झुकझुक आगीनगाडी(१५) :  पुनश्च सोलापूर

कोकण रेल्वेत सुरुवातीपासूनच OFC तंत्र होते. मी तिथे उपकरण बदलणे, OFC Cable आणि उपकरणांतील  त्रुटी काढणे आणि पूर्ण कोकण रेल्वे भारतीय रेल्वेच्या दळणवळण नकाशावर (NMS) आणणे एवढेच, पण ३ ते ४ महिने चालणारे क्लिष्ट आणि जिकीरीचे  काम करत होतो; कारण  हे सर्व काम मला तेथील चालू असलेली सिग्नल आणि दूरसंचार प्रणाली  बंद न करता करायचे होते. 

 ‘कोणतेही काम जितके क्लिष्ट असेल  तिकका त्याचा तो अनुभव समृद्ध असतो.’  असा समृद्ध अनुभव घेऊन मी परत मायदेशी (सोलापूर) परतलो. कोकणात  कायम नदी,समुद्र किनारा, पुळण,  बोगदे, रौद्र निसर्ग , दमट  हवा आणि इकडे एकदम कोरडे हवामान. मी परत माझ्या कामाला लागलो. माझा आता सर्व उपकरणांवर हात चांगलाच बसला होता. 

रेल्वे अभियंते – मग ते कोणत्याही खात्याचे असोत – चांगले सरावलेलेच पाहिजेत. नवीन उपकरणे आणि त्यांचे  Programmes  अगदी मी झोपेतसुद्धा  सांगत होतो. जिथे-जिथे भारतीय रेल्वेत  असे OFC प्रकल्प चालू होते तिथून मला रात्री-अपरात्री ‘मार्गदर्शन करा,’ म्हणून फोन येऊ लागले. मला सुरुवातीला बरे वाटले; पण नंतर त्रास होऊ  लागला. ज्या सूक्ष्मतरंग ( Railway Microwave) खात्यात माझी सुरुवातीला नेमणूक झाली होती, त्याच तंत्राच्या  मुळावर मी उठलो होतो. तंत्रज्ञान बदलल्यामुळे सर्व Microwave प्रणालीवरील दळणवळण आता OFC वर वळवले गेले होते. ती उपकरणे, मी लिहिलेले पुस्तक आता कालबाह्य झाले होते. कारण रेल्वेतील सिग्नल  आणि Telecommunicationचे  तंत्रज्ञान आणि दळणवळणावर अवलंबून असणारे इतर खात्यांचे तंत्रज्ञान   ही  कामे पूर्णपणे बदलली गेली होती. 

जसे : PRS(Passenger Reservation System), मालवाहतूक (FOIS…Freight Information System) Account Finance, Audit अशा प्रत्येक खात्याशी निगडित असलेलेली  दळणवळण सुविधा. या सर्व तंत्रबदलाचा मी एक साक्षीदार होतो.

‘कात टाकणे’ हा प्रकार मी अनुभवत होतो. रेल्वेतील सर्व विभागांचे काम  दळणवळण मजबूत झाल्यामुळे जोरात चालू झाले. मालवाहतुकीमध्ये,  माल पाठवणारा आणि घेणारा यांना आपला माल कुठे, कोणत्या स्टेशनावर आहे आणि आपल्याला केव्हा मिळणार हे  मोबाईलवर  कळू लागले. भारतीय जनताजनार्दन  रेल्वे तिकिटाचे आरक्षण घरून करू लागले. BSNL  वरील आमचे अवलंबन  जवळजवळ  समाप्तच झाले होते. आमची एक स्वतंत्र दळणवळण प्रणाली भारतभर अस्तित्वात आली होती. ह्या तंत्रबदलामुळे  प्रत्येक विभाग प्रमुखाला लॅपटॉप दिला गेला आणि कार्यालयात डेस्कटॉप  मिळाला. आम्ही घरूनसुद्धा छोटी छोटी प्रशासनिक  कामे करू लागलो.  

