महाकवी मोरोपंत : (१)

संस्कृत विद्वान मोरोपंतांचे लेखन हा न संपणारा वाचनाभ्यास आहे.

जन्म शके १६५१ ते मृत्यू शके १७१६ या अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील १५ वर्षे बाल्य आणि शिक्षणाची धरली तरी ५० वर्षं  निरंतर लेखनध्यास घेतलेला हा विलक्षण कवी.

त्यांची काव्यसंपदा सूचीच थक्क करणारी आहे. 

१)भारत १८ पर्वे

२)भागवत दशम स्कंध आणि काही आख्याने

३)१०८रामायणे वेगवेगळ्या वृत्तांतली आणि वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीतून पाहिलेली

४)विविध पदे, साक्या, केकावलीसारखी काव्ये. 

५)सीतागीत  

६)कृष्णविजय इ. 

काव्यलेखनाची आंतरिक ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अभ्यासलेल्या विविध पौराणिक कथा, मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे कंगोरे, त्यांतून उभे राहिलेले तंटे, युद्ध या सर्वांचा विशाल पट त्यांच्या मेंदूत आखला गेला होता. ते ग्रथित करण्यासाठी नुसती शब्दकळा नव्हे तर अलंकारांचंही कोंदण त्यांच्या भाषेला लाभलं होतं. कधी संस्कृतप्राचुर्य तर कधी साधीसुधी मराठी भाषा! त्यांचा शब्दपट उलगडत गेला, की वाचक त्यात रंगून जातो!  रसनिर्मिती हा  असाधारण पैलूही त्यांच्या लेखनाला होता.

मोरोपंतांचा आणखी एक स्वभाव-विशेष म्हणजे कसल्याही प्रकारचा गर्व नसणे. एवढं समृद्ध लेखन करूनही ‘इदं न मम’ हा भाव त्यांच्या लेखनात जाणवतो. प्रसंगी ते स्वतःला क्षुद्रही म्हणवून घेतात आणि क्षुद्रानेही आपल्या कुवतीप्रमाणे काव्यरचना करायला हवी असेही म्हणतात. 

(३४६/नवनीत स्फुट आर्या, गीतिछंद) 

काव्य करावें म्यां, नच वचकावें  दूषितो परि लघूस

कां न सदन बांधावें कीं  त्यांत पुढें बिळें करिल घूस

 ‘माझ्यासारख्या छोट्या माणसाने काव्य करणे हे योग्य नाही,  कारण लोक टीका करतील असं म्हणणं योग्य नाही.’ पुढे दृष्टान्त देतात : हे म्हणजे घूस बीळ करेल  म्हणून घरच न बांधण्यासारखं आहे. साध्या सोप्या दृष्टान्तातून लेखनाचं महत्त्व ते अशा तऱ्हेने वाचकांच्या मनावर बिंबवतात. 

स्वतःच्या काव्याविषयी ते  म्हणतात,

(३४६/४,५,६) 

या काव्यात संस्कृत शब्दांचे उपयोजन  अधिक आणि बोलीभाषा कमी आहे. रसिकांनी  ते सावकाश वाचावे. 

गीर्वाणशब्द पुष्कळ जनपदभाषाचि देखतां थोडी,

यास्तव गुणज्ञ लोकीं याची घ्यावी हळूहळू गोडी||३४६/४|नवनीत

मुळात शालजोडीला ठिगळ लावावे का? म्हणजे देवभाषा संस्कृत आणि मराठी  यांची जोड का घालावी? असा संस्कृतज्ञांचा, प्रस्थापितांचा प्रश्न! 

मोरोपंत यालाही मृदू शब्दांत उत्तर देतात (३४६/५) :

प्राकृत-संस्कृत-मिश्रित यास्तव कोणी म्हणेल ही कंथा,

भव-शीत-भीति-भीत-स्वान्ताला दाविला बरा पंथा.

