अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.
ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे :
हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे अशी इच्छा सगळीच राष्ट्रे करीत असल्यामुळे हळूहळू पृथ्वीचा ऱ्हास झाला – इतका झाला की मानव आणि वन्यजीव सगळेच नष्ट झाले! काही वैज्ञानिक, विचारवंत तेवढे जिवंत राहिले. आपले वैज्ञानिक तंत्र आजमावून त्यांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन तेथे वस्ती केली. तेथे ‘स्वर्ग’ या नावाला शोभेल असे वातावरण तयार केले. नवीन पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून मानवाच्या नैसर्गिक क्षमतेत वृद्धी केली. राग, लोभ यांचा विसर पडून त्यांना आनंदात जगण्याचे जमायला लागले. या ग्रहावर त्यांनी पक्ष्यासारखे पंख निर्माण करून स्वतःत फार मोठा बदल घडवून आणला. त्या पंखांना सूर्यकिरणात बसले तर फोटोसिंथेसिस (photosynthesis) म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारा शक्ती मिळू लागली. फळांचा रस पिऊन आणि सूर्यकिरणांपासून मिळालेली शक्ती यांमुळे त्यांचे आयुष्य सोपे झाले. तेथे मृत्यू हा शब्दच नव्हता. जेव्हा आयुष्यातील आनंद घ्यायची इच्छा संपेल तेव्हा ते त्यांचे आयुष्य संपवू शकत.(उषा अरुण प्रभुणे यांच्या परीक्षणातून) काही मूलभूत संशोधन करण्यासाठी स्वर्गावरील उत्क्रांत मानवांनी पृथ्वीवर एक मोहीम पाठवायचे ठरवले. या मोहिमेत सहभागी झालेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर आल्यावर काय सापडले, तिथल्या वर्षभराच्या वास्तव्यात त्यांना काय अनुभव आले आणि जीवनाविषयी त्यांनी काय नवीन ज्ञान मिळवले हे अंतर्नादमध्ये क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या भागांमधून आपल्याला समजत जाईल.
एक अत्यंत उत्कंठावर्धक विज्ञान कादंबरी असे याचे वर्णन करावे लागेल.
जीवन – मृत्यू, प्रेम आणि ताटातूट, काळ आणि अवकाश यांसंबंधी प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या आणि ज्ञानासाठी मानवाचा जो निरंतर शोध चालू असतो त्याचे रूपकात्मक चित्रण करणाऱ्या या कादंबरीचे मराठी भाषांतर अर्चना मिरजकर यांनी ‘पुनरपि जननं’ या नावाने केले आहे. हे भाषांतर क्रमशः देत आहोत. या अंकात वाचू या प्रकरण चौदावे .
– संपादक
जागृती
आकाशगंगा प्रवास केंद्रात मोठीच गजबज भरून राहिली होती. पृथ्वी प्रकल्पाची जवळजवळ संपूर्ण टीम तिथे हजर होती. पृथ्वीकडे जाणारे आकाशयान त्याच्या निर्दिष्ट मार्गावरून व्यवस्थित मार्गक्रमण करत आहे आणि तिथे उतरणाऱ्या पथकाचे सदस्य त्यांच्या दीर्घ सुषुप्तीतून जागे झाले आहेत याचा काहीतरी संकेत आज मिळण्याचे अपेक्षित होते. या नव्या टीमने प्रकल्पाच्या आरंभाच्या वेळेस झालेल्या दूरदर्शी चर्चा ऐकल्या नव्हत्या, की पृथ्वीवर जाणाऱ्या पथकाच्या निवडीची उत्सुकता अनुभवली नव्हती. आकाशयानाला त्याच्या प्रवासासाठी आवश्यक ती गती देणाऱ्या रॉकेटचे उड्डाणही त्यांनी पाहिलेले नव्हते. मोहीम सुरू झाल्यानंतर ही नवी टीम रुजू झाली होती आणि पथकातील सदस्यांशी त्यांचा संपर्क दुरूनच झाला होता आणि तोदेखील दीर्घ काळ प्रवास करून पोचलेल्या संदेशांमार्फत. पथकातील सदस्य सुषुप्तीत असताना ही टीम कणद्वयाचे आकलन करणाऱ्या यंत्रांमार्फत (particle entanglement detectors) यानाच्या प्रवासावर लक्ष ठेवून होती. अजून तरी त्यातून सातत्याने माहिती मिळत होती आणि ती अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित होती…
आणि आता उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी, त्यांच्या शरीरांना जागं करणारी औषधं जेव्हा कार्यरत झाली तेव्हा एक एक करून पथकातील सदस्य एका आठवड्याच्या कालावधीत जागे झाले होते. घरच्या ग्रहावरील जवळजवळ पाच वर्षांच्या अवधीतील घडामोडी ज्यांच्या जाणिवेतून निसटून गेल्या होत्या, अशा या सोळा तरुण मुलामुलींना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम जमिनीवर असलेल्या मोहिमेच्या टीमला आता करायचं होतं. ही मुलं आपल्या नातेवाइकांचे निरोप ऐकण्यासाठी आतुर असणार होती आणि मोहिमेच्या टीमने त्यांच्या नातेवाइकांकडून आणि मित्रमैत्रिणींकडून आलेले निरोप केव्हाच यानाकडे पाठवून दिले होते.
