आकाशवाणीचं हे ….
‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।
वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’
(उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.)
भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली. भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, समाजमाध्यमांच्या जोरदार आक्रमणामुळे आकाशवाणीचे काय होईल असे गेल्या काही वर्षांपर्यंत वाटत होते; परंतु आकाशवाणीनेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. स्वतःचे ॲप तयार केले. विविध समाजमाध्यमांचा वापर करून त्यांवरून आपले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजही आकाशवाणी भारतीय जनमानसातले आपले स्थान व विश्वासार्हता टिकवून आहे. शतकपूर्तीच्या या वळणा-वाटांचे सौंदर्य आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त उपसंचालक गोपाळ अवटी हे आपल्याला क्रमशः उलगडून दाखवत आहेत.
भाग १०
नवी स्पर्धा नवी आव्हाने
आकाशवाणीच्या यशापयशाचा विचार करण्यापूर्वी या माध्यमाने आपले व्यक्तिमत्त्व(कॅरेक्टर या अर्थाने) जपता जपता वेळोवेळी कात टाकून काळाला अनुरूप राहण्याचा कसाप्रामाणिक प्रयत्न केला आहे, हे पाहणे योग्य ठरेल.
मध्यम आणि लघुलहरींची खरखर अनेक वर्षं सहन केल्यावर १९८० नंतर एफ. एम.चे जाळे विणताच प्रसारणात तांत्रिक सुस्पष्टता आली आणि श्रोता टिकून राहण्यास मदत झाली. बातम्यांमधून वेळेवर माहिती, चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतातूनमनोरंजन, साहित्य-नाटक इत्यादींमधून स्थानिक लेखक कवींना वाव, शेती, महिला – युवावर्ग यांना त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी स्वतंत्र कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती, संशोधक – वैज्ञानिकांशी प्रश्नोत्तरे यांसारख्या आशयातून नवा विचार, वस्तुनिष्ठ – विज्ञाननिष्ठ संस्कार – असे सगळे ‘आशय चारित्र्य’ आकाशवाणीने सांभाळले. या व्यक्तिमत्त्वात गांभीर्यजास्त होते पण त्यात श्रोता विश्वासार्हता अनुभवायचा.
यादरम्यान सादरीकरणाची नवी उडती शैली, भाषेतील अति लवचीकता, अत्यंत अनौपचारिक मांडणीचा अॅप्रोच घेऊन खाजगी चॅनेल सक्रिय झाले. अगदी सुरुवातीला नावीन्य म्हणून युवा श्रोता त्याकडे खेचला गेलाही; पण ८-१० वर्षांत ही क्रेझ कमी होऊन पुन्हा रेडिओचा श्रोता ‘आकाशवाणी’च अधिक पसंत करू लागला. स्पर्धा होतीच – या स्पर्धेला पुरून उरणं सोपं नव्हतं. मिर्ची’ला ठसका असला तरी काहींना तो पसंत होता.अशा वेळी सादरीकरणात जरा लचिलेपण आणण्यासाठी आकाशवाणीला ‘फोन इन’ उपक्रमांचा फार सकारात्मक उपयोग झाला. हळूहळू ‘पत्रां’धारित स्वरूप मागे पडले.श्रोत्यांच्या पसंतीची गाणी लावताना त्यांच्याशी ‘जनरल’ गप्पा मारणे सुरू करण्यात आले.त्यांचे जीवन, त्यांचे प्रश्न, त्यांनी शोधलेली उत्तरं, त्यांच्या आवडीनिवडी यावर गप्पा रंगू लागल्या. श्रोत्यांना आपला आवाज ऐकू येऊ लागलाच; पण आपल्या भावनांना व्यासपीठ मिळाल्याचे समाधानही मिळू लागले. हळूहळू सामान्य गप्पांची जागा ‘थीम ओरिएंटेड’ कार्यक्रमांनी घेतली. विशिष्ट विषयावर श्रोते गप्पा मारू लागले, आपापली जीवनशैली – दृष्टिकोण सर्वांशी ‘शेअर’ करू लागले. एक मोकळा संवाद प्रस्थापित झाला. या प्रक्रियेचा आणखी एक फायदा पडद्यामागे जाणवत होता. सादरकर्त्यांमध्ये एक सुदृढ स्पर्धा निर्माण झाली. वेगळा विषय, वेगळी ट्रीटमेंट, आकर्षक प्रस्तुती यांची व्यावसायिक चढाओढ निर्माण होऊन ‘कंटेंट’ विस्तारला, आशय परिपक्व झाला. निव्वळ चिवचिवाट, बाष्कळ बडबड, प्रदूषित भाषा, मराठीचे धिंडवडे – असले आरोप आकाशवाणीवर कोणी केले नाहीत. ही फार जमेची बाजू होती आणि आजही आहे.