संस्कृत आणि देशी भाषा अशा सरमिसळीला कोणी  (थट्टेने) कंथा म्हणजे ठिगळं लावून केलेली गोधडी म्हटलं तरी ते चुकीचे नाही.  सांसारिक दुःखांची  भरलेली हीव पळवायचा  मार्ग  यातून नक्कीच मिळतो. संस्कृत सर्वसामान्यांना कळतंच असं नाही.  वाचनाच्या भुकेल्या रसिकाला संस्कृत आणि मराठी अशा मिश्रित भाषेचा आस्वाद  घेता येईल अशी मोरोपंतांची धारणा आहे. त्यांच्या स्फुटकाव्यांमधून त्यांच्या  गुणज्ञतेची कल्पना येते. 

(३४६/८ नवनीत) 

ज्यांच्या हृत्कासारीं होय गुण-स्नेह-बिंदुही फार

सार-ज्ञ असूयोज्झित त्यांला माझा असो नमस्कार||

ज्याच्या हृदयसरोवरात गुणांचे तेल आहे, मार्दव आहे आणि त्यामुळे  इतरांच्या गुणांची तो कदर करतो  अशा विद्वान, मर्मज्ञाला ते मनोमन नमस्कार करतात.

मोरोपंतांच्या उदंड काव्यरचनांमधील काही मोजक्या रचनांचा या लेखांतून रसास्वाद घेण्याचा हा प्रयत्न आहे. सुरुवात अष्टोत्तरशत रामायणाने करत आहे.

अष्टोत्तरशत म्हणजे एकशे आठ रामायणे. या रचनांमधील काव्यगुण, रस, नाट्य यांचे वैविध्य  चकित करणारे  आहे. अलंकार सौंदर्य ओघाने येईलच; तरीही अलंकारांविषयी एक स्वतंत्र लेखही लिहावा  इतके विविध अलंकार विविध शब्दखेळांत त्यांनी गुंफले आहेत. रामायण कथा सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे कथेचा सारांश येथे देण्याची गरज वाटत नाही.  काव्यातील अवघड शब्द, विलक्षण कल्पना, अलंकार – थोडक्यात त्यांच्या प्रतिभेची  ओळखण व्हावी  या उद्देशाने हे लेखन केले आहे. 

अष्टोत्तरशत रामायणातील पहिले

मंत्ररामायण २/४

श्रीकारापासुनियां मकारपर्यंत वर्ण जे तेरा, 

ते राघवचरितांती ग्रथिले, हें रामभक्त हो! हेरा

असं म्हणत मोरोपंत अष्टोत्तरशत म्हणजे १०८ रामायणांचा घाट घालतात. 

या एकशेआठ रामायणांमधील कथा तीच!  विविध वृत्तांमध्ये गुंफलेली, अलंकार, म्हणींमधून पात्रपरिचय करून देत,  मनुष्यस्वभावाचे कंगोरेही स्पष्ट करत उभी केलेली ही संपूर्ण  कथा! उद्देश काय? (३/१६)

आर्यकथाछंदानें आर्याछंदें चि जन्मलीं सरलें

याणें माझें तनुवाक्कर्ममनःपाप सर्वथा सरलें||

रामकथेचं लेखन केल्याने पाप  सरले याचा अतीव आनंद त्यांच्या मनात आहे. काव्यरचनेच्या बाबतीत त्यांचे विचार स्पष्ट आहेत – अर्थ महत्त्वाचा! लघुगुरू तडजोड, कधी यतिभंग अशा चुका  क्षुल्लक मानाव्यात आणि रसास्वाद घ्यावा असे ते ठासून सांगतात. 