तळावर असलेल्या टीमने त्यांना पृथ्वीच्या निकटच्या प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी करायच्या तयारीच्या आणि त्या ग्रहावर उतरण्याच्या क्रमवार सूचनादेखील पाठवल्या होत्या. यानातील पथकाकडून येणारे सूचक संदेश आज लांबचा प्रवास करून स्वर्गावरच्या मोहिमेच्या नियंत्रण कक्षात पोचणार होते. त्याच वेळी तिकडे पथकातील सदस्य पृथ्वीवर उतरण्याच्या तयारीत असणार होते.
पृथ्वीच्या निकट असलेल्या अंतराळात पोचल्यावर ते यान अंतराळाचे आकुंचन करण्याचे थांबवेल आणि मग त्यात प्रवास करणाऱ्या पथकाचे काळ आणि अंतराळ यांच्या संदर्भात स्वर्गाशी असलेले नाते तुटेल. प्रत्यक्षात पाच प्रकाश वर्षांचं अंतर असलेल्या त्या दोन ग्रहांच्या दरम्यान मग संदेशांचं दळणवळण अशक्य होईल. अगदी प्रकाशाच्या वेगाने जाणारा संदेशदेखील स्वर्गावर पोचायला पाच वर्षं लागतील. तोपर्यंत पथकाची पृथ्वीवरची मोहीम संपलेली असेल आणि ते परतीच्या मार्गावर असतील.
पण आत्ता, पथकाकडून येणाऱ्या अत्यावश्यक संदेशाची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती. नेमक्या ज्या क्षणी ‘सगळं काही ठीक आहे’ हा संदेश अपेक्षित होता, त्या क्षणी तो पोचला, त्या कूट संदेशाचं विश्लेषण केलं गेलं आणि सगळ्या वाहिन्यांवर तो प्रक्षेपित केला गेला. आकाशगंगा प्रवासकेंद्रात जमलेल्या शास्त्रज्ञांनी तो ऐकला, पथकातील सदस्यांच्या कुटुंबीयांनी ऐकला आणि स्वर्गावर राहणाऱ्या ज्यांना या मोहिमेत रस होता आणि जे तिचा माग ठेवत होते त्या सर्वांनी तो ऐकला.
दोन महिन्यांनी पथक पृथ्वीवर उतरणार होतं. आता यानाशी कोणताही संपर्क साधणं शक्य नव्हतं. अंतराळाच्या आकुंचन प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतरचा त्यांचा दोन महिन्यांचा प्रवास आणि त्यानंतरचे दहा महिने हे एक रहस्यच राहणार होतं. परतीच्या प्रवासात स्वर्गाजवळ आल्यावर अंतराळाच्या आकुंचनातून यान बाहेर पडेल त्या क्षणापर्यंत मोहिमेच्या नियंत्रण कक्षाला यानाकडून कोणताही संदेश प्राप्त होऊ शकणार नव्हता. स्वर्गाच्या दृष्टीने तो क्षण सहा वर्षांनी येणार होता; पण सगळं काही ठरल्याप्रमाणे व्यवस्थित होईल अशी मोहिमेच्या टीमला खातरी होती.
________________________________________________________________________________________________________

आम्ही आहोत तिथून खाली मला पांढऱ्या ढगांनी वेढलेला एक निळा प्रचंड गोल दिसत आहे. त्याच्या कडेला त्याच्या ताऱ्याचे किरण जिथे त्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करताहेत तिथे एक सोनेरी कोर दिसत आहे. इतक्या उंचावरून त्या ग्रहाचं सौंदर्य मंत्रमुग्ध करणारं आहे. केवळ त्याच्या प्रचंड आकारामुळे, स्वर्गापेक्षा अचंबित करणारं आहे. स्वर्गाचा आकार पृथ्वीच्या केवळ तीन चतुर्थांश आहे. हा ग्रह आमच्या टेहळणीच्या वर्तुळाकार खिडक्यांच्या बाहेर लांबवर पसरलेला आहे. तो आम्हांला उतरायचं निमंत्रण देत आहे, तिथे राहायला बोलावतो आहे; पण आम्ही सावधगिरी बाळगून पुढे जातो आहोत. त्या ग्रहावर उतरणं कितपत सुरक्षित आहे, हे ठरवण्यासाठी त्याच्या वातावरणाविषयी आणि त्याच्या जमिनीवरील परिस्थितीविषयी आवश्यक ती माहिती गोळा करेपर्यंत आणखी काही दिवस आम्ही त्या ग्रहाभोवती फेऱ्या मारत राहू.