सगळ्या क्षेत्रांतल्या नामवंतांना, खेळाडूंना, कर्तृत्ववान व्यक्तींना आकाशवाणीच्या कार्यक्रमात आणण्याचा संबंधितांचा प्रयत्न असतोच; पण श्रोत्यांना आकर्षित करतील अशा ‘सेलिब्रेटीज’ना आणण्याचेही प्रयत्न आकाशवाणीने केले. श्रोतृसंख्या वाढवण्यात त्यांची छान मदत झाली. मुंबई विविध भारतीद्वारे याबाबतीत अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेतच; पणपुणे आकाशवाणीच्या ‘विशेष गीतगंगा’ कार्यक्रमातल्या यशस्वी प्रयत्नांचा इथे उल्लेख करणे अगत्याचे आहे. विविध भारती गीतगंगाच्या धर्तीवर मराठीत एखादा लोकप्रिय कार्यक्रम दीर्घकाळ चालावा ही इच्छा सादरकर्ते संजय भुजबळ यांनी परिश्रम आणि नियोजनपूर्वक कार्यान्वित केली. अमोल पालेकर, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, सई परांजपे, सुनील बर्वे, अनुराधा मराठे, शिवाजी साटम, महेश कोठारे, रोहिणी हट्टंगडी, विक्रम गोखले, सलील कुलकर्णी, राहुल रानडे अशा कितीतरी नामवंतांनी विशेष गीतगंगामध्ये हजेरी लावली, आपल्या पसंतीच्या गाण्यांचे उत्तम विश्लेषण सादर केले. श्रोत्यांनी या उपक्रमास मनमुराद दाद दिली. या मालिकेतील शंभरावा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झाला. सुबोध भावे यांनी तो सादर केला.
माझे एक सहकारी संचालक रमेश अगरवाल यांनी सांगितले, की आकाशवाणीच्यापोर्टब्लेअरसारख्या केंद्रानेही याच धर्तीवर ‘सितारों के संग’सारखा कार्यक्रम काही वर्षं चालवला. गानकोकिळा लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, आशा भोसले, जुही चावला, दारासिंग, शर्मिला टागोर, प्रेम चोप्रा, जितेंद्र, नाना पाटेकर, हृतिक रोशन यांसारखे कलाकार यात सामील झाले. आगरतळा (त्रिपुरा) केंद्रानेही असे काही कार्यक्रम सादर करताना राष्ट्रीय एकात्मता या विषयावर भर दिला होता.
कोक बोरोक (त्रिपुरी) आणि बंगाली भाषेतूनही हे कार्यक्रम सादर झाले. एका कार्यक्रमात त्रिपुराचे तत्कालीन मुख्यमंत्रीही (श्री. माणिक सरकार) सामील झाले होते.
आकाशवाणीचा श्रोतृवर्ग विस्तारण्याचे हे यशस्वी प्रयत्न होते. या प्रयत्नांना चौकार-षटकारांचे यश मिळवून दिले ते ‘अॅप’ तंत्रज्ञानाने. भारतभर आकाशवाणीला श्रोत्यांच्या पुनर्जोडणीचे यशस्वी प्रयत्न चालू ठेवण्यासाठी असे एक ‘अॅप’ हवे होते, जेणेकरून कोणतेही केंद्र कुठेही ऐकणे श्रोत्यांना शक्य व्हावे. प्रसारभारतीच्या तंत्रज्ञांनी लाईव्ह स्ट्रीमिंगची ही मोठी तांत्रिक झेप शक्य केली आणि आकाशवाणीची अक्षरशः ‘विश्वव्याप्ती’ वाढली.
