बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे…
४७ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणाच्या तीव्र इच्छेतून एकत्र आलेली आपापल्या शाळांतील हुशार मुलंमुली.
एकमेकांसाठी जवळजवळ सगळेच अनोळखी …
कुणी डॉक्टरांचे, कुणी सरकारी सायबांचे, काही शिक्षकांचे, काही बागायतदारांचे – पण बरेच जण सरकारी-निमसरकारी कामगारांच्या middle class बिऱ्हाडांतले…धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुण्यासह या जिल्ह्यांतील छोटी-मोठी गावं अन् अतिदुर्गम वाडी वस्तीवरील, गरीब, श्रीमंत, सवर्ण,अवर्ण, गौरवर्णी, कृष्णवर्णीय २०० विद्यार्थी…
देहबोलीतून डोकावणारा लाजरेपणा, बुजरेपणा, न्यूनगंड, गर्व,अहंकार, माज…
पण सामाजिक, आर्थिक,भाषिक,भौगोलिक परिस्थितीच्या न्यूनगंडाने पछाडलेलेच अधिक…
देहबोलीइतक्याच वेगवेगळ्या वेशभूषा, केशभूषा आणि बोली भाषा..
भाषेत पुणेरी, नगरी, खानदेशी लहेजा आणि बऱ्याच जणांचा न्यूनगंड वाढवणारा काही जणांचा फिरंगी लहेजा..
आपसांतील समान धागा पकडून एकमेकांशी करून घेतलेली ओळख… birds of the same feathers flock together च प्रत्यय देणारा.
भाषा, संस्कृती, जात, धर्म या धाग्यांनी आखलेल्या परिघात जमलेल्या मित्र-मैत्रिणींचं कोंडाळं… काहींनी पुणं पहिल्यांदा पाहिलेलं; तर काहींनी रेल्वे पहिल्यांदा पाहिलेली…
नुकत्याच झालेल्या थोड्याफार ओळखी! अंगावरील पांढरा शुभ्र एप्रन, गळ्यात स्टेथोस्कोप आणि हातात कनिंगहॅमचं पुस्तक… आत्मविश्वास वाढवायला पुरेशी सामग्री…
अ… अॅनॅटचा…ब … बायोचा…
क… कॅंटिनचा… ड…डिसेक्शनचा…
श्रीगणेशा सुरू झाला वैद्यकीय शिक्षणाचा…
Dissectionच्या टेबलावरील फाॅरमॅलीनने झोंबलेल्या डोळ्यांच्या पाण्यात मैत्रीची बीजं हळूहळू ओलावली…अंकुरली…पालवली… फुलली… आणि पुढील साडेचार वर्षांत फुलतच राहिली…. Artery, Vein, muscle, nerves, tendons… निर्जीव अवयवांची चिरफाड करताना टेबलाभोवतीच्या सजीवांत एक नवीन नातं विणलं जात होतं.
Testosterone आणि Estrogen चा ओव्हरबॅलन्स होण्याचं ते वय…पण तरीही मुलामुलींमध्ये संवाद कमी अन् संकोच जास्त… आपल्या क्रशला बीजेच्या कट्टयावर बसून न्याहळणं किंवा हाॅस्टेलच्या खिडकीतून डोकावून पाहणं… यातच सुख मानणारी ती पिढी…पण पुढील साडेचार वर्षांत बोलण्याचं धाडस करणारा दोनशेत एखाद दुसरा… त्यामुळे जवळपास शाळेसारखं वातावरण… छोटे छोटे गट…
मुलांचा, मुलींचा, सीटीलाईट, हाॅस्टेलाईट, देशी, फिरंगी…
वडासांबार, चहा अन् काही टेबलांवर सिगारेटचे झुरके. सगळंच कसं आपसांत वाटून चाखलेलं…
“आज तू दे, उद्या मी देईन”च्या बोलीवर चुकतं केलेलं शेट्टीचं बिल…
तर कधी TTMM
आठ-पंधरा दिवसांतून एकदा दोघां-तिघांत रिचवलेली एक बियरची बाटली…
ओठांनी ओलावलेली सिगारेट
आणि
भकारांत शिव्यांची देवाणघेवाण…
साबण, टूथपेस्ट, चपला, केसांचं तेल आणि गादीखाली लपवलेलं पिवळ्या कव्हरचं पुस्तक …कुणाचं का असेना…सार्वजनिक मालमत्ता असल्यासारखं कुणीही वापरायचं…
रविवारची मॅटिनी, दुर्गाची बिर्याणी, इराणी चहा… खिसा भरलेला असेल तर ब्लू नाईल किंवा दोराबजी
सहवासातून सुखवासाची अनुभूती देणारा सत्संग.
सामाजिक भेदाभेदांची सगळी ओझी खांद्यावरून फेकत पुढील साडेचार वर्षांत मैत्री नावाचा धर्म वाढत गेला… याच सुखाच्या निरागस समागमातून जन्माला आलेला मित्र नावाचा नातलग..
