
मागची रांग मध्यभागी डॉ रॉबर्ट क्लॉपस्टॉक,पुढची रांग उजवीकडून दुसरे काफ्का
पत्रलेखन हे जिवंत असते. कार्ड, पिक्चर पोस्टकार्ड, कागदावर शाईत, पेन्सिलीने लिहिलेली पत्रे, टाईप केलेली पत्रे या सगळ्यांना एक काया असते. या कायेची किमया इ-मेल मध्ये नाही. पाश्चात्त्यांना – अगदी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांतील पाश्चात्त्यांना – त्यांच्या आजी-आजोबांची, मित्रांची, नातेवाइकांची पत्रे जपून, पुढच्या पिढीला देण्याचे वेड असते. लेखक, विचारवंत, विज्ञानवंत, महिला असो वा पुरुष यांचा पत्रव्यवहार पाश्चात्त्य विद्यापीठांत संग्रहित करून. अभ्यासकांसाठी खुला केलेला असतो. जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलो म्हणजे कोणीतरी, केव्हातरी प्रकाशित केलेला असा एखादा पत्रसंग्रह मिळून जातो. तो क्षण मला मोहरून टाकतो. काफ्काची पत्रे मला अशीच मिळाली. काफ्काने लिहिलेल्या १९२० ते १९२४ या कालखंडातील पत्रांतून डॉ. रॉबर्ट याचे व्यक्तिचित्र डोळ्यांसमोर उभे राहते, तसेच काफ्काचेही! पत्रव्यवहार वाचताना पत्रलेखक आणि पत्रातील व्यक्ती या दोहोंबद्दल जिवंत माहिती मिळते. ती जिवंत वार्ता वाचकमित्रांबरोबर शेअर करण्याचा हा प्रयत्न.
विश्रब्ध पत्रव्यवहार
गतकालातील पत्रव्यवहार हे इतिहासाचे एक भरवशाचे किंवा विश्वासू साधन असते. महाराष्ट्रातील खाजगी पत्रांचे दोन खंड ह. वि. मोटे यांनी प्रकाशित केले. खंडाचे सार्थ नामकरण ‘विश्रब्ध शारदा’ असे आहे. पहिल्या खंडाला (ह. वि. मोटे प्रकाशन १९७२) दि. के. बेडेकर यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. परदेशातील पत्रव्यवहार वाचताना त्याच काळात महाराष्ट्रात कोणत्या घटना घडत होत्या, काय महत्त्वाचे पत्रव्यवहार होते, हे शोधण्याचा मला छंद आहे. या छंदफंदात माझ्या डोळ्यांसमोर पाश्चात्त्य आणि पौर्वात्य असे दोन सांस्कृतिक खंड उभे राहतात. विश्रब्ध शारदेचा हा स्पर्श विलक्षण असतो. काफ्काचा १९२० ते १९२४ या काळातील पत्रव्यवहार या लेखासाठी तपासणार आहे म्हणून महाराष्ट्रातील त्याच काळातील पत्रे पाहिली – त्यांतील वानगीदाखल दोन – १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाले; पण मृत्यूपूर्वी काही महिने बाळ गंगाधरांनी लिहिलेली महत्त्वाची पत्रे या खंडात वाचायला मिळतात आणि अगदी शेवटपर्यंत लोकमान्य किती कार्यमग्न होते याची कल्पना येते. दुसरे उदाहरण ५ एप्रिल १९२२ रोजी पंडिता रमाबाईंचे निधन झाले. न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे या पंडिता रमाबाईंच्या मैत्रीण होत्या. पंडिता रमाबाईंनी ख्रिस्तीधर्म स्वीकारल्यानंतर पंडिता रमाबाई हिंदू समाजाच्या रोषास कारण होत्या; तरी रमाबाई रानडे यांची पंडिता रमाबाईंशी मैत्री टिकून होती. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंडिताबाईंच्या चिटणीस मिस मेरी फुलर यांना रमाबाई रानडे यांनी लिहिलेले पत्र वाचनीय आहे. त्यात रमाबाई रानडे लिहितात, ‘त्यांच्या जाण्याने स्त्री-शिक्षणाच्या खऱ्या पुरस्कर्त्या भगिनींपैकी एकीला आम्ही अंतरलो आहोत.’ या वाक्यातून रमाबाई रानडे यांचे पंडिताबाईंबद्दलचे प्रेम आणि त्यांच्या कार्याबाबतचा आदर दिसून येतो. १९२०च्या सुमारास ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रातील राजकारणात, समाजकारणात, अशा घडामोडी होत्या. युरोपात दुसरे महायुद्ध संपून दोन वर्षे उलटली होती. युरोपमध्ये ‘ज्यू द्वेषाच्या’ झळा दिवसेंदिवस तापत होत्या. दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली जात होती. अॅडॉल्फ हिटलर (१८८९-१९४५) याने १९२१ साली नाझी पार्टीची ‘फ्युरर’- नेतेपदाची सूत्रे हाती घेतली होती.