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः

यत्क्रौंचमिथुनादेकम-वधीः काममोहितं|||

आद्य छंदोबद्ध वाणीतून उमटलेला हा शाप (पान ४) आणि त्यातून एकामागून एक निमित्त होऊन घडत गेलेल्या अटळ घटना यांचा एकसंध पीळ घालताना मोरोपंतांनी भाषेच्या अलंकारांसह, नाट्य, नाट्याला आवश्यक मनुष्यस्वभाव यांची पेरणी केली आहे. हे कमीच की काय, म्हणून ही काव्यरचना  श्रीराम जय राम जय जय राम या  मंत्राने अवगुंठित केली आहे. पहिल्या कडव्याच्या पहिल्या ओळीत श्री दुसऱ्या कडव्याच्या पहिल्या ओळीत रा अशी योजना करत संपूर्ण मंत्ररामायणात श्रीरामाचा जप ओवला आहे. त्यातून त्यांच्या स्वतःच्या जपाबरोबरच वाचकांचाही जप नकळत साधला जातो. 

वानगीदाखल एक रचना ५/१४

ठळक अक्षराने श्रीरामाचा जप दर्शविला आहे.  कडव्याच्या सुरुवातीला जपाची अक्षरे येतात ती वाचकांच्या लक्षात यावी यासाठी ठळक केली आहेत. (मं.रा ५) 

श्रीरघुनाथनिदेशें कथिता जाला              जसें कवीन मुनी   

कुशलव कुशलवचनपटु गाती 

गुर्वंघ्रिला मनीं नमुनी.||१|| 

राजप्रिया अयोध्या कोसलदेशीं            

यथार्थनामा जी, 

तीतें अजसुत दशरथ जो ख्यात या    जनामाजी|२||

ह्यवन प्रौढकरें, धर्मपरें  देवकार्य सिद्धिकरें                                                                

दशरथनृवरें केलें त्रिभुवन धवल स्वसद्यशःप्रकरें.||३|| 

 गतीपतीस होत्या सार्धत्रिशत

 प्रिया अज श्रेष्ठा; 

 कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा   तयांत ही  श्रेष्ठा||४||

मनियमें, पुत्रार्थ, क्षितिपें, 

सुरपूजनाद्यधीनमनें

 इच्छादानें, मानें तोषविले मंदधी, सुधी नमनें||५||

रा जास  सौख्य कांही प्राप्त न      

जालें चि पुत्ररत्नाचें;

यास्तव चिंताकुळ तो मानी 

वैफल्य सर्व यत्नाचें||६||

नुवंशी जन्मुनियां, जालों  

अनपत्य मीं, न लोक मला

 यास्तव हयमेधीं हे द्यावी 

 द्विजहस्तकीं म्हणे ‘कमला’ 

नपति मग यज्ञास्तव

वसिष्ठमुखभूसुरांशि तो प्रार्थी;

त्यांही तोषविला बहु     

आशीर्वादें नृपाळ पुत्रार्थी

‘य जनाचे साहित्य क्षिप्र करीं’ 

 यापरी अनुज्ञा ते करुनि, यथागत गेले वसिष्ठमुख

भूमिनिर्जर ज्ञाते           

यशाली भूप म्हणे मंत्रिजनाला, 

‘समस्त संभार सरयूतीरीं करणें, तुम्हां वरी हा असे महाभार

त्नें साहित्य तदा करूनियां, 

ते प्रधान यज्ञाचें 

आनंदविती मानस 

कौसल्याजानिचें नयज्ञाचें

रा जेंद्रासि म्हणे तो सुमंतनामा प्रधान अनवीन

आज्ञा असेल तरि मी  हितकाम तुज्या पदासविनवीन

नुजाधीशा! वदला भविष्य पूर्वीं सनत्कुमार मुनी;

तें आइकिलें ऋषिजनवदनें मीं

तत्पदांबुजी रमुनी 

या तऱ्हेची नावीन्यपूर्ण रचना वाचकाला गुंगवून ठेवते. मोरोपंतांच्या काव्यातील शब्द बऱ्याच वेळा संभ्रमात टाकतात, कधी संस्कृतप्रचुरता तर कधी तत्कालीन मराठी शब्द अशा लोलकाच्या आंदोलनामुळे वाचकाला सुरुवातीला अर्थ समजून घ्यायची कसरत करावी लागते. 

