भारताच्या फाळणीचा इतिहास हा केवळ भूगोलाच्या नकाशावर ओढलेल्या रेषांचा इतिहास नाही; तर तो मानवी संवेदना, विश्वास आणि स्वप्नांच्या बघता- बघता झालेल्या धुळधाणीचा इतिहास आहे. महात्मा गांधींच्या सहवासात वाढलेले आणि गांधीविचारांचे थोर भाष्यकार नारायणभाई देसाई यांनी लिहिलेल्या ‘जिगरना चिरा’ या मूळ गुजराती पुस्तकाचा ‘हृदयाची फाळणी’ या नावाने डॉ. विश्वास पाटील यांनी केलेला मराठी अनुवाद, फाळणीच्या जखमांकडे पाहण्याचा एक नवा आणि अंतर्मुख करणारा दृष्टिकोण देतो.हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे श्रेय जळगावच्या ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ला जाते. गांधीजींचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे फाउंडेशन व अनुवादक गेल्या अनेक वर्षांपासून व्रतस्थपणे काम करत आहेत. ‘हृदयाची फाळणी’ हे त्यांचे १२ वे प्रकाशन असून, अनुवादित आणि स्वतंत्र साहित्याद्वारे त्यांनी गांधीजींच्या विचारांची मशाल तेवती ठेवली आहे. प्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांनी साकारलेले मुखपृष्ठ प्रस्तुत पुस्तकाच्या विषयाची संवेदनशीलता पहिल्या दर्शनातच अधोरेखित करते.
पुस्तकाला लाभलेली समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांची प्रस्तावना म्हणजे या ग्रंथाचा आरसाच आहे. नंदी यांनी आजच्या काळातील ‘गांधीविरोधी’ मानसिकतेवर कडक प्रहार केला आहे. त्यांच्या मते, समाजात असा एक वर्ग आहे ज्याला गांधीजी हे ‘भूतकाळाचे ओझे’ वाटतात. भारताला पाश्चात्त्य धर्तीवर एक ‘आधुनिक राष्ट्र राज्य’ (Modern Nation State) बनवण्याची घाई असलेल्या या लोकांसाठी ‘गांधीवंदना’ हे केवळ एक नाईलाजाने करावे लागणारे कर्मकांड उरले आहे.नंदी यांचे एक निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे : १९४०च्या दशकात गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे शहरी मध्यमवर्गाच्या हातातून काढून घेऊन ती ग्रामीण जनसामान्यांकडेसोपवली. यामुळे राजकीय सत्तासंतुलन बिघडले आणि मध्यमवर्गात गांधींच्या अहिंसेबद्दल व राजकारणाबद्दल एक सुप्त बेचैनी निर्माण झाली. गांधीजींना अभिप्रेत असलेले विकेंद्रित, ग्रामकेंद्रित आणि पर्यावरणाशी नातं सांगणारे स्वराज्य या वर्गाला पचनी पडले नाही. आजच्या जागतिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर आजही गांधीजींची ही मांडणी किती महत्त्वाची आहे, याचा विचार करायला ही प्रस्तावना भाग पाडते.
लेखक नारायणभाई देसाई यांच्यादृष्टीने हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नसून त्यांच्या ‘वैयक्तिक शोधयात्रेचा’ एक टप्पा आहे. नई तालीम, भूदान, शांति सेना आणि जेपींच्या संपूर्ण क्रांती चळवळीत स्वतःला झोकून देणाऱ्या नारायणभाईंनी या ग्रंथातून फाळणीच्या नैतिक पराभवाचे विश्लेषण केले आहे. नारायणभाईंनी भारतभर गांधी कथा निरूपण केले हे आपल्याला माहीत आहेच. गांधीजींच्या आयुष्यातील शेवटच्या दशकाचे त्यांनी ‘स्वर्गारोहण पर्व’ असे नामकरण केले आहे. हे पर्व जनतेच्या धडपणे लक्षात आलेले नाही असे नारायण भाईंचे कथाकथनाच्या निमित्ताने भ्रमण झाल्यानंतरचे मत बनले. अजूनही बऱ्याच लोकांना गांधीजीच फाळणीसाठी जबाबदार आहेत असे वाटते. फाळणीच्या संदर्भात भारतात विपुल साहित्य लिहिले गेले आहे. लेखकाच्या मतानुसार कमी-अधिक प्रमाणात या दोषाचे खापर कुणाच्यातरी माथी फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत.आपल्या देशातल्या जातीवाद व संप्रदायवाद आणि इंग्रजांच्या साम्राज्यवादात या फाळणीचे मूळ आहे असा नारायणभाईंचा अभिप्राय आहे. गांधीजींना आपल्या नजरेसमोर देश खंडित झालेला पाहावा लागला. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी यासाठी आपण दोषी आहोत असे समजून स्वतःचा दोष शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तर कदाचित त्यांना मिळालेही. हे उत्तर फार भेदक होते.’ इथपर्यंत आपण जी अहिंसा आचरली ती शूरवीरांची नसून भित्र्यांची अहिंसा होती’ हा त्यांचा निष्कर्ष सुन्न करून टाकणारा आहे. हा निष्कर्ष काढून गांधीजी स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी लगेच या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक उपायही सांगितला.