दीर्घ झोपेतून जागं झाल्यापासून मला थोडं भिरभिरल्यासारखं, उदास वाटत होतं. अंग आळसावलं होतं. आम्हांला आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे शक्तिवर्धक पेयं, कृत्रिम प्रकाश स्नान आणि व्यायाम केल्यानंतर आमची शक्ती भरून आली आणि मनात उत्साह वाटू लागला.
आता मला खूप बरं वाटत आहे. नऊ महिन्यांच्या गाढ झोपेतून मागच्या आठवड्यात उठल्यावर हातापायांचे आणि पंखांचे व्यायाम जितके जड जात होते तितके ते आता अवघड वाटत नाहीत. कृत्रिम प्रकाशाने उजळलेल्या दालनात केलेलं प्रकाश स्नान आणि शक्तिवर्धक पेयं यांच्यामुळे आमच्या शरीरात टवटवी आली आहे. पुनरुत्थानाची दिनचर्या आम्हांला काळजीपूर्वक पाळायची आहे. पण लवकरच पृथ्वीवर उतरण्याच्या कल्पनेने मला हुरूप आला आहे. यानातील अडचणीचा मला आता कंटाळा आला आहे.
आता मला जास्त काम आहे. आमच्या यानाची आकलन यंत्रणा पृथ्वी ग्रहाची माहिती प्रचंड प्रमाणात गोळा करत आहे. मी पथकातील एकमेव कॉंप्युटेशनिस्ट असल्याने मला त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करायचं आहे. स्वर्गावरील मोहिमेच्या नियंत्रण कक्षाकडे विश्लेषणासाठी ती माहिती पाठविण्याला वेळ नाही आमच्याकडे. आमचे संदेश पोचण्याचा काळ आता जवळजवळ पाच वर्षांचा आहे. अंतराची संभाषण क्षमतेची सीमा आम्ही केव्हाच ओलांडली, आम्ही झोपेत असतानाच.
आम्ही जागे झाल्यावर स्वर्गाकडे पाठवलेले संदेश केवळ कणशोधक यंत्रांना (particle detectors) पाठवलेले कूट संदेश होते आणि स्वर्गाहून आमच्यापर्यंत पोचलेले संदेश कित्येक महिने आधीच आमच्या दिशेने पाठवले होते. आईने खूप विचारपूर्वक संदेश पाठवला होता. सुषुप्तीतून उठल्यावर मला घरची आठवण येणार हे तिला माहीत होतं. तिने केवळ आपला आवाजच नव्हे तर माझी काही आवडती गाणीदेखील रेकॉर्ड करून पाठवली होती. तिने मला दिलेला फोटो मी सारखा पाहते. तो फोटो आणि तिचा आवाज यांमुळे मला ती माझ्या जवळ असल्यासारखं, माझी काळजी घेत असल्यासारखं वाटतं.
आम्ही पृथ्वीसंबंधी गोळा करत असलेल्या माहितीचं विश्लेषण करायला ॲग्नॉन कधीकधी मला मदत करतो. आम्हांला असं कळलं आहे, की पृथ्वीवरचे भूखंड हजार वर्षांपूर्वी होते तसेच आहेत. समुद्राची पातळी वाढली आहे आणि त्यामुळे जुन्या नकाशात दिसणारी काही बेटं बुडून गेली आहेत. काही नद्या सुकून गेल्या आहेत आणि इतर बऱ्याच नद्यांचे प्रवाह बदलले आहेत. पर्वतशृंखला बव्हंशी तशाच राहिल्या आहेत. हवामान बदलल्यामुळे वनस्पतींची वाढ बदलली आहे. ध्रुव प्रदेश आणि त्याच्या खालचा बराचसा प्रदेश वैराण आहे; पण उष्णकटिबंधीय प्रदेश आणि विषुववृत्ताजवळ घनदाट अरण्ये आहेत. प्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल अजून आम्हांला निश्चित काही माहिती नाही; पण गोळा केलेल्या माहितीनुसार त्यांच्या असण्याची दाट शक्यता आहे.
पृथ्वीवर अजून ऋतुचक्र चालू आहे; पण आता ऋतू अधिक तापदायक आणि लहरी झाले आहेत. अखेरच्या युद्धात वापरल्या गेलेल्या अस्त्रांचा किरणोत्सर्ग पृथ्वीच्या वातावरणात अजून रेंगाळतो आहे. उन्नयनपूर्व काळातील कोणताही मनुष्य त्या वातावरणात जिवंत राहू शकणार नाही; पण आमच्या शरीरांमध्ये किरणोत्सर्गाचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता आहे; शिवाय आमच्याकडे सुरक्षात्मक फुगे आहेत.