‘दे भार्यांशि’ असं म्हणून कुंडातून प्रकट झालेल्या दिव्य पुरुषाने दिलेला प्रसाद दशरथाने पत्नींना वाटून दिला… या प्रसंगाचे वर्णन करत मोरोपंत पुढे म्हणतात, 

महिषी अंतर्वत्नी होउनियां त्या तनुप्रभानिकरे… (७/४६)

असं वाचताच एक धक्का बसतो. दशरथाच्या पत्नींना दिलेला प्रसाद भक्षण करून  महिषी – म्हशी गर्भवती झाल्या असा अर्थ वाटतो; पण महिषीचा अर्थ राजपत्नी असाही आहे हे लक्षात येतं आणि… मोरोपंतांनी या काव्याला मराठी आणि संस्कृतची गोधडी  का म्हटलं आहे तेही कळतं. 

भार्गवरामाचे धनुष्य श्रीरामाने मोडले या प्रसंगाचे वर्णन(९/६६) करताना मोरोपंत म्हणतात, 

महदानंदें भार्गव गेला, विनवून कपटमनुजाला 

हा कपटमनुज कोण असा प्रश्न पडतो… आणि या कपटी माणसाची भार्गवाने विनवणी का केली, हा प्रश्न उभा राहतो. कपटचा नकारात्मक अर्थ इथे सकारात्मक छटेने रंगवला आहे. कपटमनुज  म्हणजे लबाडीने मनुष्याचं रूप  धारण केलेला ईश्वर… अर्थात श्रीराम! 

काव्यात एकसुरीपणा येऊ नये म्हणून मोरोपंत असे नवनवीन शब्द, अलंकार, रस  यांचं शिंपण घालतात. 

पान१३/३३

वल्कें धरितां भिजली पुरभू जननेत्र जीवनासारे

भिजविति सज्जन पौर क्षोणीला बाष्पजीवनासारें

जाती रामासह तें पुर भासे त्यांसि पितृवनासारें

राम निघून गेल्यावर अयोध्या पितृवनासारखी वाटू लागते – हा  शब्दप्रयोगही थोडा विचार करायला लावतो. पितृवन म्हणजे पित्याची वाटिका असा अर्थ वाटतो.  राम जाण्याचा आणि पित्याच्या बागेचा काय संबंध हे प्रश्नचिन्ह उभं राहतं.  पितृवन म्हणजे पितरांचं  स्थान! ते जसं ओसाड असतं तशीच अयोध्या  रामरूपी चैतन्य गेल्याने  भकास दिसू लागली. डोक्याला ताण देत अर्थ लावला, की कथा दृश्य स्वरूपात सामोरी येते.

वर्णनासाठी आशयघन शब्दांना ते कधी एकाच अक्षराचे वारंवार उपयोजन करून गेयता आणतात. 

पान १३/३० 

निर्लज्जा कैकेयी रामासि पुसे महादृषद्धृदया? 

(पाषाणहृदयी) या अवघड समासानंतर दरचार अक्षरांनंतर  ‘य’ या अक्षराचे उपयोजन करत लिहितात, १३/३१

रा असें आकतां, हा म्हणे बाको न हे कृत्या

काय करूं? जाय वना  बा! यशजोडीं करूनि सत्कृत्या

शब्द चमत्कृतीचे असे विविध प्रकार  लीलया गुंफत मोरोपंत औत्सुक्य निर्माण करतात. 

पान १२ मंत्ररामायण /२५

शय जोडुनि राम म्हणे, जननि! उपेक्षूं नको पिता माजा

कैकेयीशब्दशरक्षत मद्विश्लेषविकळ हा राजा

हा राज्ञी सुतशब्द श्रवण करुनि, होय ते विगत हारा

हा राम! म्हणोनि करी उरीं प्रहारासि वर्जिता हारा

हा राजा, हा राज्ञी, विगतहारा, हा राम, वर्जितहारा

 हा या अक्षरापुढे रा हे अक्षर  लावून  विविध अर्थांचे शब्द  सहज गुंफून त्यांनी शब्दसुमनहार माळला आहे. 