गांधीजींचा फाळणीला असलेला विरोध हा देशातील सर्वधर्मीय लोकांवरील ‘प्रेमातून’ आलेला होता. “भौगोलिक फाळणी झाली तरी हृदयाची फाळणी होऊ देणार नाही,” हा तो उपाय. ही गांधीजींची दूरदृष्टी होती. याउलट, फाळणीला विरोध करणारे इतर अनेक गट हे समोरच्याबद्दलच्या ‘वैरभावनेतून’ अखंडतेचा नारा देत होते. हा प्रेम आणि द्वेष यांतील मूलभूत फरक नारायणभाईंनी स्पष्टपणे मांडला आहे.
पुस्तकाची मांडणी २२ प्रकरणांत विभागलेली आहे. या शोकांतिकेच्या केंद्रस्थानी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटीश सत्ता हे तीन मुख्य पक्ष आहेत. पुस्तकाची सुरुवात ‘एकला चालो रे’ या प्रकरणाने होते, तर शेवट ‘योजिलेले राहिले अधुरे’ या प्रकरणाने होतो. सुरुवात आणि शेवट गांधीजींच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची अस्वस्थ जाणीव करून देते.लेखकाने फाळणीच्या मुळाशी असलेल्या एका विचित्र सत्यावर बोट ठेवले आहे : “फाळणीला मान्यता देणाऱ्या नेत्यांचा परस्परांवर विश्वास नव्हता; पण फाळणी करणाऱ्या इंग्रजांवर मात्र दोन्ही पक्षांचा आंधळा विश्वास होता.” ही विसंगतीच फाळणीच्या वेळी भारतात व पाकिस्तानात झालेल्या विनाशाला कारणीभूत ठरली.
नारायणभाईंनी हा ग्रंथ ‘खुदाई खिदमतगार’ संघटनेला अर्पण केला आहे. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान (सरहद्द गांधी) यांनी अहिंसेच्या मार्गाने दिलेला लढा आणि फाळणीनंतर त्यांना मिळालेली वागणूक हे या पुस्तकातील सर्वात अस्वस्थ करणारे प्रकरण आहे. ज्यांनी आयुष्यभर गांधीजींच्या अहिंसेवर विश्वास ठेवला, त्यांना फाळणीने ‘लांडग्यांच्या समोर फेकले,’ ही भावना वाचकाच्या काळजाला भिडते. गांधीजींना जी वीरांची हिंसा अपेक्षित होती ती प्रत्यक्षात आणणाऱ्या सरहद्द गांधींना फाळणीच्या वेळी वाऱ्यावर सोडण्यात आले हे दुर्दैवी सत्य आहे.
मुस्लिम लीगची स्थापना आणि बॅरिस्टर जिना यांच्या अहंकारी व्यक्तिमत्त्वाचा आलेख लेखक प्रभावीपणे मांडतात. केवळ राजकारणच नाही; तर हिंदी-उर्दू भाषावाद आणि ‘नई तालीम’सारख्या शैक्षणिक प्रयोगांना लीगने दिलेली धार्मिक वळणे कशी फाळणीला पूरक ठरली, याची सूक्ष्म निरीक्षणे येथे आढळतात. उदाहरणार्थ : मध्यप्रदेशातील एका अध्यापन महाविद्यालयाला ‘मंदिर’ नाव दिल्याने निर्माण झालेला वाद आणि त्याचे राजकीय भांडवल कसे झाले, हे आजच्या काळातही विचार करायला लावणारे आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी केलेले खेळ या पुस्तकात उघड केले आहेत. चर्चिलपासून ते शेवटचे चार व्हाईसरॉय – आयर्विन, लिनलिथगो, वेवेल आणि माउंटबॅटन यांनी व त्यांना मदत करणाऱ्या गोऱ्या नोकरशाहीने इंग्लंडचे आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी कशी चालबाजी केली, याचे पुरावे लेखक देतात. विशेषतः शेवटच्या तीन व्हाईसरॉयांवर लिहिलेली प्रकरणे ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. सर्वसाधारणपणे मजूर पक्षाचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली हे भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत उदारमतवादी होते असे समजले जाते; परंतु त्यांनीदेखील याबाबतीत इंग्लंडचा प्राधान्याने विचार केला हे या प्रकरणाच्या वाचनानंतर लक्षात येते. ‘ते स्मोक स्क्रीन डिप्लोमसीसाठी कुशल होते,’ हे एका अमेरिकन नोकरशहाचे त्यांच्याबद्दलचे मत खूप काही सांगून जाते.
