‘द.रा. बेंद्रे : एक द्विभाषिक साहित्यिक’

या पुरस्काराच्या निमित्ताने अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. डॉ. बेंद्रे हे मूळचे मराठी भाषिक असूनही त्यांचे बहुतांश लेखन कानडी भाषेत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकांची शेजारी राज्ये असल्याने सीमावर्ती भागांमध्ये अनेक जणांना दोन्ही भाषा येतात. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आठ कानडी लेखकांकडे नजर टाकली तर बेंद्रे यांच्याशिवाय आणखी पाचांचा मराठीशी कमी-अधिक प्रमाणात संबंध राहिला आहे. गिरीश कर्नाड व विनायक कृष्ण गोकाक मराठीशी चांगले परिचित होते. के. शिवराम कारंत यांच्या पत्नी लीला अल्वा मराठीत शिकल्या होत्या व पती-पत्नी यांनी मिळून ह. ना. आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ चा कानडीत अनुवाद केला होता. चंद्रशेखर कंबर बेळगाव जिल्ह्यातील असल्याने त्यांची मराठीशी ओळख होती. यू. आर. अनंतमूर्तींचे बालपण शिरसीमध्ये गेले, तेथे मराठी बोलली जायची. तशीही मराठी आणि कानडी समाजांमध्ये आणि त्यामुळे भाषांमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काही कानडी शब्दांचा (चिल्लर, लडिवाळ, हुडूकून, पडदा) वापर आहे. संत नामदेव आणि तुकारामांच्या अभंगांचा प्रभाव कर्नाटकच्या हरिदासांवर होता.
द.रा.बेंद्रे यांच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या बहुभाषिक लेखकांचा उल्लेख करणे उचित ठरेल. काकासाहेब कालेलकर यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण साताऱ्यात, बी.ए. ची पदवी पुण्यातून. गांधीजींच्या प्रभावामुळे ते अनेक वर्षे साबरमती आश्रमात राहिले. गुजरातमधील दोन विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहयोग होता व दोन्हींमध्ये ते कुलगुरू होते. ते राष्ट्रभाषा समितीचे सदस्य होते. गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांची ग्रंथसंपदा चार भाषांमध्ये आहे. इंग्रजीत ४, हिंदीमध्ये २, मराठीत ६, तर गुजरातीमध्ये त्यांनी तब्बल २२ पुस्तके लिहिली. गुजरातीमधील ‘जीवन व्यवस्था’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
बहुभाषिक पी. व्ही. नरसिंह रावांचे उदाहरणदेखील विशेष आहे. रावांना १७ भाषा अवगत होत्या. त्यांनी ‘पण लक्षात कोण घेतो’ चा तेलगूमध्ये अनुवाद केला. विश्वनाथ सत्यनारायण यांच्या ‘वेयि पडागलु’चा त्यांनी ‘सहस्रफणा’ नावाने हिंदीमध्ये अनुवाद केला.
कन्नड भाषा, तिचे साहित्य आणि साहित्यिक
कन्नड ही भारतातील अत्यंत समृद्ध आणि प्राचीन भाषांपैकी एक आहे. तामिळ आणि संस्कृत पाठोपाठ २००८ मध्ये तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तिचा लिखित इतिहास २००० वर्षांहून अधिक काळचा आहे. द्राविडी भाषांमध्ये ती तामिळच्या इतकीच जुनी आहे. तिची लिपी कदंब लिपीपासून विकसित झाली, तेलगू लिपीशी तिचे कमालीचे साम्य आहे. कन्नड साहित्याचे प्रामुख्याने तीन कालखंड आहेत.
प्राचीन कन्नड साहित्य(१२ व्या शतकापूर्वीचे) या काळाला ‘पंपायुग’ असेही म्हटले जाते. या काळातील साहित्यावर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. इ.स. ८५० मधील काव्यशास्त्रावरील ’कविराजमार्ग’ हा उपलब्ध असलेला सर्वात जुना ग्रंथ.
मध्ययुगीन साहित्य आणि ‘वचन’ साहित्य (१२वे ते १८वे शतक) १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी एक मोठी सामाजिक आणि साहित्यिक क्रांती घडवून आणली. त्यांनी क्लिष्ट संस्कृतप्रचुर भाषेऐवजी सामान्य माणसाच्या भाषेत ‘वचन’ लिहायला सुरुवात केली. त्यांनी अध्यात्म आणि समाजसुधारणा ‘वचनां’च्या माध्यमातून मांडली. पुढे पुरंदरदास आणि कनकदास यांनी ‘दास’साहित्य समृद्ध केले. त्याचा कर्नाटक संगीतावर मोठा प्रभाव आहे.