त्यांच्या लेखनाचा लंबक अमर्याद हलता आहे. एकीकडे हाराची शाब्दिक गंमत ओवताना हा लंबक थेट अध्यात्माकडे वळतो. 

पान १४/४५

तो राम सुरनदीतें मग गुहनौकाश्रयेंकरूनि तरे;

मायानदीस जैसा जन याच्या भक्तिसंश्रयें उतरे 

श्रीरामाच्या  भक्तीत रममाण होऊन लोक  भवसागर जसा पार करतात तसा   गुहकाच्या नौकेतून तो

‘तरे’ म्हणजे तो नदीपार गेला. आध्यात्मिकतेचा हा अचानक येणारा वळसा काव्यातील एकसुरीपणा दूर करणारा ठरतो.

पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायात शिरताना ‘श्रीराम जयराम’ हा जप दुसऱ्या अक्षरापासून सुरू होतो. प्रत्येक अध्यायात  रामनाम कसं रचलं आहे हे बघणंही आनंददायक ठरतं. या अध्यायात लहानपणापासून आपण ऐकत आलेली श्रावणबाळाची  कथा फ्लॅश बॅक पद्धतीने येते. एक मोठा समास योजत ते लिहितात, (१६/६५) 

नीरादानागतमुनिपात्ररवाकर्णनें अजाणानें

(रिकाम्या भांड्यात पाणी भरताना  आलेल्या आवाजाने) 

ही कथा माहीत असली तरी संस्कृप्रचुर अवघड शब्दांमधून यथार्थ चित्रवर्णन मोरोपंत घडवतात. 

निपुत्रिक दशराथाला श्रावणाचे आईवडील शाप देतात :

हें मद्दुष्कृत जाणुनि अंधे वृद्धें सकोप तत्पितरें

‘म्हणती,’ त्वां हि मरणें सुतशोकें यापरीच तप्ततरें’

हा गंभीर  प्रसंग रंगवताना तत्पितरे आणि तप्ततरे यांतील अक्षरसाम्य  गुंफत रसभंगाचा दोष टाळून कथेचा ओघ कायम ठेवतात. 

‘मुलाच्या वियोगाने मृत्यू येईल…’ 

याचाच अर्थ त्याआधी या अनपत्याला मूल होईल… 

मज  तें इष्ट चि शापप्रदान गमलें तदानपत्याला

हा दशरथाचा आनंद इष्टापत्तीसारखाच आहे.

पान १६

दामयमकाची चमत्कृती विविध प्रसंगांत ते रेखतात. अलंकारांचा एक मोठा लेख होणार असला तरी कथानुषंगाने येणारे  अलंकार मनाला थेट भिडतात म्हणून काही अलंकार इथे दिले आहेत. 

दशरथाच्या और्ध्वदेहिकाचे वर्णन मोरोपंत करतात.

१६/७४

द्विजवर वसिष्ठ ठेउनि तैलद्रोणींत भूप देहा तें;

दे हातें पत्र म्हणें भरतासि सुमंत्र करि, व दे हातें

आपल्या  आईच्या कैकेयीच्या – दुराग्रहापोटी पित्याचा मृत्यू झाला हे ऐकून भरताला अतीव दुःख झालं आणि संतापही आला. मोरोपंत वर्णन करतात (१७/७६)  :

‘दंडाहत भुजग तसा कोपें मातेकडे तदा मुरडे’

सर्पावर वार केल्यावर तो जसा उसळून चाल करून येतो  तसा  भरत कैकेयीवर उसळून बोलू लागला. दाटलेला क्रोध, संताप, फणा काढलेल्या सर्पाच्या उपमेत वेढून मोरोपंत हा पूर्ण प्रसंग संताप, शोकाच्या आवर्ताने रंगवतात. 