ना जातीचा ना पातीचा
ना रक्ताचा ना वंशावळीचा
ना जवळचा ना लांबचा…
पण
हाकेच्या अंतरावरचा…
एके काळचा अनोळखी पण आता जिवलग
मित्र नावाचा नातलग..
फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर…
साडेचार वर्षे भुर्रकन गेली… वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा पाहून पक्ष्यांचा थवा
अनेक दिशांत विखुरला… तो कायमचा…
काही ग्रॅज्युएटस् तर काही पोस्टग्रॅज्युएटस्…
सुई टोचणाऱ्या जीपीपासून ते मेंदू, हृदय, किडनी, हाडं आणि गर्भाशय लीलया सांभाळणारे आणि हाताळणारे तज्ज्ञ…..
हळूहळू खांद्याखांद्यांवर जबाबदारी वाढली…रोटी कपडा और मकानच्या पलीकडे काळानुरूप गरजा बदलल्या…
बदलल्या सुखाच्या कल्पना…
त्याच्या शोधासाठी पायाला भिंगरी…
झाल्या दिशा वेगवेगळ्या…
झाल्या वेगवेगळ्या वाटा…
काही स्वतःच्या… तर काही वहिवाटा…
पंखांत बळ भरलेल्या पाखरांनी आपआपलं आभाळ शोधलं…काही शहरात
तर काही दुर्गम भागात
कुणी लोकल तर कुणी ग्लोबल झालं
कुणी नोकरीत तर कुणी व्यवसायात गेले..
काही तालुक्यांत, शहरांत तर काही साता समुद्रांपार स्थिरावले…
संसाराची सप्तपदी चालता चालता कष्टाने मिळवलेली सुबत्ता आणि सटवाईने कपाळावर लिहिलेली सुखदुःखं भोगलेली पिढी… काहींनी मोजता येणार नाही इतकं मिळवलं तर कुणी सहन होणार नाही इतकं गमावलं… कुणाची सुखं मुठीत सामावलेली… तर कुणाची मिळकत बॅंकेच्या पासबुकातील पानावर मावतील इतकीच…
केसांनी रंग सोडला
डोक्याने केस सोडले
गुडघ्यांनी भार सोडला
पोटाने घेर सोडला
मेंदूने स्मृती सोडली
हृदयाने ताल सोडला
मणक्याने लवचीकपणा सोडला
बीपी, शुगर,संधिवात…
जेवणाच्यासोबत औषधं आली…
काहींची व्याधी गंभीर; तर काहींची अतिगंभीर
पण नशीब बलवत्तर आणि वृत्ती सकारात्मक म्हणून सर्जरी, केमो, ट्रान्सप्लांटवर निभावलं
तरी… अधून मधून कळणाऱ्या बातम्या ..
हा गेला…ती गेली… अरेरे…तो पण गेला…
…काही अकाली…काही ऐन उमेदीत तर काही हल्ली हल्लीच…
टिटव्यांची टिवटिव ऐकू आली की जाणवायचं…
“अरे जाण्याचं वय तर आपलंही झालंय की!
काय माहीत? कल हो ना हो…”
याच जाणिवेतून ४७ वर्षांनी एका हाकेवर यांतील बरीच पुन्हा एकदा जमली .
कुणी कारने, कुणी रेल्वेने, कुणी बसने तर कुणी विमानाने…
… पण आले..
काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले…
आपआपल्या विषयांतील शिरोमणी..
पण…
पद, प्रतिष्ठा अन् सुबत्तेपायी साठलेलं मीपणाचं ओझं घरातल्या उंबरठ्यावर सोडून जमला जणू वैष्णवांचा मेळा
आणि झाला सुरू आनंदसोहळा…
जमला मित्र-मैत्रिणींचा गोतावळा…
तोच उत्साह तीच निरागसता..
मीही तीच तीच तूही…
तोच मीही तोच तूही…
मीही तोच तीच तूही…
मीपणा नाही कुठे… घनदाट मैत्रीचा कुंज…
काही खूप जवळचे, काही जरा ओळखीचे, काही माहितीचे तर काही…” चेहरा ओळखीचा पण नाव आठवत नाही,” या कॅटेगरीतले…
तुतारी अन् ताशाच्याच्या निनादात तीस-पस्तीस वर्षांनंतर तिनं तिच्या मैत्रीणीला आणि त्याने त्याच्या मित्राला… कडकडून मारलेली मिठी…
कधीकाळी शेअर केलेल्या शेट्टीच्या चहापेक्षाही जास्त उबदारपणा.
फाॅरमॅलीनच्या वाफेशिवाय डोळे पाणावले.
पोटाची भूक ज्यांनी कधीकाळी वाटून खाऊन भागवली ते आज एकमेकांच्या भावनिक भुकेचे वाटेकरी होणार होते.
