झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१४        

——————————————————————————————–

श्री. जॉर्ज मैथ्यू फर्नांडीस  (३जून १९३० – २९ जानेवारी २०१९ ) कोकणकिनारी मंगलोर येथे जन्म झालेले समाजवादी नेते. मंगलोर येथील वाहतूकक्षेत्रात कामगार नेते होते, तेव्हापासून, ‘मुंबईला रेल्वेने कसे जाता येईल?’ हाच विचार त्यांच्या मनात घोळत असे.  रेल्वेमंत्री असताना त्यांची नजर ३० जून १९९० रोजी सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या ई. श्रीधरन (अभियांत्रिकी सदस्य, रेल्वे बोर्ड )  यांच्याकडे गेली आणि त्यांनी श्रीधरन यांना  कोंकण रेल्वेबद्दल सांगितले.  त्यांना  महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्याचा विचार फर्नांडीस यांच्या मनात आला आणि अर्जुन बळवंत वालावलकर, बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, रामकृष्ण हेगडे व अर्थातच स्वतः जॉर्ज फर्नांडिस या   कोकणातील इतर अनेक वजनदार नेत्यांचे स्वप्न साकारण्यासाठी ई.श्रीधरन पुढे सरसावले. “सर्वाधिकार मला देणार असाल तरच मी कार्यभार  स्वीकारेन; कोणतीही राजकीय लुडबुड नको,” ही  अट फर्नांडीस यांना मान्य करायला लावून श्री. ई.श्रीधरन यांनी  CEO /KRCL म्हणून कार्यभार स्वीकारला.

डॉ ई श्रीधरन यांनी साइटची पाहणी केलीपूर्वीच्या सर्वेक्षणांचे अहवाल पुरेसे परिष्कृत नव्हते. म्हणून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने वाहतूकक्षमता आणि वेगक्षमता वाढवण्यासाठी पुनर्सर्वेक्षण केले. साठच्या दशकापासून, कोकण किनारपट्टीवर  रेल्वेचा विस्तार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले होते. त्यामध्ये ऑक्टोबर १९६४मध्ये पनवेल ते दिवा आणि एप्रिल १९६६ मध्ये पनवेल ते आपटा जोडले गेले होते; परंतु १९७७ मध्ये प्रा. दंडवते यांनी आपटा ते रोहा हा पहिला टप्पा मंजूर केला. तो प्रत्यक्षात मार्च १९८६ मध्ये सुरू झाला.

 १९८९ मध्ये जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले, तेव्हा हे काम अधिक जोमाने पूर्ण करण्यात आले. खरंतर, रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी, त्यांनी रेल्वे भवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सांगितले, की त्यांच्या मनात दोन प्रकल्प आहेत – बिहारमधील बगाहा – चित्तौनी आणि कोकण रेल्वे. श्री.फर्नांडिस यांना कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती; परंतु अशा मोठ्या प्रकल्पासाठी निधीची व्यवस्था करणे कठीण जाणार होते. तत्कालीन अर्थमंत्रालयातील आर्थिक सल्लागार यांनी केंद्र आणि रेल्वे ज्या ज्या राज्यांतून धावणार आहे अशी  राज्ये हाती धरून प्रकल्पासाठी निधी उभारण्याची कल्पना सुचवली. (कोणतीही राजकारणी लुडबुड नको आणि सरकारी तिजोरीवर भार नको  म्हणून ही कल्पना श्री. ई. श्रीधरन यांचीच होती.) या संकल्पनेद्वारे श्री.फर्नांडिस तत्कालीन पंतप्रधान श्री.व्ही.पी. सिंह आणि चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ शकले. अर्थमंत्री म्हणून प्रा.मधू दंडवते यांनी त्यांना पूर्ण सहकार्य दिले.

श्री. ई. श्रीधरन हे रेल्वे बोर्डाचे अभियांत्रिकी सदस्यच  होते आणि  बांधकाम अभियंता असल्याने, कोकण रेल्वेच्या कल्पनेबद्दल ते खूप उत्साही होते. प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळविण्यासाठी आणि महामंडळाच्या तरतुदीसाठी सर्व कागदपत्रे १९८९ मध्ये त्यांनीच  लवकर पूर्ण केली.  त्या वेळी त्यांना  माहीतसुद्धा नसेल, की हे काम आपल्यालाच पूर्ण करावे लागेल. फेब्रुवारी १९९० मध्ये श्री.जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला तोपर्यंत ही योजना तयार झाली होती आणि अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली होती. तदनंतर श्री. श्रीधरन यांना महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९ जुलै १९९० रोजी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ही कंपनी अस्तित्वात आली… महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांना   महामंडळात भागीदार बनवले. त्यात श्री.ई.श्रीधरन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. महामंडळासमोर  हे एक अशक्य वाटणारे काम होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे पायाभरणी केल्यानंतर, छोटे-मोठे पर्वत आणि नद्या ओलांडत आणि अनेक नैसार्गिक अडथळे पार करत ७६० किमी लांबीचा रेल्वे मार्ग बांधावा लागणार असा अंदाज काढला होता. त्यात भर म्हणजे संपूर्ण मार्गाची सविस्तर माहितीदेखील उपलब्ध नव्हती. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी फक्त  ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. या प्रकल्पाचा डोलारा चांगलाच मोठा होता आणि वेळ मात्र  खूपच कमी होता. इतके असूनदेखील KRCL कंपनीने  इतका मोठा प्रकल्प पाच वर्षांत करून दाखवला होता. 