इतिहासाची रखरखीत पुस्तके वाचण्यापेक्षा, मला गतकालावर स्नेहाळू प्रकाश टाकणारा जुना पत्रव्यवहार जास्त भावतो.
रॉबर्ट क्लॉप्स्टॉक (१८९९-१९७२)
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) संपायला एक वर्ष बाकी होते. फ्रांझ काफ्का (१८८३-१९२४) ३४ वर्षांचा होता. १९१७ साली फ्रांझला क्षयाचे निदान झाले. त्याची तब्येत खालावू लागली. १९२०च्या उत्तरार्धात काफ्का उपचारासाठी Tatra डोंगरातील सॅनेटोरियममध्ये (आज हा भाग उत्तर Slovakia मध्ये येतो) उपचारासाठी जाऊन राहिला होता. त्या काळी डोंगरमाथ्यावरची शुद्ध हवा आणि उत्तम पोषण हेच फक्त उपचार होते. तेथे रॉबर्ट क्लॉपस्टॉक(१८९९-१९७२) हा २१ वर्षांचा हंगेरियन वैद्यकीय विद्यार्थी त्याच रोगाच्या उपचाराकरता दाखल झाला होता. तेथे दोघांची भेट झाली. (त्या काळात युरोपमध्ये क्षयाने साथीचे रूप धारण केले होते. आज युरोपात हे प्रमाण खूपच कमी आहे.) रॉबर्टचे वडील रेल्वेत कामगार होते. त्याचे शालेय शिक्षण बुडापेस्ट येथे झाले. बुडापेस्ट विद्यापीठात १९१८ साली त्याने वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केली. दोन वर्षे चांगली गेली. शिक्षण चालू असताना त्याला बारीक ताप येऊ लागला. १९२० साली क्षयाचे निदान झाले आणि त्याला शिक्षण थांबवून उपचाराकरता Tatra येथील सॅनेटोरियममध्ये जावे लागले. येथील राहणे व उपचार खर्चीक होते म्हणून त्याने तेथील डॉक्टरच्या मदतनीसाची नोकरी पत्करली. रॉबर्टला उपचाराच्या खर्चाला थोडा हातभार मिळाला.
पत्रातील चित्र
काफ्काने १ फेब्रुवारी १९२१ साली मॅक्स ब्रॉड या त्याच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात रॉबर्टचे पहिले शब्दचित्र लेखाटले आहे, ‘रात्रीचे ९ वाजले होते. मी माझ्या खोलीत शांत बसलेला असताना व्यत्यय आला; पण तो अडथळा सुखदायी होता. येथील डॉक्टरचा सहकारी माझ्या खोलीवर आला. तो होता बुडापेस्टहून आलेला २१ वर्षांचा एक ज्यू वैद्यकीय विद्यार्थी. खूप महत्त्वाकांक्षी, हुशार, साहित्याची जाण असलेला असा हा तरुण. त्याला माणसांची भूक आहे – जशी जन्मजात डॉक्टरला असायला हवी तशी. ज्यू लोकांच्या ‘ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र’ या कल्पनेला विरोध करणारी त्याची विचारसरणी आहे. जीझस आणि दोस्तोवस्की त्याचे मार्गदर्शक आहेत. तो माझ्याशी विशेष मित्रत्वाच्या नात्याने वागत होता. मॅक्स, हे सगळे तुझ्या नावातून उगवले होते, बरे का. तू आणि मी मित्र आहोत हे तो जाणत होता. तू मला भेटायला येथे येणार आहेस ही त्याच्यासाठी आकर्षक बातमी होती.’ एप्रिल १९२१ मध्ये मॅक्सला लिहिलेल्या पत्रात काफ्काने रॉबर्टचे आणखी व्यक्तिचित्रण केले आहे, ‘त्याच्याकडे बघितल्यानंतर तो आजारी आहे असे वाटत नाही. तो उंच, धिप्पाड, लाल गालांचा, सोनेरी केसांचा तरुण आहे. तो खोकत नाही पण त्याला अधूनमधून बारीक ताप येतो. त्याचा चेहरा बालिश, स्वप्नाळू आहे. दिसायला तसा चांगला आहे तो. त्याला बुडापेस्ट सोडावे लागणार आहे. तो प्रागला जाणार. त्याच्याजवळ बुडापेस्ट येथील दोनतीन ज्यू धर्मगुरूंची प्रागमधील ज्यू धर्मगुरूंकरता पत्रे आहेत. पण मॅक्स, तुला कल्पना आहेच, प्रागमध्ये परदेशी लोकांना राहणे किती कठीण असते ते. तो झेकोस्लोव्हेकियाचे नागरिकत्व मिळवून आला तर ठीक होईल का? मला कळव.’