भयंकर उसळून भरत मातेची निर्भर्त्सना करत म्हणतो, १७/८१

‘तूं राक्षसापरीस हि अधमा, जे निजकुटुंब खातीस

मीं ही पाप तुजा सुत, हे बोले,’ होय पारखा तीस

स्वतःचं कुटुंब खाणारी लावसट असं संबोधत तिला दूर करणारा भरत, त्याचा संताप आणि पित्याच्या मृत्यूचे, वडील भावाच्या दूर जाण्याचे दुःख  आणि खातीस.. पारखा तीस या ओळींमधून क्रोध, शोकरसाचाही आविष्कार करतं. मोरोपंतांच्या लेखनात एकसुरीपणा नाही. अलंकार आणि रसांचं उपयोजन झाल्यावर ते अवघड शब्दांमध्ये शिरतात.(२०/१११) 

कारागृहगतसम तो, सामात्य सदैव पादुका अर्ची

शिंपी विवेकनीरें परि न शमे शोकवन्हिची अर्ची||

अर्ची म्हणजे अर्चना करणे हा अर्थ माहीत असतो. दुसऱ्या अर्चीचा अर्थ (अर्चिस्=अग्नी) कसा यथातथ्य योजला आहे! 

विवेकाच्या काही गोष्टी सांगितल्या तरी शोकरूपी आगीची ज्वाळा विझली नाही. शोकवन्हिची अर्ची आणि पादुका अर्ची ही शब्दकुसर आशयघन ठरते. 

मोरोपंतांच्या शब्दसंपदेतून  नानाविध अलंकार निर्मिले जातात. २२/१७ 

अनुज कृतच्छदसदनीं, सदनिष्टविनाशदक्षपा दरज;

दर ज गतीचें हरितो हरितोषद कोसलेशजोदरज 

(कौसल्येच्या उदरातून जन्मलेला)

छेकानुप्रास, दामयमक आणि यमक. जादूगाराच्या   पोतडीतून कबुतराचा  मोर, मोराचा पोपट अशी चमत्कृती पाहायला मिळते तसं काहीसं हे अद्भुत!

छद म्हणजे पान. पानाचं घर म्हणजे पर्णकुटी… सदनी पुढे येणारा

सदनिष्टविनाशदक्षपादरज

सत्+अनिष्ट+विनाशदक्ष + पादरज

साधूंचं अनिष्ट टळावं यासाठी दक्ष असलेली पायाची धूळ. लागोपाठ येणाऱ्या सदनी सदनि मधून साधलेला छेकानुप्रास शिवाय 

या पादरजातील  ‘दर ज’ ही अक्षरे पुढच्या ओळीत घेऊन

दर जगतींचे हे दामयमक, हरितो हरितोषद हा पुन्हा छेकानुप्रास आणि शेवटी

कोसलेशजोदरज हे दक्षपादरजाचे यमक… कोसल देशाच्या राजाच्या मुलीच्या उदरातून जन्म झालेला! 

हे लेखन डोक्याला कोड्यात टाकणारं आहे पण उलगडा होत गेला, की मात्र या शब्दपांडित्याने वाचक थक्क होतो.

इथे मुद्दाम स्पष्ट करावंसं वाटतं, आत्ताचे  सुलभ काव्य आणि हे काव्य यांची तुलना करणे अयोग्य आहे. त्या त्या कालानुरूप कवितेची घडण होत असते आणि ती उत्तरोत्तर बदलतही जात असते. त्यामुळे एकविसाव्या शतकातील कविता  समोर ठेवून  संतपंततंत काव्याचं मूल्यमापन करू नये.

रामायणामागची  त्यांची स्वतःची भूमिका भुंग्याची आहे.

वाल्मीकि कवि प्रोक्त काव्यपद्म श्रीरामलीला मकरंद सद्म

तेथे मयुरेश्वर भृंग झाला

सेवावया नित्य सुखे रसाला चरिताम्रवनांत

मयुरेश्वर भृंग्याने साठवलेल्या मधुमधुर मकरंदाचा आपण  क्रमशः आस्वाद घेणार आहोत.

Author

Leave a Reply