जपानवारी (पूर्वार्ध)

 आम्ही चौघेजण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शारदशोभा (Autumn Colours🍁) बघायला आणि हिमवर्षा अनुभवायला म्हणून जपानला गेलो. चौघे म्हणजे मी, माझी ‘ही,’ माझा मित्र संकेत आणि त्याची ‘ही’. माझी ताई (चुलत बहीण) कामानिमित्त गेली ३ वर्षे टोकियोमध्ये असते. तिच्याकडे जाणे, आमच्या भाचराला (वय वर्ष ६) भेटणे असाही या वारीचा भाग होता. 

   नियोजनाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली होती. म्हणजे विमानाचं तिकीट काढून झालं. मग जपानबद्दल यू ट्यूबवर व्हिडिओ बघणे, कुठे काय बघायचं, काय खायचं, बुलेट ट्रेन, मेट्रो, वेगवेगळे ट्रेनचे पास, त्याची माहिती, खर्चाचा अंदाज काढणे, राहायला हॉटेल्स शोधणे, फिरण्याची ठिकाणं, तिथे जाणं-येणं, हे सगळं ठरवणं, असा सगळा भरगच्च कार्यक्रम मे ते नोव्हेंबरमध्ये कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सुरू होता. कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीसोबत फिरायला जात नसल्यामुळे हा सगळा अभ्यास करावा लागतो. पण हे सगळं करण्यात मजाही येते. कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यासाठी एकत्र जमणे, नियोजनासाठी चर्चासत्र भरवणे, पण त्यात नियोजन सोडून भलत्याच गप्पा मारत बसणे असे सगळे उद्योगही झाले. त्यात आमच्या दोघांच्या ‘हीं’चे पासपोर्ट नूतनीकरण करायला लागणार हे लक्षात आलं आणि ते करून झालं. दोघींचे नवीन ‘इ पासपोर्ट’ आले. 

आम्ही चौघे जपानला जायच्या एक-सव्वा महिना आधी – म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या साधारण १० दिवस आधी व्हिसासाठी अर्ज करायला मुंबईला जपानच्या दूतावासात (Consulate) गेलो. रांगेत लवकर नंबर लागावा यासाठी सकाळी ८ च्या सुमारास पोचलो होतो. दूतावासाचे  कामकाज सकाळी ९ वाजता सुरू होते. ८ वाजता पोचण्यासाठी  घरून साधारण ६ – ६.१५ ला निघालो. रांगेत ५ वा नंबर लागल्यामुळे लवकर निघाल्याचं सार्थक झालं. मात्र वक्तशीर म्हणून प्रसिद्ध असलेले जपानी इथे चक्क ५-१० मिनिटे उशिराने धावत होते. मुंबईच्या लोकलचा (अव )गुण (?) लागला असावा बहुदा  त्यांना! मग दूतावासात सगळी कागदपत्रं आणि पासपोर्ट जमा केले आणि त्यांनी १० दिवसांनी पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन जा असे सांगितले.

   दरम्यान तिकडे जाण्यापूर्वीची खरेदी हळूहळू सुरू होतीच. आता फक्त प्रश्न होता सगळं सामान विमान कंपनीने दिलेल्या वजनाच्या मर्यादेत ‘बसवण्याचा!’ माणशी २५ किलोची एक मोठी बॅग आणि ७ किलोची एक छोटी बॅग एवढच सामान नेता येणार होतं. आता हे सगळं वजन काटेकोरपणे मोजायचं म्हणून अर्थातच सगळ्यात आवश्यक अशी आणखी एक खरेदी झाली ती म्हणजे छोट्या ‘इ’ वजनकाट्याची. एकूणच विमान कंपन्या फक्त सामानाच्या बॅगांच्या वजनावर निर्बंध घालतात म्हणून ठीक आहे… नाहीतर काही खरं नाही! 

