लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड, जागा आणि रचना याबद्दलची उत्सुकता यामुळे मी आर्किटेक्चर हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले आणि भारतात आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली. आर्किटेक्चर शिकताना केवळ इमारती कशा उभ्या राहतात हेच शिकवले जात नाही, तर माणूस आणि स्पेस यांच्यातील नातं समजून घ्यायला शिकवलं जातं. एखादी जागा माणसाला कशी वाटते, तो त्या जागेत कसा वावरतो, त्या जागेचा अनुभव त्याच्या भावनांवर कसा परिणाम करतो हे सगळं आर्किटेक्चरचं खरं शिक्षण आहे.
पदवी पूर्ण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आर्किटेक्चर हे केवळ घरं, ऑफिस किंवा इमारती डिझाइन करण्यापुरतं मर्यादित नाही. या शिक्षणातून सिनेमा, रंगभूमी, प्रदर्शन आणि मनोरंजन क्षेत्रातही काम करता येतं. विशेषतः चित्रपटांसाठी केल्या जाणाऱ्या प्रॉडक्शन डिझाइनमध्ये आर्किटेक्टच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास अनेक सुधारणा आणि वेगळे आयाम घडवता येतात. चित्रपटातील सेट्स हे फक्त पार्श्वभूमी नसतात, तर ते कथेला आकार देतात. पात्रांची हालचाल, कॅमेऱ्याचे अँगल्स, प्रकाशयोजना आणि दृश्यरचना या सगळ्या गोष्टी सेट डिझाइनवर अवलंबून असतात.
या जाणिवेतून मी अमेरिकेत प्रॉडक्शन डिझाइन या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पश्चिमेकडील चित्रपट उद्योगात प्रॉडक्शन डिझाइनसाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं. आज केवळ प्रत्यक्ष सेट उभारले जात नाहीत, तर डिजिटल सेट्स, एलईडी वॉल्स आणि एक्सआर (एक्स्टेंडेड रिअॅलिटी) स्टेजसारख्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. एक्सआर स्टेजमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर आभासी वातावरण दाखवून प्रत्यक्ष सेट आणि डिजिटल जग यांचा संगम केला जातो. यामुळे कलाकारांना प्रत्यक्ष वातावरणात अभिनय करता येतो आणि दिग्दर्शकाला कॅमेऱ्यातच अंतिम दृश्य दिसतं.

एक्सआर स्टेजवरील पूर्ण सेट — भौतिक सेट, लाइटिंग आणि एलईडी वॉलवरील आभासी पार्श्वभूमी यांचा एकत्रित अनुभव.

कॅमेऱ्यात दिसणारा/री अंतिम फ्रेम – एक्सआर तंत्रज्ञानामुळे भौतिक आणि डिजिटल स्पेस यांच्यातील सीमारेषा अस्पष्ट होताना.

दुसऱ्या प्रकल्पासाठी तयार केलेला एक्सआर सेट — भौतिक घटक आणि एलईडी वॉलवरील दृश्य यांचा समन्वय.

कॅमेऱ्यातील दृश्य – भौतिक सेट आणि डिजिटल पार्श्वभूमी यांचे एकत्रीकरण.
प्रॉडक्शन डिझाइनचं शिक्षण घेत असताना आणि काही भारतीय व अमेरिकन चित्रपट प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाल्यावर मला या तंत्रज्ञानांचा सखोल अभ्यास करता आला आणि प्रत्यक्ष कामामध्ये त्यांचा वापरही करता आला. या अनुभवामुळे सेट डिझाइन केवळ भौतिक बांधकाम न राहता, तंत्रज्ञान, दृश्य कथाकथन आणि स्पेस यांचा एकत्रित विचार कसा असतो, हे अधिक स्पष्टपणे समजलं.
अशा प्रकारच्या सेट डिझाइनसाठी स्पेसची समज अत्यंत महत्त्वाची ठरते. आर्किटेक्चरमधून मिळालेलं स्पेस प्लॅनिंग, प्रमाणबद्धता, दृश्य रचना आणि माणसाच्या हालचालींचं ज्ञान हे प्रॉडक्शन डिझाइनमध्ये थेट उपयोगी पडतं. त्यामुळे आर्किटेक्चरची पार्श्वभूमी असलेले डिझायनर्स या क्षेत्रात सहजपणे आपली जागा निर्माण करू शकतात.
याच शिक्षण आणि अनुभवातून मला थीम्ड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची ओळख झाली. थीम्ड एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे काय, हे साध्या शब्दांत सांगायचं झालं तर, ही अशी इंडस्ट्री आहे जिथे लोकांसाठी संपूर्ण अनुभव डिझाइन केला जातो. थीम पार्क, राइड्स, इमर्सिव्ह अनुभव आणि इंटरअॅक्टिव्ह वातावरण यांचा यात समावेश होतो. अमेरिका, युरोप आणि मध्य-पूर्वेत ही इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे. थीम पार्क हा एक सर्वसमावेशक प्रतिसृष्टीसारखा अनुभव देणारा प्रकल्प असतो. थीम्ड एंटरटेनमेंटच्या व्याप्तीत फक्त अम्युझमेंट पार्क्स आणि राइड्सच नाहीत, तर म्युझियम सारख्या अचल वस्तुसंग्रहालयाला जिवंत आणि प्रत्यक्ष आभासी अनुभव देणे, एखादी हॅरी पॉटरसारखी दीर्घकथा संपूर्णपणे जिवंत अनुभवाने उभी करणे अशा अनेक गोष्टी थीम्ड एंटरटेनमेंटच्या संकल्पनेत येतात.

