षयरोगातही याचा उपयोग होतो. मधमाश्या आणि फुलपाखरे याच्या फुलांतील मधासाठी या रोपट्याजवळ येत असतात. शहरीकरणात या रोपट्यांची तोड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
अडुळशासारख्या महत्त्वाच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या संवर्धनासाठी आज प्रबोधनाची गरज आहे.