   जायच्या तयारीचा भाग म्हणून जे अनेक यू ट्यूब व्हिडिओ बघितले होते आणि ताईनेही सांगितले होते त्यात एक गोष्ट जाणवली होती, ती म्हणजे शाकाहारी जेवणाचे  असणारे  मर्यादित पर्याय. ताईकडे राहायचं असल्यामुळे त्या बाबतीत टोकियोमध्ये तसा काही प्रश्न नव्हता; पण बाकी ठिकाणी तो पर्याय नव्हता. त्यामुळे जाताना सोबत काही गोष्टी घेऊन जाणं भाग होतं. ताईने तिकडे चांगल्या मिळत नसलेल्या गोष्टींची यादी दिली होती, ज्यात गव्हाचे पीठ, हिंग, पोहे अशा गोष्टी होत्या. तर अशा या सगळ्या ‘खाण’सामानाने दोन छोट्या बॅगा भरल्या. सप्पोरो, होक्कायदो या ठिकाणी उणे तापमान अपेक्षित असल्यामुळे उष्ण कपडे, स्वेटर अशा कपड्यांनी बॅगेत बऱ्यापैकी जागा व्यापली.

   जपान तसा पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. वर्षभरात जपानमध्ये साधारण ३ ते ४ कोटी विदेशी पर्यटक भेट देतात. ही संख्या जपानच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २५ टक्क्यांच्या आसपास आहे. भारतात हे  प्रमाण अगदीच नगण्य आहे. जपानमध्ये प्रामुख्याने वर्षाच्या दोन वेळा पर्यटनासाठी फारच प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे वसंत ऋतू (Spring) आणि दुसरा शरद ऋतू (Autumn). जपानमध्ये वसंत ऋतूचा काळ हा साकुरा म्हणजेच चेरी ब्लॉसमचा; तर शरद ऋतूचा काळ हा लाल, पिवळ्या, हिरव्या पानांचा, पानगळीचा आणि बर्फवृष्टीचा! गदिमांच्या शब्दांत सांगायचं, म्हणजे ‘शारद शोभेचा.’ आमच्या वारीसाठी आम्ही निवडला तो शरद ऋतू. कारण वसंत ऋतू म्हणजे मार्च – एप्रिलचा महिना – तेव्हा  आमच्या कामाच्या स्वरूपामुळे कुठेही फिरायला जाणे शक्य होत नाही आणि साकुरापेक्षा शरद ऋतूमध्ये तुलनेत थोडी गर्दीपण कमी असते. 

  आम्ही १७ नोव्हेंबरला जपानमध्ये दाखल झालो. टोकियोच्या नारिटा विमानतळावर उतरलो तेव्हा संध्याकाळचे साधारण ५ वाजत आले होते. विमान उतरत असताना दिवस मावळून संधिप्रकाश पडला होता. उगवत्या सूर्याच्या देशातील भूमीचं प्रथम दर्शन हे असं आम्हांला अगदी मावळतीला झालं. 

   जपानमध्ये जन्मदर कमी आहे, वृद्धांची संख्या जास्त आहे, ६५ वर्षांवरील काम करणाऱ्या वृद्धांची संख्या लक्षणीय आहे असं ऐकून होतो; पण त्याचा अनुभव विमानतळावर उतरल्या-उतरल्याच येऊ लागला. सामान परत मिळवण्याच्या जागेत (Baggage Claim) असलेला कर्मचारी वर्ग, इमिग्रेशनच्या रांगेत सूचना देणारा कर्मचारी वर्ग यांत वृद्धांचे प्रमाण जाणवण्याइतपत जास्त होतं. 

आता आम्ही जाण्यापूर्वीच इमिग्रेशनसाठी लागणारे माहिती आणि अर्ज ऑनलाईन भरून ठेवले होते. असे केल्याने जपानच्या विमानतळावर या सगळ्या सोपस्कारांना लागणारा वेळ वाचतो. याच्या रांगा वेगळ्या असतात. तिथे तुम्हांला मिळालेला क्यू आर कोड आणि पासपोर्ट स्वयंचलित यंत्रात स्कॅन करावा लागतो. ते यंत्र भरलेली माहिती आणि पासपोर्ट, व्हिसा तपासून तुमच्या माहितीची खातरजमा करतं आणि तुम्हांला पुढे सोडतं. तर इथे माझा आणि संकेतचा पासपोर्ट स्कॅनच होई ना. पण आमच्या दोघांच्या ‘हीं’चा मात्र झाला. त्या यंत्राशी धडपडताना तिथल्या एका कर्मचारी आजोबांनी मला बघितलं आणि ते जवळ आले. त्यांनी पासपोर्ट बघितला आणि मला जपानी भाषेत काहीतरी सांगितलं. अर्थातच ते डोक्यावरून गेलं. शेवटी त्यांनी खुणेनेच एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि दुसऱ्या प्रवाशाला मदत करायला गेले. तेवढ्यात हिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि “काय एवढं साधं जमे ना तुला!” असा कटाक्ष टाकून “दे पासपोर्ट इकडे, मी बघते,” म्हणाली. सगळं परत करून तो पासपोर्ट स्कॅन करणार एवढ्यात आजोबा परत आले. त्यांचं न ऐकता सांगितलेल्या जागी उभा राहिलो नाही म्हणून ते चिडलेच. आता आजोबांना काय सांगणार? मग आजोबा एका काउंटरवर घेऊन गेले जिथे माणूस होता आणि त्याने स्वतः तो पासपोर्ट स्कॅन केला. याला तोडकं मोडकं इंग्रजी येत असल्याने त्याने जे सांगितलं त्यावरून उलगडा झाला. तो म्हणाला त्या मशीन मध्ये फक्त ‘इ’ पासपोर्ट स्कॅन होतात. तुमचा पासपोर्ट साधा आहे. म्हणून स्कॅन झाला नाही. असे हे सोपस्कार आटपून साधारण तासाभरातच आमचं सामान घेणं, इमिग्रेशन असं सगळं झालं आणि जपानमध्ये आमचा प्रवेश झाला. 

   ताई विमानतळावर न्यायला आली होती. नारीतापासून ताईच्या घरी जायला साधारण २ तास लागतात. या प्रवासात एकदा बस आणि एक दोनदा मेट्रो बदलून जावी लागते. पुढच्या ३ आठवड्यांत जे आम्ही अनेक वेळा आणि तेही वेगवेगळ्या शहरांत (गुगल मॅप्सच्या साहाय्याने) जे अगदी लीलया केलं त्याची तोंडओळख या प्रवासात आम्हांला झाली होती. टोकियो आणि पर्यायाने जपानचं ‘फर्स्ट इम्प्रेशन’ फारच चांगलं होतं. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, शिस्त, सौजन्य अशा गोष्टी इथे खरंच अस्तित्वात आहेत. तसं म्हणायला या सगळ्या गोष्टी भारताबाहेर बहुतेक सगळ्याच ठिकाणी अनुभवायला मिळतात; पण जपानी लोक यात एक पाऊल पुढेच असावेत असं वाटायला लावणारी परिस्थिती होती. मुंबईकरालासुद्धा ‘किती गर्दी आहे!’ असं वाटायला लावणारी गर्दी होती; पण कुठेही गोंगाट, गोंधळ नव्हता. स्थानकात गाडी आली, की उतरणाऱ्यांना उतरायची संधी न देता गाडीत घुसण्याचा प्रकार नव्हता. सगळे शिस्तीत रांगा लावून डब्यात चढत होते. गाडीचे पायदान आणि फलाटाच्या उंचीत फरक नव्हता, अपंगाना चाकाच्या खुर्चीसकट सगळीकडे ये-जा करता येत होती आणि जिथे फरक होता, तिथे स्थानकातले कर्मचारी एक उघडझाप होणारी धातूची फळी घेऊन उभे होते. ती फळी फलाट आणि गाडीच्या अंतरामध्ये चपखल बसून त्यावरून चाकाच्या खुर्च्या ने आण करता येत होत्या. तर मुंबईपासून एकूण १५ एक तासांचा प्रवास  करून आम्ही ताईच्या घरी पोचलो. घरात गेल्या गेल्या भाचरू उडी मारून मामाच्या कडेवर बसलं, मग मामीच्या गळ्यात पडलं आणि प्रवासाचा सगळा शीण निघून गेला. सतीशने (ताईचा नवरा) मस्त गरमागरम कढी खिचडी केली होती. त्यावर ताव मारला. दुसऱ्या दिवशी टोकियोमध्येच फिरायचं असा बेत होता त्यावर चर्चासत्र झडलं आणि मग सगळे निवांत झोपलो. 

