
माझी कच्छला जाण्याची ही तिसरी वेळ.
‘कच्छ देखा, मगर बहोत कुछ नहीं देखा.’
असा अनुभव आला.
सुरुवात झाली ती एका स्वप्नाने. ३४ कि.मी.चा एकेरी, अरुंद, सरळ, समांतर, एकही वळण नसणारा, खाचखळगे नसलेला ‘Road to the Heaven.’
ह्या रस्त्यावर मनसोक्त फिरायचे – हात लांब केले तर जणू हाताला अथांग मीठसागर लागेल! त्या मीठसागरात उगवता, मावळता सूर्य बघायचा. रात्री चंद्राच्या शीतलतेत चमचमणारे ‘मीठ-हिरे’ डोळ्यांनी मनसोक्त वेचायचे.
पण – पण – निसर्गापुढे हतबल. अती पाऊस झाल्यामुळे या वेळी रण तयारच नाही झाले.
धोलाविराचा सूर्योदय, सूर्यास्त अप्रतिम – पाहिला – पण पाण्यात, रणमध्ये नाही.



ह्या रस्त्यावरून चालताना हमखास रामेश्वरम ते धनुषकोडी रस्त्याची आठवण होते. फरक हा, की रामेश्वरमचा रस्ता हिंदमहासागरातून जातो; तर स्वर्गीय रस्ता कच्छच्या उथळ सरोवरातून जातो. खालील जमीन सपाट, पाण्याची खोली अगदी २ इंच ते ५-६ फूट इतकीच. ह्या अथांग पाण्याचे, त्यावरून चालता येते असे रण तयार होते, ह्यावर विश्वास बसत नाही. अशा तळ दिसणाऱ्या पाण्यात असंख्य रोहित पक्षी एका पायावर, एक पाय दुमडून, थव्या-थव्याने आपले लाल पंख पसरवत क्षितीकडे झेप घेतात ते दृश्य अवर्णनीय.
महाकाय रण तयार झाले नसल्यामुळे आता चौथ्यांदा कच्छ बोलावणार हे निश्चित. तिथले जाणकार सांगतात हा अनुभव घेण्यास मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात यावे.
रण पाहून झाले, की साहजिकच पाऊले वळतात ती धोलाविराची हडप्पन संस्कृती बघायला. हजारो वर्षांपूर्वीची – कदाचित १०००० वर्षांपूर्वीची आधुनिकता पाहून उघडलेला जबडा उघडाच राहतो! राजा ते रंक घरे वेगळी, सर्वात उंच जागी राजा, मंडलिक यांचे महाल. त्यानंतर कामाच्या कचेऱ्या, मग प्रधानांची वस्ती व सर्वात खालच्या बाजूला कामगार. पाणी वाचवा, पाणी जिरवा ही शिस्त, सांडपाणी वाहण्याची अचूक क्षमता. शौचकूपे व मैला वाहून जाण्याची सोय, चिऱ्यावर चिरे रचून बांधकाम, विहिरीतून पाणी उपसण्यासाठी केलेली मोट बांधणी, इतकेच नाही तर विहिरीतील पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याच्या ओघावर गरगर फिरणारा दगड, शॉवर बाथचीही सोय. गोल गरगरीत जाती, उखळी, कोरीव कमानी, किती पाहावे आणि किती नाही असे होते. त्या काळी टणक दगड कसे कापले असतील, कोरीव काम कसे केले असेल, एकसंध कसे जमवले असेल ह्या प्रश्नांना उत्तर नाही. हे सारे बघताना विचार येतो आपली प्रगती चालू आहे का अधोगती!

