शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

काही दिवसांपूर्वीचा  ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’मधील हा विलक्षण अनुभव – अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभूती असे म्हणू या हवे तर… 

नशीब म्हणा, योगायोग म्हणा, की काहीही असो, मला जंगलात किंवा सातारा शहराच्या आसपास, अगदी माझ्या घराच्या दारातदेखील  बिबट्याचे दर्शन पुष्कळ वेळा झाले आहे. प्रत्येक जंगल सफारीमध्येतर मला हमखास व्याघ्रदर्शन होणार हे नक्की असते. 

बिबट्या पुष्कळ वेळा मला अगदी निकट दर्शन देऊन गेला आहे. वाघ मात्र तसा दुर्मीळ. लहानपणी सर्कसमधील वाघ बघितला होता; परंतु सर्वात जवळून जंगलातील वाघ बघितला तो कर्नाटकातील कार्करली ते शृंगेरी प्रवासात घनदाट जंगलात! त्यालाही आता तीस वर्षे झाली. आम्ही सुमो गाडीमधून जात होतो. संध्याकाळची वेळ होती, घाटातील आणि घनदाट जंगलातील रस्ता होता आणि आमच्या गाडीसमोर अचानक भलामोठा वाघ आडवा आला. चालकाने करकचून ब्रेक मारला आणि त्या आवाजाने ह्या महाराजांनीदेखील दचकून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तीन फूट उंच कठड्यावरून पलीकडे जाताना काही क्षण तोंड वर काढले आणि नेमक्या त्याच क्षणी आमची गाडी तिथे थांबली. त्या विलक्षण क्षणी काचेच्या मागे गाडीमध्ये एका फुटावर मी बसलो होतो आणि काचेपलीकडे दीड फुटावर त्याचे तोंड होते. म्हणजे त्याच्या एका पंजाच्या अंतरावर मी होतो… मध्ये फक्त ती काही मिलीमीटर रुंदीची काच होती. मी त्या अद्भुत क्षणी त्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला होता. त्याची ती नजर आजही अंगावर शहारे आणते.

मला कितीतरी मित्र विचारतात, ‘वाघ-बिबटे बघताना तुला भीती नाही वाटत?’ मी सांगतो, ‘नाही.’ मला जंगलात फिरताना भीती वाटते ती फक्त तीन प्राण्यांची : एक म्हणजे अस्वल, दोन नंबर रानगवे आणि तिसर्‍या क्रमांकावर साप! या यादीमध्ये वाघ-बिबटे येत नाहीत. 

मला कधीही ह्या राजाची भीती वाटली नाही, त्याच्या हिरवट डोळ्यांच्या नजरेत जरब असते; परंतु आश्वासक अशी – दहशत किंवा भीती नाही. अगदी भारतीय किंवा आफ्रिकेमधील सिंहदेखील ह्या पदापर्यंत पोहोचलेले नाहीत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. 

जिम कॉर्बेट अभयारण्यातदेखील जेव्हा हे व्याघ्रमहाराज आमच्या जिप्सीकडे शांतपणे एकेक पाउल टाकत येत होते त्या वेळी मी हातात कॅमेरा असूनदेखील फोटो कमी काढत होतो आणि त्याच्या त्या रुबाबदार, डौलदार चालीकडे बघत बसलो होतो. अंदाजे तीनशे मीटर अंतरावरून महाशय अतिशय शांतपणे आमच्या दिशेने चालत येत होते. सर्वत्र सन्नाटा होता. त्याला कशाचीही फिकीर नव्हती – ना आमची, ना सभोवतालच्या जंगलाची! त्याच्याच मस्तीत तो येत होता, त्याच्याच जगात तो राहत होता, फिरत होता. आमची साधी दखलदेखील त्याने घेतली असावी, असे मला  वाटले नाही. त्याच्या राज्याचा तो अनिभिषिक्त सम्राट होता आणि त्याची त्याला खातरी होती. 

आमची सोडून इतर फक्त तीन गाड्या मागे होत्या. तो जसाजसा जवळ आला तसा तो अधिक रुबाबदार दिसत होता. त्याचा पिवळाधमक भव्य असा चेहरा, त्याच्या फेंदारलेल्या मिश्या, मिश्यांभोवती असणारे धारदार काटे, मध्येच बाहेर येणारी त्याची खरखरीत जीभ, त्याच्या कानांची हालचाल, आपल्या हाताच्या मनगटाच्या तिप्पट रुंदीचा त्याचा एकेक पाय आणि सर्वात भेदक अशी त्याची ती नजर! 

ती नजर आणि ते डोळे बघतच आदराने माझी नजर खाली वळली होती आणि दोन्ही हात छातीवर जोडले गेले होते. हा अनुभव कितीतरी वेळ घेतला,  मला वर्णन शब्दांत करताच येत नव्हते; परंतु आज शब्दबद्ध करण्यासाठी मला शब्द सापडले…

हीच ती भेदक नजर,

तीक्ष्ण आणि आरपार पाहणारी.

समझनेवालों को इशारा काफी है, हे सांगणारी!

हीच ती भेदक नजर,

समोरच्या व्यक्तीच्या नुसत्या शरीरातच नव्हे तर

मनामध्ये डोकावणारी!

हीच ती भेदक नजर, 

डोळे जरी हिरवे असले, 

तरी खोल कसे, तर  सरोवरासारखे

आतला थांगपत्तादेखील न सांगणारे.

हीच नजर असते खरी राजाची. 

नुसत्या दर्शनमात्रे नतमस्तक करायला लावणारी,

नुसत्या एका कटाक्षाने जरब बसविणारी.

हीच ती नजर असते,

दहशतीची परंतु तितकीच आश्वस्त करणारी.

हीच ती नजर, 

तिच्या एका कटाक्षाने,

आपण ‘त्याच्या’ साम्राज्यात आलो, हे सांगणारी.

हीच ती नजर,

‘मी सम्राट आहे, ह्या जंगलाचा,’ असे सांगणारी.

त्याची खातरी पटावी म्हणून, 

गर्जना करायची आवश्यकता काय?

हीच ती नजर असते,

विशाल दृष्टी म्हणजे काय, ते सांगणारी,

समोरच्या सर्व सृष्टी पसार्‍याला कवेत घेणारी.

हीच ती नजर असते, विश्वास देणारी,

खातरी पटवणारी,

कशाची म्हणून काय विचारता ?

हीच ती नजर आहे, जग जिंकणारी,

जंगलाच्या सम्राटाची!

हीच ती नजर असते,

शब्दाविना संवाद साधणारी.

ओठांच्या हालचालींची गरज कशासाठी?

आणि म्हणूनच,

संत तुकाराम महाराज उगीच नाही  म्हणत

नजर माझी ऐसी, भेदक स्वरूपाची ।

आश्वासक मायेची, प्रचिती जनां ॥ १ ॥

दोन्ही फोटो : संदीप श्रोत्री

Author

Leave a Reply