दुसऱ्या दिवसापासून ताईच्या सेतागया भागामधल्या घरापासून बसने फुताको-तामागावा मेट्रो स्टेशन आणि तिथून पुढे वेगवेगळ्या मेट्रो लाइन्सने टोकियो दर्शन असा आमचा टोकियो दर्शनाचा उपक्रम सुरू झाला. १८ ते २३ नोव्हेंबर टोकियो आणि आजूबाजूचा भाग, मग २४ ते २९ नोव्हेंबर ओसाका, क्योतो, नारा, मियाजिमा, हिरोशिमा, ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर परत टोकियो, ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर सप्पोरो, होक्कायदो, ७ आणि ८ ला पुन्हा टोकियो आणि ९ डिसेंबरला परतीचा प्रवास असा आमचा ढोबळ कार्यक्रम होता. 

टोकियोमध्ये आम्ही शिबुया, शिंजुकू, हाराजुकू, असाकुसा, गिन्झा, मारूनोची, टोकियो मिडटाऊन, ओशियागे, कप्पाबशी स्ट्रीट, गिंको अवेन्यू, सायतामा, रोपोंगी असे विविध भाग या तीन आठवड्यांत फिरलो. याव्यतिरिक्त हाकोने, नरुसावा आईस केव्ह, लेक कावागुचिको, इनोशिमा, कामाकुरा अशा टोकियोहून दिवस सहली (Day Trips) केल्या. ओसाका, हिरोशिमा, क्योतो, नारा, मियाजिमा, हीमेजी ही शहरं ओसाकामध्ये मुक्काम करून फिरलो. तसेच सप्पोरो, नोबोरीबेट्सू, फुरानो, होक्कायदो हा भाग सप्पोरो येथे राहून फिरलो. या सगळ्या प्रवासात अनेक वेळा ‘शिंकान्सेन’ म्हणजे बुलेट ट्रेन, तसेच वेगवेगळ्या एक्सप्रेस गाड्या आणि स्थानिक मेट्रो, सब वे, बस, ट्राम, टॅक्सी, विमान अशा विविध साधनांनी प्रवास झाला. 

एकट्या टोकियो आणि आजूबाजूच्या परिसरात मिळूनच जवळपास वेगवेगळ्या अशा २५-३० मेट्रो आणि सब-वे लाईन्स आहेत. ओसाका आणि सप्पोरोलाही अशाच वेगवेगळ्या १०-१५ लाईन्स आहेत. त्यांतल्या बहुतांशी लाइन्सने आम्ही फिरलो. सगळीकडेच कमालीची स्वच्छता आणि त्यासाठी कुठलंही अभियान चालवलं जात नाही आणि आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्यांचं प्रमाण फारच कमी असूनही कुठेही कचरा नाही. ‘आपला कचरा आपली जबाबदारी’ या न्यायाने जो तो आपला कचरा घरी घेऊन जातो आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावतो आणि हे सगळं स्वयंप्रेरणेने होतं. सार्वजनिक शिस्त आणि नागरी भान, हा देश माझा आहे आणि माझ्या घराइतकाच तो स्वच्छ ठेवणं ही व्यक्ती म्हणून माझी वैयक्तिक आणि समाजाचा भाग म्हणून सामाजिक जबाबदारी आहे ही भावना कायम मनात असणं हेच यामागचं मोठं कारण आहे. आपण नेमके याच बाबतीत एक समाज म्हणून कमी पडतो असं मला वाटतं. हा देश माझा आहे पण तो स्वच्छ ठेवायची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची आणि पर्यायाने सरकारची आहे आणि मी वाटेल तसं वागलं तरी काही फरक पडत नाही ही आपली वृत्ती आपण सुजाण नागरिक आणि समाज नाही याचं द्योतक आहे. 