मॅक्सला एका पत्रात काफ्का लिहितो, ‘येथील जवळ जवळ सर्व कर्मचारी याच रोगाचे रुग्ण आहेत. स्वयंपाक घरात काम करणाऱ्या मुली मात्र निरोगी आहेत. पेशंटच्या ताटलीतील उरलेले पण ‘न उष्टावलेले’ अन्न त्या खाऊन टाकतात, असे मी ऐकले आहे.आज मी रॉबर्टच्या खोलीवर गेलो होतो. त्याला बारीक ताप आला होता. अगदी मलूल दिसत होता.’
हे पत्र वाचून माझ्या डोळ्यांसमोर त्या रोगाची त्या काळातील युरोपातील व्यापकता लक्षात आली. युरोपातील गरिबी जाणवली. आज समृद्ध युरोप बघायला भारतीय मोठ्या संख्येने जातात; पण फक्त शंभर वर्षांपूर्वी युरोप असा नव्हता याची आपल्याला कल्पनाही नसते. गतकालाकडे दोन नजरांनी बघता येते : एक गतकाळ समजून घेण्याकरता आणि वर्तमान समजून घेण्यासाठी गतकालाकडे बघणे, ही दुसरी नजर! पत्रव्यवहार असा दोन्ही नजरांनी वाचता येतो.
मे १९२१ मध्ये मॅक्सला लिहिलेल्या पत्रातील एक परिच्छेद – ‘इथे माझे आणि रॉबर्टचे मेतकूट आहे हे सगळ्यांना माहीत आहे. माझ्याकडून काही हवे असेल तर लोक रॉबर्टला विचारतात, त्याची मदत घेतात आणि मला कोणाकडून काही हवे असेल तर मी ते काम रॉबर्टवर सोपवतो. त्यामुळे मी एकटा पडलो आहे असे मला वाटत नाही. इथे सगळेजण तसे गोडीगुलाबीने राहतात. मी येथील कर्मचार्यांना, हेड वेटरला बऱ्यापैकी सढळ हाताने ‘टीप’ देतो. हा हेडवेटर बुडापेस्टहून आला आहे. त्याने त्याच्या बायकोला पत्र लिहिले, ते पत्र कसे कोणास ठाऊक पण फुटले. त्यात त्याने लिहिले होते, ‘येथील बारा जण बरे आहेत, बाकी सैतानाकडे गेले तरी काही हरकत नाही. त्याने टीप न देणाऱ्यांची यादीच दिली होती. बरे झाले माझे नाव त्या यादीत नव्हते. मला सैतान जरी घेऊन गेला तरी त्याचे कारण मी कमी टीप देत होतो हे असणार नाही.’ काफ्काची विनोदबुद्धी या वातावरणात, अशा वेळीही शाबूत होती. काफ्का हा गंभीर आणि उदास लेखक आहे असा सर्वसाधारण समज आहे; पण तो पूर्णतः खरा नाही; याचे कारण मनोवैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. लेखक कलावंत वगैरे यांची एक सार्वजनिक प्रतिमा असते, ज्याला ‘पर्सोना’ म्हणतात. म्हणजे हा एक मुखवटा असतो. सर्व लोक या मुखवट्याला ओळखतात; पण या लेखकाच्या आत एक माणूस वा व्यक्ती दडलेली असते. लेखक सदासर्वकाळ लेखक नसतो, तो जेव्हा लिहीत असतो, विचार करत असतो तेव्हा तो त्याच्या ‘पर्सोनात’ जातो, इतर वेळी म्हटले तर तो सामान्य माणूस असतो. मला वाटते कधी कधी तो पत्रव्यवहारात उघडा होत असेल.