आधुनिक कन्नड साहित्य (१९व्या शतकापासून) इंग्रजी साहित्याच्या संपर्कामुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात कन्नडमध्ये ‘नवोदय’काळ सुरू झाला. यात कथा, कादंबरी, नाटक आणि आधुनिक कविता अशा विविध साहित्य प्रकारांची निर्मिती झाली.
कन्नड साहित्याला एकूण आठ ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. कन्नड भाषिकांचे प्रमाण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ३.५% आहे. मुंगी आपल्या वजनाच्या कित्येक पट जड गोष्ट उचलून नेते तसा हा काहीसा प्रकार म्हणायला हवा. बेंद्रे यांच्या व्यतिरिक्त इतर सात विजेत्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ या.
कुवेंपू (के.वी.पुटप्पा) यांना आधुनिक कन्नड साहित्यातील ‘राष्ट्रकवी’ मानले जाते. त्यांच्या ‘श्रीरामायण दर्शनम’ कृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. निसर्ग आणि मानवी मूल्यांवर त्यांनी भर दिला.
शिवराम कारंत यांनी कन्नड कादंबरीला वास्तववादाची जोड दिली. ‘मुकज्जिया कनसूगलु’ (आजीची स्वप्ने) ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे.
मास्ती वेंकटेश अय्यंगार एका तामिळ भाषक कुटुंबामध्ये जन्म घेऊनही त्यांनी कन्नडमध्ये लेखन केले. त्यांना कन्नडच्या लघुकथेचे जनक मानले जाते.
यू. आर. अनंतमूर्ती कन्नड साहित्यातील एक वादळी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या ‘संस्कार’ कादंबरीने भारतीय साहित्यात खळबळ माजवून दिली होती. (या कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले होते.)
गिरीश कार्नाड हे जागतिक कीर्तीचे नाटककार. ययाती, तुघलक, हयवदन या त्यांच्या नाटकांनी कन्नड रंगभूमीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. मराठी रसिकांना ते चांगले परिचित आहेत.
विनायक कृष्ण गोकाक कन्नड साहित्यातील ‘नव्य’ काव्य चळवळीचे हे प्रवर्तक होते. ‘भारतसिंधू रश्मी’ या महाकाव्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीच्या अहवालामुळे कर्नाटकात कन्नड भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्यात आले.
चंद्रशेखर कंबर हे कवी, नाटककार आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या लेखनात उत्तर कर्नाटकमधील लोकसंस्कृती आणि मिथकांचा सुरेख मिलाफ आढळतो. ‘सिरि संपिगे,’ ‘जोकुमारस्वामी’ यांसारखी त्यांची नाटके भारतीय रंगभूमीसाठी मैलाचा दगड ठरली.
वरील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांशिवाय आणखीनही कित्येक चांगले लेखक आहेत, त्यांपैकी काहींची थोडक्यात माहिती घेऊ या. यांतील सर्वात प्रसिद्ध नाव एस.एल. भैरप्पा यांचे. ‘पर्व,’ ‘वंशवृक्ष,’ ‘मंद्र’ यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांचे मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. गोपालकृष्ण अडीगा हे ‘नव्य’ काव्यपरंपरेचे पितामह. त्यांच्या कवितांनी कन्नड साहित्याला नवा चेहरा दिला. देवनूर महादेव हे दलित साहित्यातील एक महत्त्वाचे नाव. ‘कुसुमबाले’ या त्यांच्या कादंबरीने कन्नड साहित्याला एक नवी दिशा दिली.
यानंतर आपण बेंद्रे यांचा सविस्तर परिचय करून घेऊ या.
द. रा. बेंद्रे – विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ कन्नड कवी
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे कुटुंब मूळचे रायगड(तेव्हाच्या कुलाबा) जिल्ह्यातले. नंतरच्या पिढ्यांचे जागोजागी स्थलांतर झाले. बेंद्रे यांचे आजोबा सांगली संस्थानातल्या शिरहट्टी येथे स्थायिक झाले. आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या आजीने (आईची आई) आपल्या मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली व त्यांना घेऊन धारवाडला आली. बेंद्रे यांचे वडील तरुणपणीच गेल्यावर त्यांच्या आजीने, आईच्या मदतीने घर सांभाळले. या कामी त्यांना बेंद्रे यांच्या काकांकडूनदेखील मदत मिळाली. आई आणि आजीबद्दल बेंद्रे यांच्या मनात अपार कृतज्ञता भाव आणि प्रेम होते.