या सगळ्या प्रवासात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. सगळ्या ठिकाणी जवळपास सगळेच लोकं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले. अगदी रस्त्यावरून चालतानासुद्धा डोकं आणि लक्ष मोबाईलमध्ये. या संदर्भात ‘Don’t be smartphone zombies’ असे फलक आणि अशामुळे चालता चालता एकमेकांशी होणाऱ्या टक्कर टाळा अशा जाहिराती अनेक ठिकाणी लावलेल्या दिसल्या. आणि ही ‘मोबाईल समस्या’ जागतिक असल्याचं लक्षात आलं. 

छायाचित्र आंतरजालावरुन साभार

बाकी एकमेकांशी फारसा संवाद नाही. ट्रेन, बसमध्ये सगळं कसं शांत शांत! कोणी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतंय, गप्पा मारतंय असं चित्र फार विरळा. सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर बोलू नये असा सर्वमान्य संकेत आहे; पण इथे तो लोकांनी एकूणच बोलण्याच्या बाबतीत लागू केलेला दिसतो. त्यामुळे आम्ही चौघे एकमेकांशी गप्पा मारत असू, बोलत असू तेव्हा अनेक नजरा आमच्याकडे काही क्षण रोखून बघत असत. पण काहीही वाटलं तरी अशा सार्वजनिक ठिकाणी अजिबात व्यक्त न होणं हा जपानी माणसाचा स्वभाव आहे. तसंच एखादी गोष्ट पटली नाही तरी जे शिव्याशाप द्यायचे आहेत तेसुद्धा मनातल्या मनात. बाहेर सगळं शांत आणि हा शांततेचा अट्टहास अगदी अतिरेकी पातळीपर्यंत जाऊ शकतो असंही लक्षात आलं. सतीशने एकदा सांगितलं, की कुत्रे भुंकतात आणि त्याचा त्रास होतो म्हणून त्यांची स्वरयंत्रंच काढून टाकतात इथे काही लोक; पण हीच जपानी माणसं शनिवार आणि रविवारी एकदा इझाकायामध्ये (बार आणि रेस्टॉरंट) जाऊन थोडी तरंगू लागली, की रंगात येऊन गडगडाटी हसताना आणि अगदी रस्त्यात झिंगून पडतानाही दिसली. जपानी माणसांत चिंता, नैराश्य आणि भीती (Anxiety,  Depression & Phobias) यांचं प्रमाण जास्त आहे असं सतीश आणि ताईशी बोलता बोलता समजलं. मनमोकळेपणे न वागणे, गोष्टी मनात ठेवणे, संवादाचा अभाव ही यामागची काही कारणं असावीत असं मला वाटतं आणि शनिवार-रविवारी जे चित्र दिसलं तो त्यावरचा उतारा असावा असं वाटलं. 

आमच्या सगळ्या प्रवासात एक गमतीशीर गोष्ट आम्हांला जाणवली ती म्हणजे ‘रांग लावणे’ हा प्रत्येक जपानी माणसांचा छंद आहे. कुठेही जा – मग ते कॉफी शॉप असो, तिकीट खिडकी असो, गाडीत चढायला फलाटावर उभे असो, गाडीतून उतरून स्थानकातून बाहेर पडणं असो किंवा एखादे पर्यटनस्थळ असो, सगळीकडे सगळं रांगेत चाललेलं. आता हा सगळा सार्वजनिक शिस्तीचा भाग नक्कीच आहे आणि (योग्य तिथे) अनुकरणीयदेखील आहे; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. म्हणजे तुम्ही चुकून एखाद्या ठिकाणी उभे आहात तरी बाजूने जाणारे विचारतात, की तुम्ही कशासाठी रांग लावली आहे का? 

