अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा (११) 

आकाशवाणीचं हे ….

                                             ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।

                                              वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’

(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)

भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या  जोरदार आक्रमणामुळे  आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते;  परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले.  स्वतःचे ॲप तयार केले.  विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व  विश्वासार्हता टिकवून आहे.  शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत. 

भाग ११ 

माध्यम-स्वातंत्र्य : भ्रम आणि वास्तव

माध्यम-स्वातंत्र्य हा पत्रकारितेच्या एकूण क्षेत्रात सतत चर्चिला जाणारा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर १९७७ पासून आकाशवाणीच्या स्वायत्ततेबद्दल सुरू झालेली चर्चा १९९९ मध्ये प्रसारभारती हे स्वायत्त महामंडळ स्थापन झाल्यावर आणखीनच खुली झाली. 

‘आकाशवाणीतल्या एकूण निर्मितीमध्ये माध्यम स्वातंत्र्य कितपत मिळतं?’  हा प्रश्न बरेचदा मलाही विचारला गेला.

मला हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला गेला तेव्हा एक मूलभूत गोष्ट लक्षात आली ती ही, की इथे ‘स्वातंत्र्य’ ही गोष्ट ‘देणाऱ्या’पेक्षा ‘घेणाऱ्यांवर’ जास्त अवलंबून असते. स्वायत्तता हे मूल्य किंवा संकल्पना तुमच्या कृतीतून कशी आणि किती राबवता हे सर्वस्वी तुमच्यावरच अधिक अवलंबून असते. एकतर यासाठी प्रामाणिक व्यावसायिक निष्ठा लागते. ‘सामान्य श्रोता’ हा जो तुमचा आत्मा आहे, त्याच्या कल्याणाची आच असावी लागते. स्वायत्तता घेताना, ती राबवताना तुम्हांला तुमचा स्वार्थ बाजूला ठेवून जराशा त्यागाची तयारी ठेवावी लागते. ज्या स्वायत्ततेची बूज तुम्ही राखता आहात त्यासाठी प्रसंगी त्यागासोबत संघर्षाचीही तयारी लागते. पाठपुराव्यासाठी धडपड लागते. आता हे सगळं आकाशवाणीच्या सरकारी कर्मचारी असणाऱ्या माध्यमकर्मींकडे असायला हवं. अन्यथा स्वायत्तता, माध्यम-स्वातंत्र्याच्या बड्या-बड्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. इथे तर कित्येकांना स्वायत्तताच नको आहे. काही स्पष्ट, रोखठोक, व्यापक समाजहिताची कळकळ ठेवून करायचे असेल तर ‘स्वातंत्र्य’ लागतं. इथे ते हवंय कोणाला? स्वातंत्र्य घेऊन करायचंय काय? आपल्याला ते कोणासाठी आणि कसं राबवायचं याची सुस्पष्टता आहे का? मला माझ्या वाटचालीत आणि माझ्या वाट्याला आलेल्या टीमच्या कामात व गुणवत्तेत कधीही स्वायत्ततेचा – स्वातंत्र्याचा प्रश्न किंवा त्यात अडसर आलेला नाही. जे जे धाडसी आशयाचे कार्यक्रम करायला मिळाले ते करताना आपले कोणी पंख छाटतंय, आपल्यावर कोणी फार दडपण आणतंय असं मला कधीही जाणवलं नाही. हे सरकारी माध्यम आहे म्हणून इथं सरकार विरोधी काही बोलताच येणार नाही हा केवढा मोठा भ्रम आहे. आकाशवाणीसाठी एक सुंदर आचारसंहिता – (एअर कोड) आहे. या संहितेच्या कोंदणात राहून भरपूर स्वातंत्र्य घेता येतं – आम्ही ते घेतलं. त्याचं फळदेखील आम्हांला, आमच्या टीमला, आमच्या केंद्राला ‘इमेज’च्या रूपाने मिळालं. काही उदाहरणे देतो :

१९८३ च्या आसपास संघाचं तत्त्वज्ञान, भारताची राष्ट्रीय एकात्मता यावर बाळासाहेब देवरस यांची एक विस्तृत मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली होती.  

शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन चरम सीमेवर असताना त्याच विषयावर जोशी यांची मुलाखत प्रसारित झाली. 

नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची विस्तृत मुलाखत त्यांना अगदी अटक झालेली असतानाही ध्वनिमुद्रित करण्यात आली व नंतर प्रसारित करण्यात आली. 

मुद्दा असा, की तिन्ही उदाहरणांतील नेत्यांचे त्यांचे म्हणून काही विचार आहेत. त्यांचीही बाजू आहे. तिला तुमच्या प्रसारणात स्थान हवे. या तिन्ही मुलाखती आकाशवाणीवरून प्रसारित केल्याबद्दल कोणत्याही वरिष्ठांनी आम्हांला जाब विचारला नव्हता. उलट, ‘चांगला दृष्टिकोण ठेवताय,’ म्हणून अभिनंदनच केले होते. या उलट अस्तनीतले निखारे आसपासच असतात. मेधा पाटकरांच्या मुलाखतीबद्दल दुसऱ्याच एका केंद्राच्या सल्लागार सभेत म्हणे, आमचा ‘निषेध’ झाला होता आणि तेथील कार्यक्रम प्रमुखांनी तो आम्हांला उत्साहाने कळवला होता. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त गो. रा. खैरनार यांच्या अतिक्रमणविरोधी धाडसी भूमिकेतबाबत एक समतोल मुलाखत प्रसारित केली, याचा जाब त्या वेळेच्या निदेशकांनी दोन महिन्यांच्या सुट्टीवरून परत आल्यावर मला विचारला होता. विरोधी मताचे स्वागत करणारे स्वातंत्र्यप्रेमी आणि विरोधी स्वर दाबून इच्छिणारे झारीतील शुक्राचार्य असे आतमध्येच कुंपणावर बसून शेत चरत असतात. तेव्हा स्वायत्ततेबद्दल आपणच किती प्रामाणिक आहोत, याचा विचार माध्यमकर्मींनी आधीच करायला हवा. स्वायत्तता नाही म्हणून ऊर बडवण्यात काही अर्थ नाही.

जशी काही व्यक्तींची उदाहरणं दिली तशी काही उपक्रमांचीही चर्चा इथे उचित ठरेल. पूर्वी केवळ पंधरा मिनिटे ‘संसद समीक्षा’ हा कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीतून देशभर प्रसारित होत असे. आता संसदेतल्या कामाचं – प्रश्नोत्तरांचं प्रत्यक्ष प्रसारण किंवा संपादित भागाचं प्रसारण निवडक आकाशवाणी केंद्रांवरून रात्री तासभर होतं. विरोधी आवाजाला सुयोग्य जागा देण्याचा हा भाग आहे. राष्ट्रपती – पंतप्रधानांच्या खालोखाल विरोधी पक्षनेत्यांच्याही बातम्यांना प्राधान्याने स्थान असतं. अर्थात या ठिकाणी काही वेळा गोंधळ, ओरडाआरडा होत असतो. त्याला माध्यम जबाबदार नसते.