दत्तात्रेय बेंद्रे यांचा जन्म ३१ जानेवारी १८९६ रोजी धारवाड मध्येच झाला. मूळची मराठी आणि स्थानिक कन्नड अशा दोन्ही भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या. धारवाडमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून पुढे चार वर्षे त्यांनी पुण्यात राहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेथे त्यांना राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांसारख्या साहित्यिकांचा आणि विद्वानांचा सहवास लाभला. पुण्यात असतानाच प्रभाकर हरी खाडिलकर आणि त्यांचे मित्र यांनी सुरू केलेल्या ‘शारदा मंडळा’शी त्यांचा काही काळ संबंध आला. स्वदेश आणि स्वभाषा यांच्या प्रगतीसाठी काहीतरी करण्याचा त्यामागील उद्देश होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन धारवाडला गेल्यावर बेंद्रे यांनी ‘गेलेयरा गुंपू’ (साहित्यिक मंडळी) ची स्थापना केली.
बेंद्रे यांनी काही वर्षे धारवाडच्या विक्टोरिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी लिहिलेल्या ‘नरबळी’ या कवितेतून जनतेला हिंसाचाराचा संदेश जात असल्याच्या आरोपावरून त्यांना ३ महिन्यांची शिक्षा झाली. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यानंतर पुढील ८ वर्षे कोणीही त्यांना नोकरी द्यायची नाही असा आदेश निघाला. या बिकट काळात त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांचे साहित्यिक महत्त्व जाणणारे मास्ती वेंकटेश अय्यंगार यांनी आपल्या ‘जीवन’ या मासिकाचे संपादन करण्याचे काम त्यांना दिले.
बेंद्रे यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता ‘तुतोरी’ ही केशवसुतांच्या ‘तुतारी’पासून स्फूर्ती घेऊन लिहिलेली असली, तरी ती पूर्णपणे वेगळी होती. केशवसुत आणि बेंद्रे हे दोघेही प्रसिद्ध कवी कीट्स यांचे चाहते होते, हा त्या दोघांना जोडणारा समान धागा होता. मात्र बेंद्रे यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे, की त्यांच्या काव्यावर आधुनिक मराठी कवितेचा विशेष प्रभाव नाही.
एक कवितासंग्रह प्रसिद्ध होऊनही महत्त्वाचे कवी म्हणून बेंद्रे यांची ओळख काहीशा उशिराने, १९२९ मधील बेळगाव येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनातील त्यांच्या काव्यवाचनानंतरच झाली. त्यानंतर मात्र त्यांची कीर्ती झपाट्याने पसरली. तीन वर्षांनंतर प्रसिद्ध झालेल्या ‘गरि’ या काव्यसंग्रहाला प्रचंड लोकप्रियता लाभली. बेंद्रे यांनी आपले काव्यलेखन ‘अंबिकातनयदत्त’ (अंबिका हे त्यांच्या आईचे माहेरचे नाव) या नावाने केले. त्यांचे साहित्यातले चार गुरू म्हणजे आयरिश गूढवादी आणि कवी A. E., खलील जिब्रान, रवीन्द्रनाथ टागोर आणि श्री. अरबिंदो. बेंद्रे यांच्यावर साधारणपणे वरील क्रमानेच त्यांचा प्रभाव राहिला.
बेंद्रे यांना कन्नड साहित्यातील ‘नवोदय’ (पुनरुज्जीवन) कालखंडाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या लेखनाने प्रभावित होऊन कन्नड साहित्य रसिकांनी त्यांना ‘वरकवी’(दैवी देणगी लाभलेला कवी) असे संबोधन दिले. ते केवळ कवीच नव्हे, तर द्रष्टे विचारवंत होते. अनेक विषयांमध्ये त्यांना गती होती. असे म्हणतात, की त्यांच्या ग्रंथसंग्रहात १०२ विषयांची पुस्तके होती. बेंद्रे यांनी उत्तर कर्नाटकमधील धारवाडमध्ये बोलल्या जाणाऱ्या ‘देशी कानडी’च्या वापरातून कानडी साहित्य आणि आधुनिक कानडी कवितेमध्ये एक नवी वाट निर्माण केली.