मैत्रीचा गर्भकाल
काफ्का आणि रॉबर्ट त्याच सॅनेटोरीयममध्ये आठ महिने एकाच वेळी राहिले. तो त्यांच्या मैत्रीचा गर्भकाल ठरला. मैत्री घट्ट झाली. काफ्काच्या मृत्यूसमयी त्याचा शेवटचा मित्र रॉबर्ट आणि शेवटची मैत्रीण डोरा हे दोघेच जवळ होते. काफ्का सॅनेटोरियमचे उपचार संपल्यानंतर १९२१ला प्रागला परतला. त्याची रजाही संपली होती. पण त्याची तब्येत ढासळत होती. त्याने १९२१च्या शेवटच्या चार महिन्यांत रॉबर्टला अठरा पत्रे लिहिली आणि १९२२च्या पहिल्या सात महिन्यांत चौदा पत्रे लिहिली. ही पत्रे काफ्काच्या प्रकृतीबाबत तर होतीच; पण त्यांत साहित्यिक आणि धार्मिक विषयही होते. दोघांचे तेथे सामाईक दोस्त झाले होते त्यांची विचारपूस होती. काफ्काने सगळ्यात जास्त पत्रे Felice Baur आणि Milena Jesenska या दोन प्रेयसी-मैत्रिणींना लिहिली. त्यानंतर नंबर लागतो मक्स ब्रॉड या मित्राचा आणि चौथा क्रमांक रोबर्ट क्लॉपस्टॉकचा!
रॉबर्टला १९२१ मध्ये बुडापेस्टला जाऊन वैद्यकीय शिक्षण सुरू करायचे होते; पण हंगेरीत आता Regent Miklos Horthy यांचे नॅशनॅलिस्टिक सरकार आले होते. हे कम्युनिस्टविरोधी आणि ज्यूविरोधी सरकार १९२० ते १९४४ पर्यंत सत्तेवर होते. त्यामुळे ज्यूंवर आणखी निर्बंध आले. विद्यापीठीय शिक्षणाकरता ज्यूंचा कोटा ठरवण्यात आला. रॉबर्टला हंगेरीतील वैद्यकीय शिक्षणाचे दरवाजे बंद झाले. काफ्काच्या प्रयत्नाने प्राग येथील जर्मन विद्यापीठातील वैद्यकीय विभागात रॉबर्टला प्रवेश मिळाला. १९२२ मध्ये रॉबर्ट काफ्काच्या फ्लॅटवर त्याच्या बरोबर राहत होता.
पुढे काफ्काची प्रकृती खालावत गेली बर्लिन येथे उपचार घेऊनसुद्धा फरक पडला नाही. तेथे त्याची डोराशी मैत्री झाली. काफ्काला व्हिएन्नाजवळील एका सॅनेटोरीयममध्ये दाखल करण्यात आले. रॉबर्ट आणि डोरा दोघेही त्याच्याजवळ होती. ३ जून १९२४ रोजी काफ्काचे निधन झाले.
काफ्काच्या मृत्यूनंतर
जून १९२५ पर्यंत रॉबर्ट प्रागमध्ये शिकत होता. १९२६-१९२७ या काळात तो जर्मनी येथील Kiel विद्यापीठात होता. १९२८मध्ये बर्लिन विद्यापीठाची डिग्री घेऊन तो डॉक्टर झाला. डॉ.रॉबर्ट बर्लिन येथील क्षय रोगाच्या रुग्णालयात ‘लंग सर्जन’ ‘फुफ्फुसाचे शस्त्रक्रियावंत’ म्हणून १९३३ पर्यंत काम करत होते. १९३० साली बुडापेस्ट येथे त्यांचा Gizela Deutsch हिच्याशी विवाह झाला. तिने काफ्काच्या ट्रायल या कादंबरीची पहिली काही प्रकरणे हंगेरियन भाषेत अनुवादित केली होती. त्यावर थोमास मान Thomas Mann हा लेखक खूश झाला होता. १९३३ ला डॉ.रॉबर्ट आणि त्यांची पत्नी बुडापेस्टला आले.