हडप्पन संस्कृती बघायला मात्र सकाळी सातच्या ठोक्याला प्रवेशद्वारी पोचायचे, पाण्याची बाटली व टोपी तर हवीच; नाहीतर विराण दगडांच्या देशात भर उन्हात आपलं काही खरं नाही. हडप्पन संस्कृतीचे अवशेष, मिळालेली मौल्यवान रत्ने, दागदागिने, भांडीकुंडी सध्या दिल्लीत आहेत. मोठा संग्रह तयार झाला, की ह्या वस्तू येथे आणण्यात येतील. तेथे काय सापडले आहे याची अल्पशी कल्पना यावी यासाठी एक छोटेखानी संग्रहालय उभारले आहे.
पुढील भटकंती फोसिल पार्क. वाळूत दडलेली झाडे, शंख, शिंपले. कालांतराने वाळूचे, झाडांचे दगडात रूपांतर होते तरी त्यांचे अस्तित्व जाणवते. एका ठिकाणी तर तंबोरासदृश आकार नजरेस पडतो.
मग बोलावले ‘बनी गवताळ प्रदेशाने.’ आशिया खंडातला सर्वात मोठा गवताळ प्रदेश : सात मुंबई मावतील इतका मोठा!
स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध. सुकलेली, भेगा पडलेली जमीन, खुरटे गवत, बाभळी, मिसवाकची मुबलक झाडे, अध्येमध्ये लहान मोठे जलाशय. रस्ता नाहीच! वाटाड्याची नितांत गरज, तसेच सोबतीला पक्षितज्ज्ञ, निसर्गतज्ज्ञ हवाच.
हजारो नाही; तर लाखो पक्षी सर्वत्र पंख पसरून विहरत होते.

सारस पक्षी
करड्या रंगाचे मोठ्ठाले, स्थलांतरित.

सारस पक्षी एकदा का सहचारिणीची निवड झाली, की जन्मभर एकत्र राहतात… जर जोडीदाराचा अंत झाला तर दुसरा प्राणत्याग करतो.
ह्या थव्यांचे बनीमध्ये वास्तव्य ३-४ महिने – थंडी असेपर्यंत.
इथे दिसली निसर्गाची किमया. ह्या भेगा पडलेल्या जमिनीत दिसणार नाही इतके लहान गवत उगवते. त्याला छोटेसे कणीस लागते. त्यात मोत्यासारखा पांढरा शुभ्र दाणा. हे खाद्य सारसाचे. एक सारस दिवसाला ३५०ग्राम खाद्य खातो; तरीही वर्षात ह्या गवताळ प्रदेशातील फक्त ४०%धान्य संपते.
असे अनेक पक्षी – प्रत्येकाची वेगळी कहाणी.


भरपूर गायी- म्हशी, चरायला सोडलेल्या. म्हशींची शिंगे गोलाकार – जणू शाळेतल्या मुलींच्या रिबिनी लावलेल्या वेण्या. गाईंची शिंगे मोठी, अक्कडबाज, मुक्तहस्त चित्रासारखी.
३५-४० काळे, तपकिरी उंटांचे कळप. अगदी बाळ उंटही! मध्येच रानटी डुकरांचे कुटुंब तर कुठे रानमांजर, तरस इ.इ.
पुढचा पडाव ‘कडिया ध्रो‘ला. खडबडीत रस्ता, धूळच धूळ. FWD ने जावे लागते. साधारण ३० मिनिटे हाडे खिळखिळी केली, की पोचतो खार नदीने तयार केलेला नजारा पाहायला! कित्येक रंगीत दगड, लहान मोठ्या शिळा, दगडांचे आकार तरी किती? कुठे लगाम लावलेल्या घोड्याचे तोंड, तर कुठे चवताळलेला कुत्रा. कुठे चेहऱ्यावर चष्मा तर कुठे अवाढव्य पाऊल, कुठे जबडा उघडलेली मगर तर कुठे मासा!
विविध आकार, रांगोळी काढल्याप्रमाणे! निसर्ग काढणारा? चित्रकार, डोह, अनेक तयार झालेल्या घळी, डोकावणाऱ्या वा सुस्त पहुडलेल्या मगरी आणि चित्राला पूर्णत्व देणारा धबधबा.
आज शब्दांचा धबधबा इथेच थांबवते. पुढे कधीतरी भूजची अनेक संग्रहालये, त्यांतील विविधता, नावीन्य, कलासंस्कृती टिकवण्याची तळमळ, राजेशाही थाट, राजवाडे, महाल, कला, कशिदा बाजार, हस्तकला असे बरेच काही. अनोख्या दुनियेत नेणारे.
पुन्हा भेटू अशाच अगाध निसर्गात.
प्रा. लीना साटम
मुंबई





कडिया ध्रो . बहुरंगी, बहुढंगी

awesome experience