एक गंमत : साधारण २००० साली नवीन लॅपटॉप वापरण्याचे  फॅड आले होते. (यावरून एक प्रसंग आठवला, टिळकांचे गीतारहस्य जेव्हा प्रकाशित झाले, तेव्हा बरेच ढोंगी  लोक तो ग्रंथ  न वाचता   हातात घेऊन फिरत असत आणि मी विचक्षण वाचक आहे असे दर्शवत.) आता गीतारहस्याऐवजी गळ्यात लॅपटॉप  आला होता. मानसिकता तीच होती.असो.) रेल्वेमध्येसुद्धा लॅपटॉप वापरणे सक्तीचे  केले गेले; पण त्या वेळेस लॅपटॉप फार लोकांना वापरता येत नव्हता म्हणून मग सगळ्यांना प्रशिक्षण सक्तीचे केले होते आणि विशेष म्हणजे सगळ्या रेल्वे स्टाफला एकसारखे  लॅपटॉप ही देण्यात आले होते. आता एवढे   लॅपटॉप्स दिले तर होते,पण ते कोणालाच  नीट वापरता येत नव्हते. आता आली ना पंचाईत! परत त्या लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन, fingerprint lock, Camera, Speaker, VIDEO conference  असे विविध  fancy पर्याय होते. मी टेक्निकल फील्डचा  असल्यामुळे रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझ्या अंगावर  आली म्हणून मग मी त्याप्रमाणे स्वतः तयारी करून प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण देतेवेळी लॅपटॉपमधील   ‘privacy and security’ चा भाग  शिकवताना मी fingerprint lock बद्दलदेखील प्रशिक्षण दिले.  माझे सगळ्यांना सगळे शिकवून पूर्ण झाले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी रेल्वे दवाखान्यातील डॉक्टर पतिपत्नी माझ्या ऑफिसात अतिशय चिंतित मुद्रेने  आले आणि गंभीरपणे म्हणाले, “हम दोनों का लॅपटॉप कल से खुलता हि नही! ” मी थोडासा विचार केला आणि प्रयत्न करून पहिला तसा लॅपटॉप सुरूतर होता पण फिंगरप्रिंट लावूनसुद्धा उघडत नव्हता. “आता काय करायचं,” म्हणून मीपण थोडासा विचारात पडलो. मग मला माझ्या बाबांनी सांगितलेलं सूत्र आठवलं, “सगळं  तुझ्यासमोर आहे, तुझं  निरीक्षण कमी पडतंय, निरीक्षण कर!” मग मी दोन्ही लॅपटॉप एकदम निरखून पहिले तर दोन्ही लॅपटॉप एकदम सारखे होते मग अचानकच माझी ट्यूब पेटली आणि मी त्या दोघांच्या(पती- पत्नी)  लॅपटॉप्सची  अदला-बदली केली आणि सांगितले, “आता लॅपटॉप अनलॉक करा.”मृत  व्यक्ती जिवंत व्हावी त्याप्रमाणे दोघांचे लॅपटॉप्स व्यवस्थित  सुरू झाले. कधी कधी हुशारीपेक्षा common sense कामाला येतो तो असा! त्यानंतर  ते दोघे म्हणाले, “ये  तो हमारे ध्यान में नही आया.”  आम्ही तिघे मग खळखळून हसलो आणि मग आपल्या आपल्या कामाला लागलो. नंतर जेव्हा जेव्हा परत त्या डॉक्टर जोडप्याला भेटायचा योग येतो तेव्हा तेव्हा या किश्श्याची  आठवण होते  आणि आम्ही खूप हसतो. त्यांची बदली होईपर्यंत ते माझे उत्तम मित्र झाले होते.   

हा तंत्रबदल होण्याआधी  आम्ही रेल्वेची गरज भागवण्यासाठी BSNL कडून अवघी २Mb Bandwidth ( Internet चा स्पीड मोजण्याचे एक  एकक) पूर्ण सोलापूर डिव्हिजन साठी  वापरत होतो आता OFC झाल्यावर आम्ही ४०Gb (१ Gb म्हणजे 10 वर ९ शून्ये  ) वापरत आहोत आणि तो तंत्रासुर विकट हास्य करीत म्हणत असावा , “घेशील किती दो करांने” 

ह्या तंत्रामुळे आता सर्व लहान-मोठ्या   स्टेशनांना आरक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. ह्या सर्व तंत्रबदलामुळे सोलापूरच्या कर्मचाऱ्यांचे  मुंबईला जाणे जवळपास बंद झाले आणि छोट्या स्टेशनावरील  कर्मचाऱ्यांचे सोलापूरला येणे जवळ जवळ बंदच झाले; कारण सर्व काम e Office ने  होऊ लागले आणि रेल्वेला IT या ब्रह्मसमंधाने  पछाडले. या तंत्रबदलामुळे  काही विनोद/मजेशीर प्रसंगसुद्धा झाले .

 टाईप केलेला मजकूर किंवा DATA कॉंप्युटर बंद केला, की उडतो (नाहीसा होतो.) Save ह्या option वर आमचा विश्वास नव्हता.

काही निवृत्तीच्या उंबरठ्यावरील  तंत्रस्नेही नसलेले कर्मचारी ईमेलचे Print Out काढून फाईल करत होते. काही दुसऱ्या डिविजनचे कर्मचारी, ईमेल जरी केला तरी त्याचे प्रिंटआउट  काढून सही करून पोस्टाने/ ट्रेनने  पाठव असे म्हणायचे.  त्यांना शिकवताना माझी भंबेरी उडायची. असाच एक किस्सा : मुंबईला काही महत्त्वाची कागदपत्रे  पाठवायची होती. मी स्कॅन करून इमेलला  जोडून कसे पाठवायचे  हे त्यांना शिकवले.  मुंबईच्या O.S ( Office Superintend) ला मिळाले का नाही ह्याच्यासाठी मुंबईच्या त्याच  O.Sचा इ मेल त्या O.Sला पासवर्ड  विचारून मी सोलापुरातच दुसर्‍या pc वर ओपन  करून त्या महाभागाला दाखवला आणि म्हणालो, “झाले समाधान?”  त्यावर त्या महाशयांचे  गूगललाही कोड्यात पडणारे उत्तर होते : “दोनो कॉंप्युटर सोलापुर में हैं इसीलिये दिख रहा है|”  ये तो  बंबई जाने के बाद हि पता लगेगा, कि उसको मिला  या नहीं!”  मी त्याला कोपरापासून हात जोडले आणि ट्रेनिंग  सेंटरमधून बाहेर पडलो. 

Author

Leave a Reply