थीम पार्कमधील इमर्सिव्ह वातावरणाचे उदाहरण

कथा, आर्किटेक्चर आणि राइड डिझाइन यांचा एकत्रित अनुभव
प्रत्येक पार्कला एक ठरावीक कथा आणि ओळख असते. पार्कमध्ये प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत पाहणाऱ्याला जणू एखाद्या वेगळ्या जगात नेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, ग्राफिक्स, प्रकाशयोजना, ध्वनी, कथा लेखन आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर होतो. इथेही स्पेस कशी उघडते, कशी बंद होते, कुठे उत्सुकता निर्माण होते आणि कुठे विश्रांती मिळते हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन केलं जातं. सध्या भारतात फारसे थीम पार्क्स नाहीत. अॅडलॅब्स इमॅजिका सारखे काही मोजके थीम पार्क्स आपल्याकडे आहेत. त्याचप्रमाणे एसेल वर्ल्ड, रामोजी फिल्म सिटी, वंडरला /वंडरलँड यांसारखी अनेक अम्युझमेंट पार्क्स आहेत; मात्र पश्चिमेकडील देशांप्रमाणे भारतात अद्याप इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली स्वतंत्र थीम पार्क इंडस्ट्री अस्तित्वात नाही.
आज मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत असून, थीम पार्कसाठी अनुभवात्मक आणि कथा-आधारित डिझाइन करण्याचं काम करतो. जागतिक स्तरावरील प्रकल्पांवर काम करताना आंतरराष्ट्रीय टीम्सचा सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्युच्च दर्जाचे अविस्मरणीय अनुभव निर्माण केले जातात. या सगळ्या प्रक्रियेत आर्किटेक्चरची शिस्त, स्पेसची समज आणि डिझाइन थिंकिंग मला सातत्याने मदत करत आले आहे.
पश्चिमेकडील देशांमध्ये प्रॉडक्शन डिझाइन आणि थीम्ड एंटरटेनमेंटसाठी स्वतंत्र आणि संरचित शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थी या क्षेत्रांमध्ये औपचारिक शिक्षण घेऊन थेट उद्योगासाठी तयार होतात. भारतात मात्र अशा फोकस्ड डिझाइन स्ट्रीम्स अजूनही मर्यादित आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी या वेगळ्या पण मोठ्या संधींबद्दल अनभिज्ञ राहतात.
माझ्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, की आर्किटेक्चर हे अत्यंत बहूपयोगी शिक्षण आहे. या शिक्षणातून केवळ पारंपरिक वास्तुकलाच नव्हे, तर प्रॉडक्शन डिझायनर, थीम पार्क डिझायनर, एक्सपीरियन्स डिझायनर, सीनिक डिझायनर अशा अनेक भूमिका निभावता येतात.
भारतामधील तरुण विद्यार्थ्यांनी आणि डिझाइन शिकणाऱ्यांनी आपल्या करिअरकडे अधिक व्यापक दृष्टिकोणातून पाहावं, असं मला वाटतं. विशेषतः भारतातील चित्रपट उद्योगाला मोठा वारसा आणि अफाट लोकप्रियता आहे व या क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त आज जगभरात डिझाइनसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवल्यास, जागतिक पातळीवर या इंडस्ट्रीजमध्ये काम करणं नक्कीच शक्य आहे.