पृथ्वीवर कसं वाटेल याची मी रोज कल्पना करते. आम्ही कुठे आणि कधी उतरणार हे आम्हांला अजूनही माहीत नाही.
____________________________________________________________________________________________________________
आरुषीची आई अंथरुणावरून उठली आणि पाणी पिण्यासाठी पाण्याच्या दालनात गेली. आज तिला झोप लागत नव्हती. दोन घोट पाणी पिऊन तिने पेला ओट्यावर ठेवला. आपले लांब केस एकत्र करून तिने अंबाडा बांधला. मग संथपणे जिना चढून ती वर गच्चीवर गेली. तिथे एका कोपऱ्यात मोठी दुर्बीण बसवलेली होती. ती आसनावर बसली आणि दुर्बिणीच्या भिंगातून पाहू लागली. आकाशाची कमान निरखण्यासाठी तिने दुर्बिणीचा दांडा काळजीपूर्वक फिरवला आणि हळूहळू, लक्षपूर्वक तिने दुर्बिणीचं भिंग सूर्यावर स्थिर केलं. तिथं, त्या दूरच्या ताऱ्याच्या आसपास एक ग्रह होता ज्याच्याभोवती एक इटुकलं आकाशयान प्रदक्षिणा घालत होतं आणि त्या यानाच्या पोटात तिचं बाळ होतं.

या इतक्या अंतरावरून तिला ते यानही दिसत नव्हतं आणि तो ग्रहदेखील दिसत नव्हता; पण तिला माहीत होतं, की ते तिथं आहे – त्या फसव्या अंधाऱ्या अवकाशाच्या पोकळीत.
आत्ता काय करत असेल आरुषी? ती त्या दूरच्या प्रवासाला निघून गेली त्याला जवळजवळ पाच वर्षं झाली आणि तरी त्या काळात तिची लेक केवळ एका वर्षाने मोठी झाली असेल. त्यातदेखील त्या वर्षाचा अधिकांश भाग तिने झोपेतच घालवला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने तिच्या आईने स्वर्गावर राहून जी दीर्घ पाच वर्षं घालवली होती त्या काळात आरुषी फक्त तीन महिनेच आयुष्य जगली होती.
त्या पाच वर्षांत कितीतरी गोष्टी घडल्या होत्या – रॉल्फच्या आग्रही प्रेमाने तिचे लाड केले होते, एक संकोची चित्रकार असण्याच्या अवस्थेतून तिचं एका निश्चित शैली असलेल्या कलावंतात रूपांतर झालं होतं, ज्या घरात तिने आपल्या तान्ह्या मुलीचं एक धाडसी अवकाशयात्री होईपर्यंत संगोपन केलं होतं, त्या घरात अनेक वर्षं ती एकटी राहिली होती. तो सगळा काळ आरुषीच्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हता काय? इतका सापेक्ष असेल तर काळ म्हणजे नक्की काय? एक भास? तिच्या आयुष्यात इतकं काही घडलं आणि त्याच दरम्यान आरुषीच्या आयुष्यात इतकं कमी कसं काय घडलं? नाही, तिथेच ती चूक करत होती. त्याच दरम्यान म्हणणं चुकीचं होतं. तिच्यासाठी पाच वर्षांचा काळ उलटला होता पण आरुषीसाठी केवळ एकाच वर्षाचा काळ व्यतीत झाला होता. आरुषीने केवळ कमी अनुभवलं होतं आणि तिने स्वतः खूप काही – असं नसून तिला मिळाला तेवढा वेळ आरुषीला मिळालाच नव्हता. ती केवळ एकच वर्ष जगली होती आणि तिची आई पाच वर्षं जगली होती. पण एकाच अवधीत काळ वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळा कसा असू शकतो?
या वस्तुस्थितीमागचा शास्त्रीय सिद्धांत आरुषीच्या आईला पूर्णपणे ठाऊक होता; पण या सगळ्याचं मनाला पटेल असं आकलन होणं फार कठीण होतं. तिने एक उसासा सोडला आणि वरच्या तारांकित आकाशाकडे पाहिलं. इथेच, तिच्या मांडीवर बसून, तिच्या लेकीची नियती ठरली होती – त्याच ताऱ्यांनी लखलखणाऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर! नियतीने आरुषीला त्यांच्या ग्रहाच्या पलीकडे आणि काळ आणि अवकाश यांच्या सीमांच्या पलीकडे नेलं होतं. आरुषीच्या आईला तिची खूप आठवण येते; पण तिला माहीत आहे, की आता लेकीची वाट बघणं हे तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. तिच्या आयुष्यात एक निश्चित असं लक्ष्य आहे.
———————————————————————————————
प्रकरण चौदावे समाप्त