वयाची साठी केव्हाच मागे सरली तरी चवीपुरतं बालपण अजूनही गाठीला जपल्याने मनसोक्त कल्ला आणि निघालेले चीत्कार
नाव, आडनाव,टोपणनाव आणि सौम्य शिव्या वापरून मारलेल्या हाका…
मुलींचा गोंगाट नेहमीप्रमाणे हायपिचमध्ये होता…
का नसावा?
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जबाबदारीच्या कोषात अडकलेल्या सुरवंटांचं आज फुलपाखरू झालं होतं…
खूप वर्षांनी तो तिला आणि ती त्याला भेटली… तिच्या केसाने रंग सोडला होता… त्याच्या डोक्याने केस सोडलेले…नैसर्गिक वयानुसार ती आजी तर तो आजोबा होता.. एके काळी जिला तिरक्या नजरेने न्याहाळलं…जिला कधी थेट पाहण्याचं धाडस नाही केलं – ती आज हाताच्या अंतरावर उभी होती…
पण आज दोघांच्याही भावनांना हार्मोन्सची चौकट नव्हती. त्यामुळे शेकहॅंड करताना ना तिला संकोच होता ना तिच्या खांद्यावर हात ठेवताना त्याला stress होता… ना तो आज नर होता ना ती नारी होती… आज दोघेही होती फक्त दोन माणसं. स्त्री आणि पुरुष या लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन खूप दिवसांनी भेटलेले दोन मित्र…
लायब्ररी ते कॅंटीन…. लेक्चर हाॅल ते काॅमन रुम… ओपीडी ते ओटी…. पीएचसी ते सिव्हिल…इंटर्नशिप ते पीजी…या ठिकाणी जगलेल्या आणि जागवलेल्या क्षणांच्या आठवणींचा दुवा पुरेसा होता संवाद साधण्यासाठी.
दोघांचेही तळवे खरखरीत आणि कोरडे पण कधी काळी जपलेला आपुलकीचा ओलावा आजही जाणवला. काळाच्या ओघात उसवलेलं नातं पुन्हा विणलं जात होतं.
स्मितहास्य ते गडगडाटी हास्य… सगळं झालं…
औपचारिक अनौपचारिक हाय झालं, हॅलो झालं, हाउ आर यू पण झालं… गटागटाने फोटो झाले… चहा,काॅफी,बियर झाली… सिगारेटचे झुरके झाले…आणि मग सुरू झाला आयुष्याच्या संध्याकाळी मावळतीच्या साक्षीने बीजेचा शाळकरी दंगा… MGA तील गॅदरिंगचं छोटंसं प्रारूप…
श्रद्धांजलीच्या यादीत काही नवीन नावं आली होती… कुणाच्या अगदी जवळचं, कुणाच्या ओळखीचं तर कुणाच्या विस्मरणातलं नाव…
दोन मिनिटांच्या मौनात पुन्हा जाणवलं मृत्यू नावाचं वास्तव…
कृतज्ञतेचा पाॅडकास्ट झाला… स्किट झालं, स्क्विझ झाली… दबलेल्या,दाबलेल्या आणि साठवलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळालं… बाथरूम ते स्टेज…कराओकेच्या तालावर गाणाऱ्यांची हौस भागली… दुखरे गुडघे आणि ताठरलेल्या कंबरा… झिंगाटच्या ठेक्यावर आजी आजोबा सैराट झाले…असं वाटलं, “आज फिर जीनेकी तमन्ना है”
गोलमेजवर बैठका जमल्या… गप्पा, गोष्टी, दारू, स्टार्टर वाटाघाटी सुरू झाल्या… गारठलेल्या देहाला कॅंपफायरची ऊब मिळाली…रात्र संपूच नये… पिणारे आधीच झिंगलेले पण उत्तररात्री न पिणाऱ्यांनाही झिंग चढली… दिवसभराच्या आठवणींच्या उबदार पांघरुणात डोळा कधी लागला कळलंच नाही…
झुंजूमुंंजू उजेडात चहा झाला, काॅफी झाली…
चिमण्यांचा चिवचिवाट आणि कावळ्यांची कावकाव..
अस्ताव्यस्त पसरलेलं सामान बॅगेत आणि चोवीस तासांतील आठवणी मनात साठवून जड पावलांनी चेक आउट केलं…
“लवकरच परत भेटू या, ” या एकाच आशेवर विरहाची निराशा लपवत… बाय करणारे थरथरणारे हात दाखवत एका मागून एक गाड्या आपापल्या घरी निघाल्या…
गाडीत बसलेला प्रत्येक जण नियतीकडे एकच गाऱ्हाणं मांडत होता…
पुढच्या गेट टुगेदरला श्रद्धांजलीच्या यादीत कुठलंही नवीन नाव जोडू नको रे देवा…
चला आपणही म्हणू या…
“व्हय महाराजा”