‘न्यूज ऑन एअर’सारख्या अॅपमुळे कोणतेही केंद्र कुठेही – अगदी भारतभर नव्हे – तर जगभर ऐकणेशक्य झाले. हा डिजिटल तंत्रज्ञानाचा चमत्कार होता. यातूनच पुढे आकाशवाणीच्या बातम्या अनेक देशांत ऐकू जाऊ लागल्या. यूट्युब, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांवर त्यांना मिळणारा प्रतिसाद जबरदस्त होता. अनेक कार्यक्रमांच्या यूट्युब लिंक्स किंवा अॅपच्या प्रसारण लिंक्स शेकडो श्रोत्यांमध्ये ‘शेअर’ होऊ लागल्या आणि कार्यक्रमकर्मींच्या पदरात प्रतिसादाचे भरघोस दान पडत गेले. हे फार उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी होते. पूर्वी एखादा कलाकार बाहेरगावी असेल तर त्याला स्वतःलादेखील कार्यक्रम ऐकणे अवघड जायचे. तो काळ ट्रान्समीटरच्या प्रक्षेपण क्षमतेनुसार प्रायमरी टर्शरी लिसनिंग झोनचा होता.
आता डिजिटल प्रसारण आणि अॅपमुळे जुन्या संकल्पना कालबाह्य ठरल्या आहेत. उदा. : पं. संजीव अभ्यंकर आज आकाशवाणी केंद्रात रेकॉर्डिंग करून अमेरिकेस गेले आणि अन्यसाथीदार पुढच्या कार्यक्रमास कलकत्त्याला गेले तरी आपले प्रसारण ते ठरलेल्या दिवशी विनासायास, विनाव्यत्यय ऐकू शकतात. या ‘अॅप’च्या सुरुवातीच्या एका विशिष्ट काळात सर्वाधिक डाउन लोडिंग झाले म्हणून गुगलने आकाशवाणीस विशेष अभिनंदनाचे पत्र पाठवल्याचे तसेच म.टा.ने विस्तृत वृत्त दिल्याचे मला स्मरते. आकाशवाणीच्या आधुनिक प्रसारात अभियंत्यांचे हे मोठेच योगदान आहे. ‘न्यूज ऑन एआयआर’च्या धर्तीवर एआयआर रेडिओ (ऑल इंडिया रेडिओ लाईव्ह) सारखे आणखीही ‘अॅप्स’ पुढे आले. रेडिओ झोपड्या – टपऱ्यांपासून चालती कार, रेल्वे इत्यादीपर्यंत सहज पोहोचू लागला. अंतराची बंधनं जणू संपलीच! लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या या अॅपचा आनंद एकीकडे साजरा होत असताना आकाशवाणीचे समाजमाध्यमातील अस्तित्व अर्थपूर्ण आणि ठसठशीत करण्याचे आवाहन प्रसारणकर्मींपुढे होते. तरुण कार्यक्रम अधिकाऱ्यांनी हेही आव्हान सक्षमपणे पेलले. फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सर्व ठिकाणी आकाशवाणीचा आशयठळक उमटू लागला. ज्यांना प्रसारणाच्या ठरावीक वेळी कार्यक्रम ऐकणे शक्य नसेल, ते नंतर अन्य समाजमाध्यमांवर उपलब्ध रेडिओ कार्यक्रम, त्यांच्या लिंक्स यांचा उपयोग करू लागले. मोठ्या प्रमाणात ‘शेअरिंग’ आणि प्रसिद्धी – प्रोमोजचे कॅंपेन हेही त्यातून शक्य झाले.