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे KRCL संस्थेची स्थापना. भारतीय रेल्वेमधील त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे श्री.श्रीधरन यांनी निर्माणकार्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी (खडी, सिमेंट, लोखंड आणि पायाभूत सोयीसाठी लागणाऱ्या गोष्टी, स्वीडनहून आणलेले मोठी ड्रिल मशीन ) पोहोचवण्यासाठी एक संघटनात्मक रचना तयार केली. ७६० कि. मी. लांबीचा संपूर्ण प्रकल्प महाड, रत्नागिरी (उत्तर), रत्नागिरी (दक्षिण), कुडाळ, पणजी, कारवार आणि उडुपी इ. सात क्षेत्रांमध्ये विभागला. प्रत्येक क्षेत्र अंदाजे १०० कि.मी. लांबीचे  होते. त्याचे नेतृत्व मुख्य अभियंता करत होते. मुख्य अभियंत्यांना पुरेसे अधिकार (SOPGM/SOPEST) सोपवण्यात आले. (SOPGM-Schedule of Power on General Matters) प्रत्येक लहान मोठ्या अधिकार्‍यांना सरकारी पैसा आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे (SOPEST-Schedule of Power on Establishment Matters.) प्रत्येक लहान-मोठ्या अधिकाऱ्याला नेमणूक आणि मनुष्यबळ वापरण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे.)अशी वैयक्तिक लक्ष देण्याची सोय असल्यामुळे केआरसीएल ‘लाल फिती’वर मात करण्यात यशस्वी झाले. 

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये (कोकण रेल्वेचे मुख्यालय CBD-Central Business District बेलापूर येथे आहे.) सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिग्नल आणि टेलिकॉम इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि स्टोअर्स अँड फायनान्समध्ये तज्ज्ञ असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली होती. इतर रेल्वेतून प्रतिनियुक्तीवर आलेले माझ्या  बॅचचेसुद्धा लहान मोठे अधिकारी आणि अभियंता होतेच. त्यांनीह मोठ्या कामांची डिझाइन्स, नियोजन, निविदा आणि कंत्राटीकरणाचे धोरणात्मक काम यांना दिशा देऊ  केली. हे काम वरील सर्व  अधिकार दिल्यामुळे जलद होऊ लागले. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मुख्य अभियंत्यांना सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल आणि टेलिकॉम शाखांचे उपमुख्य अभियंते आणि उपमुख्य लेखा अधिकारी मदत करत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नवीन पदवीधरांमधून भरती झालेल्या सुमारे ४०० तरुण अभियंत्यांनी क्षेत्रीय स्तरावर काम केले.

त्या वेळी KRCLबांधकामाच्या शिखरावर असताना, सीएमडीपासून ते सर्वात खालच्या स्तरावर २०००पेक्षा जास्त कर्मचारी नव्हते. संगणकाच्या आगमनामुळे  त्यांच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली, संपूर्ण मार्गावर तत्काळ फॅक्स आणि टेलिफोनची सुविधा  उपलब्ध झाली. त्यामुळे  निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद झाली आणि काम थांबणे टाळले गेले. ज्या वेळी मी कोकण रेल्वेत होतो त्या वेळी श्री.ई.श्रीधरन यांच्याबद्दल आदरयुक्त माहितीच मिळत गेली. ते अतिशय हुशार, वेळेचे बंधन  पाळणारे, कायम जमिनीवर असणारेच अधिकारी होते. १९७१च्या युद्धातील फील्ड मार्शल SHFJ माणेकशा आणि कोकण रेल्वेतील CMD  ई. श्रीधरन यांनी अगदी वेगळ्या कार्यसंस्कृतीत काम केलेले असले तरी हे दोघे या काही बाबतींत समधर्मी  होते.

श्री. ई. श्रीधरन यांचे  कुटुंबही हरहुन्नरी होते. एकदा निरीक्षणाला आले असता उडुपी जिल्हातील कोलूर या ठिकाणी मुखाम्बिका देवी मंदिरात त्यांच्या मुलीने एक सुंदर भजन मल्याळी भाषेत म्हटले  होते. अतिशय कर्मठ, पूर्ण शाकाहारी असे व्यक्तिमत्त्व होते. प्रसंगानुसार ते गीतेतील श्लोक म्हणून दाखवत आणि अर्थही सांगत. पटवून देण्याची त्यांची हातोटी वेगळीच होती. 

त्यांच्याबद्दल काही आंतरजालावर सापडलेल्या  काही  चित्रफिती : 

१)  कोकण रेल्वेविषयी  ई. श्रीधरन म्हणतात

२ ) स्वतःविषयी ई. श्रीधरन म्हणतात

३ ) भगवद्गीतेबद्दल ई. श्रीधरन यांचे विचार  https://www.youtube.com/watch?v=1HqEn-7nvAM

   ई.श्रीधरन यांचे  कौतुक आपण भारतीय  तर  करूच; पण स्वीडनच्या  SIDA (Swedish International Development Cooperation Agency) अंतर्गत अहवालात कोंकण रेल्वेबद्दल  असे मत दिले, की आम्ही आमच्या बोगदे करणाऱ्या यंत्राबद्दलची अधिक माहिती आमचे अभियंते कोकण रेल्वेला पाठवून घेतली. इतके मोठे काम ई. श्रीधरन कोकणात करत होते. त्यांच्यावर बरीच पुस्तके आणि लेख आहेत. त्यांपैकी प्रत्येक अभियंत्याने  आपला, ‘कर्मग्रंथ’ म्हणून वाचावे असे  पुस्तक म्हणजे जणू त्यांची आत्मकथाच असलेले  ‘कर्मयोगी’ हे एम एस अशोकन यांनी लिहिलेले पुस्तक. 

Author

Leave a Reply