छायाचित्र आंतरजालावरुन साभार

एकदा आम्ही चौघे बस स्टॉपवर उभे होतो. रांग अर्थातच होती पण आम्हांला रांगेत उभं राहायचा कंटाळा आल्यामुळे रांगेच्या थोडंसं बाजूला एका झाडाच्या बाजूला गोलाकार रेलिंग होतं त्याला टेकून गप्पा मारत उभे राहिलो. काही वेळाने लक्षात आलं, की आम्ही आपोआप रांगेचा भाग झालोय कारण लोकांनी आमच्या मागे रांग लावली आहे आणि आता इंग्रजी U आकाराची रांग झाली आहे. आम्ही कपाळावर हात मारला. ताई म्हणाली, “हे अगदीच नॉर्मल आहे. रांग खूप मोठी होऊन जागा जास्त लागू नये म्हणून इथे अशीच U आकारात रांग लावायची पद्धत आहे.” म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार हे लोक करतात याच नवल वाटलं; पण याच सवयीचा अतिरेक म्हणून माणसाचं रूपांतर मेंढरात होतं याचाही प्रत्यय आम्हांला अनेक वेळा आला. मेट्रो / ट्रेनमधून उतरल्यावर सगळे एका रांगेत चालत सुटतात आणि पुढे बाहेर पडायला दोन जिने आहेत आणि एक रिकामा आहे; पण तिकडे न वळता रांगेत पुढच्या माणसाच्या मागे चालत राहतात. आमच्यासारखा एखादा पुढचा ‘उपरा’ माणूस जर त्या रिकाम्या जिन्याकडे वळला, की मग रांगपण वळते. म्हणजे त्यांची सार्वजनिक शिस्त वाखाणण्याजोगीच आहे; पण त्याबरोबर थोडंसं डोकंसुद्धा वापरलं तर शिस्तही पाळली जाईल आणि माणसाचं मेंढरात होणारं रूपांतरही थांबवता येईल असं आपल्याला वाटल्यावाचून राहत नाही. 

जपानमध्ये येणारा एक खूपच सुखद अनुभव म्हणजे सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये असलेली कमालीची स्वच्छता. आपल्या घरातल्या स्नानगृह आणि शौचालयालासुद्धा लाजवेल इतकी ती स्वच्छ आणि सुंदर असतात आणि दिवसातल्या कोणत्याही वेळी ती तशीच असतात. आपल्याकडे मुळात सार्वजनिक प्रसाधनगृहांची उपलब्धता हाच एक मोठा विषय आहे; तर त्यांची स्वच्छता आणि त्याबद्दलची उदासीनता हा मुद्दाच गौण होऊन बसतो. पण जपानमध्ये एकदा वर्तमानपत्रात याविषयी एक बातमी वाचली आणि खरंच आश्चर्य वाटलं. बातमी होती सार्वजनिक ठिकाणी  असलेल्या या प्रसाधनगृहांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी असलेल्या  उपलब्धतेच्या असमानतेबद्दल. एका सर्व्हेनुसार जपानमध्ये पुरुषांच्या प्रसाधनगृहांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत पाऊण पट जास्त आहे. यामुळे स्त्रियांच्या प्रसाधनगृहांबाहेर मोठ्या रांगा लागतात आणि एकूण वेळही बराच जातो आणि हा अनुभव आमच्या दोघांच्या ‘हीं’स देखील आला. आता या असमानतेबद्दल जपान सरकार चर्चा आणि उपाययोजनादेखील करत आहे. जपानी सरकारने का होई ना, पण आमच्या दोघांच्या ‘हीं’स झालेल्या अशा त्रासाची दखल एका देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेतली गेली म्हणून दोघी खूश झाल्या. 

बाकी जपानमध्ये शरद ऋतूचे निसर्गसौंदर्य, निळाशार समुद्र ते बर्फाचे नंदनवन अशा सगळ्या सृष्टिसौंदर्याने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आयुष्यातली पहिली बर्फवृष्टी आम्ही जगातल्या सर्वात सुंदर पावडर बर्फाच्या प्रदेशात अनुभवली. त्याबद्दल, जपानमध्ये केलेल्या खादाडीबद्दल, शिंकान्सेन प्रवासाबद्दल, माउंट फुजीने दिलेल्या हुलकावण्या आणि शेवटी दिलेल्या दर्शनाबद्दल, हिरोशिमाच्या म्युझियममधल्या सुन्न करणाऱ्या अनुभवाबद्दल पुढच्या भागात.

Author

Leave a Reply