ज्यूंचे हत्याकांड जोरात सुरू होते. अल्बर्ट आईनस्टाइन (१८७९-१९५५ भौतिकी नोबेल १९२१) आणि थोमास मान(१८७५ – १९५५ साहित्याचे नोबेल १९२९) यांनी डॉ. रोबर्ट यांना दिलेल्या पत्रामुळे १९३८ला त्या दोघांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. १९३८ ते १९४५ या काळात त्यांनी बॉस्टन येथील मॅस जनरल हॉस्पिटल या जगप्रसिद्ध संस्थेत फुफ्फुसांच्या रोगावर संशोधन केले. १९४५ मध्ये डॉ. रॉबर्ट यांनी न्यूयॉर्क येथील क्षय रुग्णालयात छातीच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. न्यूयॉर्क विद्यापीठात ते शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक होते. त्यांनी फुफ्फुसाची शस्त्रक्रिया या विषयावर ८० वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले. आजही हे शोधनिबंध मार्गदर्शक आहेत. फुफ्फुसाची शस्त्रक्रिया या विभागात ते ‘पायनियर’ पायंडा पाडणारा संशोधक आणि कौशल्यपूर्ण सर्जनशील ‘सर्जन’ म्हणून जगभर ओळखले जातात.
डॉ. रॉबर्ट काफ्काच्या मैत्रीबाबत कधीही बोलले नाहीत आणि ‘आपण काफ्काचे जवळचे दोस्त होतो,’ अशी शेखीही मिरवली नाही. डॉ रॉबर्ट यांनी त्यांच्या शल्य-कौशल्याने अनेक रुग्णांना क्षयरोगातून मुक्त केले. हीच त्यांची काफ्काला आदरांजली होती. डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक यांचे १९७२मध्ये न्यूयॉर्क येथे निधन झाले. त्यांच्या पत्नीचा Gizela यांचा १९९५मध्ये मृत्यू झाला.
मानवी उपचार
अनादिअनंतापासून माणूस दुसऱ्या जखमी माणसावर, जखमी जनावरावर, उपचार करत आला आहे. या उपचारामागे सह-अनुभूती – एंपथी आणि सहानुभूती – सिंपथी या दोन्ही भावना असतात. दुसऱ्याच्या वेदना जाणणे ही संवेदना माणसाच्या स्वभावाचा एक पैलू आहे. कावळा, सिंह, चीम्प्स हे वानर, दुसऱ्या जखमी बंधूची काळजी घेतात, त्यावर त्यांच्या वकुबानुसार उपचारही करतात, अशी उदाहरणे निसर्गात आढळतात. मानवी उपचारांची उत्क्रांती कशी झाली असावी हा प्रश्न माझ्या मनात अनेक वर्षे रुंजी घालत आहे. त्यावर एका शोधनिबंधाने प्रकाश पडला. डॉ. एरिक फ्रँक हे युनिव्हर्सिटी ऑफ व्युर्र्त्सबुर्ग येथे गेली अनेक वर्षे विवध प्रकारच्या मुंग्यांवर संशोधन करत आहेत. या मुंग्या वाळवीच्या किड्यांवर हल्ला करतात. या लढाया खेळताना काही मुंग्या जखमी होतात. जखमींना कॉलनीत नेले जाते. सर्जन मुंग्या त्यांच्या करवतीसारख्या जबड्याने इजा झालेल्या मुंगीचा पाय कापतात – चक्क ‘अॅंप्युटेट’ करतात. जखमेवर सर्जन मुंगी तोंडातून चिकट द्र्व काढून लावते. या चिकट द्रवाचा तपास केला तेव्हा त्यात २० प्रकारची प्रथिने आढळली. त्यांच्यात जीवाणू-विरोधी गुणधर्म असतात. त्याचा माणसाला कसा काय उपयोग करून घेता येईल यावर संशोधन जारी आहे. म्हणजे मुंग्यांना इतर मुंग्यांबाबत सहानुभूती वगैरे असते की काय? तसे नाही. Susanne Foitzik यांनी युनिव्हर्सिटी ऑफ Mainz येथे मुंग्यांच्या या वर्तनावर संशोधन करून या वर्तनाच्या जनुकांचा शोध लावला आहे. ही जनुके कसे काम करतात याचा शोध चालू आहे. मुंग्यांच्या इवल्याश्या मेंदूत हे वर्तन हार्डवायर झाले असावे असा कयास आहे. उत्क्रांतीतून हे वर्तन नैसर्गिक निवडीने माणसापर्यंत पोहचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काफ्काला ही माहिती मिळाली असती तर त्याने मानवारोपी पद्धतीने एखादी कथा लिहिली असते असे मला वाटून गेले.
आनंद जोशी.
२२ / २ / २०२६