अधिकृत राजकीय पक्षांसाठी निवडणूक प्रसारणाची योजनादेखील एका सुदृढ लोकशाही संकेताचा निदर्शक आहे. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगातर्फे जाहीर झाल्यावर पुरेसा कालावधी ठेवून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना आपली भूमिका मतदारांपुढे मांडण्यासाठी वेळ दिला जातो. योगायोग म्हणजे ही पद्धत १९७७ मध्ये सुरू झाली हे विशेष. आणीबाणीनंतर सरकारलाही लगेच उपरती झाली होती की काय! बरखास्त विधानसभा – लोकसभेतील पक्षीय बलाबलानुसार प्रसारणाचा अवधी ठरून लॉटनुसार वेळ ठरवली जाते. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यात प्रचार – प्रसाराची व्यापक प्रमाणावर संधी मिळते. विरोधी आवाजालाही लोकशाहीत प्रतिष्ठा असते, याचे हे उदाहरण आहे. दहावी-बारावीनंतरचे शैक्षणिक प्रवेश, महापालिका, वीज पुरवठा, पाणीपुरवठा, गॅस वितरण, रेल्वेआरक्षण, आरटीओमधील परवाना वितरण इत्यादींबाबत जनता आणि सरकारी अधिकारी यांना आमने-सामने आणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न आकाशवाणी केंद्राने सातत्याने केला आहे. विशेष म्हणजे अशा संवादसभेचे नियोजन टायर टू सिटीतूनही केले गेले. 

केवळ शहर आणि स्टुडिओ एवढ्याच सुरक्षित परिघात न राहता ‘गरजू’ भागाला अशा आयोजनांचा लाभ मिळवून दिला गेला. ‘जनमंच,’ ‘लोकमंच,’ ‘झोत,’ ‘आकाशवाणी गावागावांत’ अशा आकर्षक बॅनर्सखाली शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले.

हुंडा, गर्भजल चिकित्सा – स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, घटस्फोट, मानसिक आरोग्य, पोलीस-नागरिक संबंध, नवीन तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रश्न, घटस्फोटांशी निगडित मुद्दे, वेश्यांच्या जगण्यातले प्रश्न, लसीकरण – लसींची उपलब्धता इत्यादी विषयांवरही आकाशवाणीने जनतेचे प्रश्न चव्हाट्यावर आणून त्यांना वाचा फोडली आहे.

अगदी काही अपवाद सोडले तर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनीदेखील या कार्यक्रमांतून संवेदनशीलपणे उत्तरे दिली आहेत, पाठपुराव्याला प्रतिसाद दिला आहे. कोकणात, मराठवाड्याच्या मागासलेल्या भागात ‘एक सकारात्मक संवाद’ या प्रयत्नातून निर्माण तर झालाच पण आकाशवाणीबद्दल ‘केवळ सरकारची बाजू’ हा ठप्पा जाऊन ‘समतोल प्रतिनिधित्वाची’ ‘समतोल मध्यस्थीची’ प्रतिमा उभी राहिली. ही सर्वच अनुभवप्रक्रिया फार उमदेपणाची विधायक माध्यम भूमिकेची होती. त्यामुळे तिचे मनःपूर्वक स्वागत झाले.“अरे वा! असेही कार्यक्रम तुम्ही करू शकता?” अशा प्रतिक्रियांमुळे आम्हांला जॉबसॅटिस्फॅक्शनचा बोनस आनंद मिळाला. असा आनंद मिळविण्याची इच्छा मात्र हवी! इच्छा तिथे मार्ग निघतो, बंधने सैल होतात, मर्यादा मलूल पडतात. आशय हाच राजा (‘कंटेंट इज द किंग’) या माध्यम-सत्याचा अनुभव येतो. माध्यमातील नव्या कर्त्या तरुण पिढीने हा स्वायत्ततेचा आनंद भरभरून घ्यावा. पगारासोबतचे हे ‘समाधान’ पॅकेज अतुलनीय असते…कायम सोबत राहणारे! माध्यमाला एका अर्थपूर्ण अस्तित्वाचा दर्जा बहाल करणारे असते.

* * * * *

जनता पक्षाच्या मृणाल गोरे, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ.एस. जी.सरदेसाई आकाशवाणी वरुन आपली भूमिका मांडताना

नई दुनिया, भास्कर सारख्या राष्ट्रीय दैनिकांनी आकाशवाणीच्या प्रयत्नांची दखल घेतली. माध्यम स्वातंत्र्याचे स्वागत केले.

Author

Leave a Reply