माउंट बॅटन यांना१९४८च्या आत इंग्रज राजवट समाप्त करायची होती हे आपल्याला माहीत आहे; पण फाळणीसाठी ब्रिटनला जबाबदार न धरता हिंदी नेत्यांनीच स्वतःहून फाळणी मागून घेतली असे भारत, ब्रिटन आणि उर्वरित जगाने मानावे हा माउंटबॅटन यांच्या भारतातल्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा हेतू होता हे या पुस्तकातले त्यांच्याबद्दलचे प्रकरण वाचल्यानंतर आपल्याला स्पष्टपणाने कळते.
वल्लभभाई पटेल यांवर या पुस्तकात ‘सरदार’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्यांचे व महात्मा गांधींचे संबंध १९१६ ते १९४८ या प्रदीर्घ कालावधीचे. या दोघांच्या स्वभाव आणि तत्त्वज्ञानाचे वर्णन करताना लेखक जी विशेषणे वापरतो ती खूप काही सांगून जातात. गांधीजींचा आदर्शोन्मुखी व्यवहारवाद आणि सरदार यांचा व्यवहाराधिष्ठित आदर्शवाद.
नारायणभाई केवळ इतिहास सांगत नाहीत, तर गांधीजींच्या ‘शांति सेना’ आणि ‘सैन्यमुक्ती’ या संकल्पनांचीही मीमांसा करतात. हिंसा आणि अहिंसा यांच्या संघर्षात गांधीजींना जे स्वराज्य हवे होते, ते केवळ सत्तांतर नव्हते तर ते मानवी हृदयांचे परिवर्तन होते. फाळणीच्या वेळी जेव्हा सर्वत्र रक्ताच्या नद्या वाहत होत्या, तेव्हाही गांधीजी हृदयांची फाळणी रोखण्यासाठी प्रयत्नरत होते.
डॉ. विश्वास पाटील यांनी ओघवत्या मराठी भाषेत या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. त्यांचे व नारायण भाईंचे दोन दशकांचे व्यक्तिगत संबंध होते. त्यांनी महात्मा गांधींच्या सामाजिक आणि सैद्धांतिक स्वरूपाच्या वेदना मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. मूळ गुजरातीतील आशय आणि संवेदनशीलता मराठीत आणणे हे तसे आव्हानात्मक काम होते. शिवाय विषय ही तितकाच संवेदनशील आहे. परंतु अनुवादकाने अत्यंत गांभीर्याने हा विषय हाताळला आहे. काही ठिकाणीहे भाषांतर म्हणावे तेवढे प्रवाही वाटत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर या पुस्तकातील पान क्रमांक १७२ वर अब्दुल गफार खान यांचे, “या तत्त्वाने आमच्या सुदृढतेला छिन्नभिन्न करून टाकलेय,” हे उद्धृत. यातील एका प्रकरणाचे ‘गजग्राह’ असे शीर्षकआहे. ज्याला भारतीय पुराणांविषयी थोडीफार माहिती आहे त्याला यातील गजेंद्र मोक्षाचा संदर्भ लक्षात येईल पण इतरांसाठी ते थोडे अवघड जाऊ शकते. अनुवादकाने एखादी तळटीप देऊन स्पष्टता आणायला हरकत नव्हती.
पुस्तकात पान क्रमांक १६२ वरती ‘वन मॅन बाउंड्री कमिशन’चा उल्लेख आहे. माउंटबॅटन यांनी गांधीजींचे कलकत्त्यातले एकहाती केले गेलेले अद्भुत शांतिकार्य पाहून त्यांच्यासाठी हे शब्द योजले होते असे लिहिले आहे. ते शब्द ‘वन मॅन बाउंड्री फोर्स’ असे आहेत. सिरिल रॅडक्लिफ या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फाळणीची रेषा कायम करण्यासाठी जे कमिशन नेमले गेले होते त्याला ‘वन मॅन बाउंड्री कमिशन’ म्हणून ओळखले जाते. या प्रकरणाच्या पान क्रमांक १०३ वर १९४८ असा सनाचा चुकीचा उल्लेख झालेला आहे.
‘हृदयाची फाळणी’ हे पुस्तक म्हणजे केवळ फाळणीचा इतिहास नाही, तर तो आपल्या काळातील हिंसा आणि द्वेषाच्या वातावरणात शांततेचा शोध घेणारा एक पथदर्शक ग्रंथ आहे. ज्यांना महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे शेवटचे दिवस आणि फाळणीची खरी वेदना समजून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे. गांधीजी या युद्धात हरले असे वाटत असले, तरी त्यांचे ‘हृदयांची फाळणी’ टाळण्याचे स्वप्न आजही जगाला वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.
पुस्तकाचे नाव : हृदयाची फाळणी,भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजी (मूळ गुजराती : जिगरना चिरा)
लेखक : नारायणभाई देसाई
अनुवाद : डॉ. विश्वास पाटील
प्रकाशक : गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव


