ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते

 ‘तेलगू कविसम्राट’ 

विश्वनाथ सत्यनारायण 

   १९६५ साठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी.शंकर कुरूप यांच्यानंतर आज आपण थेट १९७०चे मानकरी विश्वनाथ सत्यनारायण यांचा परिचय करून घेणार आहोत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या लेखमालेत चौदा भाषांचे प्रतिनिधित्व असणार आहे. अर्थात एखाद्या भाषेच्या लेखकाबद्दल लिहिताना त्या भाषेतील इतर पुरस्कारप्राप्त लेखकांची थोडक्यात का होई ना, ओळख होईलच.

पोत्तु श्रीरामुलू यांच्या आमरण उपोषणामुळे अस्तित्वात आलेले आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक तत्त्वावरील राज्य. तसं पाहता आपला आग्नेयेकडचा शेजारी. तेलगू भाषकांची संख्या जवळपास मराठी माणसांइतकीच; तरीही तेलगू समाज, भाषा, साहित्य आणि साहित्यिक यांबद्दल आपणांस फार थोडी माहिती असते. आजच्या घडीला प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि आर्थिक प्रगतीचा वेग या निकषांवर तेलंगण( आंध्र प्रदेशचे २०१४ मध्ये विभाजन होऊन अस्तित्वात आलेले) राज्य प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या काही दशकांमध्ये तेलगू भाषकांनी दोन क्षेत्रांत मोठी मुसंडी मारली आहे. Software/IT मध्ये ते मोठ्या संख्येने आहेत. अमेरिकेत मराठी लोकांच्या तुलनेत तेलगू भाषक ३-४ पटीने किंवा त्यांहून अधिकच असतील. चित्रपट व्यवसायात तर आज तेलगू सिनेमा बॉलिवूडला संख्या, गुण आणि गल्ला या सर्वच बाबतींत टक्कर देत आहे.

तेलगू भाषा सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक आहे. द्रविडी भाषाकुलातली ती सर्वांत जास्त संख्येने बोलली जाणारी भाषा. कानडी आणि तेलगू भाषांची लिपी एकसारखी असली तरी एरवी त्या बऱ्याच भिन्न आहेत. बरेचसे शब्द उकारान्त असल्यामुळे ती अतिशय गोड आहे. पंधराव्या शतकातील प्रवासी निकोली डी कोन्ती याने तिला ‘पूर्वेकडील इटालिअन’ म्हटले होते. तेलगू साहित्याला २५०० वर्षांहून जुना इतिहास आहे. तामिळ आणि संस्कृत पाठोपाठ २००८ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळाला. तिच्या शब्दसंग्रहावर संस्कृतचादेखील मोठा प्रभाव आहे.

तेलगू साहित्याचे ४ प्रमुख टप्पे आहेत. इ.स. १००० आधीच्या पूर्व नन्नय्या काळात ते केवळ शिलालेख आणि मौखिक परंपरेतील काव्यं आणि लोकगीतांच्या स्वरूपातील होते. इ.स. १००० ते १४०० हा ‘पुराणकाळ’ किंवा ‘अनुवाद काळ.’ नन्नय्या, तिक्कंना आणि एर्रा प्रागडा या ‘कवित्रयम’नी मिळून महाभारत तेलगूमध्ये आणले. विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांचा इ.स. १५०० ते १६०० दरम्यानचा काळ म्हणजे ‘प्रबंध काळ.’ हे तेलगू साहित्याचे सुवर्णयुग समजले जाते. कृष्णदेवराय हे स्वतः एक थोर साहित्यिक होते. त्यांनी प्रबंध नावाचा नवीन काव्यप्रकार लोकप्रिय केला. त्यांच्या दरबारात अष्टदिग्गज( आठ महान कवी) होते. इ.स. १८५० पासूनचा काळ हा आधुनिक काळ मानला जातो. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रभावामुळे तेलगू साहित्यात मोठे बदल झाले. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि मुक्तच्छंद यांसारखे साहित्यप्रकार रूढ झाले.

१४ व्या ते १९ व्या शतकातील प्रमुख तेलगू साहित्यिक 

कवी श्रीनाथ यांनी ‘शृंगार नैषधम’ आणि ‘काशी खंडमु’सारखे उत्कृष्ट ग्रंथ लिहिले. त्यांना ‘कवी सार्वभौम’ म्हटले जाई. अल्लासानी पेदन्ना हे कृष्णदेवराय यांच्या दरबारातले प्रमुख कवी होते. त्यांनी लिहिलेले ‘मनुचरित्रमु’ हे महाकाव्य प्रबंध साहित्याचा मानदंड समजले जाते. कवी वेमना हे जनसामान्यांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांनी साध्या भाषेतून समाज प्रबोधन केले. कंदुकुरी वीरेशलिंगम यांना आधुनिक तेलगू साहित्याचे जनक म्हटले जाते. त्यांनी पहिली तेलगू कादंबरी ‘राजशेखर चरित्रमु’ लिहिली. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून विधवा विवाह आणि स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार केला. गुरजाडा अप्पाराव यांच्या ‘कन्याशुल्कम’ नाटकाने तेलगू साहित्यात क्रांती घडवून आणली. त्यांनी बोलीभाषेचा साहित्यात प्रभावी उपयोग केला.

आधुनिक तेलगू साहित्य 

विसाव्या शतकातील काही प्रमुख साहित्यिकांचा थोडक्यात परिचय करून घेऊ या. 

श्रीरंगम श्रीनिवास राव(श्रीश्री) यांनी तेलगू साहित्यात ‘अभ्युदय’(पुरोगामी) चळवळीची सुरुवात केली. त्यांचा ‘महाप्रस्थानम’ हा काव्यसंग्रह एक प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. छंदोबद्ध कवितेच्या चौकटी मोडत त्यांनी साध्या, कष्टकरी माणसाच्या व्यथांना आवाज दिला.

सी. नारायण रेड्डी(सिनारे) यांना १९८८ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांचे ‘विश्वंभरा’ हे महाकाव्य मानवाच्या उत्क्रांतीचा वेध घेते. ते केवळ उत्तम कवीच नाही; तर गीतकार आणि वक्ते होते. तेलगू चित्रपटांसाठी त्यांनी हजारो गीते लिहिली आहेत. (काहीसे आपल्या गदिमांसारखे?)

गुडीपाटी वेंकटचलम हे सर्वात वादग्रस्त आणि बेधडक साहित्यिक म्हणून ओळखले जात. ‘मैदानम’ ही त्यांची कादंबरी खूप गाजली. त्यांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य, लैंगिकता आणि सामाजिक हक्कांवर परखडपणे लिहिले.

रावूरी भारद्वाज हे तेलगू भाषेचे तिसरे ज्ञानपीठ विजेते लेखक. त्यांना हा पुरस्कार २०१२ साठी प्राप्त झाला. ‘पाकुडू राल्ळू’(घसरते दगड) ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी  चित्रपट सृष्टीच्या झगमगाटामागील वास्तव समोर आणते. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर येऊन त्यांनी ५००हून अधिक कथा आणि अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

तेलगू साहित्यातील काही खास प्रकार 

आधी उल्लेख झालेल्या ‘प्रबंध’ या साहित्य प्रकाराखेरीज आणखी दोन विशेष साहित्य प्रकार तेलगू भाषेत आहेत. त्यांतील एक म्हणजे ‘शतक साहित्य.’ शंभर ओळींच्या काव्याला ‘शतक’ म्हणतात. (उदा. सुमती शतक, वेमना शतक.) सर्वसामान्य माणसाला नीतिबोध देण्यासाठी हे लोकप्रिय आहे. ‘अवधानम’ हा आणखी एक साहित्यप्रकार. त्यात कवीला एकाच वेळी अनेक प्रश्नांची काव्यात उत्तरे द्यावी लागतात. हा अत्यंत कठीण प्रकार तेलगू साहित्याच्या अद्वितीय परंपरेचा भाग आहे.

विश्वनाथ सत्यनारायण 

विसाव्या शतकातले तेलगू साहित्यातील ‘सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे विश्वनाथ सत्यनारायण केवळ लेखकच नाही, तर भारतीय संस्कृती आणि साहित्याचे भाष्यकार होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८९५ रोजी तत्कालीन मद्रास राज्यातील कृष्णा जिल्ह्यामधील नंद्मरू या गावात झाला. त्यांचे वडील शोभानाद्री हे कलेचे भोक्ते होते, साहजिकच नकळत सत्यनारायण यांच्यामध्ये ते बी रुजले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावीच अनौपचारिक पद्धतीच्या शाळेत झाले. त्या काळच्या ग्रामीण सांस्कृतिक वातावरणाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. पारंपरिक लोककलांचे त्यांना आकर्षण वाटे व ते त्यांमध्ये रस घेत. गावातील लोकांचा जातपात वा इतर सामाजिक घटकांचे अवडंबर न माजविता असलेला  बंधुभाव, ग्रामीण जीवनातील सौंदर्य यांनी त्यांची विचारसरणी घडविली. जवळच्या बांदर येथील प्रख्यात नोबेल कॉलेजमध्ये ते पुढील काही वर्षे शिकले. संस्कृत विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. प्रख्यात तेलगू लेखक चेल्लापिल्ला वेंकटशास्त्री यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. आधी शिक्षक, त्यानंतर प्राध्यापक आणि अखेर करीमनगर शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य अशी त्यांची कारकिर्द राहिली.

सत्यनारायण यांनी लेखनास वयाच्या चौदाव्या वर्षीच सुरुवात केली. त्यानंतर पन्नासहून अधिक वर्षे त्यांची लेखणी अव्याहत सक्रिय राहिली. त्यांचे लेखन चौफेर होते. त्यांनी कविता, कादंबऱ्या, नाटके, निबंध, समीक्षा असे विविधांगी लेखन केले.  ते परंपरेचे पुरस्कर्ते असूनही त्यांच्या लेखनात आधुनिक मानवी जीवनाची गुंतागुंत दिसून येते. ते भारतीय सनातनी मूल्यांचे खंदे समर्थक होते. पाश्चात्त्य संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृतीतील तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे साधन असावे हा त्यांचा विचार होता. त्यांची ग्रंथसंपदा विपुल होती. ३० काव्यसंग्रह, ६० कादंबऱ्या, २० नाटके यांसह विविधांगी लेख, नभोनाट्ये व काही संस्कृत पुस्तकेदेखील त्यांच्या नावावर आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, ज्ञानमीमांसा अशा विविध विषयांवर त्यांनी लिहिले.‘श्रीमद रामायण कल्पवृक्षमु’ ही त्यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती समजली जाते. या महाकाव्यासाठीच त्यांना १९७० चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हे केवळ वाल्मीकि रामायणाचे भाषांतर नसून त्यांनी स्वतःच्या प्रतिभेने रचलेले एक महाकाव्य आहे. ते सहा खंडांमध्ये विभागलेले आहे. त्यात त्यांनी रामायणातील पात्रांचे मानसशास्त्रीय विश्लेषण आणि मानवी भावनांचे सूक्ष्म चित्रण केले आहे. अत्यंत कठीण अशा ‘छंदोरचनेचा’ वापर त्यांनी केला असून तेलगू भाषेचे सौंदर्य त्यात परमोच्च पातळीवर दिसते. आधुनिक काळातही अभिजात शैलीत महाकाव्य कसे लिहिता येते याचा हा आदर्श नमुना आहे. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे १९६७ मध्ये कानडी लेखक कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा(कुवेंपु) यांना त्यांच्या ‘श्री रामायण दर्शनम’ या महाकाव्यासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एका महान कलाकृतीमधून किती जणांना सर्जक लिखाण करण्यास स्फूर्ती मिळते याचे हे एक उत्तम उदाहरण.

वेयि पडागालू ही सत्यनारायण यांची एक अतिशय गाजलेली कादंबरी. ही कादंबरी ‘सुबन्नापेट’ या काल्पनिक गावाच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेतील स्थित्यंतराचा वेध घेते. धर्माचे रक्षण करणारा ‘शेषनाग’ हे त्यातील मध्यवर्ती पात्र आहे. ब्रिटिश राजवटीचा प्रभाव, मोडकळीस आलेली जमीनदारी व्यवस्था आणि भारतीय मूल्यांचा  ऱ्हास यांचे चित्रण तिच्यात केले आहे. ही केवळ एक कथाच नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा कोश आहे. यातील ३० प्रमुख पात्रे मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. पी.व्ही. नरसिंह राव यांनी ‘सहस्रफण’ नावाने तिचे हिंदीत भाषांतर केले होते.

‘एकवीरा’ ही त्यांची गाजलेली ऐतिहासिक आणि प्रेमप्रधान कादंबरी आहे. मदुराईच्या नायक राजांच्या काळातली ही कथा आहे. यात दोन मित्रांच्या आणि त्यांच्या प्रेमाच्या संघर्षाची करुण कहाणी आहे. ही कादंबरी  तरल भावना आणि उत्कट वर्णनांसाठी ओळखली जाते. मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि कर्तव्याची जाणीव यांचे सुंदर चित्रण तिच्यात आहे. या कादंबरीवर आधारित तेलगू चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

सत्यनारायण यांची एक कल्पनारम्य सुंदर कविता ‘किन्नेरसानी पातलू’ ही आहे. ती मुक्तच्छंदात आहे. किन्नेरसानी या गोदावरीला जाऊन मिळणाऱ्या नदीला एक सुंदर स्त्री कल्पून तिच्याभोवती एक कहाणी या कवितेमध्ये गुंफली आहे.

विश्वनाथ सत्यनारायण यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. १९६२ मध्ये ‘विश्वनाथ मध्यक्कारलू’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९७० मधील ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पुढच्याच वर्षी ते ‘पद्मभूषण’ने सन्मानित झाले. याशिवाय राज्य शासन आणि काही संस्थांकडूनही त्यांना गौरविण्यात आले. तेलगू साहित्य रसिकांनी तर त्यांना ‘कविसम्राट’, ‘कलाप्रपूर्ण’ अशा उपाधींनी गौरविले.

एकीकडे सत्यनारायण यांना अमाप लोकप्रियता लाभली असली तरी त्यांचे टीकाकारदेखील होते. त्यांच्या प्रास, यती, छंदोबद्ध काव्यावर मुक्तच्छंदात लिहिणारे कवी टीका करत. मात्र त्यांच्या साहित्याचा एकत्रित विचार केला तर त्यांनी अतिशय भरीव काम केले आहे हे नाकारता येत नाही.

ऑक्टोबर ७६ मध्ये, वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. मृत्युपश्चात विजयवाडा शहरातील लेनिन सेंटरमध्ये त्यांचा तेजस्वी पूर्णाकृती पुतळा साकारला आहे. 

भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ एप्रिल २०१७ मध्ये एक विशेष टपाल तिकीट जारी केले. त्यांचे साहित्य आजच्या पिढीलादेखील प्रेरणा देत आहे.

Author

Leave a Reply