धर्म नावाची मजेशीर गोष्ट

समाज कुटुंबाचा बनलेला असतो. ही कुटुंबे वेगवेगळे धर्म बाळगून असतात.

 कुटुंबात  जन्म झाला, की आपण त्या कुटुंबाच्या धर्माचे बनून जातो.  कुटुंब हिंदू असेल तर आपण आपसूक हिंदू म्हणून ओळखले जातो. एवढ्यावर संपत नाही.

ज्या धर्मात जन्म झालाय त्या धर्माचा अभिमान बाळगण्याची पद्धत असते. त्या पद्धतीनुसार आपण जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा अभिमान बाळगायला लागतो.

एकप्रकारची सक्तीच असते ती. कोणी विचारत नाही, ‘तू ज्याबद्दल अभिमान बाळगतो आहेस त्याची तत्त्वं विचार तुला मंजूर आहेत का? तू त्याबद्दल काही वाचले आहेस का?’ 

काय वाचणार!

ज्या वयात अक्षर ओळखदेखील नसते त्या वयात आपण एका धर्माचे बनून  अभिमान बाळगायला लागलो  असतो. 

गंमत इथूनच सुरू होते.

हिंदू कुटुंबात जन्मलो, की हिंदू धर्माचा अभिमान बाळगायचा.

मुस्लीम कुटुंबात जन्मलो, की मुस्लीम धर्माचा अभिमान बाळगायचा. सामाजिक  रूढीप्रमाणे वागायचं. 

धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी विशेष काही करावं लागतं का? 

… तर काही नाही. 

माझ्या धर्माचा मला अभिमान आहे असं बोलावंदेखील लागत नाही.

एक मात्र  महत्त्वाचं ! अभिमान बाळगण्यासाठी आपला धर्म नुसता चांगला असून भागत नाही – आपला धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असावा लागतो 

आणि अर्थातच आपला धर्म श्रेष्ठ असण्यासाठी दुसरा धर्म कमी प्रतीचा  – म्हणजे कनिष्ठ असायला लागतो.

एक गंमत म्हणजे ज्याला आपण कनिष्ठ किंवा खालच्या प्रतीचा समजतो त्या धर्मात आपण जन्माला आलो  तर?

 तो धर्म श्रेष्ठ असं आपल्याला मानणं भागच आहे.  दुसरा  कनिष्ठ  समजणं हे ओघानेच आलं. 

आपली रेषा मोठी आहे असं मानण्यासाठी शेजारची रेषा लहान नको का! 

आणखी गंमत म्हणजे – 

 ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माचा आपल्याला अभिमान आहे, असणारच, असं लोक गृहीत धरून चालतात.

एकूण धर्म म्हणजे मोठा गडबडगुंडा आहे. 

पण धर्म नावाच्या या गमतीतून त्रासदायक गोंगाट निर्माण होतो. चेंगराचेंगरी होते, त्यात भक्त त्यांच्या बांधवांच्या पायाखाली तुडवले जातात… आमचा देव, तुमचा देव अशी भांडणं होतात, मारामाऱ्या दंगे होतात… लढाया होतात. रक्तपात होतो.  शाळांवर बॉंब पडतात, निरपराध मुले मारली जातात.

अर्थात, मरण पावलेले जीव दुसऱ्या धर्माचे असतील तर आपल्याला शोक करायचं कारण नसतं…

वर्तमानपत्राचं पान  उलटलं, की बातमी दृष्टीआड होते आपण लागलीच नाटक सिनेमाच्या जाहिराती पाहू लागतो.

___________________

Author

One thought on “धर्म नावाची मजेशीर गोष्ट

  1. कुणीसं म्हटलंय….”धर्म ही अफूची गोळी आहे”, हे शंभर टक्के खरं आहे.धर्माच्या नावाखाली स्व-संवेदना बधिर करून परधर्मी लोकांवर अनन्वित अत्याचार करणारी मंडळी पाहिल्यास हे पटून जाते.
    हे केवळ आज नव्हे,अनादि काळापासून चालत आले आहे,सर्व धर्माचे लोक कमी अधिक प्रमाणात दोषी आहेतच.
    या अफूच्या गोळीचा अंमल कमी करून सर्व धर्म समभाव कसा आणता येईल,याबाबत कोणी ठोस प्रयत्न करताना ही दिसत नाही,तोपर्यंत तिचा प्रभाव रहाणार याबद्दल मला तरी शंका वाटत नाही !

Leave a Reply