बेंद्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई फारशा शिकलेल्या नव्हत्या; मात्र बेंद्रे यांच्या कवितांच्या त्या प्रथम श्रोता असत. ४७ वर्षांचा त्यांचा संसार. त्यांना एकूण नऊ अपत्ये झाली, मात्र त्यांतील केवळ तीनच मोठी होईपर्यंत जगली. एक मुलगा २० वर्षांचा होऊन व एक मुलगीदेखील काहीशी मोठी होऊन गेली. या दोन मृत्यूंचा बेंद्रे पती-पत्नी दोघांवरही खोलवर परिणाम झाला. बेंद्रे यांनी काव्यरूपाने आपल्या भावनांना वाट दिली, लक्ष्मीबाई मात्र त्यानंतर अंथरुणाला खिळल्या.
बेंद्रे यांनी नंतरच्या काळात सोलापूरच्या डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या काळात त्यांनी अनेक नभोनाट्ये लिहिली.
बेंद्रे यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. अर्थात, त्यात काव्यसंग्रहच सर्वाधिक संख्येने आहेत. काही नाटके, कथा, निबंध, वैचारिक लेख, समीक्षा, अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे. त्यांच्या साहित्याची अतिशय सविस्तर समीक्षा शंकर मोकाशी पुणेकर यांनी केली आहे. जी. एस. अमुर आणि कीर्तिनाथ कुर्तकोटी यांनीदेखील बेंद्रे यांच्या साहित्यावर लिहिले आहे.
कन्नडसह बेंद्रे यांनी मराठीमध्येदेखील ललित लेखन केले. ‘संवाद’ या त्यांच्या ग्रंथाला १९६५ साठीचा ‘न.चिं. केळकर साहित्यिक पुरस्कार’ मिळाला. मात्र जाणकारांच्या मते त्यांचे कन्नडमधील लेखन मराठीच्या तुलनेत खूपच वरच्या दर्जाचे होते.
बेंद्रे यांना कन्नड साहित्यासाठी १९५८ चा साहित्य अकादमी पुरस्कार, १९६९ मधील त्याच संस्थेची फेलोशिप, १९७३ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार, १९४३ मधील शिमोगा येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असे विविध साहित्यिक सन्मान त्यांच्या वाट्याला आले. १९६८मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ने त्यांचा गौरव केला. कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद डी.लिट. प्रदान केली.
त्यांच्या काही प्रमुख साहित्य कृतींचा परिचय करून घेऊ या.
‘नाकु तंती’ (चार तारा) या काव्यसंग्रहासाठी त्याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. या संग्रहात कवीने मानवी अस्तित्वाचे चार पदर – मी, तू, तो आणि ते असे कल्पिले आहेत. ते एकत्र आल्यानंतर सृष्टीचे चक्र पूर्ण होते असे ते मानतात. मानवी मन, बुद्धी, प्राण आणि आत्मा यांतील संबंधांवर त्यांनी भाष्य केले आहे. आधुनिक कन्नड काव्यातील ते एक काहीसे क्लिष्ट परंतु अद्भुत असे आध्यात्मिक काव्य मानले जाते.
‘गरि’ (पिसारा, पंख) या संग्रहाचा आधी उल्लेख झाला आहे. हा त्यांचा सुरुवातीच्या काळातील संग्रह. त्याच्या नावाप्रमाणेच यातील कवितांना कल्पनांचे पंख लाभले आहेत. या संग्रहात त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांचा समावेश आहे. या संग्रहातील कवितांमुळे बेंद्रे यांना ‘नादलोल’ (नाद खुळा) म्हटले जाऊ लागले. एक प्रकारे कुसुमाग्रजांसाठी ‘विशाखा’ संग्रहाचे जे स्थान आहे त्याच प्रकारचे बेंद्रे यांच्यासाठी ‘गरि’चे आहे.
‘अरलु मरलु’ (फुलणे आणि कोमेजणे) हा प्रत्यक्षात पाच पुस्तकांचा एकत्रित संग्रह आहे. ‘सूर्यपान’, ‘हृदयसमुद्र’, ‘मुक्तकंठ’, ‘चैत्यालय’ आणि ‘जीवलहरी’ ही त्या पुस्तकांची नावे. २७३ कविता असलेल्या या ग्रंथासाठी बेंद्रे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा त्यांच्या परिपक्व विचारांचा संग्रह मानला जातो. यात नव्या आणि जुन्या विचारांचा संगम पाहण्यास मिळतो. त्यांच्या लेखणीतली धार आणि कोमलता दोन्ही यात अनुभवायला मिळतात.
१९८० मध्ये मुंबईतील हरकिसनदास इस्पितळात उपचारांदरम्यान बेंद्रे यांचे देहावसान झाले. कन्नड आणि मराठीत समर्थपणे लेखन करणाऱ्या या कविश्रेष्ठाची स्मृती चिरंतन राहील.

बेंद्रे भवन, धारवाड