‘जाहिरात विश्व’ हा आकाशवाणी जगतातील किती मोठा पसारा आहे, याची निश्चित कल्पना आपणांस या निमित्ताने यावी असे वाटते. १९८५ पूर्वी केवळ विविध भारतीवर असलेली जाहिरात ८५ नंतर आकाशवाणीच्या सर्वच विभागीय आणि स्थानिक केंद्रांतूनही अवतरली. जाहिरात हे स्वायत्त संस्था म्हणून प्रसार भारतीचे प्रमुख उत्पन्न स्रोत बनले. वार्षिक उत्पन्न साधारण ५०० कोटीपर्यंत नेऊन दाखवण्याची किमया आकाशवाणीने करूनदाखवली. विविध भारती, स्थानिक एफ. एम. केंद्रे, बातम्या यांचा या कमाईत सिंहाचा वाटा होता. सन २००० नंतर प्रत्येक केंद्राला आर्थिक कमाईचे उद्दिष्ट (टार्गेट) देण्यास सुरुवात झाली. अर्थार्जनाचे सिंहावलोकनही नियमित होऊ लागले. जाहिरातीसंदर्भात ‘कार्यक्रम’आणि ‘प्रसारण वेळा’ अशा दोन कॅटेगरीज करण्यात आल्या आहेत. केंद्रांची ही स्वतंत्र वर्गवारी आहे. त्यानुसार जाहिरातींचे दर सुनिश्चित आहेत. यात बार्गेनिंग नाही – डायरेक्ट बुकिंग डिस्काउंट मात्र आहे. माझे भाग्य, की आकाशवाणीच्या सर्वात मोठ्या केंद्रीय विक्री विभागाचा (सेंट्रल सेल्स युनिट) व जाहिरात प्रसारण केंद्राचा (सी. बी. एस.) संचालक म्हणून पाच वर्षे मुंबईत राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मला मिळाली. त्या अनुषंगाने हैद्राबाद, तिरुअनंतपुरम्, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, पणजी, भोपाळ, जयपूर इ. ठिकाणी अनेकदा बैठकांसाठी जाण्याची संधी मिळाली. भारतभर आकाशवाणीसाठी जाहिराती मिळवणाऱ्या दीड हजारांच्या आसपास नोंदणीकृत्त संस्था आहेत. या एजंसीज प्रायोजित कार्यक्रम, प्रायोजकत्व, जाहिरात, जिंगल्स, स्लोगन्स इत्यादी तयार करण्याचे काम कमिशन तत्त्वावर करतात. काही एजंसीजना ‘अॅक्रीडेशन’चा दर्जा मिळून ४५ दिवसांच्या क्रेडिटवरही काम करता येते. दिल्लीत आकाशवाणीचा मार्केटिंग विभागही कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातींची उलाढाल करतो. क्रिकेट सामने आणि प्रत्यक्ष वर्णन हे जाहिरातींचे मुख्य आकर्षण असते. फिनोलेक्स पाईप, जैन पाईप, आयुर्विमा, निरमा वॉशिंग पावडर,टूथपेस्ट, ज्वेलरी, रेनकोट, वह्या,व्हिक्स,सॅरिडॉन इत्यादी कितीतरी जाहिराती श्रोत्यांच्या स्मरणात असतील. काही वेळा जाहिराती ऐकताना श्रोता कंटाळतो; पण ‘आमदनी’ की बात असल्यामुळे काही पर्याय नसतो. एकूण काय – तर ‘पोहोचण्या’च्या बाबतीत आकाशवाणीला आकाश ठेंगणे झाल्याचा हा उत्कट ‘योग’ प्राप्त झाल्यावर जाहिरातींचा ओघ आणखी वाढला, कमाई वाढली. दडलेल्या शक्यतांना पुन्हा एकदा हात घालण्याची नव्याने संधी निर्माणझाली. किल्लारी भूकंप, अंदमनातील त्सुनामी आदी भीषण आपत्तींत जे स्मरणीय काम रेडिओने केले त्यापेक्षा अधिक प्रभाव नव्या तंत्रज्ञानातून साधण्याची हाक कल्पनाशक्तीला, उपक्रमशीलतेला मिळाली आहे. या हाकेला रेडिओवाले किती पुरणार हे काळच ठरवेल. या माध्यमाची सार्थकताच त्यातून नव्याने सिद्ध होईल. अस्तित्वाच्या लढाईत पहिली फेरी तरजिंकली असे मानू या. आता अर्थपूर्ण, समाजोपयोगी, विकासानुकूल, भावपूर्ण, आनंददायी आणि प्रभावी अस्तित्वाचे आव्हान शिल्लक आहे.
* * * * *
